सोमवार, १ जुलै, २०१३

निखळ-१२: एन्जॉईंग द प्रोसेस..!




('दै. कृषीवल'मध्ये 'निखळ' सदराअंतर्गत सोमवार, दि. १ जुलै २०१३ रोजी प्रकाशित झालेला माझा लेख...) 
परवाच मुलीचं नव्या शाळेत ॲडमिशन केलं. पहिल्या दिवशी तिला सोडायला गेलो होतो. आधीची शाळा मला फारशी पसंद न पडल्यानं तिला नव्या ठिकाणी सोडताना कदाचित थोडी साशंकता माझ्या चेहऱ्यावर असावी. तिच्या क्लास टीचर समोरुन आल्या. त्यांना मी माझी, मुलीची ओळख करून दिली. त्यांनीही स्वतःचा परिचय सांगितला. कदाचित माझा चेहरा त्यांनी वाचला असावा. त्या म्हणाल्या, यू प्लीज डोंट वरी. आय ॲश्युअर ऑन माय साइड दॅट युवर डॉटर विल एन्जॉय ॲन्ड लव्ह द प्रोसेस ऑफ लर्निंग. त्यांच्या या वाक्यासरशी माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं (त्या क्षणापुरतं का होईना!) हलकं झाल्यासारखं वाटलं.  आजच्या काळात शिकण्याची प्रक्रिया आनंददायी बनविण्याची भाषा करणारा शिक्षक कधी-कुठे भेटेल, अशी अपेक्षा मला अजिबात नव्हती. तरीही माझ्या मुलीला तशी टीचर मिळाली, यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकेल? नाही तर, पालकांनी फक्त मुलांच्या डायरीवर दररोज नजर ठेवून राहायचं. अमूक मुदतीपर्यंत तमूक इतकी रक्कम ढमूक कारणासाठी भरा. विलंब झाल्यास दररोज ५० ते ५०० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. अशी सूचना वाचली की फटाफट जोडणा करायची आणि धाडकन ती रक्कम भरून उसासा टाकायचा, एवढाच काय तो मुलांच्या शाळेशी पालकांचा संबंध राहिलाय. भरपूर फी आकारणाऱ्या शाळांतून मुलांना घातलं की, आपण त्यांना क्वालिटी एज्युकेशन देतो आहोत, अशी पालकांची सरसकट भावना बनलेली असते. त्यामुळं शिक्षणाच्या त्या फॅक्टरीत आपला कच्चा माल घालायचा, आणि त्याला पैशांचं इंधन पुरवत राहिलं की, एन्ड प्रोडक्ट चांगलंच निघणार, अशी त्यांची धारणा असते. मात्र या सर्व घोळात शिक्षणाच्या प्रक्रियेकडं मात्र कुणाचंच लक्ष नसतं. ना शिक्षकांचं, ना पालकांचं; मुलांचं लक्ष असण्याचा प्रश्नच नाही, कारण त्यांना त्यांच्या दैनंदिन होमवर्क-असाइनमेंटमधून डोकं वर काढायला संधीच कुठंय?
खरंच, बघा ना! आपण मुलांना शाळेत घालतो शिकण्यासाठी. पण नेमकं काय शिकण्यासाठी, याचा विचार आपण करतच नाही. परीक्षेतील मार्क हाच पाया धरून त्याला आपण केवळ परीक्षार्थी म्हणूनच घडवणार असलो तर विद्यार्थी म्हणून त्याच्याकडून विद्यार्जनाची आणि शिक्षकांकडून तरी अध्यापनाची अपेक्षा आपण बाळगूच शकणार नाही. तथापि, व्यावहारिक जगामध्ये सक्षमपणे वावरण्यासाठी विद्यार्थ्यांची मूलभूत तयारी करवून घ्यायची झाल्यास त्यांना शिक्षणाच्या एकूणच प्रक्रियेविषयी प्रेम वाटलं पाहिजे, त्याचा आस्वाद त्यांना घेता आला पाहिजे. तितकी स्पेस, तेवढी मोकळीक त्यांना या व्यवस्थेमध्ये उपलब्ध करून देणं आपणा सर्वांचं कर्तव्य आहे.
भावी आयुष्यात विद्यार्थी त्याला जे बनायचं, ते बनेल; पण शिक्षणाच्या या प्रक्रियेविषयी त्याच्या मनात आस्था निर्माण झाली पाहिजे. आज आपण विद्यार्थ्यांना अगदी मॅकेनिकल पद्धतीनं घडविण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येकाला एकाच साच्यात आकार देण्याचे आपले प्रयत्न आहेत. या प्रत्येकाचा साचा वेगळा आहे, आकार वेगळा आहे, आवाका वेगळा आहे, क्षमता वेगळ्या आहेत, ही साधी गोष्टही आपण लक्षात घ्यायला तयार नाही. त्यातूनच शिक्षणव्यवस्थेविषयीचे अनेक प्रश्न आजघडीला निर्माण होत आहेत. पण मूलभूत गोष्टींपेक्षा आजूबाजूंच्या गोष्टींकडंच आपलं अधिक लक्ष आहे आणि तिथंच चुकतं आहे.
केवळ शिक्षणच नाही, तर प्रत्येक बाबतीमध्ये निर्मितीची, जडणघडणीची प्रक्रियाच ही खरी आनंददायी असते. हिमालय सर करणं हे साध्य झालं, पण त्या ध्येयप्राप्तीपर्यंत घेऊन जाणारा, आठ वेळा अपयश दाखविणारा आणि यशाचा मार्ग अधिकाधिक अधोरेखित करणारा मार्गच शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांना त्या शिखरापर्यंत घेऊन गेला. एडिसननं बल्ब बनविला खरा! पण एक बल्ब बनविण्यापूर्वी तो बल्ब अन्य ७०० प्रकारांनी बनविता येऊ शकत नाही, हा शोधही त्याला लागला, ते केवळ त्या निर्मिती प्रक्रियेमधील त्याच्या आस्वादामुळंच. या प्रक्रियेमधील प्रत्येक अपयशानं त्याला यशाच्या अधिकाधिक जवळच तर नेलं ना!
सृजनाचा, नवनिर्मितीचा आनंद तर आणखीच वेगळा. ठोकळेबाज थिअरी आणि प्रॅक्टीकलच्या जोरावर उद्याच्या भारताचे आशादायी संशोधक, नेतृत्व घडेल, ही समजूत खुळचटपणाची आहे. आणि त्या वाटेचा स्वीकार करण्यात, त्या वाटेनं आपली पोरं गुरासारखी पिटाळण्यात मात्र आपल्याला उलट मोठेपणाच वाटतो. अशा वेळी त्यांच्याकडून कुठल्या सृजनाच्या, नवनिर्मितीच्या, नवकल्पनेच्या आविष्काराची अपेक्षा करणार आहोत आपण? रुजण्याच्या वयात जर या कल्पनांची बीजं त्यांच्या सुपीक मनाच्या भूमीवर पडलीच नसतील, आपण ती पडूच दिली नसतील, तर फळाची अपेक्षा कुठल्या तोंडानं करायची?
मुळात मुलांनी काही वेगळं करावं, असं वाटणारे आणि तसं त्यांना करू देणारे पालक आज फार कमी आहेत. तसं त्यांना घडविणारे, मोल्ड करणारे, तयार करणारे शिक्षक थोडे फार असतीलही. पण त्यापेक्षा त्यांनी, मुलांना केवळ तेच ते आणि तेच ते शिकवून तयार करावं, अशा अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल तर खुलेपणानं, मोकळेपणानं मुलांना त्यांचं विश्व शोधायला ते कसे काय मदत करू शकतील?
आणि आजकाल मिडियामधून तर काय? केवळ गाणी म्हणणं आणि नाच करणं, या दोन गोष्टी म्हणजेच टॅलंट असा एक सरसकट निष्कर्ष दर्शकांच्या मनावर थेट बिंबवून रिकामे झालोत आपण. पण त्या व्यतिरिक्तही अन्य ६२ कला आपल्या संस्कृतीत आस्तित्वात आहेत, त्यांच्या आस्तित्वाची पुसटशीही जाणीव ना आपण ठेवली, ना पुढच्या पिढीला करून देतो आहोत. अशी काहीशी अर्धवट अवस्था आपल्या जगण्याची झाली आहे. तेच जगणं, तीच लाइफस्टाइल आपण पुढच्या पिढीवर लादतो आहोत. ठीक आहे, आपलं जसं असेल ते असो, पण त्यांना तरी ही शिकण्याची प्रक्रिया अनुभवू द्या, तिचा आनंद लुटू द्या. कधी तरी ते आपलं नाव काढतील- आईबापानं नुसतंच ओझ्याचा बैल केला नाही आपला, ते ओझं वाहण्यातला आनंद लुटायलाही शिकवलं, म्हणूनच आपलं जगणं सुसह्य झालं गड्या!’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा