बुधवार, ११ सप्टेंबर, २०१३

निखळ-१७: आनंदाचे डोही...!



 
(सोमवार, दि. ९ सप्टेंबर २०१३ रोजी 'दै. कृषीवल'मधील 'निखळ' या पाक्षिक सदराअंतर्गत प्रकाशित झालेला माझा लेख...)
दै. कृषीवलच्या तमाम वाचकांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आज घरोघरी मंगलमूर्ती गणरायाचं आगमन होतं आहे, आणि त्याच्या आमगनाच्या आनंदात, स्वागत सोहळ्यात आपण सारेच रममाण झालेले असाल. आपणा सर्व कोकणवासियांसाठी गणेशोत्सव हा खरं तर केवळ उत्सव नाही, तर त्याहून अधिक काही आहे. मला कोकणच्या गणेशोत्सवात एक गोष्ट नेहमी आवडते, ती म्हणजे या उत्सवाची भाविकता, त्याचं पावित्र्य जपण्याचा इथल्या स्थानिकांकडून खूप कसोशीनं प्रयत्न केला जातो. आणि चाकरमान्यांच्या आगमनामुळं या उत्सवाला जे एक स्नेहमेळ्याचं आनंदनिधान लाभतं, ते सुद्धा माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे.
मूळचा कोकणचा पण मुंबईत स्थायिक झालेला चाकरमानी मनुष्य एक वेळ दिवाळीला इकडं येईल की नाही, सांगता येणार नाही; मात्र, गणेशोत्सवाचे वेध मात्र त्याला (कदाचित रेल्वेच्या रिझर्वेशनमुळं असेल, पण) खूप आधीपासून लागलेले असतात. प्रवासात त्याला कितीही खस्ता खाव्या लागल्या तरी अखेरीस गावी पोहोचल्यावर त्याच्या मनाला लाभणाऱ्या समाधानाचं वर्णन अन्य कोणत्याच शब्दांत करता येऊ शकणार नाही. त्याच्या मनःस्थितीचा अनुभव त्यांनाच येईल, ज्यांनी कधी ना कधी अशा प्रकारे प्रवास करून उत्सवासाठी दाखल व्हावं लागलं आहे. आणि हो, त्याला अपवाद कमीच असतील, कारण कधी ना कधी इथल्या प्रत्येक चाकरमान्यानं तशा खस्ता खाल्लेल्या असतातच. मात्र हे सारं काही देवासाठी किंवा उत्सवासाठीच तो करतो का, असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा माझ्या मनाचा मला संमिश्र कौल मिळतो. कारण जो देव मानतो, त्याच्यासाठी तो नाकारण्याचा अधिकार कुणालाच नाही. (आणि नाकारला तरी तो ऐकतो थोडंच?) केवळ उत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी कोकणात येतो, असं म्हटलं तरी ते त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. कारण इथल्यापेक्षा जास्त साजरीकरण तर तो जिथं राहतो, त्या मुंबईत सर्वाधिक होतं. त्यातला गणेश राहतो, मांडवापुरता आणि उत्सवाचाच जल्लोष साऱ्या मुंबईभर ११ दिवस घरंगळत राहात असलेला दिसतो. त्यामुळं ते वातावरण सोडून तो कोकणात येतो, त्याचं कारण आणखी काही वेगळं असावं, असं मला वाटतं.
कोकणी माणसाबद्दल एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे हा माणूस फणसासारखा असतो- वरुन काटेरी अन् आतून गोड. हा इथल्या मातीतलाच गुण म्हणा ना! तो जेव्हा भिडतो तेव्हा थेट भिडतोच आणि भेटतो तेव्हा खूप खोल- एकदम आतून. मुंबईमध्ये पोटापाण्यासाठी गेलेल्या चाकरमान्याला तिथल्या निष्ठूर दुनियेत आपल्या आस्तित्वासाठी अनेक प्रकारचा झगडा मांडावा लागत असतो. संपूर्ण वर्षभर असल्या कचकडी दुनियेत वावरल्यामुळं त्याच्यावर कदाचित त्याचीच पुटं चढण्याची शक्यता असते. पण, गणेशोत्सवाच्या निमित्तानं हा चाकरमानी इथं येतो आणि पुन्हा आपल्या पूर्वरंगात रंगून नव्या जोमानं आणखी वर्षभरासाठी आपल्या रंगील्या दुनियेत दाखल होण्यासाठी बाहेर पडतो. पण त्याच्यातल्या सामाजिक संवेदना जागत्या ठेवण्याचं, मातृभूमीप्रती त्याच्या बांधिलकीची जाणीव त्याच्या मनात जागृत ठेवण्याचं काम गणेशोत्सव करतो, असं मला वाटतं.
गावाकडच्या लोकांमध्ये वावरताना अनुभवांची देवाणघेवाण होणं आणि त्यातून नव्या पिढीसाठी दिशादर्शन करण्याचं कामही या चाकरमान्यांच्या हातून कळत नकळत होत असतं. गावातल्या एखाद्यासाठी एखादा चाकरमानी आदर्श ठरतो आणि त्याच्या प्रगतीसाठी अप्रत्यक्षपणे साह्यभूत ठरतो, असंही घडू शकतं.
मुंबईतल्या गिरणीमध्ये काम करण्यासाठी म्हणून कोकणातला माणूस सर्वप्रथम तिथं दाखल झाला. मुंबापुरीच्या प्रगतीमध्ये रक्त-घाम गाळून ज्यानं आपलं योगदान दिलं, त्या लोकांमध्ये सर्वाधिक कोकणी माणूस होता, ही वस्तुस्थिती कोण नाकारू शकेल? अन् त्याच गिरण्या धडाधड बंद होऊ लागल्यानंतर तितक्याच वेगानं देशोधडीला लागणाऱ्यांतही हाच कोकणी माणूस सर्वाधिक होता, ही वस्तुस्थिती सुद्धा कोणी नाकारू शकणार नाही. एकेकाळी चाकरमान्यांच्या मनीऑर्डरवर जगणारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणासाठी त्याच्या रोजीरोटीवर झालेला आघात सहज पचवण्यासारखा नव्हता. तरीही कोकण त्यातून सावरला आणि कोकणी माणूस पुन्हा नव्या जोमानं आपलं आस्तित्व, स्वत्व सिद्ध करण्यासाठी पुढं सरसावला. या दरम्यानच्या काळात त्याचं बाँडिंग इथल्या मातीशी अधिक दृढ झालं आणि जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी कोकणी माणूस हे मातीचं इमान जपतो, याचं प्रत्यंतर मला इथल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून येतं. माणूसपणाच्या जाणीवा समृद्ध करण्याला, सामाजिक जाणीवेच्या कक्षा रुंदावण्याला हा उत्सव खरोखरीच साह्यभूत ठरू शकतो. त्या विकसित करण्याची क्षमता कोकणातल्या उत्सवात आहे. अन्य ठिकाणीही ती होती, पण आता ते या मूळ उद्देशापासून इतके भरकटले आहेत की, आता त्यांना त्याच्या साजरीकरणापासून आणि विकृतीकरणापासून रोखणे अशक्य आहे. काही ठिकाणी तर उत्सवाच्या नावाखाली थेट लोकांची लुबाडणूकच करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणच्या गणेशोत्सवाचं वेगळेपण आणि साधेपणातलं सच्चेपण मला खूप भावतं.
आता मुंबईचं साजरीकरणाचं लोण या भूमीवर दाखल होऊ पाहतंय. तसं झालं तर इथलं अन् तिथलं असा फरक उरणार नाही आणि कोकणची गणेशोत्सवामधली स्नेहमेळावा संस्कृतीच धोक्यात येईल, अशी मला साधार भीती वाटते. तसं होऊ नये, याची जबाबदारी आज प्रत्येक कोकणवासीय आणि प्रत्येक चाकरमान्यानं उचलायला हवी. कोकणच्या गणेशोत्सवाचं वेगळेपण, देखणेपण आणि सात्विकता जपली गेली तर मेट्रो शहरांतल्या चकचकाटालाही इथल्या उत्सवातला साधेपणा मागे सारेल. पण त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी तरी या निमित्ताने आपण कटिबद्ध होऊ या.
गणपती बाप्पा मोरया!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा