गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१३

निखळ-१९: इन्व्हेस्टमेंट!




माणसाला आयुष्यात सर्वाधिक कोणत्या गोष्टीची गरज असते?, असं जर विचारलं, तर सत्ता, पैसा, संपत्ती अशी मनी, मसल, पॉवर या भौतिक दृष्टीकोनातून बरीचशी उत्तरं येतील किंवा अगदीच दुसऱ्या टोकाची म्हणजे आत्मिक समाधान, शांती अशी अध्यात्मवादी उत्तरं येतील. आपली दैनंदिन निकड भागविण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या गोष्टींची गरज नाकारता येत नाही; तथापि, आयुष्य समाधानात जाण्यासाठी माणसाला माणसाचीच गरज असते, असं माझं या प्रश्नावर उत्तर राहील. मानव हा समाजशील प्राणी आहे, असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा या समाजशीलतेचं प्रत्यंतर दैनंदिन जीवनानुभवामध्ये येत असतं. सामाजिक बहिष्कृततेची शिक्षा ही म्हणूनच एखाद्या फाशीच्या शिक्षेपेक्षाही प्रभावी ठरते, असं म्हटलं जातं, ते त्यामुळंच. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा तर खऱ्याच, पण त्याही पेक्षा त्याची महत्त्वाची भूक आहे ती संवादाची. एक वेळ रागावलं, मारलं तरी एखादा मनुष्य खपवून घेईल, पण त्याच्याशी बोलणं टाकलं की त्याचा जो मानसिक, भावनिक कोंडमारा होतो, तो त्या मारण्यापेक्षाही खूप तीव्र ठरतो. संवादशास्त्रामध्ये संवादाच्या विविध प्रकारांबरोबरच आत्मसंवादालाही खूप महत्त्वाचं स्थान आहे. अगदी कोणीच नसेल बोलायला तरीही मनुष्याचा स्वतःशी संवाद सुरूच असतो. मेडिटेशन ही विधायक आत्मसंवादाची वरची पायरी मानली जाते. असो!
तर, विषय होता तो म्हणजे माणसाला माणसांचीच सर्वाधिक गरज असते आयुष्यात. आणि आपल्यासोबत, आपल्या पाठीशी आणि आपल्यासाठी इतके लोक उभे राहू शकतात, राहतात, यातून मिळणारं समाधान आणि जबाबदारीचं भान या दोन्ही गोष्टी आपल्या सर्वंकष वाटचालीमध्ये खूप मोलाच्या ठरत असतात. हे प्रकर्षानं जाणवण्याचं कारण म्हणजे गेल्या आठवड्यात या सहृदय माणुसकीचा मलाच अनुभव घेता आला. माझे बंधू अनुप जत्राटकर यांच्या स्त्री-भ्रूण हत्येच्या विषयावर आधारित द प्रॉमिस.. या सायको-शॉकर लघुपटाचा कोल्हापुरात प्रिमीअर झाला. (कृषीवलतर्फे आयोजित पहिल्या स्तंभलेखक परिषदेतील लघुपट महोत्सवात अनुप यांचा जलप्रदूषणावर आधारित पंचगंगा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला होता.) या प्रिमिअरसाठी समाजातील विविध स्तरांमधील नागरिकांना तसंच प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या संख्येनं असलेल्या आमच्या मित्र परिवाराला निमंत्रित करण्यासाठी आम्ही दोघे बंधूच फिरत होतो. प्रिमिअरच्या आधीचे दोन दिवस निव्वळ नियोजन आणि निमंत्रण वाटप या दोन एनसाठीच आम्ही घालविले. दसरा चौकातील चारशे आसन क्षमतेच्या राजर्षी शाहू सभागृहात २५०-३०० लोक आले तरी आपला कार्यक्रम यशस्वी होईल, अशी आम्हा दोघांत चर्चा झाली. पण, रविवारची सकाळ असूनही लोकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला की जवळपास सहाशे दर्शक उपस्थित राहिले आणि बसायला जागा मिळाली नाही, तरी जागा मिळेल तिथे- अगदी दरवाजात सुद्धा उभे राहून त्यांनी लघुपटाचा आस्वाद घेतला. हा हाऊसफुल्ल प्रतिसाद आम्हालाच नव्हे, तर मिडियातल्या मित्र-मैत्रिणींसाठीही अनपेक्षित अन् अनोखा होता. त्यामुळं लघुपटालाही हाऊसफुल्ल गर्दी होऊ शकते, याचं प्रत्यंतर द प्रॉमिस..च्या प्रिमिअरमुळं आलं, अशा शब्दांत कौतुकाचा वर्षाव माध्यमांनी केला. माझे गुरू व ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर सरांचा मला आवर्जून फोन आला. ते म्हणाले, तुम्ही कार्यक्रम तर छानच नियोजनबद्ध पार पाडलात; फिल्मही आवडली. पण, मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते ती इतका मोठा लोकसंग्रह तू करू शकलास याची. हीच तुझी खरी कमाई आहे. केवळ याच गोष्टीबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी फोन केलाय.मीही सरांना मनापासून धन्यवाद दिले आणि म्हणालो, सर, इतक्या मोठ्या संख्येनं लोकांनी आमच्या प्रेमाखातर येणं, हा माझ्यासाठीही खरंच खूप सुखद धक्का ठरला. आयुष्याच्या शेवटी यातले चार खांदे पुढं सरसावले, तरीही खूप समाधानाची आणि कृतज्ञतेची भावना माझ्या मनात असेल.
खरंच आहे ना! पैसा ओतून जमणाऱ्या गर्दीपेक्षा प्रेमाखातर जमणाऱ्या गर्दीचं मोल कुठल्या तराजूत करणार? जनसंपर्काच्या क्षेत्रात काम करत असतानाही मी नेहमीच माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला आणि नेहमी त्या सद्भावनांनाच साद घालण्याचं काम करत राहिलो. पैसा ओतला की सारं मॅनेज करणं सहज शक्य होतं, असं मत असणाऱ्यांचाही या क्षेत्रात वावर आहेच. पण, पैशामुळं येणारा माणूस हा तुमच्याकडं किंवा तुमच्यासाठी येत नाही, तो पैशासाठीच येतो. त्याचा ओघ थांबला की तो तुमच्यासोबत राहील, याची शाश्वती राहात नाही. त्यामुळं त्या गोष्टींना फाटा देऊन मी माझं काम शांत चित्तानं करत राहिलो. ज्या व्यक्तीसाठी, संस्थेसाठी, शासनासाठी काम करायचं, त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं. आणि या प्रामाणिक कामाच्या बळावरच माझा समाजातला आणि विशेषतः मिडियामधला मित्रसंग्रह मला जोडता आला. मिडियामधल्या लोकांशी मैत्री करत असताना त्यांना जपलं पाहिजे, यापेक्षा त्यांच्यापासून जपलं पाहिजे’, ही भावना लोकांच्या मनात अधिक असते. कशाला त्यांच्या वाटेला जा अन् दुखवा, अशी भावनाही असते. माझ्या बाबतीत मात्र या भावनेला थारा नाही. माझे मिडियात मित्र आहेत आणि माझे अनेक मित्र मिडियात आहेत, या दोन्ही प्रकारच्या मित्रांमध्ये मैत्रभावनेला सर्वोच्च स्थान असल्यामुळंच त्यांच्याशी अतिशय सद्भावनापूर्ण संबंध जोपासता येऊ शकलेले आहेत. आमच्या संबंधांमध्ये निखळ मैत्रीखेरीज अन्य कुठलाही हितसंबंधगुंतलेला नसल्यामुळंच मैत्रीतली गुंतवणूकच सर्वश्रेष्ठ आणि दूरगामी ठरली आहे. आयुष्यातली महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट हीच ठरली आहे आणि कमाईसुद्धा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा