शनिवार, १७ मे, २०१४

गोपाळ बोधे: द फोटोग्राफर विथ हेवनली व्ह्यू!



गोपाळ बोधे
काही क्षणांपूर्वी फेसबुक उघडलं आणि सतीश लळित सरांच्या एका पोस्टमुळं अक्षरशः मोठ्या धक्क्यात गेलो... काल नैनिताल इथं ज्येष्ठ हवाई छायाचित्रकार गोपाळ बोधे सरांचं निधन झाल्याची वार्ता त्यांनी दिलीय... ही बातमीच इतकी अनपेक्षित आणि सरांचं निधनही इतकं अकाली झालंय की त्यावर विश्वास ठेवणंच जड जातंय.. लळित सर कामात प्रचंड बिझी असतील, कालच्या लोकसभा निवडणूक निकालाच्या विश्लेषणाच्या जबाबदारीत गुंग असतील, ही जाणीव असूनही त्यांना फोन करून ही दुःखद बातमी कन्फर्म केली.. आणि दुर्दैवानं शेवटी त्यावर विश्वास ठेवावाच लागला... ज्येष्ठ विधिज्ञ व छायाचित्रकार अधिक शिरोडकर यांचं नुकतंच निधन झालं.. त्यांच्यापाठोपाठ बोधे सरांचं असं जाणं चटका लावणारं आहे.
बोधे सरांच्या नजरेतून मुंबई.
मुंबईमध्ये, मंत्रालयात बोधे सरांसोबत त्यांच्या छायाचित्रणाविषयी, राज्यातील अनमोल ठेव्यांविषयी, कास पठाराच्या जतनाविषयी अशा अनेकविध विषयांवर रंगलेल्या गप्पांच्या आठवणी मनात जागल्या आहेत. मी मुंबई सोडून निघताना अगदी अखेरच्या दिवशी मला आवर्जून भेटून कोल्हापूरला चालला आहेस, म्हणून खास भेट घेऊन आलोय, असं म्हणून त्यांनी महालक्ष्मीच्या छायाचित्रांचं आणि सोबत महाराष्ट्र व मुंबईच्या हवाई छायाचित्रांची त्यांची पुस्तकं मला भेट दिली होती तेव्हा त्यांच्या त्या अकृत्रिम प्रेमाच्या जिव्हाळ्यानं मी गहिवरुन गेलो होतो. गोपाळ बोधे यांच्या जाण्यानं भारताच्या इतिहासातला अग्रणी हवाई छायाचित्रकार तर काळाच्या पडद्याआड गेला आहेच, पण व्यक्तिशः मी सुद्धा माझा छायाचित्रणातील पितामह गुरू गमावला आहे.
गेटवे ऑफ इंडिया
गोपाळ बोधे यांना मी पहिल्या भेटीत सांगितलं होतं की, ते माझे पितामह गुरू आहेत. याचं कारण म्हणजे मी बीजेसीला असताना फोटोग्राफी हा विषय घेतला होता. तेव्हा शशिकांत मुळ्ये सर आम्हाला तो विषय शिकवायचे. स्वतः उत्तम इंडस्ट्रीयल आणि कॅसेट कव्हर फोटोग्राफर असलेल्या मुळ्ये सरांनी आम्हाला देशातल्या, जगातल्या वेगवेगळ्या छायाचित्रकारांचा परिचय करून दिला. त्या दरम्यान, बेटर फोटोग्राफीमध्ये गोपाळ बोधे यांच्या हवाई छायाचित्रांविषयी विशेष आर्टिकल वाचनात (विशेषतः पाहण्यात) आलं. भारतातल्या परिचित ठिकाणांची हवाई छायाचित्रं पाहिली आणि नेहमीच्या गोष्टींकडं पाहण्याच्या एका अभिनव विहंगम दृष्टीकोनाशीही आमचा प्रथमच नव्यानं परिचय झाला. गेटवे ऑफ इंडियाच्या तीन घुमटांचं हवाई छायाचित्र त्यावेळी जणू मनावर कोरलंच गेलं होतं.
राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहात असताना बोधे सर एकदा माझ्या कार्यालयात आले. रवींद्रमध्ये मुंबईच्या हवाई छायाचित्रांचं प्रदर्शन त्यांना भरवायचं होतं आणि उद्घाटक म्हणून त्यांना मंत्री महोदय हवे होते. ज्याची केवळ कामगिरी पाहून मी भारावलो होतो, ती व्यक्ती साक्षात माझ्यासमोर उभी होती. मी गोपाळ बोधे, असं त्यांनी उच्चारताच मी चटकन माझ्या जागेवरुन उठलो आणि सारे प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांना वाकून नमस्कार केला. हा त्यांच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. 
सरकारी कार्यालयातील एखाद्या अधिकाऱ्याकडून अशी वर्तणूक त्यांना पूर्णतः अनपेक्षित असावी. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, गेल्या पंधरा वर्षांपासून मी त्यांच्या कामगिरीचा भक्त आणि चाहता आहे. माझ्या गुरूंकडून आपला परिचय झाल्यामुळं आपण माझे पितामह गुरू आहात. त्यांनीही हसतमुखानं माझ्या बिरुदाचा स्वीकार केला आणि म्हणाले, माझं काम झालं नाही तरी चालेल, पण तुझ्यासारख्या चाहत्याची भेट झाली, हे महत्त्वाचं!’ सुदैवानं, त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मी भुजबळ साहेबांना घेऊन जाऊ शकलो आणि गंमत म्हणजे त्याठिकाणी तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर सरांचा त्यावेळी एक छायाचित्रकार म्हणून नव्यानं परिचय झाला. ते या उद्घाटनाला आवर्जून आणि गळ्यात कॅमेरा लटकावूनच उपस्थित होते. अधिक शिरोडकर यांच्यासारखे अनेक दिग्गज छायाचित्रकार तिथं आले होते. बोधे सरांच्या छायाचित्रकारितेच्या वर्तुळाचा तेव्हा पहिल्यांदाच परिचय झाला.
'मुंबई: एक विहंगावलोकन' या छायाचित्र प्रदर्शनावेळी मुंबईचे एक विहंगम छायाचित्र छगन भुजबळ यांना भेट देताना गोपाळ बोधे. शेजारी अधिक शिरोडकर.
त्यानंतर बोधे सर जेव्हा कधीही मंत्रालयात येत, आवर्जून मला भेटत. वेळ असला की खूप गप्पा मारत. त्यांचा स्वभावच मुळी अतिशय लाघवी होता. व्यक्तिमत्त्व अतिशय विनम्र. इतका मोठा माणूस पण वागण्या-बोलण्यात एक विशिष्ट विनम्रता असे. कामाच्या बाबतीत मात्र ते आग्रही आणि आक्रमक असत. सतीश सोनी सरांकडं एकदा बसले असताना कासच्या पठाराच्या संरक्षणाचा मुद्दा खूप आर्जवानं आणि तळमळीनं मांडत होते. त्यांचं सामाजिक आणि पर्यावरणीय भान त्यातून डोकावत होतं. कासच्या बचावासाठी कार्यरत गटामध्येही त्यांचा सहभाग होता. राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे ते सदस्यही होते. त्या मंडळामधील सदस्यही त्यांची तळमळ पाहून प्रभावित होत असत. महाराष्ट्र आणि गोवा शासनासाठी त्यांनी छायाचित्रणाच्या अनेक मोहीमा केल्या. लक्षद्वीपची त्यांची कामगिरीही लक्षणीयच. कोयना व्याघ्र प्रकल्पातील कॅमेरा ट्रॅप लावणं असो की, जीपीएस तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं राज्यातील पुरातत्त्व संरक्षित इमारतींचं संरक्षण करण्याचा मुद्दा असो, त्याबाबतीत बोधे सरांची तळमळ खूप मनापासून असे. त्यासाठी शासनाकडं पाठपुरावा करण्यासाठी ते सतत फेऱ्या मारत. महाराष्ट्रात पर्यटनाच्या इतक्या संधी आहेत, पण त्यांचा लाभ उठविण्यात आपण अजूनही कमी पडतो आहोत, असं त्यांना वाटत असे. आणि त्यात तथ्यही आहे.
बोधे सरांसोबत कासची सफर करण्याचा माझा मनोदय आता कधीच प्रत्यक्षात येणार नाहीय. २०१२मध्ये कोल्हापूरला जॉईन झाल्याच्या पुढल्याच महिन्यात त्यांचा कासला येतोय, तूही ये.असा फोन आला होता, पण मीच म्हटलं सर, यंदा शक्य होईलसं वाटत नाही. पुढल्या वर्षी नक्की.२०१३मध्ये आम्ही विद्यापीठातले सहकारी मिळून गेलो, तेव्हा बोधे सरांना फोन केला होता, पण ते दिल्लीत असल्यानं येऊ शकले नाहीत. तेव्हा ते पुढल्या वर्षी नक्की असं म्हणाले होते... पण आता ते पुढचं वर्ष कधीच येणार नाही, , ही खंत आयुष्यभर मनात राहणार आहे.
जंजिरा
अलीकडंच त्यांनी हवाई छायाचित्र काढणारं मिनीएचर हेलिकॉप्टर घेतलं होतं. त्याचा डेमोही कधी तरी दाखवतो म्हणाले होते... शिवाजी विद्यापीठात त्यांनी एखादं एक्झिबिशन किंवा वर्कशॉप घ्यावं, अशी माझी इच्छा होती... कधीही बोलव.. मी आहेच.. असं ते म्हणाले होते... या आणि अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला करायच्या होत्या... पण आता त्या कधीच प्रत्यक्षात येऊ शकणार नाहीत.
आज सॅटेलाइटपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं एरियल फोटोग्राफी हा तसा काही फारसा अवघड प्रांत राहिलेला नाही.. पण मूळचे नेव्ही ऑफिसर असलेल्या बोधे सरांना त्या काळात एरियल फोटोग्राफीची कल्पना कशी सुचली असेल आणि त्यानंतर झपाटल्याप्रमाणं त्यांनी या क्षेत्रात जी काही अतुल्य कामगिरी करून ठेवलीय, त्याला तोड नाही. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी हे पॅशन जपलं.. मुंबई: अ व्ह्यू फ्रॉम हेवन्स, महाराष्ट्र: अ व्ह्यू फ्रॉम हेवन्स, पोर्ट्रेट ऑफ इंडियाज् लाइटहाऊसेस, बर्ड्स आय व्ह्यू: फोर्ट्स, लक्षद्वीप: अ व्ह्यू फ्रॉम हेवन्स, प्लेसेस ऑफ वरशीप, गॉडेस महालक्ष्मी टेंपल ॲट कोल्हापूर: ‘शक्तीपीठ, कास प्लॅटू: महाराष्ट्राज् व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अशी अनेक पुस्तकं त्यांच्या या पॅशनची साक्ष देतात. अशाच एका मोहिमेवर असताना त्यांचं निधन व्हावं, यापेक्षा मोठा दैवदुर्विलास तो कोणता?
एका वाक्यात बोधे सरांचं वर्णन करायचं तर अ फोटोग्राफर विथ हेवनली व्ह्यू असंच करावं लागेल. केवळ छायाचित्रकार म्हणूनच नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून जीवनाकडं पाहण्याची त्यांची दृष्टीही खूप व्यापक आणि सजग होती. ते केवळ भारताचे पहिले एरियल फोटोग्राफर नव्हते, तर त्यांच्याच प्रयत्नानं खरं तर भारतात एरियल फोटोग्राफीची सुरवात झाली, असं म्हणता येईल. त्यांच्या जाण्यानं हवाई छायाचित्रणाच्या क्षेत्रात अफाट आणि अचाट कामगिरी करून भारताचा लौकिक वृद्धिंगत करणारा महान पायोनिअर एरियल फोटोग्राफर देशानं गमावला आहे.. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

1 टिप्पणी: