मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

‘शिवार सांसद’ विनायक हेगाणा





(‘तेजस प्रकाशनाच्या बदलते जग या दिवाळी वार्षिकांकाचं हे सातवं वर्ष. या वार्षिकांकाचा सलग सहाव्या वर्षी अतिथी संपादक होण्याचा बहुमान मित्रवर्य श्री. रावसाहेब पुजारी यांनी बहाल केला. त्यांचे शेतीप्रगती मासिक यंदा दिमाखदार तेरावा दिवाळी विशेषांक सादर करीत असताना गेल्या सहा वर्षांत तरुण मनांची स्पंदनं टिपण्याचा प्रयत्न करणाऱ्या बदलते जगनंही यंदा चेंजमेकर्स- वेगळ्या वाटा शोधणारी तरुणाई असा विषय घेऊन यंदाचा 'बदलते जग'चा अंक सादर केला आहे. गेल्या सहा वर्षांत या अंकानं तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून शैक्षणिक क्षेत्र, सोशल मीडिया, कौशल्य विकास, डिजीटल इंडिया, डिजीटल यूथ आणि दूरशिक्षण अशा विषयांचा वेध घेतला. आपण वाचकांनीही त्यांचे मनापासून, उत्स्फूर्त स्वागत केले. यंदा चेंजमेकर्स-वेगळ्या वाटा शोधणारी तरुणाई असा विषय घेण्यामागं काही विशेष कारणं आहेत. आजच्या तरुण पिढीवर मागील पिढ्यांकडून अनेक प्रकारचे आक्षेप घेतले जातात. आजचे तरुण वाया जाताहेत, ती करिअरविषयी जागरूक नाहीत, त्यांना सामाजिक भान नाही वगैरे वगैरे आक्षेपांचा त्यात समावेश असतो. आजचा तरुण नित्य या आक्षेपांना सामोरा जात असतो. पण, पूर्वीच्या पिढ्यांत नसलेली एक बेफिकीरी जरूर त्याच्यात आहे; ही बेफिकीरी म्हणजे नेमकं काय मनावर घ्यायचं आणि काय नाही, याचा विवेक त्याच्यात आहे. त्यामुळे तो यातलं काही मनावर न घेता आपले मार्ग धुंडाळण्यात धन्यता मानतो. याचा गैरअर्थ काढला जात असतो. पण, या अंकाचं काम करीत असताना या साऱ्या आक्षेपांना धुडकावून लावतील, अशी सोन्यासारख्या तरुणांची खाणच आमच्या हाती लागली. सुरवातीला असे तरुण मिळतील का, असा विचार आमच्याही मनी आला. पण अंक होता होईतो, पानांच्या मर्यादेत बसणार नाहीत, इतके कर्तृत्ववान तरुण आमच्या हाती लागले. यामध्ये अगदी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आदी विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर काम करणाऱ्या तरुणांपासून ते अगदी आपल्या अवतीभोवतीही कुठल्याही प्रसिद्धीची, मोबदल्याची अपेक्षाही न ठेवता काम करणारे तरुण आमच्या नजरेत आले. आमची पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन त्यातील काही निवडक तरुणांच्या कर्तृत्वाला आम्ही या अंकात स्थान देऊ शकलो आहोत. हा अंक वाचल्यानंतर हा केवळ शब्दरंजन नाही, तर एक प्रेरणास्रोताचा झरा आम्ही आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, हे आपल्या लक्षात येईल. आजचा आपला भोवताल अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे खरा, पण त्याचवेळी त्याला निश्चिततेचे ठोस आयाम प्रदान करणारे, सावरणारे तरुण हातही आहेत, हे वास्तवही खरेच! सकारात्मकतेच्या या प्रवासाचा आनंद आपल्यालाही यातून लाभेल. सारंच काही वाईट, चुकीचं होतंय, या धारणेला छेद जाऊन चांगलंही बरंच काही होतंय, चांगलं घडविण्याचा प्रयत्न करणारे आशेचे दीप उजळविणारे तरुण हातही आहेत. या हातांत आपल्या देशाचे भवितव्य सुरक्षित आहे, याची जाणीव वृद्धिंगत होईल. सकारात्मक सामाजिक जाणिवांचा, संवेदनांचा जागर या अंकाच्या माध्यमातून आम्ही मांडला. या अंकाच्या माध्यमातून असे काम करणाऱ्या काही तरुणांच्या कामगिरीचा वेध घेण्याचा प्रयत्न मी स्वतःही केला आहे. त्यातील लेख क्रमाक्रमाने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी 'बदलते जग'च्या सौजन्याने येथे पुनर्प्रकाशित करीत आहे. आपल्याला आवडतील, अशी अपेक्षा आहे.- आलोक जत्राटकर)




विनायक हेगाणा.. एक मनस्वी तरुण... एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन बी.एस्सी. अग्रीकल्चरला अडमिशन घेतलेला तरुण... हे ध्येय ना स्पर्धा परीक्षेचं होतं, ना प्रयोगशील शेतकरी बनण्याचं... त्याच्या मनात काही वेगळंच होतं... काम करायचं होतं त्याला शेतकऱ्यांसाठीच... पण, हे काम साधंसुधं नव्हतं, नाही... त्याला रोखायच्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या.. त्याला उंचावायचं आहे शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचं जीवनमान... त्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या उत्तम संधी... आणि यातून त्याला साधावयाची आहे कृषी क्षेत्राची प्रगती... आणि त्या माध्यमातून एकूणच राज्याची आणि देशाची प्रगती... यासाठी या तरुणानं शिवार संसद नावाचं एक समविचारी तरुणांचं व्यासपीठ उभारलंय आणि त्या माध्यमातून राज्याच्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांबरोबरच अन्य ठिकाणीही अक्षरशः झंझावाती दौरे करून तो जनजागृती करतो आहे...
आता हा विनायक कोण, कुठला? असा प्रश्न वाचकाच्या मनात येणं स्वाभाविक आहे... ते समजल्याखेरीज आपण माहिती घेत असलेल्या व्यक्तीची आपल्याला खरीच माहिती झालीय, असं वाटतच नाही आपल्याला... पण, नेमकं म्हणूनच मी ते इथं सांगणार नाही... विनायक आहे साऱ्या महाराष्ट्राचा... इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातला... कारण या राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घराघरांत त्याच्या मुलाबाळांमध्ये विनायक आहे... प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातली आग आहे विनायक.. शेतकऱ्याच्या मुलाबाळांची आस आहे विनायक... आपल्या राज्याचं, देशाचं तरुण वर्तमान आणि भवितव्यही आहे विनायक...
साधारण तीनेक वर्षांपूर्वी विनायक मला विद्यापीठात भेटायला आला. माझे माहिती महासंचालनालयातले सहकारी श्री. मनोज सानप यांनी त्याला माझा संदर्भ दिलेला. या पहिल्या भेटीतच विनायक भरभरून बोलत होता. सुरवातीला त्यानं आपल्या वसतिगृहातल्या मित्रांसमवेत सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राबद्दल मला सांगितलं. त्याशिवाय इतरही अनेक उपक्रमांबद्दल तो मला सांगत राहिला. आणखी एका विषयावर बोलायचं आहे, पण पुढच्या भेटीत बोलू, असं सांगून निघून गेला. विनायकचं बोलणं एकदम मनापासून होतं. त्यात कोणताही अभिनिवेश नव्हता. महत्त्वाचं म्हणजे त्याचे डोळे अत्यंत प्रामाणिक होते. हा मुलगा जे काही सांगतोय, ते मनापासून, याची खात्री पटवणारे. या विनायकनं पहिल्याच भेटीत माझ्या मनात एक चांगला विद्यार्थी म्हणून स्थान निर्माण केलं.
पुढच्या भेटीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात आपल्याला काम करायचं असल्याचं त्यानं मला सांगितलं. आधी तुझी पदवी पूर्ण कर आणि त्यानंतर तुला हवं ते करण्यास तू मोकळा आहेस, असा सबुरीचा सल्ला मी त्याला दिला. तो त्याला पटलाही. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा, त्यासंदर्भात जागृती करण्याचा त्याचा निश्चय कायम होता. त्यातूनच शिकत असतानाच त्यानं आपल्या मित्रमैत्रिणींच्या मदतीनं शेतकरी आत्महत्यांबाबत जागृती करणारा एक लघुपट तयार केला अवकाळ नावाचा. त्याची कथाही त्यानंच लिहीलेली आणि आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या शेतकऱ्याची भूमिकाही त्यानंच केलेली. आपल्या लहानग्या मुलीमुळं, कुटुंबाच्या विचारामुळं अवकाळी परिस्थितीशी नव्यानं संघर्ष करण्यास सज्ज होणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट विनायकनं त्यात सांगितली. असं होऊ शकतं, असा आशावाद जागविणारा हा लघुपट होता. विनायकची ही आशा भाबडी ठरली असती, जर त्यानं या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करायला सुरवात केली नसती तर.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या काहीही करून रोखायच्या, त्यांच्यात नवी उमेद पेरायची, त्यांच्या मुलाबाळांना पोरकं होऊ द्यायचं नाही आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना दिलासा देण्याबरोबरच त्यांना सावरायचं, असा निर्धार विनायकनं केला होता. यासाठी त्याच्याकडं ना पैसा होता, ना इतर कुठलं पाठबळ. मात्र त्याच्यासोबत होते, त्याचे विचार पटलेले त्याचे अनेक मित्र-मैत्रिणी. त्याच्या शब्दाखातर काहीही करण्यास तयार असलेले.
विनायक एका अत्यंत बिकट धाडसी मोहिमेवर निघाला आहे, जाऊ पाहतो आहे, याची जाणीव मला होती. त्यालाही होती. मात्र, त्याच्याकडे असलेला दुर्दम्य आत्मविश्वास आणि इतर कोणी करेल न करेल, याची वाट न पाहता, मी मात्र देशाला भेडसावणारा हा प्रश्न सोडविण्यासाठी अथक, अखंडित प्रयत्न करीत राहणार, असा त्यानं मनाशी केलेला निर्धार पाहता या वाटेवरुन हा मुलगा मागे हटणार नाही, याचा विश्वासही होता.
विनायकनं त्याच्या क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाचाही गांभिर्यानं अभ्यास चालविलेला. राज्यासह देशभरातला डाटा त्यानं गोळा केला. या साऱ्या अभ्यासातून त्याची स्वतःची काही निरीक्षणं, मतं तयार झाली. ती त्यानं एकत्रित नोंदविली. या निरीक्षणांची एक पुस्तिका त्यानं स्वतः तयार केली. या पुस्तिकेच्या हजारो प्रती त्यानं आजवर शेतकऱ्यांना वितरित केल्या असतील. त्याच्या कार्याचं महत्त्वाचं प्राथमिक पाऊल म्हणजे ही पुस्तिका ठरली. एवढ्यावरच तो थांबला नाही. शक्य होईल तेव्हा मराठवाडा, विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त गावांना, शेतकऱ्यांना भेटी देण्याचा, त्यांना समजून घेण्याचा, समजावून सांगण्याचा प्रघात त्यानं सुरू केला. यातून आत्महत्याग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांशी, त्यांच्या कुटुंबियांशी सुरू झाली विनायकची एक अखंड संवाद यात्रा. पुढं यात राज्यातल्या विविध भागातले समविचारी तरुण-तरुणीही सहभागी झाले आणि त्यातूनच साकारली विनायकची शिवार संसद. 
शिवार संसद हे आज शेतकऱ्यांच्या प्रबोधनाचं राज्यातलं एक महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून पुढं येत आहे. शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्रातला गहन प्रश्न आहे. गेल्या वीस वर्षांत राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. गरीबी, नापिकी, कर्जबाजारीपणा अशी अनेक कारणं यामागे आहेत. या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शिवार संसदच्या माध्यमातून विनायक आणि त्याचे सर्व तरुण सहकारी शेतकऱ्यांत प्रबोधन करताहेत.
राज्यातल्या शेतकरी आत्महत्या पूर्णपणे थांबल्या पाहिजेत, हे एकमेव उद्दिष्ट घेऊन विनायक झटतो आहे. शेतकरी आत्महत्या या प्रश्नावर नव्हे, तर या प्रश्नांवरच्या उत्तरावर काम विनायक काम करतो आहे. त्याचं काम हे केवळ बोलाची कढी नाहीय, तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शिवारात, आवारात, घरात जाऊन तो हे काम करतो आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात विनायक आणि त्याच्या सहकारी मित्र-मैत्रिणींनी साधारण पन्नास शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केलंय. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले तीन हजार तरूण शिवार संसदशी जोडले गेले आहेत. हे सारे तरूण शेतकरी कुटुंबातले आहेत.
विनायक आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी थेट संवादावर अधिक भर आहे. सध्या त्यांनी राज्यातल्या बीड, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. तिथल्या आत्महत्या झालेल्या गावांत जाऊन ते शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधतात. तुम्ही मायबाप, आम्ही तुमची लेकरं अशी आत्मियतेची साद घालून ही मुलं शेतकऱ्यांना बोलतं करतात. त्यांच्या भावना समजून घेतात आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांचं मनोबल वाढवितात. आत्महत्या करण्याची शक्यता असणाऱ्या शेतकऱ्यांवर ते अधिक लक्ष केंद्रित करतात.
मी विनायकला विचारलं की, अमूक एक शेतकरी आत्महत्या करण्याची शक्यता आहे, हे तू कसं ओळखतोय?, यावर विनायक सांगतो की, एक तर घरच्या परिस्थितीबद्दल आणि वडिलांच्या बदललेल्या वर्तनाबद्दल त्यांच्या मुलांशी संवाद साधताना आम्हाला कळून येतं की, त्या व्यक्तीवर आम्हाला काम करावं लागणार आहे. किंवा, अनेकदा आमच्याशी बोलत असणाऱ्या शेतकऱ्याचं बोलणं, त्याची देहबोली, त्याचं आमच्यापासून डोळे दूर फिरवणं असे काही सिग्नल आम्हाला त्यांनी तोंडी न सांगताही लक्षात येतात. तेव्हा लक्षात येतं की, इथं अधिक संवाद साधत राहण्याची गरज आहे. आणि मग आम्ही त्यांना बोलतं करत करत त्यांना हळूहळू, त्यांच्याही नकळत आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यात यश येतं आहे, ही आमच्या कामाची खरी पोचपावती आहे, असं वाटतं, अशी समाधानाची भावनाही विनायक व्यक्त करतो.
शेतकरी आत्महत्यांमागं अनेक कारणं आहेत. या कारणांची उकल करून हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. शेतकरी आत्महत्या करतात पण ज्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली ते कायम राहतं. त्यामुळे हा प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी हरेक प्रकारे प्रयत्न करण्याची गरज आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच भावनिक आणि मानसिक आधार देण्याचं कामही शिवार संसद करते. लघुपट, गोष्टी, कथा आदी माध्यमातून शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यावर विनायक आणि त्याच्या सहकाऱ्यांचा भर आहे. अनेक शेतकरी मुलांकडे पाहून जगत असतात. त्यामुळे त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचाही प्रयत्न शिवार संसद करते आहे.
आत्महत्या हा विषय वाटतो तितका सोपा नाही. तो चटकन सुटणाराही नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या पूर्णपणे थांबवण्यासाठी काम करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवण्याचाही शिवार संसदचा प्रयत्न आहे.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून विनायकनं एक शेतकरी हेल्पलाइनही विकसित केली आहे, शिवार हेल्पलाइन तिचं नाव. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांसाठी शिवार संसदतर्फे पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत असलेल्या या हेल्पलाइनचा लाभ आजवर सुमारे सहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला आहे. दैनंदिन सरासरी 250 शेतकरी या हेल्पलाइनशी आपल्या विविध समस्या सोडविण्यासाठी संपर्क साधत असतात. शिवार संसदबद्दल ऑनलाइन माहिती देण्यासाठी www.shivarsansad.com ही वेबसाइटही विनायकनं निर्माण केली आहे. शिवार संसदच्या उपक्रमांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या जगाच्या पाठीवरील कोणाही व्यक्तीला त्यामुळे थोडक्यात का असेना, माहिती मिळते. आपल्याकडं 21-22 वर्षांच्या तरुणांकडं पाहण्याचा दृष्टीकोण खूप हलका असतो. ह्याला काय कळतं, आम्ही चार पावसाळे जास्त पाहिलेत, अशा स्वरुपाची भावना असते. अशा लोकांसाठी विनायक म्हणजे एक सणसणीत उत्तर आहे. विनायकचं काम, हाती घेतलेल्या कार्याप्रती निष्ठा ही त्याच्यापेक्षा वयानं कितीही मोठ्या असणाऱ्या व्यक्तीपेक्षा निश्चितपणे अधिक आणि तीव्र आहे. त्याची शेतकऱ्यांप्रती ही कळकळ आणि तळमळ पाहून आता या उपक्रमात त्याला मदत करण्यासाठी अनेक मदतीचे हातही पुढे येताहेत. यात भारत गणेशपुरे यांच्यासारखा अभिनेता तर आहेच, पण अनेक शासकीय, प्रशासकीय अधिकारी, विद्यापीठांचे अधिकारी, शिक्षक आदींचाही सहभाग आहे. परभणी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तर विनायकला विद्यापीठात व्याख्यानाची संधी तर दिलीच, शिवाय, त्याच्या या उपक्रमाला वेळोवेळी सक्रिय सहकार्य करण्याचे धोरणही स्वीकारले आहे. शेतकरी आत्महत्येच्या समस्येची तीव्रता सर्वांना जाणवते आहेच; पण, अशा संवेदनशील व्यक्तींना या कामात सहभागी करून घेऊन आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या विनायकच्या कार्याचा अवकाश अधिक व्यापक आणि यशस्वी होण्यासाठी आपण साऱ्यांनीच त्याच्या आणि शिवार संसदेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.

दहा हजार शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष प्रबोधन
तुळजापूरला शारदीय नवरात्रौत्सव भव्य स्वरुपात साजरा होतो. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये शेतकऱ्यांची संख्याच सर्वाधिक असते. ही बाब लक्षात घेऊन विनायकच्या शिवार संसद युवा चळवळीने हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने येथे शेतकरी आत्मसन्मान अभियान राबविले. श्री तुळजा भवानीच्या मंदिर परिसरात शेतकरी मित्र म्हणून सुमारे 200 स्वयंसेवकांनी शेतकरी प्रबोधनाचे काम केले. या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, वैद्यकीय स्वरुपाची माहिती घेतली. त्याचप्रमाणे त्यांना शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच त्यांना आवश्यक सल्ला व मार्गदर्शनही करण्यात आले. या अभियानांतर्गत दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून माहिती मिळविण्यात शिवार संसदला यश मिळाले.

बियाण्यांनी तारले शेतकऱ्याचे प्राण
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातलं टाकळगवाण गाव. इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना त्यातला एक जण आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असल्याचं विनायकला जाणवलं. या शेतकऱ्याचं प्राथमिक समुपदेशन केल्यानंतर सविस्तर संवाद साधत असताना त्याच्यावर पाच लाख रुपयांचं कर्ज असल्याचं आणि कर्जमाफीसाठीही पात्र ठरले नसल्याचं विनायकच्या लक्षात आलं. शेतीत पाण्याची सोय होती, मात्र त्याची सहा एकर शेतीही कोरडीच होती. नव्यानं पेरणी करायची तर बियाण्यांसाठीही पदरी छदाम नाही, अशी विपन्नावस्था ओढवलेली. विनायकनं त्याची ही स्थिती लक्षात घेऊन परभणी कृषी विद्यापीठातील प्राध्यापक आणि पुण्यातील रॅडरॅप या संस्थेशी संपर्क साधला. विद्यापीठाच्या शिक्षकांनी वैयक्तिक मदतीचा हात दिला, तर रॅडरॅपच्या हिमांशू सिंग, प्रवीण खजिनदार, सिद्धार्थ पचौरी, पूजा पालव यांनी मदत केली. त्यातून या शेतकऱ्याला पुढील सहा महिन्यांचे नियोजन करून त्या सहा एकरासाठी 30 किलो हरभरा आणि 50 किलो ज्वारी बियाणे शिवार संसदनं उपलब्ध करून दिले. त्याला आवश्यक ती तांत्रिक मदतही विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. या मदतीनं भारावलेल्या शेतकऱ्यानं नव्या जोमानं, उत्साहानं शिवारात पेरणी करून कामाला सुरवात केली. हे शिवार संसदेच्या कार्याचं मोठं फलित आहे.

शेतकरी बांधवांना पत्र

शिवार संसद युवा चळवळीच्या माध्यमातून विनायकनं शेतकरी बांधवांना पत्र या नावानं एक भावनिक आवाहन करणारं पत्रक तयार केलं आहे. त्यामध्ये अखेरीस तुमचा मुलगा असं लिहून संबंधित शेतकऱ्याला आत्महत्येपासून भावनिकदृष्ट्या परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रात शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन करताना अशी विनंती केली आहे की, हिंमत हरू नका. खंबीर बना. शासन, प्रशासन, समाज तुमच्यासोबत आहे. आपल्या गावातील एकही व्यक्ती आत्महत्या करणार नाही अथवा कोणाला आत्महत्या करू देणार नाही, असा सर्व ग्रामस्थांनी संकल्प करा. आपलं गाव आत्महत्यामुक्त बनविण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या जिल्ह्याला लागलेला कलंक मिटवून टाका. तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या सुखदुःखात राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि समाज सदैव मदत करतील. आम्ही तुमची लेकरे, आमच्या परीने काम करण्याची ग्वाही देतो. समाजाचे सुद्धा काहीतरी देणे लागतो म्हणून माझ्या मायबापांसाठी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपणाला विनंती करतो की, आपण कोणत्याही प्रकारचा चुकीचा वा शेवटचा विचार करू नका. हे करण्याची वेळ आलीच किंवा आपणाला कोणत्याही प्रकारची अडचण वा मदतीची गरज लागलीच तर मी व माझ्यासारखीच तुमची सर्व लेकरं सदैव आपल्यासोबत असतील. फक्त हाक द्या. आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
  
(विनायकशी आपण 8275257996 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा