शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

‘द पिरियड मॅन’ प्रवीण निकम

(तेजस प्रकाशनाच्या बदलते जग या दिवाळी वार्षिकांकाचं हे सातवं वर्ष. या वार्षिकांकाचा सलग सहाव्या वर्षी अतिथी संपादक होण्याचा बहुमान मित्रवर्य श्री. रावसाहेब पुजारी यांनी बहाल केला. त्यांचे शेतीप्रगती मासिक यंदा दिमाखदार तेरावा दिवाळी विशेषांक सादर करीत असताना गेल्या सहा वर्षांत तरुण मनांची स्पंदनं टिपण्याचा प्रयत्न करणाऱ्या बदलते जगनंही यंदा चेंजमेकर्स- वेगळ्या वाटा शोधणारी तरुणाई असा विषय घेऊन यंदाचा 'बदलते जग'चा अंक सादर केला आहे. गेल्या सहा वर्षांत या अंकानं तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून शैक्षणिक क्षेत्र, सोशल मीडिया, कौशल्य विकास, डिजीटल इंडिया, डिजीटल यूथ आणि दूरशिक्षण अशा विषयांचा वेध घेतला. आपण वाचकांनीही त्यांचे मनापासून, उत्स्फूर्त स्वागत केले. यंदा चेंजमेकर्स-वेगळ्या वाटा शोधणारी तरुणाई असा विषय घेण्यामागं काही विशेष कारणं आहेत. आजच्या तरुण पिढीवर मागील पिढ्यांकडून अनेक प्रकारचे आक्षेप घेतले जातात. आजचे तरुण वाया जाताहेत, ती करिअरविषयी जागरूक नाहीत, त्यांना सामाजिक भान नाही वगैरे वगैरे आक्षेपांचा त्यात समावेश असतो. आजचा तरुण नित्य या आक्षेपांना सामोरा जात असतो. पण, पूर्वीच्या पिढ्यांत नसलेली एक बेफिकीरी जरूर त्याच्यात आहे; ही बेफिकीरी म्हणजे नेमकं काय मनावर घ्यायचं आणि काय नाही, याचा विवेक त्याच्यात आहे. त्यामुळे तो यातलं काही मनावर न घेता आपले मार्ग धुंडाळण्यात धन्यता मानतो. याचा गैरअर्थ काढला जात असतो. पण, या अंकाचं काम करीत असताना या साऱ्या आक्षेपांना धुडकावून लावतील, अशी सोन्यासारख्या तरुणांची खाणच आमच्या हाती लागली. सुरवातीला असे तरुण मिळतील का, असा विचार आमच्याही मनी आला. पण अंक होता होईतो, पानांच्या मर्यादेत बसणार नाहीत, इतके कर्तृत्ववान तरुण आमच्या हाती लागले. यामध्ये अगदी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आदी विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर काम करणाऱ्या तरुणांपासून ते अगदी आपल्या अवतीभोवतीही कुठल्याही प्रसिद्धीची, मोबदल्याची अपेक्षाही न ठेवता काम करणारे तरुण आमच्या नजरेत आले. आमची पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन त्यातील काही निवडक तरुणांच्या कर्तृत्वाला आम्ही या अंकात स्थान देऊ शकलो आहोत. हा अंक वाचल्यानंतर हा केवळ शब्दरंजन नाही, तर एक प्रेरणास्रोताचा झरा आम्ही आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, हे आपल्या लक्षात येईल. आजचा आपला भोवताल अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे खरा, पण त्याचवेळी त्याला निश्चिततेचे ठोस आयाम प्रदान करणारे, सावरणारे तरुण हातही आहेत, हे वास्तवही खरेच! सकारात्मकतेच्या या प्रवासाचा आनंद आपल्यालाही यातून लाभेल. सारंच काही वाईट, चुकीचं होतंय, या धारणेला छेद जाऊन चांगलंही बरंच काही होतंय, चांगलं घडविण्याचा प्रयत्न करणारे आशेचे दीप उजळविणारे तरुण हातही आहेत. या हातांत आपल्या देशाचे भवितव्य सुरक्षित आहे, याची जाणीव वृद्धिंगत होईल. सकारात्मक सामाजिक जाणिवांचा, संवेदनांचा जागर या अंकाच्या माध्यमातून आम्ही मांडला. या अंकाच्या माध्यमातून असे काम करणाऱ्या काही तरुणांच्या कामगिरीचा वेध घेण्याचा प्रयत्न मी स्वतःही केला आहे. त्यातील लेख क्रमाक्रमाने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी 'बदलते जग'च्या सौजन्याने येथे पुनर्प्रकाशित करीत आहे. आपल्याला आवडतील, अशी अपेक्षा आहे.- आलोक जत्राटकर)





ज्या व्यक्तीबद्दल इथं सांगतो आहे, त्या मुलाचं नाव आहे प्रवीण निकम आणि ज्या विषयामध्ये तो काम करतो आहे, तो विषय आहे, महिलांच्या मासिकधर्माचा! प्रवीणनं या क्षेत्रात जागृतीचं इतकं महत्त्वाचं आणि उत्तुंग काम करीत आहे की, त्याला आज जगभरातले लोक द पिरीयड मॅन म्हणून ओळखतात आणि याचा त्यालाही सार्थ अभिमान आहे.
---
पौगंड किंवा टीनएज असं ज्याला म्हणतात, तो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला एक प्रकारचा अडनिडा कालखंड असतो. प्रत्येक गोष्ट करावीशी वाटणं किंवा काहीही करावंसं न वाटणं, निरनिराळी स्वप्नं पाहणं, आज एक तर उद्या दुसरं असं चंचलपण, धडपडणं नव्हे पडणंच अधिक, त्यातही प्रेमातलं वगैरे तर नेहमीचंच! अशा एक ना अनेक क्वालिटीज् या पौगंडावस्थेच्या म्हणून सांगता येतात. या टीनएजमध्ये पाहिलेली स्वप्नं आणि मनापासून केलेली पायाभरणीच बहुतेकदा अनेकांच्या आयुष्याचं दिग्दर्शन करत असल्याचं आपल्याला दिसतं. या वयात असते कुणाला अभिनयाची, गाण्याची आवड, पण करिअरपोटी होतो डॉक्टर!  पण संधी मिळाली की पावलं आपोआप वळतात या जुन्या आणि खऱ्या आवडींकडं! याउलट कित्येकांना टीनएज उलटून गेलं तरी आपल्या आयुष्याचा सूर काही लवकर सापडत नाही. त्यांचं चाचपडणं सुरूच असतं.
टीनएजशी निगडित या साऱ्या बाबी सांगण्याचं कारण म्हणजे इथं ज्या व्यक्तीची माहिती मी सांगणार आहे, त्या व्यक्तीनं वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी एका अशा विषयाला हात घातला आहे, ज्याचा उच्चार करायलाही कित्येक लोक कचरतात, लाजतात. कित्येकांना ते अश्लील, असभ्य किंवा किळसवाणंही वाटतं. पण, या मुलानं मात्र अगदी जाणीवपूर्वक या विषयाला घेऊनच आपल्या सामाजिक कामाला सुरवात केली आणि आज जगभरात त्याच्या कामाचे चाहते आहेत- अगदी क्वीन एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचाही त्याच्या चाहत्यांत समावेश आहे.
मी ज्या व्यक्तीबद्दल इथं सांगतो आहे, त्या मुलाचं नाव आहे प्रवीण निकम आणि ज्या विषयामध्ये तो काम करतो आहे, तो विषय आहे, महिलांच्या मासिकधर्माचा! प्रवीणनं या क्षेत्रात जागृतीचं इतकं महत्त्वाचं आणि उत्तुंग काम करीत आहे की, त्याला आज जगभरातले लोक द पिरीयड मॅन म्हणून ओळखतात आणि याचा त्यालाही सार्थ अभिमान आहे.
महिलांचा मासिकधर्म ही महिलांची आजही महिलांची खाजगी बाब म्हणूनच पाहिली जाते. दोन महिला सुद्धा एकमेकींशी या विषयावर खुलेपणाने, मोकळेपणाने बोलू शकत नाहीत, तिथे पुरूषांनी त्यावर चर्चा करणे तर दूरचीच गोष्ट. एक सहज नैसर्गिक, जैविक प्रक्रिया असलेल्या मासिक पाळीच्या भोवती अनेक गुंतागुंतीचे सामाजिक विशेषतः महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होताहेत. पिढ्यान् पिढ्या, वर्षानुवर्षे महिला त्याच त्या आरोग्याच्या प्रश्नांनी घेरल्या जात आहेत, मात्र त्याला वाचा फोडली जात नाही. एक महत्त्वाची सामाजिक, आरोग्य समस्या म्हणून त्याबाबत जागृतीपर असंही फार काही केलं जात नाही- महागड्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातींपलिकडं! हा आपल्या सामाजिक असंवेदनशीलतेचाच खरं तर परिणाम आहे.
पुण्याचा प्रवीण निकम मात्र याला अपवाद ठरला. त्याची संवेदनशीलता सर्वसामान्यांपेक्षाही असीम ठरली. सन 2011मध्ये अठरा वर्षांचा प्रवीण एका शैक्षणिक दौऱ्याच्या निमित्तानं आसामच्या शुकलाई या गावात गेला होता. तिथं त्याला एक मुलगी लाकडी हातमागावर विणकाम करताना दिसली. रोशनी तिचं नाव. प्रवीणनं तिला सहज विचारलं, शाळेत का नाही गेलीस म्हणून. त्यावर ती उत्तरली, देवानं मला शिक्षा दिल्यानं आता मला शाळेत जाता येत नाही. प्रवीणला तिचं ते अगम्य उत्तर काही समजलं नाही, म्हणून त्यानं तिच्या वडिलांनादेवाची शिक्षा म्हणजे नेमकं काय?’ म्हणून विचारलं. त्यावर त्यांनी तिची मासिक पाळी सुरू झाल्यानं तिला शाळेत पाठवत नसल्याचं सांगितलं. त्या गावात, परिसरात मासिकधर्म सुरू झाल्यानंतर कित्येक मुलींना शाळा सोडाव्या लागल्याचंही त्याला समजलं. या माहितीमुळं प्रवीण समूळ हेलावला. त्यानं या विषयी तिथं आणखी माहिती घ्यायला सुरवात केली, तर एका घरातल्या चार महिला त्यांच्या मासिक पाळीच्या वेळी एकच कपडा आलटून पालटून वापरत असल्याचं समजून त्याला धक्का बसला.
त्यानंतर परतीच्या प्रवासात याच विषयानं त्याच्या मनाचा पूर्ण ताबा घेतला. याबाबत सामाजिक जागृती करण्याची गरज त्याला वाटू लागली. प्रवीणला त्याच्या आयुष्याचं ध्येय सापडलं होतं. पुण्यात परत आल्यानंतर त्यानं पहिली गोष्ट कोणती केली असेल तर इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडून दिलं आणि सामाजिक शास्त्र शाखेकडे प्रवेश घेतला.
शिकत असतानाच त्यानं रोशनी या एनजीओची स्थापना केली. महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं आणि बालशिक्षणाला प्रोत्साहन देणं हे दोन प्रमुख हेतू ठेवून रोशनीचं काम सुरू झालं. प्रवीणला त्याच्या समविचारी मित्रमैत्रिणींचीही साथ लाभली आणि मासिक पाळीच्या संदर्भात जनजागृतीचा कारवाँ सुरू झाला. झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात जागृत करण्याचं काम हाती घेण्यात आलं. मासिक पाळी ही एक सर्वसाधारण नैसर्गिक, जैविक प्रक्रिया असून तिचा बाऊ करण्याचं अजिबात कारण नसल्याचं तो पटवून देऊ लागला. या संदर्भात अक्टिव्हीटी बेस्ड उपक्रम राबविण्यालाही तो प्राधान्य देऊ लागला. परिणामी, त्याच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद लाभू लागला आणि हळूहळू त्याला यशही येऊ लागलं. पुढं समाजातल्या सर्वच स्तरांतल्या लोकांचाही त्याला प्रतिसाद लाभू लागला.
प्रवीणच्या या कामानं समाजाचं, देशाचं लक्ष वेधून घेतलं. साहजिकच, महाराष्ट्र शासनाच्या युवा पुरस्काराबरोबर राष्ट्रीय युवा पुरस्कार पटकावणारा तो देशातला सर्वात तरुण पुरस्कारार्थी ठरला. संयुक्त राष्ट्रसंघानं त्याला जागतिक शिक्षण युवा राजदूत म्हणून पुरस्कृत केलं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं त्याला ग्लोबल शेपर म्हणून गौरवलं. आणि प्रवीण आता कॉमनवेल्थ युथ कौन्सिलमध्ये आशिया प्रतिनिधी म्हणूनही काम पाहतो आहे. गेल्या वर्षी (2016) त्याला झांबिया या देशानं इलेक्शन ऑब्जर्व्हर म्हणून अत्यंत सन्मानानं निमंत्रित केलं होतं.
कॉमनवेल्थ युथ लीडरशीप ट्रेनिंग प्रोग्रामअंतर्गत लंडनमध्ये असताना महाराणी एलिझाबेथ यांनी त्याला भेटीला बोलावलं आणि साधारण पंधरा मिनिटं त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी त्याला मिळाली. प्रवीणनं महाराणींना महिलांच्या आरोग्याशी विशेषतः मासिकधर्माशी निगडित जगभरातल्या गैरसमजुती आणि प्रथांची माहिती दिली. नेपाळमध्ये छौपडी असं मासिकपाळीला संबोधलं जातं आणि त्या काळात महिलेला जनावरांच्या गोठ्यात राहणं भाग पडतं. भारतात सुद्धा 14-15 वर्षे वयातल्या सुमारे 23 टक्के मुलींना केवळ मासिक पाळी सुरू झाली म्हणून शिक्षण सोडून घरी बसावं लागतं. असं त्यानं महाराणींना सांगितलं. अशा विषयावर कोणाशी तरी पंधरा मिनिटं इतका प्रदीर्घ वेळ बोलण्याची महाराणींचीही ही पहिलीच वेळ होती आणि त्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केल्याचंही प्रवीणला नंतर सांगण्यात आलं.
मासिक पाळीशी निगडित समाजमनावर पसरलेली सर्व जळमटं झाडून दूर करण्याचा प्रवीणचा मानस आहे. त्याच्या कामाचं प्रमुख उद्दिष्ट तेच आहे. सॅनिटरी प्रोटेक्शनचं साधन वापरलं तर देवाचा कोप होईल, असं मानणाऱ्या महिला आजही आहेत, असं सांगून त्यांचा हा भ्रम दूर करून त्यांच्यात आरोग्यविषयक जागृती करण्यासाठी प्रवीण दुप्पट जोमानं काम करतो आहे. तो काम करीत असलेल्या झोपडपट्टीत त्यानं तिथल्याच होतकरू तरुणींना रोशनीच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन निर्मितीचं युनिट टाकून दिलं आहे. त्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम आणि दाम तसंच आरोग्याचा सांभाळ या तिन्ही बाबी त्यातून साध्य झाल्या आहेत.
या तरुणींच्या मातांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांच्यापर्यंतही हा आरोग्याचा प्रश्न पोहोचविण्यासाठी काय करता येईल, याचा विचार प्रवीण करीत होता. त्याला यावर एक कल्पना सुचली. यातल्या बहुतेक महिला या गृहिणीच होत्या. सतत घरकामात व्यस्त असत. त्या कामावर परिणाम न होता करता येईल, असं काम त्याला सुचलं. ते होतं पेपर बॅग तयार करण्याचं! घरच्या कामात महिला कितीही व्यस्त असल्या तरी दिवसाला वीस पेपरबॅग बनवणं त्यांना अजिबात अवघड नव्हतं. त्यामुळं त्यांना हेच काम द्यायचं त्यानं ठरवलं. एका बॅगेला तीन रुपये किंमत सहज मिळू शकणार होती. अशा सुमारे 50 महिलांची निवड करून त्यांना पेपरबॅग बनविण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. काम सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत त्यांचा महिन्याचा टर्नओव्हर तीस हजारांवर गेला. मग प्रवीणनं तिथल्याच सामाजिक कार्यकर्त्यांकडं हे युनिट सोपवलं आणि आणखी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित केलं.
रोशनीच्या माध्यमातून प्रवीणनं महिलांच्या प्रश्नांचा अधिक साकल्यानं विचार करून त्यांना वेळोवेळी वाचा फोडण्याचं काम सुरूच ठेवलं. सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी करत त्यानं उभारलेली राईट टू पी ही चळवळ अवघ्या देशभरात वणव्यासारखी फोफावली. महिलांच्या मूलभूत सार्वजनिक गरजेला त्यानं वाचा फोडली. पुढं देशभरात साठहून अधिक एनजीओंनी हा प्रश्न निरनिराळ्या पातळ्यांवर धसास लावून धरला आणि ठिकठिकाणी तडीसही नेला.
अंध बालके, युवक यांच्या शिक्षणाच्या संदर्भातही प्रवीण अत्यंत गांभीर्यानं काम करतो आहे. विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यान अंध विद्यार्थ्याचा सहायक म्हणूनही त्यानं काम केलं आहे. अंध विद्यार्थ्यांना वाचन, लेखन यांसाठी सहायक उपलब्ध करून द्यावेत, असे शासन आदेश आहेत, पण याबाबत बऱ्याच ठिकाणी अनास्था दिसून येत असल्याचं तो सांगतो. हे पाहून ज्या अंध विद्यार्थ्यांना असे सहायक हवे आहेत, त्यांच्यासाठी हेल्पलाइन सुरू केली. आज या हेल्पलाइनअंतर्गत दोनशे स्वयंसेवक कार्यरत आहेत. अंध विद्यार्थ्यांना निरनिराळी वाद्यं वाजविण्यास शिकवण्याबरोबरच क्रिकेट खेळायलाही शिकविण्यात येतं.
याशिवाय, बालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी किताब एक्स्प्रेस हा उपक्रमही यशस्वीरित्या चालविला आहे. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृतीसाठी पिंक नावाचा प्रकल्पही त्यानं हाती घेतला आहे. प्रवीणनं रोशनीच्या माध्यमातून आजवर दहा हजारांहून अधिक लोकांचं आयुष्य पालटून टाकलं आहे. पन्नास हजारांहून अधिक महिलांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान केलं आहे. प्रवीणच्या कामाचा परीघ आता विस्तारला आहे. त्याला आता आपल्या राज्याच्या किंवा देशाच्या सीमांची बंधनं नाहीत. प्रवीण हा खऱ्या अर्थानं आता ग्लोबल सिटीझन झाला आहे. जगभरातील महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृतीसाठी तो सातत्यानं फिरतो आहे. आशिया, आफ्रिका खंडातल्या सर्व देशांमध्ये त्याला महिलांच्या आरोग्य समस्येविषयी जागृती करण्याची तीव्रतेनं निकड भासते आहे. त्यासाठी तो कॉमनवेल्थच्या व्यासपीठाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा त्याच्या परीनं प्रयत्न करतो आहे. सॅनिटरी नॅपकिन्सवरील कोणत्याही प्रकारचा कर अन्यायकारक असून महिलांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारे हे कर रद्द केले पाहिजेत, अशी ठोस मागणी तो जागतिक व्यासपीठांवरुन करतो आहे.
अलीकडं पुन्हा एकदा आसामला जाण्याची संधी मिळाली तेव्हा प्रवीण मुद्दामहून शुकलाईला गेला. त्याच्या आयुष्याला दिशा दाखविणाऱ्या रोशनीमागची खरी रोशनी असणाऱ्या रोशनीला शोधण्याचा त्यानं प्रयत्न केला. स्थानिक संघर्षात तिथली सुमारे पाचशे गावं उद्ध्वस्त होऊन चार लाख लोक विस्थापित झाल्याचं त्याला सांगण्यात आलं. रोशनी किंवा तिचे पालक जिवंत असतील की नाही, याविषयीच साशंकता असल्याचं तिथल्या गावकऱ्यांनी सांगितलं. आपण प्रवीणला नेमकं काय दिलं, हे खऱ्या रोशनीला कधीच समजू शकणार नसलं तरी, प्रवीणनं मात्र या महिला आरोग्याच्या चळवळीला तिचं नाव देऊन तिला जागतिक पातळीवर अजरामर केलंय, एवढं निश्चित!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा