मंगळवार, २ जानेवारी, २०१८

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठांच्या जबाबदारीमध्ये व्यस्त आहेत. नववर्षातही त्यामध्ये फरक पडलेला नाही. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा चाहता म्हणून भावी जीवनात त्यांच्याकडून काही अपेक्षा बाळगल्या आहेत. त्याच या अनावृत शुभेच्छापत्राच्या माध्यमातून शेअर करीत आहे.- आलोक जत्राटकर)

आदरणीय कुलगुरू सर,
सप्रेम नमस्कार.
Dr. Devanand Shinde
आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देताना मला मनापासून आनंद होतो आहे. आपण सध्या मुंबई विद्यापीठाच्या व्यस्त दिनक्रमात असल्यामुळे दूरध्वनीवरुन शुभेच्छा देण्याऐवजी ऑनलाईन मार्ग अवलंबतो आहे. 

सर, साधारण अडीच वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून आपण रुजू झालात आणि तेव्हापासून किंबहुना, त्या आधीच कोल्हापूरकडे येत असतानाच्या प्रवासादरम्यानच केवळ मोबाईल संभाषणातून तुम्ही मन जिंकलंत. माझंच काय, इथल्या प्रत्येक व्यक्ती आणि अगदी माध्यमकर्मींच्याही मनात आपण स्वतःचं एक स्थान निर्माण केलंत. आपला स्वभाव, आपल्या वागण्याबोलण्यातून सदैव ओथंबून वाहणारी आपुलकी आणि एक स्वाभाविक निरलसपणा यामुळं आपण समोरच्याच्या मनात अगदी अलगद स्थान मिळवता, त्याच्या प्रेमास पात्र ठरता; अगदी कोणी आपल्याशी झगडायचे ठरवून आला, (तसे प्रसंग फारसे उद्भवत नाहीतच म्हणा!) तरी त्या माणसाच्या मनातलं ते वैषम्य कधी गळून पडतं, हे त्याचं त्यालाही समजत नाही, इतकी अजातशत्रुता आपल्या व्यक्तीमत्त्वात आहे.

आपण कुलगुरू आहोत, याचे भान आपल्या ठिकाणी आहे, ते असलेच पाहिजे, परंतु त्या पदाचा अभिनिवेश मात्र आपण गाजवत नाही. ही फार महत्त्वाची आणि दुर्मिळ गोष्ट आहे. आयुष्यभर डोक्यात खुर्ची घेऊन फिरणाऱ्यांची मांदियाळी अवतीभोवती वावरत असताना इतक्या सर्वोच्च पदी बसणाऱ्या आपणामध्ये हा जो जमिनीशी जोडून राहण्याचा गुण आहे, तो आजच्या काळात दुर्मिळ असला तरी अनुकरणीय आणि प्रशंसनीय आहे. याची कारणं आदरणीय आईंच्या संस्कारात आहेत. त्याचा सार्थ अभिमान आपल्याला तर आहेच, पण मलाही आहे कारण आपल्यासारखा बॉस लाभणं, ही बाब आजच्या कालखंडात दुर्लभ झाली आहे; सध्याचे एकूण चित्र पाहता येथून पुढच्या काळात तर ते अशक्यप्रायच वाटते आहे.

या समग्र पार्श्वभूमीवर आपले वेगळेपण उठून दिसणारे आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणीचे आपण उदात्त प्रतीक आहात. कोणताही बडेजाव किंवा डौल मिरवण्याचा आपला स्वभाव नाही; मात्र, त्याचवेळी डिग्निटीच्या बाबतीत आपण तडजोड करीत नाही. हे संतुलन सांभाळणे अनेकांना अवघड असते, ते आपण सहजपणे सांभाळता, हा आपला महत्त्वाचा गुणविशेष!

कुलगुरू पद ही आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आहे. मात्र, अध्यापन, संशोधन आणि प्रशासन या तिन्ही पातळ्यांवर आपण अथकपणे दिवस-रात्रीचा, प्रवासाचा, शारिरीक, मानसिक कष्टाचा, थकव्याचा विचार न करता ज्या प्रकारे कार्यरत राहता, ते स्फूर्तीदायक आहे. आपल्याइतकी शक्य नसली तरी आपल्यासारखी काम करण्याची एनर्जी आणि ऊर्मी आपल्यात कशी विकसित करता येईल, या दिशेने मी विचार करीत असतो, प्रयत्नही करतो. कुठं तरी कमी पडतो, हे जाणवते. मात्र, त्याचवेळी पुन्हा आपली कष्ट घेण्याची वृत्ती झळाळून उठून दिसते.

या कष्टाच्या जोरावर आपण कोणतेही ध्येय अगदी निश्चितपणे साध्य कराल, याचा मला  विश्वास आहे. भविष्यात आपल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर या देशाचे शैक्षणिक व संशोधकीय क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी लाभेल, याची खात्री आहे. किंबहुना, अलिकडच्या काळातील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील आपला सहज वावर मला प्रो. यशपाल यांची आठवण करून देतो. त्यांच्या जाण्याने भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याची क्षमता आपल्यात आहे. म्हणून मी आपल्याला भविष्यात केंद्रीय पातळीवर पाहू इच्छितो. हा माझा विश्वास अनाठायी नाही. आपल्याला संधी मिळाली, तर ती सिद्ध करण्यासाठी आपण जीवाचे रान करता आणि प्रशासनाने दाखविलेला विश्वास सार्थ करण्याबरोबरच संबंधित घटकांच्या कल्याणासाठीही प्रयत्न करता, हे मी वेळोवेळी पाहिले आहे.

सध्या बहुजन, मागास आणि वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या प्रयत्नांना एका वेगळ्या पद्धतीने खीळ घालण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहेत. शैक्षणिक परिवर्तनाचे चक्र उलटे फिरविण्यासाठी काही प्रवृत्ती कार्यरत आहेत. शिक्षणाच्या बाजारीकरणाचेही प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना त्यासाठी फशी पाडले जात आहे. त्यातून शिक्षण व्यवस्थेत नवी चातुर्वर्ण्य व्यवस्था उदयाला येते आहे. हे भारतीय समाजासाठी घातक आहे. दुहीचे आणि शैक्षणिक वंचिततेचे मोठे सावट आज शिक्षण क्षेत्रावर पडले आहे. तसे होऊ नये, यासाठी वंचित, मागास समाजघटकांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रतिबद्ध असणाऱ्या आपणासारख्या शिक्षणसेनानीची देशाला खरेच फार गरज आहे. आपण यापुढे अनेकानेक पदे मिळवाल, ती आपल्या कर्तृत्वावर आपणाला मिळतीलच. तथापि, फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा आणि वसा घेऊन आपण जे कार्य आजवर करीत आला आहात, त्याच्या कक्षा राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्याला कशा विस्तारता येतील, या दृष्टीनेही आपण प्रयत्नरत राहावे, अशी माझी आपणास मनापासून विनंती आहे.

या क्षणी कदाचित आपल्या मनी असाही विचार येईल की, नववर्षाच्या शुभेच्छा देताना हे निरोपाप्रमाणे लेखन मी का करतो आहे. खरे सांगायचे तर सकाळी आपणाला शुभेच्छा देण्यासाठी फोन उचलला, पण त्यावेळी मनात विचार आला की, केवळ हॅपी न्यू इयर म्हणण्याऐवजी शैक्षणिक क्षेत्राला आपण देऊ शकणाऱ्या योगदानाची आणि त्यासाठीच्या आपल्या क्षमतेची आपणास जाणीव करून द्यावी, असे वाटले. त्यासाठी केवळ हा लेखन प्रपंच.

भावनात्मक असल्यामुळे लेखन थोडे लांबले असले तरी आपण समजून घ्याल नेहमीप्रमाणे, याची खात्रीही आहे.

आपणाला पुन्हा एकदा अगदी मनापासून नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपला,

आलोक जत्राटकर

१२ टिप्पण्या:

 1. नववर्षाच्या शुभेच्छा देताना हे निरोपाप्रमाणे लेखन मी का करतो आहे.......

  वाक्याची भिती अनेकांच्या मनात आहे.....

  पत्र नितांत सुंदर....

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. हा... हा... हा... एकदम खरे आहे, सर! लिहीताना माझ्या मनात मात्र तसा कोणताही हेतू नव्हता, आता आपल्या टिप्पणीने मात्र त्याला तो संदर्भ प्राप्त झाला. असो! आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद!

   हटवा
 2. डॉ.देवानंद शिंदे सरांच्या सोबत अनेक वर्षापासून काम करण्याची मला संधी मिळाली. त्यांच्या बद्दल जे काही पत्रात लिहिले आहे ते योग्यच आहे...किंबहुना उपलब्ध शब्दांमधे सर्वोत्तम आहे....आज ते कुलगुरु आहेत म्हणून नाही, तर गेल्या 25-30 वर्षात अनेक महत्वाच्या पदावर कार्यरत
  असूनही सरांच्या वागण्या बोलण्यात अतिशय सहजता जाणवते.....अहंकार कधीच जाणवला नाही....
  ईश्वर चरणी प्रार्थना "सराना उदंड यश, आरोग्य, मिळो..... त्यांच्या कार्यातून या समाजाचे, देशाचे कल्याण होवो"

  उत्तर द्याहटवा
 3. अलोक जत्राटकर सर खुप चांगल्या पध्दतीने भावना व्यक्त केल्या आहेत

  उत्तर द्याहटवा
 4. सराच्या मोठेपणाचा अनुभव कालच आला. He is very accomodative sensible leader who knows ground realities.

  उत्तर द्याहटवा