बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

श्यामच्या आईचा अस्वीकार आणि आपण...



सुप्रसिद्ध आणि संवेदनशील लेखक-निर्माता-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची एक मुलाखत ऐकत होतो. त्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलं, ते असं की, श्यामची आई मला माझी आई वाटत नाही कारण माझी आई ही तशी अजिबातच नाही... ती तंबाखू खाते, शिव्या घालते. तिचं जगणं, संघर्ष वेगळा आहे. सामाजिकदृष्ट्या अत्यंत सजग असलेल्या आणि ते भान आणि जाणीवा घेऊनच मोठा बनलेल्या नागराजचं हे स्टेटमेंट महत्त्वाचंच. त्याशिवाय, काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री दिशा पिंकी शेख यांनीही शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित एका कार्यक्रमात श्यामच्या आईबद्दल अशाच पद्धतीचं विधान केलं.

हरकत नाही. आपल्यापैकी अनेकांच्या आया श्यामच्या आईसारख्या नसतीलही, किंवा कित्येकांच्या असतीलही. हा एक वेगळा भाग. या देशातलं सामाजिक वास्तव अधोरेखित करण्याच्या दृष्टीनं नागराज आणि दिशा यांनी सदर विधानं केलेली आहेत. या समाजातील विषमता, सामाजिक-आर्थिक दरी, दारिद्र्य आणि या दारिद्र्यामधलं विविध समाजघटकांचं जीणं, या अर्थानं या विधानाकडं पाहिलं जाणं आवश्यक आहे. या सगळ्या भेदांवर मात करीत, परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून भक्कमपणे उभे राहात या दोघांनीही आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. समाजातल्या अत्यंत खालच्या स्तरातील, ज्यांच्या नशिबी सातत्यानं नकारच आहे, त्यांनी समाजाला त्यांचा स्वीकार करायला भाग पाडलेलं आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारकार्यामुळं त्यांनी शिक्षण घेतलं, शहाणपण मिळवलं आणि त्यातूनच ते श्यामच्या आईपर्यंतही पोहोचले. हो, ही बाब महत्त्वाची आहे. हे दोघे श्यामच्या आईपर्यंत पोहोचले म्हणूनच ती आई आणि आपली आई यांच्यातला फरक-भेद त्यांच्या लक्षात आला आणि हे दोघे आपल्या आईसह त्यांच्या तमाम श्यामांचा उद्धार करण्याची भाषा करू लागले.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी की, हे दोघेही विचारवंत श्यामच्या आईला नाकारत नाहीयेत, तर आजच्या सामाजिक भोवतालामध्ये तिचा अस्वीकार नोंदविताहेत. नकार आणि अस्वीकार हा केवळ शब्दांचा खेळ मी मांडत नाहीये, तर त्यामधील सूक्ष्म भेद इथे मला आपल्यासमोर मांडायचा आहे. श्यामच्या आईला दारिद्र्यातीलच पण समाजातल्या वरिष्ठ जातीचं पर्यावरण मिळालं. त्या पर्यावरणामध्ये श्यामला गरीबीतीलही समाधान आणि सुसंस्कारांसह उत्तम माणूस म्हणून घडविण्याचा त्याच्या आईचा प्रयत्न आहे. तिच्या घरात सनातन वातावरण असलं तरी समाजातल्या खालच्या स्तरांतील माणसाविषयी-महिलांविषयी तिच्या मनात कणव, दया आहे. ती तिच्या कृतीतूनही दिसते आणि श्यामच्या मनावर तिच्या या सामाजिक संवेदनशीलतेचा खूप खोल संस्कार उमटलेला आहे. श्याम, पायाला जशी माती लागू नये म्हणून जपतोस, तसा मनाला घाण लागू नये, म्हणूनही जप हो... हे श्यामच्या आईचे संस्कारक्षम उद्गार केवळ श्यामच्याच नव्हे, तर अगदी प्रस्तुत लेखकाच्याही जीवनाचं एक महत्त्वाचं सूत्र झालेलं आहे. मी माझ्या मनात कोणाविषयीही कोणत्याही प्रकारचं किल्मिष, असूया अथवा पूर्वग्रह बाळगत नाही आणि समोरचा माणूस माझ्याबद्दल काय विचार करतो, याची तर मुळीच फिकीर करीत नाही कारण ती माझी समस्या नसतेच मुळी. तो त्यांचा प्रॉब्लेम असतो. तर, श्यामच्या आईच्या या एका वाक्यामध्येच माझ्या जीवनाचंही सूत्र कोणाला सापडेल, अशा पद्धतीचं सद्वर्तन करण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे. असो! व्यक्तीगत उदात्तीकरण करण्याचा इथे हेतू नाही, तर श्यामच्या आईचा हा माणूसपणाचा संस्कार किती महत्त्वाचा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न आहे.

तर, श्यामच्या आईच्या संस्काराचं महत्त्व असं की, त्यातून अत्यंत सुकोमल, हळव्या आणि संवेदनशील मनाचा श्याम घडला. समाजातल्या हरेक घटकांप्रती कळवळ्यानं ओथंबलेलं सुहृदय घेऊन वावरत राहिला; त्यांच्यासाठी, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत राहिला आणि कदाचित या कठोर समाजामध्ये आपल्या मूल्यांपेक्षा, आईच्या संस्कारांपेक्षाही काही मूल्ये अधिक वरचढ ठरताहेत, सामाजिकदृष्ट्या घातक ठरताहेत आणि त्यांचा परीघ हा त्या मूल्यसंस्कारांपेक्षा मोठा बनतो आहे, या जाणीवेनं अस्वस्थ झालेला श्याम अखेरीस आपलं आयुष्य मात्र कठोरपणानं संपवितो. मात्र, आपल्या आईच्या संस्कारांना आयुष्यभरात कधीही तडा जाऊ देत नाही. हे श्यामचंही मोठेपण इथं आपण लक्षात घ्यायलाच हवं. आईनं बिंबविलेली मूल्यं, संस्कार जपण्यासाठी प्रसंगी प्राणाहुती देण्याची तयारी असणारे किती श्याम आजच्या भोवतालामध्ये आढळतील आपल्याला? कदाचित नाहीच.

या पार्श्वभूमीवर, नागराज आणि दिशा यांच्या अस्वीकाराकडं पाहायला हवं. आजच्या भोवतालामधील श्यामच्या आईचं अस्तित्व, तिच्या संस्कारांचं मोल कमी झालेलं आहे, अशातला भाग नाही; पण, आजचा कालखंडही तिच्या काळचीच विषमता घेऊन उभा आहे. सामाजिक-आर्थिक समता, समानता या देशातल्या कित्येक घटकांच्या नजरेच्या टप्प्यापासूनही अद्याप कोसो दूर आहे. या परिस्थितीमध्ये राहणाऱ्या बालकांना, लोकांना आपापल्या आयांचं पर्यावरण घेऊन उभं राहायचं आहे. ही मुलं श्यामच्या आईपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि पोहोचली तरी एक प्रकारची निराशा त्यांचं मन आणि आयुष्य व्यापून राहण्याची शक्यताच अधिक. कारण, त्यांचा भोवताल आणि श्यामचा भोवताल, त्यांच्यासाठी असणाऱ्या मर्यादित संधी आणि आजच्या वरिष्ठ जातींतील तमाम श्यामांना उपलब्ध असणाऱ्या अमर्याद संधींचं आकाश यामध्येही जमीन-आस्मानाचा फरक आहे. आधी हा फरक दूर करण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं या देशातले सगळेच श्याम आणि त्यांच्या आया यांना विकासाच्या, उभं राहण्याच्या समान संधी उपलब्ध होणं आणि सर्वंकष विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांचं सामाजिक समावेश होणं, यासाठी व्यवस्थेनं पुढं होऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता नागराज आणि दिशा यांना अभिप्रेत आहे. व्यवस्थेच्या त्या प्रयत्नांना समस्त समाजघटकांचीही, विशेषतः सामाजिक-आर्थिकदृष्ट्या संपन्न, सधन घटकांची समर्थ साथ लाभणंही फार महत्त्वाचं आहे. तो मिळत नसेल तर, श्यामच्या आईचं मोल काहीच राहात नाही. व्यक्तीच्या धडपडीला पर्यावरणाची साथ मिळणं फार महत्त्वाचं आहे. ते जर उपलब्ध होणार नसेल, मानवी विकास साधला जाणार नसेल, तर त्या पर्यावरणामध्येच खोट असते आणि म्हणून मग त्या पर्यावरणाला वंचित, शोषितांनी नकार देणं स्वाभाविक आहे. त्या नकारातूनच मग श्यामच्या आईचाही अस्वीकार केला जातो कारण त्या पर्यावरणात तिच्या मूल्यांचं महत्त्व मातीमोलाचं ठरवलं जात असतं. श्यामला घडण्याच्या संधी नाकारल्या जात असतात. जिथं संधी नाकारल्या जातात, त्या व्यवस्थेचा स्वीकार करण्यात हशील तर काय? हे नागराज-दिशा यांच्या अस्वीकाराचं कारण आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं.

मात्र, हे वास्तव लक्षात घेऊनही माझ्या मनात एक वेगळी भीती आहे. आजच्या सामाजिक ध्रुवीकरणाच्या आणि एकूणच सामाजिक वाचन कमी होत जात असण्याच्या कालखंडात नागराज आणि दिशा यांच्या विधानांना कोणी थेट घेतलं, तर मात्र मोठा सामाजिक घोटाळा होऊन बसणार आहे. उद्या नागराज-दिशा यांच्यासारख्या सामाजिक दिग्दर्शकांनी हाच अस्वीकार सातत्यानं अधोरेखित केला, तर श्यामच्या आईला एक सार्वत्रिक नकार निर्माण होईल. त्यातून घडलेला श्यामही नाकारला जाईलच स्वाभाविकपणे! या नकारातून पुढच्या पिढ्या श्याम आणि त्याच्या आईपर्यंत पोहोचणारच नाहीत कदाचित. तसंही आजच्या भोवतालामध्ये श्यामच्या आणि त्याच्या आईच्या मूल्यसंस्कारांना मोल दिलं जात नाही. भांडवली व्यवस्थेत तर त्यांना स्थानच नाही. मात्र, श्यामचा आणि त्याच्या आईचा आवाज क्षीण होणं, आपल्याला परवडणारंही नाही. त्यासाठी माणसाच्या सहृदयतेला साद घालत राहण्याची त्यांची क्षमता आपण सातत्यानं अधोरेखित करीत राहायला हवं... तरच या व्यवस्थेच्या समग्र पटलावर कुठे एखादा श्याम अवतरेल. श्यामची गरज कधीही संपुष्टात येत नसते, येणार नाही. तमाम नागराज-दिशाच्या आयांचं परिवर्तन श्यामच्या आईत करावयाचं, तर त्यांना समताधिष्ठित विकासाच्या एकसमान संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, तरच त्यांचा व्यापक स्वीकार नोंदविला जाईल, अन्यथा अस्वीकाराच्या विद्रोहाला आपणाला सातत्यानं सामोरं जातच राहावं लागणार आहे. तो नोंदवित राहणं, ही आजच्या सामाजिक दिग्दर्शकांची सर्वात मोठी अपरिहार्यता आहे.