शुक्रवार, ३ मे, २०२४

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला: वर्ष तिसरे

हरित रसायनशास्त्र हा डॉ. भालचंद्र काकडे यांच्या संशोधनाचा गाभा: डॉ. माणिकराव साळुंखे

 

आ'लोकशाही प्रस्तुत डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत 'हरित रसायनशास्त्र' या विषयावर बोलताना माजी कुलगुरू व ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे

(डॉ. माणिकराव साळुंखे यांचे संपूर्ण व्याख्यान येथे ऐका)


कोल्हापूर, दि. ३ मे २०२४: डॉ. भालचंद्र काकडे यांचे संशोधन शाश्वत विकासकेंद्रित होते. हरित रसायनशास्त्र हा त्यांच्या संशोधनाचा गाभा होता. त्यांच्या निधनामुळे देश एका आश्वासक वैज्ञानिकाला मुकला आहे, अशी भावना ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ तथा माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आज व्यक्त केली.

डॉ. भालचंद्र काकडे यांच्या तृतीय स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला आलोकशाही या वाहिनीच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये डॉ. साळुंखे हरित रसायनशास्त्र या विषयावर बोलत होते.

डॉ. साळुंखे म्हणाले,  डॉ. भालचंद्र काकडे यांच्याशी व्यक्तीगत पातळीवर माझा कधी संबंध आला नसला तरी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील त्यांचे मार्गदर्शक डॉ. विजय मोहन यांच्याशी मात्र माझा चांगला परिचय राहिला. डॉ. काकडे यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये हाती घेतलेले संशोधन आणि विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांतून सादर केलेल्या शोधनिबंधांचे स्वरुप पाहता त्यांचे संशोधन हे पूर्णतः पर्यावरणपूरक होते, असे म्हणता येते. आज आपण शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये घेऊन संशोधन करण्यासाठी संशोधकांना प्रेरित करतो आहोत, तथापि तत्पूर्वीच डॉ. काकडे यांनी शाश्वत विकासाचे संशोधन होती घेतल्याचे दिसून येते. पाण्यावर रेल्वे चालविण्याचे अतिशय महत्त्वाकांक्षी संशोधन त्यांनी हाती घेतले होते. हरित रसायनशास्त्राच्या दृष्टीने ते खरोखरीच खूप महत्त्वाचे असे होते. त्यांच्या अचानक निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे.

डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, हरित रसायनशास्त्र म्हणजे जास्तीत जास्त रासायनिक प्रक्रिया, अभिक्रिया या जास्तीत जास्त पर्यावरणपूरक पद्धतीने घडवून आणणे होय. आज मोठमोठ्या उद्योगांमध्ये विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी ज्या काही रासायनिक प्रक्रिया घडवून आणल्या जातात, त्या अतिउच्च तापमानाला आणि विविध रसायनांच्या वापराद्वारे घडवून आणल्या जातात. त्यामधून बाहेर पडणारी उप-उत्पादने ही सुद्धा पर्यावरणासह मानवी आरोग्यालाही घातक असतात. त्यामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जन आणि हवा-पाण्याचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. या उलट निसर्गामधील प्रक्रियांचे असते. निसर्गातील प्रत्येक प्रकारची रसायननिर्मिती ही पर्यावरणपूरक पद्धतीने घडविली जाते. हरित रसायनशास्त्राचे उत्तम उदाहरण म्हणजे मानवी शरीर होय. मानवी शरीरातील अभिक्रिया आपल्याला खूप काही शिकविणाऱ्या आहेत. शरीरातील सर्व अभिक्रिया या सर्वसामान्य तापमानामध्ये होतात. इतर कोणत्याही नव्हे, तर पाण्यासारख्या द्रावणामध्ये होतात. त्याचप्रमाणे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी पद्धतीने न होता उदासीन पद्धतीने होतात. त्यामधून कोणतेही घातक उपपदार्थ निर्माण होत नाहीत. त्याचप्रमाणे ते नैसर्गिकरित्या विघटनशीलही असतात. सध्या तरी आपल्याकडे मानवी शरीराइतके आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही. मात्र, आपण त्या दिशेने संशोधनाच्या दिशा केंद्रित करणे आवश्यक आहे. आपण औद्योगिक, व्यावसायिक पातळीवर घडवून आणत असलेल्या अभिक्रियांमधील उप-उत्पादनांचे आणि प्रदूषकांचे प्रमाण कमी कमी करीत नेण्याचा प्रयत्न करायला हवा. पुढे टप्प्याटप्प्याने असे घातक पदार्थ निर्माणच होणार नाहीत किंवा जे निर्माण होतील ते नैसर्गिकरित्या विघटनशील असावेत, याकडे कटाक्ष असावा. सध्या आपण रासायनिक अभिक्रियांसाठी अनेकविध हानीकारक रसायने वापरतो. पण, पुढे या अभिक्रिया पाण्यातच घडविता येतील का, या दिशेनेही विचार व संशोधन करणे गरजेचे आहे. पुनर्वापरक्षम कच्चा माल, नवनिर्मितीक्षम उत्पादने आणि त्यांचे तत्काळ विश्लेषण करण्याची सुविधा यांचाही या संशोधनामध्ये समावेश करायला हवा. त्या पद्धतीच्या साधनसुविधांची निर्मिती, उद्योग संरचना विकसित करण्याची आवश्यकता आहे. महात्मा गांधी यांच्या हिंद स्वराज संकल्पनेमध्येही निसर्गाला ओरबाडू नका, असाच संदेश आहे. मानवी समुदायाचे भवितव्य उज्ज्वल बनवायचे असेल, तर पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासक्षम हरित रसायनशास्त्राला पर्याय नाही, असा संदेश डॉ. साळुंखे यांनी दिला.

कार्यक्रमात आलोकशाही वाहिनीचे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत करून परिचय करून दिला, तसेच आभार मानले. डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत उद्या (दि. ४ मे) सायं. ७ वाजता टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लि. कंपनीचे उप-सरव्यवस्थापक विनय कुलकर्णी यांचे आविष्कार जल अभियांत्रिकीचा!’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा