मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

नितळ-८: हजारों बुत हैं...


(मुंबईच्या 'दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या लेखमालिकेअंतर्गत मंगळवार, दि. १८ एप्रिल २०२३ रोजी प्रकाशित झालेला लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

हैदर अली आतिशचा एक शेर आहे-

इलाही एक दिल किस किस को दूँ मैं!

हज़ारों बुत हैं याँ हिन्दोस्तान है।

(परमेश्वरा, माझं एकच हृदय कोणा-कोणास देऊ बरे? एकीकडे हजारों मूर्त्या आहेत, अन् दुसरीकडे माझा देश!)

भारतीय समाज हा प्रतिमा, प्रतीके आणि संबोधने यांच्या जंजाळात गुरफटलेला आहे. त्याच्या समस्त अस्मिता या राष्ट्रपेक्षा, एखाद्या महापुरूषाच्या विचार अथवा कर्तृत्वापेक्षा या प्रतिमा आणि संबोधनांभोवतीच एकवटलेल्या दिसतात. मूळ बाबीकडे लक्ष देण्याऐवजी तो अशा निरुपयोगी बाबींमध्ये अधिक गुंतत जात आहे आणि कित्येकदा अनाठायी वादांना कारणीभूत ठरतो आहे.

उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त महाराष्ट्राचं आराध्यदैवतच. महाराजांविषयी आदर नाही, असा माणूस शोधून सापडावयाचा नाही. महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख हा अनादराचा भाग असण्याचं कारणच नाही, उलट त्यांच्याप्रती आपलेपणाच त्यातून प्रतिबिंबित होतो. महाराष्ट्रात शिवाजी आणि संभाजी नाव असणारे लोक गावोगावी, नव्हे घरोघरी सापडतील. जेव्हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला महाराजांचे नाव द्यायचं ठरलं, तेव्हा छत्रपती राजाराम महाराज, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी सुरवातीपासूनच शिवाजी विद्यापीठ असाच नामप्रयोग केला. बॅ. पी.जी. पाटील यांनीही शिवाजी विद्यापीठाचे नामकरण अनादराच्या हेतूने नव्हे, तर या विद्यापीठाचे नाव उच्चारणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी छत्रपतींचे नाव आलेच पाहिजे, या हेतूने केले असल्याचे स्पष्ट केले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांनी अधूनमधून नामविस्ताराच्या येणाऱ्या मागण्या ऐकून त्यासंदर्भात सविस्तर निवेदन केले होते. त्यांनी म्हटले होते की, शिवाजी विद्यापीठ असे नामकरण खूप विचारपूर्वक करण्यात आले आहे. त्याचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार झाला की लगोलग त्याचे सी.एस.एम.यु. असे लघुरुप प्रचलित होण्याचा धोका आहे. सीएसटी (शिवाजी महाराज टर्मिनस), सीएसएमटी (छत्रपती शाहू महाराज टर्मिनस), बामु’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), एसपीपीयु (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), आरपीडी (राणी पार्वतीदेवी महाविद्यालय) अशी उदाहरणं आहेतच आपल्या नजरेसमोर. विद्यापीठाची स्थापना झाली त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो आणि विद्यापीठाच्या नावात छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख असावा, असे आमचे मत होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आमच्याशी चर्चा केली. त्यांनी शिवाजी विद्यापीठ या नामकरणामागील भूमिका स्पष्ट केली. ती योग्य वाटल्याने आम्ही सहकार्य केले. त्यामुळे लघुरुप होण्याचा धोका टाळण्यासाठी नव्याने नामविस्ताराचा आग्रह धरणाऱ्यांनी सबुरीने घ्यावे. मात्र, अगदी एन.डी. पाटील यांनी सांगितल्यानंतरही आज लव्हाळ्याप्रमाणे उगवणाऱ्या संस्था हा वस्तुनिष्ठ इतिहास लक्षात न घेता लगोलग अस्मितेचे कारण पुढे करीत नामविस्ताराचे निवेदन घेऊन विद्यापीठाच्या, शासनाच्या दारात येतात आणि लोकानुनय सांभाळण्याच्या नादात त्यांनाही ते स्वीकारण्याखेरीज पर्याय राहात नाही.

मूर्त्या, पुतळे उभारले की आपल्या साऱ्या निष्ठा आपण त्या पुतळ्यांच्या नव्हे, तर ते उभारणाऱ्यांच्या पायी वाहायला सिद्ध होऊन जातो. महापुरूषांच्या अनाठायी दैवतीकरणाच्या मागे आपण लागलेलो आहोत. विभूतीपूजेच्या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा देऊन ठेवलेलाच आहे. संविधान सभेत केलेल्या भाषणात ते म्हणतात की, जगातील कोणत्याही देशात नाही, इतकी विभूतीपूजा भारतीय राजकारणात आहे. धर्मातील मुक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असेल; पण, राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकुमशाहीकडे नेणारा मार्ग असेल.

बाबासाहेबांचा इशारा लक्षात न घेता आपण आपल्या साऱ्या भावभावना, अस्मिता या विचारांपेक्षा पुतळ्यांच्या पायी वाहिलेल्या दिसतात. त्यामुळे अलिकडे भावना दुखावणे हे प्रकरणही कधी नव्हे इतके पातळ झाले आहे. काही झाले तरी कोणाच्या ना कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ लागल्या आहेत. आपल्याकडे लोकपरंपरेतून आलेल्या अनेक म्हणी, वाक्प्रचार या जगण्याची शिकवण देणाऱ्या आहेत. मात्र, त्यातील आशय लक्षात न घेता केवळ शाब्दिकता पुढे करून त्याचा बाऊ केला जातो आहे. त्यामुळे स्वच्छ अभिव्यक्तीला सुद्धा आता मर्यादा पडू लागलेल्या आहेत. बोलण्याच्या ओघात निघून गेलेला सहजोद्गार माफीनाम्यापर्यंत घेऊन जाऊ शकण्याच्या काळात आपण वावरतो आहोत.

एखाद्या समूहाचा सन्मान हा विशिष्ट शब्दांनी केला जाणे उचितच आहे. जसे की, दिव्यांग, दिव्यदृष्टी. मात्र, या संबोधनांच्या पलिकडे एक समाज म्हणून आपण या घटकांना त्यांची प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याची जबाबदारी निभावतो आहोत का, हा खरा मुद्दा आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.

स्त्रियांच्या प्रतिष्ठेच्या बाबतीत तर आपण अशा संबोधनांच्या मार्गानेच आपली संवेदनशीलता दाखविण्याचा प्रयत्न करीत राहिलो आहोत. स्त्रीचे दुय्यमत्व संपविण्यासाठी कौटुंबिक अथवा सामाजिक पातळीवर आपण किती प्रयत्न करतो आहोत, हे दररोजचे वृत्तपत्र उघडले की लक्षात येतेच. लहान मुलीपासून ते जख्ख वृद्धेपर्यंत पुरूषांच्या अत्याचारातून कोणीही सुटल्याचे दिसत नाही. स्त्रियांना त्यांचे न्याय्य नैसर्गिक हक्क प्रदान करण्याच्या बाबतीत सुद्धा आपण समाज म्हणून मागेच पडलेलो आहोत. स्त्रीच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला आपण पुरूषी सत्तेच्या प्रतीकांनी मढवलेले आहे, याची जाणीव स्त्रियांनाच नाही मुळी. तिच्या भांगात सिंदूर आहे, तिच्या कपाळी कुंकू आहे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, हातात हिरवा चुडा आहे, बोटात अंगठी आहे, अंगावर हिरवी साडी आहे, पायात पैंजण, जोडवी आहे. ही सारी प्रतीकं पुरूषाचं तिच्या आयुष्यातील अस्तित्व दाखविणारी, मात्र ती मोठ्या अभिमानानं मिरवते आहे. पुरूषाच्या बोटात तिच्या नावची (म्हणजे सासऱ्यानं लग्नात दिलेली) अंगठी असली तर असते किंवा नसतेही. पुरूष हा आयुष्यभर श्रीमान असतो; मात्र, स्त्रीच्या जीवनातील पुरूषाचं अस्तित्व तिच्या संबोधनातून अधोरेखित केलं जातं. तिचं कुमारिका असणं, तिचं सौभाग्यवती असणं आणि तिचं श्रीमती असणं, हे सारं त्या पुरूषी अस्तित्वाशी, तिच्या आयुष्यात त्याच्या असण्या-नसण्याशी निगडित आहे. त्यापलिकडं जाऊन तिला आपण अन्य कोणतं संबोधन देतो, यानं तिच्या जगण्यात असं कोणतं मोठं आमुलाग्र परिवर्तन साधणार आहोत? त्यापेक्षाही स्त्रीची प्रतिष्ठा जपण्यासाठी, उंचावण्यासाठी एक समाज, एक राज्य, एक राष्ट्र म्हणून आपण काय करतो, काय करू शकतो, हे अधिक महत्त्वाचं नाही का?


सोमवार, १० एप्रिल, २०२३

फुले-आंबेडकर: एक वैचारिक ऋणानुबंध

 


(दि. ११ एप्रिल ही महात्मा फुले यांची तर १४ एप्रिल ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्ताने दै. पुढारीच्या 'बहार' पुरवणीमध्ये दि. ९ एप्रिल २०२३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा २८ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबई येथे षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त गौरव करण्यात आला. या समारंभात उपस्थितांशी हृद्गत साधताना बाबासाहेबांनी, माझं आयुष्य बुद्ध, कबीर, फुले या तीन गुरूंनी आणि प्रज्ञा, स्वाभिमान व शील या तीन उपास्य दैवतांनी घडविलं आहे, असे उद्गार काढले. बाबासाहेब म्हणतात, माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरू बुद्ध होत. मॅट्रिक पास झालो तेव्हा दादा केळुस्करांनी मला बुद्धचरित्र बक्षीस दिलं. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला. त्या धर्माची पकड माझ्या मनावर कायमची आहे आणि माझी अशी ठाम खात्री आहे की, जगाचं कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकेल. माझे दुसरे गुरू कबीर होत. कबीराच्या जीवनाचा आणि तत्त्वाचाही माझ्यावर फार मोठा परिणाम आहे. मी मोठा कोणालाच- अगदी गांधींनाही, म्हटले नाही. कबीराने म्हटले आहे, मानुष होना कठीण है। तो साधु क्या बने? जो माणूस झाला नाही, तो महात्मा कसा होईल? आणि माझे तिसरे गुरू म्हणजे जोतीबा फुले होत.. ब्राह्मणेतरांचे खरे गुरू तेच होत. शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी, महार, मांग, चांभारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकविले. पूर्वीच्या (ब्राह्मणेतर पक्ष) राजकारणात आम्ही जोतीबांच्या मार्गानेच जात होतो. पुढे मराठे आमच्यातून फुटले. कोणी काँग्रेसमध्ये तर कोणी हिंदू महासभेत गेले. कोणी कोठेही गेले तरी आम्ही जोतीरावांच्या मार्गानेच जात राहू. काही झाले तरी जोतीबांचा मार्ग सोडणार नाही.

महात्मा फुले यांना गुरूपद प्रदान करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणखी एके ठिकाणी अधिक नेमकेपणाने त्यामागील कारण दिले आहे. नाशिक येथील (१७ नोव्हेंबर १९५१) सभेत बाबासाहेब सांगतात, जोतीबांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. आत्मविश्वासाने मी आज म्हणू शकतो की, मीच तेवढा आज जोतीबांना एकनिष्ठ राहिलो आहे आणि मला अशी खात्री आहे की, या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा कोणताही पक्ष पुढे आला, त्याने कोणतेही नाव धारण केले तरी त्याला जोतीबांचे धोरण, त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे जावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे. समाजातील ८० टक्के लोकांस विद्याप्राप्ती करू न देणे आणि त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय गुलामगिरीत जखडून ठेवणे हे दिसत असता स्वराज्य, स्वराज्य म्हणून ओरडण्यात काय फायदा? स्वराज्याचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे. मागासलेल्या वर्गांच्या सर्वांगीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढे आल्याशिवाय कोणताही पक्ष आज जनतेचे नेतृत्व घेऊ शकत नाही, हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे.

महात्मा फुले यांचे धोरण, तत्त्वज्ञान आणि त्यांचा समग्र कार्यक्रम हा लोकशाही प्रस्थापनेचा सच्चा मार्ग आहे, अशी धारणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. या लोकशाही मूल्यांची देशामध्ये प्रस्थापना करावयाची, तर त्यास महात्मा फुले यांचा मार्ग स्वीकारण्याखेरीज पर्याय नाही, या भावनेतून बाबासाहेब महात्मा फुल्यांचे बोट धरून लोकशाहीच्या मार्गावरुन चालत राहतात आणि ती मूल्ये या देशाला प्रदान करण्यासाठी हयात वेचतात, हे या गुरू-शिष्य जोडीचे वैशिष्ट्य आहे. बाबासाहेब ज्या तीन महामानवांना आपले गुरू घोषित करतात, ते सर्वच बाबासाहेबांच्या जन्माआधी होऊन गेलेले आहेत. अगदी महात्मा फुले यांचे १८९०मध्ये निधन झाले आणि त्यानंतर अवघ्या पाचेक महिन्यांत बाबासाहेबांचा महू इथे जन्म झाला. मात्र, या सर्वांनी जी मानवतेची मूल्ये प्रस्थापित करण्यासाठी अखंड प्रयत्न केले, त्या मूल्यांशी बाबासाहेब आपले शिष्यत्वाचे नाते जोडतात.

बाबासाहेबांनी  'शुद्र पूर्वी कोण होते?" हा आपला ग्रंथ  महात्मा फुले यांना अर्पण केला. अतिशय मार्मिक अशी ही अर्पणपत्रिका आहे. त्यात आंबेडकर म्हणतात की, "हिंदू समाजातील कनिष्ठ वर्गांना ते उच्च जातीचे गुलाम आहेत, याची जाणीव त्यांनी (म. फुले यांनी) करून दिली आणि परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळविणे, यापेक्षा सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना जास्त मूलगामी आहे, असा मूलमंत्र घरोघरी पोहोचविला, त्या राष्ट्रपिता महात्मा फुले या आधुनिक भारतातील सर्वश्रेष्ठ अशा शुद्रास हा ग्रंथ सादर अर्पण." या वरुन महात्मा फुले यांच्याप्रती डॉ. आंबेडकर यांच्या मनी असलेला अतीव आदर आपल्या लक्षात येऊ शकेल.

महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील अत्यंत मूलभूत अशा समाजपरिवर्तनाच्या चळवळीचे आद्यप्रवर्तक होते. हिंदू समाजातील शूद्रातिशूद्रांच्या व्यथा त्यांनी वेशीवर टांगल्या. सावकारी पाशात जखडलेल्या, कर्जबाजारीपणापायी हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या गाऱ्हाण्यांना त्यांनी वाचा फोडली. या कष्टकऱ्यांचे अज्ञान आणि दारिद्र्य हे ईश्वरनिर्मित नसून त्याचे मूळ आपल्या प्रस्थापित समाजव्यवस्थेमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात आणून दिले. म्हणूनच या व्यवस्थेतील धर्माधिष्ठित बौद्धिक गुलामगिरी, सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषण यांच्याकडे त्यांनी सर्वप्रथम लोकांचे लक्ष वेधले. एकोणीसाव्या शतकात अनेक कर्ते समाजसुधारक होऊन गेले. त्यात बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, भांडारकर, रानडे, विष्णुशास्त्री, न्या. रानडे आदींचा उल्लेख करता येईल. त्यांची दृष्टीही उदार आणि व्यापक होती. त्यांची सामाजिक कर्तव्यबुद्धी कौतुकास्पद होती, तरीही त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित राहिले. स्त्रीशिक्षण, बालविवाह, विधवा पुनर्विवाह, केशवपन आदी स्त्रीदास्यविमोचनाच्या प्रश्नांवरच त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. उच्चवर्णीयांच्या कौटुंबिक सुधारणेपलिकडे त्यांच्या कार्याची मजल गेली नाही. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांच्या कार्याची दिशा मात्र अगदी भिन्न स्वरुपाची होती. या समाजातल्या परंपरागत जीवनसरणीतील अनिष्ट व अन्यायकारक रुढी-प्रथांवर तर त्यांनी सातत्याने कोरडे ओढलेच, शिवाय, रुढीप्रामाण्य आणि सामाजिक विषमतेला दैवी अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या धर्मसंस्थेवरच त्यांनी हल्ला चढविला. दलित, शोषित, वंचित या वर्गांसह जातधर्मनिरपेक्ष शोषणाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या स्त्रियांचा कैवार घेऊन त्यांना त्यांचे नैसर्गिक मानवी अधिकार प्राप्त करून देण्यासाठी ते जन्मभर झगडले. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी हिरीरीने प्रयत्नशील राहिले. बहुजन समाजातील नवशिक्षितांना आपल्यावरील सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत राहिले. स्वतःच्या विवेकबुद्धीला जे पटेल, ते आचरणात आणताना फुले डगमगले नाहीत. महात्मा फुले यांनी न्याय व समता यांवर आधारलेली आदर्श समाजरचना अस्तित्वात आणण्याचा ध्येयवाद स्वीकारलेला होता. त्यासाठी ते अखेरपर्यंत झटले. तळागाळातील शूद्रातिशूद्रांच्या सुखदुःखांशी ते तादात्म्य पावले. फुल्यांची ही तादात्म्यता आणि कृतीशीलता यामध्येच त्यांचे महात्मेपण आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही व्यक्तीचे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा, समता, सामाजिक न्याय याच मानवतावादी लोकशाही मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी सारा संघर्ष मांडलेला होता. कृतीशीलतेच्या बाबतीतही ते खूपच आक्रमक होते. फुल्यांनी निर्मिकाच्या स्वरुपात का होई ना, पण ईश्वराचे अस्तित्व मानले. पण, बाबासाहेबांनी तेही नाकारण्याचे धाडस दाखविले. महात्मा फुले यांचा विवेकवाद, विज्ञाननिष्ठा हे गुणही बाबासाहेबांमध्ये प्रकर्षाने आढळून येतात. धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या बाबतीत बाबासाहेब अधिक आक्रमक होतात. चातुर्वर्ण्याचा मनोरा उद्ध्वस्त केल्याखेरीज हिंदू समाजातील जातिप्रथेचे उच्चाटन अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. जातिनिर्मूलन या ग्रंथात जातीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे त्याचप्रमाणे जातीव्यवस्था ही श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी असल्याचे ठाम प्रतिपादन बाबासाहेबांनी केले आहे. जातिनिर्मूलनाचे उपायही बाबासाहेब सांगतात. धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह, व्यापक लोकशिक्षण आणि संसाधनांचे फेरवाटप या चतुःसूत्रीच्या बळावरच जातिप्रथेचे समूळ उच्चाटन करता येणे शक्य असल्याचा निष्कर्ष मांडतात. त्याखेरीज स्वातंत्र्य, समता व बंधुता या मानवी मूल्यांची प्रस्थापना अशक्य असल्याचे सांगतात. बाबासाहेबांचा चातुर्वर्ण्याविरोधातील हा लढा भारतीय समाजाला, विशेषतः अस्पृश्यांना केवळ शैक्षणिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक करण्यासाठीच नव्हता, तर त्यांच्यामध्ये सामाजिक-आर्थिक उत्थानाच्या जाणीवा निर्माण करण्यासाठीचाही होता, ही बाब लक्षात घेतली जाणे फार आवश्यक आहे.

गुलामगिरी,शेतकऱ्याचा असूड आणि अखंडादी काव्यरचनांमधून महात्मा फुले शेतकऱ्यांच्या ज्या समस्यांचे सूचन करतात, त्या समस्यांचे पुढील काळात निराकरण करण्यासाठी बाबासाहेब झटताना दिसतात. महार वतनामुळे अस्पृश्य समाज स्वाभिमानशून्य व अल्पसंतुष्ट झाल्याची बाब हेरून बाबासाहेबांनी महार वतन नष्ट करण्याचे विधेयक मांडले. याच्या अनुषंगाने लोकांना सविस्तर अवगत करण्यासाठी त्यांनी महार आणि त्यांचे वतन अथवा विसाव्या शतकातील गुलामगिरी ही पुस्तिका लिहीली. अस्पृश्यांनी हीन दर्जाची कामे सोडून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावे आणि आपल्या मानवी हक्कांसाठी संघर्षरत व्हावे, ही अपेक्षा घेऊन बाबासाहेब त्यांच्यावरील गुलामगिरीचे जोखड भिरकावून देण्यासाठी पुढे सरसावतात. बाबासाहेब त्यानंतर लगोलग सावकारी नियंत्रण विधेयक मांडतात. सावकाराकडून पिळवणूक झालेला केवळ अस्पृश्य वर्गच नाही, तर सर्वच जातीजमातींमधील गोरगरीबांचे सावकाराकडून शोषण होते. त्यामुळे सावकारासाठी व्यावसायिक परवाना, त्याचे वार्षिक नूतनीकरण, सावकारी गैरव्यवहार आढळल्यास परवाना रद्द करण्याची तरतूद, कर्ज देण्याबाबतच्या लेखी व्यवहाराची सोय, धनकोने ऋणकोस द्यावयाचे कर्जव्यवहाराचे खातेपुस्तक आदी तरतुदी या विधेयकामध्ये होत्या.

बाबासाहेबांनी खोती व तालुकदारी पद्धती नष्ट करण्यासाठी आणलेले विधेयक फारच महत्त्वाचे होते. खोतांकडून शेतकरी कुळांचे होणारे शोषण थांबविण्यासाठी व त्यांना संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी हे विधेयक त्यांनी मांडले. नाममात्र मोबदल्यात कुळांकडून कष्टाची कामे करून घेण्यास त्यांनी विरोध केला. खोतांनी त्याविरोधात दाखल केलेल्या दाव्यांमध्ये कुळांच्या बाजूने बॅरिस्टर बाबासाहेब उभे राहिले आणि त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. सुमारे २० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा (१० जानेवारी १९३८) त्यांनी आझाद मैदानापासून कौन्सिल हॉलपर्यंत नेला. बाबासाहेबांनी पुढे केंद्रीय मजूरमंत्री या नात्याने कामगारांच्या मानवी व नैसर्गिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या.

याठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांच्या योगदानाचा उल्लेख केल्याखेरीज आपल्याला पुढे जाता येणार नाही कारण महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यकर्तृत्वाची मधली महत्त्वाची कडी जर कोणी जोडली असेल तर ती शाहू महाराजांनीच होय.

भारताच्या राजकीय स्वातंत्र्यासाठीचा झगडा चालू असतानाच्या कालखंडात भारतीय समाजातील परीघावरील आणि परीघाबाहेरच्या समाजघटकांच्या सामाजिक समावेशनासाठीचा झगडा मांडण्याची आणि भारताच्या राजकीय स्वातंत्र्याला पूर्णत्व प्रदान करण्याची महान कामगिरी हे फुले-शाहू-आंबेडकरांनी आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी दिलेले महत्त्वाचे योगदान आहे. म्हणूनच या त्रयीचे आधुनिक भारताच्या जडणघडणीमधील स्थान सातत्याने अधोरेखित करीत राहणेही महत्त्वाचे आहे.


(पुढारी ऑनलाईनवरील लेखाची लिंक: प्रासंगिक : फुले-आंबेडकर : एक वैचारिक ऋणानुबंध | पुढारी (pudhari.news))

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

नितळ-७: अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा...



('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेमधील पुढील भाग माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा नित्याचाच. इथं प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या संघर्षात गुंतलेली आहे. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, प्रत्येकाचे ध्येय वेगळे आणि ते साध्य करण्याच्या वाटाही निरनिराळ्या. तिथं माणसाचं लहान-मोठेपण किंवा इतर कोणत्याही भेदांनी फरक पडत नाही. या संघर्षाच्या वाटा जिथं एकमेकांना छेदतात किंवा खूपच समांतर धावायला लागतात, तेव्हा त्याला स्पर्धेचं स्वरुप येतं- अगदी जीवघेण्या.

हा संघर्ष मुळात कशासाठी असतो आणि येतो कोठून, याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की पहिली गोष्ट असते, ती जगणं. जगण्यासाठी प्रत्येकाला काही मूलभूत बाबींची आवश्यकता असते. त्या मूलभूत गरजांची पूर्तता जर नैसर्गिकरित्या होत नसेल, तर त्या मिळविण्यासाठीचा संघर्ष हा आपल्या आयुष्यात सर्वप्रथम येतो. हवा, अन्न आणि पाणी या त्यातल्या सर्वाधिक मूलभूत. चांगल्या निर्मळ हवेवर अधिकार सर्वांचाच असायला हवा. पण, प्रत्यक्षात माणसानंच प्रगती आणि उन्नतीच्या नावाखाली ती प्रदूषित करून टाकली आहे. तेव्हा चांगलं पर्यावरण मिळविण्यासाठीचा झगडा, ही आपली प्राथमिक गरज आणि जबाबदारी असली, तरी आपल्या प्राधान्यक्रमावर तिचा क्रमांक कुठं तरी खूप खाली लागतो. कोविडच्या कालखंडात ऑक्सिजनच्या एकेका श्वासाअभावी टाचा घासून आपल्यातले किती तरी जण टाचा घासून मृत्यूमुखी पडले, तरी हे शहाणपण आपल्याला येत नाही. काय म्हणावं याला?

पुढला संघर्ष हा पाण्यासाठीचा आहे. जी गोष्ट हवेची, तीच पाण्याच्या बाबतीतही आपण करून ठेवली आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि त्या औद्योगिकीकरणाला प्रदूषण नियंत्रणाच्या ज्या अटी आहेत, त्यांना पळवाटा निर्माण करून देणारी व्यवस्थेतीलच यंत्रणा, यामुळं आज नद्याच्या नद्या, पाणवठेच्या पाणवठे प्रदूषणाचे वाहक झाले आहेत. ज्या जीवनवाहिन्यांचे काठ धरून जगातल्या महानतम संस्कृती विकसित झाल्या, त्या जीवनवाहिन्यांचाच जीव या संस्कृतीच्या वाहकांनी आज गुदमरुन टाकला आहे.

हे हवापाण्याचं प्रदूषण अन्नामध्येही उतरलं आहे. आपला सारा झगडा हा पोटाची दोन वेळच्या भुकेची आग शमविण्यासाठी मांडलेला आहे. मात्र, तिथं तर प्रचंड विषमतेनं रान व्यापलं आहे. देशातल्या साधनसंपत्तीचं कधी नव्हे इतकं विषम वाटप होऊ लागलेलं आहे. देशाची ९० टक्के संपत्ती २ टक्के लोकांच्या हाती, आणि ९८ टक्के लोकसंख्येसाठी अवघी १० टक्के संपत्ती. संघर्षाचं, सर्वसामान्य, गरीब माणसाच्या दोन वेळच्या अन्नासाठी होणाऱ्या दमछाकीचं मूळ इथं एकवटलं आहे.

माणसाच्या हवा, पाणी आणि अन्न या नैसर्गिक मूलभूत गरजांचंच जिथं शमन होऊ शकत नाही, तिथं वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आदी वर्धित गरजा भागणं, या परिस्थितीत कसं बरं शक्य आहे? त्यासाठीचा झगडा तर आणखीच मोठा. तो झगडा मांडत असताना मग जर कोणी चोरीसारख्या वाममार्गाचा अवलंब करू लागला तर तो दोष कोणाला द्यायचा? त्या व्यक्तीला की त्या कृत्यासाठी त्याला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेला?

मुळात व्यवस्था म्हणजे वेगळं असं काही नसतंच ना! तीही तुमच्या आमच्यातले लोकच राबवितात. म्हणजे मग समस्या आहे ती राबविणाऱ्या मनांची, मानसिकतेची आणि हातांची. मुद्दा केवळ भौतिक संपत्तीचा नाही, तो सर्वसमावेशक उन्नतीचा आहे. मानवी समाजाची एकात्मिक उन्नती साधायची तर त्याला भौतिक साधनांपेक्षाही नैतिक उन्नयन करणाऱ्या साधनांची आणि नियमनाची मोठी गरज आहे. ही गरज लक्षात येऊन ती भागविण्याचे दिशादर्शन करणारे महामानव या भूमीवर अडीच हजार वर्षांपूर्वी होऊन गेले आहेत आणि त्यांच्या संदेशांची कधी नव्हे इतक्या प्रकर्षाने अवलंब करण्याची जाणीव करून देण्याची ही घटिका आहे. तथागत गौतम बुद्ध आणि भगवान महावीर या क्षत्रिय कुळात जन्मलेल्या महामानवांनी अखिल मानवजातीला तिच्या उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे.

भगवान बुद्ध मानवाला त्याच्या दुःखनिवृत्तीचा मार्ग दाखवून देतो. जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, हे दुःख पूर्णपणे नष्ट केले जाऊ शकते आणि दुःख दूर करण्यासाठी मार्ग आहे, ही चार आर्यसत्ये बुद्ध सांगतात. त्यासाठी लौकिक आयुष्यात अहिंसा, सत्य बोलणे, चोरी न करणे, अव्यभिचार आणि आसक्तीपासून दूर राहणे या पंचशीलाचा अवलंब करण्याचा मार्ग बुद्ध जगाला दाखवितात. ज्या व्यक्तीला आयुष्य सुखाने जगावयाचे असेल, त्याने योग्य दृष्टीकोन, उचित निर्धार, उत्तम वाणी, चांगले कर्म, संतुलित उपजीविका, मानसिक शुद्धता, सशक्त व्यक्तीमत्त्व विकास आणि सम्यक समाधी या अष्टांगमार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

भगवान महावीरही यापेक्षा काही वेगळे सांगत नाहीत. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य याच पाच मूल्यांच्या आधारे एक चांगले जीवन व्यतित करता येऊ शकते आणि मनुष्याने त्याच मार्गाने स्वतःही जगले पाहिजे आणि इतरांनाही जगू दिले पाहिजे; पक्षी, जगण्यास मदत केली पाहिजे, असे महावीर सांगतात.

आपल्याला ही मूल्ये काही नव्याने सांगितली गेली आहेत किंवा आज प्रथमच त्यांचा उच्चार होतो आहे, अशातला भाग नाही. गेली २५०० वर्षे त्यांचे उच्चारण केले जात आहे, अनुसरण केले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष त्यांचे पालन करणाऱ्यांची संख्या घटत चालली असल्यामुळे आज आपण ज्या समस्त समस्यांना सामोरे जात आहोत, त्या उद्भवल्या आहेत. आज भोवतालात सारंच या महामानवांच्या संदेशाच्या विपरित आचरण दृष्टीस पडत आहे. शारीरिक, मानसिक हिंसेच्या घटना पदोपदी घडताहेत. असत्याचा बाजार पूर्णपणे तेजीत आहे. भौतिक तर आहेतच, पण मनोकायिक चोरीचे, व्यभिचाराचे प्रकारही भोवतालात नित्य व्याप्त आहेत. सारं केवळ मला आणि मलाच मिळायला हवं, इतरांपेक्षा माझ्याकडे अधिकचं हवं, ही भावना प्रत्येकाच्या मनात उद्रेक घडवित आहे. त्यातून सारा मोहमायांचा आणि संपत्तीसंचयाचा आणि अखेरीस संघर्षाचा माहौल उद्भवित आहे.

गेल्या अडीच हजार वर्षांपासून बुद्ध-महावीर आपल्यातल्या मानवतेला आव्हान देणाऱ्या या गोष्टींबाबत आपल्याला पदोपदी सावध करीत आहेत, आपल्यातल्या जीवघेण्या संघर्षाचं मूळ दाखवून देत आहेत, पण आपण त्यांचं कधीच ऐकत नाही. पण, कधी तरी त्यांचं ऐकण्याखेरीज मानवतेला पर्याय राहणार नाही कारण तेव्हा आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं ठाकलेलं असेल. म्हणूनच त्यांचं स्मरण नित्य करीत राहणं अन् करवून देत राहणं महत्त्वाचंय!

(लेखक माध्यम व जनसंपर्क व्यावसायिक आहेत.)