मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

शिवरायांच्या हयातीमधील त्यांच्या शिल्पाचा इतिहास आणि कथा

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे यादवाड येथील हेच ते दुर्मिळ, ऐतिहासिक महत्त्वाचे शिल्प

शिल्पाच्या खालील भागातील छत्रपती शिवराय आणि मल्लाबाई यांचे शिल्प

यादवाड (धारवाड) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्पमंदिर

यादवाड येथीलच एक अन्य अश्वारुढ प्रतिमाशिल्प


यादवाड... कर्नाटकातील धारवाडपासून अवघ्या दहा-बारा किलोमीटरवरील एक छोटंसं खेडं... एरव्ही या गावाची माहिती होण्याचं कारण नव्हतं. हे नाव ऐकलं ते माझे मित्र श्रीनिवास व्हनुंगरे यांच्या तोंडून. लॉकडाऊनपूर्वी एक दिवसाच्या शिरोडा ट्रीपवर गेलो असताना त्यानं मला या गावाच्या वैशिष्ट्याविषयी सांगितलं होतं. तेव्हापासूनच खरं तर इथं जाण्याची विलक्षण ओढ मनाला लागून राहिली होती. आणि लॉकडाऊननंतर जेव्हा पहिल्यांदाच बाहेर पडण्याचा विचार केला, तेव्हा यादवाडखेरीज अन्य दुसरं कोणतंही ठिकाण नजरेसमोर आलं नाही. असं काय आहे बरं तिथं?

मित्र हो, यादवाड या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या हयातीमध्ये निर्माण करण्यात आलेलं अतिशय सुंदर शिल्प आहे. आणि ते पाहण्यासाठीच आम्ही तिथे गेलो होतो. कोल्हापूर-निपाणीहून आपण धारवाडकडे जात असताना टाटा मोटर्स, उच्च न्यायालयाचे खंडपीठ ओलांडले की सर्व्हिस रोडवरुन डावीकडेच नरेंद्र या गावाकडे जाणारा फाटा फुटला आहे. दोन्ही बाजूला हरभरा आणि गव्हाची शेतवडी असणारा हाच रस्ता आपल्याला पुढे थेट यादवाडकडे घेऊन जातो. यादवाड स्टँडच्या चौकात पोहोचलो की डाव्या हातालाच अवघ्या पन्नास पावलांवर यादवाडकरांनी नव्यानेच जिर्णोद्धारित केलेलं (१८८५ साली स्थापन केलेलं) हनुमानाचं मंदिर (हनुमान गुडी) आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारातच एक सुरेख कमान करून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प स्थापित केलेलं आहे. मराठी व कन्नडमधून त्या कमानीवर छत्रपती शिवाजी असं नावही कोरलेलं आहे.

या शिल्पाचा इतिहास जो सांगितला जातो तो असा- छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाहून उत्तरेस संपगावाकडे कूच करीत असताना वाटेत बेलवडीच्या येसाजी प्रभू देसाई याने राजांचे कहीकाबाडीचे बैल आपल्या गढीत पळवून नेले. कहीकाबाडी म्हणजे लाकूडफाटा, दाणा, अन्नधान्य वाहून नेणारे.[i] देसायास समज देऊन बैल परत आणण्यासाठी महाराजांनी सखुजी गायकवाड नामक सरदाराची नियुक्ती केली. छोटी गढी एका दिवसात ताब्यात घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा इरादा होता. मात्र झाले विपरितच. देसाईंनी बैल परत केले नाहीतच, पण लढाई आरंभली. गढी छोटी असल्याने तोफा अगर मोठी शस्त्रे न वापरता ती जिंकावी, असा महाराजांचा प्रयत्न होता, जेणेकरून बदलौकिक न व्हावा. या लढाईत देसाई मारले गेले. मात्र, त्याची पत्नी मल्लाबाई (बखरींमध्ये हिचे नाव सावित्री असेही दिले आहे.) हिने लढा पुढे चालवला. सुमारे २७ दिवस तिने गढी राखली. अखेरीस गढीतील अन्नधान्य, दारुगोळा संपला, तेव्हा ती आपल्या सैन्यानिशी सखुजींच्या सैन्यावर तुटून पडली आणि तिने दिवसभर मराठा सैन्याला आवेशपूर्ण झुंज दिली. अखेरीस पराभव होऊन ती सखुजीच्या हाती सापडली. तिला महाराजांसमोर हजर करण्यात आले. मात्र स्त्रीजातीस शिक्षा करावयाची नाही, असा महाराजांचा नियम असल्याने त्यांनी मल्लाबाईंची मुक्तता केली आणि वस्त्राभूषणे देऊन त्यांना गौरविले. बेलवडी तर त्यांना दिलेच, शिवाय आणखी दोन गावेही त्यांना इनाम दिली.[ii] तारीख-ई-शिवाजी या यवनी बखरीत असे म्हटले आहे की, सखुजी गायकवाड या सरदाराने तिला पकडून वाईट रितीने वागविल्याबद्दल महाराजांनी त्याचे दोन्ही डोळे काढून त्याला मानवली गावी कैदेत ठेवले.[iii] मल्लाबाई आणि शिवाजी महाराज यांच्या या भेटीचे शिल्पांकन बेलवाडीच्या परिसरात अनेक ठिकाणी झाल्याचे आढळते.[iv] त्यापैकीच हे एक शिल्प आहे. या हनुमान मंदिराच्या समोर एक पार आहे. त्यावरही काही छोटी शिल्पं आहेत. त्यात हनुमानाची काही, गणेशाचे एक आणि अश्वारुढ सैनिकाचेही एक शिल्प आहे. तेही या शिल्पांपैकीच एक आहे, असे ग्रामस्थ सांगतात.

या लढाईच्या संदर्भात राजापूरच्या एका इंग्रज व्यापाऱ्याची दि. २८ फेब्रुवारी १६७८ रोजीची नोंदही जदुनाथ सरकारांनी आपल्या शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात दिलेली आहे. त्यात हा व्यापारी सांगतो आहे की, “He (Shivaji) is at present besieging a fort where, by relation of their own people come from him, he has suffered more disgrace than ever he did from all power of the Mughal or the Deccans (=Bijapuria), and he, who hath conquered so many kingdoms is not able to reduce this woman Desai!”[v] शिवाजी महाराजांच्या सैन्याशी मल्लाबाईने किती प्रखर झुंज दिली असावी, हे या उद्गारांतून लक्षात येते.

हा इतिहास पाहिल्यानंतर आता प्रत्यक्ष या शिल्पाकृतीची माहिती घेणे सोपे होईल. शिवाजी महाराजांच्या या दिलदार उमदेपणाच्या स्मृतीप्रित्यर्थ मल्लाबाईंनी शिवरायांचे हे शिल्प निर्माण केले. सुमारे चार फूट उंचीच्या या शिल्पाला कोरीव खांब, पोपट आणि लतावेलींची सुबक महिरप कोरण्यात आली आहे. त्यात सुमारे तीन चतुर्थांश भागात शिवाजी महाराजांचे अश्वारुढ शिल्प आहे. दिग्विजयी सम्राटाला साजेशी त्यांची ही प्रतिमा आहे. महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज लपत नाही. कोरीव दाढीमिशा, लांब पायघोळ वेशभूषा, जिरेटोप, एका हातात तळपती नंगी तलवार, दुसऱ्या हातात ढाल आहे. शिरावर छत्र आहे. पुढेमागे भालदार, चोपदार, सैनिक आहेत. अश्व सम्राटाला साजेसा सजविलेला आहे. महाराजांच्या पायाशी एक इमानी कुत्रा आहे. पूर्वी सुद्धा सैन्यासोबत सुरक्षेसाठी कुत्रे नेण्याची प्रथा यातून दिसते. खालील एक चतुर्थांश भागात मल्लाबाईंची कथा आहे. या शिल्पात शिवाजी महाराज आसनावर बसलेले आहेत. त्यांच्या मांडीवर एक मूल आहे. त्याला ते दूधभात भरवताहेत. समोर मल्लाबाई एक वाटी घेऊन उभ्या आहेत. हे मूल मल्लाबाईंचे असून त्याच्या दूधभातासाठी म्हणून महाराजांनी त्यांना बेलवडी दोन गावांच्या इनामासह परत केली, असे सांगतात. या दृश्याच्या समोरील बाजूस एक सैनिक पाण्याची सुरई घेऊन उभा आहे आणि महाराजांच्या मागे एक धनुर्धारी योद्धा स्त्री संरक्षणार्थ उभी आहे, असे दाखविले आहे. हे शिल्प म्हणजे उत्तम कोरीव कामाचा नमुनाच आहे. त्यापेक्षाही महाराजांच्या हयातीमध्ये, त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या मल्लाबाईंनी ते करवून घेतलेले आहे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे शिल्प यादवाडवासियांनी चांगल्या पद्धतीने जतन केले आहे. मात्र, हनुमानाला तेल घालायला येणारे भाविक महाराजांच्या या शिल्पालाही तेल, साखर ऊद वाहतात. त्यांची भावना रास्त असली, तरी त्यामुळे या शिल्पाची झीज होते, ही वस्तुस्थिती आहे. कर्नाटक राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या परिसरातील इतर शिल्पेही शोधण्याचे ठरविले आहे. ती सापडतील की नाही, माहीत नाही; मात्र तोपर्यंत जे आपल्यासमोर आहे, त्याचे अधिक योग्य पद्धतीने जतन करण्याची जबाबदारी तातडीने स्वीकारायला हवी. मराठा साम्राज्याच्या संस्थापकाची ही लाखमोलाची स्मृती जपायला हवी.


यादवाड येथे जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी गुगल मॅपची लिंक अशी:- 

https://maps.app.goo.gl/Y78qttX7nU1hPudY9





[i] सभासदाची बखर, पृ. ९१

[ii] केळुसकर, कृष्णराव अर्जुन: क्षत्रियकुलावतंस छत्रपति शिवाजीमहाराज यांचे चरित्र, मनोरंजन छापखाना, मुंबई (१९२०), पृ. ४५६

[iii] कित्ता, पृ. ४५६

[iv] देशपांडे, प्र.न.: छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई (२००२), पृ. ८६

[v] Sarkar, Jadunath: Shivaji and His Times, Longmans, Green & Co., London (Second and revised edition, 1920), p. 355

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

आई माझा ‘गुरू’!

 





कधी कधी लोक विचारतात की तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल अनेकदा लिहीले, पण आईबद्दल फार काही लिहीले नाही. असे का? याचं उत्तर शोधताना माझ्या लक्षात आलं की, माझ्या वडिलांनी अत्यंत जाणीवपूर्वक आमच्या वाढत्या वयाबरोबर आमच्याशी मैत्रीचं नातं जोडलं. आईही कधी कठोर वागली नाही, पण तिच्याशी माझं तसं मैत्र जुळलं नाही कारण माझी आई ही सदैव माझ्यासाठी एक आदर्श शिक्षिका, आदर्श गुरू राहिली आहे. तिच्यातल्या आईइतकाच किंबहुना त्यापेक्षाही मला हा गुरू सदैव मार्गदर्शक राहिला आहे. तिच्या या गुरूत्वाचा प्रभाव माझ्यावर अधिक आहे. माझ्या जडणघडणीत तिचं हे शिक्षकत्व खूप महत्त्वाचं ठरलं आहे.

माझी आई रजनी जत्राटकर. शिक्षिका. कागलच्या यशवंतराव घाटगे हायस्कूलमधून ती निवृत्त झाली. लग्नापूर्वी सांगलीच्या राजवाड्याच्या कन्या शाळेत शिकविणारी आई लग्नानंतर कागल विद्यालयात रुजू झाली. इंग्रजी तिचा विषय. नुसता विषय नाही तर एकदम हातखंडा. सांगलीच्या तुलनेत कागल खेडंच. इथली पंचक्रोशी ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी. या कष्टकऱ्यांच्या मुलांना इंग्रजीची अफाट भीती. ही भीती दूर करून विषयाची गोडी लावण्याचं काम आईनं हयातभर केलं. त्यामुळं ती कितीही सिनियर झाली, तरी तिचे पाचवी-सहावीचे वर्ग काही सुटले नाहीत. कारण शाळेलाही माहिती होतं की मुलांचा बेस पक्का करायचा झाला तर तिथं जत्राटकर बाईच पाहिजेत.

मी हिंदुराव घाटगे विद्यामंदिरातून चौथी उत्तीर्ण झाल्यानंतर पाचवीला आईच्या हाताखाली तिच्या शाळेत दाखल झालो. शाळेत आणि शाळेबाहेरही तिचा एक विशिष्ट दरारा होता. बाई रस्त्यानं जाताना दिसल्या की मुलं सैरावैरा होऊन आपापल्या आयांच्या मागं दडत. इंग्रजी घोटून घेण्यात आई जबरदस्त होती. शब्द आणि त्यांचे अर्थ ती देई. त्यातला प्रत्येक शब्द दुसऱ्या दिवशी २५ वेळा लिहून आणण्याचा सराव ती देई. त्या दिवशी २५ वेळा ज्यांनी लिहीला नसेल, त्यांना दुसऱ्या दिवशी ५० वेळा लिहीण्याची शिक्षा असे. त्यामुळं मुलं होमवर्क करूनच येत. कविता चालीत म्हणवून घेण्याचा तिचा कटाक्ष असे. त्यामुळं पाचवी सहावीच्या कित्येक कविता आजही मला तोंडपाठ आहेत.

आईच्या या शिकवण्यामुळं मला इंग्रजीचा क्लास कधी लावावा लागला नाही. वर्गमित्रांना वाटत असे की, आई माझा घरी ज्यादा अभ्यास घेत असेल. मात्र, ती घरी आली की घरकामाला लागे. तिचा स्वयंपाक सुरू असताना बस्तर टाकून मला तिच्यासमोर अभ्यासाला बसवत असे. त्या पलिकडं तिनं माझा स्वतंत्र अगर विशेष असा अभ्यास कधी घेतला नाही. मात्र, तिच्या शिकवण्यामुळं मला इंग्रजीची, विशेषतः इंग्रजी व्याकरणाची खूप गोडी लागली. ती इतकी की मी सहावी ते आठवी या तीन वर्षांच्या मेच्या सुटीत तर्खडकरांची तीनही पुस्तके सोडविली. त्याशिवाय आठवीत असतानाच दहावीपर्यंतच्या इंग्रजीच्या विकास व्यवसायमाला सोडविल्या होत्या. इंग्रजी पुस्तकं, कादंबऱ्या मिळतील तशा न घाबरता वाचू लागलो होतो. दहावीच्या आतच पेरी मेसन, जेफ्री आर्चर वगैरेना हात घातला होता. पुढं अकरावीनंतर मॅक्झीम गॉर्की, सिडने शेल्डन आणि अन्य इंग्रजी लेखक आपसूकच दाखल झाले आयुष्यात. पुढं जेव्हा मी उपमुख्यमंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी बनलो, तेव्हा एका कार्यक्रमात मी लिहीलेलं इंग्रजी भाषण ठोकून आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मला विचारलेलं, तू कोणत्या कॉन्व्हेंटचा विद्यार्थी म्हणून. तेव्हा मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी असल्याचं मी मोठ्या अभिमानानं सांगितलं. आणि माझं इंग्रजी करवून घेणाऱ्या होत्या जत्राटकर बाई.

आईमुळंच माझ्या वाचन-लेखन-वक्तृत्व या गुणांचा विकास झाला, ही गोष्ट अभिमानानं नमूद करावीशी वाटते. दुसरीपर्यंत सांगलीत शिकून तिसरीला मी हिंदूराव घाटगे शाळेत आलो. त्यावेळी ढोले गुरूजींनी लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त वर्गातल्या सर्वच मुलांना एकच भाषण लिहून दिलं आणि पाठ करून यायला सांगितलं. १ ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धा होती. आईनं मला भाषण कसं करायचं, उच्चार कसे करायचे, आवाजातले चढउतार अशा अनेक बाबी सांगितल्या. अगदी आपण दुसरं भाषण लिहूनही मला दिलं. पण, गुरूजींनी हेच भाषण करून यायला सांगितलंय, यावर मी ठाम राहिलो. आईचा नाईलाज झाला, पण तिनं ते भाषण माझ्याकडून तयार करून घेतलं. भाषण म्हणजे केवळ पाठ करून पोपटासारखं घडाघडा बोलणं नव्हे. त्यातला शब्द न् शब्द समजून घेऊन समोरच्याला सांगणं, पटवून देणं, हे खरं भाषण. असं तेव्हा तिनं सांगितल्याचं मी कायम लक्षात ठेवलं. १ ऑगस्टला शाळेत गेलो. आमच्या वर्गातल्या कोगनोळीच्या पाटील (बहुधा आशिष नाव असावं त्याचं.) म्हणून एका मित्राला त्याच्या आईनं वेगळं भाषण लिहून दिलं होतं. त्यानं म्हटलंही उत्तम. ते ऐकून मला माझ्या आईचं भाषण डोळ्यासमोर आलं. पण, माझ्यासह वर्गातल्या सर्व मुलांनी गुरूजींनी दिलेलं भाषणच म्हटलं. साहजिकच पाटलांचा पहिला नंबर आला आणि दुसरा नंबर माझा. परीक्षक म्हणून ढोले गुरूजी आणि मगर गुरूजी होते. मगर गुरूजी म्हणाले, त्यानं वेगळेपण दाखवलं म्हणून त्याचा स्वाभाविक पहिला नंतर आला. पण, कॉमन भाषणही उत्तम पद्धतीनं तू केलंस, म्हणजे त्यांच्यात तू पहिलाच आहेस. कॉमन गोष्ट अनकॉमन पद्धतीनं सादर करण्याचं फळ मिळतंच, हा आणखी एक धडा तिथं मिळाला. या पहिल्या स्पर्धेनं खूप आत्मविश्वास मिळाला.

पुढं अशा वक्तृत्व स्पर्धांची माहिती मिळाली की मी आईच्या मागं लागत असे. आईही अतिशय सोपं पण प्रभावी भाषण लिहून देत असे. कागलची ब्राह्मण सभा ही खूपच अॅक्टीव्ह होती. त्यांच्यातर्फे दरवर्षी वक्तृत्व सभा आयोजित केल्या जात. चौथीत मी ब्राह्मण सभेच्या स्पर्धेत पहिल्यांदा भाषण केलं चांगल्या सवयी या विषयावर. या भाषणाचं खूपच कौतुक झालं. श्रेय आईचंच. तेव्हापासून सातवीपर्यंत दर वर्षी मी ब्राह्मण सभेच्या स्पर्धेत पहिला नंबर मिळविला. बक्षीसंही घेतली ती सूर्यकांत मांढरे, भालचंद्र कुलकर्णी यांच्या हातून.

इथं आईच्या शिकवणीचा आणखी एक किस्सा नमूद करायलाच हवा, ज्यानं मला आयुष्यभराचा एक मोठा धडा दिला. सातवीत असताना कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघानं वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली. मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून भाषण करायचं होतं. मी हिंदीतून भाषण करायचं ठरवलं. विषय घेतला जय जवान, जय किसान. आईनं उत्तम भाषण तयार करून घेतलं माझ्याकडून. हिंदीतून म्हणायचं, तर त्यातले उच्चार, त्याची शब्दफेक कशी असायला हवी, यावर आम्ही काम केलं. नंबर आला नाही तरी चालेल पण आपलं सादरीकरण उत्तम व्हायला हवं, यासाठी आमची धडपड होती. स्पर्धेसाठी शाळेतून दोन गटांत दोघांची निवड झाली होती. मी सहावी ते आठवी गटात आणि आणखी एका नववीतील विद्यार्थ्याची आठवी ते दहावी गटात. स्पर्धा उद्यावर होती. मी वर्गात होतो. गणिताचा तास सुरू होता. इतक्यात दहावीच्या वर्गातला एक मुलगा बोलवायला आला. कमते सरांनी मला बोलावल्याचं सांगितलं. मला लक्षात येई ना, दहावीच्या वर्गात माझं काय काम? टेन्शनमध्येच मी त्या वर्गात गेलो. सारेच दादा आणि ताई माझ्याकडं पाहात होते. इतक्यात तो नववीच्या वर्गातला दादाही आला. कमते सरांनी आम्हाला उद्याच्या स्पर्धेसाठीची भाषणं सादर करायला सांगितली. मी जाम टेन्शनमध्ये आलो. घाम फुटला, काही सुचेना! पण, सरांनी सांगितलंय म्हटल्यावर बोलायला सुरवात केली. घशाला कोरड पडली, काही आठवेना. असं कधीच झालं नव्हतं मला. पण, कदाचित अचानक बोलावल्यामुळं असेल किंवा मोठ्या मुलांसमोर कधी बोललो नसल्यामुळं असेल, माझं सादरीकरण फेल गेलं. दुसऱ्या दादानं मात्र घडाघडा भाषण म्हटलं. माझ्या भाषणावर सरांनी कॉमेंट केली, हे पाहा आपल्या शाळेचे प्रतिनिधी. स्पर्धा उद्या आणि यांच्या तयारीचा अजून पत्ता नाही. उद्याचा निकाल आत्ताच दिसतोय मला. दहावीचा तो वर्ग हसला फिदीफीदी त्यावर. सरांच्या मनात कदाचित शाळेच्या हिताखेरीज काही नसेलही. पण, मला मात्र हे वाक्य खूपच बोचलं, झोंबलं. मी खालमानेनं माझ्या वर्गात परतलो. बसलो जागेवर. पण तो अपमानास्पद प्रसंग काही मनातून जाई ना. दुपारपर्यंत अंगात जोराचा ताप भरला. मी डबाही खाल्ला नाही. दुपारच्या सुटीत घरी आलो. आजी होती घरी. तिला काही न बोलता घरात गेलो आणि अंगावर चादर ओढून झोपलो. आई संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी आली. तर मी झोपलेलो. तिनं कपाळावर हात ठेवून पाहिलं, तर तापानं फणफणलेलो. तिच्या मायाभरल्या हाताच्या स्पर्शानं मला जाग आली. जसं तिला पाहिलं, पटकन उठलो आणि तिच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडलो. आईला काहीच माहिती नव्हतं. तिनं मला मोकळं होऊ दिलं. रडता रडता आईला मी म्हणालो, आई, मी काही उद्या स्पर्धेला जाणार नाही. मला काहीच पाठ झालेलं नाही. काही तरी गडबड आहे, हे तिच्या लक्षात आलं. कारण एरव्ही कुठल्याही स्पर्धेसाठी जाताना मनापासून तयार होणारा मी आता वेगळ्याच पवित्र्यात होतो. तिनं मला काय झालं म्हणून खूप खोदून खोदून विचारलं. तेव्हा कुठं मी तिला सकाळचा प्रसंग सांगितला. त्यावर आईनं मग मला एकच प्रश्न विचारला, मग तू त्या सरांचं विधान स्पर्धेत भाग न घेताच खरं करून दाखवणार, की स्पर्धेत भाग घेऊन त्यांचं विधान खोटं ठरवणार?’ या वाक्यानं आजतागायत माझ्या मनात घर केलंय. त्यानंतर आयुष्यात खोट्या मित्रांपेक्षा खरे निंदकच आपल्या प्रगतीसाठी कसे आवश्यक असतात, हे तिनं मला सांगितलं. सच्चे मित्र मिळणं जितकं दुर्लभ, तितकेच खरे निंदक मिळणं हेही भाग्याचं! निंदकाचं घर शेजारी असलं की आपण ताळ्यावर राहायला मदतच होते, हे सांगितलं. अशा अनेक गोष्टी ती सांगत राहिली आणि माझ्या मनातला हरपलेला आत्मविश्वास चेतवित होती. अखेरीस उद्या स्पर्धेला जाणारच, इथपर्यंत तिनं मला पोहोचवलं. त्या रात्री आई-बाबांनी मिळून माझी प्रॅक्टीस घेतली. दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये स्पर्धा होती. आईनं थेट रजा काढली आणि शाळेच्या सरांबरोबर न पाठवता ती स्वतःच मला घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी आली. मी भाषणाला उभा राहिलो. आयुष्यातली पहिलीच मोठी स्पर्धा. त्यात पहिलंच हिंदी भाषण. माझी प्रेरणा, माझी आई समोरच्या बाकावर बसली होती. मी भाषणाला सुरवात केली. मला त्या क्षणी आईखेरीज अन्य कोणीही दिसत नव्हतं. कुठंही न तटता, अडखळता भाषण झालं. दुपारी निकाल लागला. उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झालं. आईच्या डोळ्यांत पाणी तरळलं. माझ्याही. वरच्या गटातला स्पर्धक मित्रही भेटला. त्याला कुठलंच बक्षीस मिळालं नव्हतं. एखाद्याला बक्षीस मिळालं नाही, याचा आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचा आसुरी आनंद मला वाटला कारण सरांनी त्यावेळी वर्गात त्याला शाबासकी दिली होती आणि माझी खिल्ली उडवलेली. पण, त्यात त्याचा काय दोष होता?, म्हणून मग पुढच्याच क्षणी मी त्याला दिलासा द्यायला सरसावलो, कारण तोही शेवटी माझा मित्रच होता. दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या दिवशी मुख्याध्यापकांनी माईकवरुन माझ्या यशाची घोषणा केली, तेव्हा मला मुलांसमोर आणून टाळ्या वाजवणाऱ्यांत कमते सरही होते. नंतर स्टाफरुममध्ये मात्र आईनं त्यांची जोरदार शाब्दिक धुलाई केल्याची वार्ता आमच्या कानी आलीच. कमते सर पुढे मुख्याध्यापक झाले शाळेचे. आणि या शाळेत माझं एकमेव व्याख्यान ठेवणारे व सत्कार समारंभ घडवून आणणारेही तेच होते. ही बाब ही कृतज्ञतापूर्वक नोंदवायलाच हवी.

आमच्या आईचा हा थेट निर्भीड, टोकदार स्वभाव वैशिष्ट्यपूर्णच. त्यामुळं तिच्यापुढं विद्यार्थीच काय, पण शिक्षकांसह कोणाचंही काही चालत नसे. जशास तसे, याचं मूर्तीमंत उदाहरण. आणि तिच्यामध्ये तिच्या आईचा म्हणी अन् वाक्प्रचारांत बोलायचा, स्वभाव ओतप्रोत उतरलेलाय. त्यामुळं समोरच्याचं कौतुक असो की धुलाई, आई ते काम मोजक्या शब्दांत उरकायची; आजही उरकते. रिटायर झाली असली तरी आम्ही असतोच की तिच्या टार्गेटवर. असो!

माझ्यात वाचनाची आवड निर्माण केली होती माझ्या आजोबांनी. मात्र वाचन-लेखनाची आवड वृद्धिंगत झाली ती आईमुळेच. आईनं माझ्यासाठी कपडे कदाचित कमी आणले असतील, मात्र कुठेही गेली तरी माझ्यासाठी एखादं तरी पुस्तक तिनं आणलं नाही, असं कधी झालं नाही. कोल्हापूरला साहित्य संमेलन झालं, तेव्हा तर चंगळच म्हणावी इतकी पुस्तकं आणली होती तिनं. त्याशिवाय, आमच्या शाळेत मुलांसाठी एक लायब्ररी चालवली जायची. एका मोठ्या संदुकीत भरगच्च पुस्तकं होती. ती मुलांना दर आठवड्याला वाचायला दिली जात. माझी आठवड्यातच दोन-तीन होत वाचून. पाचवीतच मी त्यातली बहुतेक पुस्तकं वाचून संपवली. नंतर माझा डोळा शिक्षकांसाठीच्या लायब्ररीवर होता. मुख्याध्यापकांच्या शेजारच्या खोलीत ती होती. जाता-येता नजरेला पडत. परीक्षेचा कालावधी वगळता आईनं मला त्यातली अनेक पुस्तकं आणून दिली. या ओघामध्ये रामायणाचे बरेचसे कांडही मी वाचून काढले होते. विवेकानंद वाचले ते याच काळात. आणि दलित साहित्याशी परिचय झाला तोही याच माध्यमातून. अनेक महान व्यक्तीमत्त्वांची चरित्रेही इथलीच वाचली. सहावीत थॉमस अल्वा एडिसनच्या चरित्रकार्यानं मी प्रचंड भारावलो होतो. इतका की शाळेच्या भित्तीपत्रकासाठी त्याची जीवनकथाच लिहीली. माझ्या आठवणीनुसार माझं हे पहिलं मोठं लेखन. त्यानंतर नववीत मी महात्मा फुले यांच्यावर एक प्रदीर्घ निबंध लिहीलेला आठवतो.

वाचनानंतरचा पुढला टप्पा लेखनाचा निश्चित होता. मघाशी सांगितल्याप्रमाणं वक्तृत्व स्पर्धांसाठी आई भाषणं तयार करून द्यायची, मी पाठांतर करायचो आणि स्टाईलमध्ये सादर करून बक्षीस मिळवायचो. नंतर नंतर माझ्यासारखे अनेक पोपट मला या स्पर्धांतून दिसू लागले. आणि एक दिवस या पोपटपंचीचा मला स्वतःलाच वैताग आला. आईला म्हटलं, तू लिहून द्यायचं, मी पाठ करायचं आणि बक्षीस मारायचं, याला काय अर्थ? मी स्वतः जेव्हा तुझ्यासारखं लिहीन आणि त्या भाषणावर बक्षीस मिळवीन, तेव्हा खरं! या गोष्टीसाठीही तिनं प्रोत्साहन दिलं. लेखन सुधारायचं, तर मग निबंध स्पर्धांतून भाग घ्यायला तिनं प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मी वक्तृत्वाऐवजी निबंध स्पर्धांतून लिहू लागलो. वेगवेगळे संदर्भ गोळा करणे, विषयानुरुप त्यांची संगती लावणे या बाबतीत मात्र मला बाबांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांनीही लागतील ती पुस्तकं थेट विकतच आणून द्यायला सुरवात केली. आमच्या देवचंदची लायब्ररीही जबरदस्त आहे. तिचाही मी खूप लाभ उठवलाय. बारावीची प्रॅक्टीकल एक्झाम सुरू असताना लायब्ररीत थेट शेक्सपिअरला मिठी मारुन बसलेल्या मला पाहून काय अवस्था झाली असेल बाबांची आणि त्यानंतर माझी, याचा विचारही तुम्हाला करवणार नाही. तर असो! या निबंध लेखनातही माझी तयारी चांगली झाली. राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत भारताची अण्वस्त्र चाचणी या विषयावरील निबंधाला मला पुरस्कार मिळाला आणि पुन्हा कागलमध्येच याच विषयावरील भाषणानं माझ्या वक्तृत्वाचीही दुसरी इनिंग सुरू झाली.

आईनं शिक्षक म्हणून कागलमधल्या कित्येक पिढ्यांना इंग्रजी विषयाचे पहिले पाठ शिकविलेच, पण तिने या नगरीला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती असेल तर ती म्हणजे शाळेतला विविध गुणदर्शन कार्यक्रम किंवा गॅदरिंग होय. आई सांगलीहून इथे रुजू होईपर्यंत गॅदरिंग हा प्रकार कागलला ठाऊक नव्हता. रुजू झाल्याच्या पुढच्याच वर्षी तिनं मुख्याध्यापक डिंगणकर बाईंसमोर गॅदरिंगचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी ती जबाबदारी आईकडंच सोपविली. तेव्हापासून अगदी अलिकडंपर्यंत म्हणजे साखळकर सर वगैरे ही नव्या दमाची शिक्षक मंडळी रुजू होईपर्यंत आईनं गॅदरिंगची जबाबदारी एकहाती यशस्वीरित्या सांभाळली. गॅदरिंगच्या एक महिना आधी आमच्या कागले वाड्यातल्या घरी मुलं शाळा सुटल्यानंतर जमायची. तीस चाळीस विविध नृत्य-नाट्य-कला आदी प्रकार आई त्या मुलांकडून बसवून घ्यायची. अगदी नाचाच्या स्टेपसुद्धा तीच बसवायची. आमच्या घरात आणि बाहेरही त्या काळात बसायला नव्हे, उभारायला सुद्धा जागा मिळायची नाही. शेणानं सारवलेलं घर उकरून निघून घरभर मातीचा धुरळा उडायचा नाचानं. पण, घरमालक कागले काकांनी कधीही एका शब्दानं त्याबद्दल विचारलं नाही. उलट जमीन पुन्हा दुरुस्त करून द्यायला ते असायचेच. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे अनेक लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भागीदार होते. गॅदरिंगच्या दिवशी तर सारं कागल लोटायचं शाळेच्या मैदानावर. आईबाप आपल्या मुलांचं सादरीकरण कौतुकानं पाहायचे. सूत्रसंचालन बहुतेक वेळा आईकडंच असायचं. तिच्या आवाजानं पोरंच काय, दंगा करणारे आईबापही शांत बसत- एवढा दरारा होता तिच्या आवाजात. कनवाळूपणही तितकंच होतं. एखाद्या मुलाला अगर मुलीला आईबाप शाळेला पाठवत नाहीत, असं लक्षात आलं की आई दाखल झालीच समजायचं त्यांच्या दारात. मग आईबापाची तिच्यासमोर चकार शब्द काढायची प्राज्ञा नसायची. मुलाला घेऊनच आई शाळेत दाखल होत असे. शाळेत असताना आईच्या शिकवण्याचा, गृहपाठाचा जाच वाटणारी मुलं पुढं जेव्हा कधी तिला भेटतात, तेव्हा आमच्या प्रगतीत आपला मोठा वाटा आहे, असं आवर्जून सांगतात. एका शिक्षकाला आणखी काय हवं असतं? अशा अनेक गोष्टी तिच्या योगदानाबद्दल सांगता येतील.

आईचं फाईटिंग स्पिरीट हे अगम्य अन् अफलातून आहे. वेगवेगळी सात ऑपरेशन झालीयत तिची. काही वर्षांपूर्वी अर्धांगाचा झटका आला. निम्मं अंग लुळं पडलं, वाचा गेली. ब्रेन हॅमोरेजमुळं मेंदूच्या काही भागावर परिणाम झाला. बीपी-शुगर हे तर तिचे गेल्या चाळीसेक वर्षांपासूनचे सोबती. अशा परिस्थितीतूनही दर खेपी ती पुनःपुन्हा उभी राहिली ती केवळ या फाईटिंग स्पिरीटच्या जोरावरच. पॅरालिसीस झाला, तेव्हा कोल्हापुरात एडमिट केलं. तिथून माझ्या फ्लॅटवर नेलं. आयुष्य इतकं स्वावलंबी जगलेली की कधी कोणावर कुठल्याही बाबतीत अवलंबून राहण्याचं कारण नव्हतं. मात्र इथं दर खेपी सुनेचा आधार घ्यावा लागायचा. त्याचं शल्य तिच्या नजरेत जाणवायचं. मग, तो त्रागा शब्दांतून नाही, तर इतर गोष्टींतून व्यक्त व्हायचा. तेव्हा तिच्या या फाईटिंग स्पिरीटलाच मी आव्हान दिलं. हे असं दुसऱ्याकडून करून घेणं बरं वाटत नसेल, तर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि त्या पायांनी माझा जिना उतरुन तुझ्या तुझ्या घराकडं जायचं!’ असं सुनावलं. पुढच्या महिनाभरात आई स्वतःच्या पायांनी चालत गाडीत बसून निपाणीला परतली. या वर्षी कोविडच्या काळातही तिची ऑक्सिजन लेव्हल ७० पेक्षाही खाली गेलेली. स्थानिक डॉक्टरांनीच तिची आशा सोडलेली. पण, पुन्हा इथेही तिला आम्ही सांगितलं, आपल्याला इतक्या सहजी मरायचं नाहीय. इंजक्शनचा कोर्स पूर्ण होईपर्यंत उभं राहायचंय. स्वतःची कामं स्वतः करता आली पाहिजेत. आणि आई पंधरा दिवसांत उभी राहिलीय. थरथरतेय, थोडा तोल जातोय, पण काठीशिवाय चालू लागलीय.

आईचे हे सारे गुणावगुण मला माझ्या मुलीतही दिसतात. आजचा तिचा हट्ट, दुराग्रह हे भविष्यातले निर्धार अन् निश्चय असतील, असं वाटत राहतं आईच्या अनुभवावरुन. तिच्या रुपानं मागे आई आणि पुढेही आई, असं आयुष्य असणार आहे माझं. आई कॉलेजमध्ये असताना भारूड वगैरे उत्तम सादर करायची. तिचं भारूड ऐकून सांगली आकाशवाणीनं त्या काळी तिला अनाऊन्सरच्या पोस्टसाठी ऑडिशनला बोलावलेलं. पण, आजीनं स्पष्ट नकार दिल्यानं ती जाऊ शकली नव्हती. पण, पुढच्या आयुष्यात तिच्या अभिव्यक्तीच्या साऱ्या दिशा तिनं शोधल्या. मुलीमध्येही मला त्याच पाऊलखुणा दिसतात.

हे सारं लिहीतोय, कारण आज आईचा ६८वा वाढदिवस आहे. कोरोनाचा काळा कालखंड ओलांडून आम्ही सारे एकत्र आहोत. ती आमच्यासमवेत आहे ती केवळ तिच्या इच्छाशक्तीच्या बळावर! आज सकाळी डायनिंग टेबलवर तिला विचारलं, आई कितवा गं वाढदिवस? त्यावर ती हसतमुखानं उत्तरली, ६७ पूर्ण, ६८. आणि I owe this life to these two persons... असं म्हणून तिनं बंधू अनुप आणि माझी पत्नी दीपालीकडं अंगुलीनिर्देश केला. आणि ते खरंही आहे. या दोघांनी आईची इतकी सेवा केलीय की त्याबद्दलची कृतज्ञता अगर कौतुक शब्दांत मांडणंच कठीण आहे. आणि आईची शब्दफुले झेलत ती करणं हे तर महाकठीण काम. ते या दोघांनी आस्थेनं केलंय. म्हणून तर ती आपल्या बोनस आयुष्याचं श्रेय त्यांना देती झालीय. पण, आई, काही जरी असलं तरी I owe my life to you! Thank you for this lovely life!!

 

सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

एका तेलियाने...



संत जगनाडे महाराज (इ.स. १६२४-१६८८) यांची जयंती उद्या ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याबाबतचं परिपत्रक ई-मेलवर आलं आणि ‘आता हे कोण ब्वा जगनाडे महाराज?’ असा प्रश्न मनात डोकावला. खरंच त्यांच्याविषयी माहिती नव्हती, याची सुरवातीलाच कबुली देतो. प्रश्न पडला म्हटल्यावर उत्तर शोधायला सुरवात केली. तर, या महात्म्याचे भन्नाट चरित्र आणि कार्य सामोरे आले. संत तुकाराम यांचे अत्यंत लाडके शिष्य असलेल्या जगनाडे महाराज यांचे उभ्या महाराष्ट्रावर आणि वारकरी संप्रदायावर थोर उपकार आहेत, हे समजून त्यांच्याविषयी हृदय कृतज्ञतेनं भरून आलं.

मावळ तालुक्यातल्या सुदुंबरे इथं विठोबा जगनाडे आणि माथाबाई यांच्या पोटी जन्मलेले संताजी जगनाडे हे आपल्या मायबापाप्रमाणंच विठ्ठलभक्तीत दंगणारं व्यक्तीमत्त्व. एका तेल्यानं हिशोबापुरतं जेवढं शिकायचं, तेवढं शिकलेले. संत तुकारामांची कीर्तनं त्यावेळी प्रचंड लोकप्रिय होती. संताजींनी एकदा तुकोबारायांना ऐकलं आणि त्यांच्या अभंगांनी ते नादावूनच गेले. संसारात राहूनही भक्तीप्रपंच मांडता येतो, हे तुकारामांनी स्वतःच्या उदाहरणानंच त्यांच्यावर बिंबवलं. तुकारामांच्या कीर्तनाला साथ करणाऱ्या टाळकऱ्यांपैकी ते एक बनले. तुकारामांचे लाडके बनले. तुकोबारायांना साथ करता करता त्यांनाही त्यांचे अभंग मुखोद्गत झाले. तुकारामांची गाथा लिहीताना तुकारामांचे लेखनिक म्हणून त्यांनी काम केले. पुढे संत तुकारामांचा जनमानसावरील वाढता प्रभाव सहन न होऊन दुष्टाव्याने जेव्हा त्यांनी गाथा बुडविण्यात आली. ती गाथा तरली. गाथेला तारणारे इंद्रायणीचे पाणी नव्हते, तर संतु जगनाडे यांची आणि त्यांच्यासारख्या हजारो सर्वसामान्य लोकांची वाणी होती. तुकारामांच्या गाथेतले मुखोद्गत असणारे अभंग या तैलबुद्धीच्या तेल्याने लिहून काढले आणि गाथेला तारले. म्हणून मग तत्कालीन भटब्राह्मणांनी सकाळच्या प्रहरी तेल्याचे तोंडही पाहू नये; त्याने अपशकून होतो, असा अपसमज पसरविला, असे म्हणतात.

संत संतु जगनाडे यांनी तुकारामांच्या प्रभावाने आणि आशीर्वादाने अभंग रचनाही केल्या.

एकादशी दिनी संतु तुका वाणी ।

राऊळा आंगणी उभे होते ।। १ ।।

तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना ।

पांडुरंग चरणा नमियेले ।।२।।

तेथुनी तो आला तुका जेथे होता ।

आलिंगन देता झाला त्याशी ।।३।।

तुका म्हणे संतु पुसतो तुजला ।

सांगतो तुजला संतु म्हणे ।।४।।

असे गुरूकृपा सांगणारे अभंग जसे लिहीले, तसेच-

सगुण हा घाणा घेऊनि बैसलो ।

तेली जन्मा आलो घाणा घ्याया ।।१।।

नाही तर तुमची आमची एक जात ।

कमी नाही त्यात आणु रेणु ।।२।।

संतु म्हणे जाती दोनच त्या आहे ।

स्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ।।३।।

असे मानवातील जातीभेदावर प्रहार करणारे अभंगही त्यांनी लिहीले आहेत. संत जगनाडे महाराज हा असा एक महान शिष्य आणि तितकाच महान संतही या महाराष्ट्र भूमीवर होऊन गेला.

सध्या आपण महापुरूषांबरोबरच या संतांच्याही जातबंदिस्तीचा बंदोबस्त करून टाकला आहे. मी जेव्हा इंटरनेटवर सर्च केलं, तेव्हा देशभरातल्या केवळ तेली समाजानंच त्यांचे फोटो आणि माहिती शेअर केली होती. त्याखेरीज विकिपिडियावर थोडी माहिती पाह्यला मिळाली. कदाचित ती सुद्धा कोण्या तेलियानेच टाकली असावी. या साऱ्या संतांना जातबंधनातून मुक्त करून जातविरहित दृष्टीकोनातून त्यांचा नव्याने अभ्यास करण्याची गरज आज हे सारे वाचताना नव्याने जाणवली. असो!

जगनाडे महाराजांप्रती या निमित्ताने आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

(ता.क.: उपरोक्त माहितीचा स्रोत इंटरनेट आहे. संतसाहित्याच्या अभ्यासकांनी या संदर्भात अधिक वस्तुनिष्ठ माहिती देण्यास हरकत नाही. चांगल्या माहितीचे आदानप्रदान त्या निमित्ताने व्हावे, ही अपेक्षा!)


रविवार, ६ डिसेंबर, २०२०

बाबासाहेब आणि आचार्य अत्रे यांचे मैत्रबंध

-        (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य अत्रे यांचे मैत्रबंध अगदी वेगळ्या प्रकारचे होते. त्यांच्या या मैत्रपर्वावर यंदाच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने प्रकाशझोत टाकण्याची संधी सन्मित्र मोहसीन मुल्ला यांच्या आग्रहामुळे लाभली. हा लेख 'पुढारी ऑनलाईन'वर दि. ६ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित झाला. 'पुढारी ऑनलाईन'च्या सौजन्याने तो माझ्या ब्लॉगवाचकांसाठी सादर करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)


आचार्य अत्रे यांच्या महात्मा फुलेचित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी (दि. ४ जानेवारी १९५४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माई आंबेडकर यांच्यासमवेत (डावीकडून) अभिनेते बाबूराव पेंढारकर, सुलोचना (महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या वेशभूषेत), आचार्य अत्रे, त्यांच्या पाठीमागे शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे आदी. या चित्रपटाला शुभेच्छा देताना बाबासाहेब म्हणाले होते की, “आजकाल जो उठतो तो राजकारण किंवा चित्रपटाच्या मागे लागलेला दिसतो. परंतु, सामाजिक सेवेचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. अत्रे यांच्या या चित्रपटाने भारताचे महान समाजसुधारक महात्मा फुले यांच्या स्मृती पुन्हा नव्याने जागविल्या जातील.तर, अत्रे म्हणाले होते की, “महात्मा फुले यांचे सच्चे वारसदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. म्हणूनच या चित्रपटाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणे हा दुग्धशर्करा योग आहे.या चित्रपटाला राष्ट्रपतींचे रजतपदक प्रदान करण्यात आले. बाबासाहेबांनीही हा चित्रपट पाहिला आणि त्याच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी अत्र्यांचे अभिनंदन केले. दि. २० जानेवारी १९५५ रोजी अत्रे यांना पत्र पाठवून विषयाची रचना आणि सादरीकरण या अंगांनी हा चित्रपट उत्कृष्ट आहे,” असे कळविले. या चित्रपटाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे याचे निवेदन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले होते. यात संत गाडगे बाबांचे कीर्तन होते आणि आचार्य अत्रेंनी स्वतः कर्मठ तेलंगशास्त्र्याची खलभूमिका साकारलेली होती. (छायाचित्र भारिप बहुजन महासंघ, खारघर यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार) 


आचार्य अत्रे यांनी बाबासाहेबांविषयी लिहीलेल्या अग्रलेखांचे पुस्तक 'दलितांचे बाबा'


आचार्य प्र.के. अत्रे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर




भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या बरोबरीने मला आठवण येते ती ज्येष्ठ साहित्यिक, संपादक आचार्य प्र.के. अत्रे यांची! त्याचे कारण म्हणजे या दोघांमध्ये असणारे अतूट असे मैत्रबंध होय. खरे तर, सुरवातीच्या काळात अत्रे बाबासाहेबांकडे काँग्रेसी चष्म्यातून पाहात असत. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांवर पराकोटीची टीकाही केली. मात्र, बाबासाहेबांनी घटना समितीत केलेल्या जाज्ज्वल्य भाषणामुळे त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि पुढे बाबासाहेबांशी थेट परिचय झाल्यानंतर अत्रे त्यांच्या अखंड प्रेमात राहिले. हे प्रेम त्यांनी अखेरपर्यंत जपलेच, शिवाय, बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जयंतीला आणि महापरिनिर्वाण दिनाला मराठा, नवयुगमधून त्यांच्या आठवणी सातत्याने जागविल्या.

अत्रेंच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, “डॉ. आंबेडकरांचा एक वेळ मी कठोर टीकाकार होतो. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याचा लढा जेव्हा सुरू होता, त्या वेळी देशातील सर्व राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी त्या लढ्याचा पुरस्कार करावा, असे मला वाटत होते. ह्या दृष्टीने डॉ. आंबेडकर व सावरकर यांच्या त्या वेळच्या भूमिका मला अयोग्य वाटत होत्या. तथापि, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दलितांच्या आणि हिंदू समाजाच्या हिताचे काँग्रेसने फार मोठे नुकसान केले, हे दिसून आले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताच्या फाळणीला मान्यता देऊन काँग्रेसने देशाचा जो घात केला, त्या इतिहास क्षमा करणार नाही. डॉ. आंबेडकरांनी या महान संकटाचा इशारा पूर्वीपासून दिला होता. पुढे घटना समितीमध्ये डॉ. आंबेडकर ह्यांनी अखंड भारताच्या पुरस्काराची जी तेजस्वी घोषणा केली, त्या वेळी त्यांच्या प्रखर देशभक्तीचे साऱ्या देशाला दर्शन झाले, आणि तेव्हापासून त्यांच्या चरित्राबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल मला विलक्षण आदर वाटू लागला. त्यानंतर त्यांचा नि माझा परिचय झाला आणि त्या परिचयाचे रुपांतर दृढ स्नेहात झाले. त्यांच्या सहवासात येण्याची कित्येकदा संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे मला जे देदिप्यमान दर्शन झाले, त्याच्या स्मरणाने अद्यापही भावना दीपून जातात. आंबेडकर ह्यांच्याएवढा विशाल बुद्धिमत्तेचा आणि प्रचंड धैर्याचा पुरूष भारतात पुन्हा होणे नाही. भारताच्या राजकीय, धार्मिक जीवनात क्रांती करून त्यांनी भारताच्या सामाजिक विचारात आणि तत्त्वज्ञानात मोलाची भर घातलेली आहे. तथापि, आंबेडकरांच्या अथांग विद्वत्तेची आणि विचारांची अद्याप भारताला पुष्कळच ओळख व्हावयाची आहे. ती ज्या दिवशी समग्रपणे होईल, त्या दिवशी त्यांच्या कर्तृत्वाचा जनतेला साक्षात्कार होईल. भारताच्या इतिहासातील एक युगप्रवर्तक पुरूष असाच डॉ. आंबेडकरांचा उल्लेख करावा लागेल.[1]

आचार्य अत्रे म्हणजे खुल्या दिलाचा माणूस. त्यांच्या व्यक्तीमत्त्वात एक प्रकारचा सच्चेपणा आढळतो. पटलं तर प्रेम, नाहीतर वेशीवर टांगायला कमी न करणारा हा माणूस बाबासाहेबांच्या मात्र प्रचंडच प्रेमात पडलेला होता. आणि हे त्यांचे प्रेमही एकतर्फी नव्हते. बाबासाहेबांनीही त्यांचे हे मैत्रीबंध तितक्याच आत्मियतेने स्वीकारले होते. एरव्ही आपला वाढदिवस साजरा करण्याच्या विरुद्ध असणाऱ्या बाबासाहेबांनी ५५व्या वाढदिवशी अत्रेंना नवयुगचा खास अंक काढण्याची परवानगी दिली. त्याची हकीकतही अत्रेंनी लिहून ठेवली आहे. आम्ही बाबासाहेबांकडे संदेश मागावयास गेलो. बाबासाहेब हसून म्हणाले, महाराचा कसला वाढदिवस साजरा करताहात?’ त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याचे आम्हाला काय तोंड होते? आम्ही खाली मान घातली आणि गप्प बसलो. तेव्हा बाबा एकदम गंभीर झाले. आमची भावना त्यांना कळली. ते म्हणाले, खरं सांगू? व्यक्तीशः माझा वाढदिवस साजरा व्हावा, हे मला मुळीच आवडत नाही. या देशात अवतारी पुरूष आणि राजकीय पुरूष ह्या दोघांचेच जन्मदिवस पाळले जातात. फार दुःखाची गोष्ट आहे ही. मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. मला विभूतीपूजा कशी आवडेल? विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याच्याबद्दल प्रेम बाळगा. आदर दाखवा. पण पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा कसली करता? त्यामुळे पुढाऱ्यांबरोबर भक्तांचाही अधःपात होतो. बाबा बोलत होते आणि आम्ही त्यांचे शब्द टिपून घेत होतो. हा झाला आमचा स्पृश्यांना संदेश. आम्ही म्हणालो, आता अस्पृश्यांना तुमचा संदेश द्या पाहू!’ अस्पृश्यांना काय देऊ संदेश?’ डोळे अर्धवट मिटून बाबासाहेब स्वतःशीच पुटपुटले. इतक्यात त्यांना कसी तरी आठवण झाली. ते म्हणाले, ग्रीक पुराणातील एक गोष्टच मी तुम्हाला सांगतो. होमरने आपल्या महाकाव्यात सांगितली आहे. डिमेटर नावाची एक देवता मनुष्यरुप धारण करून पृथ्वीतलावर आली. एका राणीने आपले तान्हे मूल सांभाळायला तिला राजवाड्यात नोकरीस ठेवले. त्या लहान मुलाला देव बनवावे, अशी त्या देवतेला इच्छा आली. म्हणून ती रोज रात्री सारी मंडळी झोपली की सारी दारे बंद करी. मुलाला पाळण्यातून काढी आणि त्याचे कपडे उतरवून त्याला जळत्या निखाऱ्यांवर ठेवी. हळूहळू निखाऱ्यांची धग सहन करण्याचे सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न झाले. त्याचे बळ वाढू लागले. त्याच्यात अत्यंत तेजस्वी असा दैवी अंश विकसित होऊ लागला. पण, एका रात्री त्याची आई एकाएकी त्याच्या खोलीत शिरली. तिच्या दृष्टीस तो प्रकार पडताच ती भयंकर संतापली. तिने मूल चटकन निखाऱ्यांवरुन उचलून घेतले आणि त्या देवतेला हाकलून दिले. अर्थात राणीला तिचे मूल मिळाले, मात्र त्याचा देव जो होणार होता, त्या देवाला मात्र ती मुकली! ही गोष्ट हाच अस्पृश्यांना माझा संदेश! तो हा की, विस्तवातून गेल्यावाचून देवपण येत नाही. दलित माणसाला हालअपेष्टांच्या आणि त्यागाच्या आगीमधून जावयालाच पाहिजे. तरच त्याचा उद्धार होईल... आजपर्यंत आम्ही अस्पृश्यांनी हजारो वर्षे हाल सोसले आहेत. छळ सोसला आहे. झगडा केला आहे. पण, इतके असूनही मी पुन्हा हाच संदेश देतो की, झगडा, आणखी झगडा. त्याग करा, आणखी त्याग करा. त्यागाची आणि हालांची पर्वा न करता एकसारखा झगडा  चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे. आपले कार्य पवित्र आहे, यावर त्यांचा दृढविश्वास असला पाहिजे.बाबासाहेबांचे ते दिव्य शब्द आजही आमच्या कानात घुमत आहेत.[2]

अत्रे यांच्याशी घनिष्ट संबंध असले तरी बाबासाहेबांकडे एखादा मतभेदाचा मुद्दा उपस्थित झाला, तरी ते मित्राची बाजू उचलून न धरता, योग्य बाजूने उभे राहात. याचा एक गंमतीदार किस्सा एस.एम. जोशी यांनी आपल्या मी एस.एम. या आत्मचरित्रात सांगितला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या त्या कालखंडात एस.एम. आणि अत्रे यांच्यात प्रांतिक मंत्रिमंडळात सामील होण्यावरुन मतभेद निर्माण झाले. कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी होऊ नये, असे एस.एम. यांचे म्हणणे होते, तर सत्तेत जाऊन लढाई जारी राखावी, असे अत्रे यांचे! हा मुद्दा घेऊन हे दोघे बाबासाहेबांसमोर उपस्थित झाले. बाबासाहेब आपल्या बाजूने मत देतील, याची अत्रेंना जणू खात्रीच होती. पण, जर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई हवी असेल तर सत्तेला आपण काठीनेही स्पर्श करता कामा नये, असे बाबासाहेबांनी सांगितले. बाबासाहेबांचा हा निवाडा अत्र्यांनी लगेच मान्य केला. या प्रसंगाबद्दल एस.एम. यांच्याशी बोलताना अत्रे म्हणाले, बाबासाहेबांनी म्हणजे बिनपाण्यानेच केली हो आमची. गंमतीचा भाग सोडा, पण अत्रे यांचा स्वभाव माहिती असणाऱ्यांना लक्षात येईल की, अत्रे आपल्या मताबद्दल किती आग्रही असत. मात्र, बाबासाहेबांच्या मुखातून आलेला निवाडा मात्र त्यांनी अगदी मनापासून स्वीकारला. यातून त्यांचे त्यांच्यावरील प्रेमच दिसून येते. महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाचा प्रारंभ करीत असताना मुहूर्ताच्या पहिल्या दृश्याच्या चित्रिकरणावेळी सुद्धा त्यांनी बाबासाहेबांना आग्रहपूर्वक बोलावले आणि बाबासाहेबही तितक्याच प्रेमाने उपस्थित राहिले.

या दोघांचे हे मैत्र अखेरपर्यंत अबाधित राहिले. आपल्या मृत्यूच्या दोन दिवस आधी म्हणजे ४ डिसेंबर १९५६ रोजी संध्याकाळी बाबासाहेबांनी दोन पत्रे स्वहस्ताक्षरात लिहीली. त्यापैकी एक आचार्य अत्रे यांना, तर दुसरे एस.एम. जोशी यांना होते.[3] संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या ह्या दोघा आघाडीच्या नेत्यांनी आपण काढीत असलेल्या रिपब्लिकन पक्षाला येऊन मिळावे, अशी विनंती त्या पत्रांत बाबासाहेबांनी केलेली होती.[4] ५ डिसेंबरच्या रात्रीही आपले सहाय्यक नानकचंद रत्तू हे निघत असताना त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकासाठी लिहीलेल्या उपोद्घात व प्रस्तावनेची टंकलिखित प्रत आणि ही दोन पत्रे आपल्या उशाला ठेवण्यास सांगितले होते- अखेरचा हात फिरविण्यासाठी. कदाचित त्यांनी हाताळलेली ही अखेरचीच पत्रे ठरली असावीत. कारण त्या रात्री झोपेतच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

दि. ७ डिसेंबर १९५६ रोजी सुमारे दहा लाखांच्या जनसागराच्या साक्षीने बाबासाहेबांची मुंबईत राजगृहापासून दादर चौपाटीपर्यंत जी महापरिनिर्वाण यात्रा सुरू झाली, त्या यात्रेच्या अग्रभागी आचार्य अत्रे होते. दादर येथे ही महायात्रा पोहोचल्यानंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहाच्या साक्षीने त्या प्रचंड जनसमुदायासमोर त्या प्रसंगी केवळ एकमेव भाषण झाले ते आचार्य अत्रे यांचे. तत्पूर्वी, दादासाहेब गायकवाड यांनी, १६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांनी मुंबई येथे जो धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला होता, तो विधी त्यांच्या पार्थिव देहाच्या साक्षीने दादासाहेबांनी तेथे पार पाडला. लाखो लोकांनी त्यावेळी साश्रूपूर्ण नयनांनी धम्मस्वीकार केला.

त्यानंतर भिक्खू आनंद कौसल्यायन यांच्या अनुमतीने आचार्य अत्रे यांनी जे भाषण केले, त्यावेळी त्या लाखोंच्या जनसागराच्या अश्रूंचा बांध फुटल्याचे दृश्य दिसले. अत्रे म्हणाले, मराठी पत्रकार व लेखक यांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच मला कीव वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या नरपुंगवावर, एका महान जीवनाच्या या ग्रंथावर, इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली? महापुरूषाचे जीवन पाहू नये, असे म्हणतात. पण, त्यांचे मरण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले. आकाशातील देवांनाही हेवा वाटावा, असे भाग्य त्यांना लाभले. भारताला महापुरूषांची वाण कधी पडली नाही. परंतु, असा युगपुरूष शतकाशतकांत तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड. असा बंडखोर, शूरवीर, बहाद्दर पुरूष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्मन करण्यास शब्द नाहीत. अशी एकही गोष्ट नाही की, ज्याविरुद्ध बाबांनी बंड पुकारले नाही. अन्याय, जुलूम, जबरदस्ती, विषमता जेथे दिसली, तेथे त्या वीराने आपली गदा उगारली. बौद्ध धर्म स्वीकारून हिंदू धर्मावर सूड घ्यावा, अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यांच्या इच्छेप्रमाणे लोकसभेने हिंदू कोड बिल मंजूर केले असते, तर त्यांनी धर्मांतर केलेच नसते. हिंदू धर्म सुधारण्यासाठीच त्यांनी हा क्रांतीकारक निर्णय घेतला. सूड घेण्यासाठी नव्हे.[5]

बाबासाहेबांच्या मृदू अंतःकरणाचे वर्णन करताना आचार्य अत्रे पुढे म्हणाले की, महात्मा गांधींना वाचविण्यासाठी आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांचे नुकसान करूनही त्यांनी पुणे करारावर सही केली. ते कच्च्या गुरूचे चेले नव्हते. बुद्ध, कबीर व फुले हे त्यांचे गुरू होते. अस्पृश्यता जाळा, जातिबेद जाळा, मनुस्मृती जाळा असे म्हणणारा हा पुरूष स्वतंत्र भारताच्या घटनेचा शिल्पकार बनला. त्यांना आम्ही छळले- सरकारने छळले- अशा वेळी कुठे जावे त्यांनी? शेवटी भगवान बुद्धाला ते शरण गेले व त्याने त्यांना कायमचा आश्रय दिला. (यावेळी सारा जनसमुदाय ओक्साबोक्शी रडू लागला.) सात कोटी लोकांच्या उद्धारासाठीच त्यांनी बुद्धाला कवटाळले.

अशा परिस्थितीत, मी हिंदू म्हणून जन्मलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही, असे जे ते बोलले, ते काय रागावून बोलले? हिंदू धर्माचे तेच खरे उद्धारकर्ते होते, हे पुढे कळून येईल. बाबा अत्यंत आणीबाणीच्या वेळी आम्हाला सोडून गेले. संयुक्त महाराष्ट्राचा पाळणा त्यांनी हलविला. मुंबई परमेश्वराने महाराष्ट्राला दिली, ती कुणाच्या बापाला महाराष्ट्रापासून हिरावून घेता येणार नाही, असे ते म्हणाले. आता मुंबईचा लढा आम्ही कुणाच्या नेतृत्वाखाली लढवायचा? शोक करणे त्यांना आवडणार नाही. आज त्यांचा प्राण त्यांच्या कुडीतून बाहेर पडून सात कोटी अस्पृश्यांच्या शरीरात शिरला आहे. त्यांचे चारित्र्य, निर्भयपणा व दुसरे गुण अंगी बाणवून आपण त्यांचे कार्य पुरे केले पाहिजे.[6]

त्यानंतर चंदनाच्या चितेवर चढविलेल्या बाबासाहेबांच्या पार्थिवाला यशवंतरावांच्या हस्ते संध्याकाळी सव्वासात वाजता अग्नी देण्यात आला. या महापरिनिर्वाण यात्रेचे संपूर्ण धावते वर्णन ऑल इंडिया रेडिओवरुन ध्वनिक्षेपित करण्यात आले आणि ती कामगिरी पु.ल. देशपांडे पार पाडीत होते.[7]

यानंतर दि. ७ डिसेंबर ते १९ डिसेंबर १९५६ या कालावधीत मराठ्यातून अत्रेंनी बाबासाहेबांच्या स्मरणार्थ तेरा अग्रलेखांची मालिका लिहीली. हे सारे अग्रलेख बाबासाहेबांच्या तेजस्वी प्रतिमेला आणि कारकीर्दीला अत्रे उवाच पद्धतीने उजाळा देणारे आहेत. पहिल्या अग्रलेखातच दलितांचे बाबा गेले.. असा टाहो फोडतात आणि तेथून मानव धर्माचा प्रेषित होण्यापर्यंतच्या त्यांच्या वाटचालीचे परिशीलन करतात. याच काळात नवयुगमध्येही भारताचा उद्धारकर्ता महात्मा असा त्यांचा सार्थ गौरव करतात. सच्चे ब्रह्मर्षी, समतायोगी, नवभारताचे निर्माते अशा विशेषणांची खैरात बाबासाहेबांवर करताना अत्रे थकत नाहीत. आंबेडकर हे सात कोटी अस्पृश्यांचे कल्याणकर्ते नव्हते, तर पंचवीस कोटी स्पृश्यांचे उद्धारकर्ते होते. विभूतीपूजा आणि ढोंग ह्याने साऱ्या हिंदू समाजाचा अधःपात झालेला होती. म्हणून त्या विभूतीपूजेवर आणि ढोंगावर घमाचे घाव घालून त्या खोट्या मूर्ती आंबेडकरांनी फोडून टाकल्या आणि बुद्धीची नि मानवतेची पूजा करा, अशी देशाला शिकवणूक दिली... भारताच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी सारा जन्म ज्यांनी जुलूम, असत्य आणि ढोंग ह्यांच्याशी निकराने झुंज दिली असा लोकोत्तर धैर्याचा, वज्रकठोर छातीचा आणि कुसुमकोमल हृदयाचा महात्मा म्हणून डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे नाव भारताच्या इतिहासात चिरंतन प्रकाशत राहील!”[8] असे अत्रे म्हणतात.

या मालिकेच्या पलिकडे मराठ्यातून दरवर्षी महापरिनिर्वाण दिनाला ते मराठ्यातून दरवर्षी बाबासाहेबांच्या आठवणी जागवत असत. मुंबईच्या महापौर पदावर प्रथमच दलित समाजातील पी.टी. बोराळे यांची निवड झाल्याची वार्ता (१९५९) अत्रेंच्या कानी येते, अगदी त्या क्षणी सुद्धा अत्रेंच्या मनात बाबासाहेबांचा विचार तरळतो आणि त्यांच्या हातून अग्रलेख कागदावर उमटतो, आज बाबा असते तर...’! ते लिहीतात, या देशातील सर्वश्रेष्ठ नगरीचा सर्वश्रेष्ठ नागरिक म्हणून एका अस्पृश्याच्या नावाने द्वाही फिरताना आणि ब्राह्मणांपासून सर्व जातीजमातींच्या हजारो लोकांच्या मुखातून एका महाराच्या (हे बाबासाहेबांनी अत्रे यांना मुलाखत देताना स्वतःसाठी वापरलेले संबोधन अत्रे येथे मोठ्या खुबीने वापरतात. त्याकडे जातीवाचक अर्थाने पाहून चालत नाही.) नावाचा जयघोष होताना आम्ही या कानांनी ऐकला. जेव्हा रिपब्लिकन पक्षाचे नेते पी.टी. बोराळे महापौर पदाच्या खुर्चीवर आरुढ होण्यासाठी चालू लागले, तेव्हा त्यांच्या प्रत्येक पावलाखाली अस्पृश्यतेचा अन्याय तुडविला जात आहे, असे आम्हाला वाटले. जेव्हा त्यांच्या गळ्यात पुष्पहार पडू लागले, तेव्हा त्या प्रत्येक हारागणिक जातिभेदाच्या राक्षसाच्या गळ्याबोवती करकचून फास आवळले जात आहेत, असा आम्हाला भास झाला. आमच्या डोळ्यांत आनंदाश्रूंनी गर्दी केली आणि त्याच वेळी एका आठवणीने आमचे मन व्याकुळ होऊन आमच्या मुखातून उद्गार निघाले, बाबासाहेब आंबेडकर, आज आपण इथे हवे होता’!”

धन्य ते बाबासाहेब आणि धन्य त्यांचा हा अत्रे नावाचा सखा!

(लेखक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या

विचार व कार्याचे अभ्यासक)



[1] अत्रे, प्र.के. : दलितांचे बाबा, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई, (आठवी आवृत्ती, २००२), प्रास्ताविकातून

[2] अत्रे: कित्ता, पृ. ४७-४८

[3] खैरमोडे, चां.भ.: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, खंड १२, सुगावा प्रकाशन, पुणे (दुसरी आवृत्ती, २०००) पृ. ११०

[4] कीर, धनंजय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई (पाचवी आवृत्ती, २०१६), पृ. ५०८

[5] खैरमोडे: कित्ता, पृ. १३०

[6] खैरमोडे: कित्ता, पृ. १३१

[7] खैरमोडे: कित्ता, पृ. १३१

[8] अत्रे: कित्ता, पृ. ७६-७७



'पुढारी ऑनलाईन'वर प्रकाशित लेखाची लिंक : https://www.pudhari.news/news/Kolhapur/Friendship-of-Dr-Babasaheb-Ambedkar-and-Acharya-Pralhad-Keshav-Atre-article-by-Dr-Alok-Jatratkar/