|
Bhalchandra Nemade |
|
भालचंद्र नेमाडे |
त्यांच्या पांडुरंग सांगवीकरनं
आमचं पूर्ण हॉस्टेल लाइफ व्यापलेलं.. त्यांच्या खंडेरावानं जीवाला लई
त्रास दिलेला… पण दोघंही हृदयाच्या एकदम जवळचे.. अशा या दोन अविस्मरणीय
व्यक्तीरेखांच्या निर्मात्याच्या शेजारी बसून त्यांची निर्मिती प्रक्रिया
जाणून घेण्यापासून ते आता ‘हिंदू’च्या पुढच्या भागाची आस माझ्यासारख्या
हजारो चाहत्यांना कशी लागून राहिली आहे, ते पटवून देण्यापर्यंत, निपाणीच्या
विडी प्रश्नापासून ते सीमा प्रश्नापर्यंत, वाचनवेडे असणाऱ्या
एके काळच्या युवकांपासून ते स्मार्टफोनवर ई-बुक्स वाचणाऱ्या पिढीपर्यंत,
स्वप्नाळू लेखकांपासून ते वास्तववादी लेखकांपर्यंतच्या साहित्य
प्रवासापर्यंत अशा किती तरी विषयांवर ते बोलत राहिले आणि मी ऐकत राहिलो,
अगदी भाविकपणे. जसं लिहीणं तसंच बोलणं, थेट, भिडणारं आणि मार्मिक. सारंच
कसं अगदी मनापासून. समरसून..
|
श्री. नेमाडे यांच्यासमवेत मी. |
या माणसाला भेटण्याची आस कित्येक वर्षे लागून
होती. आज एका व्याख्यानाच्या निमित्तानं ते कोल्हापुरात आले आणि
विद्यापीठात निवांतपणे त्यांनी मुक्त वेळ दिला. आधीच त्यांच्याबद्दलचं
मनातलं वेगळं वलय.. त्यात काहीबाही ऐकलेलं.. पण त्यापलिकडे जाऊन भेटण्याची
ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती.. भेटलो ते उत्तमच झालं.. आयुष्यातली ही एक
अविस्मरणीय भेट ठरली.. साऱ्या शंकाकुशंका मिटल्या.. साऱ्या वावड्या खोट्या
ठरल्या.. जितका मस्त लेखक त्याहून अधिक मस्त माणूस.. भरभरून बोलले..
मनापासून बोलले.. हिंदू लिहून पूर्ण झाल्यानं मनावर २७ वर्षे वागवलेलं ओझं
कमी झाल्याची भावना व्यक्त करतानाच पुढच्या भागांचं दडपणही आता मनावर
असल्याची भावना व्यक्त केली.. मी म्हटलं.. खरंच वेळ काढा, तुमचं लिखाण हे
आमच्या आणि पुढच्या पिढ्यांचं खरं संचित असणार आहे.. त्यांनाही पटलं.. खूष
झाले.. म्हणाले.. ड्राफ्ट तयार आहेत.. वेळ काढून नक्की त्यांना अंतिम रुप
देईन.. पुन्हा वर.. तुझ्यासारख्या चाहत्यांमुळंच लिखाणाचं बळ अंगी येतं..
हेही सांगायला विसरले नाहीत.. काही तरीच! नेमाडे सर, तुम्ही लिहीता..
तुमच्यासारखे लिहीणारे आहेत, म्हणून वाचनाचं बळ आमच्या अंगी आलंय, ही आमची
वस्तुस्थिती!.. खरंच धन्यवाद.. आजच्या दिवसासाठी आणि या पूर्वीच्या कैक
वर्षांसाठी!..
आणखी एक.. खरं तर, सेल्फी काढणं मला आवडत नाही.. पण
आयुष्यातला पहिला सेल्फी मी काढला तो भालचंद्र नेमाडे यांच्यासमवेत.. ही
तुमचा चाहता म्हणून माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.. थँक यू व्हेरी मच सर!