मंगळवार, २१ मे, २०१३

निखळ-९: ‘आय. फि. एल.’ … सिर्फ देखने का...?शीषर्कात वापरलेल्या शॉर्ट फॉर्मचा विस्तृत फॉर्म मी सूज्ञ वाचकांना सांगायलाच हवा, अशातला भाग नाही कारण भारतीय क्रिकेट जगताला लागलेली फिक्सिंगची कीड गेल्या चार दिवसांत पुन्हा नव्यानं चर्चेत आलेली आहे.
स्पॉट फिक्सिंगचा सबळ पुराव्यानिशी आरोप ठेवून दिल्ली पोलीसांनी एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि चांडिला या तिघांवर तातडीनं केलेली कारवाई अभिनंदनीय आहे. या कारवाईनंतर आयपीएलच्या बऱ्यावाईटाबद्दल पुन्हा चर्चेचं वादळ उठलं. प्रत्यक्षात ललित मोदीच्या सुपीक डोक्यातून क्रिकेटच्या टी-ट्वेंन्टी फॉर्मेटचा वापर करून त्याचं पैशाच्या वटवृक्षात रुपांतर करण्याची कल्पना बाहेर पडली आणि आयपीएलचा जन्म झाला, तिथंच खऱ्या अर्थानं आयपीएलचा मूळ उद्देशही स्पष्ट झाला. क्रिकेट आणि प्रेक्षक हे दोन घटक वगळता आयपीएलमध्ये गुंतलेल्या इतर प्रत्येक घटकाचा इथं फायदा झालेला आहे. क्रिकेट हा इथं क्रीडाप्रकार (sports) नसून  मनोरंजन (entertainment) आहे. मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला जावं, तसा पैसा खर्च करून क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमवर यायचं, तीन तासांची करमणूक करवून घ्यायची, दंगामस्ती करायची आणि परत जायचं. क्रिकेटपेक्षा इतर भलभलत्या गोष्टींकडंच खेळणाऱ्यांचं आणि खेळ पाहणाऱ्यांचंही लक्ष असतं. आयपीएल हा गेम नसून रेस आहे, असं माझं सुरवातीपासूनचं मत आहे. रेसकोर्सवर जसं घोड्यांच्या शर्यती लावून त्यावर सट्टा लावला जातो आणि काही वेळातच त्यातून भरघोस कमाई केली जाते; त्याच धर्तीवर इथं खेळाडूंवर बोली लावून त्यांचा लिलाव मांडला जातो. खेळाडू स्वतःच्या मर्जीनं या लिलावाच्या घोडेबाजारात स्वतःला उभं करतात, हे विशेष. इथं एकेकावर लाखो-करोडो रुपयांची बोली लावली जाते, त्यांची खरेदी केली जाते. आता या घोड्यानं मालकाच्या (फ्रँचाइसीच्या) तालावर नाचलं पाहिजे, हा इथला अलिखित नियम. रिकी पाँटिंगसारखा क्रिकेटपटू एरव्ही फॉर्म कमी झाला तरी कसोटी, वन-डे खेळत राहिला असता, पण इथं एक दोन गेमनंतर संपूर्ण आयपीएल मैदानाबाहेर बसून पाहण्यात त्यानं धन्यता मानली, याचं कारणही हेच. लॉयल्टी खेळाशी नाहीच, ती केवळ पैसे देणाऱ्या धन्याशी. राहुल द्रविड, ज्याला आम्ही द वॉल म्हणून कौतुकानं गौरवलं, ती सुद्धा डळमळताना पाहण्याचं दुर्दैव आयपीएलमुळं आमच्या नशिबी आलं. असो!
...तर या रेसमध्ये अमाप पैसा गुंतलेला आहे. फ्रँचाइसी, टेलिव्हिजन राइट्स, स्पॉन्सरशीप यांच्या माध्यमातून आयपीएलमध्ये गुंतणारा पैसा आणि होणारी उलाढाल ही सर्वसामान्यांच्या डोक्याबाहेरची गोष्ट आहे. केवळ माहितीसाठी काही आकडे सांगतो. साधारण दहा वर्षांच्या काळात बीसीसीआयला आयपीएलमधून किमान 2 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. फ्रँचाइसींसाठी सुरवातीला साधारण 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी बेस प्राइस निश्चित केली होती. प्रत्यक्षात बोली लागली 723.59 दशलक्ष डॉलर्सची. पहिल्या पाच वर्षांचं (सन २००८ ते २०१२) प्रायोजकत्व डीएलएफ या भारतातील आघाडीच्या प्रॉपर्टी डेव्हलपर कंपनीकडं होतं. त्यासाठी डीएलएफनं २५० कोटी रुपये मोजले. यंदाच्या सीझनपासून पुढच्या पाच वर्षांसाठी आता पेप्सीकोनं प्रायोजकत्व स्वीकारलंय. त्यासाठी कंपनीनं ३९६.८ कोटी रुपये मोजलेत. त्याशिवाय आयपीएलच्या प्रत्येक टीमशी ऑफिशियल बेव्हरेज सप्लायर म्हणूनही स्वतंत्र करार केलेत. सोनी वाहिनीनं दहा वर्षांसाठी सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क 8700 कोटी रुपये देऊन बीसीसीआयकडून विकत घेतले आहेत. याशिवाय अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांचीही वेगवेगळ्या प्रायोजकत्वासाठी आयपीएलमध्ये गुंतवणूक आहे. आयपीएल सुरू झाल्याच्या दुसऱ्याच वर्षी महसूल दुपटीनं वाढल्याचं (सुमारे १८ हजार कोटी रुपये) निरीक्षण एका युके बेस्ड कंपनीनं नोंदवलं आहे. गेल्या पाच वर्षांत महसुलात किती वाढ झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. अशा तऱ्हेनं आयपीएलमधून निर्माण होणारा सर्व पैसा सेंट्रल पूलद्वारे एकत्र केला जातो. त्यातला 40 टक्के आयपीएलसाठी, 54 टक्के पैसा फ्रँचाइसींकडे आणि केवळ सहा टक्के पैसा बक्षीसांवर खर्च होतो. 2017 नंतर हा शेअर अनुक्रमे 50 टक्के, 45 टक्के आणि 5 टक्के असा बदलणार आहे.
आयपीएलमध्ये गुंतलेल्या या अमाप पैशांमुळंच नामांकित उद्योजक, व्यावसायिकांनी त्यात गुंतवणूक केलीय. चला, क्रिकेटच्या भल्यासाठी काही तरी चांगलं करू या, अशा टाइपची ही गुंतवणूक नक्कीच नाही. पैसा फेंको, तमाशा दिखाओ और प्रॉफिट कमाओ। हाच त्यांचा मूळ उद्देश असल्यास ते त्यांच्या व्यावसायिक प्रतिमेस साजेसंच आहे. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आता आयपीएलमध्ये सलग दोन वर्षे स्पॉट फिक्सिंगचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळं खेळाडू आणि बुकी यांचे संबंध जगासमोर येताहेत. तथापि, आयपीएलमधील टीम्सच्या मालक कंपन्या आणि बुकी यांच्या संबंधांचीही या अनुषंगाने चौकशी होण्याची नितांत गरज आहे, असं मला वाटतं. श्रीशांतच्या एका बॉलसाठी दहा लाख मोजण्याची तयारी असणारे बुकी अखंड मॅचसाठी किती मोजायला तयार असतील? आणि तसं होतच नसेल असं छातीठोकपणे कोणीतरी म्हणू शकेल काय? म्हणूनच तपासकर्त्यांनी या दिशेनंही पुरावे गोळा करण्याची गरज आहे.
आता राहता राहिला प्रश्न आपल्या खेळाडूंचा उर्फ रेसच्या घोड्यांचा. या घोड्यांच्या हातात नको त्या वयात इतका पैसा खेळू लागतो की, अति पैशामुळं ते न चेकाळतील, तरच नवल! त्या पाठोपाठ इतर दुर्गुणही येतात. त्यामुळं श्रीशांत, अंकितला अटक केले तेव्हा त्यांच्यासोबत तरुणी सापडल्या, यात मला तरी आश्चर्य वाटत नाही. पहिल्या वर्षी आयपीएलच्या एका टीमचे सल्लागार असलेल्या क्रिकेटपटू रमेश वायंगणकरांनी आयपीएलच्या खेळाडूंच्या मॅच संपल्यानंतरच्या वर्तणुकीबाबत अतिशय खेद आणि चिंता व्यक्त केली. त्यांची ऐय्याशी आणि मौजमजा करण्याचे प्रकार पाहून दुसऱ्या वर्षीपासून त्यांनी थेट आयपीएलला रामराम केला. बीसीसीआयला आयपीएलचा फॉर्मेट वापरुन रणजी, दुलिप, इराणी, एनकेपी साळवे, विजय हजारे, देवधर अशा अनेक प्रथम श्रेणी करंडक सामन्यांचं कल्याण करता येऊ शकलं असतं, पण तिथं इतका पैसा सहजी मिळाला नसता. त्यामुळं त्यांनी आयपीएलच्या माध्यमातूनच क्रिकेटचं (की आणखी कोणाचं?) कल्याण करण्याचं ठरवलंय. आयपीएल बंद करा, अशी माझी मागणी नाही. कारण त्यातून कोणाचं भलं होणार असेल, प्रेक्षकांचं मनोरंजन होणार असेल तर होऊ द्या, पण क्रिकेटला मात्र मूठमाती मिळता कामा नये, एवढंच मागणं आहे. त्यासाठी त्यात गुंतलेल्या दुष्प्रवृत्ती मुळातूनच उखडून काढल्या पाहिजेत.

गुरुवार, ९ मे, २०१३

निखळ-८ :वुई आर बीईंग वॉच्ड!काही दिवसांपूर्वी माझ्या एका हितचिंतक सहकाऱ्याचा मला फोन आला. मी माझं फेसबुक अकाऊंट बंद करून टाकलंय. तू सुद्धा तुझं फेसबुक अकाऊंट तातडीनं बंद कर. वुई आर बीईंग वॉच्ड. त्या सहकाऱ्यानं अगदी सद्हेतूनं फोन केला, याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नव्हतं, पण फेसबुकचं अकाऊंट काही कारण नसताना, कोणीतरी वॉच ठेवून आहे, म्हणून बंद करावं, हे काही मला पटेना. मी त्याला म्हटलं, काही लोक लक्ष ठेवून आहेत, म्हणून मी अकाऊंट बंद करावं, असं काही मला वाटत नाही. त्यांना त्यांचं काम करू दे, माझं मी करतो. त्यांच्यासाठी माझ्या मित्रांशी संपर्कात ठेवणाऱ्या या उत्तम (आणि फुकट) सुविधेचं द्वार बंद करावं, असंही वाटत नाही. यावर त्यानं सबुरीचा सल्ला आणखी एकदा देऊन फोन ठेवला.
आजच्या व्हर्चुअल रिॲलिटीच्या, सोशल मिडियाच्या या दुनियेत ज्यानं प्रवेश केलाय, त्याची प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही कुठे ना कुठेतरी रजिस्टर होते आहे, तिच्यावर वॉच ठेवला जातो आहे, हे दोनशे टक्के सत्य आहे. हे वास्तव आपल्याला स्वीकारलंच पाहिजे. मुळात सोशल मिडियाचा हेतूच त्याच्या या सोशल संबोधनातून दृग्गोच्चर होतो. हां, आता सोशल मिडियाचा वापर ज्या व्यक्ती, प्रवृत्ती अन्-सोशल गोष्टींसाठी करत आहेत, त्यांना या माध्यमाच्या गैरवापराबद्दल शिक्षा ही व्हायलाच हवी. अनेकजण या माध्यमांमध्ये येऊन आपले छुपे अजेंडे खुले करतात. सोशल मिडियाचं व्यासपीठ हे प्रत्येकासाठी पर्सनली उपलब्ध आहे. व्यक्तिगत अभिव्यक्तीसाठी उपयुक्त आहे, म्हणूनच या माध्यमाचा बोलबाला आहे, पॉप्युलॅरिटी आहे. अशा समान अभिव्यक्तीचे लोक या व्यासपीठावर एकत्र आले की, ग्रुप फॉर्म होतात आणि विचारमंथनही सुरू होतं. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये या माध्यमाच्या संघटनशक्तीचा अनेक चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या बाबींमधून प्रत्यय आला आहे. अण्णांच्या (पहिल्या) आंदोलनाला इथूनच पाठिंबा संघटितरित्या व्यक्त झाला; तर त्याचवेळी कित्येक रेव्ह पार्ट्यांची निमंत्रणंही याच मिडियामधून दिली गेली. दिल्लीतील बलात्कार प्रकरणाच्या विरोधाची आग इथूनच चेतविली गेली आणि रस्त्यावर उतरली; तर लहान मुलाच्या विक्रीची जाहिरातही खुलेपणानं इथूनच दिली गेली.
अशा चांगल्या-वाईट दोन्ही प्रकारच्या गोष्टी या माध्यमाच्या साह्यानं घडवल्या गेल्या असल्या तरी वाईटाच्या बाबतीत प्रत्यक्ष या माध्यमाचा दोष किती, असा जर विचार केला तर तो फारच कमी असल्याचं दिसेल. खरे दोषी आहेत, ते त्याचा वापर करणाऱ्या प्रवृत्ती! सोशल मिडियाच कशाला? आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा कोणताही आविष्कार असू द्या, त्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही उपयोग असतात. तो कोणत्या कारणासाठी करावयाचा, हे संपूर्णतया वापरणाऱ्यावरच अवलंबून असतं. अणुचा शोध लागला, ही चांगली गोष्ट झाली. पण त्या अणूचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी करायचा की बाँबनिर्मितीसाठी करायचा, हे त्या शोधाची माहिती ज्या हातांत आहे, त्या हातांवर अवलंबून असतं, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच हाती असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, हे ज्या-त्या हातांवर अवलंबून आहे.
माझा या सोशल मिडियात येण्याचा उद्देश एकदम क्लिअर आहे. आज मला असं वाटतं की, आपण कोणीतरी आहोत. या कोणीतरी असण्यातून अनेक मैत्रसंबंध प्रस्थापित झाले आहेत- त्यांच्याशी, आणि ज्यावेळी मी कोणीही नव्हतो, तेव्हा कोणत्याही उद्देशाविना, हेतूविना ज्यांच्याशी माझं मैत्र जोडलं गेलं होतं, अशा सर्व मित्र-मैत्रिणींशी पुन्हा एकदा व्हर्चुअली का असेना, पण संपर्क प्रस्थापित करावा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की, माझा हा उद्देश बहुतांशी सफल झाला आहे. त्यामुळं इथल्या माझ्या एकूण फ्रेंड्सपैकी किमान दोन तृतीअंश माझे वन टू वन परिचयातले आणि जवळचे मित्रमैत्रिणी आहेत. उर्वरित काहींना मी फॉलो करतो तर काही जण मला फॉलो करणारे आहेत. काही कार्यालयीन कामकाजामुळं लिस्टेड-कनेक्टेड आहेत. माझा एखादा विचार एकाचवेळी इतक्या लोकांशी शेअर करण्याचं आणि त्यावर त्यांची मतं आजमावण्याचं इतकं उत्तम व्यासपीठ दुसरं असूच शकत नाही.
आता यातल्या प्रत्येकाच्या प्रत्येक मताशी मी सहमत असेन, अशातला भाग नाही. किंवा माझं प्रत्येक मत त्यांना आवडायलाच हवं, असा माझाही आग्रह असण्याचं कारण नाही. पण आजपर्यंत तरी मी आणि माझ्या मित्रमंडळींनी मानवी स्वभावाचं हे बेसिक तत्त्व गृहित धरूनच एकमेकांशी गोष्टी लाइक/शेअर केल्या आहेत, त्यावर कॉमेंट केली आहे किंवा सोडून दिली आहे.
या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी आता याला पकडायचंच, म्हणून जर वॉच ठेवण्याचं ठरवलं असेल, तर तो त्यांच्या इच्छेचा भाग आहे. त्यांनी खुशाल ठेवावा वॉच! इथं एक गोष्ट महत्त्वाची ठरते, ती म्हणजे माझी (आपली) सहृदयता. सोशल मिडियातला आपला वावर हा सोशल आणि संवेदनशीलच असला पाहिजे, असा माझा आग्रह असतो. मूलभूत मानवी संवेदनांची, सहवेदनांची आणि व्यापक सामाजिक जाणिवांची देवाण घेवाण जर या व्यासपीठावरुन होत असेल, तर त्याला कोणाचाही आक्षेप असण्याचं कारणच उरणार नाही. पण आपल्याच हेतूंविषयी समोरच्याच्या मनात किंतु निर्माण करणाऱ्या पोस्ट आपण क्रिएट करणार असू, शेअर करणार असू तर मग आपण स्वतःहूनच अशा वॉचमन्सच्या हातात आयतं कोलीत दिल्यासारखं होईल.
      या मित्राचा फोन येण्याआधी काही दिवस आधीच मी सोशल मिडियावर माझा अधिक वेळ जात असल्याचं लक्षात येऊन स्वतःच स्वतःला रेस्ट्रीक्ट केलं आणि सलग तीन दिवस (अगदी स्मार्टफोनवर) सुद्धा लॉग-इन केलं नाही. आणि असं कमी करत करत अगदी माफक वेळ मी आता या मिडियावर असतो. तेवढ्या वेळात काही चांगले लेख, सुंदर छायाचित्रं, उत्तम सुविचार असं बरंच काही मला वाचता येऊ शकतं, ते केवळ माझ्या मित्र-मैत्रिणींनी शेअर केल्यामुळंच. माझ्या वाचनात आलेलं, मी लिहिलेलं असं काही मी सुद्धा शेअर करतो. शेअरिंगचं हे इतकं नितांत सुंदर व्यासपीठ मी आताच सोडावं, अशी काही परिस्थिती नाही. हां, कोणी वॉच ठेवतंय म्हणून नाही, पण उद्या आलाच (ऑर्कुटसारखा) कंटाळा तर करू बंद, आहे काय त्यात? आणखी नवीन काही आलेलं असेलंच की तोपर्यंत!

शनिवार, ४ मे, २०१३

‘असेल माझा हरी...’


('शेती-प्रगती' मासिकाच्या 'मे' २०१३च्या ताज्या अंकात प्रकाशित झालेला माझा लेख...)  


दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर साडेनऊच्या बातम्यांत काही दिवसांपूर्वी एक मुलाखत पाहण्यात आली. लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झालेले मूळचे महाराष्ट्रीय असलेल्या सुनील नारकर यांची ती मुलाखत होती. सुनील नारकर हे अमेरिकेत एक उद्योजक म्हणून चांगले सुस्थापित आहेत. तिथल्या टीव्हीवर मॉडेल, अँकर म्हणून त्यांनी चांगला लौकिक मिळवला आहे. चित्रपट अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी चांगल्या लक्षवेधी चित्रपटांची, लघुपटांची निर्मिती केली आहे. पण, केवळ त्यामुळंच माझं लक्ष या मुलाखतीकडं वेधलं गेलं, असं नाही तर या मुलाखतीत श्री. नारकर जी माहिती देत होते, त्या माहितीमुळं मी तिकडं आकर्षित झालो.
नारकर हे मूळचे राजापूर तालुक्यातल्या पडवे गावचे. अमेरिकेत स्थायिक असले तरी गावी मुलाबाळांसह अधूनमधून येत-जात असतात. त्यांच्या मुलीचं नाव संजना तर मुलाचं नाव श्री. एका उन्हाळ्याच्या सुटीत असेच गावी आले असता, एक गोष्ट संजनाच्या लक्षात आली ती म्हणजे गावात केवळ त्यांच्याच घरच्या विहीरीला पाणी असल्यानं गावकऱ्यांची तिथून पाणी नेण्यासाठी अखंड गर्दी असायची. नारकरही त्यांना कधी अडवायचे नाहीत.
अमेरिकेत जन्मलेल्या, वाढलेल्या नारकरांच्या मुलांना मात्र त्यामागचं पाणीटंचाईचं, दुष्काळाचं भीषण वास्तव माहिती असण्याचं कारण नव्हतं. या स्थानिकांची पाण्यासाठी ही वणवण करण्यामागचं कारण त्यांनी आपल्या वडलांना विचारलं. तेव्हा नारकरांनी त्यांना पाणीटंचाईविषयी सांगितलं. तेव्हा तुम्ही या लोकांना विहीरी बांधून देऊ शकत नाही का, असा बाळबोध प्रश्न त्यांच्या मुलांनी त्यांना केला. तेव्हा त्यासाठी खूप पैसे हवेत, असं नारकरांनी सांगितलं. त्यावर अतिशय चिवटपणानं त्या मुलांनी त्यांना विचारलं, समजा, आम्ही तुम्हाला पैसे जमवून दिले तर तुम्ही कराल का?’ यावर नारकरांनीही त्याला सहजपणे होकार दिला.
गावाहून हे कुटुंब अमेरिकेला परत गेले, पण मुलांच्या डोक्यातून हा विषय गेला नव्हता. त्यांनी डेव्हलपमेंट ऑफ रुरल महाराष्ट्र (www.dormindia.org) या नावानं एका एनजीओची स्थापना केली. स्वतः गाड्या धुणे, आइस्क्रीम विकणे अशी कामे करून त्यांनी निधी उभारलाच. शिवाय, आपले मित्रमंडळी, फेसबुकवरील फ्रेंड्स यांच्याकडूनही निधी जमा केला. किमान १ डॉलर ते कमाल ५ डॉलर अशा पद्धतीनं त्यांनी जवळ जवळ दोन लाख रुपयांचा निधी जमवला. सन २००८मध्ये राजापूर तालुक्यातल्या सोगमवाडीत त्यांनी एक विहीर खोदून दिली. आणि गेल्या महिन्यात (एप्रिल २०१३) पडवे- टुकरुलवाडी या टंचाईग्रस्त गावात एक विहीर बांधून देण्याचं काम या भावंडांनी केलं. त्यांच्या वडिलांनी या कामी त्यांना पूर्ण प्रोत्साहन दिलं आणि स्थानिक पातळीवर आवश्यक त्या मंजुरींची पूर्तता करवून घेण्यासाठी प्रयत्न केले. एका एनआरआय कुटुंबाच्या प्रयत्नांतून, सामाजिक बांधिलकीतून दोन गावांची तहान भागली.
या प्रकल्पाच्या यशामुळं आनंदित झालेल्या नारकर भावंडांनी आता तीव्र दुष्काळग्रस्त विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विहीरी खोदून देण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्धार केला आहे.
सुनील नारकर यांनी आपला व्याप सांभाळत मुलांच्या सामाजिक जाणिवेला ज्या पद्धतीनं जपलं आहे, ती अगदी स्पृहणीय अशीच आहे. पण इथं विहीर खोदण्यासाठी केवळ पैसे असून भागत नाही, तर अन्य शासकीय सोपस्कारही पार पाडावे लागतात. त्यासाठी स्थानिक पातळीवर कोणी पुढं आलं तर आपण त्यांना मदत करू, असं नारकर यांनी या मुलाखतीत सांगितलं. विदर्भ-मराठवाड्यातून अशा प्रकारे विहीरी खोदण्यासाठी निधीची मागणी करणारी सात ते आठ प्रपोजल आपल्याकडं आल्याचंही त्यांनी सांगितलं आणि त्या सर्वांना एकदम शक्य झालं नाही, तरी टप्प्याटप्प्यानं का असेना, न्याय देण्याची, मदत करण्याची आपली भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नारकर यांच्या सकारात्मक भूमिकेविषयी दुमत असण्याचं कारण नाही. पण त्यांची ही मुलाखत ऐकल्यानंतर, विशेषतः शेवटचं वाक्य ऐकल्यानंतर माझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं. एकीकडे दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून हजार कोटी, दोन हजार कोटींची पॅकेजेस जाहीर होत असताना, अखंड राज्यभरातून मदतीचा ओघ वाहात असताना गावपातळीवर नागरिकांचे टंचाईमुळं होणारे हाल थांबलेले नाहीत, त्यांना दिलासा मिळालेला नाही, असा अर्थ यातून काढायचा काय? शासन मदतीसाठी तत्पर असताना एनआरआय व्यक्तीकडं मदतीसाठी याचना करण्याची वेळ त्यांच्यावर का यावी? एकीकडं रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीबाबत कॅग ताशेरे ओढत असताना विहीर बांधून देण्याची ठोस हमी आणि खात्री नारकर कुटुंबियांकडून अधिक वाटते आहे का? तसं असेल तर ते कोणाचं अपयश?
दुसरी गोष्ट म्हणजे १९७२चा दुष्काळ पडला, तेव्हा आम्ही या भूतलावर आवतीर्ण झालेलो नव्हतो, पण वाडवडिलांच्या सांगण्यानुसार त्यावेळी राजा आणि रंक एकमेकांमधली सामाजिक दरी विसरून एकाचवेळी दुष्काळी कामांवर जात राहिले. आणि त्यावेळी झालेल्या या एकीमुळं आणि लोकशक्तीच्या संघटनामुळंच खऱ्या अर्थानं त्या दुष्काळावर मात करता आली. पण आता तशी परिस्थिती राहिली आहे का? कितीही दुष्काळ पडला तरी आज दुष्काळी कामं निघत नाहीत, निघाली तरी तिथं कोणी जात नाही. असं का होऊ लागलंय? कोणतीही आपत्ती, संकट कोसळलं तरी प्रत्येक गोष्टीसाठी सरसकट सरकारला जबाबदार धरण्यात येऊ लागलंय. सरकारनं पाहून घ्यावं, किंवा ती सरकारची जबाबदारी आहे’, इथंपासून ते सरकार काय झोपा काढतं आहे का?’ एवढं म्हणत रस्त्यावर उतरलं की तिथं आपली सामाजिक जबाबदारी संपते. पुढचं सरकारनं पाहून घ्यावं, अशी भावना जनमानसात खोलवर रुजली आहे किंवा रुजविण्यात येते आहे. सरकारकडं पाहण्याचा असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी असा आपला दृष्टीकोन बनला आहे. तो मुळातच चुकीचा आहे. मुळात सरकार म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नसून आपणच आहोत, ही गोष्टच आपण विसरून चाललो आहोत की काय, असं मला वाटू लागलं आहे. सरकारवर सारी जबाबदारी ढकलण्याच्या नादात आपल्याला आपल्या क्रयशक्तीचाच विसर पडू लागला आहे की काय, असाही दुसरा प्रश्न मला पडला आहे.
आज आपण विहीरीला निधी मिळावा म्हणून नारकरांकडं हात पसरतो आहोत. नारकरांनीही दिलदारपणानं हातचं न ठेवता मदतीची तयारी ठेवली आहे, प्रत्यक्ष कृतीतही उतरवलं आहे. पण मला असं वाटतं, समजा गावपातळीवर ग्रामस्थांनीच एकत्र येऊन श्रमदानातून विहीर खोदायची ठरवली, तर अशक्य आहे काय? नक्कीच नाही. पण अलीकडच्या काळात तसं क्वचितच घडताना दिसतं आहे. रोजगार हमी योजनांमध्ये बनावट लाभार्थी दाखवून भ्रष्टाचार होत असल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलंय. रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांची टक्केवारी एक तृतिअंशाहून (३०%) खाली आली आहे. याचं कारण काय? या दोन्ही गोष्टींना कारणीभूत आपणच आहोत. कारण हल्लीच्या काळात श्रमप्रतिष्ठेच्या मूल्याची खूपच घसरण होऊ लागली आहे. गावाकडंही उपलब्ध साधनसामग्रीमध्ये सोफिस्टिकेटेड म्हणजे थोडक्यात अंगाला काही लावून न घेता राहण्याची चैनीखोरी बळावू लागली आहे. राजकीय लाभापोटी त्यांच्या या सवयीला खतपाणी घालण्याचं कामही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होऊ लागलं आहे. त्यामुळं आपण मात्र आपल्या शक्तीची जाणीव विसरून जातो आहोत. हे भविष्याच्या दृष्टीनं खूप घातक आहे. यंदाचा दुष्काळ ही तर येणाऱ्या अतिगंभीर भविष्यकाळाची एक चुणूक आहे. पुढंपुढं असे गंभीर दुष्काळ येतच राहणार आहेत, पण त्यांना सामोरं जाण्याची, त्यांचा मुकाबला करण्याची आपली उपजत, नैसर्गिक प्रवृत्ती मात्र आपण हरवून बसणार आहोत. त्यातून ही तीव्रता अधिकच भासत राहणार आहे. त्यामुळं आपण वेळीच आपल्या क्षमतेची जाणीव कायम ठेवून जनसहभागातून अशा नैसर्गिक वा कृत्रिम संकटांचा सामर्थ्यानं मुकाबला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातून नारकरांसारख्या उदात्त भावनेनं मदत करणाऱ्या लोकांनाही हुरूप येईल आणि अशा हजारो नारकरांचे हात मदतीसाठी पुढं सरसावतील. तेव्हाच सुनील नारकर आणि त्यांच्या मुलांच्या कष्टाचं आपण खऱ्या अर्थानं चीज केल्यासारखं होईल.