शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

‘भारतीय’ बाबासाहेब



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षे जातिव्यवस्था आणि त्यायोगे येणाऱ्या विषमतेच्या गर्तेमध्ये रुतून पडलेल्या भारतीय समाजाला त्या गर्तेतून बाहेर काढले. वर्णाश्रमाधारित उच्चनीचता, त्यातून निर्माण झालेली आणि या समाजाच्या मनीमानसी खोलवर रुजलेली जातिव्यवस्था या साऱ्या बाबींना बुद्धीप्रामाण्यवादाच्या बळावर उद्ध्वस्त केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये या समाजाला प्रदान करीत असताना या समाजाला एक देश म्हणून संघटित करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले.
आजकाल भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा असं कंठरवानं ओरडून आपल्या माथी काही तरी गीत, संगीत, नृत्य मारलं जातं. परंतु मुळात भारतीय असं काही सन १९५०पर्यंत अस्तित्वात तरी होतं का, हा खरा प्रश्न आहे. आजचा भारत हा मूळचा होता तरी काय? विखुरलेली शेकडो संस्थाने, त्यातले काही मोठे राजे, तर काही छोटे. पण हा छोटे-मोठेपणा हा निव्वळ भौगोलिक विस्तार आणि संपत्तीवरच जोखला जात असे. त्यांच्या-त्यांच्यात झडलेल्या या अस्तित्वासाठीच्या झगड्यांनी आपला इतिहास व्यापून राहिला आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बौद्ध धम्मप्रसार, त्यानंतर सम्राट अशोकाचा साम्राज्य व धम्मविस्तार यातून काही अंशी या नकाशाला आकार येण्यास सुरवात झाली. त्यानंतरच्या काळात आधी मुस्लीम राज्यकर्ते आणि त्यानंतर ब्रिटीश यांनी आपल्या साम्राज्यविस्ताराच्या नादात जो काही भूप्रदेश आपल्या अखत्यारीत आणला, त्याला आधी हिंदुस्थानी सल्तनत आणि पुढे ब्रिटीश इंडिया असं संबोधण्यात आलं. म्हणजे परकीयांच्या साम्राज्यविस्तारातून आजच्या भारताचे पूर्वरुप खऱ्या अर्थाने आकाराला आले, असे म्हणता येईल. नाही म्हणायला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी मध्य भारतामध्ये स्वराज्य निर्माण करून एक मोठा भूप्रदेश आपल्या अखत्यारीत आणला. पहिल्या बाजीरावाने अटकेपर्यंत झेंडा फडकविला. पण, पुन्हा पुढे त्याची शकले झालीच. हा इतिहास फार फार तर मागच्या पाच-सात शतकांचाच अवघा... मग हे सारं भारतीयत्व आलं कोठून?
भारतीय उपखंड, हिंदुस्थानी सल्तनत, ब्रिटीश इंडिया या साऱ्या संबोधनातून साकारलेल्या भारताला खऱ्या अर्थानं भारत म्हणून संघटित करण्याचं महत्त्वाचं कार्य भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. या देशातील धर्म, जाती, वंश, भाषा, प्रांत, उच्चनीचता, गरीब-श्रीमंत अशा अनेक भेदांच्या भिंती भेदून साऱ्यांना लोकशाही व्यवस्थेच्या एकसमान प्रतलावर आणून ठेवण्याचं महान कार्य त्यांनी केलं. या देशाला, देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय ही ओळख प्राप्त झाली, ती केवळ बाबासाहेबांमुळेच. वुई... दि पीपल ऑफ इंडिया... ही एकता, एकात्मतेची, एकजिनसीपणाची भावना या भारतीय समाजात निर्माण करण्याचा ठोस प्रयत्न त्यांनी केला. एकमेकांपासून अत्यंत भिन्न असलेल्या एका व्यापक भौगोलिक पटावरील समाजाला एका समान सूत्रात, समान धाग्यात गुंफून अभिन्नत्व बिंबविण्याचे काम त्यांनी केले.
बाबासाहेब हे सच्चे राष्ट्रप्रेमी होते. त्यांनी देशभक्ती वादातीत होती, हे या भारतीय समाजाला कंठरवानं ओरडून सांगितलं तरी, आजही बाबासाहेबांकडे केवळ जातीच्या चष्म्यातून पाहून त्यांचं मोठेपण त्यांची जन्मजात काढून नाकारण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न सातत्यानं बिंबविण्याचे काम विविध पातळ्यांवर सुरू असते. बाबासाहेबांनी मुळात इतक्या विविध क्षेत्रांत, इतक्या विविध ठिकाणी कामच इतकं मोठं करून ठेवलं आहे की, त्यांना नाकारून अगर त्यांना ओलांडून आपल्याला पुढे जाता येत नाही. उच्चवर्णीय, उच्चजातीय मानसिकता खोलवर भिनलेल्या भारतीय समाजाची खरी समस्या ही आहे. आणि आजकाल प्रत्येक गोष्टीकडं, प्रत्येक महापुरूषाकडं जातीच्याच चष्म्यातून पाहायची सवय लागलेल्या नेत्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी त्यांना केवळ ज्या त्या जातीच्या अस्मितेच्या साखळदंडांत करकचून बांधून टाकले आहे. असे करताना या महान राष्ट्रपुरूषांना आपण जातीमध्ये बंदिस्त करून टाकतो आहोत, त्यांचे मोठेपण संकुचित करतो आहोत, याचे भान मात्र कोणालाच राहिलेले नाही. भारतीय समाजाचे खरे दुखणे हे आहे.
बाबासाहेबांनी विज्ञानवाद, विवेकवादाचा सातत्याने पुरस्कार केला. शिक्षण हाच प्रगतीचा मूलाधार आहे, असे मानून या देशातील बहिष्कृत समाजाला त्यांनी शिक्षणाची दीक्षा दिली. केवळ बहिष्कृतांच्या शिक्षणासाठीच त्यांनी प्रयत्न केले नाहीत, तर बहुजन आणि अभिजन संज्ञेखाली मोडणाऱ्या समाजालाही त्यांनी भारतातील जातिव्यवस्थेचे दुष्परिणाम पटवून देऊन ती ध्वस्त करण्यासाठी प्रेरित केले. त्यांना तसे काही साथीदारही मिळाले. धर्माच्या नावाखाली विषमतेचा पुरस्कार करणारी व्यवस्था त्यांनी नाकारली. जो धर्म माणसाला माणूस मानत नाही, पशूपेक्षाही हीन वागणूक देतो, तो धर्म कसा? असा प्रश्न या समाजासमोर उपस्थित करून धर्माच्या शुद्धीकरणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न चालविले. मात्र, एका क्षणी आपल्या दलित बांधवांना स्वीकारण्याची मानसिकता या धर्माच्या ठायी उत्पन्न होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र बाबासाहेबांनी अत्यंत जड अंतःकरणाने मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घनघोर प्रतिज्ञा केली. बाबासाहेब कितीही विज्ञानवादी असले तरी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील धर्माचे महत्त्व अगर स्थान त्यांनी नाकारले नव्हते. स्वतःच्या हिंदू धर्मातच राहून समानतेची वागणूक शूद्रातिशूद्रांना, दलितांना मिळावी, ही त्यांची अपेक्षा रास्त होती. पण, त्यांची ही अपेक्षा पूर्ण होत नाहीसे दिसल्यानंतरच त्यांनी नवा मार्ग स्वीकारण्याचे ठरविले. मात्र, १९३५ साली केलेल्या या घोषणेनंतर बाबासाहेबांनी लगेच आपला विचार अंमलात आणला नाही. या संदर्भातील त्यांचे चिंतन, विचारविमर्श सातत्याने सुरू राहिले, ते थेट १९५६पर्यंत. त्यांनी या भूमीतच जन्मलेल्या आणि जगाला सर्वप्रथम विज्ञानवादाची शिकवण देणाऱ्या भगवान बुद्धाच्या धम्माची निवड त्यासाठी केली, हे सुद्धा बाबासाहेबांचे भारतीय समाजावर थोर उपकार आहेत, ही बाब आपण कधी तरी समजून घेणार की नाही? बाबासाहेबांसमोर ख्रिस्ती, मुस्लीम आणि शीख या धर्मांच्या अक्षरशः ऑफर्स होत्या. मात्र, बाबासाहेबांनी या देशात पसरलेल्या एक षष्ठांश बहिष्कृत समाजाने कोणत्या दिशेने धर्मांतर केल्यास या देशाची एकता आणि अखंडता बाधित होणार नाही, याचाच साकल्याने सर्वप्रथम विचार केला. बाबासाहेबांनी त्यावेळी ख्रिस्ती, मुस्लीम अगर शीख धर्म स्वीकारला असता, तर भारताला आज किती मोठ्या अराजकाला सामोरे जावे लागले असते, हे आजची परिस्थिती अवलोकनी घेतली तरी लक्षात येते. मिशनरी स्वरुपाचे हे धर्म वाईट आहेत, अशातला भाग नाही. माणसाच्या जीवनाच्या आचारसंहितेला दिशा देणारा, मर्यादशील राखणारा कोणताही धर्म, त्याची शिकवण वाईट नसतेच कधी. मात्र, तो धर्म शिकविणारे, त्यांचे अनुयायी धर्माच्या वाटचालीची दिशा अधोरेखित करीत असतात. या पार्श्वभूमीवर, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता, तर या देशाची वाटचाल ख्रिश्चन राष्ट्र होण्याकडे झाली असती. मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर आणखी एका देशांतर्गत पाकिस्तानच्या निर्मितीला ते कारणीभूत ठरले असते. शीख धर्म स्वीकारला असता तर खलिस्तानी चळवळीला किती बळ मिळाले असते, याचा विचारच करवत नाही! त्यामुळे बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारून भारतीय समाजाचे अखंडत्व टिकविले आहे. म्हणूनच भारतीय समाजावर त्यांचे थोर उपकार आहेत, असे मी म्हणतो.
बाबासाहेबांनी राज्यघटनेची निर्मिती करीत असताना येथील प्रत्येक नागरिक त्या घटनेच्या मध्यवर्ती ठेवून तिची रचना केली. या देशातील प्रत्येक व्यक्तीला एक समान मूल्य प्रदान करण्याचे महत्कार्य त्यांनी केले. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य ही एक महत्त्वाची देणगी त्यांनी भारतीय समाजाला दिली. जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, वंश, प्रांत आदी कोणत्याही भेदाशिवाय लोकशाहीच्या व्यापक पटावर प्रत्येक भारतीय स्त्री-पुरूषाचे सममूल्य अधोरेखित करण्याचे कार्य त्यांनी केले.
बाबासाहेबांनी या देशात सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ बळकट केली नसती, तर या देशाच्या राजकीय स्वातंत्र्याला कवडीचेही मोल प्राप्त झाले नसते, याची जाणीव भारतीय समाजाला नव्याने करून देण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. पारतंत्र्याच्या हजारो वर्षांच्या झळा सोसून भारतीय समाजाने स्वातंत्र्याचे मोल जाणलेले आहे. ते स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून चिरकाल अबाधित राखण्याची पराकाष्ठा बाबासाहेबांनी केलेली आहे. राज्यघटनेला स्वातंत्र्य, समता व बंधुता या नैसर्गिक, मानवी मूल्यांचे अधिष्ठान देऊन त्या पायावर भारत या एकसंध राष्ट्राची उभारणी त्यांनी केलेली आहे. मात्र, आज या समाजात पुन्हा विषमतेची बीजे, परस्परांबद्दल असूया आणि अविश्वास पेरून घटनाविरोधी कारवायांना बळ देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. जातीय, प्रांतिक, भाषिक अस्मिता टोकदार करून वादांना खतपाणी घातले जात आहे. भारतीय ही ओळख बाजूला ठेवून इथे प्रत्येक जण कोणत्या तरी भाषेची, जातीची, धर्माची, प्रांताची पताका घेऊन आपापल्या दिंड्या काढू लागला आहे. त्यासाठी त्यांना प्रेरित केले जाऊ लागले आहे. भारतीय प्रजासत्ताक आणि भारतीय स्वातंत्र्य या दोहोंसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्या दृष्टीने वेळीच सावध होण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. अन्यथा, भारतात राहणाऱ्यांची नव्हे, तर भारत सोडून परदेशात राहणाऱ्यांचीच ओळख केवळ भारतीय अशी राहील. तशी वेळ येऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे.

गुरुवार, १२ एप्रिल, २०१८

बाबासाहेबांची प्रस्तुतता



(येत्या १४ एप्रिल २०१८ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती साजरी करण्यात येत आहे. त्या निमित्ताने विशेष लेख...)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. भीमराव रामजी तथा बी.आर. आंबेडकर यांना सारा देश बाबासाहेब म्हणून ओळखतो, त्यांच्याशी आपुलकीचं नातं जोडतो. ज्यांना ती ओढ वाटत नाही, ते सुद्धा त्यांचे ईप्सित साध्य करण्यासाठी बाबासाहेबांशी जवळीक साधू पाहतात; ती जवळीक आपण साधतो आहोत, हे दर्शविण्याची अहमहमिका अशा दांभिकांत लागलेली असते. मात्र, या दांभिकांच्या तुलनेत बाबासाहेबांवर ओसंडून प्रेम करणाऱ्या जनतेची संख्या मात्र लक्षणीय. ही जनता महत्त्वाची व्होटबँक असल्यानं त्यांचं लांगुलचालन करणं, ही काहींची अपरिहार्यता बनलेली असते आणि त्या अपरिहार्यतेचा मार्ग बाबासाहेबांच्या नावापासून सुरू होतो.
अलीकडच्या काळात बहुतांश भारतीय समाजाला एक जाणीव होऊ लागली आहे, ती म्हणजे बाबासाहेबांना केवळ दलितांचे नेते ठरविणे अगर केवळ राज्यघटनेच्या शिल्पकारितेपुरतेच मर्यादित राखणे, हा इतिहासाने आणि वर्तमानाने त्यांच्यावर केलेला मोठा अन्याय आहे. नेत्यांच्या या संकोचीकरणाला सर्वप्रथम कारणीभूत ठरतात, ती म्हणजे आपली क्रमिक पुस्तके होय. या पुस्तकांतून महापुरूषांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देणे हा प्रधान हेतू असला तरी, त्यांच्या प्रतिमा एखाद्या विशेषणानं पार संकुचित करून टाकल्या जातात. त्यापासून बाबासाहेबांची तर सुटका नाहीच; पण, महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आदीही सुटलेले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. त्यानंतर मग पुढच्या काळात जातीय राजकारणाच्या टोकदार अस्मितांचे इतके उदात्तीकरण केले जाते की, त्यापोटी या महापुरूषांना जातीच्या चौकटीतच करकचून बांधून टाकले जाते. एकदा का त्यांच्याकडे पाहण्याचा आणि अनुसरण्याचा दृष्टीकोनच संकुचित करून टाकला की, मग आमच्या नेत्यावर हक्क केवळ आमचाच; तुमच्या नेत्याशी आमचा काय संबंध?’ अशा प्रकारच्या भावनांतून या महापुरूषांना त्यांचे अनुयायीच सर्वप्रथम संकुचित करून त्यांचे विचार आणि कार्य यांना संपविण्याच्या कामाला हातभार लावायला सुरवात करतात. याच्या पुढची पायरी असते, ती म्हणजे दैवतीकरणाची! एखाद्या व्यक्तीला इतक्या महानपणाच्या बुरूजावर चढवून ठेवायचे की, त्याच्या कार्याची, विचारांची चिकित्सा केलेली सुद्धा खपवून घेतली जात नाही. सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे यामध्ये आघाडीवर आहेत. त्यांचे पुतळे आणि स्मारके उभारून अनुयायांना त्याच दांभिक अस्मितांच्या घेऱ्यात गुरफटून टाकले जाते. मुंबईत फिरोझशहा मेहता यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव समोर आला असताना त्यावर पुतळे, मूर्ती आदी स्मारक म्हणून उभारण्यापेक्षा त्यांच्या स्मरणार्थ उत्तम ग्रंथालये, वाचनालये उभारा, अशी सूचना बाबासाहेबांनी केलेली होती. ज्ञानसंपादन आणि ज्ञानप्रसार या कामी ग्रंथालयांचे महत्त्व बाबासाहेबांनी जाणले होते. म्हणून तशी सूचना ते करू शकले. ग्रंथालयांच्या माध्यमातून पुढच्या पिढ्यान् पिढ्या घडत राहतील, असा त्यांना विश्वास होता. पण, आजकाल आपल्या अस्मिता भौतिक बाबींवर अधिक केंद्रिभूत झालेल्या आहेत. ज्ञानासारख्या अभौतिक पण चिरंतन बाबीपासून तात्कालिक लाभ मिळविता येणे अशक्य असते. पण, स्मारक, पुतळे यांच्याभोवती तथाकथित अस्मितांचे केंद्रीकरण करून त्याचा लाभ तत्परतेने उठविता येणे सहजशक्य असते. ज्या लोकांनी हयातभर विभूतीपूजेच्या विरोधात काम केले, त्यांच्या अनुयायांनाच विभूतीपुजेला प्रेरित करून त्यांच्या वंदनीय नेत्याबद्दल आपल्या मनातील ममत्व मोठ्या कौशल्याने त्यांच्या मनावर बिंबविले जाते. या विभूतीपुजेमध्ये एक बरे असते, उदबत्त्या, मेणबत्त्या पेटवून नमस्कार केला की, बाकी काही करण्याची गरज उरत नाही. यातून प्रेमाचे, आदराचे प्रदर्शनही होते आणि तथाकथित अस्मिताही जपली जाते. ही विभूतीपूजा नाकारायची म्हटले तर दोन गोष्टी कराव्या लागत असतात. पहिली म्हणजे या विभूतीपूजेसाठी नादावलेल्या लोकांच्या विरोधात तुम्हाला आवाज उठवावा लागत असतो आणि दुसरी म्हणजे त्या नेत्याच्या विचारांचा, प्रबोधनाचा जागर घालावा लागत असतो; जी दीर्घकालीन, दूरगामी पण हमखास परिणाकारक प्रक्रिया आहे. पण, पहिल्या गोष्टीसाठी बहुसंख्य अनुयायांसमोर आपला आवाज क्षीण पडतो आणि दुसऱ्यासाठी चिकित्सक अभ्यासाची नितांत गरज असते. आजकाल अशा दुसऱ्या पद्धतीच्या नेतृत्वाची, चिंतनशील कार्यकर्त्यांच्या फळीची चळवळीला मोठ्या प्रमाणात आवश्यकता निर्माण झाली आहे.
पण... नेमकी इथेही मोठी गोची करून ठेवण्यात आली आहे. भांडवलशाहीच्या बाजारपेठीय चक्रव्यूहात आज समस्त समाज हा केवळ ग्राहक मात्र बनून राहिलेला आहे. या भोवतालात, भांडवलदारांच्या जाहिरातींच्या भडिमारात या ग्राहकाला सर्व प्रकारच्या क्रय-विक्रयाचे अधिकार (?) आहेत, पण त्यासाठी या बाजारपेठीय व्यवस्थेची एकच पूर्वअट असते, ती म्हणजे ग्राहकाने आपले डोके अजिबात चालवायचे नाही. त्याने त्याचे डोके (न वापरता) सांभाळले की, बाकी सारे काही या व्यवस्थेमध्ये सांभाळून घेतले जाते. असा नागरिक या नव-भांडवलदारी व्यवस्थेत अत्यंत सुजाण गणला जातो. डोके वापरणारा, विचार करणारा ग्राहक मात्र या व्यवस्थेसाठी अत्यंत घातक, धोकादायक असतो. त्यामुळे अशा विचार करणाऱ्या, विचार देणाऱ्या अल्पसंख्य डोक्यांचा सद्यस्थितीत धोका नसला तरी, दूरगामी धोका ओळखून त्यांचा बंदोबस्त करण्याकडे या व्यवस्थेचा कल असतो. अशा व्यवस्थेपुढे अनुयायांनी शरणागत होणे, हे कोणत्याही चळवळीला परवडणारे नसते. आज देशात अशा डोके वर काढणाऱ्या चळवळींचे स्वरुप एखाद्या वळवळीपलीकडे जात नाही. माध्यमांतून त्यांचा आवाज मोठा केला जात असला तरी, पुन्हा त्यांनी उपस्थित केलेल्या सामाजिक-आर्थिक मुद्यांपेक्षा त्यातील राजकारणाचे उदात्तीकरण करून ते सादर करण्याकडे मोठा कल झुकू लागतो. त्यातून त्या आरोप-प्रत्यारोपात चळवळीचा मूळ हेतू मागे पडतो आणि आपोआपच तिचा दबावही कमी होतो. व्यवस्थेवर दबाव निर्माण होण्यापूर्वीच त्यातील हवा काढून घेण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जातात. कार्यकर्ते पुन्हा कोशात जातात. आजच्या भोवतालात असे चळवळींनी सातत्याने कोशात जाणे भारतीय समाजाच्या दृष्टीने हितावह नाही, परवडणारे नाही.
नेमकी याच वेळी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार व कार्याचे स्मरण करून कृती करण्याची गरज नव्याने अधोरेखित होते आहे. या तिघांचे नाव एकमेकांपासून भिन्न किंवा वेगळे करता येणारे नाही. कारण ही केवळ तीन व्यक्तींची नावे नाहीत, तर या देशात सामाजिक समतेचे वादळ निर्माण करणारी एक अखंड प्रवाहित झालेली ती विचारधारा आहे. या विचारधारेची सुरवात महात्मा फुले यांच्या कृतीशील सामाजिक, शैक्षणिक कार्यापासून होते. राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा फुले यांची ही कृतीशीलता अधिक गतिमान करीत असताना आपल्या संस्थानासह बाहेरील प्रांतातही सुरू असलेल्या शैक्षणिक, सामाजिक सुधारणांच्या कार्याला बळ देण्याचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील सामाजिक कार्याचे स्फुल्लिंग फुंकर घालून अधिक चेतवण्याचे मोठे कार्य राजर्षींनी केले. राजर्षींच्या या विश्वासाला सार्थ करीत असताना भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता व बंधुता या मानवी मूल्यांची प्रस्थापना राज्यघटनेच्या माध्यमातून करण्याचे महत्कार्य बाबासाहेबांनी साध्य केले. भारताला एक देश म्हणून खऱ्या अर्थाने संघटित करीत असताना या राज्यघटनेच्या छत्राखालील प्रत्येक नागरिकाला भारतीय ही ओळख प्रदान करण्याचे काम बाबासाहेबांनी केले, ही बाब येथे लक्षात घ्यायला हवी.
विषमताधिष्ठित शोषण परंपरा असलेल्या भारतीय समाजाला लोकशाहीच्या व्यासपीठावर आणून एक व्यक्ती, एक मत अशी समता बाबासाहेबांनी प्रदान केली खरी, तथापि, अद्याप एक व्यक्ती, एक मूल्य हा प्रवास आपल्याला पूर्ण करावयाचा आहे. भारतीयांच्या मनीमानसी उच्चनीचतेची बीजे खूप खोलवर रुजलेली आहेत. त्यांना खतपाणी घालून एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्यासाठी प्रेरित केले जाते. त्यांच्या या दांभिक अस्मितांना धुमारे फोडून धुमसत ठेवण्यामध्ये अनेकांचे अनेक प्रकारचे स्वार्थ दडलेले असतात. पण, खोट्या प्रतिष्ठेपायी त्या स्वार्थांकडे दुर्लक्ष करून आपल्यापेक्षा खालच्याला तुडविण्याचे काम करण्याकडे कल वाढू लागतो. खालच्याला हात देऊन वर उचलण्याचे समतेचे महत्त्वाचे तत्त्व या क्षणी पायदळी तुडविले जात असते, याचे स्वाभाविक भान सुटणे हे प्रगल्भ समाजाचे लक्षण नव्हे. या सामाजिक जाणीवांची रुजवात शंभर वर्षांपूर्वी जितक्या प्रगल्भतेने केली जात होती, त्या विचारांची स्वीकारार्हता शंभर वर्षांनंतरही आपल्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही, हे चांगले नव्हे. उलट, आपल्या मानसिक, सामाजिक अधोगतीचे ते द्योतक होय. या अधोगतीतून आपण एक राष्ट्र म्हणून कधीही एकदिलाने, खांद्याला खांदा लावून उभे राहू शकत नाही. विषमतेच्या पायावर कधीही समतेच्या मूल्यांची उभारणी होऊ शकत नाही, ही सहज स्वाभाविक बाब जोपर्यंत आपण लक्षात घेणार नाही, तोपर्यंत फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची प्रस्तुतता कमी होणार नाही. उलट, भारतीय समाजाला अधिक प्रकर्षाने त्यांची गरज भासत राहणार आहे.

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

कृतीशील सामाजिक विकासक महात्मा फुले





(दि. ११ एप्रिल १८२७ रोजी महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांचा जन्म झाला. उद्या त्यांची १९१वी जयंती साजरी होते आहे. त्या निमित्ताने फुले दांपत्याच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण.)

महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे दांपत्य म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातलं एक अत्यंत अलौकिक असं दांपत्य आहे. सुमारे १६० वर्षांपूर्वी त्यांनी समतेची, स्त्री-पुरूष समानतेची आणि सामाजिक न्यायाची जी चळवळ उभारली तिला महाराष्ट्राच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात तोड नाही. विद्येविना दलित-बहुजनांची, स्त्रियांची प्रगती शक्य नाही, ही बाब लक्षात घेऊन या दांपत्यानं शिक्षणाच्या प्रसारासाठी आपलं आयुष्य वेचलं. 
सन १८५४-५५ मध्ये मुलींसाठी पहिली एतद्देशीय शाळा स्थापन करून त्यांनी देशाच्याच शैक्षणिक चळवळीचा प्रारंभ केला. महात्मा फुले यांनी हा ज्ञानयज्ञ आरंभला, त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं २१ वर्षांचं, तर सावित्रीबाईंचं होतं केवळ १८ वर्षं. घर सोडावं लागलं, प्रतिगाम्यांनी अंगावर चिखल टाकला, अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागल्या तरी हाती घेतलेल्या व्रतापासून तसूभरही ढळता या दांपत्यानं आपलं कार्य अखंड चालवलं. त्या काळात विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर महात्मा फुले यांनी भर दिला.
शाळांतून विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी सुद्धा त्यांनी काही उपाय अंमलात आणले होते. गरीबी आणि शिक्षणात रस नसणे ही दोन प्रमुख कारणे या गळतीमागे असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानं विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता देण्याची योजना फुल्यांनी त्या काळात सुरू केली होती. त्याचप्रमाणं विद्यार्थ्यांना शिकण्यात गोडी वाटेल, अशा विषयांचा त्यांनी अभ्यासक्रमात समावेश केला. दलित आणि बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणात रस वाटावा, यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. पालकांच्या प्रबोधनाची मोहीमही त्यांनी हाती घेतली होती.
शिक्षणाखेरीज अन्य सामाजिक कार्यासाठी महात्मा फुले यांनी १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सावित्रीबाईंच्या साथीनं त्यांनी पुरोहितविरहित, हुंडाविरहित अल्पखर्चातील विवाह घडवून आणण्याचं विधायक कार्य आरंभलं. हजारो वर्षांच्या प्रथा-परंपरेला छेद देण्याचं मोठं काम यातून घडलं. आजची `रजिस्टर्ड मॅरेजेस` तरी याहून कुठं वेगळी असतात?
आपल्या गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड या पुस्तकांच्या माध्यमातून फुले यांनी अनेक समकालीन प्रश्नांचा, समस्यांचा इतका सूक्ष्मपणे वेध घेतला आहे आणि उपाय सुचविले आहेत की, आजच्या काळातील समस्यांवरही त्यांचे उपाय लागू पडतात. महात्मा फुले यांनी सांगितलेले `त्रि-भाषा सूत्र` तर आजसुद्धा आपल्या संपूर्ण देशात लागू असलेले दिसते.
महात्मा फुले यांचे व्यक्तिमत्त्व केवळ एक समाजसुधारकाचेच नव्हते, तर अत्यंत बहुआयामी स्वरुपाचे होते. पुणे कमर्शियल ॲन्ड कॉन्ट्रक्टिंग कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक होते. कॉन्ट्रक्टर म्हणून खडकवासला धरण, पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज बोगदा, पुणे-नगर रस्त्यावरील बंडगार्डन पूल अशी कामं त्यांच्या नावावर जमा आहेत.
सन १८७६ ते १८८२ या सहा वर्षांच्या कालावधीत पुणे शहराचे कमिशनर म्हणून काम करत असताना महात्मा फुले यांनी शहरातील अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, शाळा आदींविषयक समस्या दूर करण्यावर भर दिला.
महात्मा फुले यांना शेअर मार्केटचंही उत्तम ज्ञान होतं. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये सहभागी व्हावं, असं त्यांना वाटे. त्यामुळंच शेअर मार्केटमध्ये व्यवहार कसा करावा, याविषयीही त्यांनी आपल्या अखंडांतून मार्गदर्शन केल्याचं आपल्याला दिसतं.
एकूणच शाळांतून विद्यार्थी गळती, तंत्रशिक्षणाचं महत्त्व, महिला सक्षमीकरण, सिंचन सुविधा, जल व्यवस्थापन, सर्वांना सक्तीचं आणि हक्काचं शिक्षण अशा ज्या अनेक गोष्टी अंमलात आणण्यासाठी आज आपण धडपडतो आहोत, त्या फुले दांपत्यानं सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच कृतीत आणल्या होत्या, ही गोष्ट लक्षात घेतली तरी त्यांच्या क्रांतिकारक दूरदृष्टीचा प्रत्यय आपल्याला येतो. महात्मा फुले केवळ समाजसुधारकच नव्हते, तर पायाभूत सुविधांचेही कृतीशील विकासक होते, हीच बाब उपरोक्त गोष्टींवरून अधोरेखित होते.

संदर्भ:
१.      महात्मा फुले समग्र वाङ्मय: (संपा.) कीर धनंजय, मालशे सं.ग., फडके य.दि., महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई (सुधारित, सहावी आवृत्ती), नोव्हेंबर २००६
२.      प्रा. हरी नरके यांच्याशी वेळोवेळी झालेली चर्चा.