मंगळवार, २१ मार्च, २०२३

नितळ-६: कुछ तो लोग कहेंगे...!

 


('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेमधील पुढील भाग माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

माणूस हा समाजशील प्राणी खराच; पण, त्याच्यामध्ये ही समाजशीलता इतकी भिनलेली आहे की त्याच्या प्रत्येक कृतीवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजाची प्रेरणा अथवा दबाव असतो. गंमतीचा भाग म्हणजे कृतीवर जसा हा प्रभाव असतो, तसाच किंवा त्यापेक्षाही अधिक एखादी कृती न करण्यामागे असतो. म्हणजे पाहा ना, एखादी साध्यात साधी कृती करण्याचा विचार जरी आपल्या मनात आला, तरी त्याच वेळेला लोक काय म्हणतील?’ हा विचार आपल्या मनी ठाकतो. आणि शेकडा ९९ वेळा आपण मनात आलेला कृतीशील विचार कोणत्याही कृतीविना पाठीवर टाकून रिकामे होतो. कदाचित एक चांगलं काम आपल्या हातून होता होता मागं पडतं किंवा राहूनही जातं. लोकांनी काही म्हणू नये, या दृष्टीनं आपलं जीवनाचं रहाटगाडगं मग आपण फिरवित राहतो.

सौरऊर्जेच्या प्रचारासाठी दशकभराच्या भारतभ्रमण यात्रेवर असलेल्या चेतन सोळंकी यांची अलिकडेच भेट घेतली. ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टीनं त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये सध्या सुरू असलेली उर्जेची अनाठायी उधळण आणि बचत करण्यासाठी छोटे-छोटे उपाय त्यांनी सुचविले. बोलता बोलता ते म्हणाले की, आपण प्रत्येकाने घरगुती पातळीवर कपड्यांना इस्त्री न करता ते वापरले तरी आपण खूप बचत करू शकतो कारण इस्त्री जवळपास १००० वॅट वीज खाते. त्यांनी रेफ्रिजरेटर, गीझर वगैरे साधनांचाही वापर सहज टाळता येऊ शकतो, हे सांगितलं. यातल्या फ्रीज, गीझर यांसाठी कौटुंबिक संमती मिळवणं तत्काळ शक्य नव्हतं; मात्र, व्यक्तीगत स्तरावर स्वतः इस्त्री न केलेले कपडे वापरणं सहजशक्य आहे. म्हणून मी तिथून सुरवात करण्याचा निर्णय घेतला. अगदी शाळेत असतानाही स्वच्छ धुतलेला युनिफॉर्म कुठे दर वेळी इस्त्री केला जात होता? धुतलेला ड्रेस रात्री छान घडी घालून उशाखाली किंवा अंथरूणाखाली ठेवला की सकाळी कडक नसली तरी चांगली दिसेल अशी इस्त्री झालेली असे. त्यामुळे मी धुतलेला शर्ट इस्त्री न करता चढवला अंगावर बाहेर पडताना. त्यावेळी बायकोचा पहिला प्रश्न हाच होता की, लोक काय म्हणतील?’ मी उत्तरलो, कोणी काही म्हणणार नाही, पण म्हणालं तर मी सांगेन ना!’ यावर तिचा तिरपा कटाक्ष पाठीवर घेऊन मी घरातून बाहेर पडलो.

पाहा ना, एक साधारण कृती, जिच्यामुळं कोणाला कसलाही त्रास होणार नाही की अन्य कोणाचंही जीवन कोणत्याही प्रकारे प्रभावित होण्याचं कारण नाही, अशा वेळीही जर लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाचा सामना करावा लागत असेल, तर लाखो, कोट्यवधी लोकांचं जीवन प्रभावित करण्यासाठी हयात वेचणाऱ्या लोकांना किती वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागत असेल? आधी व्यक्तीगत स्तरावर विचार आणि स्वीकार, यानंतर पुढे कुटुंब, नातेवाईक, स्थानिक भोवताल आणि त्यानंतर मग इतर समाजघटक असा त्या विचाराचा विस्तार व स्वीकार वाढविण्यासाठी कोण झगडा समाजप्रवर्तकांना, प्रबोधकांना करावा लागत असेल, याचा आपण कधी विचारच करीत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बडोद्याच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे इंग्लंडमधील विद्याभ्यास अर्धवट सोडून भारतात परतले. उरलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी परत जायचे म्हणून त्यांनी अनेक प्रकारची कामे केली. शिकवण्या घेतल्या, गुंतवणूक सल्लागार म्हणून काम केले,शेवटी सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून तात्पुरती नोकरी स्वीकारली. या समग्र काळामध्ये ते प्रचंड काटकसर करून पै न पै साठवित होते. यामध्ये माता रमाबाईंना ते अतिशय नेमकी रक्कम दरमहा खर्चाला देत. अगदी काडेपेटीच्या प्रत्येक काडीचाही हिशोब त्यात असे. बाबासाहेब परदेशी असतानाही या माऊलीने कोणतीही तक्रार न करता लोकांच्या घरची कामे करून आपला निर्वाह चालविला. आणि बाबासाहेब उच्चशिक्षित होऊन परतले, आता तरी आपल्यामागचे शुक्लकाष्ठ संपेल, या आशेवर असणाऱ्या रमाबाईंचे सांसारिक कष्ट कमी झाले नाहीत. उलट ही काटकसर करावी लागली. मात्र, त्यांनी बाबासाहेबांच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी हे कष्ट विनातक्रार सोसले. एवढ्या प्रकांडपंडिताची बायको, पणलोक काय म्हणतील?’ म्हणून त्यांनी कष्टत्याग केला नाही. उलट आरोग्याच्या अनेकविध तक्रारी असूनही अजिबात कुरकूर न करता त्यांनी साऱ्या झळा सोसल्या, म्हणूनच बाबासाहेबांच्या उत्कर्षामध्ये आणि असामान्यत्वामध्ये रमाबाईंच्या साधेपणाचा, सामान्यत्वाचा वाटा जगन्मान्य ठरला. महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई यांचा संघर्ष तर लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाला अजिबातच थारा न देण्यामध्ये आणि त्या पलिकडला आहे.

राजर्षी शाहू महाराजांचाही इथे दाखला देता येईल. राजर्षींनी ज्या कालखंडात त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीला हात घातला, प्रतिगामित्व ठासून भरलेल्या त्या काळात समाजमानसावर रुढी, परंपरांचा पगडा मोठा होता. राजर्षींनी स्वतःपुरत्या साऱ्या भेदभावांना तिलांजली दिलेली होती. त्यांनी आपल्या धार्मिकतेला तिलांजली दिलेली नव्हती, पण कोणताही धर्म विषमतेला थारा देत नाही, याविषयी त्यांची धारणा पक्की होती. आणि माणसा-माणसांत भेद मानणं, हा अधर्म आहे, याविषयी तर त्यांची खात्रीच होती. मात्र, ही मानसिकता राजघराण्यातल्या सर्वांचीच असेल, असे कसे म्हणता येईल? आपण केवळ या अंगाने विचार केला, तरी डोक्याला मुंग्या येतील की राजर्षींना मग त्या स्तरावर किती टोकाचा संघर्ष करावा लागला असेल. जितके मोठे कार्य तितका हा झगडा मोठाच. मात्र, त्यावरही मात करून अथवा घरचे काय म्हणतील?’ वा लोक काय म्हणतील?’ याची फारशी फिकीर न करता महाराजांनी आपलं सामाजिक कार्य जोमानं सुरूच ठेवलं आणि एक राजा म्हणून ते लोकांच्या गळीही उतरवलं. म्हणून तर ते 'लोकराजा' उपाधीला पात्र ठरले.

म्हणजे एखादं व्यापक, समाजहितैषि कार्य हाती घ्यायचं, तर झगडा मोठा आहेच. पण, छोट्या-छोट्या प्रभावहीन बाबींसाठी सुद्धा लोक काय म्हणतील?’ हा अडथळा ओलांडणं अथवा झुगारून पुढं जाणं, ही फार महत्त्वाची, कसोटीची पहिली पायरी आहे. मुळात आपण आपल्या सामान्यत्वाच्या कक्षांमधून बाहेर पडून थोड्याफार तरी असामान्यत्वाच्या दिशेनं जाणार की नाही, याचा निर्णय, या प्रश्नाचं तुम्ही काय काय उत्तर देता, यावरच अवलंबून असतं. बापलेक आणि गाढवाची गोष्ट आपणा सर्वांना माहिती असूनही अकारण या प्रश्नाच्या बेड्या आपल्या पायबंद बनून राहणार असतील, तर आपण आपल्या सामान्यत्वाच्या कक्षेतून कधी बाहेरच पडणार नाही. लोगों का काम है कहना...यारों, समझो!


मंगळवार, १४ मार्च, २०२३

नितळ-५: ‘डि-कास्ट’ व्हावं कसं?


('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेतील पुढील भाग माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)

अमेरिकेतील सिएटल प्रांतात नुकताच जातीच्या आधारावर कोणत्याही भेदभावाला प्रतिबंध करणारा कायदा अस्तित्वात आला. जी अमेरिका आजपावेतो केवळ रंग वा वर्ण आणि वंश या दोनच आधारांवरील भेदभावासाठी ओळखली जात होती, तिथं आता जातही ठळकपणे अधोरेखित झाली आहे. ही जात आणि तिच्या अनुषंगाने येणारा भेदभाव हा स्वाभाविकपणाने दक्षिण आशिया आणि प्रामुख्याने भारतामधून तिथे गेला आहे, हे स्पष्ट आहे. भारतीय मागासवर्गीय समाजातील तरुणांची हा कायदा आणण्यामध्ये आणि त्याची गरज पटवून देण्यामध्ये कळीची भूमिका राहिली आहे.

इथे विचार करण्यासारखा प्रमुख मुद्दा असा आहे की, अत्यंत आधुनिक अशा माहिती तंत्रज्ञानाच्या आणि फायनान्ससारख्या क्षेत्रात काम करण्यासाठी आधुनिक युवा भारतीय अमेरिकेच्या सिलीकॉन व्हॅलीमध्ये मोठ्या संख्येने गेले आहेत. त्यांची एक पिढी या आधुनिकतेसाठी तिथे आता खपली आहे, ज्यातून जागतिक माहिती तंत्रज्ञान युग साकार झाले. त्यामध्ये भारतातील अनुसूचित जाती-जमातीमधील युवा वर्गही त्यांना आरक्षणामुळे प्राप्त झालेल्या शिक्षणाच्या संधी आणि त्यांची गुणवत्ता या बळावर येथपर्यंत पोहोचला. मात्र, ज्या अमेरिकेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य व समता या लोकशाही मूल्यांचा साक्षात्कार झाला, त्या अमेरिकेच्या भूमीवरही भारतीय नागरिक त्यांची जातवर्चस्ववादी भावना घेऊन वावरत आहेत आणि तेथेही त्यांनी आपल्या जातीय भेदभावाचे रंग पसरविले आहेत, ज्याचा फटका या मागासवर्गातून पुढे गेलेल्या युवा पिढीला बसला आहे. म्हणूनच अमेरिकेतील एका प्रांताला आता या जातीय भेदभावाच्या विरोधात कायदा करावा लागला आहे, हे स्पष्टच आहे. इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानामुळे जग हे एक खेडे झाले आहे, हे विधान आतापर्यंत जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये सकारात्मक पद्धतीने घेतले जात होते. पण, आता या ग्लोबल खेड्याने भारतीय खेड्यांमधील धार्मिक-जातीय भेदभावाची भावनाही आत्मसात केली आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.

अमेरिकेमधील या चित्राची मीमांसा करीत असताना आपण आपल्या गिरहबानमध्येही डोकावून पाहायला हरकत नसावी. आरक्षणाच्या धोरणाची चिकित्सा करीत असताना आता वरिष्ठ वर्ण अथवा जातींतील नागरिक इतके निष्ठूर होऊ पाहात आहेत की, संबंधित अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी आदी बांधवांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय प्रगतीसाठी आरक्षणाची अद्याप गरज आहे, ही बाब लक्षात न घेता जणू काही हे आरक्षण वरिष्ठ, अभिजन, प्रगत वर्गाच्या मुळावर उठले आहे, अशा प्रकारची वातावरणनिर्मिती करून काही घटक येथील समाजस्वास्थ्याला धोका पोहोचवू पाहात आहेत. भारतीय राज्यघटनाकारांनी मोठ्या विचारांती आरक्षणाचे तत्त्व स्वीकारले आहे. त्यामध्ये लवचिकताही ठेवली आहे. मात्र, मनाला वेदना तेव्हा होते, जेव्हा एखादा विद्यार्थी मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देऊ नये, असे धडधडीत निवेदन शासकीय व्यवस्थेतील अधिकाऱ्यांना देतो आणि ते अधिकारीही अशी निवेदने कॅमेऱ्याकडे तोंड करून हसतमुखाने स्वीकारतात. एखाद्या मागासवर्गीयाने गुणवत्तेच्या बळावर खुल्या गटातून एखादी जागा मिळविली, तर जणू आमची जागा याने गिळंकृत केली, अशा गुन्हेगाराच्या भावनेने त्याच्याकडे पाहिले जाते. ही बाब तर चुकीचीच आहे, मात्र, एखाद्या खुल्या जागेसाठी गुणवत्तेच्या बळावर पात्र असणाऱ्या मागासवर्गीयाला केवळ त्याच्या जातीय आरक्षणामुळे संधी नाकारली जाणे, हे तर त्याहूनही वाईट आहे. खुला वर्ग हा सर्वांसाठी खुला आहे, या तत्त्वाला येथे हरताळ फासला जातो. मुळात आरक्षणातून बाहेर पडण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे, हे व्यवस्थेतील आणि समाजातील विविध घटक लक्षात घेणार नाहीत, तोपर्यंत आपण या जातमानसिकतेमधून बाहेर पडणार नाही. अनुसूचित जाती-जमातीतील एका पिढीने आरक्षण घेऊन आपला शैक्षणिक, सामाजिक-आर्थिक विकास साधून घेतल्यानंतर त्याच्या पुढील पिढीने त्या जातीय आरक्षणातून बाहेर पडून खुल्या प्रवर्गामधून आपली कारकीर्द घडवावी; अशा प्रकारे समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या आरक्षणातून बाहेर पडून खुल्या प्रवर्गामध्ये यावे आणि टप्प्याटप्प्याने आरक्षणाची गरज संपुष्टात आणावी, हे आरक्षणाचे मूलतत्त्व आहे. यामध्ये एक बाब अध्याहृत ही सुद्धा आहे की समाजातील वरिष्ठ, अभिजन वर्गानेही दोन पावले पुढे येऊन या वंचित समाजघटकांच्या प्रगतीसाठी त्यांना हात द्यावा.

छत्रपती शाहू महाराजांनी माणगाव परिषदेमध्ये शंभर वर्षांपूर्वी केलेल्या भाषणामध्ये जपानमधील सामुराई या अभिजन वर्गाचे उदाहरण दिले होते. त्यांनी स्वतः पुढे होऊन त्यांना लाभलेले जन्मजात सामाजिक उच्चस्थान सोडून दिलेले होते आणि समाजातील खालच्या स्तरातील नागरिकांना बरोबरीचे स्थान प्रदान केले होते. हा सामुराईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारतीय समाजात विषमता निर्मूलनाचा कार्यक्रम राबवून समता प्रस्थापनेच्या दिशेने वाटचाल करावी, असे महाराजांना अभिप्रेत होते.

तथापि, आज आपण याच्या नेमकी विरुद्ध दिशा पकडलेली आहे. आरक्षणाचा लाभ घेणारे जणू काही आपले हितशत्रू असून त्यामुळेच आपल्या असणाऱ्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत, अशा प्रकारचे आभासी भय पसरविले जाऊन आरक्षणाचा लाभ घेऊन या समाजात थोडेफार बरोबरीचे स्थान मिळवू इच्छिणाऱ्या समाजघटकांचा दुस्वास केला जातो आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे आपल्या समस्यांवर आरक्षण हाच जणू काही प्रभावी उपाय आहे, अशी आभासी भावना सामाजिक- आर्थिक दृष्ट्या उच्च घटकांमध्ये पसरवून त्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी प्रेरित केले जात आहे. खरे तर, अधिकारांवर गंडांतराचा केवळ आभास निर्माण केला जाऊन राजकीयदृष्ट्या लाभ प्राप्त करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. मात्र, ही बाब संबंधितांच्या लक्षात येऊ न देता त्यांच्या भावनांचा बेमालूमपणे आपले स्वार्थ साधून घेण्यासाठी फायदा उठविला जातो.

या साऱ्या गदारोळात गोची त्यांची होते, ज्यांना खरोखरीच या जातीच्या दलदलीमधून बाहेर पडावयाचे आहे. आजकाल अनेक विचारी लोक स्वतःला जातीच्या ओळखीतून बाहेर काढू पाहताहेत. खऱ्या अर्थाने ते डि-कास्ट होऊ पाहताहेत. पण, हे असं डि-कास्ट होणंही त्यांच्यासाठी तितकंसं सहजशक्य नाही. भारतीय समाजामध्ये जातजाणीवा इतक्या खोलवर रुजल्या गेलेल्या आहेत की, एखाद्याची जात समजल्याखेरीज ते स्वतःला त्याच्याशी कोणत्याही प्रकारे रिलेट करू शकत नाहीत. एखाद्याच्या नावावरुन, आडनावावरुन, त्याच्या मित्रपरिवारावरुन, त्याच्या गावावरुन, त्याच्या पत्त्यावरुन असं कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याची खरी ओळख करवून घेतल्याखेरीज आपल्याला चैन पडत नाही. म्हणजे जात नाकारणं अथवा जातीच्या ओळखीतून स्वतःला बाहेर काढणं, किंवा बाहेर पडणं, हे सुद्धा आज या देशात एखाद्याच्या हातात नाही; तर ते कार्ड सुद्धा या समाजानं स्वतःच्याच हाती ठेवलं आहे. आणि हा समाज या जातजाणीवांमधून देशाला इतक्या सहजासहजी त्यातून बाहेर पडू देणार नाही, हे वास्तवही आता अधिक ठसठशीतपणे सामोरं आलं आहे कारण ते आता ग्लोबल झालंय...


रविवार, ५ मार्च, २०२३

डॉ. बाळकृष्ण, ‘शिवाजी द ग्रेट’ आणि शिवाजी विद्यापीठ

डॉ. बाळकृष्ण

'शिवाजी द ग्रेट' महाग्रंथाचे मुखपृष्ठ


महाराष्ट्री अगर मराठी नसूनही ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मिरविला, असे शिवचरित्राचे महान संशोधक डॉ. बाळकृष्ण यांनी अस्सल इंग्रजी, फ्रेंच, डच व पोर्तुगीज साधनस्रोतांचा वापर करून ‘शिवाजी द ग्रेट’ या महाग्रंथाचे लेखन केले. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने चारेक वर्षांपूर्वी मूळ चौखंडी महाग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी त्याचे संपादन केले होते. उद्या (दि. ६ मार्च २०२३ रोजी) या महाग्रंथाचा मराठी अनुवाद ‘महान शिवाजी’ या द्विखंडीय महाग्रंथाचे ज्येष्ठ पत्रकार-संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते प्रकाशन होते आहे. ही फार मोलाची गोष्ट आहे. या मराठी आवृत्तीचे संपादनही डॉ. जयसिंगराव पवार सरांनीच केले असून वसंत आपटे यांनी अनुवाद केला आहे.

स्वराज्य- तेही मावळ्यांचे आणि मावळ्यांसाठीचे, स्थापन करण्यासाठी शिवरायांनी ज्या पद्धतीने समाजातल्या सर्व स्तरांतल्या घटकांना सोबत घेतले आणि त्यांना एका ध्येयाने प्रेरित करून अक्षरशः त्यांच्याकडून ते कार्य करून घेतले, त्याला तोड नाही. केवळ स्त्रियांचाच नव्हे, तर पर्यावरणाचा आणि निसर्गाचा सन्मान हे सुद्धा शिवछत्रपतींच्या राज्याचे अंगभूत वैशिष्ट्य होते. त्यांचा हाच वारसा शंभूराजांनीही समर्थपणे पुढे चालविला. 

शिवछत्रपतींचे मोठेपण हे त्या काळाची गरज असलेल्या राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये, धोरणी गनिमी लढाई तंत्रामध्ये जसे होते, तसेच ते त्यांच्या या सामाजिक जाणिवेमध्येही होते. किंबहुना, राज्याभिषेकानंतर रायगडावरील सिंहासनावर आरुढ होण्यापूर्वीच जनतेच्या हृदय सिंहासनावर ते त्यापूर्वीच विराजमान झालेले होते. त्याला त्यांची संवेदनशीलता, चारित्र्यसंपन्नता आणि सामाजिक जाणीव कारणीभूत होती. 

शिवरायांच्या या समग्र जीवनपटाचा अत्यंत भारावून टाकणारा, रोमहर्षक इतिहास डॉ. बाळकृष्णांनी या महाग्रंथाच्या रुपाने साकारला आहे. १९३२ ते १९४० या कालखंडात म्हणजे आयुष्याच्या अंतिम पर्वात या चरित्राचे लेखन केले. डॉ. बाळकृष्ण मूळचे पंजाब प्रांतातले होते, आर्यसमाजाच्या विचारसरणीने भारावलेले होते आणि त्यामुळेच त्यांनी इथल्या राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्यपद स्वीकारले आणि तेव्हापासून ते या भूमीचेच होऊन गेले. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्यावर शिवचरित्राचा प्रचंड प्रभाव पडला आणि तेव्हाच त्यांनी समग्र शिवचरित्र साकारण्याचे ठरविले होते. शिवरायांच्या समकाळातील डच भाषेतील संदर्भ वापरून लिहिण्यात आलेले हे एकमेव चरित्र आहे. डच साधने मिळवून शिवचरित्रात मोलाची भर घालणारे ते पहिले इतिहासकार आहेत. हेच या चरित्राचे वेगळेपण आणि प्रमुख वैशिष्ट्य आहे. डॉ. बाळकृष्णांची ते लिहिण्याची कळकळ इतकी तीव्र होती की, शरीरात प्रचंड ताप असतानाही रात्री-अपरात्री उठून ते लिहायला बसत. १९४०मध्ये अखेरचा खंड लिहून त्यांनी पूर्ण केला आणि त्यानंतर अगदी अल्पावधीत त्यांचे निधन झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी हा आपला संकल्प पूर्ण केलेला होता. 

डॉ. बाळकृष्ण यांचे दुसरे एक अत्यंत महत्त्वाचे स्वप्न होते, ते म्हणजे शिवाजी विद्यापीठाची स्थापना. शाहू महाराजांच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांत करवीरमध्ये रुजू झाल्यानंतर छत्रपती राजाराम आणि डॉ. बाळकृष्ण या दोघांनी मिळून शिवाजी विद्यापीठाचे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने त्यांनी आखणीही करायला सुरवात केली होती. 

डॉ. बाळकृष्णांनी त्या काळात या विद्यापीठाचे स्वरुप कसे असायला हवे, त्याची योजनाही करून ठेवलेली होती. ही योजना अशी- “कोल्हापूरच्या पूर्वेस दीड मैलावर पुना-बेंगलोर रस्त्याच्या समीप राजाराम तलावानजीक निसर्ग वलयांकित अशी जवळजवळ दीडशे एकर जमीन यासाठी राखून ठेवून तेथे राजाराम कॉलेजच्या आर्ट्स व सायन्सच्या शाखा, लॉ कॉलेज, टीचर्स कॉलेज, ओब्रायन टेक्निकल स्कूल व शेतकी शाळा या संस्था तेथे न्यावयाच्या. यालाच पुढे व्हेटर्नरी व मेडिकल कॉलेजची जोड द्यावयाची. वरील सध्याची कॉलेजे निरनिराळ्या विषयांची भर घालून वाढविता येण्यासारखी आहेत, ती वाढवावयाची. उदाहरणार्थ, राधानगरी येथील हायड्रो-इलेक्ट्रीक स्कीम व अल्युमिनिअमचा कारखाना सुरू झाल्यावर येथील सायन्स कॉलेजमध्ये खनिज वस्तूशास्त्र (मिनरॉलॉजी) व भूगर्भशास्त्र (जिऑलॉजी) हे विषय शिकविले जावेत. हे विषय शिकविण्यासाठी व तेथील विद्यार्थ्यांना उमेदवार म्हणून घेण्यासाठी अंशतः आर्थिक झीज सोसण्यात वरील कारखान्यांच्या चालकांना आनंदच वाटेल. हायड्र-इलेक्ट्रीक स्कीम सुरू होताच इलेक्ट्रीक इंजिनिअरिंगचा कोर्स सुरू करता येईल. अल्युमिनिअम व हायड्रो-इलेक्ट्रीक स्कीममुळे उत्पन्न होणाऱ्या विजेच्या सहाय्याने कोल्हापुरात इतर धंद्यांची वाढ होऊन रेल्वेची वाढ होईल, त्यासाठी मॅकेनिकल इंजिनिअर्सची जरुरी भासेल; म्हणून, तीही शाखा उघडावी लागेल. उद्योगधंद्यांचा वाढीमुळे कमर्शियल स्कूल उघडणे सोयीस्कर होईल, तसेच कोल्हापूर हे संगीत-चित्र-नाट्य-चित्रपट या कलांचे माहेरघर असल्यामुळे त्या कलांचे शिक्षण देण्यासाठी एकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स सुद्धा स्थान करावी लागेल. कोल्हापूरची मल्लविद्येबद्दलची बरीच ख्याती असल्यामुळे लष्करी शिक्षणाच्या खालोखाल शास्त्रशुद्ध शारीरिक शिक्षण जितक्या तरुण-तरुणींस देता येईल, तितक्यांना मिळायला हवे. १) शारीरिक शिक्षण व मल्लविद्या आणि २) लष्करी शिक्षण यांच्या दोन शाळा उघडाव्या लागतील. या सर्व कॉलेजांची वसतिगृहे एकाच ठिकाणी बांधली गेली तर, बनारस हिंदू विश्वविद्यालयाप्रमाणे कोल्हापूर शिवाजी विश्वविद्यालयास स्वरुप येईल.” 

डॉ. बाळकृष्णांच्या या योजनेनुसार, छत्रपती राजाराम महाराजांनी आपला सक्रिय पाठिंबाही जाहीर केला होता. एवढेच नव्हे तर, महाराजांनी या नियोजित युनिव्हर्सिटीसाठी टेंबलाई मंदिराच्या परिसरात एक स्वतंत्र जागाही दिली होती. त्याही पुढे जाऊन त्यांनी युनिव्हर्सिटीच्या खर्चासाठी सात लक्ष रुपयांचे अनुदानही मंजूर केले होते.

डॉ. बाळकृष्ण यांची शिवाजी विद्यापीठाची कल्पना पाहताना त्यांच्या द्रष्टेपणाविषयी अचंबा वाटल्याशिवाय राहात नाही. त्यांच्या स्वप्नातील शिवाजी विद्यापीठाच्या जागेचे स्थान व आजच्या शिवाजी विद्यापीठाच्या जागेचे स्थान एकच असावे, हा केवढा विलक्षण योगायोग आहे, असे म्हणण्याऐवजी तो डॉक्टरांच्या द्रष्टेपणातील प्रतिभेचा सुंदर आविष्कारच समजला पाहिजे. खरोखरच आजच्या शिवाजी विद्यापीठाचे आद्य संकल्पक डॉ. बाळकृष्ण असून, शिवाजी विद्यापीठ हेच त्यांचे खरेखुरे स्मारक आहे, असे म्हणता येईल. 

छत्रपती राजाराम महाराज असोत की बाळकृष्ण, या दोघांनी आणि त्यानंतरच्या काळातील विद्यापीठाच्या संकल्पकांनीही या विद्यापीठाचे नाव ‘शिवाजी युनिव्हर्सिटी’ असावे, असले पाहिजे, असे म्हणून तेच नाव त्यांच्या लेखनात, बोलण्यात वापरले आहे. या माध्यमातून शिवछत्रपतींचे नाव देशविदेशांतील लोकांच्या ओठी यावे, त्या निमित्ताने शिवरायांच्या कर्तृत्वाची माहिती सर्वदूर व्हावी, म्हणून या विद्यापीठाचे नाव हे शिवाजी विद्यापीठ असावे, असा त्यांचा आग्रह होता आणि त्यानुसारच या विद्यापीठाचे नामकरण ‘शिवाजी विद्यापीठ’ असे करण्यात आले. डॉ. बाळकृष्णांचे हे दुसरे स्वप्न मात्र, त्यांच्या निधनानंतर सुमारे २२ वर्षांनी प्रत्यक्षात आले. मात्र, या विद्यापीठाचा पाया हा त्यांच्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यामुळेच रचला गेला, याची कृतज्ञ जाणीव आपण सदैव मनी बाळगली पाहिजे.