मंगळवार, ३ जून, २०१४

विद्यार्थीहितदक्ष शिक्षक-प्रशासक : डॉ. बी.एम. हिर्डेकर






(शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.बी.एम. हिर्डेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त 'दै. सकाळ'मध्ये प्रकाशित झालेला माझा लेख...)
शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर सर आज (दि. ३१ मे २०१४) सेवानिवृत्त होत आहेत. एक अतिशय संवेदनशील, सहृदयी आणि विद्यार्थीहिताविषयी तळमळ असणारा एक मूळचा हाडाचा शिक्षक आणि कायद्याचे उत्तम ज्ञान असणारा, व्यासंगी प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
हिर्डेकर सरांची कारकीर्द कोणालाही हेवा वाटावी अशी त्यांनी मोठ्या कष्टानं आणि प्रयत्नपूर्वक घडविली आहे. एक चढती कमान त्यांच्या कारकीर्दीला लाभलेली आहे. माध्यमिक शिक्षक म्हणून रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विविध शाळांत काम करत असतानाच त्यांनी उच्चशिक्षण घेणेही सुरूच ठेवले. त्यातून ते एम.ए., एम.एड. झाले. पुढे त्यांनी आवडीखातर आणि खरे तर प्रशासकीय सेवेला पूरक म्हणून एल.एल.बी. सुद्धा केले. शिक्षणशास्त्रात ते पीएच. डी. झाले. बरोबरीने त्यांची कारकीर्दही वळणे घेत राहिली. विविध महाविद्यालयांत इंग्रजी विषयाचे अधिव्याख्याता म्हणून त्यांनी सुमारे पंधरा वर्षे काम केले. रहिमतपूरच्या एस.एम. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्यपदही त्यांनी दोन वर्षे भूषविले. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवरही आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवला. शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द बहरात असतानाच त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या उपकुलसचिव पदी निवड झाली. आपल्या शैक्षणिक अनुभवाचा पुरेपूर वापर करीत त्यांनी प्रशासकीय कारकीर्दही शिक्षण क्षेत्राच्या उत्थानासाठी जाणीवपूर्वक समर्पित केली. त्यांच्या प्रत्येक उक्ती आणि कृतीला कायदेशीर अभ्यासाची जोड देण्याचे कौशल्यही त्यांनी जाणीवपूर्वक विकसित केले. त्यामुळे विद्यापीठाच्या महत्त्वपूर्ण बैठकांमध्ये एखाद्या संवेदनशील किंवा किचकट विषयावर त्यांचे मत विचारात घेतले जाऊ लागले. आपल्या या कौशल्याचा त्यांनी सदोदित विद्यापीठ प्रशासनाच्या भल्यासाठी वापर केला, हे महत्त्वाचे!
विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदी त्यांची ५ ऑगस्ट २००८ रोजी नियुक्ती झाली, तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी या पदाचा विद्यार्थी हितासाठीच वापर करण्याचा मंत्र आणि तंत्र स्वतःच्या आणि आणि परीक्षा विभागातील सर्व सहकाऱ्यांच्या मनावरही बिंबवले. मॅन्युअल ते डिजिटल असा परीक्षा विभागाचा प्रवास त्यांच्याच कारकीर्दीत यशस्वीपणे झाला. आधुनिक संगणक, डिजिटल यंत्रणेचा जास्तीत जास्त वापर करून परीक्षा पद्धतीमध्ये अधिकाधिक लवचिकता आणण्याचे श्रेय निःसंशयपणे डॉ. हिर्डेकर यांना द्यावे लागेल. या सर्व गोष्टी करीत असताना विद्यार्थी हिताला त्यांचे सर्वोच्च प्राधान्य राहिले. स्टुडंट फ्रेंडली एक्झाम हे त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. हॉरिझॉन्टल मोबिलिटीच्या आधारावर विद्यार्थ्यांची अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांची समकक्षता निश्चिती करण्याबरोबरच  एनएसएस कॅम्पमुळे परीक्षेला मुकणारे विद्यार्थी किंवा मध्यंतरी झालेले ऊसदराचे आंदोलन यामुळे परीक्षा चुकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय हिर्डेकर सरांनी घेतला. सहृदय भावनेतून अशी परीक्षा घेण्याचा प्रकार एकमेवाद्वितियच म्हणावा लागेल.
विद्यापीठाच्या जवळपास ९० टक्के परीक्षांचे निकाल तीस दिवसांच्या आत तर ९ टक्के परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाने सातत्य राखले आहे. उर्वरित १ टक्का निकाल ५० दिवसांत लावले जातात. याबद्दल प्रत्यक्ष राज्यपाल आणि मुख्यमंत्री महोदयांनीही विद्यापीठाचे विशेष अभिनंदन केले आहे. यामध्येही हिर्डेकर सरांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
वर्षभरात विद्यापीठाच्या सुमारे ५०० परीक्षा, त्यांच्या ५००० प्रश्नपत्रिका आणि त्या अनुषंगाने साऱ्या यंत्रणेची रचना, उभारणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी परीक्षा विभागाची यंत्रणा सक्षमपणे राबवताना वेळोवेळी मानसिक तणावाखाली येणाऱ्या आपल्या स्टाफला सांभाळून धीर देऊन चांगल्या कामासाठी उद्युक्त करण्याचे सरांचे कौशल्यही वादातीत आहे. विभागातला साधारण दीडशे जणांचा स्टाफ निम्म्यावर आला असताना आणि परीक्षा व विद्यार्थ्यांची संख्या वर्षागणिक वाढत असतानाही कामगिरीत सातत्य राखण्यात त्यांना यश आले आहे.
ऑनलाइन हॉलतिकीट व ऑनलाइन अर्ज स्वीकृती, प्रश्नपत्रिका सेट तयार करताना कोड पद्धतीचा अवलंब, सन १९६५ पासूनच्या सर्व गुणपत्रिकांचे डिजिटायझेशन आणि एसआरपीडी (सिक्युअर्ड रिमोट पेपर डिस्ट्रीब्युशन) सॉफ्टवेअरची यशस्वी अंमलबजावणी हे डॉ. हिर्डेकर सरांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे ठरावेत. प्रश्नपत्रिकांचे सेट तयार करत असताना संबंधित प्राध्यापकांखेरीज ते अन्य कोणीही पाहात नाही, अगदी परीक्षा नियंत्रक, कुलसचिव किंवा कुलगुरू सुद्धा! तीन सेटपैकी एक रँडम पद्धतीने निवडून, त्याला वेळापत्रकानुसार विशिष्ट कोड देऊन तो छपाईला दिला जातो. तेथून त्या कोडनुसार पॅकेजिंग होऊन थेट परीक्षा केंद्रनिहाय वितरित केले जातात. इतकी गोपनीयता या सर्व यंत्रणेमध्ये बाळगली जाते. त्यातूनही प्रश्नपत्रिकेत चुका झाल्यास संबंधित प्राध्यापकांना परीक्षा प्रमाद समितीकडून खुलासा विचारला जातो.
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी जुन्या गुणपत्रिका हव्या असतात. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या अगदी पहिल्या वर्षाच्या परीक्षेपासूनच्या म्हणजे सन १९६५ पासूनच्या सर्व गुणपत्रिकांचे डिजिटायझेशन ही सरांच्या कारकीर्दीतली खूप मोठी उपलब्धी आहे. स्टुडंट फॅसिलीटी सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अगदी एका दिवसात डुप्लीकेट गुणपत्रिका उपलब्ध करून देता येणे त्यामुळे शक्य झाले आहे. ऑनलाइन रिव्हॅल्युएशन ॲप्लीकेशनच्या सोयीचाही विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत.
एसआरपीडी (सिक्युअर्ड रिमोट पेपर डिस्ट्रीब्युशन) सॉफ्टवेअरची अंमलबजावणी हा सुद्धा हिर्डेकर सरांच्या कारकीर्दीतला महत्त्वाचा पैलू आहे. अभियांत्रिकी आणि फार्मसी विषयाच्या परीक्षा सध्या या पद्धतीने घेण्यात येत आहेत. या सॉफ्टवेअरद्वारे अगदी गोपनीयरित्या व सुरक्षित पद्धतीने एक पेपर रँडमली सिलेक्ट होऊन डाऊनलोडसाठी उपलब्ध होतो. आणि परीक्षा पद्धतीची गोपनीयता जपण्याबरोबरच यंत्रणा राबविण्यावरील ताणही कमी करण्यात यामुळे यश आले आहे. या तंत्रज्ञानालाही शिक्षक-विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लाभतो आहे. या यंत्रणेच्या अंमलबजावणीत शिवाजी विद्यापीठ राज्यात अग्रेसर आहे. आणि त्यात सरांचा मोलाचा वाटा आहे.
या संपूर्ण शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकीर्दीखेरीज हिर्डेकर सरांचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे सामाजिक भान आणि व्यापक लोकसंग्रह! शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचे कार्य ते करीत आहेत. आपल्या व्याख्यानांतून त्यांनी सदैव पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला आहे. विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी आजवर त्यांनी कितीतरी व्याख्याने दिली आहेत. आधुनिक भारताचा जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, या तळमळीतून त्यांनी हे कार्य चालविले आहे. या त्यांच्या कार्यातून विविध क्षेत्रांतील लोकांशी ते जोडले गेले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर काय करता येईल, याचा सकारात्मक विचार करण्याच्या, सदैव सहकार्य करण्यास तयार असण्याच्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळे त्यांची विद्यार्थीप्रियताही मोठी आहे.
असे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आज केवळ सेवेतून निवृत्त होत असले तरी यापुढील काळात सामाजिक कार्यामध्ये अधिक जोमाने गतिमान होईल, असा विश्वास आहे. त्यांच्या भावी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!