मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९

माझा फोटोग्राफीचा गुरू हरपला...!


मुळ्ये कुटुंबियांसमवेत आमची बीजेसीची फोटोग्राफीची बॅच. यात प्रज्ञा कलमे, जितेंद्र पोवार, विजय जाधव (पार्टनर), सचिन बनछोडे, समाधान पोरे, संजय साळुंखे, निशिकांत तोडकर, संदीप तेंडोलकर, रफिक मुल्ला, संजय उपाध्ये आणि संजय चव्हाण आहेत.

शशिकांत मुळ्ये सरांसमवेत केलेली दाजीपूरच्या अभयारण्याची अविस्मरणीय सफर.

शशिकांत मुळ्ये सरांसमवेत केलेली दाजीपूरच्या अभयारण्याची अविस्मरणीय सफर.

बीजेसीच्या आमच्या बॅचमसेवत (डावीकडून) डॉ. जगन्नाथ पाटील, डॉ. अशोक चौसाळकर, श्री. दशरथ पारेकर, डॉ. ओमप्रकाश कलमे आणि श्री. शशिकांत मुळ्ये. समोर सरांची छोटी सोनू दिसत आहे.

बरोब्बर एकवीस वर्षांपूर्वीची गोष्ट... शिवाजी विद्यापीठात बीजेसी करत असतानाची... विद्यापीठात सध्या आता जिथं गांधी अभ्यास केंद्राचा वर्ग चालतो, ती खोली त्यावेळी आमच्या जर्नालिझमची सेमिनार रुम होती. गेस्ट लेक्चर्स, प्रेझेंटेशन्स, सेमिनार, व्हायव्हा वगैरे त्या खोलीत होत. तिथं जमायला ओमप्रकाश कलमे सरांनी सांगितलेलं. कारण माहिती नव्हतं.. थोड्या वेळात कलमे सर एका उंचापुऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन वर्गात दाखल झाले. पाहता क्षणीच नजरेत भरणारं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे मोठ्ठे डोळे. इतके मोठे की गांधीजींसारख्या गोल फ्रेमच्या त्यांच्या चष्म्यातून बाहेर येतील की काय, असे वाटावे.. पण मोठ्ठे असूनही त्या डोळ्यांत रुक्ष बटबटीतपणा नव्हता. एक प्रकारचं स्नेहाळ मार्दव त्यांत होतं. चेहऱ्यावर सदैव विलसणाऱ्या स्मितहास्यामुळं एक प्रकारची प्रसन्नता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर होती. कलमे सरांनी ओळख करून दिली, हे शशिकांत मुळ्ये. प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत. मुंबईहून काही कारणानिमित्त कोल्हापुरात दाखल झाले आहेत. ते आपल्याला फोटोग्राफी हा विषय शिकवतील. आपल्याकडे फोटोग्राफी ऑप्शनला असला तरी आधुनिक युगात तिचं महत्त्व समजावून घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी या विषयाची निवड करावी, वगैरे वगैरे सरांनी सांगितलं.
शशिकांत मुळ्ये सरांच्या दर्शनाचा तो आमचा पहिला दिवस होता. त्यानंतर फोटोग्राफीविषयी, आपल्या कामाविषयी मुळ्ये सरांनी आम्हाला माहिती दिली. त्यातून त्यांनी अनेक कंपन्यांसाठी विशेषतः एचएमव्हीसाठी कॅसेट कव्हर्स केल्याचं समजलं. अनेक उद्योगांसाठी इंडस्ट्रीयल फोटोग्राफी केल्याचंही समजलं. त्यांचे काही फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर या मोठ्या डोळ्यांमधली नजरही किती कलात्मक अन् तीक्ष्ण आहे, याची आम्हाला खात्रीच पटली. आमच्यातल्या निम्म्या विद्यार्थ्यांनी फोटोग्राफी विषय ठेवायचं, तत्क्षणी ठरवून टाकलं. सरांच्या वक्तृत्वानं आणि कार्यानं सर्वाधिक भारावलेल्यांत मी, निशिकांत (तोडकर) आणि समाधान (पोरे) होतो. पुढं आम्ही सरांचे आल्लोक, निशी आणि सॅम झालो.
एवढं सगळं असताना मग सर मुंबई सोडून कोल्हापुरात का बरं आले असतील, असा प्रश्न आम्हाला पडलेला; पहिल्या भेटीतच तसं विचारणं थोडं अगोचरपणाचंच होतं, पण त्या वयात तो घडून गेला; तथापि, सरांनी अत्यंत प्रांजळपणानं त्यामागची कथा सांगितली आणि त्यामुळं तर मी त्यांच्या प्रेमात पडलो. सरांना ट्रेकिंगचा भारी नाद होता. हिमालयावर सरांनी दोन वेळा चढाई केली, नयनरम्य फोटोग्राफीही केली. मात्र, दुसऱ्या वेळी त्यांना स्नो बाईट झाला आणि त्यांचा पाय वाचविण्यासाठी मांडीतील हाडाच्या जागी स्टीलचा रॉड घालावा लागला होता. त्यामुळं धावपळ कमी करावी लागणार होती. म्हणून सरांनी सासूरवाडीचं ठिकाण असलेल्या कोल्हापूरची निवड स्थायिक होण्यासाठी केली होती. पुढच्या व्याख्यानावेळी आम्ही सरांना त्यांच्या हिमालय स्वारीतील छायाचित्रांचीच माहिती द्यायला लावली. जवळजवळ दोन तास सरांनी आम्हाला हिमालयाची सचित्र सफरच जणू घडविली. ते स्वतःही तल्लीन झालेले आणि आम्हीही.
असा आमचा फोटोग्राफीचा हिमालयीन विषयप्रवेश झाला. सरांचं शिकवणंही रुटिन, रटाळ नव्हतं. अनुभव शेअर करीत, फोटोग्राफीच्या गंमतीजंमती, दिग्गज फोटोग्राफर्सच्या यशकथा सांगत, त्यांनी आम्हाला फोटोमागच्या दुनियेची सफर घडवायला सुरवात केली. बेटर फोटोग्राफी सरांमुळंच आमच्या आयुष्यात आलं. सर शिकवत होते, तेव्हा अद्याप डिजिटल फोटोग्राफीची सुरवात झालेली नव्हती. रोल कॅमेऱ्यांचा, एसएलआरचा तो जमाना होता. बाजारात कोडॅकचा हँडी केबी-१० नुकताच दाखल झालेला, असा तो कालखंड. तेव्हा मुळ्ये सरांनी आम्हाला डिजिटलच्या पाऊलखुणांची माहिती दिलेली होती. सर्व फोटोग्राफर्ससाठी महत्त्वाचा आणि मोलाचा ठरेल, असा संदेश त्यांनी त्यावेळी आम्हाला देऊन ठेवला. ते सांगत, फोटोग्राफीत इन्स्ट्रुमेंट महत्त्वाचे असतेच. नाही, असे नाही. मात्र, इन्स्ट्रुमेंटच महत्त्वाचे असते, असे मात्र नाही. तुमच्या हातात जगातला सर्वात भारी, महागडा कॅमेरा आहे, मात्र फोटो काढण्यासाठी लागणारी नजर तुमच्याकडे नसेल, तर सारेच व्यर्थ आहे. त्यामुळे त्या काळात केबी-१०, कॅननसारखे साधे कॅमेरे हाती घेऊन फोटो काढण्याचे प्रयोग आम्ही केले, पण त्याचवेळी सेकंडहँड का असेना, पण एसएलआर (सिंगल लेन्स रिफ्लेक्स) कॅमेरा घेण्याचं धाडसही सरांनी आमच्यात निर्माण केलं. कॅमेऱ्यात रोल असा कौशल्यानं लोड करता यायला हवा की, ३६च्या रोलमध्ये ३८ ते ४० फ्रेम्स एक्स्पोज व्हायला हव्यात आणि या प्रत्येक रोलमध्ये तुमचा किमान एक तरी बेस्ट, वेगळा फोटो असायला हवा. हळूहळू ही संख्या जितकी वाढत जाईल, तितके तुम्ही उत्तम छायाचित्रकार व्हाल. आजही हातातल्या मोबाईलमध्ये जरी एखादा फोटो घेतला आणि तो उत्तम आला, तर सरांच्या या वाक्यांची आठवण झाल्याखेरीज राहात नाही.
सरांनी फोटोग्राफीसंदर्भातील इतक्या असाइनमेंट आमच्याकडून करवून घेतल्या की आमचा कॉन्फिडन्स खूपच वाढला. इतका की, मी आणि समाधाननं एसएलआर घेऊन मुक्त छायाचित्रकार म्हणून कामही करायला सुरवात केली. विद्यापीठाचं कॉन्व्होकेशन असो की एखाद्या वसतिगृहातल्या मित्राचा रिसर्च एक्सपिरीमेंट, अशा ऑर्डरी मिळायला सुरवात झाली. कमाई सुरू झाली. त्यामुळं माझा पहिला शिक्का जो तयार केला, तो फोटोग्राफर अँड जर्नालिस्ट असा होता, हे अभिमानपूर्वक नमूद करावंसं वाटतं. त्याला मुळ्ये सरांचं मार्गदर्शनच कारणीभूत होतं.
क्लासरुमबरोबरच क्लासरुमबाहेरही सरांचं शिकवणं सुरूच असायचं. आम्ही बीजेसीच्या फोटोग्राफीच्या विद्यार्थ्यांनी सरांसोबत दाजीपूरच्या अभयारण्यात फोटोग्राफीसाठी जंगल सफारी केली. जंगल कसं वाचावं, पाहावं, हे आम्हाला सांगणारा हा पहिला माणूस होता. एवढंच नाही, आमच्या मनावर परंपरेनं लादलेली काही जळमटं होती, ती काढून टाकायलाही सरच कारणीभूत होते. उदाहरणच सांगायचं तर, न्यूड किंवा नग्न म्हणजे काही तरी चुकीचं, वाईट, ओंगळ अशी आपली सार्वत्रिक सामाजिक मानसिकता करून देण्यात आलेली असते. सरांनी आमच्या मनातली ही किल्मिषं अगदी हळूवारपणानं दूर केली. नग्नतेकडं केवळ अश्लील म्हणून न पाहता त्यातलं सौंदर्य, ते टिपण्यामागील छायाचित्रकाराची नजर, भूमिका हे समजून घ्यायला शिकवलं. ते सांगताना मग केवळ छायाचित्रांपुरतं मर्यादित न राहता लिओनार्दो, राजा रविवर्म्यासारख्या महान चित्रकर्मींची नव्यानं पुनर्भेट घडविली. त्या दोन वर्षांत सरांबरोबर आम्ही उत्तमोत्तम इंग्रजी चित्रपट पाहिले. चित्रपटांतल्या छायाचित्रणाबद्दलही सर भरभरून बोलत, माहिती देत असत. आम्हाला खऱ्या अर्थानं एन्-रिच करणारा हा शिक्षक होता.
सरांसोबतचा स्नेह हा केवळ त्यांच्यापुरता मर्यादित न राहता त्यांच्या घरापर्यंत विस्तारला होता. मॅडमही त्यांच्यासारख्याच स्वभावानं मृदू आणि बोलायला गोड. आणि छोटुकली सोनू (चैत्राली) तर काय, आम्हा सर्वांचीच लाडकी झालेली.
अभिनेता अतुल परचुरे हा सरांचा जवळचा नातेवाईक. तो एकदा खाजगी भेटीवर आला असताना (सरांना माझं चित्रपट प्रेम ठाऊक असल्यानं) त्यांनी आवर्जून माझी अन् त्याची भेट घडवून आणली. त्यावेळी अतुलची मी घेतलेली मुलाखत लोकमतच्या चित्रगंधा पुरवणीत प्रसिद्ध झाली.
पुढं आम्ही सारे कामानिमित्तानं इकडं-तिकडं झालो. मी सकाळमध्ये उपसंपादक म्हणून रुजू झालो. लग्न झालं. त्यानंतर कोल्हापुरात अगदी लकीली सरांच्या अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅटच मला भाड्यानं मिळाला. त्यामुळं केवळ माझ्यापुरता असणारा मुळ्ये कुटुंबाचा स्नेह माझ्या पत्नीलाही लाभला. नाईट ड्युटीला जात असताना तिला जणू तिच्या आईवडिलांची सोबत आहे, असं समजून मी निर्धास्तपणानं ड्युटीला जात असे. सर आम्हाला हनिमून कपल म्हणून संबोधत. म्हणायचे, या वयात जितका क्वालिटी टाईम एकमेकांसाठी द्याल, तितकं ते पुढं महत्त्वाचं ठरतं. नंतर तुम्ही मुलाबाळांसह साऱ्यांना वेळ द्याल, पण एकमेकांसाठी किती वेळ द्याल, सांगता यायचं नाही. त्यावेळी मला त्यांच्या सांगण्याची मौज वाटायची, पण आता त्यातलं मर्म उमगतंय... त्यांचं सांगणं एकदम अनुभवसिद्ध होतं. पुढं सहा महिन्यांतच मी नोकरीनिमित्तानं मुंबईला शिफ्ट झालो. सरांशी अधून-मधून बोलणं व्हायचं. त्यांनी काही वाचलं, कधी आठवण झाली की, स्वतःहून फोन करायचे. काही नवीन सांगायचे, काही नवीन विचारायचे. सरांमुळेच ज्यांच्या कामाची माहिती झाली, त्या गोपाळ बोधे सरांशी झालेला परिचय ही माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची घटना होती. त्याच दिवशी सरांना फोन करून त्यांना या भेटीविषयी सांगितल्याखेरीज मला राहावलं नाही. खूष झाले ते!
काही वर्षांपूर्वी मॅडमचं असंच अचानकपणानं निधन झालं. सरांसाठी, सोनूसाठी, आमच्यासाठी हा मोठा अनपेक्षित धक्का होता. त्या त्रिकोणी कुटुंबाचं एकमेकांशी असलेलं बाँडिंग ज्यांना ठाऊकाय, त्यांनाच हा महत्त्वाचा कोन हरपल्याचं विलक्षण दुःख लक्षात येईल. सर त्यातून सावरायचा प्रयत्न करीत राहिले, ते फक्त सोनूसाठी. तिच्यासाठी ते पुण्याला शिफ्ट झाले. तिथल्या चांगल्या कॉलेजात सोनू शिकू लागली. तिच्या शैक्षणिक प्रगतीच्या वार्ता ते शेअर करीत असत. व्हॉट्सअप हे त्यांनी त्यासाठी चांगल्या पद्धतीनं वापरायला सुरवात केलेली. मधल्या काळात त्यांनाही थोडासा विस्मरणाचा त्रास सुरू झाला, पण तो मर्यादित होता. आणि गेल्या तीन ऑक्टोबरला पहाटे त्यांचंही अचानकपणे निधन झालं. त्रिकोणाचे दोन कोन हरपले आहेत आणि सोनू नामक बिंदूला पुन्हा नव्यानं आपल्या आयुष्याची भूमिती साधण्यासाठी, जुळविण्यासाठी बळ गोळा करायचंय, संघर्षरत व्हायचंय.
मुळ्ये सरांचं अकाली जाणं हे माझ्यासाठीच नव्हे, तर आमच्या संपूर्ण बॅचसाठी प्रचंड क्लेषकारक आहे. त्यांच्याविषयी जेव्हा विचार करतो, तेव्हा लक्षात येतं की, या माणसानं आम्हाला केवळ फोटोग्राफी शिकवली, असं नाही, तर आयुष्य जगावं कसं, किती रसरशीतपणानं जीवनातील विविध अभिव्यक्तींचा आस्वाद घेता येऊ शकतो, हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलं. कधी आनंदात, तर कधी एकटेपणात ते त्यांची लाडकी सतार घेऊन बसायचे. सर असेच एकदा तल्लीन होऊन सतार वाजवत असताना त्यांचा एकमेव श्रोता होण्याची संधी मला लाभलीय. त्यांना बसल्या जागी इथंही बक्कळ पैसा कमावता आला असता, पण त्यांनी तसं केलं नाही. क्वालिटी टाईम देऊन सुपरफाईन काम हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आपल्या वेळेवर आपल्या कुटुंबाचाही हक्क आहे, हे त्यांच्या सदैव स्मरणात असायचं. सकाळी घरातून बाहेर पडताना इतक्या वाजेपर्यंत येतो म्हणून सांगितलं, की त्या वेळेत घरी पोहोचणारच. आजकाल सारे नातेसंबंध मागे टोकून पैशांच्या मागे धावणारी मंडळी पाहिली की मुळ्ये सरांसारख्या माणसाचं वेगळेपण प्रकर्षानं जाणवायला लागतं. खूप पैसा, प्रचंड प्रसिद्धी त्यांना सहजी मिळविता आली असती, पण त्यांनी जगण्याचं खरं रहस्य ओळखलं होतं. जेवढंही आयुष्य ते जगले, क्वालिटीनं जगले.
आता मॅडम नाहीत... सरही नाहीत... या दोघांनी इतकं अकाली जाणं अपेक्षित नसतानाही ते घडलंय... वस्तुस्थिती स्वीकारावीच लागेल... पण या दोघांच्या प्रेमाची छत्रछाया लाडक्या सोनूवर सदैव राहील, याची खात्री आहे... मिस् यू सो मच मुळ्ये सररेस्ट इन पीस!