बुधवार, १ जानेवारी, २०१४

निखळ-25: सुहाना सफर...



('दै. कृषीवल'मध्ये गेले वर्षभर सुरू असलेल्या माझ्या पाक्षिक 'निखळ' या लेखमालेतील अखेरचे पुष्प ब्लॉगवाचक मित्रांसाठी साभार सादर करीत आहे. दै. कृषीवलच्या रायगड जिल्ह्यातील वाचकांचा जसा या मालिकेला प्रतिसाद लाभला, तितकाच तो या ब्लॉगवरुनही लाभला. त्यामुळे अधिक चांगलं लिहीण्याची प्रेरणा मिळाली. संपादक मित्रवर्य श्री. संजय आवटे सरांना यासाठी खरंच मनापासून धन्यवाद द्यायला हवेत, कारण त्यांच्या माझ्यावरील विश्वासामुळं आणि त्यांनी दिलेल्या संधीमुळंच ही लेखमाला मी वर्षभर यशस्वीपणे लिहू शकलो.- आलोक जत्राटकर)

वाचक मित्र हो, संपादक मित्राच्या आग्रहाखातर सुरू झालेला आपला हा पाक्षिक संवाद पाहता पाहता त्याच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करता झाला आहे. गेल्या वर्षभरामध्ये आपण अनेक विषयांवर बोललो, अनेक गोष्टी मी आपल्याशी शेअर केल्या. रायगड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या वाचक मित्र-मैत्रिणींशी मी जोडला गेलो. महत्त्वाचं म्हणजे आपला हा संवाद एकतर्फी राहिला असता, तर संवादाला कदाचित उणेपण आलं असतं, पण अनेक वाचकांनी कित्येकदा थेट मोबाईलवर संपर्क साधून माझा लेख, मी मांडलेले मुद्दे आवडल्याचं सांगितलं. काहींनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यामध्ये वयोगटाचा विचार केला तर विद्यार्थ्यांपासून ते प्राध्यापकांपर्यंत आणि तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत साऱ्यांचा समावेश होता. त्यामुळं दैनिक कृषीवलच्या माध्यमातून आपल्यासोबत सुरू असलेला माझा हा प्रवास खरोखरीच या मालिकेच्या नावाप्रमाणंच 'निखळ' आनंददायी ठरला. हे सारं खूप अनपेक्षित होतं. वाचक इतकं गांभीर्यानं वाचतात म्हटल्यावर लिहीणाऱ्याची जबाबदारीही आपोआपच वाढते. माझ्या पहिल्या लेखात मी म्हटल्याप्रमाणं, आम्ही पत्रकार लोक वाचकांना खूप गृहित धरतो, पण, प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नसते. याचं प्रत्यंतर आपण सूज्ञ जागरूक वाचकांनी आणवून दिलं, याचा मनस्वी आनंद आहे.
आजच्या कोलाहलात जिथं एक तर विवेकाचा बळी घेतला जातो किंवा त्याला गहाण तरी ठेवलं जातं, अशा परिस्थितीत आपण जिज्ञासूपणे वाचताहात; भवतालाकडं चिकित्सक दृष्टीनं पाहताहात, एखाद्या विधानाला सारासार विचाराच्या कसोटीवर तपासून पाहताहात, ही खूप दिलासादायक बाब आहे. रायगड जिल्हा हा खूप व्यामिश्रतेनं भरलेला आहे. इथल्या जीवन-संस्कृतीत विकासाची अन् आदिमतेची टोकाची रुपं पाह्यला मिळतात. मात्र, तशाही परिस्थितीत एक मध्यममार्गी, सम्यक जीवनपद्धती इथं आकाराला येत असलेली दिसते आहे. विकासाच्या संधी इथं नक्कीच व्यापक आहेत, मात्र त्याचवेळी विकास म्हणजे नेमका काय, आणि तो कुठल्या दिशेनं व्हायला हवा, याची जाणीव करून देणारं समाजजीवनही इथं आहे. त्यामुळं रायगडच्या शाश्वत विकासाबद्दल मी आश्वस्त आहे. गेल्या वर्षभरामध्ये आपल्या दरम्यान जो संवाद झाला, त्यातून ही आश्वस्तता माझ्या मनात निर्माण झालेली आहे. या जिल्ह्याचा माहिती अधिकारी म्हणून माझी कारकीर्द अल्प ठरली असली तरी, या लेखमालेच्या निमित्तानं आणि माध्यमातून मी आपणा सर्वांशी आणि या जिल्ह्याशी दीर्घकाळासाठी, नव्हे- आयुष्यभरासाठी जोडला गेलो आहे. हे जोडलं जाणं, खऱ्या अर्थानं माझ्याच काय, कुणाच्याही दृष्टीनं खरं संचित असतं. म्हणतात ना, माणसाची श्रीमंती त्याच्याकडच्या संपत्तीपेक्षा, त्यानं जोडलेल्या माणसांवरुन ठरवावी. त्या दृष्टीनं आपणा सर्वांच्यामुळं माझ्या संपत्तीमध्ये खूप मोठी भर पडली आहे, अशी कृतज्ञतेची आणि कृतार्थतेची भावना या क्षणी माझ्या मनी आहे.
आपल्याशी हा संवाद निरंतर ठेवण्यामध्ये कृषीवलच्या संपादकांसह संपादकीय टीमचाही खूप मोलाचा वाटा आहे. त्या टीमशी जोडलं जाण्याचाही आनंद खूप वेगळा आहे. या दैनिकाच्या रुपानं आणि तिथल्या सहकाऱ्यांच्या रुपानं अलिबागशी एक आगळा जिव्हाळा निर्माण झाला आहे. स्तंभलेखक परिषदेच्या निमित्तानं तिथं आलो, तेव्हा तर हे बंध अगदी घट्ट झाले. जिल्हाभरातल्या पत्रकार मित्रांशी जोडला गेलो. ‘कृषीवलचं हे ऋण मोठं आहे. केवळ वृत्तपत्र म्हणून नव्हे, तर एक चळवळ म्हणून अलिबागसारख्या ठिकाणी आदर्श पत्रकारितेचा दीपस्तंभ म्हणून काम करणं खूप कठीण आहे. पण अखंडितपणे हे व्रत या दैनिकानं जोपासलं आहे, याचं मोल शब्दातीत आहे.
या लेखमालेदरम्यान विचारांचा जागर घालावा, वगैरे काही अजिबातच माझ्या मनात नव्हतं, नाही. ते विचारवंत वेगळे आहेत. मी त्यांच्याइतका मोठाही नाही. पण, शेअरिंग करायला मला आवडतं. बरोबर असेल किंवा कधी चूकही. पण, शेअर केल्याशिवाय, सांगितल्याशिवाय ते पडताळणार तरी कसं? त्याचबरोबर शेअरिंगमुळं आपण एकटेच असे नाही आहोत, इतरांनीही असा अनुभव येऊ शकतो, याची जाणीव होऊ शकते, तर कधी कधी 'अरे, असंही असू शकतं ना!' याचंही प्रत्यंतर येतं. म्हणजे दोन्ही बाजूंनी शेअर करणारा आणि ज्याच्याशी केलं जातं, ते फायद्यात राहतात. त्याउपर काही चांगलं वर्तन-प्रेरक असे विचार जर देऊ-घेऊ शकलो, तर त्याहून मोठं असं काय असू शकेल? समस्त लेखन प्रपंचाच्या यशापयशाविषयी, साध्यतेविषयी साद्यंत चर्चा होऊ शकेल. पण, अंतिमतः त्यातून मिळणाऱ्या समाधानाचं मोल कशाशी करणार? एक गोष्ट मात्र नक्की सांगतो की, या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये 'चला, काही तरी लिहू या,' असं म्हणून पाट्या टाकण्याचा प्रकार कधी हातून झाला नाही. माझ्या लेखनाचं हेच मोठं यश वाटतं मला. आणि अगदी साप्ताहिक जरी नसलं तरी आपण नेमानं पाक्षिक लिहू शकतो, असा आत्मविश्वास मनात निर्माण झाला. वाचकांच्या प्रोत्साहनाच्या बळावरच ही उपलब्धी साध्य करता आली, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.
रात्रीच्या गर्भात आशेचा किरण जन्म घेत असतो, किंवा जुन्याच्या जीर्ण होत जाण्यातूनच नवं सृजन जन्मण्याची शक्यता अधिक गडद होत असते. तद्वतच सरतं वर्ष आणि येणारं नववर्ष यांच्या सीमारेषेवर आज उभे राहात असताना अनामिक हुरहूर मनाला लागून राहणंही स्वाभाविकच म्हणायला हवं. तशीच ती लागून राहिली आहे. पण, कधी तरी माणसाला थांबणं गरजेचं असतं. आणि त्या थांबण्यातूनच पुन्हा नव्या प्रवासाची आशाही द्विगुणित होत असते.
एकूणच आपला हा सहप्रवास सुहाना सफर ठरल्याची भावना मनात दाटून येते आहे--
जिंदगी में समझा था,
सारे बेगाने ही शायद साथ होंगे,
बयान ना कर सके जुबाँ,
इतने दर्द शायद सहने होंगे,
गलतफहमी थी सारी,
दर्द तो सारे बाद में आए,
कराहने की फुरसत दी,
जिन्हें बेगाना कहता रहा मैं,
मरहम साथ लिए दौडे आए।
खाली आशियाँ जलने का,
दुख जता रहा था मैं,
बुझाते बुझाते,
हाथ तो उन्हीं के जल गए थे।
शुक्रिया। धन्यवाद। टेक केअर। नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!