शनिवार, ६ जून, २०१५

मॅगी आणि बरंच काही…
भारतीय अन्नसुरक्षा व प्रमाणीकरण प्राधिकरणाने (FSSAI) अखेर नेस्ले इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला नूडल्स कॅटेगरीतली सर्वच्या सर्व नऊ उत्पादने भारतीय बाजारपेठेतून माघारी घेण्याचे निर्देश दिले. मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) या घातक रसायनाचे निर्धारित अंशांपेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रमाण मॅगी नूडल्सच्या सॅम्पल्समध्ये सापडल्यामुळे राज्याराज्यांत टप्प्याटप्प्याने या उत्पादनांवर बंदी घालण्यात येऊ लागली. केंद्रीय आरोग्य मंत्रालय व FSSAI यांनी वाढत्या जनक्षोभाची दखल घेत तातडीने पावले उचलत नेस्लेला प्रोडक्ट रिकॉल करण्यास भाग पाडल्याने भारतीय बाजारपेठेतील हा सर्वाधिक मोठा प्रोडक्ट रिकॉल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या टोटल प्रोडक्ट रिकॉलमुळे दोन गोष्टी झटकन होणार आहेत. त्या म्हणजे नेस्ले इंडिया प्रा.लि. या कंपनीच्या मॅगी नूडल्सची गेल्या तीस वर्षांपासून भारतीय बाजारपेठेवरील मक्तेदारी 'बस्स, दोन मिनिटांत' संपुष्टात येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय ग्राहकांना आणि भारतीय बाजारपेठेला गृहित धरण्याच्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या मानसिकतेला धक्का बसणार आहे.
प्रोडक्ट रिकॉल ही गोष्ट अलिकडच्या काळात ऑटो इंडस्ट्रीसाठी नवी नाही. दररोज नवनवी वाहने उत्पादित करत असताना विशिष्ट लॉटमधील वाहनांच्या सॅम्पल चाचणीमध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या, तर त्या लॉटमधील वाहने कंपनी परत मागवते आणि ग्राहकांना ते दोष निवारण करून देते. बीएमडब्ल्यू, फॉक्सवॅगनसह अगदी मारुती सुझुकीनेही अलीकडच्या काळात अल्टो के-१० सिरीजमधील वाहने परत मागविल्याच्या बातम्या ताज्या आहेत. नोकिया कंपनीच्या काही मोबाईल हॅण्डसेटमधील बॅटरीज सदोष आढळल्यानंतर त्या कंपनीने भारतीय बाजारपेठेतून केलेला प्रोडक्ट रिकॉल हा या पूर्वीचा अलीकडच्या काळातला मोठा होता. त्यातून नोकिया सहीसलामत बाहेर पडली आणि तिने बाजारावरील आपले नियंत्रण कायम ठेवले. मात्र, दरम्यानच्या काळात सॅमसंगने ड्युल सीमकार्डच्या सुविधेसह स्मार्ट फोन्सच्या अप्रतिम श्रेणी सादर करीत आपले स्थान निर्माण करायला सुरवात केलेली होती.
मॅगी नूडल्सच्या बाबतीत चर्चा करताना काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. तीस वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः उदारीकरणाचे धोरण स्वीकारण्याच्या काही वर्षे आधी ही दो मिनिट्स नूडल्स भारतीय बाजारातील मध्यमवर्गीय ग्राहक नरजेसमोर ठेवून दाखल झाली खरी. तत्पूर्वी, इथल्या सर्वसामान्य माणसाच्या घरात शेवया नामक पदार्थ प्रचलित होता. त्याच्या चवीच्या तुलनेत मॅगीच्या रेडी मसाल्याची चव थोडीशी हार्ड होती. भारतीय ग्राहक मसाल्याचे चाहते, वापरकर्ते असले तरी ही चव त्यांना तितकीशी भावली नाही. भारतीय शेवयांचा सॉफ्टनेस, चव यांच्या तुलनेत ती खूप जाड आणि बेचव होती. पण, उदारीकरणानंतरच्या काही वर्षांत मेट्रो शहरांमधील उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय लाइफ स्टाइलचे पॅटर्न झपाट्याने बदलण्यास सुरवात झाली. गतिमान झालेल्या या राहणीमानामध्ये इन्स्टंट व फास्ट फूड ही चैन न राहता तातडीची, ऐनवेळची गरज होऊ लागली. त्यामुळे महिन्याच्या वाणसामानात मॅगीच्या पॅकेट्सनी स्थान मिळविले. हळूहळू केवळ एकाच प्रकारच्या पॅकमध्ये उपलब्ध असणारे मॅगी नूडल्सचे निरनिराळ्या वाढीव वजनाचे पॅकही उपलब्ध झाले. मॅगीची जी जाहिरात अमिताभनी केली होती, त्यांच्यात तर एका खेड्यामधली आई आपल्या मुलाला चुलीवरच्या पातेल्यात मॅगी टाकून शिजवून देताना दिसली. यातून मॅगीने भारतीय बाजारात खोलवर मारलेली मुसंडी लक्षात आली. त्यापाठोपाठ आजच्या आरोग्यदायी लाइफस्टाइलचे फॅड बनलेल्या ओट्समधली श्रेणीही नेस्लेने लाँच केली. महाग असल्याने याचा टार्गेट ग्रुप उच्च व मध्यमवर्गच होता. त्यामुळे माधुरी दीक्षितचा पॉप्युलर चेहरा जाहिरातीसाठी निवडला गेलेला होता. या साऱ्या धबडग्यात नेस्ले कंपनीचे अन्नसुरक्षा निकषांकडे दुर्लक्ष झाले. त्यातून काही लॉट्समध्ये एमएसजी या आरोग्यास घातक अशा रसायनाचे प्रमाण मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यातून देशाच्या विविध राज्यांमध्ये मॅगीच्या उत्पादनांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील काही निगेटीव्ह तर काही पॉझिटीव्ह आल्या. साधारणतः हे प्रमाण ५०-५० टक्के आहे. म्हणजे नेस्ले कंपनीचे भारतीय अन्नसुरक्षा मानकांकडे ५० टक्के का असेना दुर्लक्ष झाले, हे नक्की! त्यामुळे कंपनीची बाजू घेण्यात अर्थ नाही. प्रचंड विस्तारलेल्या भारतीय बाजारपेठेला आणि ग्राहकाला गृहित धरण्याच्या प्रवृत्तीमुळे कंपनीला टोटल प्रोडक्ट रिकॉलच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले.
नेस्लेच्या या नामुष्कीची दुसरी बाजू म्हणजे यात गुंतलेले कॉर्पोरेट वॉर. आज भारतीय बाजारात नूडल्स, ओट्ससह इन्स्टंट फूड विकणाऱ्या, विकू इच्छिणाऱ्या अनेक प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत. मॅगी नूडल्सने भारतीय बाजारात इतके भक्कम पाय रोवलेले होते की त्याची पाळेमुळे सहजी हलवणे या कंपन्यांना शक्य नव्हते. नेस्ले कंपनीची भारत ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ होती. सन २०१४मध्ये या कंपनीच्या किरकोळ बाजारातील विविध उत्पादनांनी सुमारे ६२३ दशलक्ष डॉलर्सचा व्यवसाय केला. यात मॅगी नूडल्सचा निव्वळ वाटा ३० टक्के इतका होता. नूडल्सच्या बाजारपेठेत मॅगीचा मार्केट शेअर ६३ टक्के इतका आहे. उरलेल्या टक्केवारीत इतर कंपन्या खेळत होत्या. आता मॅगीचे हे वर्चस्व संपुष्टात आल्याने हा ६३ टक्के भागही नेस्ले मॅगीच्या स्पर्धक कंपन्यांना खुला होणार आहे. अशा काही उत्साही कंपन्यांनी आपल्या टीव्ही कमर्शिअल्सची संख्याही वाढविलेली आहे. त्यामुळे यात कॉर्पोरेट वॉर गुंतलेले आहे, असे म्हणण्यास जागा आहे.
या पार्श्वभूमीवर, या टोटल प्रोडक्ट रिकॉलनंतर प्रचंड नफा मिळवून देणारी भारतीय बाजारपेठ हातची गमावल्यानंतर पुन्हा इथे कमबॅक करण्यासाठी नेस्ले कंपनी कोणत्या प्रकारचा क्रायसिस मॅनेजमेंट प्लॅन राबविणार, याबद्दल मोठी उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे आरोग्य मंत्रालय आणि FSSAI यांनी आतापर्यंत केवळ मॅगी नूडल्सच्याच सॅम्पल्सची चाचणी केली आहे. तथापि, इन्स्टंट फूड श्रेणीतील सर्वच कंपन्यांच्या उत्पादनांची सॅम्पल्सची तपासणी करण्याचे काम हाती घेणे जरुरीचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय बाजारपेठेची अन्नसुरक्षा मानके ही अधिक प्रमाणित आणि भक्कम करण्याची मोठी गरज या प्रकरणातून अधोरेखित झाली आहे. यापूर्वीही एनर्जी ड्रिंकना परवानगी देण्याच्या वेळी आपली मानके अधिक सशक्त करण्याची गरज निर्माण झालेलीच आहे. ती करून भारतीय ग्राहकाचे आरोग्य ही मल्टीनॅशनल कंपन्यांची प्रयोगशाळा नाही; किंवा जगात इतरत्र जे खपत नाही, ते या बाजारात खपते, असा जो त्यांचा समज आहे, त्याला तडाखा देण्याचे काम भारतीय यंत्रणांना करावेच लागेल.