सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

दशक ‘फेसबुक’चं!



 
(रविवार, दि. २ फेब्रुवारी २०१४ रोजी 'दै. पुढारी'च्या साप्ताहिक बहार पुरवणीत 'फेसबुक'च्या दशकपूर्तीच्या अनुषंगाने प्रसिद्ध झालेला माझा लेख ब्लॉग वाचकांसाठी खास शेअर करीत आहे. पुरवणी संपादक आणि माझे ज्येष्ठ सहकारी-मार्गदर्शक श्री. जयसिंग पाटील यांनी आवर्जून लिहायला लावून तो प्रसिद्ध केला. याबद्दल त्यांना आणि पुढारी-बहार टीमला मनापासून धन्यवाद!- आलोक जत्राटकर)

दहा वर्षांपूर्वी फेसबुक तयार केले, तेव्हा वाटले होते- आमचे काम झाले; आता त्याची पुढची बांधणी जगासाठी कुणीतरी करेलच. पण, ते कुणीतरीआम्हीच असू, याची मात्र कल्पना नव्हती.” 
                                                                    - मार्क झुकेरबर्ग

येत्या मंगळवारी, तारीख ४ फेब्रुवारी आहे, असं मी आपल्याला सांगितलं, तर तुम्ही म्हणाल, त्यात काय एवढं? दर मंगळवारी कुठली ना कुठली तारीख असतेच किंवा दर ४ फेब्रुवारीला कोणता ना कोणता वार असतोच! मग..? दहा वर्षांपूर्वी म्हणजे सन २००४च्या ४ फेब्रुवारीच्या पहाटे अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठाच्या डॉर्मेटरीमध्ये राहणाऱ्या मार्क एलियॉट झुकेरबर्ग या विद्यार्थ्यालाही तसं काही विशेष वाटण्याचं कारण नव्हतं, जेव्हा त्यानं आपल्या चार साथीदारांसह गंमती-गंमतीत फेसमॅश हे ॲप्लीकेशन लाँच केलं होतं. पण, गेल्या दहा वर्षांत मात्र त्या ॲप्लीकेशननं फेसबुकच्या रुपात ४ फेब्रुवारीला जागतिक सोशल नेटवर्किंगच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान प्रदान केलं आहे.
येत्या ४ फेब्रुवारीला फेसबुकच्या स्थापनेला दहा वर्षं पूर्ण होताहेत. मार्क झुकेरबर्गनं फेसबुकची सुरवात कशी केली, एका ड्रॉप-आऊट विद्यार्थ्यानं जगातल्या सर्वाधिक प्रभावी कंपनीचा सर्वाधिक तरुण संस्थापक आणि सर्वात श्रीमंत सीईओ होण्यापर्यंत कशी मजल मारली, हा इतिहास तर आता जवळजवळ साऱ्यांनाच माहिती झालाय. आपल्या मैत्रिणीशी आठ वर्षांपर्यंत प्रामाणिक राहून तिच्याशीच त्यानं कित्ती साधेपणानं विवाह केला, याचीही चर्वितचर्वणं खूप झालीयेत. त्यामुळं त्या तपशीलात किंवा इतिहासात न शिरता गेल्या दहा वर्षांत फेसबुकनं आपल्याला काय दिलं किंवा फेसबुकच्या जागतिक यशाचं रहस्य काय, तसंच भवितव्य काय? याविषयी मात्र नक्कीच चर्चा व्हायला हवी.
दशकपूर्ती साजरी करत असतानाच गेल्या २९ जानेवारीला फेसबुकच्या गत वर्षाखेरीच्या (३१ डिसेंबर २०१३) कामगिरीचे आकडे जाहीर झाले आहेत आणि ते या कंपनीशी संबंधित सर्वच स्टेकहोल्डर्ससाठी आनंददायी असे आहेत. सन २०१३मध्ये फेसबुकनं ७.८७ अब्ज डॉलर इतकी उलाढाल केली. गतवर्षीच्या तुलनेत ५५ टक्क्यांहूनही ती अधिक आहे. विविध प्रकल्पांमधून फेसबुकनं वर्षभरात २.८० अब्ज डॉलर मिळविले. त्यामध्ये कंपनीची निव्वळ मिळकत दीड अब्ज डॉलर इतकी आहे. फेसबुकच्या दैनंदिन वापरकर्त्यांची (युझर) सरासरी संख्या ७५७ दशलक्षांवर गेली आहे. गतवर्षीपेक्षा ही संख्या २२ टक्क्यांनी वाढली आहे. त्यात मोबाईलवरून फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या ५५६ दशलक्ष इतकी आहे. यामध्ये तर गतवर्षीपेक्षा विक्रमी ४९ टक्के वाढ झाली आहे. दरमहा सक्रिय सदस्यांची संख्या १.२३ अब्ज असून त्यातही १६ टक्के वाढ आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दैनंदिन फेसबुक वापरणाऱ्यांपैकी सुमारे ८१ टक्के लोक हे अमेरिका आणि कॅनडाबाहेरचे आहेत.
ही आकडेवारीच अतिशय बोलकी आहे. दहा वर्षे हा काही फार मोठा कालावधी नाही, तथापि, सोशल नेटवर्किंग साइट्सचा आज अक्षरशः भडीमार होत असताना त्या झंझावातामध्ये अशा सातत्यपूर्ण कामगिरीची नोंद करणं, ही खरं तर खूपच आव्हानात्मक बाब आहे आणि ती फेसबुकनं साध्य केली आहे.
माय-स्पेस, ऑर्कुट, बझ, गुगल प्लस अशा काही जगभरात पॉप्युलर असणाऱ्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या आस्तित्वाचा थोडासा आढावा घेतला तर फेसबुकच्या प्रगतीचा आपल्याला अंदाज येऊ शकेल. उपरोल्लेखित चारपैकी माय-स्पेस वगळता उर्वरित तीनही सेवा या गुगल कंपनीच्या आहेत. ऑर्कुटची सुरवात ही २००४च्याच जानेवारीमध्ये झाली, म्हणजे फेसबुकच्याच आसपास. ऑर्कुटने झटपट भरारीही घेतली, विशेषतः ब्राझील आणि भारतामध्ये मोठीच लोकप्रियता ऑर्कुटनं मिळवली. पण, एकूण वापरकर्त्यांपैकी सुमारे ५९ टक्के लोक हे एकट्या ब्राझीलमधील असल्यानं कंपनीनं ऑर्कुटचा बेस ब्राझीलला हलवला. दरम्यानच्या काळात फेसबुकनं ऑर्कुटची जागा अगदी वेगानं घेतली. बझ ही सेवा सुद्धा गुगलनं जी-मेलच्या वापरकर्त्यांना प्रदान केली खरी. मात्र फेब्रुवारी २०१०मध्ये सुरू झालेली ही सेवा डिसेंबर २०११मध्ये बंद सुद्धा करावी लागली. यातून धडा घेत गुगलनं आता गुगल प्लस ही सोशल नेटवर्किंगच्या पुढं जाऊन त्यांच्या सर्वच सेवांसाठीची आयडेंटिटी सर्व्हीस म्हणून सुरू केली आणि जी-मेल, यू-ट्यूबच्या वापरकर्त्यांचा खूप मोठा बेस आधीच तयार असल्यानं या सेवेच्या वापरकर्त्यांची संख्या २५ दशलक्षांवरुन (जुलै २०११) ५४० दशलक्षांवर (ऑक्टोबर २०१३) पोहोचली. यामध्ये वापरकर्त्यांपेक्षा कंपनीच्या क्लृप्त्यांचा मोठा वाटा आहे, असं म्हटलं पाहिजे. माय-स्पेस ही अमेरिकेतली संगीतविषयक आघाडीची सोशय नेटवर्किंग साइट होती. सन २००५पासून २००८पर्यंत सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात माय-स्पेस आघाडीवरच होती. जून २००६मध्ये तर माय-स्पेसला भेट देणाऱ्यांची संख्या ही गुगलपेक्षाही अधिक होती. सन २००९मध्ये माय-स्पेसला फेसबुकनं मागं टाकलं. त्यानंतर कित्येक बदल केल्यानंतरही आणि झिंगा, रॉक यू सारखे गेमिंग आणि म्युझिक प्लॅटफॉर्म लाँच केल्यानंतरही माय-स्पेसला आपलं पूर्वीचं स्थान मिळवणं काही शक्य झालेलं नाहीय. पाच वर्षांपेक्षाही कमी कालावधीत या सर्व घडामोडी घडल्या.
कितने आए, कितने गए तरीही फेसबुकचं स्थान, त्याची लोकप्रियता दहा वर्षे सातत्यानं कायम आहे. यामागे फेसबुकनं जाणीवपूर्वक स्वीकारलेलं बदलांचं धोरण सर्वाधिक कारणीभूत आहे, असं मला वाटतं. माझा एक तरुण मित्र विनायक पाचलग यानं या बदलांना थिअरी ऑफ चेंज (बदलते जग दीपावली विशेषांक २०१३) असं अगदी समर्पक नाव दिलंय. इंटरनेटचं, सोशल नेटवर्किंगचं जग हे आभासी आहे. प्रत्यक्ष जीवनात तोच-तो पणाचा आपल्याला कंटाळा येतो, ते तत्त्व या आभासी जगतालाही लागू आहे, कदाचित प्रत्यक्षाहूनही अधिक प्रकर्षानं! त्यामुळं झुकेरबर्ग यानं फेसबुकचं रुप अगदी सुरवातीपासून कमीअधिक प्रमाणात बदलतं ठेवलं आहे; कधी दृश्य स्वरुपात, तर कधी युझर फ्रेंडलीनेसच्या स्वरुपात. त्यामध्ये प्रामुख्यानं वॉलची निर्मिती (सप्टेंबर २००४), विद्यापीठांबरोबरच हायस्कूलपर्यंतही सेवेचा विस्तार (सप्टेंबर २००५), १३ वर्षांवरील सर्वांना फेसबुकवर येण्याची संधी आणि न्यूज फीड या सर्वाधिक लोकप्रिय सेवेची सुरवात (सप्टेंबर २००६), प्रोग्रामर डेव्हलपर्ससाठी प्लॅटफॉर्मची निर्मिती (मे २००७), फेसबुक चॅटची सुरवात (एप्रिल २००८), लाइक सेवा सुरू (फेब्रुवारी २००९), लोकेशन फीचर (ऑगस्ट २०१०), टाइमलाइनचे आगमन (सप्टेंबर २०११), जाहिरातदारांना स्टेटस, फोटो, मेसेज अपडेट करण्याची संधी (फेब्रुवारी २०१२), फोटो आणि प्रोफाइल सर्च करणाऱ्या ग्राफ सर्चची सुरवात (जानेवारी २०१३) आदी सेवांचा समावेश आहे. वापरकर्त्यांसाठी या सुविधांची निर्मिती करत असतानाच कंपनी म्हणूनही फेसबुकनं आपला विस्तार कौशल्यानं वाढवला आहे. नॅसडॅकमध्ये लिस्टेड कंपनी म्हणून पब्लीक होण्याबरोबरच इन्स्टाग्रामसारखी कंपनी टेकओव्हर करण्यासारख्या अनेक समयोचित निर्णयांचा त्यामध्ये समावेश आहे.
खरं तर केवळ ॲपिअर, कनेक्ट ॲन्ड शेअर या मूलभूत त्रिसूत्रीवर कोणत्याही सोशल नेटवर्किंग साइटचा डोलारा अवलंबून असतो. पण, फेसबुकनं या तिन्ही गोष्टी उपलब्ध करून देत असतानाच त्यामध्ये जाणीवपूर्वक पण अगदी हळूवार असे काही बदल केले. ते लोकांच्या पचनी पडल्यानंतरच त्यांनी पुढच्या बदलांना हात घातला आणि त्याहूनही वापरकर्त्यांना अधिक आणखी काय सेवा देता येतील, याचा सातत्यानं विचार केल्याचं दिसतं. हे फेसबुकच्या यशाचं महत्त्वाचं कारण म्हणून अधोरेखित करता येईल.
फेसबुकच्या आस्तित्वानं आपल्याला काय दिलं, याचा विचार केला तर, या माध्यमानं आपली अर्थात मानवाची मूलभूत अशी संवादाची आणि अभिव्यक्त होण्याची गरज भागविण्यास मोठी मदत केली, असं म्हणता येईल. आजच्या धावपळीच्या युगात संवाद हरवत चालला आहे, असं सरधोपटपणे आपण म्हणत असलो, तरी त्यात शंभर टक्के तथ्यही आहे. हा संवाद प्रस्थापित करण्याचं, जुन्या-नव्या मित्रांशी, कुटुंबियांशी कनेक्ट करण्याचं आणि त्यांच्याशी नव्यानं जोडलं जाण्याचं महत्त्वाचं काम, भलेही ते आभासी असेल, पण फेसबुकनं केलं आहे. स्मार्टफोन्सच्या आगमनानंतर तर हे प्रमाण अत्यधिक वाढल्याचंही वर दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं. भारतामध्येही स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट, पर्यायानं सोशल नेटवर्किंग साइट वापराचं प्रमाण वाढत असल्याचं इंटरनेट अन्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालावरुन स्पष्ट झालं आहे. या अहवालानुसार, जून २०१२मध्ये देशातल्या एकूण इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १५ कोटी होती, त्यात स्मार्टफोनवर इंटरनेट वापरणारे ६.८० कोटी लोक होते. जून २०१३मध्ये हे प्रमाण १९ कोटींमध्ये १३ कोटी इतकं वाढलं तर जून २०१४मध्ये ते २४.३० कोटींमध्ये १८.५० कोटी इतकं होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजे स्मार्टफोनमुळंही फेसबुकच्या वापराला आणि शेअरिंगला अधिक बूस्ट मिळतो आहे, असं म्हणता येईल. आजच्या युगात हे शेअरिंग आणि कनेक्ट होणं, खूप महत्त्वाचं बनलं आहे- मूलभूत गरजांबरोबरच अनेक कृत्रिम-व्यावसायिक गरजा भागविण्यासाठी सुद्धा. त्यामुळं नजीकच्या काळात फेसबुकची गरज किंवा आस्तित्व संपुष्टात येईल, याची शक्यता दिसत नाही. मात्र, त्या धोक्याची जाणीव ठेवून झुकेरबर्गनं पुढची पावलं उचलायला सुरवात केली आहे.
ओपन कॉम्प्युट प्रोजेक्ट (Open Compute) आणि इंटरनेट डॉट ऑर्ग (Internet.org) ही त्याची पुढची दोन पावलं आहेत. फेसबुकच्या पुढाकारानं हाती घेण्यात आलेल्या ओपन कॉम्प्युट प्रकल्पामध्ये  संगणक, नेटवर्किंग क्षेत्रातल्या इंटेल, मायक्रोसॉफ्टसह जगभरातील १५० कंपन्यांना सामावून घेण्यामध्ये झुकेरबर्गला यश आलं आहे. ओपन सोर्स सॉफ्टवेअरची निर्मिती आणि वापर यांच्या साह्यानं व्यवस्थापन, ऊर्जा आणि क्रयशक्तीवरील खर्च वाचविण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. विशेषतः इंजिनिअरिंगच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या सर्व्हर नेटवर्किंग, सर्व्हर शेअरिंग, इंटरनेटवर्किंग, केबलिंग अशा अनेक गोष्टींचा या प्रकल्पांतर्गत फेरविचार करण्यात येणार आहे. सेकंदाला ४ अब्ज ऑपरेशन्स होणाऱ्या फेसबुकनं ओपन सोर्स संसाधनांचा वापर करून गेल्या तीन वर्षांत व्यवस्थापन आणि ऊर्जेवरील खर्च १.२ अब्जांनी कमी करण्यात यश मिळवलं आहे. जागतिक स्तरावर ही गोष्ट आता झुकेरबर्गला साध्य करायची आहे. भावी काळात ही मोठी क्रांतीकारक बाब ठरणार आहे. त्याचबरोबर आयोवा आणि स्वीडनमधील प्रकल्पांसाठी पवन ऊर्जा आणि हायड्रो-इलेक्ट्रीक सिस्टीमचा वापर करून सुमारे ४० हजार घरांना लागणाऱ्या ऊर्जेइतकी बचत फेसबुकनं साध्य केली आहे. ग्रीन प्लॅनेट हा त्याचा पाया आहे. इंटरनेट डॉट ऑर्ग या प्रकल्पाअंतर्गतही सध्या पृथ्वी ज्या पद्धतीनं जोडली गेली आहे, त्या पद्धतीमध्येही मूलभूत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनं झुकेरबर्ग प्रयत्नशील आहे. म्हणजे फेसबुकचं पुढचं पाऊल हे वैश्विक कनेक्टिव्हीटीमध्येच प्रवर्तित करण्याचा फेसबुकच्या प्रवर्तकाचा मानस असल्याचं सध्या तरी दिसतंय.
----
काही नकारात्मक बाजू

फेसबुक फोबिया वाढतोय!
फेसबुकवर सर्वाधिक वावर हा पौगंडावस्थेतील आणि विशी-पंचविशीतल्या तरुणाईचा आहे. या व्हर्चुअल जगतामध्ये त्यांचा अतिशय सुरक्षित वावर आहे. त्यांना इथे थेट कोणताही धोका उद्भवण्याची शक्यता नसते. तथापि, या आभासी जगताची सवय झालेल्या मनाला वास्तव जगामधील अनुभव कदाचित खूप हार्ष, भयंकर वाटण्याची शक्यता अधिक निर्माण होते. मानसिकदृष्ट्या कोलमडून पडण्याची शक्यता इथे वाढते.
फेसबुकवर प्रत्येक गोष्ट विनाकारण शेअर करायची आणि त्यावर प्रतिक्रिया आजमावण्याची, तसंच तिथल्या लाइक्स आणि कॉमेंट्सवर आपलं सोशल स्टेटस ठरवण्याची अत्यंत चुकीची सवय इथं लागते. अभ्यास करण्याच्या वयामध्ये सातत्यानं विद्यार्थ्यांचं लक्ष स्मार्टफोन किंवा टॅबकडं लागून राहणं याचा दुसरा अर्थ म्हणजे त्याचं अभ्यासावरचं लक्ष केंद्रित करण्याचं प्रमाण कमी होणं, असा आहे. अभ्यासामधली प्रगती कमी म्हणजे भविष्यातल्या इतर शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधींचीही कमी, असा थेट परिणाम होण्याची शक्यता वाढते. या सोशल मिडियाच्या अतिरिक्त वापरामुळे भेडसावणाऱ्या व्यसनाधिनतापूर्ण मानसिक रोगालाही 'फेसबुक फोबिया' असं नाव मानसोपचार तज्ज्ञांनी दिलं आहे. या रोगाने ग्रस्त असणाऱ्या युवा वर्गाचं प्रमाण जागतिक स्तरावर चिंताजनकरित्या वाढू लागलं आहे. अत्यंत पराकोटीची नैराश्यग्रस्तता हा या रोगाचा अल्टिमेट अंतिम परिणाम आहे.
सायबर गुन्हेगारीत वाढ
व्यक्तिगत पातळीवर होणाऱ्या या रोगाबरोबरच आपण मांडलेली अतिरेकी, टोकाची मतेही दुराग्रही पद्धतीने रेटण्याची मानसिकता या माध्यमामुळे निर्माण होत असल्याचेही अलीकडे निदर्शनाला येऊ लागले आहे. व्यक्तिगत अजेंडा राबवायला कोणाची हरकत असण्याचं कारण नाही, परंतु ते विधायक असलं पाहिजे, समाजाचं, राष्ट्राचं आणि अखिल मानव जातीचं व्यापक हित त्यातून जपलं, जोपासलं गेलं पाहिजे. प्रत्यक्षात बऱ्याच जणांच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही. समाजविघातक, देशविरोधी कारवायांची किंवा व्यक्तिद्वेषमूलक आक्रमक आरोपणांची पेरणी इथं होताना दिसते आहे. असे विघातक समानधर्मी लोकांचे समूह इथं स्थापन होताहेत. रेव्ह पार्ट्यांची आमंत्रणं इथून वाटली जाताहेत, दहशतवादी हल्ल्यांचे कट इथं आखले जाताहेत, हे खूपच भयावह आहे. त्यामुळं सायबर गुन्हे शाखेचं कामही खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे. आणि हे केवळ देशात नाही, तर एकूणच जगभरात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. मैत्रीच्या आवरणाखाली फसवणुकीचे प्रकारही वाढत चालले आहेत. फेक अकाऊंट उघडून त्या माध्यमातून तरुण तरुणींची फसवणूक आणि चारित्र्यहननही याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होताना दिसतं आहे. नकळत्या वयामध्ये नको त्या पद्धतीने सेक्शुअल मटेरिअलचा मारा तारुण्यात येऊ घातलेल्या युवक-युवतींवर सुरू आहे. त्यातून एकूणच निकोप स्त्री-पुरूष संबंधांपेक्षा लिंगभेदसापेक्ष, लिंगवर्चस्ववादी विचारसरणीचा भडिमार त्यांच्यावर होतो आहे. त्यातूनही अनेक सामाजिक समस्या आणि गुन्हेगारीला खतपाणीही इथूनच मिळत आहे. आणि या माहितीच्या या प्रस्फोटाला नियंत्रित करणं, ही आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.
गरज सेल्फ रेग्युलेशनची!
फेसबुक, पर्यायानं सोशल मिडिया हे आपलं भवितव्य आहेच, हे नाकारता येत नसलं तरी त्याचा संयमित, नियंत्रित आणि व्यापक सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून  वापर केला जाणे ही खूप आवश्यक बाब आहे. आणि ती केवळ सेल्फ रेग्युलेशनच्या माध्यमातूनच शक्य आहे. तरुणांनी जसा या माध्यमाला ॲक्सेप्टन्स दिला आहे, त्याच प्रमाणे सेल्फ रेग्युलेशन मेथडही त्यांनीच ॲडॉप्ट करणे, डेव्हलप करण्याची खरी गरज आज निर्माण झाली आहे.
--
'फेसबुक'संदर्भात काही मनोरंजक तथ्ये
·         गतवर्षी फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येत २०० दशलक्ष वापरकर्त्यांची भर पडली. फेसबुक हा जर एक देश असता आणि फेसबुक वापरकर्ते त्या देशाचे नागरिक आहेत, असे गृहित धरले तर फेसबुक हा चीन आणि भारताच्या पाठोपाठ जगातील तिसरा सर्वात मोठा तसंच अमेरिकेपेक्षाही मोठा देश ठरला असता.
·         सन २०१०मध्ये झुकेरबर्गच्या आयुष्यावर बेतलेला द सोशल नेटवर्क हा चित्रपट प्रदर्शित झाला. जेस्सी आयसेनबर्ग याने झुकेरबर्गची भूमिका केली होती. या चित्रपटाला तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले.
·         सन २०११मध्ये जगातील एक तृतीअंश घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये फेसबुकचा मोलाचा वाटा असल्याचे दिसून आले.
·         सन १९४४मध्ये डेन्मार्कपासून स्वतंत्र झाल्यापासून आइसलँडला स्वतःची राज्यघटनाच नव्हती. सन २००८मधल्या आर्थिंक मंदीमुळे त्यांना ती तयार करावी लागली. आणि सुमारे २५ सदस्यांनी घटना तयार केल्यानंतर ती फेसबुकवर शेअर करून त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या. अंतिम मसुदाही वेबसाइटबरोबरच फेसबुकवर ठेवण्यात आला.
·         फेसबुकच्या यु.आर.एल.च्या पुढे /4 हा आकडा टाकला की थेट मार्क झुकेरबर्गच्या वॉलवर पोहोचता येते.
·         फेसबुकची सॉफ्टवेअर यंत्रणा हॅक करून ती अधिकाधिक सक्षम करण्यासाठी अप्रत्यक्ष मदत करणाऱ्याला ५०० डॉलरचे बक्षीस देण्यात येते.
·         आपल्या आईच्या मृत्यूविषयीची पोस्ट लाइक न केल्यामुळे एकाने आपल्या पत्नीला मारहाण केली, तर फ्रेंडलिस्टमधून अनफ्रेंड केल्याबद्दल संबंधिताचा खून केल्याचीही घटना घडली.
·         फेसबुकवर आल्यानंतर परत जाणाऱ्यांचे प्रमाण हे ३.७४ इतके अत्यल्प आहे.
·         फेसबुकवरील प्रोफाइल पिक बदलण्याचे प्रमाण २००६च्या तुलनेत तिप्पट झाले आहे.
--००--