शुक्रवार, १९ जून, २०२०

हेअर कटिंगचे सेल्फ अप्रायझल



लॉकडाऊनच्या कालखंडात तमाम लोकांनी तमाम कलाकौशल्ये आत्मसात केली, तमाम वेबिनारमध्ये सहभाग घेतला, तमाम प्रमाणपत्रे मिळविली, तमाम पाककला साध्य केल्या, अशा तमाम गोष्टी तमाम केल्या. आम्ही मात्र अशा तमाम गोष्टींच्या मागे न लागता जिथे अडले, तिथे केले, या पंथाने वाटचाल राखली. अशी एक मोठ्ठी अडवणूक करणारा अत्यावश्यक घटक होता, तो म्हणजे केशकर्तन... अद्यापही त्यासंदर्भातले नर्तन अन् चर्वितचर्वण सुरू असताना बालक सम्यक आणि त्याचा बाप यांच्या केसांनी आपला ग्रोथ रेट सातत्याने वाढता ठेवला होता. एके क्षणी- याचा तो, त्याचा तो अशा पद्धतीने कोणी कोणी साऱ्या दक्षता घेऊन घरी येऊन कर्तन करून जातो, असे संदेशही प्राप्त झाले. मात्र, त्या संदेशांनी मनातील संदेह मात्र कमी झाला नाही. त्यामुळे तो पर्याय बाजूला ठेवला. घरात कात्रीही एकच- किचनची. पोरांच्या कागद कापायच्या कात्र्या पार बोथट झालेल्या, निरुपयोगी साऱ्या. घरात पोरांच्या आईनं जीव उठवलेला, पोराचे केस खूपच वाढलेत, कापायला पाहिजेत... मग प्रश्न पडला, आता काय क्रावे ब्रे? अखेर एका सुरम्य रंगीत रविवारच्या सकाळी उठलो... कीचनमधली कात्री पार निर्जंतूक करून घेतली... पोराला हलवून उठवलं... तोंड धुवून केस ओले करून खुर्चीवर बसवलं... सम्यक- गुणाचं पोर. बापाला प्रोत्साहन देत होतं, ‘बाबा, जमतंय तुम्हाला.. कापा... करा सुरू...’ कंगवा, कात्री घेऊन [मनात ‘नामा’चं (हे नामा माझे निपाणीचे मित्र; मी त्यांच्याकडेच केस कापतो.) स्मरण करून] केली सुरवात साइड कटपासून... पहिले दोन कट पडले बरोबर... पुढे मात्र ओल्या केसांतून लागली की कात्री घसरायला... मग लक्षात आलं, घरात उपलब्ध साधनांच्या सहाय्याने केस कापत असताना केस ओले न करता कोरड्यानेच कापायला हवेत... त्या दिवशी जमेल तसे केस कापले... सम्यक आंघोळ करून आला, डोक्यात केसांच्या लाटा तयार झालेल्या... माझाच धीर खचलेला, पण पोर तरीही आरशात बघून मला सांगतंय कसं, ‘चालतंय हो बाबा, आता कुठं शाळेला जायचंय? पहिल्यांदा असूनही तुम्ही चांगलेच कापलेत.’ भाऱ्यासाठी गवत कापल्यावर जमिनीत खुंट राहावेत, तसे बिचाऱ्याचे डोके मी केलेले... पण, आता म्हटलं पुढच्या खेपेस चूक सुधारायची... डोक्यात केस कापण्याचे विविध पैंतरे घोळू लागले, ट्रीमर वगैरे तमाम साधनसामुग्री अमॅझॉनवरुन मागविण्याचाही पर्याय पडताळून पाहिला. लगेच परवडणारा नव्हता... केस कापायची कात्री सुद्धा साडेतीनशेच्या पुढची... जाऊ दे म्हटलं... आता सारं काही कॉन्फिडन्सच्या बळावर करायचं... यावेळी मात्र पाणी न लावता आणि कंगव्याऐवजी केवळ दोन बोटांच्या मध्ये केसांच्या बटा धरून एकदम बयाजवार कर्तन केलं... एकदम परफेक्ट हेअरस्टाईल जमलेली... आणखी पुढच्या खेपी म्हणजे अगदी परवाच पावसाळ्याच्या तोंडावर पोराचे केस एकदम सुपरफाईन बारीक केले... तीच कात्री अन् तीच दोन बोटे...
मधल्या काळात गरीबाचे (कोण म्हणुनी काय पुसता?) केसही वाढलेले... बायकोला रिक्वेस्ट केली, "जरा मदत करता का?" आमची विनंती साफ अव्हेरली गेली... “असंच कापलंय, तसंच कापलंय, म्हणून पुढच्या कटिंगपर्यंत ऐकून घ्यायची अजिबात इच्छा नाही...” असे शीशाच्या रसासारखे तप्त शब्द कानात ओतले गेले... घ्यावा हातात वस्तरा आणि करून टाकावं आपल्या डोक्याचं मुंडण, असा महाभयंकर विचार मनी आला... पण, तो लगेच आवरता घेतला गेला... कारण टक्कल आणि टोपी, या दोन्ही गोष्टींत आपण खूपच चंपक टाइप दिसतो, असे गरीबाचे स्वतःविषयीचे निरीक्षण आहे... 
गरीबास त्यांचे मोहनलाल दोशी विद्यालयातले पी.के. जोशी सर आठवले... जबरदस्त माणूस आणि शिक्षकही... अभ्यास न करणाऱ्या तमाम पोरांना ते न्हावी (त्या काळात सामाजिक अस्मिता अशा शब्दांशी निगडित नव्हत्या, विषमतापूर्ण वर्तनाशी होत्या.) संबोधत... जसे की, शिंत्रे न्हावी.. जत्राटकर न्हावी... म्हणायचे कसे- ‘मास्तर, तुमी शाणपणा सांगू नका... आमी काय शिकणार न्हाई... आमी न्हावीच होणार... चौकाचौकात दुकानं टाकणार... समोरनं मास्तर सायकलवर टांग टाकून जाताना दिसला की दोरी टाकून त्येला पकडणार... म्हनणार... या मास्तर, तुमची हजामत करतो... मास्तरला खुर्चीवर बशीवनार... तोंडाला साबण फासणार आनि शेवटी मास्तरच्या गळ्यावर वस्तरा ठेवनार... आता मास्तराची दाढी करनार का गळा कापनार, हे आता त्यो हजामत कशी करायला शिकलाय, त्यावर अवलंबून राहनार...’ सरांचा हेतू एकच असायचा की, पोरांनी रोजच्या रोज अभ्यास करावा... पण, त्याबरोबरच शाळा न शिकता एखादं कौशल्य शिकला, तरी ते सुद्धा प्रामाणिकपणानंच आणि परफेक्ट शिकण्याची गरज त्यातून अधोरेखित होत होती, हे आत्ता कळतंय....
गरीबाला त्याचा सायंटिस्ट दोस्त भालूची (भालचंद्र काकडे) सुद्धा आठवण झाली... भालू जपानला असताना अधेमधे आला असताना त्याची हेअरस्टाईल बघून मी म्हटलं, “भाल्या, एकदम जपानी स्टाईलचा हेअरकट झालाय बघ तुझा...” त्यावर खो खो हसत भाल्या उत्तरलेला, “आरं, कुठली स्टाईल न काय? ती जपानी सगळी एकसारखी कशीबी क्येस कापत्यात... स्टाईल बिईल सगळं आपल्याकडंच...” माझ्या डोक्यात त्यावेळी प्रकाश पडला... आपण डोक्याच्या वरच्याच भागाचा विचार करतो नुस्ता... जपानी माणूस मात्र त्या डोक्याच्या वरच्या भागापेक्षा आतल्या मेंदूच्या मशागतीकडं लक्ष देतो, म्हणून जवळजवळ सर्वच क्षेत्रांत ती जगात भारी आहेत...
अशा इन्स्पिरेशनल श्टोरीज आठवत चिडलेले गरीब मग- करतो माझं मीच कटिंग, असं म्हणून तीच कात्री अन् तीच दोन बोटे घेऊन आरशासमोर उभे राहिले... दणादण वाढलेल्या केसांची लेव्हल करीत सुटले... समोरुन लूक चांगला झालेला... प्रश्न मागच्या केसांचा होता... इथे कन्या मदतीला धावली... खुर्ची घेऊन उभी राहिली... आता तिचे डोळेच माझा आरसा बनले... ‘बाबा, इथे... थोडं खाली... हां... हां... करेक्ट’ असं म्हणून मार्गदर्शन करू लागली. आणि काय सांगावे, जमलं की ब्वा... लॉकडाऊनच्या काळात एकदा नव्हे, दोनदा... तेही बऱ्यापैकी परफेक्ट... 
“केशकर्तन ही एक प्रयत्नसाध्य कला आहे... कमीत कमी उपलब्ध साधनांमध्ये ती साधता येते... स्वतःचे केस स्वतःच कापणे, ही दुसऱ्याची हजामत करण्याइतकीच अवघड बाब आहे...” असे अनेक साक्षात्कारही या दरम्यान झाले आहेत... गरीबाचा कॉन्फिडन्स एव्ढा वाढलाय की काय सांगावे... जावेद हबीबकडे महिनाभराचा कोर्स करून सगळ्या जगाच्या हजामती करायला सज्ज होण्याचे मांडे आता तो मनातल्या मनात खातो आहे....

रविवार, १४ जून, २०२०

नोंद एका महान 'स्मृतितरंग'लहरीची!

प्रा. डॉ. आर.व्ही. भोंसले


आज अभिनेता सुशांतसिंह रजपूत यानं अवघ्या ३३व्या वर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्याची बातमी आली. एक अतिशय चांगला अभिनेता असणाऱ्या सुशांतमध्ये परिपक्व होत जाईल, तसतसा उत्तम आणि महान अभिनेता होण्याच्या परिपूर्ण शक्यता असतानाही त्यानं असा निर्णय का घेतला असावा, अशी हळहळ मन कुरतडत असतानाच कोल्हापूरचे महान अवकाश संशोधक प्रा. डॉ. आर.व्ही. भोंसले (दि. १२-११-१९२८ ते १४-६-२०२०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची बातमी आली. आणि एका विरोधाभासानं मला ग्रासलं. पहिला यशाची चव चाखूनही भौतिकतेच्या साऱ्या सुखसुविधांमध्ये लोळत असतानाही असा जीवन संपविण्याचा निर्णय घेतो. आणि दुसरा त्याच्या संशोधनाच्या क्षेत्रातही प्रचंड महान असूनही अत्यंत साधं जीवन जगतो. अगदी नव्वदीमध्येही या जगाला काही उत्तम देण्यासाठी धडपडतो आणि अत्यंत संपृक्त, समाधानी आयुष्य जगून, जगाला चांगलं योगदान देऊन निघून जातो. ही प्रत्येकासाठीच आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे. असो! सुशांतला माझी भावपूर्ण श्रद्धांजली...

आता थोडेसे डॉ. भोंसले यांच्या योगदानाविषयी...

प्रा. भोंसले यांना ते विद्यापीठ कार्यालयात मा. कुलगुरूंना भेटण्यासाठी आले असताना मला व्यक्तीशः एकदाच भेटता आले होते. मात्र, त्यांच्या स्मृतितरंग या चरित्र ग्रंथामुळे मात्र मला त्यांनी भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राला दिलेल्या महान योगदानाची कल्पना आली. एखादा माणूस कार्याने प्रचंड मोठा असून जमिनीशी किती नाते जोडून राहू शकतो, याचे ते मूर्तीमंत प्रतीक होते. (ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे हे सुद्धा कोल्हापूरचे असेच एक महान नररत्न आहे.)

जागतिक स्तरावर अवकाश विज्ञानाच्या अतिगहन क्षेत्रात कार्य करीत असताना आणि त्याची उल्लेखनीय म्हणून तेथे नोंद घेतली जात असतानाही डॉ. भोंसले यांच्या मनातील मातृभूमीची ओढ त्यांना येथे खेचून घेऊन येते आणि येथे परतल्यानंतरही कोल्हापूरचे ऋण फेडण्याचा प्रयत्न ते करतात. त्यासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये अवकाश संशोधन केंद्र स्थापन होऊन त्याचा लाभ इथल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी अथक आणि अखंड परिश्रम करतात, ही कहाणीच मोठी विस्मयजनक आहे. खरे तर, प्रा. भोंसले यांच्या या परिश्रमाला आता गोड फळे येऊ लागलेली आहेत. त्यांचे हे ऋण कधीही विसरता न येणारे आहे.

खरे तर स्मृतितरंग या नावापासूनच मी या चरित्रग्रंथाकडे आकृष्ट झालो. आयुष्यात पहिल्यांदा रेडिओ पाहिल्यापासून तरंगलहरींबद्दल मनात कुतूहल चाळविले जाऊन त्या क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी बजावणाऱ्या एका शास्त्रज्ञाच्या चरित्रनामामध्येही त्या तरंगांचा समावेश होणे, हे अतिशय औचित्यपूर्ण आहे. चरित्रकार पी.टी. पाटील यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक हा चरित्र ग्रंथ साकारला आहे.

डॉ. भोंसले यांचे जीवनकार्य म्हणजे भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राचा आणि शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधनाचा जणू संक्षिप्त समग्रपटच आहे. डॉ. विक्रम साराभाई, डॉ. एकनाथ चिटणीस यांच्यापासून ते अगदी डॉ. जे.पी. नाईक, डॉ. जगदीश शिर्के, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. यु.आर. राव, डॉ. कस्तुरीरंगन, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. अलूरकर, डॉ. देगावकर अशा अनेक महान शास्त्रज्ञांच्या समवेत त्यांनी कार्य केले. किंबहुना, या शास्त्रज्ञांनी डॉ. भोंसले यांच्या समवेत काम केले, असेही आपल्याला म्हणता येईल. डॉ. भोंसले यांनीही आपल्या अनुभवाचा पुरेपूर लाभ या सर्व शास्त्रज्ञांना होऊ दिला. ही फार महत्त्वाची बाब आहे. भारतीय अवकाश संशोधनाचा एक संक्षिप्त आलेख यामधून वाचकाच्या नजरेसमोर साकारला जातो आणि त्यातून डॉ. भोंसले यांचे आपल्या देशासाठीचे योगदानही अधोरेखित होत जाते.

देशासाठी योगदान देत असतानाच कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ देण्यासाठी त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून जे असाधारण प्रयत्न केले, त्याला तोड नाही. पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीतच असलेल्या या विद्यापीठात काळाच्या पुढे जाऊन अवकाश संशोधनाची पायाभरणी करण्याचे एक अतिशय महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.

पन्हाळा येथे अत्यंत द्रष्टेपणाने अवकाश संशोधन केंद्रासाठीच्या जागेचे प्रयोजन करून ठेवणे आणि त्यासाठी सातत्याने वीस वर्षांहून अधिक काळ पाठपुरावा करणे, या कामी त्यांनी दिलेले योगदान अपूर्व आहे. म्हणूनच आज शिवाजी विद्यापीठाच्या या केंद्रात भारत सरकारच्या अतिशय महत्त्वाकांक्षी अशा आय.आर.एन.एस.एस. या उपग्रह प्रकल्पामधील सॅटेलाईट रिसिव्हर बसविण्यात आला आणि तो अत्यंत कार्यक्षमपणे कार्यरत आहे. येथे मिळणारी निरीक्षणेही भारतातील अन्य रिसिव्हर्सपेक्षा अधिक अचूक असल्याचे इस्रोने कळविले आहे. हे केंद्र अधिकाधिक सक्षम करण्याचे प्रयत्न विद्यापीठाकडून सुरू आहेत.

या चरित्राच्या माध्यमातून डॉ. स्मृतिका पाटील या शिवाजी विद्यापीठातून अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात सर्वप्रथम पीएच.डी. झालेल्या विद्यार्थिनीची माहिती माझ्या वाचनात येऊ शकली, ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते.

पीएचडीचे संशोधन करीत असताना डॉ. भोंसले यांनी भारतातील पहिला रेडिओ टेलिस्कोप तयार केला. ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. त्यासाठी त्यांनी चरित्रातील दोन चार पाने खर्ची घातली असती, तरी चालण्यासारखे होते. मात्र, ही बाब ते अवघ्या तीन वाक्यांत सांगून रिकामे होतात. इतका प्रांजळपणा त्यांच्या व्यक्तीमत्त्वात होता. त्याचप्रमाणे सूर्यावरील महास्फोटांमुळे रेडिओ लहरींचे आयनोस्फेरिक शोषण दाखविणारा जागतिक पातळीवरील एकमेव पुरावा मिळविणारे पहिले शास्त्रज्ञ असूनही त्याविषयीचा उल्लेखही अवघ्या एका वाक्यात करून रिकामे होतात. त्या दृष्टीने या चरित्राच्या मलपृष्ठावरील कॉस्मिक नॉइज दर्शविणारा आलेख संशोधकीयदृष्ट्या फार महत्त्वाचा दस्तावेज आहे.

स्मृतितरंग हे डॉ. भोंसले यांचे चरित्र म्हणजे अवकाश संशोधनातील नोंदींचा एक अमूल्य ठेवाच आहे. एक शास्त्रज्ञ जागतिक पातळीवर प्रचंड मोठी कामगिरी बजावल्यानंतर सुद्धा त्या लोकप्रियतेच्या लहरींवर तरंगत वर आकाशात न उडता जमिनीशी किती अतूट नाते जोडून राहतो, याचे प्रत्यंतर म्हणजे डॉ. आर.व्ही. भोंसले यांचे जीवन व कार्य होय. त्यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्त्वापासून युवा पिढीने प्रेरणा घेऊन आपल्या देशासाठी योगदान द्यायला सज्ज होण्याचा संदेश घेण्याची गरज आहे. डॉ. भोंसले सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!