रविवार, ९ ऑक्टोबर, २०१६

सोशल मीडियातील उलाढाली(रविवार, दि. ९ ऑक्टोबर २०१६ रोजी 'दै. पुढारी'च्या साप्ताहिक बहार पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचकांसाठी दै. पुढारीच्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)

सप्टेंबर महिना गुगल कंपनीच्या दृष्टीनं तसा महत्त्वाचाच! कारण अठरा वर्षांपूर्वी याच महिन्यात लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन या दोघांनी गुगलची स्थापना केली. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर सिलीकॉन व्हॅलीतली एक स्टार्ट-अप कंपनी असणाऱ्या गुगलचा केवळ कंपनी म्हणून नव्हे, तर एक 'क्रियापद' होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारं गुगल आपल्या दैनंदिन जीवनातला वाटाड्याच बनला आहे.
यंदाच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर गुगल मायक्रोब्लॉगिंगमधली दिग्गज कंपनी असणाऱ्या ट्विटरला ॲक्वायर करणार असल्याच्या बातम्या फुटल्या. सद्यस्थितीत ही बातमी अफवा असल्याचं म्हटलं असलं तरी आग असल्याखेरीज धूर येत नाही. कारण गुगलबरोबरच डिस्ने, मायक्रोसॉफ्ट, सेल्सफोर्स डॉट कॉम या कंपन्या सुद्धा या स्पर्धेत असल्याचं स्पष्ट झालं. हे डील फायनल झालं नसलं तरी, त्याचा ट्विटरला मात्र तातडीनं फायदा झाला. ट्विटरच्या शेअर्सनी तीन वर्षांतली सर्वात मोठी, २१ टक्क्यांनी उसळी मारली. या निमित्तानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत दिग्गज कंपन्यांमधला अस्तित्वाचा संघर्ष पुन्हा एकदा सामोरा आला. विशेषतः सोशल मीडियामध्ये कार्यरत कंपन्यांकडं साऱ्यांचं विशेष लक्ष असल्याचं दिसतं.  विशेष म्हणजे गुगल हा या मर्जर आणि ॲक्विझिशनमधला मंझला हुआ खिलाडी आहे.
अमेरिकेच्या सिलीकॉन व्हॅलीमध्ये आयटीमधल्या अनेक छोट्या छोट्या स्टार्टअप कंपन्या आहेत. ताज्या दमाचे प्रयोगशील संगणक अभियंते तिथं सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून नवनवीन उत्पादने, सेवांची निर्मिती करीत आहेत. अशा स्टार्ट-अप्सकडं गुगल सुरवातीपासून लक्ष ठेवून असतं. या माध्यमातून मार्केटमध्ये नवीन, अभिनव असं जे काही येईल, त्याला आपल्याशी जोडून घेण्यास गुगल उत्सुक असतं. याचं कारणच असं आहे की, या क्षेत्रात केवळ एकच नियम लागू होतो, तो म्हणजे, द ओन्ली कॉन्स्टंट इज चेंज. वापरकर्त्याला नवं असं जर काही तुम्ही देऊ शकला नाहीत, तर तो त्याच-त्या पणाला कंटाळून दुसरीकडे जाऊ शकतो. नेमकी हीच बाब टाळण्यासाठी गुगलनं या स्टार्टअप्सच्या माध्यमातून स्वतःला गेली अठरा वर्षे सातत्यानं अपडेट ठेवलं आहे. या संदर्भात लॅरी पेज यांचं एक साधं-सोपं वन लाइनर तत्त्वज्ञान आहे. त्याला ते 'टूथब्रश टेस्ट' म्हणतात. म्हणजे काय तर, असं उत्पादन जे लोक दिवसातून किमान एक-दोनदा तरी वापरतात आणि जे त्यांच्यासाठी नियमितपणे उपयुक्त ठरेल, ते! लॅरी म्हणतात, ही टुथब्रश टेस्ट उत्तीर्ण होणारं उत्पादन आणि तेही माहिती तंत्रज्ञानाशी निगडित असेल, तर त्यामध्ये मला रस असतो. केवळ या तत्त्वज्ञानाच्या बळावर गेल्या अठरा वर्षांत गुगलनं आपलं स्थान भक्कम केलंय. सन २०१०पासूनचा विचार केला तर, गुगलनं सरासरी आठवड्याला एक या प्रमाणं जून २०१६पर्यंत सुमारे १९०हून अधिक विविध कंपन्या खरेदी केल्या आहेत. या खरेदी केलेल्या कंपन्यांनी डेव्हलप केलेल्या सॉफ्टवेअरच्या आधारे गुगलनं आपल्या विविध सेवा विकसित करून वापरकर्त्यांना पेश केल्या आहेत. गुगलनं अगदी पहिली कंपनी घेतली ती देजा न्यूज. त्यांची युजनेट ही सेवा गुगलनं गुगल ग्रुप्स म्हणून सादर केली. पायरा लॅब्ज आणि जिनिअस लॅब्ज या कंपन्या घेऊन ब्लॉगर ही वेब लॉगिंग सेवा सादर केली. डॉजबॉल घेऊन गुगल लॅटिट्यूड, जॉटस्पॉट घेऊन गुगल साइट्स, ग्रँड सेंट्रल कंपनीची व्हॉइस ओव्हर आयपी सेवा गुगल व्हॉइस म्हणून, नेक्स्ट न्यू नेटवर्कची व्हिडिओ शेअरिंग सेवा युट्यूब नेक्स्ट लॅब म्हणून सादर केली. ऑनलाइन जाहिरातीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या खरेदी करून ॲडसेन्स, ई-बुक पब्लिशिंगच्या क्षेत्रातील कंपन्या घेऊन गुगल बुक्स अशा सेवा सुरू केल्या. त्याखेरीज अँड्रॉईड, युट्यूब, पिकासा आदी कंपन्याही काळाची पावलं ओळखून कोट्यवधी डॉलर्स देऊन खरेदी केल्या आणि आपला मार्केटमधला वरचष्मा कायम राखला. मोटोरोला मोबिलीटी कंपनीसोबतचं सुमारे १२.५ अब्ज डॉलर्सचं त्यांचं डील हे गुगलचं सर्वाधिक किंमतीचं ठरलं आहे.
केवळ अमेरिकेतीलच नव्हे, तर जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फिनलंड अशा विविध देशांतील अभिनव सॉफ्टवेअर निर्माण करणाऱ्या स्टार्टअप कंपन्या एकापाठोपाठ एक ताब्यात घेत गुगल माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जायंट कंपनी बनत असताना दुसरीकडे फेसबुकने सुद्धा गुगलचाच कित्ता गिरवलेला दिसतो. फेसबुकनंही ५०हून अधिक कंपन्या खरेदी केलेल्या आहेत. त्या बहुतांश अमेरिकेतील आणि सॅन फ्रॅन्सिस्को बे एरियातीलच आहेत. पण या मर्जर व ॲक्विझिशनमध्ये मार्क झुकेरबर्गचं तत्त्वज्ञान वेगळं आहे. तो म्हणतो, मी कंपनी घ्यायची म्हणून घेत नाही, तर त्या कंपनीमधलं टॅलेंट मला हवं असतं. त्या तज्ज्ञ लोकांसाठी खरं तर मी या कंपन्या घेतो. झुकेरबर्गचं म्हणणं खरं आहे कारण त्यानं टेकओव्हर केलेल्या वॉट्सॲप व इन्स्टाग्राम वगळता सर्व कंपन्या मूळ फेसबुक कंपनीतच विलीन करण्यात आल्या. वॉट्सॲपसाठी सुमारे १९ अब्ज डॉलर मोजताना फेसबुकनं वॉट्सॲपच्या एका वापरकर्त्यासाठी जवळजवळ ४० डॉलर मोजले, असं म्हणता येईल. फेसबुकचं सोशल मीडियामधील वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी कनेक्टयू या बंद पडलेल्या कंपनीसह एफबी डॉट कॉम हे डोमेनही खरेदी करायला मागंपुढं पाहिलं नाही. फ्रेंडस्टर या स्पर्धक कंपनीकडून बौद्धिक संपदा हक्क मिळविण्यासाठी ४० दशलक्ष डॉलर्स मोजले. या खेरीज फेसबुकमध्ये नित्यनवे बदल घडविण्यासाठी, नवी व्हेंचर्स हाती घेण्यासाठी अनेक स्टार्टअप कंपन्या खरेदी केल्या. त्या कंपन्यांच्या माध्यमातून कितीतरी टॅलेंटेड, प्रयोगशील अभियंते फेसबुकमध्ये दाखल झाले. यामध्ये ब्लॅक रॉस, जो हेवीट (पॅराकी), पॉल बुशेट, ब्रेट टेलर (फ्रेंडफीड), चार्ल्स लीन, ॲड्रियन ग्रॅहम (नेक्स्टस्टॉप), निकोलस फेल्टन (डे-टम), माईक मेटास (पुश पॉप प्रेस), चार्ल्स जॉली (स्ट्रोब), जेन कोअम (वॉट्सअप), पामर ल्युकरी, ब्रेंडन आयरीब व जॉन डी. कार्मेक (ऑक्युलस व्हीआर) अशा दिग्गज सीईओ व अभियंत्यांची फौज फेसबुकमध्ये त्यांच्या त्यांच्या कंपन्यांसोबत दाखल झाली. महत्त्वाचे म्हणजे संजीव सिंग (फ्रेंडफीड), गोकुळ राजाराम व गिरी राजाराम (चाय लॅब्ज), नीलेश पटेल (लाइटबॉक्स डॉट कॉम), अविचल गर्ग (स्पूल) अशा अनेक भारतीय वंशाच्या अभियंत्यांचाही यात समावेश आहे.
फेसबुकप्रमाणंच ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग कंपनीनंही ५०हून अधिक स्टार्टअप कंपन्या ताब्यात घेऊन आपला पसारा जगभर वाढविला आहे. तरी सुद्धा आता या एका वैशिष्ट्यपूर्ण कंपनीला आता आणखी मोठ्या कंपनीच्या ताब्यात जावे लागणार असल्याची चाहूल लागली आहे. कधी कोणी विचारही केला नसेल, अशा सर्च इंजिन व इ-मेलच्या बाबतीत दादा कंपनी असलेल्या आणि शंभरहून अधिक कंपन्या विलीन करवून घेणाऱ्या याहूला सुद्धा आता व्हेरिझॉनने टेकओव्हर केले आहे. ही प्रक्रिया पुढील मेपर्यंत पूर्ण होईल. या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ॲक्विझिशन यदाकदाचित झाले तरी आश्चर्याची बाब ठरू नये.
भारतातही ई-कॉमर्स कंपन्यांच्या बाबतीत अशा प्रकारची स्पर्धा पाहायला मिळते आहे. सन २०१४मध्ये या क्षेत्रात एक महत्त्वाचे मर्जर पाहायला मिळाले. फ्लिपकार्टनं सुमारे ३३० दशलक्ष डॉलर (२००० कोटी रुपये) मोजून मिंत्रा ही ई-टेलिंग कंपनी टेकओव्हर केली. हा भारतातला आजवरचा ई-कॉम मधला सर्वात मोठा सौदा ठरला. तत्पूर्वी, आयबिबोनं रेडबस घेण्यासाठी १०० दशलक्ष डॉलर मोजले होते. आता जागतिक पातळीवर जशी ट्विटरच्या मर्जरची चर्चा आहे, तशीच भारतात आता आणखी एका विलीनीकरणाची चर्चा आहे, ती म्हणजे स्नॅपडीलच्या. दुसऱ्या क्रमांकाची भारतीय ऑनलाइन रिटेलिंग कंपनी असणारी स्नॅपडील ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टमध्ये विलीन होणार, अशी चर्चा होती, मात्र या तिन्ही कंपन्यांनी अशा प्रकारची कोणतीही चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
मार्केटमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या असतील, त्यांच्यात एकमेकांशी स्पर्धा होणार असेल, तर ही स्पर्धा कमी करून विरोधक कंपन्याच ताब्यात घेऊन त्यांचे आव्हान मोडीत काढण्याची मल्टिनॅशनल कंपन्यांची पूर्वापार परंपरा आहे. पेप्सी आणि कोका-कोला कंपन्या भारतात आल्या, तेव्हा येथील स्थानिक पारलेसह अन्य स्पर्धक कंपन्यांचे ब्रँड्स त्यांनी खरेदी करून टाकले.
तशाच प्रकारची स्पर्धा आता या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांना करावी लागणार आहे. या ठिकाणी वेगळेपण म्हणजे तुम्ही अभिनव, प्रयोगशील असाल, काही नवनिर्मिती केली असेल, तर तुम्ही म्हणाल ती किंमत या कंपन्या त्यासाठी मोजण्यास तयार आहेत. माहिती तंत्रज्ञान, विशेषतः सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना त्यांचा वापरकर्ता ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने दक्ष असावे लागते. ठराविक काळ एखादे ॲप वापरल्यानंतर वापरकर्ता कंटाळून नवे काही शोधण्याच्या नादात अन्य कंपनीच्या उत्पादनाकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या वापरकर्त्याला आपल्याच प्लॅटफॉर्मवर सातत्याने नवनवीन काही तरी देण्याचा या कंपन्यांचा प्रयत्न असतो. अशा नाविन्याचा शोध ही त्यांची फार मोठी गरज असते. ती गरज भागविणारा बाजारात कोणी उपलब्ध असेल, तर त्याच्याकडून ती अगदी त्याच्यासह घेण्याची या कंपन्यांची तयारी असते. त्यामुळे स्टार्टअप कंपन्यांना याचा मोठा लाभ होऊ शकतो.

भारताच्या दृष्टीने या स्टार्टअपचे महत्त्व म्हणजे एक तर अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया या मोहिमेअंतर्गत नवतरुणांना, नवउद्योजकांना विविध उद्योग-व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचाही समावेश आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अशा छोट्या छोट्या स्टार्टअप कंपन्या उभ्या राहण्याची शक्यता वाढीस लागली आहे. आपल्या युवकांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये सृजनशीलता मोठ्या प्रमाणात आहे. ती टॅप करण्याचे प्रयत्न या माध्यमातून सुरू आहेत. ही झाली आपल्या देशातील बाब. मात्र, तिकडे सिलीकॉन व्हॅलीमध्ये आजघडीला जितक्या प्रयोगशील स्टार्टअप कंपन्या आहेत, त्यामध्ये भारतीयांनी स्थापन केलेल्या कंपन्यांचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक आहे. केवळ स्टार्टअपमध्येच नव्हे, तर मार्केट लीड करणाऱ्या कंपन्यांचे लीडरसुद्धा भारतीय आहेत. यामध्ये सुंदर पिचाई (सीईओ, गुगल), सत्या नाडेला (सीईओ, मायक्रोसॉफ्ट), शंतनु नारायण (सीईओ, ॲडोब सिस्टीम्स), संजय झा (सीईओ, ग्लोबलफाऊंड्रीज), अजय बांगा (सीईओ, मास्टरकार्ड), पद्मश्री वॉरियर (सीईओ, नेक्स्ट-ईव्ही, फॉर्मर सीटीओ, सिस्को), विनोद खोसला (सीईओ, खोसला व्हेंचर्स), अमित सिंघल (निवृत्त सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट, गुगल), रुची संघवी (फेसबुकची पहिली महिला अभियंता), दीपक अहुजा (सीएफओ, टेस्ला मोटर्स), पूजा शंकर (सीईओ, पिआझ्झा), कवितार्क राम श्रीराम (फाऊंडर बोर्ड मेंबर, गुगल), रश्मी सिन्हा (सह-संस्थापक, स्लाईड शेअर) आदींचा समावेश आहे. याखेरीज मधल्या आणि वर्किंग स्टेजमधील भारतीय अभियंत्यांची संख्याही लक्षणीय आहे. सिलीकॉन व्हॅलीमधील भारतीयांचे जागतिक स्टार्टअप क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे यावरुन लक्षात येईल. ते पाहता भारतातील स्टार्टअप अभियान आणि सिलीकॉन व्हॅलीमधील स्टार्टअप यांची सांगड घालण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. स्टार्टअप कंपन्यांना सध्या सुरू असलेल्या मर्जर आणि ॲक्विझिशनच्या प्रक्रियांमध्ये मोठे महत्त्व आले असल्याचे एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल. मोठा मासा छोट्या माशांना खाऊन अधिक मोठा अधिक बलशाली होतो, हे नैसर्गिक सत्य असले, तरी आपल्या क्रिएटिव्हीटीचे, सृजनशीलतेचे नाणे खणखणीत वाजवून त्या माशाकडून होणारा लाभ पदरात पाडून घेण्याची हीच योग्य वेळ आहे.