माणसाच्या
आयुष्यात संघर्ष हा नित्याचाच. इथं प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या संघर्षात
गुंतलेली आहे. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, प्रत्येकाचे ध्येय वेगळे आणि ते साध्य
करण्याच्या वाटाही निरनिराळ्या. तिथं माणसाचं लहान-मोठेपण किंवा इतर कोणत्याही
भेदांनी फरक पडत नाही. या संघर्षाच्या वाटा जिथं एकमेकांना छेदतात किंवा खूपच
समांतर धावायला लागतात, तेव्हा त्याला स्पर्धेचं स्वरुप येतं- अगदी जीवघेण्या.
हा
संघर्ष मुळात कशासाठी असतो आणि येतो कोठून, याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं
की पहिली गोष्ट असते, ती जगणं. जगण्यासाठी प्रत्येकाला काही मूलभूत बाबींची
आवश्यकता असते. त्या मूलभूत गरजांची पूर्तता जर नैसर्गिकरित्या होत नसेल, तर त्या
मिळविण्यासाठीचा संघर्ष हा आपल्या आयुष्यात सर्वप्रथम येतो. हवा, अन्न आणि पाणी या
त्यातल्या सर्वाधिक मूलभूत. चांगल्या निर्मळ हवेवर अधिकार सर्वांचाच असायला हवा.
पण, प्रत्यक्षात माणसानंच प्रगती आणि उन्नतीच्या नावाखाली ती प्रदूषित करून टाकली
आहे. तेव्हा चांगलं पर्यावरण मिळविण्यासाठीचा झगडा, ही आपली प्राथमिक गरज आणि
जबाबदारी असली, तरी आपल्या प्राधान्यक्रमावर तिचा क्रमांक कुठं तरी खूप खाली
लागतो. कोविडच्या कालखंडात ऑक्सिजनच्या एकेका श्वासाअभावी टाचा घासून आपल्यातले
किती तरी जण टाचा घासून मृत्यूमुखी पडले, तरी हे शहाणपण आपल्याला येत नाही. काय
म्हणावं याला?
पुढला
संघर्ष हा पाण्यासाठीचा आहे. जी गोष्ट हवेची, तीच पाण्याच्या बाबतीतही आपण करून
ठेवली आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि त्या औद्योगिकीकरणाला प्रदूषण नियंत्रणाच्या
ज्या अटी आहेत, त्यांना पळवाटा निर्माण करून देणारी व्यवस्थेतीलच यंत्रणा, यामुळं
आज नद्याच्या नद्या, पाणवठेच्या पाणवठे प्रदूषणाचे वाहक झाले आहेत. ज्या
जीवनवाहिन्यांचे काठ धरून जगातल्या महानतम संस्कृती विकसित झाल्या, त्या
जीवनवाहिन्यांचाच जीव या संस्कृतीच्या वाहकांनी आज गुदमरुन टाकला आहे.
हे
हवापाण्याचं प्रदूषण अन्नामध्येही उतरलं आहे. आपला सारा झगडा हा पोटाची दोन
वेळच्या भुकेची आग शमविण्यासाठी मांडलेला आहे. मात्र, तिथं तर प्रचंड विषमतेनं रान
व्यापलं आहे. देशातल्या साधनसंपत्तीचं कधी नव्हे इतकं विषम वाटप होऊ लागलेलं आहे.
देशाची ९० टक्के संपत्ती २ टक्के लोकांच्या हाती, आणि ९८ टक्के लोकसंख्येसाठी अवघी
१० टक्के संपत्ती. संघर्षाचं, सर्वसामान्य, गरीब माणसाच्या दोन वेळच्या अन्नासाठी
होणाऱ्या दमछाकीचं मूळ इथं एकवटलं आहे.
माणसाच्या
हवा, पाणी आणि अन्न या नैसर्गिक मूलभूत गरजांचंच जिथं शमन होऊ शकत नाही, तिथं
वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आदी वर्धित गरजा भागणं, या परिस्थितीत कसं बरं
शक्य आहे? त्यासाठीचा झगडा तर आणखीच मोठा. तो झगडा मांडत
असताना मग जर कोणी चोरीसारख्या वाममार्गाचा अवलंब करू लागला तर तो दोष कोणाला
द्यायचा? त्या व्यक्तीला की त्या कृत्यासाठी त्याला भाग
पाडणाऱ्या या व्यवस्थेला?
मुळात
व्यवस्था म्हणजे वेगळं असं काही नसतंच ना! तीही
तुमच्या आमच्यातले लोकच राबवितात. म्हणजे मग समस्या आहे ती राबविणाऱ्या मनांची,
मानसिकतेची आणि हातांची. मुद्दा केवळ भौतिक संपत्तीचा नाही, तो सर्वसमावेशक
उन्नतीचा आहे. मानवी समाजाची एकात्मिक उन्नती साधायची तर त्याला भौतिक
साधनांपेक्षाही नैतिक उन्नयन करणाऱ्या साधनांची आणि नियमनाची मोठी गरज आहे. ही गरज
लक्षात येऊन ती भागविण्याचे दिशादर्शन करणारे महामानव या भूमीवर अडीच हजार
वर्षांपूर्वी होऊन गेले आहेत आणि त्यांच्या संदेशांची कधी नव्हे इतक्या प्रकर्षाने
अवलंब करण्याची जाणीव करून देण्याची ही घटिका आहे. तथागत गौतम बुद्ध आणि भगवान
महावीर या क्षत्रिय कुळात जन्मलेल्या महामानवांनी अखिल मानवजातीला तिच्या
उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे.
भगवान
बुद्ध मानवाला त्याच्या दुःखनिवृत्तीचा मार्ग दाखवून देतो. जगात दुःख आहे, दुःखाला
कारण आहे, हे दुःख पूर्णपणे नष्ट केले जाऊ शकते आणि दुःख दूर करण्यासाठी मार्ग
आहे, ही चार आर्यसत्ये बुद्ध सांगतात. त्यासाठी लौकिक आयुष्यात अहिंसा, सत्य
बोलणे, चोरी न करणे, अव्यभिचार आणि आसक्तीपासून दूर राहणे या पंचशीलाचा अवलंब
करण्याचा मार्ग बुद्ध जगाला दाखवितात. ज्या व्यक्तीला आयुष्य सुखाने जगावयाचे
असेल, त्याने योग्य दृष्टीकोन, उचित निर्धार, उत्तम वाणी, चांगले कर्म, संतुलित
उपजीविका, मानसिक शुद्धता, सशक्त व्यक्तीमत्त्व विकास आणि सम्यक समाधी या
अष्टांगमार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
भगवान
महावीरही यापेक्षा काही वेगळे सांगत नाहीत. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि
ब्रह्मचर्य याच पाच मूल्यांच्या आधारे एक चांगले जीवन व्यतित करता येऊ शकते आणि
मनुष्याने त्याच मार्गाने स्वतःही जगले पाहिजे आणि इतरांनाही जगू दिले पाहिजे; पक्षी,
जगण्यास मदत केली पाहिजे, असे महावीर सांगतात.
आपल्याला
ही मूल्ये काही नव्याने सांगितली गेली आहेत किंवा आज प्रथमच त्यांचा उच्चार होतो
आहे, अशातला भाग नाही. गेली २५०० वर्षे त्यांचे उच्चारण केले जात आहे, अनुसरण केले
जात आहे. मात्र, प्रत्यक्ष त्यांचे पालन करणाऱ्यांची संख्या घटत चालली असल्यामुळे
आज आपण ज्या समस्त समस्यांना सामोरे जात आहोत, त्या उद्भवल्या आहेत. आज भोवतालात
सारंच या महामानवांच्या संदेशाच्या विपरित आचरण दृष्टीस पडत आहे. शारीरिक, मानसिक
हिंसेच्या घटना पदोपदी घडताहेत. असत्याचा बाजार पूर्णपणे तेजीत आहे. भौतिक तर आहेतच,
पण मनोकायिक चोरीचे, व्यभिचाराचे प्रकारही भोवतालात नित्य व्याप्त आहेत. सारं केवळ
मला आणि मलाच मिळायला हवं, इतरांपेक्षा माझ्याकडे अधिकचं हवं, ही भावना
प्रत्येकाच्या मनात उद्रेक घडवित आहे. त्यातून सारा मोहमायांचा आणि संपत्तीसंचयाचा
आणि अखेरीस संघर्षाचा माहौल उद्भवित आहे.
गेल्या
अडीच हजार वर्षांपासून बुद्ध-महावीर आपल्यातल्या मानवतेला आव्हान देणाऱ्या या
गोष्टींबाबत आपल्याला पदोपदी सावध करीत आहेत, आपल्यातल्या जीवघेण्या संघर्षाचं मूळ
दाखवून देत आहेत, पण आपण त्यांचं कधीच ऐकत नाही. पण, कधी तरी त्यांचं ऐकण्याखेरीज
मानवतेला पर्याय राहणार नाही कारण तेव्हा आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं
ठाकलेलं असेल. म्हणूनच त्यांचं स्मरण नित्य करीत राहणं अन् करवून देत राहणं
महत्त्वाचंय!
(लेखक माध्यम व जनसंपर्क व्यावसायिक आहेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा