मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

सत्यशोधकीय नियतकालिकांच्या योगदानाची समग्र, वस्तुनिष्ठ गाथा



(सत्यशोधक चळवळीचे गाढे अभ्यासक डॉ. अरुण शिंदे यांच्या 'सत्यशोधकीय नियतकालिके' या पुस्तकाविषयी लिहीलेले समीक्षण 'समाज प्रबोधन पत्रिके'च्या ताज्या अंकात प्रकाशित झाले आहे. ते माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)


डॉ. अरुण शिंदे


आधुनिक भारताच्या जडणघडणीत, पायाभरणीत सत्यशोधक विचारांचे अमूल्य योगदान आहे. महात्मा फुले यांच्या संकल्पनेतून भारतीय समाजात सामाजिक समतेचा पुरस्कार व प्रस्थापना करण्याच्या हेतूने उदयास आलेल्या सत्यशोधक विचारवंतांनी १८७७ ते १९३० असा सुमारे अर्ध्या शतकाहून अधिक काळ भारतीय समाजमानसाची मशागत केली. हा कालखंड अत्यंत गतिमान घडामोडींनी युक्त असा होता. एकीकडे टिळक-गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय राजकीय स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात आली असताना त्याचवेळी सामाजिक, सांस्कृतिक स्वातंत्र्यासाठीचा सत्यशोधकी लढाही निर्णायक पद्धतीने सुरू होता. या दोन्ही बाबींच्या पुरस्कर्त्यांमध्ये परस्परांच्या चळवळींविषयी वैचारिक मतभेद असले तरी त्या चळवळी अत्यंत परस्परपूरक होत्या, हे आता इतिहासमान्य आहे. किंबहुना, राजकीय स्वातंत्र्य अगर सामाजिक स्वातंत्र्य यांसाठी सुरू असलेल्या चळवळींपैकी एक बाजू जरी लंगडी पडली असती तरी सुद्धा भारतीय स्वातंत्र्य हे चिरकाल टिकू शकले असते का, याविषयी संदेह आहे.
या पार्श्वभूमीवर, भारताचा इतिहास अभ्यासत असताना अगर शिकविला जात असताना राजकीय स्वातंत्र्य चळवळीला जितके महत्त्व दिले जाते, तितके सामाजिक स्वातंत्र्याच्या चळवळीला अजिबातच दिले जात नाही. ज्याला या गोष्टीचा स्वतंत्र विशेष अभ्यास करावासा वाटतो, त्यालाच त्याचे महत्त्व समजून येऊ शकते. त्यामुळे स्वाभाविकतः भारतासारख्या हजारो जातींनी आणि त्यांच्या आपसांतील भेदांनी, लढ्यांनी युक्त अशा जगङ्व्याळ देशाचे अखंडत्व अबाधित राखण्यासाठी ज्या सामाजिक विचारधारांनी कार्य केले, समाजमानस तयार केले, त्यांचा अभ्यास, त्यांचे कार्य मात्र बाजूला पडले, हे सखेद नमूद करावे लागते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे विचार आणि त्या विचारांतून निर्माण झालेल्या स्फुल्लिंगांतून ज्या नेत्या-कार्यकर्त्यांची मने समाजनिष्ठेने भारून चेतविली गेली, त्या सर्वांच्या विचार-कार्यांतून प्रबोधनाचे एक नवे पर्व उदयास आले. या प्रबोधनामध्ये सत्यशोधक विचारांच्या नियतकालिकांनी अर्ध्या शतकाहून अधिक काळ समाजमानस घडविण्याचे, प्रबुद्ध करण्याचे कार्य केले. मात्र, सत्यशोधक चळवळीच्या अभ्यासाप्रमाणेच या नियतकालिकांचे कार्यही कालपटलाबरोबर विस्मृतीत जाऊन दडले. तथापि, अलिकडच्या काळात विद्यापीठीय संशोधनांच्या माध्यमातून या सत्यशोधकीय नियतकालिकांचा अभ्यास होऊ लागला असून त्यामधून त्यांची विविध वैशिष्ट्येही सामोरी येऊ लागली आहेत. मात्र, विद्यापीठीय संशोधनाच्या मर्यादांमध्ये समग्र अभ्यासाची मर्यादाही कालमर्यादेमुळे समाविष्ट असते. साहजिकच, सदर नियतकालिकांचा तुकड्या-तुकड्यांमध्ये अभ्यास झाला. त्यातून काही कंगोरे नजरेसमोर आले. मात्र, एक समग्र चित्र काही साकार होऊ शकलेले नव्हते.
सत्यशोधक नियतकालिकांच्या अभ्यासासंदर्भातील नेमकी हीच बाब हेरून संशोधकीय पद्धतीवरील मांड अजिबात सैल न होऊ देता अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने सत्यशोधक नियतकालिकांच्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांचा, प्रबोधनाच्याही पुढे जाऊन त्यातील चिरंतन साहित्यिक मूल्यांचा वेध घेण्याची कामगिरी सत्यशोधक चळवळीचे अत्यंत गाढे अभ्यासक डॉ. अरुण शिंदे यांनी त्यांच्या सत्यशोधकीय नियतकालिके या संशोधन ग्रंथाच्या माध्यमातून केली आहे. डॉ. शिंदे यांचा सुमारे ५३२ पृष्ठांचा हा संशोधन ग्रंथ म्हणजे सत्यशोधक नियतकालिकांच्या भारतीय सामाजिक स्वातंत्र्यामधील योगदानाचा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यापुढे जाऊन भारताच्या सांस्कृतिक व साहित्यिक परीघामध्ये सत्यशोधक चळवळीच्या नियतकालिकांच्या योगदानाची अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने दखल घेऊन त्यांच्या कार्याची पोहोचपावती देणारा, कृतज्ञता व्यक्त करणारा आद्य ग्रंथ आहे, हेही आवर्जून नमूद करायला हवे.
आजवर अनेक संशोधकांनी सत्यशोधक चळवळीतील वृत्तपत्रे, नियतकालिकांची प्रबोधनाच्या अंगाने, त्यांच्या सामाजिक जाणीवा निर्मितीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात चिकित्सा केली आहे. स्वतः डॉ. अरुण शिंदे यांनी सार्वजनिक सत्यधर्म, सत्यशोधकांचे शेतकरीविषयक विचार, सत्यशोधक केशवराव विचारे आणि मुकुंदराव पाटील यांच्या कथा या ग्रंथांच्या माध्यमातून सत्यशोधक चळवळ आणि तीत कार्यरत असणारे विचारवंत-कार्यकर्ते यांच्या कार्याचा वेध घेतला आहे. उपरोक्त मुकुंदराव पाटील यांच्या कथा या ग्रंथामध्ये सदर सत्यशोधकीय नियतकालिके या ग्रंथाच्या संकल्पनेचे बीज डॉ. शिंदे यांच्या मनात रुजले असावे, असे मला वाटते. सदर ग्रंथामध्ये त्यांनी सत्यशोधक नियतकालिकांच्या अतिव्याप्त योगदानाची तितकीच समग्र आणि सर्वंकष नोंद या ठिकाणी घेतलेली आहे. साधारणपणे सात प्रकरणांत सदर ग्रंथाची मांडणी करण्यात आली आहे. पहिल्या तीन प्रकरणांत अनुक्रमे सत्यशोधक चळवळ, सत्यशोधकीय नियतकालिकांचे स्वरुप आणि सत्यशोधकीय नियतकालिकांमधील वैचारिक साहित्य यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. सत्यशोधक चळवळीचा अभ्यास करणाऱ्या बहुतेकांच्या अभ्यासाचा शेवट या ठिकाणी होत असतो. मात्र, पुढील चार प्रकरणे ही सत्यशोधक चळवळीच्या खऱ्या कार्याला, त्यांच्या साहित्यिक योगदानाला न्याय देणारी अशी आहेत. यामध्ये सत्यशोधकीय नियतकालिकांमधील कविता, सत्यशोधकीय नियतकालिकांतील कादंबऱ्या, सत्यशोधकीय नियतकालिकांतील कथा आणि सत्यशोधकीय नियतकालिकांतील नाट्यरुप वाङ्मय असा समग्र साहित्यिक वेध घेण्यात आला आहे. डॉ. आ.ह. साळुंखे यांनी आपल्या मलपृष्ठावरील टिपणीत असा विस्तृत ग्रंथ मराठीत प्रथमच येत आहे, असे म्हटले आहे, ते अत्यंत खरे आहे. केवळ सत्यशोधकीय वृत्तपत्रांच्या इतिहासाची जंत्री न देता गेल्या दीडशे वर्षांचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अमूल्य असा हा दस्तावेज असून सत्यशोधक वृत्तपत्रांच्या सामाजिक योगदानाच्या पलिकडे त्यांचे वाङ्मयीन मूल्य प्रकाशझोतात आणण्याचे मूलगामी स्वरुपाचे कार्य डॉ. शिंदे यांनी केले आहे.
तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये अभिजन वृत्तपत्रांतील विचार मोठ्या संख्यने असलेला बहुजन समाज व त्याच्याही पलिकडे असलेला जो दलित व उपेक्षित समाज होता, त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. एक तर, बहुजन समाजात शिक्षणाचा फारसा प्रचार झालेला नव्हता; तसेच, दुसरीकडे हा समाज सर्वच बाबींपासून वंचित होता. ब्राह्मणी वृत्तपत्रांनी चालविलेल्या चर्चा त्याच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या नव्हत्या. बहुजन समाजाची सुखदुःखे जाणून घेऊन त्यांना वाचा फोडणारे वृत्तपत्र काढण्याचा प्रयत्न झालेला नव्हता. अभिजन ब्राह्मणी वर्गाने सुशिक्षित होऊन वृत्तपत्रे काढण्याचा उपक्रम चालू केला होता, नेमक्या त्याच सुमारास महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यास प्रारंभ केला होता. बहुजन समाजात उद्‌बोधनाचा एक नवीन प्रवाह वाहू लागला. या बहुजन समाजाच्या विशेषतः महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्माच्या स्थापनेनंतर अखिल महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळीचा जो अखंड प्रवाह व प्रभाव निर्माण झाला, त्या चळवळीतूनच सत्यशोधक वृत्तपत्रांचा उदय झाला.
महात्मा फुले यांचे एक प्रमुख सहकारी कृष्णराव भालेकर यांनी 'दीनबंधु' हे वृत्तपत्र सुरु केले. या वृत्तपत्राची प्रेरणा फुले यांच्य सत्यशोधक चळवळीतच होती. असे जरी असले तरी महात्मा फुले हे अभिजन वर्गाच्या प्रश्नांत अडकलेल्या समकालीन वृत्तपत्रांवर विश्वास ठेवू शकत नव्हते कारण त्यांचा आमूलाग्र परिवर्तनवादी दृष्टीकोन! तशा परिवर्तनासाठी ज्यांना जागवणे आवश्यक होते, त्या अज्ञानी दरिद्री, शूद्रातिशूद्र समाजाच्या सर्व प्रकारच्या मर्यादा, त्या समाजाचे वरिष्ठवर्गीय, वरिष्ठवर्णीय समाजाच्या प्रश्नांपेक्षा अगदीच वेगळे असलेले जीवनमरणाचे प्रश्न आणि स्वाभाविकच त्यांच्या सोडवणुकीचा त्यांचा मार्ग भिन्न होता. त्याचप्रमाणे फुले यांच्या कार्याविषयी या पत्रकारितेने कमालीचे औदासिन्य किंवा आक्रमकता व कुचेष्टा यांचे संमिश्रण असलेले धोरण ठेवलेले होते. परिणामी, जोतीराव आणि त्यांच्या काळची पत्रकारिता यांचे संबंध अपरिहार्यतः तणावपूर्ण ठरले होते. या वृत्तपत्रांच्या अशा संकुचित व पक्षपातीपणावर जोतीरावांनी कडक ताशेरे ओढले होते. "एकंदर सर्व भट वर्तमानकर्त्यांची आणि शूद्र व अतिशूद्रांची जन्मात एकदासुद्धा अशा कामी गाठ पडत नाही. त्यातून बहुतेक अतिशूद्रांस तर वर्तमानपत्र म्हणजे काय, कोल्हा का कुत्रा का माकड, हे काहीच समजत नाही. तर मग अशा अनओळखी अतिशूद्रांची मते ह्या सोवळ्या वर्तमानपत्रांस कोठून व कशी कळणार... एकंदर सर्व खात्यांत त्यांच्या जातीच्या भट कामगारांचा भरणा असल्यामुळे एकंदर सर्व शूद्रांसहित अतिशूद्रांचे नुकसान होत आहे, याविषयी त्यास शोध घेण्यास फुरसत जर होत नाही म्हणावे, तर समुद्राच्या पलिकडील लंदन शहरातील राणी सरकारचा मुख्य प्रधान आपल्या स्वप्नांत हिंदुस्थानविषयी काय बरळला, याविषयी बित्तंबातमी काढण्यास तरी त्यास कोठून फुरसत होते.'' अशा परखड शब्दांत महात्मा फुले यांनी या वृत्तपत्रकर्त्यांचा समाचार घेतला आहे.
ब्राह्मणी वर्चस्वाखाली भरडल्या गेलेल्या बहुजन समाजाला या अमानवतावादी वर्चस्वाची जाणीव करुन देण्यासाठी आणि त्याविरुद्ध बंड करुन उठण्याची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजाच्या त्रैवार्षिक प्रतिवृत्तात त्यांनी सत्यशोधक समाजाची उद्दिष्ट्ये अगदी स्पष्टपणे विषद केली होती. "ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादीक लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकांना मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आहेत. यास्तव सदुपदेश व विद्यांद्वारे त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता म्हणजे धर्म व व्यवहारसंबंध ब्राह्मणांचे बनावट व कार्यसाधक ग्रंथांपासून त्यांस मुक्त करण्याकरिता काही सूज्ञ मंडळींनी हा समाज २४ सप्टेंबर सन १८७३ इसवी रोजी स्थापन केला. या समाजात राजकीय विषयावर बोलणे अगदी वर्ज्य आहे.'' ब्राह्मण जातीपेक्षा ब्राह्मणी मनोवृत्तीविरुद्ध बंड करुन सामाजिक विषमतेला वाचा फोडण्याचा व बहुजन समाजाला स्वावलंबी बंडखोरीला प्रवृत्त करण्याचा उद्देश यातून स्पष्ट होतो. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेतून महात्मा फुले यांनी स्वार्थनिरपेक्ष कार्यकर्त्यांची एक परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सत्यशोधक चळवळीला वृत्तपत्रासारख्या साधनाची गरज भासू लागली, याची काही अन्य कारणेही होती. सत्यशोधक समाजाची चळवळ सुरू झाल्यावर प्रथम काही काळ ब्राह्मण वर्गाने तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. पुढे चळवळीचा जोर वाढल्यावर त्यांच्याकडून चळवळीला विरोध वाढू लागला. बहुतेक वृत्तपत्रे ब्राह्मण वर्गाच्या हातात असल्यामुळे सत्यशोधक चळवळीबरोबरच महात्मा फुले यांच्यावरही टीका करण्यात येऊ लागली. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या 'निबंधमाले'तून व 'विविध ज्ञानविस्तारा'तून त्यांच्यावर कठोर टीका करण्यात आली. शूद्र जगद्‌गुरु, शूद्र धर्मसंस्थापक अशा शब्दांत चिपळूणकर फुल्यांची संभावना करीत. 'ते ब्राह्मणांवर भोकतात,' असेही विष्णुशास्त्र्यांनी लिहीले होते. सर्व मराठी वृत्तपत्रांचे कर्ते ब्राह्मण असल्यामुळे त्या वर्गाची दुष्कृत्ये उघडकीस आणण्यात कनिष्ठ वर्गाला कधीही साहाय्य करणार नाहीत, याबाबत जोतीरावांची मनोमन खात्री झाली होती. ब्राह्मणी वृत्तपत्रांतून चळवळीबद्दल विपर्यस्त माहिती व द्वेषपूर्ण टीका येऊ लागल्यानंतर या टीकेला उत्तर देण्यासाठी आपले वृत्तपत्र असावे, असे सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना वाटू लागणे स्वाभाविक होते. त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरु झाल्या. १८७५ साली मुंबईच्या तेलगू मंडळींनी सत्यशोधक समाजाला एक छापखाना देऊ केला. त्यामुळे समाजाची भूमिका मांडण्यासाठी वृत्तपत्र काढण्याच्या कल्पनेने कृष्णराव भालेकर हे उत्तेजित झाले होते, पण जोतीरावांचा प्रतिसाद मात्र तितकाच थंडा होता. कारण अक्षरशत्रू, दरिद्री, ज्ञानहीन, सारासार विचार हरवून बसलेल्या समाजाला जागृत व संघटित करण्याचे साधन वृत्तपत्र असूच शकत नाही, अशी जोतीरावांची भूमिका होती. अक्षर संस्कृतीपेक्षा संतांची मौखिक संस्कृती जनसामान्यांच्या भावविश्वात चटकन मुरते आणि पक्की कोरली जाते, अशी त्यांची धारणा होती. त्याचप्रमाणे वृत्तपत्र काढल्याने फारसे काही साधणार नाही कारण एक तर वृत्तपत्र निर्मितीचे अर्थकारण पेलण्याची आपली ताकद नाही, आणि त्यापेक्षाही दुसरी अडचण अशी की, वाचनाभिरुचीचा अभाव व दारिद्र्य. या कात्रीत अडकलेल्या बहुजन समाजात वृत्तपत्र विकत घेऊन वाचणारे फारसे सापडणार नाहीत. त्यामुळे त्यातील लेखनाचा अपेक्षित परिणाम घडून येणार नाही, असेही त्यांचे मत होते. जोतीरावांच्या या भूमिकेमुळे त्यावेळी हाती आलेला छापखाना परत करावा लागल्याचे दुःख भालेकरांना झाले. त्यातून जोतीराव आणि त्यांच्यात दरी पडली; मात्र धडाडीचे व समर्पित वृत्तीचे कार्यकर्ते असलेले भालेकर चळवळीपासून तसूभरही दुरावले नाहीत. त्यांनी पुढे पुण्यात १ जानेवारी १८७७ रोजी 'दीनबंधु' सुरू रून चळवळीचे कार्य नेटाने चालविले. घर, दागिने गमावूनही प्रखर निष्ठेपायी भालेकरांनी 'दीनबंधु' चालविला. पण झीज सोसूनही दीर्घकाळ पत्राचा संसार चालविणे त्यांना अशक्य झाले, तेव्हा त्यांनी पत्राची जबाबदारी सत्यशोधक समाजाचे कट्टर पुरस्कर्ते नारायण मेघाजी लोखंडे व रामजी संतुजी आवटे यांच्या स्वाधीन केली. अनेक आपत्ती व अडचणींना तोंड देत 'दीनबंधु'ला वाटचाल करावी लागली. पण, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी महात्मा फुले यांनी प्रज्वलित केलेल्या ज्योतीचा प्रकाश सर्वत्र पोहोचविण्याचे काम या वृत्तपत्राने दीर्घकाळ केले. भालेकर, लोखंडे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या हाती 'दीनबंधु'ची सूत्रे दीर्घकाळ राहिल्याने पत्राने टीकेशी मुकाबला करुन सत्यशोधक चळवळीला सामर्थ्य प्राप्त करुन दिले. या पत्राने वृत्तपत्रांच्या क्षेत्रात एक नवा प्रवाह आणून सोडला. पुढे बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारी अनेक पत्रे निघाली. यामध्ये सत्सार (1885, महात्मा फुले), दीनमित्र (1888- गणपतराव पाटील, 1910- मुकुंदराव पाटील) राघवभूषण (1888, गुलाबसिंह कौशल्य), अंबालहरी (1889, कृष्णराव भालेकर), शेतकऱ्यांचा कैवारी (1892, कृष्णराव भालेकर), विश्वबंधू (1911, बळवंतराव पिसाळ), जागरूक (1917, वालचंद कोठारी), जागृति (1917, भगवंतराव पाळेकर), डेक्कन रयत (1918, अण्णासाहेब लठ्ठे), विजयी मराठा (1919, श्रीपतराव शिंदे), सत्यप्रकाश (1919, नारायण रामचंद्र विभुते), गरिबांचा कैवारी (1920, बाबुराव यादव), भगवा झेंडा (1920, दत्ताजीराव कुरणे), तरुण मराठा (1920, सखाराम पांडुरंग सावंत), राष्ट्रवीर (1921, शामराव देसाई), प्रबोधन (1921, के.सी. ठाकरे), संजीवन (1921, द.भि. रणदिवे), सिंध मराठा (1924, द.वा. अणावकर), हंटर (1925, खंडेराव बागल), मजूर (1925, रामचंद्र लाड), कर्मवीर (1925, शि.आ. भोसले), नवयुग (1926, बाबासाहेब बोले), सत्यवादी (1926, बाळासाहेब पाटील), ब्राह्मणेतर (1926, व्यंकटराव गोडे), कैवारी (1928, दिनकरराव जवळकर) आदी साठहून अधिक नियतकालिकांचा समावेश आहे. उपरोक्त सत्यशोधकांनी आपापल्या परीने सत्यशोधक पत्रकारिता समृद्ध करण्यास मोठा हातभार लावला. अशा ऱ्हेने सत्यशोधकीय वृत्तपत्रांचा जन्म झाला. एका अपरिहार्य गरजेतून त्यांचा जन्म झाला असल्याने शेतकरी- कष्टकरी यांच्या प्रश्नांचा त्यात हापोह असे. शूद्रातिशूद्रांमध्ये नवी जागृती निर्माण करण्याचा धार्मिक शोषणाचा समाचार घेऊन त्यास कारणीभूत असणाऱ्या वृत्ती-प्रवृत्तीचा शोध घेण्यासाठीच दीनबंधु, दीनमित्र, शेतकऱ्यांचा कैवारी, अंबालहरी, विजयी मराठा, जागरुक, जागृती आदी सत्यशोधक वृत्तपत्रांनी लेखणी वापरली.
सत्यशोधकीय वैचारिक साहित्य:
सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीने शेतकरी संघटना, शेतकरी परिषदा, सहकार चळवळ, सहकारी पतपेढ्या, खोतीबंदी, खंडबंदी, मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी, शिक्षणसंस्थांची स्थापना, ब्राह्मणेतर शिक्षक भरती, शिक्षणप्रसार, वृत्तपत्रे, अस्पृश्यता निवारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळीस सक्रिय पाठिंबा, कामगार संघटन व कामगारांचा लढा, पुरोहितशाहीचे उच्चाटन, स्त्री-सुधारणा आदी क्षेत्रांत महाराष्ट्रभर रचनात्मक कार्य करून बहुजन, ग्रामीण समाजात अपूर्व जागृती घडवून आणण्याचे काम केले. सत्यशोधक चळवळीचे एका प्रचंड जनआंदोलनामध्ये रुपांतर करण्याच्या कामी त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले. ही चळवळ केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित न राहता मद्रास प्रांतातील जस्टीस पार्टीच्या जाहीरनाम्यावरही सत्यशोधक चळवळीच्या सामाजिक सुधारणांचा मोठा प्रभाव दिसून आल्याचे या चळवळीचे संशोधक डॉ. के.के. कावळेकर यांनी सिद्ध केले आहे. म्हणजे दक्षिण भारतातील ब्राह्मणेतर चळवळीस प्रेरणा व दिशा देण्याचे कार्य सत्यशोधक चळवळीने केले आहे.
त्यासाठी या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या फळीने त्या काळी उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या पारंपरिक प्रसारमाध्यमांचाही मोठ्या खुबीने वापर केला. त्यात भीमराव महामुनी, घनःश्यामभाऊ भोसले, शास्त्री नारो बाबाजी महाधट, दाभाडे बुवा, पंडित धोंडीराम नामदेव कुंभार, ज्ञानगिरी बुवा गोसावी, आनंदस्वामी, शास्त्री धर्माजी रामजी डुंबरे पाटील, कृ.क. चौधरी, ह.ल. चव्हाण, मो.तु. वानखडे इत्यादी सत्यशोधकांनी महाराष्ट्रभर फिरून कीर्तन, पोवाडे, प्रवचने, व्याख्याने, पुस्तक विक्री अशा विविध माध्यमांचा आधार घेऊन विनामानधन आणि प्रसंगी पदरमोड करून समाजजागृतीचे काम केले. हे सारे सत्यशोधक आजही उपेक्षेच्या अंधारात आहेत, त्यांना प्रकाशात आणण्याचे महत्त्वाचे काम डॉ. अरुण शिंदे यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे उपरोल्लेखित साठहून अधिक सत्यशोधकीय नियतकालिकांच्या सामाजिक योगदानाविषयीही सविस्तर अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली आहे. यामध्ये ग्रामव्यवस्थेचे स्तरित स्वरुप, रुढीपरंपरा, यात्रा-जत्रा, मूर्तीपूजा, नवस, सोवळे, अंगात येणे, मंत्र-तंत्र, दानधर्म, श्राद्धविधी, तीर्थक्षेत्रे, सत्यनारायण, गणेशोत्सव, सणवार, व्यसनाधिनता, आरोग्यविषयक अनास्था, भिकारी, विवाहातील घातक प्रथा आदी तत्कालीन समाजजीवनाच्या विविध आंगोपांगांवर सत्यशोधकीय नियतकालिकांनी अत्यंत मूलगामी भाष्य केल्याचे डॉ. शिंदे यांनी विस्तृतपणे अनेक नियतकालिकांतील उतारे-वेच्यांसह दाखवून दिले आहे. त्यांनी वापरलेली बोलीभाषा, ग्रामीण लोकजीवनाचे संदर्भ, भेदक समाजमीमांसा, तर्कशुद्ध व सडेतोड विषयविवेचन, वास्तवदर्शी विश्लेषण, समाजहिताची अतीव कळकळ व नवसमाजरचनेचा सुस्पष्ट दृष्टीकोन, आधुनिकता, मूल्यात्मकता वगैरे गुणवैशिष्ट्ये सत्यशोधकीय वाङ्मयामध्ये आढळतात. यामुळे मराठी वैचारिक वाङ्मयामध्ये समाजनिष्ठ विचारांची मौलिक भर पडली असल्याचे डॉ. शिंदे पटवून देतात. सत्यशोधकीय नियतकालिकांत वेद, महाकाव्ये पुराणे आदी धर्मग्रंथांची परखड चिकित्सा करण्यात आली असल्याचेही अनेक उदाहरणांसह डॉ. शिंदे दाखवून देतात. धर्माचे दलाल आणि जातीयवादाला खतपाणी घालून तिचे बळकटीकरण करणारी चातुर्वर्ण्य व्यवस्था यांचाही या नियतकालिकांनी समाचार घेतला. शेतकरी, स्त्रिया, कामगार या वर्गांचे प्रश्न, अस्पृश्यता निर्मूलन आदी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी समाज प्रबोधनाबरोबरच शिक्षण हे अत्यावश्यक असून त्या दृष्टीने सर्व स्तरांतून प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.  ग्रंथप्रामाण्य व शब्दप्रामाण्य यांच्याविरुद्ध बुद्धीप्रामाण्यवादाचा पुरस्कार सत्यशोधकीय नियतकालिकांनी अत्यंत हिरीरीने केल्याचे यातून स्पष्ट होते. बहुजन समाजाच्या अधोगतीची व मागासलेपणाची वस्तुनिष्ठ कारणममांसा करून शोषणमुक्त, गुलामगिरीमुक्त, समताधिष्ठित आधुनिक समाजनिर्मितीचा विचार या सत्यशोधक नियतकालिकांतून अभिव्यक्त झाला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, मानवी हक्क, मानवी प्रतिष्ठा यांचा आग्रह धरणाऱ्या या साहित्याने मराठी वैचारिक साहित्यामध्ये मोठी भर घातल्याचे डॉ. शिंदे यांनी दाखवून दिले आहे.
सत्यशोधकीय कविता:
लोकजागृती व लोकशिक्षण यासाठी प्रबोधन चळवळीतील कवींनी काव्यनिर्मिती केली. अभंग, अखंड, श्रीखंड, पोवाडे, उपदेशपर लावण्या, ओवी, गीते यांसारख्या देशी रचनाबंधातून प्रबोधनपर विचार हे या निर्मितीचे वैशिष्ट्य होय. मानवी मूल्यांची अभिव्यक्ती हा तर या मागचा सर्वाधिक सर्वांगसुंदर विशेष. आणि म्हणूनच त्या कवितांचे महत्त्वही तितकेच मोठे.
महात्मा फुले यांनी अखंड आणि पोवाडे यांसारख्या अत्यंत अप्रतिम रचना केल्या आहेतच. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा फुल्यांनी लिहीला, हे एव्हाना सर्वश्रुत झाले आहे. दीनबंधुचे आद्य संपादक कृष्णराव भालेकर यांनीही पोवाडे, अभंग, शेतकऱ्यांचे मधुर गायन, उपदेशपर लावण्या, श्रीखंड आदी काव्यप्रकार हाताळले आहेत. त्यांच्या श्रीखंडावर तर फुल्यांचा मोठा प्रभाव जाणवतो. शेतकरी-कामगारांच्या दुःखाला त्यांनी वैचारिक साहित्याबरोबरच कवितेतूनही वाचा फोडली.
कर्जाखाली गेले बुडोनी शेतकरी झाले ठार। भट-कुळकर्णी मारवाडी व्याजावरती सरदार। दुप्पट तिप्पट सारा वाढला झाले कुणबी बेजार। लोकल फंडही देवोनिया अज्ञ कुणबी लाचार। असे शेतकऱ्याचे वर्णन ते करतात.
दीनमित्रचे पहिले संपादक गणपतराव पाटील, सत्यशोधक समाजाचे प्रमुख प्रचारक पंडित धोंडीराम नामदेव कुंभार, दलितांचे आद्य पुढारी गोपाळबाबा वलंगकर, ज्ञानगिरी महाराज, कवी वसंतविहार ऊर्फ श्री. जोशी यांनीही निरनिराळ्या सत्यशोधक नियतकालिकांतून विविध प्रकारचे काव्यलेखन केले. समाजप्रबोधन हा या साऱ्याचा आत्मा होता. दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी कुळकर्णीलीलामृत आणि शेटजी प्रताप ही दोन खंडकाव्ये लिहून त्या काळात मोठाच गदारोळ उडवून दिला होता. गावपातळीवर कुळकर्णी या अधिकाऱ्याकडून होणाऱ्या शोषणाच्या सत्यकथाच त्यांनी क्रमशः प्रसिद्ध केल्या. त्यामुळे कुळकर्ण्याचे प्रतापच उघडे पडले. शेटजी प्रतापमध्ये सावकाराकडून गरीब शेतकरी-मजुरांचे होणारे शोषण चव्हाट्यावर आणले. कुळकर्णीलीलामृतमधील वास्तव इतके विदारक आणि प्रस्थापित वर्गाला झोंबणारे होते की, केसरीमधील अग्रलेखांत न.चिं. केळकर यांनी सत्यशोधक समाजाच्या डिस्टीलरीत बनलेली ही गोड व ब्राह्मणद्वेषाची दारू असून हे अमृतरुपी विष काही तरी सैतानी विध्वंसपर कृत्य करण्यास अवतरले आहे, अशी जहरी टीका त्यावर केली. तर, ह.कि. तोडमल या संशोधकाने शेटजी प्रतापमधील आशयाला प्रतिगामी व जातीयवादी संबोधले. तथापि, मुकुंदरावांनी अत्यंत परखडपणे सामाजिक वास्तवाचे अत्यंत विदारक असे दर्शन त्यांच्या या खंडकाव्यातून घडविले. सत्यशोधकीय कविता ही मानवमुक्तीचा स्वर व्यक्त करीत असल्याचे साद्यंत आढाव्याअंती डॉ. अरुण शिंदे निदर्शनास आणतात.
सत्यशोधकीय कादंबऱ्या आणि कथा:
तत्कालीन अभिजन समाजात ललित साहित्य हे केवळ प्रणयप्रधान, रंजनात्मक स्वरुपाचे होते. कथा, कादंबरीसारखा ललित वाङ्मय प्रकार हा सामाजिक दैन्य, दुःख चव्हाट्यावर मांडण्यासाठीही करता येतो, केला जाऊ शकतो, हे सत्यशोधक विचारवंत, लेखकांनीच दाखवून दिले. विशेष म्हणजे त्याची सुरवातही कृष्णराव भालेकरांपासूनच झाली आहे. त्यांची बळीबा पाटील ही कादंबरी गणपतराव पाटील यांनी एप्रिल ते जुलै १८८८ या कालावधीत दीनमित्रातून प्रकाशित केली. शेतकऱ्यांस सहजरित्या मार्ग सुचून आपली सुधारणा करून घेता यावी, हाच उद्देश बाळगून या पुस्तकाची रचना केल्याचे भालेकरांनी म्हटले. मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी ही धनुर्धारी (रा.वि. टिकेकर) यांची पिराजी पाटील नव्हे, तर, कृष्णराव भालेकरांची बळीबा पाटील असल्याचे डॉ. अरुण शिंदे यांनी संशोधकीय कसोट्यांवर सिद्ध केले आहे, हे या पुस्तकाचे आणखी एक महत्त्वाचे योगदान आहे.
मुकुंदराव पाटलांनी कादंबरीच्या प्रांतातही जोमदार आणि सजग मुशाफिरी केली आहे. त्यांनी होळीची पोळी, चंद्रलोकीची विलक्षण रुढी अथवा दादासाहेबांची फजिती, ढढ्ढाशास्त्री परान्ने, तोबा तोबा आणि राष्ट्रीय तारुण्य या कादंबऱ्या दीनमित्रमधून क्रमशः प्रकाशित केल्या. या साऱ्याच कादंबऱ्या एकाच वेळी लक्षणीय आणि चिंतनीय असल्या तरी व्यक्तीशः मला व्यक्तीशः त्यातील ढढ्ढाशास्त्री परान्ने ही कादंबरी सामाजिक-साहित्यिकदृष्ट्या अत्युच्च दर्जाची वाटते. शंभर वर्षांपूर्वीचा एक ब्राह्मण अचानक भूतलावर अवतरल्यानंतर येथील आधुनिकता आणि प्रतिगामित्व यांच्यातील कमी होत चाललेले अंतर पाहून त्याची होणारी तगमग ही अत्यंत विनोदी शैलीत मुकुंदरावांनी मांडली आहे. पण, त्यात अधोरेखित वर्णवर्चस्वाचा अहंकार, तो जपण्यासाठीचा खटाटोप आपल्याला आजही अंतर्मुख करतो. शिक्षण, आधुनिक विचार, आधुनिक तंत्रज्ञान जर या देशात आले नसते, तर या देशाची, इथल्या नागरिकांची परिस्थिती, राहणीमान काय असते, याबद्दलही आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे करते. या साऱ्याच कादंबऱ्यांसह तत्कालीन सत्यशोधक लेखकांनी लिहीलेल्या कथांचाही परामर्ष डॉ. शिंदे यांनी आपल्या या ग्रंथात घेतला आहे.
खरे तर, या ग्रंथातील प्रत्येक पृष्ठ, प्रत्येक परिच्छेद वाचनीय आणि मननीय झाला आहे. त्यामुळे त्याविषयी लिहीत असताना कोणत्या बाबींविषयी लिहावे, यापेक्षा काय वगळावे, याविषयीच अधिक विचार करण्याची वेळ आली. डॉ. अरुण शिंदे यांच्यामध्येच एक अत्यंत सजग आणि तत्त्वनिष्ठ व सत्त्वनिष्ठ असा सत्यशोधक समाजचिंतक असल्यामुळे समग्र सत्यशोधकीय नियतकालिकांच्या योगदानाकडे ते तितक्याच आत्मीयतेने पाहताना दिसतात. तथापि, ही आत्मियता आंधळी नाही. संशोधनाच्या कसोट्यांवर पारखून वाचकांसमोर त्यातले समग्र, बुद्धीभेदविरहित विचारमौक्तिक सादर करण्याला ते प्राधान्य देतात. त्यामुळेच त्यांच्या हातून एक अत्यंत मौलिक स्वरुपाचा संदर्भग्रंथ निर्माण झाला आहे. या ग्रंथाच्या निर्मितीमागे त्यांची गेल्या अनेक वर्षांची साधना, अभ्यास आणि संशोधनाची पूर्वपिठिका आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे या ग्रंथातील एकेक वाक्य आणि एकेक शब्द हा प्रमाणित आहे, याची प्रचितीच ग्रंथ वाचत असताना जागोजागी येते. मंगळवेढ्याच्या कृष्णा संशोधन व विकास अकादमीने या ग्रंथाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या निर्मितीमूल्यात कोठेही कसूर राहणार नाही, याची दक्षता घेतली आहे, हेही या ठिकाणी आवर्जून नमूद करावेसे वाटते.
एकूणच, सत्यशोधक चळवळीच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सत्यशोधकीय नियतकालिकांच्या अंतर्बाह्य स्वरुपाविषयी साद्यंत माहिती देणारा एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ डॉ. अरुण शिंदे यांनी सिद्ध केला आहे. केवळ सत्यशोधक, ब्राह्मणेतर चळवळीच्या अभ्यासकांनाच नव्हे, तर महाराष्ट्राचा, देशाचा सामाजिक-सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहास अभ्यासणाऱ्या कोणाही सत्यनिष्ठ संशोधकाला या कसदार ग्रंथाला ओलांडून पुढे जाता येणार नाही, इतके त्याचे मोल आहे.


-    सत्यशोधकीय नियतकालिके
लेखक- डॉ. अरुण शिंदे
प्रकाशन- कृष्णा संशोधन व विकास अकादमी, मंगळवेढा
मूल्य- रु. ५००/-