बुधवार, १३ जानेवारी, २०२१

दोस्ताच्या यशाची चढती कमान

 प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांच्याविषयीची ही बातमी वाचून ऊर अभिमानानं भरून आला... हा खरं तर आमचा सहपाठी... भालू... भाल्या... त्याच्याविषयी बातमी ही खूपच उशीरा छापून आली... मुळात भालूची वाटचाल, त्याची कारकीर्द, त्याचं लख्ख यश हा केवळ बातमीचा नव्हे, तर सविस्तर लेखाचाच विषय... आणि बातमी छापून येण्याचा सोस त्याला नाही, हेही चांगलंच आहे. नाही तर, आमच्यासारखे एवढं-तेवढंही छापणारे, लिहीणारे यारदोस्त असूनही त्यानं इमानेइतबारे त्याचं काम करीत राहावं; कामयाबी, प्रसिद्धी झक मार के पिछे दौडते आएगी... हीच आमची त्याच्याविषयीची भावना आहे. आणि मीडियाचा सोस लागल्यानंतर भल्याभल्यांची काय अवस्था होते, हेही मीडियाकर्मी म्हणून ठाऊक असल्यानं त्याचं तसं राहणंच अधिक चांगलं वाटतं आम्हाला.. आणि ते त्याच्या स्वभावाला साजेसंही आहे... पण, आता आमच्या नंदिनीनं लिहीलंय, तर म्हटलं आपणही या निमित्तानं थोडं मन मोकळं करून घेऊ...

तर, आमचा भालू... रिअल जेम... रिअल ब्रिलियंट... असे जगाच्या पाठीवर काही मोजके लोक असतील, तर त्यांच्यापैकी एक म्हणावा असा... भालूनं हा ब्रिलियन्स अत्यंत प्रयत्नपूर्वक, साधला आहे... घरची परिस्थिती मध्यमवर्गीय... मात्र काम कराल तर खाल, या पद्धतीची! त्याच्या वडिलांचं म्हणजे माझे आदरणीय पॉष ऐश्य श्रीमान लाडके काकडे काका यांचं टेलरिंगचं दुकान हे आम्हा मित्रांचं एकत्र जमण्याचं, भेटण्याचं हक्काचं ठिकाण.. अगदी आजही त्याला अपवाद नाही... भालू त्या दुकानात कटिंगपासून, शिलाईपर्यंत काही ना काही करत असायचाच... एकीकडं शिलाई मशीनवर पाय मारणं सुरू असतानाच दुसरीकडं हातातल्या नोट्सची, पुस्तकाची पानं नजर मारत मारत पालटली जात असत... जे पान पालटून त्याला समजत होतं, साधत होतं, ते रट्टा मारमारुनही आम्हाला झेपत नसे, याचा हेवा मला आजही वाटतो...  भाल्याचं केमिस्ट्रीवर नितांत प्रेम... केमिस्ट्रीच कशाला? सगळ्याच विषयांवर... आमचंही होतं, पण त्याच्यापेक्षा कमीच भरायचं... म्हणून तर बी.एस्सी.च्या तिन्ही वर्षी हा कॉलेजात पहिलाच असायचा... शिवाजी विद्यापीठात एम.एस्सी. फिजिकल केमिस्ट्रीला त्यानं प्रवेश घेतला. आम्ही हॉस्टेलला राहून जी टक्केवारी मिळवू शकलो नाही, त्यापेक्षा किती तरी अधिक त्यानं निपाणीहून दररोज येऊन-जाऊन मिळविली. पुढं त्याची एनसीएलला रिसर्च फेलो म्हणून निवड होणं, हा त्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता... त्याच्यातील संशोधकाला पैलू पाडण्याचं काम एनसीएलनं केलं. तिथूनच तो पीएचडी झाला... एनसीएलमध्ये त्याला खास रिसर्च करताना पाहण्यासाठी मी गेलो होतो... एखादा प्रयोग लावला असेल तर त्यासाठी तीन-तीन चार चार दिवस रुमकडंही न फिरकणारा भालू आम्ही पाहिला. त्याच्या कष्टाला फळ आलं नसतं तरच नवल. त्याला पुन्हा जपानच्या टोकियो इन्स्टिट्यूटची फेलोशीप मिळाली... भाल्याच्या जागतिकीकरणाचं हे पहिलं पाऊल... त्यानं जपानमधूनच अनेक देशांना संशोधनासाठी आणि शोधनिबंध वाचण्यासाठी भेटी दिल्या... जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचा रसायनशास्त्रज्ञ म्हणून त्याचं नाव घेतलं जातं... आमच्या वहिनीही त्याच तोडीच्या शास्त्रज्ञ आहेत, हेही नमूद करावं लागेल... त्याही एका स्वतंत्र लेखाचा विषय आहेत... माणसानं आभाळाएवढं यश मिळवूनही जमिनीशी नातं कसं जोडून राहावं, याचं हे जोडपं मोठं उदाहरण आहे... परदेशातील अनेक संशोधन संस्थांच्या ऑफर्स येऊनही काही वैयक्तिक कारणांनी हे दोघं जेव्हा भारतात परतले, तेव्हा नोकरीसाठी इथल्या आवश्यक पात्रतेपेक्षा ते किती तरी अधिक पात्रता धारण करतात, म्हणून त्यांना अनेक संस्थांनी नम्रतापूर्वक नकार दिला... अखेरीस चेन्नईच्या एसआरएम इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक व संशोधक म्हणून तो रुजू झाला. त्याच्या संशोधनाची कमान सातत्यानं उंचावतच आहे. मटेरिअल्स इलेक्ट्रोकेमिस्ट्री, फ्युअल सेल कॅटॅलिसिस, कार्बन नॅनोमटेरिअल्स आणि त्यांचे नॅनो कॉम्पोझिट्स, सुपरकपॅसिटर व स्टोअरेज, कॉम्पोझिट पॉलिइलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन्स हे त्याच्या संशोधनाचे ठळक विषय आहेत. आजवर त्याचे व्यक्तीगत सायटेशन्स १८१३, एच इंडेक्स २२ तर आय-टेन इंडेक्स ४१ इतका आहे. इंटरनॅशनल पेटंट्सची तर बातमी सोबत आहेच. संशोधनाच्या क्षेत्रातील जाणकारांना यावरुन त्याच्यातील क्षमतांची जाणीव होऊ शकेल. ही तर सुरवात आहे, पुढचा प्रचंड पल्ला बाकी आहे आणि त्या प्रवासात आमचा हा दोस्त देशाचे नाव दिगंतात उंचावल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री आहे.

भालू, मित्रा तुझा सदैव अभिमान आहेच; आज फक्त एक्स्प्रेस करतोय इतकंच!

रविवार, १० जानेवारी, २०२१

वारणा विज्ञान केंद्रातील अविस्मरणीय दिवस!वारणा विज्ञान केंद्रातील विविध प्रयोगांसमवेत स्विनी आणि सम्यकवारणा विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. जॉन डिसोझा आणि त्यांचे सहकारी प्रितेश लोले यांच्यासमवेत जत्राटकर कुटुंबिय.
एकविसाव्या शतकात आपण स्वतःला एक वैज्ञानिक समाज म्हणवून घेतो; मात्र प्रत्यक्षात आपल्या बहुतांश कृती या विज्ञानवादाला धाब्यावर बसविणाऱ्या असतात. या शतकातील पिढी ही चिकित्सक, बहुआयामी घडविण्यासाठी जे काही करावयास हवे, त्यामध्ये पूर्णतः यशस्वी झालो आहोत, असे म्हणता येत नाही. ‘WHY?’ असे विचारण्यास ना आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन देतो किंवा त्या ‘WHY?’चे उत्तर देण्यास कोणी पालक, शिक्षक पुढे सरसावतो. याला काही सन्माननीय अपवाद आहेतही. पण, बहुतांशी समाजाचे चित्र विपरित आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण व्हावी, त्यांच्यात जिज्ञासा निर्माण व्हावी, त्यांचे कुतूहल शमन व्हावे आणि अधिक विज्ञानवादी दृष्टीकोन त्यांच्यात विकसित व्हावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था आहेत. त्यापैकी दक्षिण महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे शैक्षणिक संकुलामध्ये विकसित करण्यात येत आहे. तात्यासाहेब कोरे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमचे सन्मित्र डॉ. जॉन डिसोझा यांच्याकडून गेली तीनेक वर्षे या विज्ञान केंद्राबद्दल आणि तेथे विकसित करण्यात येत असलेल्या वैज्ञानिक सोयीसुविधांबद्दल, उपक्रमांबद्दल माहिती मिळत होती. त्यामुळे वारणानगरचे वारणा सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर प्रत्यक्ष पाहण्याची ओढ लागून राहिली होती. मुळातच तात्यासाहेब कोरे यांच्या स्वप्नातून साकार झालेल्या वारणानगर परिसराविषयी आणि येथील विविध उपक्रमांविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. चांगल्या भावनेतून चालविलेली सहकार चळवळ एखाद्या विभागाचे रुपडे कसे पालटून टाकू शकते, याची कोल्हापूर परिसरात अनेक उदाहरणे आहेत, त्यात वारणानगर अग्रेसर आहे. सहकाराच्या माध्यमातून झालेल्या विकासाचा लाभ मिळवून देत शैक्षणिक सुविधांची उभारणी येथे करण्यात आली. वारणेचा बाल वाद्यवृंद हा तर माझ्या लहानपणापासूनचा जिव्हाळ्याचा विषय. असो! तर, अशा या समाजाभिमुखता जपणाऱ्या वारणा समूहाच्या शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्यातून वारणा सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर साकारले आहे. डॉ. जॉन डिसोझा यांनी त्यासाठी केलेला पाठपुरावा आणि मा. विनयरावजी कोरे यांना त्यांचे लाभलेले प्रोत्साहन यामुळे वारणानगरच्या शैक्षणिक संकुलात सुमारे तीन एकर परिसरावर हे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. डॉ. डिसोझा हे खरे तर फार्मसीचे तज्ज्ञ. त्यांच्या क्षेत्रात तर ते एक अग्रगण्य संशोधक आहेतच. मात्र, त्यांनी ज्या आत्मियतेने वारणेचे हे केंद्र साकारण्यासाठी योगदान दिले आहे, त्याचे कौतुक करण्यास शब्द अपुरे आहेत. ते जेव्हा अत्यंत निरलसपणे या कामाच्या उभारणीबद्दल आपलेपणाने सांगत असतात, त्यावेळी माझ्या मनात त्यांच्याविषयी अभिमानाची भावनाच केवळ दाटून येत राहिली. प्रत्येक संस्थेमध्ये असे डिसोझा असतात, गरज असते ती फक्त त्यांना ओळखून त्यांच्या पाठीवर प्रोत्साहनाचा हात ठेवण्याची.  

सन २०१७ साली ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या विज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाचा परिचय करून देणाऱ्या, दैनंदिन जीवनातील घडामोडींमागील वैज्ञानिक तथ्ये आणि सत्ये समजावून सांगणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक साधने, उपकरणे, प्रयोग आणि खेळणी आहेत. हसत-खेळत विज्ञान कसे शिकावे, शिकवावे, याचे हे केंद्र मूर्तीमंत प्रतीक आहे. येथे गेल्या तीन वर्षांत सुमारे २० हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षकांनी भेट दिली आहे. एकदा येऊन गेलेला विद्यार्थी येथे पुनःपुन्हा येण्याची मनिषा बाळगूनच परततो. किंबहुना, निघताना येथून पाय निघत नाही, इतक्या अप्रतिम वैज्ञानिक माहितीचे भांडार येथे आहे. येथील इनोव्हेशन सेंटर म्हणजे तर विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला पुरेपूर आव्हान देणारे आहे. ओल्ड इज गोल्ड संकल्पनेवरील येथील कक्षात जुन्या मोडक्या तोडक्या, जगाच्या दृष्टीने स्क्रॅप वस्तूंचेही पुनर्वापराचे मूल्य अधोरेखित करण्याचे आणि अशा वस्तूंपासून विविध कल्पक उपकरणे निर्माण करण्याचे हे प्रशिक्षण केंद्रच आहे. त्यासह भूविज्ञान, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांतील संशोधनासाठी आवश्यक असणारी साधनेही येथे उपलब्ध आहेत. गरज आहे ती त्यांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची.

आमच्या सम्यक, स्विनीने येथील सारेच प्रयोग खूपच एन्जॉय केले. येथील संशोधक सहकारी प्रितेश लोले यांनी अत्यंत प्रेमाने आम्हाला सारे प्रयोग पुष्कळ वेळ देऊन दाखविले, समजावून सांगितले. डॉ. डिसोझा, प्रितेश आणि त्यांनी साकारलेल्या या विज्ञान केंद्रात आमचा दिवस कसा संपला, हे लक्षातही आले नाही.

डॉ. डिसोझा यांनी या केंद्राच्या विविध उपक्रमांसंदर्भात अगत्याने माहिती दिली. त्यातील शनिवारी विज्ञानवारी हा उपक्रम मला खूपच आवडला. येथील निवडक विद्यार्थी परिसरातील शाळांमध्ये शनिवारी जातात आणि छोट्या छोट्या घरगुती साधनांपासून विविध वैज्ञानिक प्रयोग करून दाखवितात; रोजच्या जीवनातील विज्ञान समजावून सांगतात. यामुळे शालेय जीवनापासूनच वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यासाठी मदत होते, ज्याची आपल्या देशाला खरेच खूप गरज आहे. याशिवाय, केंद्रातील रिक्रिएशन सभागृहात वेळोवेळी अनेक विज्ञानविषयक व्याख्याने, उपक्रम व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. त्यांना वाढता प्रतिसादही लाभतो आहे. या केंद्राने इतक्या अल्पावधीमध्येच केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान प्रसार या स्वायत्त उपक्रमामध्ये गोल्ड कॅटेगरी क्लब म्हणून स्थान प्राप्त केले आहे, ही अत्यंत गौरवाची बाब आहे.

या केंद्राच्या परिसराचे व अन्य विकासाचे काम अद्याप सुरू आहे. अत्यंत सौंदर्यशाली दृष्टीने येथील लँडस्केपिंग करण्यात आले आहे. भविष्याचा वेध घेऊन येथे अनेक नवीन प्रकल्प साकारण्यात येत आहेत, जे देशात एकमेवाद्वितिय स्वरुपाचे असतील. आपल्या विभागातील मुलांना, मुंबई, बेंगलोर, दिल्ली इत्यादी ठिकाणी जाऊन जे विज्ञानाचे आविष्कार पाहणे अशक्य असतात, त्यातील अनेक प्रकल्प येथे साकारण्यात येत आहेत. त्यामुळे हे वैज्ञानिक संकुल लवकरच देशातील एक महत्त्वाचे विज्ञान व नवोन्मेष केंद्र म्हणून पुढे येईल, याची खात्री आहे.

रविवार, ३ जानेवारी, २०२१

स्वराज्याच्या ‘नाक, कान, डोळ्यांना’ हवीय शासकीय ओळख...

 


महेश दिगंबर गदाई (जोेशी) व किशन जोशी हे वासुदेव

महेश गदाई (जोेशी) या वासुदेवाचे सादरीकरण (व्हिडिओ)


 

बऱ्याच दिवसांनी आज सकाळी जाग आली तीच मुळी चिरपरिचित वासुदेवाच्या आवाजानं आणि त्याच्या टाळचिपळ्यांच्या नादानं... बाबांना विचारलं, तर म्हणाले, नाही रे! कोपऱ्यावरच्या मंदिरात काही ना काही कार्यक्रम सुरू असतो... पण, तो आवाज घुमत घुमत वेगवेगळ्या दिशांनी माझ्याकडं येतच होता... जवळ जवळ येत अखेरीस अकराच्या सुमारास आमच्या गेटबाहेर तो आवाज आलाच... एकाला दोन वासुदेव दारात उभे होते... त्यांना आत बोलावलं. विचारपूस केली. त्यांच्यासोबत मस्त चहापान केलं. मी सकाळपासून ऐकत असलेल्या खड्या तरीही गोड आवाजाचे मालक होते महेश दिगंबर गदाई (जोशी), जे आळंदीचे असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्यासोबत दुसरे वासुदेव होते, ज्यांना महेशजी गुरूजी म्हणून संबोधत होते, त्यांचं नाव किशन जोशी. ते बारामतीचे होते. यांनी आजवर त्यांच्या समाजातील ठिकठिकाणच्या २१ मुलांना वासुदेव होण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. या दोघांशी बोलण्यातून अनेक गोष्टी उलगडत होत्या.

वासुदेव हे मूळचे रोयखेल येथील असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, तो तेथून आता राज्यात सर्वत्र पोटापाण्यासाठी विखुरला आहे. बारामती येथील जोशीवाडा मात्र मोठा असून मूळच्या या भटक्या जमातीमधील बरेचसे वासुदेव तेथे आता स्थायिक झाले आहेत. असे असले तरी पोटासाठी त्यांच्यामागची भटकंती मात्र अद्याप सुटलेली नाही. उलट ती दिवसेंदिवस अधिक कठीण होत चाललेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईकांच्या साथीनं आपलं गुप्तहेरांचं जाळ विस्तारत असताना त्याकामी हेळवी, वासुदेव, पिंगळे, कुडमुडे जोशी इत्यादी भटक्या सर्वसंचारी जमातींचा मोठ्या खुबीनं वापर केला. सातत्यानं सर्वत्र भटकून गुजराण करणाऱ्या या लोकांवर शत्रूची नजर पडण्याची शक्यता नव्हतीच. आणि पडली तरी गुप्तहेर म्हणून त्यांच्याकडे संशयाची सुई वळणार नव्हती. नेमकी हीच बाब हेरून महाराजांनी या लोकांवर स्वराज्यासह शत्रूच्या प्रदेशांतील हालचाली टिपण्याची आणि माहिती पोहोचविण्याची जबाबदारी सोपविली होती. या लोकांनीही ती इमानेइतबारे पार पाडली. एके काळी अशा प्रकारे छत्रपतींच्या स्वराज्याचे नाक, कान आणि डोळे असणाऱ्या या भटकणाऱ्या समाजासमोर अद्याप अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. पूर्वी या भटक्या लोकांना कोणी जमेतही धरत नव्हतं- अगदी शिरगणतीतही. पुढे त्यांचा समावेश होऊ लागला. ते आपल्या लोकसंख्येचा भाग बनले. पण, त्यांच्या कामाच्या स्वरुपामुळं त्यांना एका ठिकाणी राहणं शक्य नव्हतं आणि त्यामुळं शिकणंही शक्य होत नव्हतं. शिक्षणाचा विषय निघाला आणि महेश वासुदेवांच्या हसतमुख चेहऱ्यावर वेदनेची एक कळ उमटली. म्हणाले, सायबा, तुम्हाला तुमच्या वडिलांनी शिकवलं म्हणून तुम्ही शिकला. बाप करेल ते पोरगा करतो. आमचा बापही हेच करायचा, आम्हीही हेच करतो. शाळा शिकू शकलो नाही, याचं शल्य आहेच. पण, पुढची पिढी शिकवावी, त्यांनी काही चांगलं कामधाम, रोजगार करावा, असं माप वाटतं; पण शिकल्यानंतर नोकरीसाठीही पाच-दहा लाख मागतात लोक. हातावरचं पोट असलेल्या आम्ही कुठून आणायचा इतका पैका? त्यात आता पूर्वीसारखा लोकांचा विश्वासही नाही राहिला आमच्यावर. शंभरातले वीस लोक प्रेमानं काही देतात. ८० लोक उभंही करून घेत नाहीत. चोरदरोडेखोरांनी आमचे वेश धारण करून बदनाम केलंय आम्हाला. लोक खूप संशयानं पाहतात आमच्याकडे. त्यांच्या नजरा छळत राहतात आम्हाला सारख्या. खूप वाईट वाटतं.

याला जोडून किशन गुरूजी पुढं सांगू लागतात, दोन तीन वर्षांपाठी वडार समाजातल्या निष्पाप लोकांना मुलं पळविणाऱ्या टोळीतील समजून ग्रामपंचायतीत कोंडून लोकांनी दगडांनी ठेचून मारलं- त्यांचं काहीही ऐकून न घेता! याचा आमच्यासारख्या भटक्या समाजातील लोकांवर खूप मानसिक आघात झाला आहे. लोकांच्या संशयी नजरांनी आम्ही खूप सैरभैर होतो. एकाच दारात सातत्यानं जाणं योग्य नाही म्हणून आम्ही दूरदूर भटकंती करीत राहतो, राज्य, प्रदेशाची सीमा न बाळगता. मात्र, कर्नाटकसारख्या अनेक भागांत लोकांना वासुदेव माहिती नाहीत. लोक विचारतात, कशाला आलात? आम्ही सांगतो, देवदर्शनाला. मग लोक म्हणतात, झालं ना दर्शन? मग आमच्या गावातल्या गल्लीबोळांतून कशाला फिरता? निघायचं मुकाट्यानं बाहेर! आता या लोकांना आम्ही कसं सांगावं की आम्ही वासुदेव आहोत. आमचा पिढीजात व्यवसायच हा आहे. लोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. आम्हाला निघावेच लागते तिथून. पूर्वी लोक आमच्या पालांना जागा द्यायचे त्यांच्या शेतवडीत. आता हजार-दोन हजार रुपये भाडे मागतात पाल टाकण्यासाठी. कसे करावे आम्ही?

यावर उपाय काय, असे त्यांनाच विचारले असता महेश वासुदेव सांगू लागले, आमच्या समाजाने शासनाकडे वेळोवेळी ओळखपत्राची मागणी केली आहे. मात्र, ती अद्याप अपूर्ण आहे. शासनाच्या यादीत आमच्या जमातीची नोंद भटक्या जमातींमध्ये एनटी (बी)मध्ये तेराव्या क्रमांकामध्ये मेढंगी जोशी या नावानं केली आहे. शिकताना, नोकरीसाठी त्याचा उपयोग होईल. आता एका ठिकाणी स्थायिक झाल्यानं आधार कार्डही मिळालंय. पण, आमच्यासारखे लोक ज्यांना आता हा वासुदेवाचा परंपरागत व्यवसाय करण्याखेरीज पर्याय नाही, त्यांचं जगणं सोपं होण्यासाठी आम्हाला शासनानं ओळखपत्रं द्यावीत, म्हणजे किमान आमच्याकडे संशयानं पाहणाऱ्या लोकांना आम्ही किमान काही तरी पुरावा दाखवू शकू.

मी कुतुहलानं एनटी (बी) टेबल काढून पाहिलं, त्यात भटक्या जमातींच्या गोसावी, बेलदार, भराडी, भुते, चित्रकथी, गारुडी, लोहार, गोल्ला, गोंधळी, गोपाळ, हेळवे, जोशी, काशी कापडी, कोल्हाटी, मैराळ, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, रावळ, शिकलगार, ठाकर, वैदू, वासुदेव, भोई, बहुरुपी, ठेलारी, ओतारी, एनटी-सी- धनगर, एनटी-डी वंजारी, मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, मरगम्मावाले, गिहारा/ गहारा, गुसाई/ गोसाई, मुस्लीम मदारी, गारुडी, सापवाले व जादुगार, गवळी व मुस्लीम गवळी, दरवेशी, वाघवाले- शाह (मुस्लीम), अस्वलवाले आदी ३७ प्रकारांचा समावेश असल्याचे दिसले. तेराव्या क्रमांकावर जोशी असून त्यांचे बुडबुडकी, डमरुवाले, कुडमुडे, मेढंगी, सरोदे वा सरोदी, सहदेव जोशी, सरवदे आणि सरोदा असे आठ प्रकार नमूद आहेत.

केवळ वासुदेवच नव्हे, तर या साऱ्याच भटक्या जमातींना आपण आधी माणूसपणाची ओळख दिली पाहिजे, हे तर खरेच आहे; मात्र माणसांच्या या जगात अद्याप त्यांना त्यांची स्वतःची ओळख असणारे एखादे कागदपत्र, ओळखपत्र असले पाहिजे, त्याची त्यांच्या रोजच्या जगण्यासाठी थोडीशी का असेना, मदत होणार आहे. जो सच्चा आहे, तो त्याचा गैरवापर कशासाठी करेल? शासकीय यंत्रणा त्यांची शहानिशा करण्यास निश्चितपणे समर्थ आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही ज्यांच्या जगण्याचा, त्या जगण्यातील झगड्यांचा फैसला जमात पंचायतीच्याच हातात आहे, जो अद्याप एकदाही साध्या ग्रामपंचायतीची पायरीही चढलेला नाही, अशा समाजघटकांचा सांधा मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी शासनाने त्यांना किमान त्यांची ओळख प्रदान करण्याची गरज आहे, हा आमच्या या संवादाचा समारोपीय निष्कर्ष होता.

आमच्या शिवाजी विद्यापीठाच्या नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू लोकविद्या अभ्यास केंद्रासाठी आपला एखादा व्हिडिओ करू द्याल का, अशी मी विनंती महेश वासुदेवना केली. त्यांनी ती मान्य करून लगेच दोन मिनिटांचं सादरीकरण केलं. तेही सोबत शेअर केलं आहे.

सुरवातीला आमच्या संवादात परस्परांप्रती थोडा अविश्वास होता, त्यामुळं हातचं राखून बोललं जात होतं त्यांच्याकडून, हे लक्षात येत होतं. पण, सुरवातीला घरचा पत्ताही न सांगणाऱ्या या दोघांनी शेवटी जाताना इमर्जन्सीसाठी माझं कार्ड घेतलं. स्वतःचा संपर्क क्रमांक सुद्धा दिला. कोल्हापूरला आल्यावर विद्यापीठात येऊन तिथंही सादरीकरण करण्याचं आश्वासन दिलंय. पुढच्या वर्षी पुन्हा आपल्या घरी येतो, असं सांगून ते निघाले आणि ही नवीन माणसं आपल्याशी जोडली गेल्याचं समाधान मनी दाटून आलं...