शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

‘पाऊलखुणांचा शोध’ घेणारं ‘त्यांच्या जगण्याचं पुस्तक’

अलिकडच्या काळात अत्यंत जवळच्या म्हणाव्या अशा दोन व्यक्तिमत्त्वांची आत्मचरित्रे वाचली. शिवाजी विद्यापीठाचे माजी वित्त व लेखाधिकारी श्री. बी.एस. पाटील यांचे पाऊलखुणांचा शोध आणि दुसरे कागलमधील ज्येष्ठ शिक्षक वि.म. बोते यांचे माझ्या जगण्याचे पुस्तक ही ती दोन चरित्रे होत. बी.एस. पाटील सरांशी माझा परिचय शिवाजी विद्यापीठात आल्यानंतरच झाला. पुढे केवळ अधिकारी असण्यापलिकडे त्यांच्यातील अनेक गुणांचा परिचय हळूहळू होत गेला. वित्त व लेखाधिकारी असले तरी रुक्ष आकड्यांच्या पलिकडे या माणसामधील रसिकता माझ्या लक्षात आली, जेव्हा त्यांनी एका दिवाळीला त्यांच्या परदेश दौऱ्यात त्यांनी काढलेल्या छायाचित्राचं ग्रिटींग दिलं. सुहृदांना विकतचं काही देण्यापेक्षा स्वतःच्या हातानं कलात्मक अगर सृजनात्मक अशी भेट देण्यातला आनंद मोठा आहे, ही जाणीव त्यांच्या ठायी दिसून आली. छायाचित्रणाबरोबरच लेखन-वाचनाचीही नितांत आवड त्यांना असल्याचं ठाऊक झालं. त्यांचं निळे पाणी, पांढरी वाळू हे पुस्तक वाचनात आलं. ललित लेखनावरील त्यांची पकड त्यातून जाणवली. सरांना पर्यटनाचाही भयंकर नाद आणि त्याविषयी लिहीण्याचाही. काही प्रवास वर्णनंही मला वाचायला दिली. अत्यंत ओघवत्या भाषेतली ही प्रवास वर्णनं अत्यंत इंटरेस्टिंग झालेली. नुकतंच त्यांचं पाऊलखुणांचा शोध हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. सरांनी आवर्जून भेट दिलं. ते जसजसं वाचत गेलो तसतसा मी सरांशी तन्मयतेनं अधिकाधिक रिलेट होत गेलो. याचं कारण म्हणजे सरांचा सारा जीवनप्रवास हा माझ्या वडिलांच्या आसपास सुरू झालेला. आणि त्यांनी जसं देवचंद कॉलेज-मंत्रालय-शिवाजी विद्यापीठ असा नोकऱ्यांचा प्रवास केला, तसा माझाही झालेला. त्यामुळं मागंपुढं असला तरी बी.एस. सरांच्या पाऊलखुणांमध्ये मी माझ्याही पाऊलखुणा कुठे तरी शोधत राहिलो. माझ्या वडिलांच्या अस्तित्वखुणाही शोधत राहिलो. एखादं आत्मचरित्र बालपणापासूनच्या मित्राच्या आणि धाकट्या भावाच्या साक्षीनं लिहीणं आणि सादर करणं, हे खरं तर धाडसाचंच. कारण ही मंडळी आपल्याला आतूनबाहेरून ओळखत असतात. त्यामुळं आपल्या शब्दाशब्दांवर त्यांची बारीक नजर असते. आत्मचरित्रात आत्मप्रौढी, वास्तवाचं अतिरंजितीकरण अगर स्व-उदात्तीकरण डोकावण्याची खूप शक्यता असते. तसंच आपल्या काही चुका अगर त्रुटींवर पांघरूण घालण्यासाठीही त्याचा वापर केला जाऊ शकत असतो. मात्र, मित्र आणि बंधू हे असे साक्षीदार आहेत की, ते प्रसंगी तुमचा कान ओढून अशा गोष्टींपासून तुम्हाला दूर ठेवतात. त्यामुळं बी.एस. पाटील सरांच्या या आत्मचरित्रामध्ये या गोष्टींना निश्चित फाटा बसला आहे. अत्यंत प्रांजळ भावनेनं त्यांनी सारा भोवताल उभा केला आहे या चरित्रात. त्यांनी आपल्या सर्व शिक्षकांना हे पुस्तक अर्पण केलंय. त्यामुळं एक निष्ठामूल्यही त्याला प्राप्त झालं आहे. अनेक आठवणी, अनेक टिपणं काढून त्यातून एक समर्पक आणि आशयबद्ध असं हे चरित्र अत्यंत ओघवतं आणि वाचनीय स्वरुपाचं झालं आहे. कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय.


दुसरं आत्मचरित्र आहे, ते आमचे गुरूजी वि.म. बोते यांचं. कोल्हापूरच्याच मोहित प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. खरं तर बोते गुरूजींनी मला प्रत्यक्ष थेट कधी शिकवलं नाही. कागलच्या हिंदूराव घाटगे विद्यामंदिरात मी तिसरी-चौथीला ढोले गुरूजींचा विद्यार्थी. बोते गुरूजी वरच्या वर्गाला शिकवायचे. मात्र, ढोले गुरूजींच्या मुळं बोते गुरूजींचं माझ्यावर चिकित्सक लक्ष असायचं. आमच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शिक्षकांतील ते एक अत्यंत निर्मळ, हसतमुख स्वभावाचे गुरूजी आहेत. गुरूजींना रिटायर होऊन आता किमान वीस वर्षांहून अधिक काळ लोटला असेल, या वयातही त्यांचं वाचन, लेखन अत्यंत रसरशीतपणानं सुरू असतं. त्यांचा मुलगा नरुदादा याच्या माध्यमातून आमचं अधूनमधून बोलणंही होत असतं. गुरुजींचं माझ्या जगण्याचं पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या आठवणीनं एक प्रत मला त्यांनी पाठविली. एकटाकी नसलं तरी दररोज सकाळी-संध्याकाळी गुरुचरित्राच्या पानांचं वाचन सुरू ठेवलं. पुस्तक वाचताना माझ्यावर आश्चर्यचकित होण्याची वेळ पानोपानी येत होती. त्या काळात संघर्ष तर प्रत्येकाच्या वाट्याला आलेलाच आहे. संघर्षातून तावून सुलाखून निघाली, म्हणूनच तर ही सोन्यासारखी झळाळणारी माणसं आम्हाला लाभली. गुरूजींच्या या वयातही असणाऱ्या तल्लख स्मरणशक्तीनं मी स्तंभित झालो. चारेक दिवसांपूर्वी भेटलेल्या माणसाचं नाव आठवताना आमची मारामार, तर गुरूजींनी लहानपणातल्या कुठं कुठं भेटलेल्या लोकांची नावं, आठवणी लिहील्यात. एक जण तर त्यांना केवळ सातवीच्या केंद्र परीक्षेवेळीच भेटला, तर त्याचंही ते स्मरण ठेवतात. मेंढरं हाकण्यापासून मागावर सूत कातण्यापर्यंत आणि अभिनयापासून मातीच्या गोळ्यासारख्या मुलांना आकार देण्यापर्यंत सारं काही गुरूजींनी त्यांच्या आयुष्यात केलं. तत्कालीन कागलचा सारा आसमंत, माहौल या पुस्तकात गुरूजी उभा करतात. दुसऱ्या अर्थानं हे समकालीन कागलचंही चरित्र आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण कागलच्या रस्त्यारस्त्यांवर आपल्याला दिसणारी ओळखीची माणसं या पुस्तकाच्या पानापानांवर त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह आपल्याला भेटत राहतात. एका अत्यंत संतृप्त, समाधानाच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेतून गुरूजी आपल्या भूतकाळाकडं पाहतात; मात्र, त्यात अनावश्यक तटस्थता नाही. त्या स्थळकाळाशी ते पुन्हा नव्यानं समरस होतात आणि त्या समरसतेतूनच साऱ्या कालपटाची सफर वाचकाला घडवितात. अनुभवांतून आलेली अनेक विचारमौक्तिके पुस्तकाच्या पानापानांवर पसरलेली आहेत. काही काही वाक्ये तर जागेवर थांबून पुनःपुन्हा मागे जाऊन वाचावीशी वाटतात. आता वहीपेनाच्या जमान्यात पाटीपेन्सिल जणू इतिहासजमाच होते आहे. मात्र, गुरूजींनी शाळेत पाटीवर पाढे लिहीण्याचा प्रसंग इतका प्रत्ययकारकतेनं लिहीला आहे की त्या शांत वर्गातल्या मुलांच्या पाट्यांवर पेन्सिलींची होणारी टकटक माझ्या कानात जणू पुन्हा नव्यानं प्रतिध्वनित होत राहिली. हा परिच्छेद मी किती तरी वेळा वाचला आणि दर वेळी ती टकटक मला माझ्याही भूतकाळात घेऊन गेली. ही ताकद आहे शब्दांची.

या दोन्ही चरित्रकारांना आता काही मिळवायचं नाहीय. ना कोणाची शाबासकी ना कोणते पारितोषिक. त्यांना केवळ त्यांचा भूतकाळ पुन्हा एकदा अनुभवायचा होता. त्यातलं काही नव्या पिढीशी शेअर करायचं होतं. ते त्यांनी अत्यंत जबाबदारीनं केलं आहे. तत्कालीन इतिहास, भूगोलासह समकालीन वास्तवालाही स्पर्श करीत असताना ही पिढी ज्या एका काळाच्या, तंत्रज्ञानाच्या ट्रान्झिशन फेजमधून गेली, तिची प्रचितीही ही चरित्रे देतात. आपल्याच थोड्या मागची पिढी कोणत्या कोणत्या परिस्थितीतून पुढं आली. तिच्या वाट्याला कोणती सुखदुःखं आली आणि त्यातूनही ती समाधानी कशी राहिली, आपल्यासाठी तिनं किती निरपेक्ष भावनेनं एक उत्तम वर्तमानकाळ आणि आशादायी भविष्यकाळ उभा केला, हे वाचताना जाणवत राहतं. त्या दृष्टीनं या लेखनाचं मोल खूप मोठं आहे.