गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

प्रखर राष्ट्रप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरhttps://upload.wikimedia.org/wikipedia/commons/8/87/Dr._Bhim_Rao_Ambedkar.jpg

(भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६वी जयंती उद्या जगभरात साजरी करण्यात ये आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करून देणारा विशेष लेख... आलोक जत्राटकर)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन भारतीय परिस्थितीचे अवलोकन करून या देशाला अत्यंत द्रष्टेपणाने नवराष्ट्रनिर्मितीचा राजकीय व सामाजिक कार्यक्रम दिला आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी जीवाचे रान केले, हे त्यांचे भारतीय स्वातंत्र्याला दिलेले बहुमूल्य योगदान आहे.
डॉ. आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते, तर या देशातील अखिल बहुजन समाजाची काळजी वाहणारा तो एक महान राष्ट्रवादी नेता होता. विचारांनी लढा देण्याचे संस्कार देणारे नेते म्हणून बाबासाहेबांचा उल्लेख करावा लागेल.
मी प्रथम भारतीय, नंतर भारतीय आणि शेवटीही भारतीयच,’ असा आपल्या भारतीयत्वाचा सार्थ अभिमान बाळगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर भारतीयत्वाचे मूर्तीमंत प्रतीक होते.
बाबासाहेबांचे व्यक्तीमत्त्वच मुळी बहुआयामी स्वरुपाचे होते. त्यांच्या विविधांगी पैलूंचा वेध घेणे हे त्यामुळेच आव्हानात्मक बनले आहे. विविध विषयांमध्ये संशोधन आणि अभ्यासपूर्ण, व्यासंगी प्रतिपादन हा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विशेष होता. बाबासाहेब हे केवळ तुमच्या माझ्या दृष्टीनेच मोठे आहेत, असे नव्हे, तर जागतिक परिप्रेक्ष्यातून त्यांच्याकडे पाहिले असतानाही त्यांचे मोठेपण व्यापून उरते. ते केवळ दलितांचे मुक्तीदाते होते, असे म्हणून त्यांच्यावर अन्याय करणे योग्य नाही.
या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या संकुचित, बंदिस्त मानसिकतेतून मुक्त करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी या देशात सर्वप्रथम केले. देशातील स्त्रियांना ज्याप्रमाणे आत्मभान देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला, त्याचप्रमाणे या देशातील पुरूषांचीही बंदिस्त पुरूषी मानसिकतेतून मुक्तता करण्याचे त्यांनी केलेले कार्यही दुर्लक्षिता न येणारे आहे.
बाबासाहेबांना ब्रिटीशधार्जिणा म्हणून हिणवण्याचे प्रयत्न होत असले तरी त्यांची बुद्धीमत्ता आणि देशनिष्ठा याबद्दल महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल किंवा त्यांच्या समकालीन नेतृत्वांमध्ये तीळमात्रही संदेह नव्हता. म्हणूनच नेहरूंच्या मंत्रीमंडळात त्यांचा समावेश करण्याची शिफारस खुद्द गांधींजींनी केली. तसा संदेह असता तर, मसुदा समितीमध्येही त्यांचा समावेश होऊ शकला नसता. तथापि, आदर्श राज्यव्यवस्थेची मार्गदर्शक तत्त्वे निर्माण करून स्वतंत्र भारताच्या पुढील वाटचालीची दिशानिश्चिती करण्याची क्षमता डॉ. आंबेडकर यांच्यात असल्याची जाण व भान तत्कालीन नेतृत्वाला होते. घटनानिर्मितीचे त्यांचे कार्य आणि योगदान हे भारतीय समाजावरील त्यांचे थोर उपकार आहेत.
डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा उदय हा साऊथबरो कमिशनसमोरील त्यांच्या साक्षीने झाला. कमिशनसमोर जात, धर्म, शिक्षण, भाषा, जमीन मालकी अशी कोणतीही अट न घालता, विनाअट प्रौढ मतदानाची मागणी करत या देशातल्या मतदानापासून वंचित असणाऱ्या सुमारे ८५ टक्के बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व जणू डॉ. आंबेडकर यांनी केले. आणि ही मागणी ब्रिटीश मान्य करण्याची खूपच अंधूक शक्यता दिसत असल्याने; ते शक्य नसेल तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी त्यांनी लावून धरली. त्याचप्रमाणे ब्रिटीश सरकार 'नॉमिनेशन'ने प्रतिनिधित्व देण्याच्या मानसिकतेचे होते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे 'को-ऑप्शन'च्या बाजूचे होते, तर डॉ. आंबेडकर त्याही पुढे जाऊन 'इलेक्शन'च्या मागणीचे समर्थन करीत होते, हे त्यांच्या मुत्सद्दी राजकीय नेतृत्वाचे लक्षण होते. गांधी-नेहरू-पटेल आणि आंबेडकर यांच्या भूमिकांचा योग्य पद्धतीने अभ्यास करून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा फेरआढावा घेण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे.
जातिभेदाच्या हकतेचे चटके डॉ. आंबेडकर यांनी लहानपणापासून सोसले होते. धर्ममूढांनी केलेल्या अपमानांनी ते अनेकदा घायाळ झाले होते. म्हणून त्यांचा लढा हा अस्पृश्यतेविरुद्धचा लढा, असे वरकरणी वाटत असले तरी तो खऱ्या अर्थानं मानवमुक्तीचा लढा होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा शोधच तो होता. जातिनिर्मूलनाची ती प्राणपणाची लढाई होती. त्यामुळे धर्म, धर्मग्रंथ, पुरोहित, कर्मकांड, पूर्वजन्म-पुनर्जन्म, ईश्वर, दैववाद ह्या वर्णव्यवस्था जातिव्यवस्थांना चिरंजीव करणाऱ्या मुळांवरच त्यांनी घाव घातले. माणूस हा विज्ञाननिष्ठ व्हावा, आधुनिक मुल्यांचे त्यांना भान यावे, त्याच्या हक्कांची, माणुसकीची आणि अस्मितेची त्याला जाणीव व्हावी, विभूतीपूजेतून- शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य यातून मुक्त होऊन तो निर्भय बनावा, ह्या व्यापक उद्दिष्टांभोवतीच डॉ. आंबेडकर यांचे सर्व लढे केंद्रीभूत झालेले असल्याचे आपल्याला दिसून येईल. त्यांचा उदारमतवाद आपल्याला समन्वय शिकवतो, तडजोड शिकवतो. आयुष्यभर त्यांनी केलेल्या सामाजिक लढाईची दिशा, त्यांच्या जगप्रसिद्ध "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा," ह्या संदेशात एकवटली आहे. इथल्या सामाजिक, सांस्कृतिक आर्थिक विषमतेची मुळे वरवरच्या मलमपट्टीने उचकटून टाकता येणार नाहीत, हे आंबेडकरांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची कृतीशील लढाई केली. 'जातिनिर्मूलन' या ग्रंथात त्यांनी केलेली मांडणी, स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहिरनामा, 'स्टेट्स ॲन्ड मायनॉरिटीज्'मधील विश्लेषण आणि लोकशाही शासन प्रणालीचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे लेखन यातून त्यांचे क्रांतीकारकत्व सिद्ध होते. म्हणूनच बाबासाहेब हे भारतातील सम्यक क्रांतीचे निर्विवाद नेते आहेत, ही बाब स्पष्ट होते.
बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील नगण्य, सामान्य शोषित, पिडित, आदिवासी, भटके-विमुक्त जन आणि स्त्रिया; जे सर्वच ह्या महान देशाच्या स्वातंत्र्याचे सारखेच वाटेकरी आहेत, त्या प्रत्येकाला 'एक मत, एक मूल्य' हा मूलभूत अधिकार त्यांनी प्रदान केला. घटनेच्या सरनाम्यात त्याची नोंद केली, ही बाबासाहेबांची कामगिरी अभूतपूर्व ठरली.
केवळ अस्पृश्यता निर्मूलन, संविधान निर्मिती एवढेच मर्यादित योगदान बाबासाहेबांनी दिले, असे नाही; तर, त्यापलिकडे या देशाचे व्हॉईसरॉयच्या प्रतिनिधी मंडळातील मजूरमंत्री म्हणून त्यांनी या देशातील कामगार वर्गाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची दखलही या ठिकाणी घेतली गेली पाहिजे.
त्या काळात कोळसा खाणींचे महत्त्व तेजीत होते. त्याचप्रमाणे विज्ञानाच्या क्षेत्रात लागत असलेल्या क्रांतीकारक शोधांमुळे अभ्रकाच्या खाणींनाही महत्त्व आले होते. त्यातही जगातील ८० टक्क्यांहून अधिक अभ्रकाचे उत्पादन एकटा भारत करीत होता, यावरुन या बाबीचे महत्त्व लक्षात यावे. या खाण कामगारांच्या विविध प्रश्नांकडे बाबासाहेबांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी झरिया, धनबाद येथील कोळशाच्या, तर कोडर्मा (बिहार) येथील अभ्रकाच्या खाणींना भेटी दिल्या. केवळ परिसरालाच भेट दिली नाही, तर शिडीने चार-चारशे फूट खोल खाली खाणीत उतरून तेथे खाणकामगारांचे प्रत्यक्ष काम कसे चालते, याची पाहणी केली. हे कामगार कशा परिस्थितीत काम करतात, त्याचबरोबर त्यांची राहण्याची व्यवस्था कशी आहे, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा कशा आहेत, या साऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करणाऱ्या बाबासाहेबांच्या या कृतीतून त्यांची कामगारांचे प्रश्न समजून घेण्याची व ते सोडविण्याची तळमळ दिसते.
या भेटींतूनच पुढे भारतीय खाण (सुधारणा) विधेयक, अभ्रक खाण कामगार कल्याण फंड विधेयक, कोळसा खाण सुरक्षा विधेयक आदी कायद्यांची निर्मिती बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्याचबरोबर कारखाने (सुधारणा) विधेयक, महागाई भत्ता वाढ, भारतीय चहा नियंत्रण (सुधारणा) विधेयक, भारतीय बॉयलर्स (सुधारणा) विधेयक,  महिला खाण कामगार प्रसूती लाभ (सुधारणा) विधेयक, भारतीय कामगार संघटना (सुधारणा) विधेयक, वेतन देयक (सुधारणा) विधेयक, औद्योगिक कामगारांसाठी आरोग्य विमा तरतूद, औद्योगिक कामगारांसाठी गृहनिर्माण योजना, औद्योगिक कामगार (स्थायी आदेश) विधेयक, कामगारांना प्रतिपूर्ती सुधारणा विधेयक, एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज, पुनर्वसन, कल्याण आणि सामाजिक सुरक्षाविषयक योजना अशा कल्याणकारी कायदे व योजनांची निर्मितीही बाबासाहेबांनी केली. पूर्वी अस्तित्वात असणारे काही कायदे कामगारांसाठी जाचक स्वरुपाचे होते किंवा अकल्याणकारी होते. त्या बाबी विचारात घेऊन बाबासाहेबांनी ही विधेयके आवश्यक त्या सुधारणा करून सभागृहामध्ये मंजूर करवून घेतली. कामगारांच्या प्रश्नांचा इतक्या साकल्याने करून त्यावर विविध कायदे व योजनांच्या माध्यमातून कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा बाबासाहेबांचा प्रयत्न यातून दृष्टोत्पत्तीस येतो.
कारखाना कायद्यान्वये स्त्रियांना रात्री काम करण्यास बंदी घातली. महागाई निर्देशांकाच्या आधारावर महागाई भत्त्याची तरतूद करण्यासाठी बाबासाहेबांनीच प्रयत्न केले. कामाचे तास १४ तासांवरुन ८ तासांपर्यंत खाली आणून निश्चित केले. लिंगभेदरहित समान काम, समान वेतन बाबासाहेबांनीच त्या काळी लागू केले. त्याचप्रमाणे महिलांना चार आठवड्यांपासून ते ९० दिवसांपर्यंतची भरपगारी प्रसूती रजा देण्याचा निर्णय घेतला. भारतीय कामगार संघटना कायद्यात किमान वेतन निर्धारणाची तरतूद केली. कारखान्यात बारमाही काम करणाऱ्या कामगारांना भरपगारी रजा देण्याचा निर्णयही त्यांनीच प्रथम घेतला. सक्तीची तडजोड करण्यासाठी लवादाची स्थापना करून कामगारांमधील विवाद सोडविण्यासाठी सनदशीर मार्ग निर्माण करून दिला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सिंचन व ऊर्जा ही खातीही होती. त्याच काळात त्यांनी सिंचन व ऊर्जा धोरणाचा पाया घातला. अर्थात सिंचन व ऊर्जा ही दोन्ही क्षेत्रे १९३५ च्या भारत सरकार कायद्याप्रमाणे प्रांतिक सरकारकडे असल्याने डॉ. आंबेडकरांना प्रांतिक सरकारांचे सहकार्य प्रयत्नांनी मिळवावे लागले. डॉ. आंबेडकरांच्या व्यवहारी शहाणपणाचा परिणाम म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाने शेती व उद्योग या दोन्ही महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रांच्या विकासासाठी अत्यावश्‍यक असणारी सिंचन व ऊर्जा ही दोन महत्त्वाची पायाभूत क्षेत्रे विकसित करण्याचा पाया घातला गेला. डॉ. आंबेडकरांचे सिंचन धोरण तीन सूत्रांवर आधारित होते.
) जलसंसाधन विकास करण्यासाठी नदीखोरे (पाणलोट) क्षेत्र हा आधार धरून सिंचन योजनांचे नियोजन करताना बहुउद्देशीय दृष्टिकोन (Multi-purpose) ठेवणे आवश्‍यक आहे. शेतीसिंचन, पिण्यासाठी पाणी, जलवाहतूक, वीजनिर्मिती व काही पाणी उद्योगांसाठी. शक्‍यतेप्रमाणे ही उद्दिष्ट्ये असली पाहिजेत.
) असे जलप्रकल्प राबवण्यासाठी पाणलोट प्राधिकर (River Valley Authority) ही प्रशासकीय व्यवस्था असावी.
3) सिंचन व ऊर्जानिर्मितीसंबंधात राष्ट्रीय पातळीवर सेंट्रल वॉटरवेज इरिगेशन अँड नेव्हिगेशन कमिशन‘ (CWINC) केंद्रीय तांत्रिक वीज मंडळ (CTPB) अशी दोन तांत्रिक मंडळे निर्माण करवीत.
डॉ. आंबेडकरांच्या नियोजनामुळे व दूरदृष्टीमुळेच तत्कालीन महत्त्वाचे मोठे जलप्रकल्प (दामोदर, हिराकुड, सोने, कोसीह) कार्यवाहीत आले व नंतरच्या सिंचन व ऊर्जाधोरणाची व्यवस्था उत्क्रांत झाली, से म्हणावे लागेल. ऊर्जावाटपासाठी ग्रिड पद्धतीचा विचार त्यांनीच मांडला.
दि इसेन्शियल आंबेडकर या अलिकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. भालचंद्र मुणगेकर बाबासाहेबांचे वर्णन करताना म्हणतात, क्रांतदर्शी महान विचारवंतांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होतो. देशापुढील एकही प्रश्न असा नाही की, ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही. ते सक्रिय बुद्धिमंत विचारवंत होते व त्यांचे विचार आजच्या संदर्भातही तितकेच लागू होतात. देशातून जातिभेदाचे समूळ उच्चाटन करणे हे त्यांचे जिवित ध्येय होते. त्यासाठी त्यांनी व्यवस्थेला आव्हान दिले आणि समाज व राज्यव्यवस्थेत सुधारणा व्हाव्यात, यासाठी लढा दिला.
खरे आहे, बाबासाहेबांचा कितीही अभ्यास करा, कितीही बाजूंनी त्यांच्याकडे पाहा, ते दशांगुळे वर पुरून उरतात आणि त्यांच्या कार्याची व विचारांची प्रस्तुतता जराही कमी न होता उलट अधिकच प्रकर्षाने जाणवते आहे, हे त्यांचे द्रष्टेपण जसे आहे, तसेच आपल्या समाजाचे दुर्दैवही! बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने भारतीय समाजाने वाटचाल राखली असती तर, या देशासमोरील किती तरी प्रश्न सहजी त्या त्या वेळी निकालात निघाले असते.
म्हणूनच त्यांच्या विचारांचा जागर आपण नियमितपणे, सातत्याने घातला पाहिजे, समाजाला जागृत केले पाहिजे. तीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.