हैदर अली आतिशचा एक शेर आहे-
इलाही एक दिल किस किस को दूँ मैं!
हज़ारों
बुत हैं याँ हिन्दोस्तान है।
(परमेश्वरा, माझं एकच हृदय कोणा-कोणास देऊ
बरे? एकीकडे
हजारों मूर्त्या आहेत,
अन् दुसरीकडे माझा देश!)
भारतीय समाज हा प्रतिमा, प्रतीके आणि संबोधने
यांच्या जंजाळात गुरफटलेला आहे. त्याच्या समस्त अस्मिता या राष्ट्रपेक्षा, एखाद्या
महापुरूषाच्या विचार अथवा कर्तृत्वापेक्षा या प्रतिमा आणि संबोधनांभोवतीच
एकवटलेल्या दिसतात. मूळ बाबीकडे लक्ष देण्याऐवजी तो अशा निरुपयोगी बाबींमध्ये अधिक
गुंतत जात आहे आणि कित्येकदा अनाठायी वादांना कारणीभूत ठरतो आहे.
उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त
महाराष्ट्राचं आराध्यदैवतच. महाराजांविषयी आदर नाही, असा माणूस शोधून सापडावयाचा
नाही. महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख हा अनादराचा भाग असण्याचं कारणच नाही, उलट
त्यांच्याप्रती आपलेपणाच त्यातून प्रतिबिंबित होतो. महाराष्ट्रात शिवाजी आणि
संभाजी नाव असणारे लोक गावोगावी, नव्हे घरोघरी सापडतील. जेव्हा कोल्हापूरच्या
शिवाजी विद्यापीठाला महाराजांचे नाव द्यायचं ठरलं, तेव्हा छत्रपती राजाराम महाराज,
प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी सुरवातीपासूनच ‘शिवाजी विद्यापीठ’ असाच नामप्रयोग
केला. बॅ. पी.जी. पाटील यांनीही शिवाजी विद्यापीठाचे नामकरण अनादराच्या हेतूने
नव्हे, तर या विद्यापीठाचे नाव उच्चारणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी छत्रपतींचे नाव
आलेच पाहिजे, या हेतूने केले असल्याचे स्पष्ट केले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ.
एन.डी. पाटील यांनी अधूनमधून नामविस्ताराच्या येणाऱ्या मागण्या ऐकून त्यासंदर्भात
सविस्तर निवेदन केले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘शिवाजी विद्यापीठ
असे नामकरण खूप विचारपूर्वक करण्यात आले आहे. त्याचा ‘छत्रपती शिवाजी
महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झाला की लगोलग त्याचे ‘सी.एस.एम.यु.’ असे लघुरुप प्रचलित
होण्याचा धोका आहे. ‘सीएसटी’ (शिवाजी महाराज
टर्मिनस), ‘सीएसएमटी’ (छत्रपती शाहू
महाराज टर्मिनस), ‘बामु’ (डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), एसपीपीयु
(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), आरपीडी (राणी पार्वतीदेवी महाविद्यालय) अशी
उदाहरणं आहेतच आपल्या नजरेसमोर. विद्यापीठाची स्थापना झाली त्यावेळी आम्ही विरोधी
पक्षात होतो आणि विद्यापीठाच्या नावात ‘छत्रपती शिवाजी
महाराज’ असा उल्लेख असावा, असे आमचे मत होते. त्यावेळी
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आमच्याशी चर्चा केली. त्यांनी ‘शिवाजी विद्यापीठ’ या नामकरणामागील
भूमिका स्पष्ट केली. ती योग्य वाटल्याने आम्ही सहकार्य केले. त्यामुळे लघुरुप
होण्याचा धोका टाळण्यासाठी नव्याने नामविस्ताराचा आग्रह धरणाऱ्यांनी सबुरीने
घ्यावे.’ मात्र, अगदी एन.डी. पाटील यांनी
सांगितल्यानंतरही आज लव्हाळ्याप्रमाणे उगवणाऱ्या संस्था हा वस्तुनिष्ठ इतिहास
लक्षात न घेता लगोलग अस्मितेचे कारण पुढे करीत नामविस्ताराचे निवेदन घेऊन
विद्यापीठाच्या, शासनाच्या दारात येतात आणि लोकानुनय सांभाळण्याच्या नादात
त्यांनाही ते स्वीकारण्याखेरीज पर्याय राहात नाही.
मूर्त्या, पुतळे उभारले की आपल्या साऱ्या निष्ठा
आपण त्या पुतळ्यांच्या नव्हे, तर ते उभारणाऱ्यांच्या पायी वाहायला सिद्ध होऊन
जातो. महापुरूषांच्या अनाठायी दैवतीकरणाच्या मागे आपण लागलेलो आहोत.
विभूतीपूजेच्या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा देऊन ठेवलेलाच आहे.
संविधान सभेत केलेल्या भाषणात ते म्हणतात की, ‘जगातील कोणत्याही
देशात नाही, इतकी विभूतीपूजा भारतीय राजकारणात आहे. धर्मातील मुक्ती ही
आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असेल; पण, राजकारणात
भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकुमशाहीकडे नेणारा मार्ग असेल.’
बाबासाहेबांचा इशारा लक्षात न घेता आपण आपल्या
साऱ्या भावभावना, अस्मिता या विचारांपेक्षा पुतळ्यांच्या पायी वाहिलेल्या दिसतात.
त्यामुळे अलिकडे भावना दुखावणे हे प्रकरणही कधी नव्हे इतके पातळ झाले आहे. काही
झाले तरी कोणाच्या ना कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ लागल्या आहेत. आपल्याकडे लोकपरंपरेतून
आलेल्या अनेक म्हणी, वाक्प्रचार या जगण्याची शिकवण देणाऱ्या आहेत. मात्र, त्यातील
आशय लक्षात न घेता केवळ शाब्दिकता पुढे करून त्याचा बाऊ केला जातो आहे. त्यामुळे
स्वच्छ अभिव्यक्तीला सुद्धा आता मर्यादा पडू लागलेल्या आहेत. बोलण्याच्या ओघात
निघून गेलेला सहजोद्गार माफीनाम्यापर्यंत घेऊन जाऊ शकण्याच्या काळात आपण वावरतो
आहोत.
एखाद्या समूहाचा सन्मान हा विशिष्ट शब्दांनी केला
जाणे उचितच आहे. जसे की, दिव्यांग, दिव्यदृष्टी. मात्र, या संबोधनांच्या पलिकडे एक
समाज म्हणून आपण या घटकांना त्यांची प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याची जबाबदारी
निभावतो आहोत का, हा खरा मुद्दा आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.
स्त्रियांच्या प्रतिष्ठेच्या बाबतीत तर आपण अशा
संबोधनांच्या मार्गानेच आपली संवेदनशीलता दाखविण्याचा प्रयत्न करीत राहिलो आहोत.
स्त्रीचे दुय्यमत्व संपविण्यासाठी कौटुंबिक अथवा सामाजिक पातळीवर आपण किती प्रयत्न
करतो आहोत, हे दररोजचे वृत्तपत्र उघडले की लक्षात येतेच. लहान मुलीपासून ते जख्ख
वृद्धेपर्यंत पुरूषांच्या अत्याचारातून कोणीही सुटल्याचे दिसत नाही. स्त्रियांना
त्यांचे न्याय्य नैसर्गिक हक्क प्रदान करण्याच्या बाबतीत सुद्धा आपण समाज म्हणून
मागेच पडलेलो आहोत. स्त्रीच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला आपण पुरूषी सत्तेच्या
प्रतीकांनी मढवलेले आहे, याची जाणीव स्त्रियांनाच नाही मुळी. तिच्या भांगात सिंदूर
आहे, तिच्या कपाळी कुंकू आहे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, हातात हिरवा चुडा आहे,
बोटात अंगठी आहे, अंगावर हिरवी साडी आहे, पायात पैंजण, जोडवी आहे. ही सारी प्रतीकं
पुरूषाचं तिच्या आयुष्यातील अस्तित्व दाखविणारी, मात्र ती मोठ्या अभिमानानं मिरवते
आहे. पुरूषाच्या बोटात तिच्या नावची (म्हणजे सासऱ्यानं लग्नात दिलेली) अंगठी असली
तर असते किंवा नसतेही. पुरूष हा आयुष्यभर ‘श्री’मान असतो; मात्र, स्त्रीच्या जीवनातील
पुरूषाचं अस्तित्व तिच्या संबोधनातून अधोरेखित केलं जातं. तिचं कुमारिका असणं,
तिचं ‘सौभाग्य’वती असणं आणि तिचं ‘श्रीमती’ असणं, हे सारं त्या
पुरूषी अस्तित्वाशी, तिच्या आयुष्यात त्याच्या असण्या-नसण्याशी निगडित
आहे. त्यापलिकडं जाऊन तिला आपण अन्य कोणतं संबोधन देतो, यानं तिच्या जगण्यात असं
कोणतं मोठं आमुलाग्र परिवर्तन साधणार आहोत? त्यापेक्षाही
स्त्रीची प्रतिष्ठा जपण्यासाठी, उंचावण्यासाठी एक समाज, एक राज्य, एक राष्ट्र
म्हणून आपण काय करतो, काय करू शकतो, हे अधिक महत्त्वाचं नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा