शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१२

‘फोर्थ सीट’!


मुंबईच्या लाइफशी जर आपल्याला जुळवून घ्यायचं असेल, तर सर्वात प्रथम इथल्या लाइफलाइनशी म्हणजे लोकल ट्रेनशी जुळवून घेतलंच पाहिजे, अन्यथा यू आर टोटली मिसमॅच! हे मी जेव्हा नोकरीनिमित्तानं मुंबईत आलो, तेव्हा पहिल्या काही दिवसांतच माझ्या लक्षात आलं. ट्रेनच्या सेकंदावरील वेळा आणि त्या वेळेशी जुळवून आपलं स्वतःचं दैनंदिन टाइमटेबल आखणारा आणि सुटीच्या दिवशी मात्र हे टाइमटेबल धुडकावून लावणारा मुंबईकर जाणून घेता घेता मी सुद्धा त्यातलाच एक कधी झालो, हे माझं मलाच कळलं नाही. कल्याण-सीएसटी-कल्याण असा दैनिक (पासावर) प्रवास सुरू झाल्यावर सुरवातीच्या काळात लोकल ट्रेनचा, त्यातल्या प्रवाशांचा माझा अभ्यास आणि निरीक्षणही सुरू झालं. (वरती हँडल पकडून लटकत उभं असताना दुसरं करता येण्यासारखं तरी काय होतं?)
अगदी विंडो सीटपासून ते डोअर-हँगरपर्यंत खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनचा प्रत्येक डबा म्हणजे आपल्या समाजाचं एक मिनी-प्रतिरुपच असल्याचा माझा समज पक्का होत गेला. वेगवेगळ्या वयोगटाची माणसं, त्यांचे ग्रुप, त्यांच्यातलं प्रेम, प्रसंगानुरुप उसळणारा त्यांचा संताप, त्याला शांत करण्यासाठी पुढं सरसावणारी माणसं, जेवढी जागा आहे तेवढ्यात एडजस्ट करणारी, करवून घेणारी किंवा चढता-उतरताना थोडा जरी धक्का लागला तरी वैतागणारी, एखाद्या आजारी माणसाला व्यवस्थित जागा देणारी, पाण्याची बाटली कुठूनही पैदा करून भोवळ आलेल्याला सावरणारी, हाथ छोड, आगे चल म्हणताना हँडल गच्च पकडून उभे राहिलेल्यांच्या हातावर फटके मारणारी अशी हरतऱ्हेची माणसं इथं पाह्यला, अनुभवायला मिळाली.
लोकलमधून प्रवास करताना मला प्रकर्षानं एक गोष्ट जाणवली किंवा खटकली म्हणा, ती म्हणजे इथली फोर्थ सीट’! तसं पाहायला गेलं तर तीन प्रवाशी बसू शकतील, अशा त्या सीटवर तौथ्या व्यक्तीला बसू देणं, हा खरं तर अनंत अडचणींना तोंड देणाऱ्या मुंबईकरांच्या मनाचा मोठेपणाच! त्या चांगुलपणाचं श्रेय त्यांना दिलं गेलं पाहिजेच. आयुष्यामध्ये सर्वात जास्त एडजस्टमेंट आणि कॉम्प्रमाइज जर कोणी करत असेल तर तो मुंबईकरच! पण लोकलमधली फोर्थ सीट ही मला नेहमीच आपल्या समाजाच्या मनोमनी खोलवर रुजलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचीच आठवण करून देते. इथं विंडो सीट म्हणजे ब्राह्मण्य, सेकंड सीट म्हणजे क्षत्रियत्व, थर्ड सीट म्हणजे वैशत्व आणि फोर्थ सीट हे शूद्रत्व! दोन्ही सीटच्या मधे आणि अन्यत्र उभे असलेले हे तर अतिशूद्रच! जेव्हा एखाद्या व्यक्तीला फोर्थ सीटवर बसायचं असतं, तेव्हा त्याचा त्या सीटवरचा प्रवेश सहजसाध्य नसतोच मुळी. त्याला आधी थर्ड सीटवाल्याला विनवणी करावी लागते, तो थोडंसं हलल्यासारखं करतो, तरीही जागा होत नाही, मग त्या व्यक्तीला सेकंड सीटवाल्याला हातानं ढोसावं लागतं, तो जरा जास्त हलल्यासारखं करतो, पण जागा होईलच याची शाश्वती नसते. झालेल्या जागेबाबत समाधान मानून फोर्थ सीटवर माणूस बसतो. तरीही समजा, त्याला अडचण वाटून पुन्हा सेकंड सीटवाल्याला विनवलं की मग तो उखडलाच म्हणून समजा. विंडो सीटवाला तर अभी क्या विंडो से बाहर जाऊँ, असं म्हणून हात वर करून रिकामा होतो.
या चातुर्सीटव्यवस्थेत असा एखाद्याचा प्रवेश शक्य आहे, पण त्याला वर, पुढं सरकायची संधी मात्र नाही. कधी कधी सेकंड सीटवाल्याला विंडो सीटकडं सरकता येऊ शकतं, थर्ड सीटवाल्याला सेकंड सीटवर सरकता येऊ शकेलही, पण... पण.. फोर्थ सीटवाल्यानं थर्ड सीटवर सरकण्याची गडबड केली, तर त्याला समज दिली जाते. फोर्थ सीटवाल्याला अशा प्रमोशनचा अधिकार नाही, असूच शकत नाही, हे कुठंतरी आत खोलवर.. खूप खोलवर पक्कं ठसलंय. उभ्या असलेल्या अतिशूद्रांना तर तोही अधिकार नाही. कुणी प्रेमानं जागा दिली तर घ्या, नाही तर राहा उभे! आणि ही मानसिकता इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजली आहे. प्रत्यक्षात एखाद्याचा सामाजिक दर्जा कोणताही असो, विंडो सीटला बसल्यावर त्याच्यामध्ये जागृत होणारी मानसिकता ही त्याच ऑथोरिटेटीव्ह मानसिकतेचंच प्रतिनिधित्व करते. आजही ती मानसिकता वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होताना दिसत्येय.
व्हाय शूड आय स्पीक टू अ क्लास फोर पर्सन?’, असं म्हणणारे किंवा सही केलेली फाइल जमिनीवरच फेकून तिथनंच शिपायानं ती उचलावी, ही पूर्वापार मानसिकता भिनलेले अधिकारी आजही आपल्यात कमी नाहीत. त्यामुळं सर्वांशी प्रेमानं, आपुलकीनं बोलणारा, वागणारा अधिकारी भेटला की, त्याच्याप्रती निष्ठेनं काम करणारे हाताखालचे लोक आपोआपच तयार होतात.
मला आठवतंय, एका मुलाखतीत हरी नरके सरांनी शैक्षणिक चातुर्वर्ण्य कसा वाढतोय, हे अगदी तपशीलवार सांगितलं होतं. इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाणारे विद्यार्थी ब्राह्मण, खाजगी, कॉन्व्हेंट शाळांत जाणारे क्षत्रिय, मराठी माध्यमात शिकणारे वैश्य आणि म्युनिसिपाल्टीच्या शाळांत जाणारे शूद्र तर शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असणारी मुलं अतिशूद्र! नरके सरांनी सांगितलेल्या या बाबीचा गांभीर्यानं विचार केला तर खरोखरीच येणाऱ्या काळात परिस्थिती अधिक बिकट आणि सामाजिक वैचारिक गोंधळ वाढवणारीच असणार आहे. त्यामुळं एकीकडं शिक्षणामुळं सामाजिक दरी कमी होण्यास मदत होईल, असा तज्ज्ञांचा जो विश्वास होता, त्याला या नव्या चातुर्वर्ण्यामुळं छेद जाणार आहे.
थेट सामाजिक चातुर्वर्ण्य आज जरी दृश्य स्वरुपात आस्तित्वात नसलं तरी समाजाच्या सर्वच स्तरांतील व्यक्तींच्या मनात रुजलेल्या चातुर्वर्ण्याचं समूळ उच्चाटन करता येऊ शकेल, अशी परिस्थिती आज तरी देशात संभवत नाही. हेच खरं दुखणं आहे...!