मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

गौडबंगाल ऑफ सिनौली..?











('दै. पुढारी'च्या यंदाच्या 'दीपस्तंभ' दीपावली विशेषांकामध्ये 'सिनौली' उत्खननाच्या अनुषंगाने सविस्तर लिहीले आहे. हा लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी साभार पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर) 


फेब्रुवारी २०२१मध्ये एका इन्फोटेनमेंट वाहिनीवर सिक्रेट्स ऑफ सिनौली ही साधारण ५५ मिनिटांची डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्यात आली. उत्तर प्रदेशातील गंगा-यमुनेच्या दोआबातील बागपतजवळील सिनौली येथे सन २००५-०६ आणि सन २०१८ अशा दोन टप्प्यांत करण्यात आलेल्या पुरातत्त्वीय उत्खननामध्ये सापडलेल्या दफनभूमी, त्यांमधील मानवी अवशेष, त्यासोबत आढळलेल्या वस्तू आणि त्यांच्या आधारे काढण्यात आलेले निष्कर्ष या बाबींवर हा माहितीपट आधारित आहे. नीरज पांडे यांच्यासारखा उत्तम निर्माता-दिग्दर्शक, मनोज वाजपेयी यांच्यासारखा मुरब्बी अभिनेत्याचे सूत्रसंचालन आणि दर्जेदार ग्राफिक्स यांमुळे हा माहितीपट निश्चितपणे प्रेक्षणीय झालेला आहे. जोडीला सिनौलीच्या सन २००५मधील उत्खननाचे प्रमुख माजी संचालक डी.व्ही. शर्मा, सन २०१८च्या उत्खननाचे संचालक आणि एएसआयचे सहाय्यक महासंचालक डॉ. संजय कुमार मंजुल, एएसआयचे माजी सहाय्यक महासंचालक पद्मश्री डॉ. आर.एस. बिश्त, माजी महासंचालक पद्मभूषण बी.बी. लाल, माजी सहाय्यक महासंचालक प्रो. के.एन. दीक्षित आणि संचालक डॉ. (श्रीमती) अर्विन मंजुल इत्यादी पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ आजी-माजी पदाधिकाऱ्यांची फौज विश्लेषण करताना, निष्कर्ष प्रतिपादित करताना दिसते. मात्र, त्यांच्याकडून मांडले गेलेले निष्कर्ष राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर वादग्रस्त ठरलेले आहेत.

सिनौली येथील उत्खननामुळे आर्य हे स्थलांतरित नव्हे, तर इथलेच आहेत आणि वैदिक संस्कृती येथे सनपूर्व २२०० पासून आहेच; त्याचप्रमाणे सिनौली येथे सापडलेले रथांचे अवशेष आणि शस्त्रास्त्रे ही महाभारत युध्द खरेच घडले असावे याचा पुरावा आहेत, अशा प्रकारचे दावे खरे मानून सदर माहितीपट बनविण्यात आला, जिने हे दावे बळकट करायला हातभार लावला आहे, असे या संदर्भातील संशोधन करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. सिनौली येथील उत्खननाबाबत काढण्यात आलेले निष्कर्ष अत्यंत अशास्त्रीय स्वरुपाचे आहेत, असा प्रमुख आक्षेप घेण्यात येतो आहे. त्याबाबत चर्चा करण्यापूर्वी नेमकी ही उत्खनने काय आहेत, हे जाणून घ्यायला हवे.

सन २००५-०६मधील उत्खनन:

सिनौली हे उत्तर प्रदेशातील छोटेसे गाव. दिल्लीपासून साधारण ७५ किलोमीटरवर वसलेले. येथील रहिवाशांचा मूळ व्यवसाय शेती आहे. सन २००५मध्ये सत्तार अली (दि. १ जुलै २००६ रोजीच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये हे नाव देण्यात आले आहे. अलीकडच्या विविध दैनिकांमध्ये मात्र शेतकऱ्याचे नाव श्रीराम शर्मा असे सांगितले जाते. असो!) हा शेतकरी आपल्या उसाच्या शेतात नांगरट करीत असताना त्याला अचानकपणे काही वस्तू सापडू लागल्या. त्यामध्ये काही बिडाचे मणी, सोन्याच्या बांगड्यांचे तुकडे, मडक्यांच्या फुटक्या खापऱ्या आणि काही मानवी हाडांचे अवशेषही होते. स्थानिकांची ते पाहण्यासाठी आणि पळवण्यासाठी गर्दी होऊ लागली. ताहीर हुसैन (याचे नावही केवळ टाइम्सच्या वार्तांकनात आहे, अन्यत्र नाही.) या तरुणाने या प्रकाराची माहिती भारतीय पुरातत्त्व विभागाला त्यावेळी दिली, म्हणून पुढील उत्खनन होऊ शकले.

ऑगस्ट २००५पासून पुढे सुमारे वर्ष- दीड वर्ष या परिसरात बारतीय पुरातत्त्व विभागाच्या (एएसआय) डी.व्ही. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन करण्यात आले. हे ठिकाण आणि उत्खनन वैशिष्ट्यपूर्ण ठरले याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशात सापडलेली ही हडप्पाकालीन एकमेव दफनभूमी आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे दफन करण्यात आलेल्या व्यक्तींच्या सांगाड्यांशेजारी सापडलेल्या तांब्याच्या दोन दुधारी तलवारी (अँटेना स्वॉर्ड) होय. त्यांना पकडण्यासाठी तांब्याच्याच मुठी होत्या. या उत्खननात १२६ सांगाडे सापडले. त्यातील बरेचसे चांगल्या स्थितीत, तर काही विस्कळीत होते. अर्थातच येथील तत्कालीन वस्ती चांगलीच दाट असल्याची खात्री त्यातून होते. येथील एका सांगाड्याच्या दोन्ही हातांत तांब्याचे कडे आढळले. त्यापासून काही अंतरावरील एका दफनात एका प्राण्याचे अवशेष आढळले. मृतासोबत बळी देण्याचा हा प्रकार असावा. उत्खननातील अन्य वस्तूंमध्ये बीडाच्या मण्यांचे हार, सोन्याचे दागिने, तांब्याचे भाले, मृण्मयी प्रतिमा, मृताच्या डोक्याकडील बाजूला काही मातीची भांडी आढळली, ज्यामध्ये यमासाठी नैवेद्य म्हणून धान्य, दही, तूप, सोमरस इत्यादी पदार्थ ठेवले असावेत. (असा तज्ज्ञांचा अंदाज.) दफनभूमीला घेरणाऱ्या भाजलेल्या विटांच्या भिंतीचेही अवशेष मिळाले. मृतावशेषांचे कार्बन डेटिंग केले असता त्यांचा कालावधी इसवी सन पूर्व २०००च्या आसपास (इ.स.पू. २२०० ते इ.स.पू. १८००) असल्याचे आढळून आले. या दफनांचे हडप्पा येथे मिळून आलेल्या उत्तरकालीन दफनांशी साधर्म्य असल्याचे पुरातत्व खात्याचे सिनौली उत्खननाचे प्रमुख डी. व्ही. शर्मा यांनी घोषित केले.

मृताच्या दफनाची दिशा ही ऋग्वेदात म्हटल्याप्रमाणे दक्षिणोत्तर आहे आणि नैवेद्याची प्रथा शतपथ ब्राह्मणात वर्णिल्याप्रमाणे आहे, असेही शर्मा यांचे म्हणणे. मात्र, याबाबत इतक्या तातडीने कोणत्याही निष्कर्षाला जाणे योग्य नाही, असे अन्य इतिहासतज्ज्ञांचे मत आहे.

ही सन २००५-०६ची उत्खनने होताहेत, तोपर्यंतच उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाला महाभारताच्या पर्यटन सर्किटमध्ये सिनौलीच्या समावेशाची घाई लागलेली. महाभारताच्या पानिपत, सोनपत, हस्तिनापूर आणि बागपत या जोडीने सिनौलीचाही समावेश करण्याचा प्रस्ताव राज्याचे तत्कालीन पर्यटन मंत्री ख्वाब हमीद यांनी केंद्र सरकारला दिला सुद्धा होता.

तेरा महिन्यांच्या उत्खननानंतर एएसआयने त्यावेळी हे उत्खनन थांबविले. नंतर बराच काळ सिनौली येथे नवे उत्खनन झाले नाही.

सन २०१८मधील उत्खनन:

सन २०१८ मध्ये या प्राचीन दफनभूमीजवळच उत्खननाचा दुसरा टप्पा डॉ. संजय कुमार मंजुल यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाला. सन २००५-०६च्या उत्खनन क्षेत्रापासून साधारण १०० मीटर अंतरावर मार्च ते मे २०१८ या काळात प्रायोगिक उत्खनन घेण्यात आले. यावेळी येथे आणखी काही दफने सापडली. विशेष म्हणजे या उत्खननात शवपेट्या आणि पूर्ण आकाराचे छकडेसदृश गाडे सापडले. त्या जोडीलाच गेरू रंगाची मातीची भांडी, तांब्याची शिरस्त्राणे, चिलखत, तांब्याच्या तलवारी व ढाल, टेराकोटाची मोठी भांडी, भडक काठाची तांबडी भांडी, तांब्याचे खिळे आणि बीडाचे मणी अशा बाबीही सापडल्या. या पूर्वी हडप्पा (पंजाब) येथे आणि ढोलावीरा (गुजरात) येथे अशा प्रकारच्या लाकडी शवपेट्या सापडल्या होत्या.

या उत्खननात सापडलेल्या लाकडी शवपेट्या तांब्याच्या नक्षीदार पत्र्याने आच्छादित केलेल्या होत्या. मृतांसोबत पुरलेल्या छकडेसदृश गाड्यांचेही अवशेष मिळाले. एका शवपेटीवरील तांब्याच्या पत्र्यावर पिंपळपान आणि बैलाच्या शिंगांचे शिरस्त्राण-सदृश अथवा बैलाचे मस्तक सूचित करणारी आकृती कोरलेली मिळाली. एका शवपेटीत स्त्रीचे शव असून तिच्या हातावर गोमेद जडवलेला बाजूबंदही सापडला.

या शवपेट्यांच्या दफनामध्येही तीन प्रकार आढळले. पहिला प्रकार म्हणजे प्राथमिक दफन. यामध्ये पूर्ण मानवी दफन आहे. अर्थात शवपेटीत एकाच व्यक्तीचे दफनकर्म येथे केले आहे. दुसरा प्रकार हा विखंडित दफनाचा आहे, ज्यामध्ये अनेक व्यक्तींचे सांगाडे त्या शवपेटीत एकत्रित आढळले. तिसरा प्रकार हा केवळ सांकेतिक दफनाचा आहे. इथे शवपेटीत कोणताही सांगाडा आढळला नाही. एका शवपेटीत महिलेचा सांगाडाही आढळला. विशेष म्हणजे तिच्यासमवेत अन्य वस्तूंबरोबरच तांब्याच्या तलवारीचेही दफन करण्यात आले आहे. याचा अर्थ ती सुद्धा एक योद्धा होती. मात्र, तिच्या पायाचा खालील म्हणजे घोट्यापासून खालचा भाग मात्र गायब आहे. हा एखाद्या प्रथेचा भाग आहे की अन्य काही, हे कळायला मार्ग नाही. या महिलेच्या मृतदेहाचे डीएनए विश्लेषण केले असता, तिचा कालखंडही इ.स.पू. २१०० ते १९०० इतका निष्पन्न झाला आहे.

या लाकडी शवपेट्या संरक्षित राहण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावर केलेले तांब्याचे नक्षीकाम. लाकडी पायांवर स्थित या शवपेट्यांच्या सर्व बाजूंनी आणि अगदी पायांवरही तांब्याचे नक्षीकाम केले आहे. त्यामुळे लाकूड जरी पूर्णतः कुजून नष्ट झाले तरी या तांब्यामुळे शवपेट्या सुरक्षित राहू शकल्या.

पहिल्या प्रकारच्या दफनभूमीत गाडा आढळला, मात्र तेथे बैल अगर घोडा अशा कोणत्याही प्राण्याचे अवशेष आढळलेले नाहीत. एका दफनभूमीत एक आणि अन्य एका दफनभूमीत एकाच ठिकाणी दोन असे एकूण तीन गाडे या उत्खननात आढळले.

एएसआयचे विश्लेषण, वादाचे मुद्दे आणि वास्तव:

सिनौली येथील दुसऱ्या टप्प्यातील या उत्खननाचे वैशिष्ट्य राहिले ते म्हणजे शवपेट्या आणि त्याहून अधिक आकर्षणाचा बिंदू राहिला तो म्हणजे सापडलेले गाडे. हे गाडे म्हणजे इंडो-आर्यन तंत्रज्ञानाप्रमाणे युद्धात वापरले गेलेले रथ आहेत आणि ते घोड्यांकरवी खेचले जात होते, असा निष्कर्ष संचालक मंजुल मांडतात. त्यांच्या मते, "भारतीय उपखंडात प्रथमच उत्खननात अशा प्रकारे घोड्यांनी खेचले जाणारे रथ सापडले आहेत. सिनौली येथील दफनविधी वैदिक विधींशी घनिष्ट संबंध दर्शवितात. तसेच, महाभारताचा कालावधीही ई.स.पू. १७५०च्या आसपास आहे." असे अनेक निष्कर्ष मंजुल मांडतात. त्यांचे माहितीपटातले सारे तज्ज्ञ समर्थन करताना दिसतात, मात्र कोणत्याही ठोस पुराव्याअभावी.

एका स्थानिक दंतकथेनुसार, श्रीकृष्णाने कुरूक्षेत्राचे युद्ध टाळण्यासाठी ज्या पाच ठिकाणी कौरवांशी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी एक सिनौली हे आहे. महाभारतात वर्णन केलेल्या रथाशी येथे सापडलेल्या गाड्याची संरचना मिळतीजुळती आहे, असाही एक प्रवाद आहे. महाभारत हे महाकाव्य नसून घटित इतिहास आहे आणि ते सप्रमाण सिद्ध करण्याचे जे खटाटोप सद्यस्थितीत चालले आहेत, ते पाहिले की या साऱ्याचा हेतू लक्षात यायला वेळ लागत नाही. अघटिताशी तथ्यांशी तुलना करणे अगर त्या तुलनेचा वापर तथ्यांच्या सिद्धतेसाठी करणे शास्त्रीयदृष्ट्या किती गैर आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र, तसा प्रयत्न येथे होताना दिसतो खरा!  

त्याचप्रमाणे माहितीपटात एएसआयचे तज्ज्ञ डी.व्ही. शर्मा अंत्यसंस्काराविषयी ऋग्वेदातल्या पुरूषसुक्ताच्या एका ऋचेचा दाखला देतात. मात्र, या ऋचेमध्ये दफन केलेल्या मृत शरीराचा नव्हे, तर अस्थि-कलशाचा (दहन केल्यानंतर उर्वरित अवशेष ठेवलेल्या) संदर्भ असल्याचे मात्र ते सांगत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे या दफनांचा काळ हा ताम्रयुगीन दिसतो. ऋग्वेदाचा अर्थात वेदांचा कालखंड हा त्यानंतरचा आहे, हेही येथे सोयीस्करपणे दुर्लक्षित केले आहे.

इंडो-आर्यनांच्या आगमनापूर्वी भारतात घोड्यांची उपस्थिती सुचवणे, याकडे काहींनी इंडो-आर्यन स्थलांतर सिद्धांताला आव्हान म्हणून पाहिले. तथापि, सापडलेल्या गाड्याची "रथ" म्हणून ओळख करून देणे यामध्ये अडचण आहे. सापडलेल्या गाड्याची चाके घन अर्थात भरीव आहेत. त्याला रथाप्रमाणे आरे नाहीत. अशा भरीव गाड्या ओढण्यासाठी बैलांची आवश्यकता असते. मात्र, युद्धात वापरण्यास ते कुचकामीच ठरणारे आहेत. आणि घोड्यांच्या अस्तित्वाचे तर कोणतेही पुरावेच नाहीत.

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या इतिहासतज्ज्ञ रुचिका शर्मा यांच्या मते, ‘एएसआय या उत्खननातील गाड्यांना रथ का म्हणते, याचे स्पष्टीकरण व्हायला हवे. हडप्पाकालीन परिसरात बैलगाड्या असणे ही काही असाधारण बाब नाही. टेराकोटाच्या अशा गाड्यांचे पुरावे उपलब्ध आहेत. एएसआयला त्यांच्या शोधांना हिंदुत्वाचा रंग देण्याची सवय आहे. त्यांनी यापूर्वीही काही स्त्री आकृत्यांचा अर्थ 'मातृदेवता' असा लावला होता. मात्र, ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते.

पुरातत्त्वज्ज्ञ प्रा. मायकल विट्झेल यांनीही या गाड्याला रथ म्हणणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याचा शोध उत्तर-हडप्पाकालीन संघटित समाजाच्या अस्तित्वाकडे निश्चितपणे निर्देश करू शकतो, असे ते म्हणतात. आणखी एक तज्ज्ञ असको पारपोला यांच्या मते, या गाड्या बैलांकरवीच ओढल्या जात असाव्यात आणि त्याद्वारे सिंथास्ता संस्कृतीमधून इंडो-इराणीपूर्व भाषिक लोकांचे भारतीय उपखंडात झालेल्या स्थलांतराचे संकेत निश्चित प्राप्त होतात. उत्तर-हडप्पा संस्कृतीचा सत्ताधारी वर्ग म्हणून तो येथे उदयास आला असावा. आद्य ऋग्वेदिक किंवा पूर्व वैदिक लोकांच्या स्थलांतराचे संकेत यातून मिळतात. सिनौलीतील गाड्यांच्या या शोधामुळे पूर्व-ऋग्वेदिक काळातील आर्यनभाषिकांच्या स्थलांतराच्या लाटेविषयी आपल्या सिद्धांताला बळकटीच मिळते, असेही पारपोला यांचे म्हणणे आहे.

इंडो-युरोपीय भाषा बोलणाऱ्यांचे भारतातले आगमन हा विषय एवढा संवेदनशील का असावा, याचे स्पष्टीकरण टोनी जोसेफ यांच्या अर्ली इंडियन्स या पुस्तकामध्ये आपल्याला मिळते. या प्रश्नाचे उत्तर देताना जोसेफ यांनी म्हटले आहे की, त्यामागे असलेले एक अलिखित गृहितक त्यासाठी जबाबदार आहे. ते गृहितक म्हणजे आर्य, संस्कृत आणिवेद हे एवढे तीनच शब्द भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यास पुरेसे आहेत. त्यामुळेच इंडो-युरोपीय भाषा बोलणारे भारतात कधी आले, हा प्रश्न विचारणे म्हणजे आपण आपली संस्कृती कधी आयात केली?, असे विचारण्यासारखे आहे. जोसेफ पुढे म्हणतात, परंतु हा दृष्टीकोन हास्यास्पद आहे. त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे भारतीय संस्कृती ही फक्त आर्य, संस्कृत किंवा वैदिक संस्कृती नव्हे. आजच्या अनन्यसाधारण अशा भारतीय संस्कृतीच्या प्रवाहातली वैदिक संस्कृती ही एक महत्त्वाची धारा आहे; पण कोणत्याही दृष्टीने ती धारा एकमेव नाही. इतर अनेक धारा भारतीय संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात मिसळल्या आहेत. दुसरे म्हणजे कोणत्याही अमूकच एका कालखंडात इंडो-युरोपीय भाषा भारतात येऊन पोहोचल्या, असे म्हणणे म्हणजे वेद, संस्कृत आणि आर्य संस्कृती जणू काही एका खोक्यातून आणवून, दिलेल्या तयार आराखड्यानुसार त्यांची इथे फक्त पुनर्बांधणी करण्यात आली, असे सुचविल्यासारखे आहे. प्रत्यक्षात मात्र वैदिक भाषा स्वतःबरोबर इथे घेऊन आलेले लोक, त्यांच्या येण्यापूर्वीचे इथले रहिवासी यांच्यातील परस्पर संपर्क, त्यांनी आत्मसात केलेली एकमेकांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि इथलेच होऊन राहण्यासाठी केलेले सांस्कृतिक-सामाजिक बदल या सर्व घटकांची घुसळण होऊन आर्य/वैदिक संस्कृती घडत गेली असावी.

त्यापुढे जाऊन जोसेफ सांगतात की, वैदिक संस्कृत बोलणारे भारतातले जनसमूह त्यांची भाषा त्यांच्याबरोबर जगभर घेऊन गेले की, ती भाषा बोलणारे लोक बाहेरून भारतात आले, या प्रश्नावर उलटसुलट चर्चा करायला आतापर्यंत वाव होता; परंतु जनुकीय संशोधनामुळे, विशेषतः प्राचीन डीएनएवर आधारित संशोधनामुळे आता या वादावर पडदा पडण्याची ठोस शक्यता निर्माण झाली आहे.  

आर्यांच्या जनुकीय पूर्वजसाखळीच्या अनुषंगाने अर्ली इंडियन्समध्ये ते लिहीतात, इंडो-युरोपीय भाषकांच्या भारतातील आगमनाविषयी अधिक काही जाणून घेण्यापूर्वी एक पाऊल मागे जाऊ या आणि भारतातून बाहेर गेलेल्या लोकांविषयीच्या गृहितकाच्या संदर्भात चर्चा करताना उद्भवलेल्या एका उपप्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ या : जर इंडो-युरोपीय भाषेचा प्रसार युरेशियाच्या विस्तृत प्रदेशात झाला होता, तर त्या भूप्रदेशात त्या भाषा बोलणाऱ्यांचे जनुकीय अंश आढळतात का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. वाय गुणसूत्राचा हॅप्लोग्रुप R1a किंवा अधिक तपशीलानं सांगायचं तर त्याचा उपगट R1a-M417, हा जगभरातल्या जवळजवळ सर्व R1a हॅप्लोग्रुपमध्ये दिसतो. R1a-M417 या R1aच्या उपगटाच्या विस्ताराचा नकाशा पाहिला तर त्यामध्ये स्कॅन्डीनेव्हियापासून दक्षिण आशियापर्यंत म्हणजेच इंडो-युरोपीय भाषा ज्या प्रदेशात बोलल्या जातात, ते सर्व प्रदेश त्या नकाशात सामावलेले दिसतात.

आपण R1a-M417चा आणखी खोलात जाऊन विचार केला आणि जगभरात तो कसा पसरत गेला, हे पाहू शकतो का? हो, नक्कीच पाहू शकतो. ते असं आहे: इसवी सन पूर्वी ३८००च्या सुमारास R1a-M417चं दोन गटांमध्ये विभाजन झालं. ते गट आहेत R1a-Z282 आणि R1a-Z93. हे गट वेगळे होऊन दोन वेगवेगळ्या मार्गांनी जगात पसरले. यातला R1a-Z282 हा फक्त युरोपमध्ये आढळतो आणि R1a-Z93 हा मध्य आणि दक्षिण आशियात आढळतो. भारतातील सर्व ‘R1’ पूर्वजसाखळ्या R1a-Z93 या उपगटातल्याच आहेत. या दोन उपगटांतला फरक लक्षणीय आहे. फायलोजेनेटिक अँड जिऑग्राफिक स्ट्रक्चर ऑफ वाय क्रोमोजोम हॅप्लोग्रुप R1a’ हा शोधनिबंध २०१४ साली प्रसिद्ध झाला आणि त्याचे प्रमुख लेखक आहेत, डॉ. पीटर ए. अंडरहिल. वाय गुणसूत्राच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अंडरहिल यांचं नाव सन्मानानं घेतलं जातं. आपल्या शोधनिबंधात ते म्हणतात: R1a-M417च्या १६९३ युरोपीय नमुन्यांमधून ९६ टक्क्यांपेक्षा जास्त नमुने R1a-Z282चे ठरले, तर आशियातल्या ४९० R1a हॅप्लोग्रुपमधले ९८.४ टक्के नमुने R1a-Z93मधले सिद्ध झाले. हे पूर्वीच्या पाहणीत सूचित झालेल्या पठडीशी सुसंगतच होतं. R1a-M417 हा इंडो-युरोपीय भाषा बोलणाऱ्या लोकांचा जो अत्यंत विस्तृत प्रदेश आहे, त्या प्रदेशात त्याचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि तो वाय गुणसूत्राच्या हॅप्लोग्रुपचा उपगट आहे. त्याचा R1a-Z93 हा उपगट भारतातील जवळजवळ सर्व पूर्वजसाखळ्यांमध्ये उपस्थित आहे. तर R1aमधून निर्माण झालेला R1a-Z282 हा उपगट युरोपमधल्या जवळजवळ सर्व पूर्वजसाखळ्यांमध्ये उपस्थित आहे.

मग R1a-M417चा आणि R1a-Z93 यांचे जगातले सर्वांत आधीचे पुरावे कोठे सापडले, याची माहिती २०१७ साली प्रसिद्ध झालेल्या द जिनोमिक हिस्टरी ऑफ साऊथ ईस्टर्न युरोप या शोधनिबंधात आहे. त्यानुसार, R1a-M417चा इसवी सन पूर्व ५००० ते इसवी सन पूर्व ३५०० दरम्यानचा सर्वात जुना पुरावा युक्रेनमध्ये सापडला, तसेच इसवी सन पूर्व २५००च्या सुमाराचे पुरावे पूर्व युरोपमधल्या अनेक ठिकाणी आढळले आहेत. भारतात सर्वत्र दिसून आलेला R1a-Z93 हा उपगट, मध्य आशियातल्या गवताळ प्रदेशातील इसवी सनपूर्व२५००च्या सुमाराच्या सर्वाधिक प्राचीन नमुन्यांमध्ये आढळून आला आहे. खरं तर, कांस्य युगाच्या मध्यापासून अखेरपर्यंत (इसवी सनपूर्व २००० ते इसवी सनपूर्व १४००), मध्य आशियातील गवताळ प्रदेशांमध्ये R1a-Z93चं प्रमाण बरंच जास्त म्हणजे ६८ टक्के इतकं आढळून आलं. यातून भारतातील R1a-Z93 असलेले जनसमूह, युरेशियन गवताळ प्रदेशातून आले असावेत, एवढा एकच निष्कर्ष निघू शकतो.

R1 आणि त्याचे उपगट भारतातील इंडो-युरोपीय भाषा बोलणाऱ्यांशी निगडित आहेत, हे तपासून पाहण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. R1 भारतातील कोणत्या सामाजिक घटकांमध्ये आढळतो, ते पाहायचं आणि ते घटक संस्कृत भाषा आणि वैदिक परंपरा यांच्याशी निगडित असलेल्या उच्चवर्णियांशी, त्यातही विशेषत्वानं पुरोहित वर्गाशी संबंधित आहे का, ते तपासून पाहायचं. अनेक संशोधनांतून हे दिसून आलं आहे की, R1चं प्रमाण उच्चवर्णीय वर्गांमध्ये अधिक आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या तुलनेत पुरोहित वर्गामध्ये ते दुपटीनं अधिक असल्याचं आढळलं आहे. म्हणजे आपल्याला आता हे माहीत आहे की, ज्या प्रदेशांमध्ये प्रामुख्यानं इंडो-युरोपीय भाषा बोलल्या जातात, त्या प्रदेशांमधल्या जनसमूहांना एकाच पूर्वजसाखळीशी जोडणारा एक विशिष्ट जनुकीय दुवा मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे. विशेष म्हणजे इंडो-युरोपीय भाषांमधल्या प्राचीन असणाऱ्या संस्कृत भाषेचं जतन करण्याचं काम भारतीय समाजातील ज्या घटकांकडं परंपरेनं आलं होते, त्या घटकांमध्ये या विशिष्ट जनुकीय दुव्याचं प्रमाण लक्षणीयरित्या अधिक आहे.

सिनौलीच्या अनुषंगानं घोडे आणि वेद यांविषयीही उलटसुलट चर्चा आहे. या चर्चेत, ऋग्वेद हा हडप्पा नागरी संस्कृतीनंतरचा आहे, या बाबत पुरातत्त्वज्ञ म.के. ढवळीकर यांचं मतही विचारात घेणे आवश्यक आहे. ते म्हणतात, आपण एखादी कादंबरी वाचत असू, तर त्या कादंबरीचा काळ आपण कसा ठरवू? त्या कादंबरीमध्ये मोबाईल फोनचा उल्लेख असेल तर ती विसाव्या शतकात किंवा त्यानंतर लिहीलेली असावी, असं आपण समजू. त्याचप्रमाणे ऋग्वेदामध्येही दोन खुणा आहेत. एक म्हणजे घोड्याचं अस्तित्व. ही खूण फारच महत्त्वाची आहे. कारण, घोडा हा आर्यांच्या खास आवडीचा प्राणी होता. त्यांच्या धार्मिक परंपरांमध्येही घोड्याची भूमिका महत्त्वाची होती. दुसरी खूण म्हणजे ऋग्वेदामध्ये नेहमी अयसचा उल्लेख येतो. त्याचा शब्दशः अर्थ तांबेअसा आहे. कारण त्यानंतर लोखंडाचा शोध लागल्यावर त्यांना कृष्ण अयस किंवा काळे तांबे असा नवा शब्दप्रयोग तयार करावा लागला.

आता शुद्ध पुरातत्त्वीय पुराव्यांचा विचार केला तर पाळीव घोड्यांचे अस्तित्व इसवी सनपूर्व १९००पासून दिसून येतं. हा काळ हडप्पा नागरी संस्कृतीच्या अखेरचा म्हणजे इसवी सनपूर्व १९०० किंवा इसवी सनपूर्व १५०० दरम्यानचा काळ आहे. त्यामुळे आपल्याला इसवी सनपूर्व १९०० ते इसवी सनपूर्व १८०० हा एक निश्चित कालबिंदू मिळतो. उत्तर भारतात लोखंडाचा वापर इसवी सनपूर्व १५०० ते इसवी सनपूर्व १४०० पर्यंत सुरू झालेला होता. यावरुन आपण इसवी सनपूर्व २००० ते इसवी सनपूर्व १४०० दरम्यानचा कालखंड ऋग्वेदाचा काळ मानू शकतो. थोडक्यात, ऋग्वेद हा हडप्पा नागरी संस्कृतीनंतरचा आहे. प्रा. विट्झेल यांच्या मतानुसारही भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशांत (आर्य जिथे प्रथम स्थिरावले तो प्रदेश) इसवी सनपूर्व १०००च्या सुमारास लोहाचा शोध लागलेला आहे, त्यामुळे ऋग्वेदाची रचनाही साधारण त्याच सुमारास झाली असावी.

खरे तर पुरातत्व खाते ज्ञानात निष्पक्ष भर घालण्यासाठी असते, याचा विसर पुरातत्त्व खात्याला पडला आहे, हे राखीगढी येथे झालेल्या उत्खननापासून ते घग्गर नदीला सरस्वती घोषित करण्यापर्यंतच्या उपद्व्यापातून आपण पाहू शकतो. सिनौली येथील उत्खनन आणि त्यावरून काढले गेलेले अशास्त्रीय निष्कर्ष यावरून तीच बाब पुन्हा सिद्ध होते, असे अभ्यासक संजय सोनवणी मांडतात. सोनवणी सांगतात की, पहिली बाब म्हणजे दफनपेटीवर बैलाच्या मस्तकाचे चिन्ह आहे, घोड्याचे नाही. म्हणजेच सिनौलीतील लोकांना बैल माहित होते, घोडे नाहीत. आणि रथ घोडे ओढतात, बैल नाही. आर्यांच्या दफनांत प्रेतासोबत रथ व त्याला जुंपलेले घोडेही दफन केले जात, असे पुरावे अन्द्रोनोवो, सिंथास्ता संस्कृती व लुयोंग येथील आर्य दफनांत मिळाले आहेत. या दफनांत प्रेते ही रथाच्या बैठकीच्या जागेवर ठेवलेली असून त्यात शवपेट्यांचा वापर नाही. ही सर्व स्थाने मध्य आशियात मोडतात, जेथून इंडो-युरोपियन म्हणजे आर्य इराणमध्ये व तेथून भारतात आले, असे मानले जाते. ही दफने इसवी सनपूर्व २००० नंतरची आहेत.

सिनौली येथे दफनासोबत छकडा आहे, पण घोडा (अथवा बैलही) पुरलेला नाही. महत्वाची बाब म्हणजे मध्य आशियातील दफनांतील रथांची संरचना सिनौलीच्या छकड्यांप्रमाणे नसून सर्वस्वी वेगळी तर आहेच; पण, चाकेही भरीव नसून आरे असलेली आहेत. भरीव चाकांचे रथ जगात कोठेही नसतात कारण त्यामुळे वजन वाढते. त्यामुळे सिनौली येथील सापडलेल्या भरीव चाकाच्या गाड्यांना युद्धातील वेगवान रथ ठरवायचा प्रयत्न करणे दिशाभूल करणारे आहे.

सिनौली येथील दफने वैदिक पद्धतीची आहेत, हे मंजुल यांचे म्हणणे धादांत असत्य असल्याचे सोनवणी सांगतात. ते म्हणतात की, शवपेटीत दफन करण्याचा एकही उल्लेख वैदिक साहित्यात नाही. मात्र उत्तरसिंधू काळात अशी दफने आढळलेली आहेत. ऋग्वेदात रथांचे जेही उल्लेख आहेत, ते आऱ्यांच्या चाकांच्या रथांचे आहेत, भरीव चाकांचे नव्हेत. सिंधू संस्कृतीत इसवी सनपूर्व ३१०० पासून भरीव चाकांच्या बैलगाड्यांचाच वापर होत असल्याचेही पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय सिनौली येथे जी मृद्भांडी, अलंकार, बैलाचे मस्तक व पिंपळपानाच्या आकृती मिळाल्या आहेत, त्याही सिंधू संस्कृतीत मिळणाऱ्या अवशेषांशी मेळ खातात. म्हणजेच सिंधू संस्कृतीचा विस्तार गंगेच्या खोऱ्यापर्यंत झाल्याचा पुरावा सिनौली येथील अवशेष देतात; तेथे वैदिक संस्कृती अस्तित्वात असल्याचा नव्हे, हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

दुसरी बाब म्हणजे सिनौली येथील मृतांचा महाभारत युद्धाशी संबंध असल्याबद्दलचा दावा. या दाव्याबद्दल सोनवणी सांगतात की, हे अवशेष सापडले तो परिसर कुरुक्षेत्राचा भाग मानला जातो. महाकाव्यातील युद्धाची आणि या अवशेषांची सांगड घालून युद्ध खरे करण्यात आलेच. त्याचप्रमाणे ही क्षत्रियांची शाही दफने आहेत, असा दावा वैदिक धर्माभिमान्यांनी करणे स्वाभाविक मानले तरी ते हे विसरतात की या दफनांतील सांगाडे हे युद्धात मेलेल्यांचे नसून नैसर्गिक मरण आलेल्यांचे आहेत. या दफनांत एक वर्षाच्या मुलापासून ते वृद्ध स्त्री-पुरुषांचेही सांगाडे सामाविष्ट आहेत. दुसरे म्हणजे दफनात तलवारी वगैरे शस्त्रे सापडली असली तरी धनुष्यबाणाचा एकही पुरावा सापडलेला नाही. महाभारत युद्धात तर धनुष्य हेच मुख्य साधन वापरल्याचे उल्लेख आहेत. मग त्या मृतांचा संबंध महाभारत युद्धातील मृतांशी कसा बरे लावता येईल? सिनौली येथील दफनभूमी ताम्रयुगीन आहे. लोखंडाचा शोध तोवर लागलेलाच नव्हता. पण ऋग्वेदाला लोखंड माहित होते म्हणजे ऋग्वेद लोहयुगात (इसपू १५०० नंतर) लिहिला गेला. तरीही सिनौली येथील अवशेषांचा संबंध वैदिक आर्यांशी जोडत त्यांना येथलेच ठरवायचा प्रयत्न करणे अशास्त्रीय व वर्चस्वतावादी धोरणाचा परिपाक आहे. उलट सिनौली येथील अवशेष आपल्याला ओरडून सांगत आहेत की सिंधू संस्कृतीचा विस्तार समजला जातो तेवढाच नसून ती गंगा-यमुनेच्या खोऱ्यापर्यंत किंवा त्याही पलिकडे पसरलेला होता. तीत काही स्थानिक वैशिष्ट्येही होती. गंगा-यमुनेच्या दोआबात राहणाऱ्या पुरातन जमातींनी ती आपली स्वतंत्र वैशिष्ट्ये आपल्या दफनपद्धतीत कायम ठेवली. त्या काळात जगभरातील सर्व जमातींना संरक्षण-आक्रमणासाठी युद्धसज्ज राहावेच लागे. किंबहुना तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असे. दफनांत शस्त्रे सापडली म्हणून त्यांना लगेच वैदिक क्षत्रिय ठरवायचा बादरायणी प्रयत्न संघीय विद्वान करू धजत असले तरी तज्ज्ञांनी तसे करणे अक्षम्य आहे. यामुळे सिनौलीच्या अवशेषांचा खरा अन्वयार्थ समजून घेतला जाणार नाही. आपले प्राचीन पूर्वज आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीवर खरा प्रकाश पडणार नाही. लबाड्या करून वर्चस्ववादी बनता येईल; पण त्यातून ज्ञानपरंपरेची अक्षम्य हानी होईल, हा त्यांचा इशारा निश्चितच दुर्लक्षिता येणार नाही.

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

‘वचन’दाता गेला...

रवींद्र जत्राटकर


 

भोगत यातना चढलो मी

शाळेची पायरी

शिकलो नाही मी

ग ग गणपतीचा

भ भ भटजीचा

त्याच्याही पुढे शिकलोय मी

ग ग गतकाळाचा

भ भ भविष्याचा

ब ब बुद्धाचा, बाबासाहेबांचा

शाळेची एक एक पायरी चढताना

मी वचन दिलंय बाबासाहेबांना

मी वचन दिलंय क्रांतीबा फुल्यांना

मी वचन दिलंय संत कबीरांना

मी वचन दिलंय गौतम बुद्धांना

त्यांची प्रज्ञाज्योत तेवत ठेवण्याचं!’


कवी रवींद्र जत्राटकर यांची मी वचन दिलंय... या काव्यसंग्रहातील शीर्षक कवितेच्या या काही ओळी... रवींद्र हे खरं तर सख्खे नसले तरी नात्याने माझे काका... माझ्यावर निरतिशय प्रेम करणारे, माझ्याबद्दल अतीव आदरभाव असणारे... जन्मदात्यांनी जन्माला घातलं, चळवळीनं घडवलं आणि साहित्यानं जगवलं, असं त्यांनी स्वतःच त्यांच्या जगण्याचं वनलाइनर सूत्र सांगितलेलं आणि ठरविलेलं... ते खरंही होतं... बाबासाहेबांच्या निपाणीतील १९५२ सालच्या सभेतील उपदेशानं भारावलेल्या गरीब परिस्थितीतल्या आईवडिलांनी आपल्या लेकरांना कष्टानं शिकविण्याचं ठरवलं... त्या भावंडातला रवीकाका एक... प्राथमिक शाळेत शाळा सुटली, पण शिकण्याची आस नाही सुटली... कष्ट करीत, सूतगिरणीत कामं करीत, आईवडिलांना हातभार लावत, जमेल तसं, जमेल त्या वेळेला शिक्षण घेत मुक्त विद्यापीठातनं त्यांनी एस.वाय. पर्यंतचं शिक्षण घेतलं... पण, शाळा-कॉलेजातल्या शिक्षणापेक्षाही जगातल्या आणि ग्रंथालयातल्या शाळेत त्यांचं जीवन घडलं... खूप वाचलं त्यांनी... बंधू सुरेश जत्राटकर यांचा आदर्श घेऊन लिहीण्याचाही छंद जडला त्यांना... सूतगिरणीत काम करताना

सटाSSक पटाSSक सटाSSक पटाSS

एकतेचं, समतेचं गाणं गाणाऱ्या

पॉवरमागला अन् विणकरांना काय माहीत

देशाची लाज अब्रू

विषमतावादी वेशीवर टांगतायत म्हणून...

हा समतेचा विचारच त्यांच्या मनात सुरू असायचा...

किराणा मालाच्या दुकानात पुड्या बांधता बांधता कागदांवर कविता उतरायची-

सांभाळताना दुकान चांगले वाईट अनुभव यायचे

अगरबत्तीप्रमाणे विचार धुपायचे

नि कापराप्रमाणे मन जळायचे

चालू केलं दुकान मी अनिच्छेनं

कविता मात्र करतोय स्वइच्छेनं

बुद्ध भीमाच्या प्रेरणेनं...

वाचनातून, जगण्यातून आलेले अनुभव त्यांच्या कवितांचा विषय व्हायचे; बुद्ध, फुले, आंबेडकरांची प्रेरणा त्यातून प्रकटत राहायची... ती प्रेरणा हे त्यांच्या जगण्याचं मर्म होतं... त्या प्रेरणेचा प्रसार हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं... विविध क्षेत्रांतील उत्तम जाणकारांचा लोकसंग्रह करणं, हा त्यांचा छंद होता... लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना जाणून घेणं, याची गोडी त्यांना होती... त्यातूनच कुटुंब, नातेवाईकांच्या पलिकडंही खूप मोठा गोतावळा त्यांना लाभलेला होता... लौकिक शिक्षण त्यांनी सांगितलं तरच समजायचं... पटायचं नाही ते, इतके वेगळे विषय, ताजे संदर्भ त्यांच्या बोलण्यात येत असत... ओथंबून बोलत असत... अक्षर तर सुलेखनाच्या वहीत छापल्यासारखंच... अशी उच्च दर्जाची प्रज्ञा लाभलेला हा माणूस... नुकताच अकाली गेला... कर्करोगानं त्यांना आमच्यातून हिरावून नेलं... सूतगिरणीत तीस वर्षांहून अधिक केलेल्या कामानं त्यांच्या जीवनाचा धागा मात्र कमकुवत करून टाकला... निर्व्याज, दिलखुलास आणि चेहऱ्यावर सदैव मंदस्मित घेऊन माझ्यासमोर येऊन उभा ठाकणारा हा काका येथून पुढे भेटणार नाही; काही लिहीलेलं वाचलं, रेडिओवर ऐकलं की आवर्जून येणारा त्यांचा फोन आता येणार नाही, ही कल्पनाच साहवत नाहीय... एक अत्यंत प्रेमाचं माणूस गमावल्याची भावना आणि आयुष्यभराची पोकळी निर्माण झालीय त्यांच्या जाण्यानं...