शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

वाय-फाय: आहे रम्य तरीही...!


(दै. पुढारीच्या साप्ताहिक 'बहार' पुरवणीत प्रकाशित झालेला लेख ब्लॉग वाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधीमंडळात मुंबई स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने काही योजना जाहीर केल्या. यामध्ये मुंबईतल्या सुमारे १२०० ठिकाणी वाय-फाय हॉटस्पॉट्स उभारून त्या माध्यमातून नागरिकांना वाय-फाय सुविधा पुरविण्यात येणार आहे. मे २०१७पर्यंत याबाबतची आवश्यक कार्यवाही पूर्ण करून ही सुविधा कार्यान्वित करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काहींना मुख्यमंत्र्यांची ही योजना पॉप्युलॅरिस्टीक वाटू शकेल; पण, प्रत्यक्षात तसे नाही. या सुविधेचा वापर करून रिअलटाइम डाटा अपडेशनसह स्मार्ट पार्किंग, स्मार्ट ट्रान्स्पोर्टेशन व्यवस्था विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. प्रवाशांना बेस्ट बस, लोकल, रेल्वे वा मेट्रो सेवा यांच्याविषयी रिअल टाइम माहिती त्यांच्या मोबाईलवरील ॲपद्वारे प्राप्त होईल. या सार्वजनिक वाहतुकीची योग्य माहिती वाय-फाय सुविधेच्या लाभासह मिळणे, या गोष्टीचे महत्त्व केवळ मुंबईकर माणूसच जाणू शकतो.
याखेरीज मुख्यमंत्र्यांनी सन २०१८च्या अखेरपर्यंत राज्यातल्या २८ हजार ग्रामपंचायती वाय-फाय सेवेने जोडण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांत गेल्या १ मे पासून अशी वाय-फाय सेवा कार्यान्वित झाली असून तिथल्या ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे आणि शाळा वाय-फायने जोडल्या आहेत.
राज्यात अन्यत्रही विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारे वाय-फाय सुविधा पुरविण्याची चाचपणी, घोषणा, प्रयोग सुरू आहेत. कोल्हापुरातही तत्कालीन स्थायी समितीचे सभापती आदिल फरास यांनी मोफत वाय-फाय सुविधेची घोषणा केली आहे. केवळ राज्यातच नव्हे, तर अगदी राष्ट्रपती भवनापासून ते विमानतळांपर्यंत, महाविद्यालयांपासून ते हॉटेल्सपर्यंत अनेक महत्त्वाच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी आता वाय-फाय हॉटस्पॉट सर्रास असल्याचे दिसतात.
स्मार्टफोन हा आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. त्यावरील विविध ॲप्सच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात खरेदीपासून ते बिल भरण्यापर्यंत आणि मित्रांशी संपर्कात राहण्यापासून ते व्हर्च्युअली नवे मित्र जोडण्यापर्यंत, वेळ वाचविण्याबरोबरच वेळ घालविण्यासाठीही, अशा प्रत्येक ठि र सप्सच्या माध्यमातून आपल्या ठकाणी स्मार्टफोन आपला साथीदार झाला आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी हा यातला सर्वात कळीचा मुद्दा आहे. आणि ही केवळ मेट्रो शहरांतल्या नागरिकांचीच गरज आहे, असे नव्हे; तर, निमशहरी आणि ग्रामीण भागापर्यंतही ही चैन नव्हे, तर गरजेची बाब बनली आहे. त्यामुळे वाय-फाय हॉटस्पॉट आणि तत्सम सुविधांकडे आपण त्या दृष्टीनेच पाह्यला हवे.
मात्र, या इंटरनेटचा, मोफत वाय-फाय सुविधांचा वापर नागरिक कशासाठी करणार आहेत, ते वापरण्याचे कल्चर, संस्कृती आपण विकसित केली आहे का, हा खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सेवा फुकट मिळते म्हणून जर त्यावर आपण केवळ ॲप अपडेट करणे, वॉट्सॲप चॅटिंग करणे, गेम्स खेळणे किंवा मोठ्या डाटा साइझचे चित्रपट, गाणी डाऊनलोड करत राहिलो, तर या सुविधांचा तो गैरवापर ठरेल.
केंद्र सरकार असो की राज्य शासन, आज डिजीटल इंडियासारख्या अभियानाच्या माध्यमातून अनेक ऑनलाइन सुविधा नागरिकांना पुरवित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाही त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून आपापल्या कार्यक्षेत्रात अशा सुविधा विकसित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने तर आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून एक-दोन नव्हे, तर तब्बल १५६ सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्यातील बऱ्याच सुविधा कार्यान्वितही झाल्या आहेत. या शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी नागरिकांना मोफत वाय-फाय सुविधेचा निश्चितपणाने उपयोग होऊ शकतो.
लाभाच्या दृष्टीने विचार केला तर, आज थ्री-जी किंवा फोर-जी सेवा या सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यातील नाहीत. एक जीबी थ्री-जी डाटा प्लॅन घ्यावयाचा झाल्यास २८ दिवसांसाठी २५२ रुपये ग्राहकाला मोजावे लागतात. फोर-जी सेवा त्याहून महाग आहे. या पार्श्वभूमीवर मोफत वाय-फाय ही सर्वसामान्य ग्राहकासाठी वरदानच ठरेल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही असे पब्लिक हॉटस्पॉट महत्त्वाचे ठरतील, कारण त्यांना ई-बुक्स, ऑनलाईन लर्निंग व रेफरन्सिंग, ऑनलाइन स्टडी, डिस्कशन फोरम यासाठी त्याचा वापर करता येईल. दूरशिक्षण घेण्याचे प्रमाण आजकाल मोठ्या प्रमाणात वाढले आहे, त्या दृष्टीनेही हे वाय-फाय उपयुक्त ठरेल. आपत्तीच्या प्रसंगी जेव्हा फोन, ब्रॉडबँड इंटरनेटसारख्या सेवा खंडित होतात, अशा वेळी वाय-फाय सुविधा वरदायी ठरू शकते. या मोफत वाय-फाय सुविधेचा वापर करून परिसरातील निम्न व मध्यम स्तरातील लोक तद्अनुषंगिक व्यवसाय संधीही निर्माण करू शकतात.
असे लाभ असले तरी, या मोफत वाय-फाय सेवेच्या अनुषंगाने निर्माण होऊ शकणारे धोके आणि तोटे यांचाही सांगोपांग विचार धोरणकर्त्यांनी करायला हवा. मोफत जरी म्हटले असले तरी जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नसते. वापरकर्त्याला मिळणारी वायफाय सुविधा ही शासन पुरविणार असले तरी, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत व्यवस्थेची उभारणी करण्याची आवश्यकता असते. अगदी ठिकठिकाणी टॉवर उभारणीपासून ते टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांना बिल भरण्यापर्यंत साऱ्याच गोष्टींचा भार शासनावर, पर्यायाने नागरिकांवरच पडणार आहे. हा खर्च कर किंवा अन्य कोणत्या तरी माध्यमातून सरकारला वसूल करावाच लागेल, अन्यथा हे मोफत प्रकरण परवडणारे नाही. दुसरी बाब म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मोफत इंटरनेट मिळू लागले की तिथे वापरकर्त्यांचीही संख्या साहजिकच वाढणार आणि त्याचा परिणाम इंटरनेटच्या गतीवरही होणार. थ्री-जी डाटा टू-जीच्या स्पीडने मिळू लागल्यावर आपली काय अवस्था होते, आठवून पाहा. तेच, अशा सार्वजनिक ठिकाणी घडले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
मोफत वाय-फाय सुविधेच्या बाबतीत सर्वात मोठा धोका उद्भवतो, तो म्हणजे सुरक्षेचा! काही दिवसांपूर्वी एका आयटी संशोधकाने बंगळूरच्या विमानतळावर केवळ शंभर डॉलर किंमतीचे एक साधन वापरून तिथल्या मोफत वाय-फाय सेवेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थींचे स्मार्टफोन हॅक करून दाखविले होते. मुंबईसारख्या शहरात जर असे सारेच फोन हॅक झाले तर कल्पनाच करवत नाही, की काय होईल? वापरकर्त्यांचे वॉट्सॲप चॅट्स, क्रेडिट, डेबीट कार्डांचे क्रमांक व इतर डिटेल्स, पासवर्ड यांच्यासह फोनमधली इतर सर्व वैयक्तिक माहिती, फोटो, डॉक्युमेंट्स.. काय नि काय काय? त्यामुळे अशा सार्वजनिक नेटवर्क्सवरुन कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करणे धोक्याचे होऊ शकते. आज व्यक्तीगत नेटवर्कवरुन केले जाणारे बँकिंग व्यवहार हॅक केले जातात, तिथे सार्वजनिक नेटवर्कवरुन असे व्यवहार केल्यास त्याची सुरक्षितता अधिकच धोक्यात येईल, हे लक्षात घ्यायला हवे. हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात त्यामुळे वाढ होण्याचा खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर, मोफत वाय-फाय सुविधा विकसित करणे आवश्यक असले तरी त्या सुविधेच्या सुरक्षेसाठीही अत्याधुनिक कठोर उपाययोजना करणे फार महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे वापरकर्त्या नागरिकांनाही या सुविधेचा सकारात्मक वापर करण्याविषयी तसेच आपल्या माहितीची सुरक्षितता आणि गोपनीयता सांभाळण्याबाबत योग्य माहिती, प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे.

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

मैत्र.. आधुनिक कृष्ण-सुदाम्याचे!मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर करावीशी वाटते... यातला एक जण शिक्षण क्षेत्रातल्या उच्चतम कुलगुरू पदावर... तर दुसरा अल्पसंख्याक समाजातला अल्पशिक्षित... चहाचा गाडा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा... दोघांच्या सामाजिक-आर्थिक स्तरामध्ये, स्टेटसमध्ये जमीन-अस्मानाचा फरक... तरीही दोघांतले मैत्रीचे बंध मात्र अतूट आणि सर्व तथाकथित स्तरांच्या, मान्यतांच्या पलिकडले!
ही गोष्ट आहे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि औरंगाबादमध्ये चहाचा स्टॉल चालविणारे त्यांचे मित्र जाफरभाई शेख यांच्या मैत्रीची! मला ती समजली, कुलगुरू महोदयांचे ड्रायव्हर श्री. प्रल्हाद गंगाधरे यांच्याकडून! काही दिवसांपूर्वी प्रल्हाद हे कुलगुरू डॉ. शिंदे यांना घेऊन औरंगाबादला गेले होते. त्यावेळी सरांना कॉफी घ्यावयाची असल्याने त्यांच्या पदाला साजेसे असे हॉटेल प्रल्हाद शोधत होते. अहिल्याबाई होळकर चौकात गाडी आल्यानंतर कुलगुरूंनी बाजूलाच असलेल्या एका टपरीच्या शेजारी कार थांबविण्यास सांगितले. सरांना काही तरी घ्यावयाचे असेल, असे समजून त्यांनी गाडी बाजूला घेतली. काही विचारणार इतक्यात सरांनी काच खाली करून 'मामू...' अशी हाक मारली. हाक ऐकून ४०-४५ वर्षे वयाची एक व्यक्ती चहाच्या टपरीतून लगबगीने गाडीकडे धावत आली. ते जाफरभाई होते... त्यांनी सरांना नमस्कार केला आणि कॉफी घेण्याची विनंती केली. कॉफी गाडीत न मागविता सर थेट गाडीतून उतरले आणि 'जनता टी हाऊस' नावाच्या त्या टपरीत गेले. जेमतेम आठ बाय आठची ती टपरी... चहा बनविण्याचे साधन.. शेगडी आणि पाण्याचा पिंप एवढीच सामग्री असलेली... जाफरभाई कॉफी बनवू लागले... कुलगुरू महोदय, तिथल्याच एखा खुर्चीवर बसले... जाफरभाईंच्या घरच्यांची ख्यालीखुशाली त्यांनी विचारली... तोपर्यंत जाफरभाईच्या टपरीत बघ्यांची मोठी गर्दी झाली... या फाटक्या टपरीत चहा प्यायला मोटारीतून कोण एवढा मोठा माणूस आलाय, ते पाहायला!... पण, या दोन मित्रांना त्याची फिकीर नव्हती... बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळं दोघंही गप्पांत रमले... जाफरभाईंनी सरांना कॉफी दिली... प्रल्हादनं विनंती करून दोघांची काही छायाचित्रं त्याच्या मोबाईलमध्ये घेतली... सरांच्या या अनोख्या पैलूनं भारावलेल्या प्रल्हादनं दौऱ्यावरुन परतल्यानंतर आवर्जून माझी भेट घेऊन कुलगुरू आणि जाफरभाईंच्या मैत्रीचा किस्सा सांगितला...
आजच्या काळात असं मैत्र आढळणं, ही तशी दुर्मिळच बाब… म्हणून मी प्रल्हादला सांगून जाफरभाईंचा मोबाईल क्रमांक मिळविला आणि या संदर्भात त्यांच्याशी मोबाईलवरुन आणखी बोललो… सरांच्या आणि त्यांच्या मैत्रीविषयी विचारताच जाफरभाई भरभरून बोलू लागले… "देवानंद सर के बारे में मैं आपको क्या बताऊँ, सर! इन्सान के रुप में भगवान समान हैं वो आदमी। उसके जहन में कोई जातपात नहीं, कोई ऊँचा-नीचा, बडा-छोटा नहीं। सारे एक समान हैं। आदमी एक बार बडा बन जाए तो पलट के नहीं देखता। टालने के लिए रास्ता बदल देता है। लेकिन ये सर, जब भी आएँगे मिले बिना नहीं जातें, आज कुलगुरू हो जाने के बाद भी।" जाफरभाई भरभरून बोलतच राहिले.
बोलण्याच्या ओघातच त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. डॉ. देवानंद शिंदे यांनी घरी भेट दिल्याशिवाय त्यांच्या घरी ते ईद साजरी करत नाहीत. "सर जैसे नेक इन्सान हमारे घर आते हैं, वो दिन ही हमारे लिए ईद का होता है। बस, ईसी साल ऐसा हुआ के सर बाहर देश गए थे और ईद के लिए नहीं आ सके।"
सर कुलगुरू व्हावेत, म्हणून थेट अजमेर शरीफ दर्ग्यात दुआ मागणारे जाफरभाई अल्लाने आपली दुआ कबूल केली म्हणून त्याचे लाख लाख शुक्रिया अदाही करतात. "अल्ला करे, देवानंद सर जिंदगी में सफलता की और भी सिढीयाँ चढें और उनके जैसा बनने के लिए समाज को प्रेरित करते रहें।" अशी सदिच्छाही व्यक्त करतात.
या आधुनिक कृष्ण-सुदाम्याचं मैत्र असंच अखंडित राहो, ही सदिच्छा आपणही सारे मैत्री दिनाच्या निमित्ताने व्यक्त करू या!!!

(जाफरभाईंचा भ्रमणध्वनी क्रमांक ९७३०३४५३३३)

सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

स्मार्ट एज्युकेशन फॉर ऑल!('दै. सकाळ'च्या कोल्हापूर आवृत्तीचा आज ३६ वा वर्धापन दिन! या निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या 'स्मार्ट लाईफ' या विशेष पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख 'दै. सकाळ'च्या सौजन्याने माझ्या ब्लॉग वाचकांसाठी येथे पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)
 


डिजीटल क्रांतीमुळे आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून आलेले आहेत. मानवाचे राहणीमान उंचावण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान मोठे योगदान देत आहे. या डिजीटल तंत्रज्ञानाची लाभार्थी विशेषत्वाने तरुण पिढी आहे. या पिढीच्या जीवनाच्या प्रत्येक घडामोडीत डिजीटल तंत्रज्ञानाचा सहभाग अधिकाधिक दृगोचर होताना दिसतो आहे. तरुणांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा हा साहजिकच शिक्षणामध्ये व्यतित होतो. त्यामुळे माहिती व संवादाधारित तंत्रज्ञान (आय.सी.टी.) शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या पलिकडे जाऊन पारंपरिक अध्ययन-अध्यापन प्रणालीचे स्वरुप पालटण्यामध्ये या नवतंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भारत हा नजीकच्या पाच वर्षांत सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश असणार आहे. या डेमोग्राफिक डिव्हीडंडचा लाभ उठवायचा असेल, तर ही तरुण पिढी ज्ञानसंपन्न, कौशल्यसंपन्न असण्याबरोबरच त्यांना आवश्यक करिअर संधी उपलब्ध करण्याची जबाबदारी आजच्या वर्तमानावर आहे. त्यासाठी स्मार्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक बाबतीतली माहिती व ज्ञानाच्या अनुषंगाने निर्माण होणारी ग्रामीण, निमशहरी आणि शहरी ही दरी सांधण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. ही जबाबदारी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्र आणि त्यात कार्यरत धुरिणांवर आहे.
आज माहिती व डिजीटल क्रांतीमुळे इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा खजिना विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. तथापि, या माहितीच्या भडिमारातून हाती काय लागणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या माहितीचे प्रोसेसिंग करून त्याचे ज्ञानात रुपांतर करून विद्यार्थ्यांना सादर करणारे शिक्षक आणि या प्रोसेसिंगची सवय लावून घेऊन अधिकाधिक अद्ययावत ज्ञान आत्मसात व निर्माण करण्याची सवय असणारे विद्यार्थी निर्माण होणे हे या आयसीटी आधारित अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये अपेक्षित आहे.
डेस्कटॉप पीसीच्या पलिकडे आता पर्सनल कम्प्युटिंग, स्मार्टफोन्स, क्लाऊड कम्प्युटिंग, व्हर्च्युअल क्लासरुम अशा पारंपरिक शिक्षण प्रक्रियेला छेद देणाऱ्या किंवा अधिक पूरक असणाऱ्या म्हणू या, या स्मार्ट बाबींचा आपल्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक शिरकाव झालेला आहे. त्यांच्यापासून आपण अजिबात दूर राहू शकत नाही, त्यामुळे त्यांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. या गोष्टी कशा प्रकारे करता येऊ शकतील, याचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उत्तम दर्जाचा अभ्यासक्रम अथवा स्टडी कन्टेन्ट तयार करणे होय. केवळ क्लासरुम टिचिंग किंवा लेखनाच्या पलिकडे जाऊन आज ग्राफिक्स, डिझाईनिंग, ॲनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल्स आदींच्या सहाय्याने संबंधित विषय अधिक परिणामकारकपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्टेन्ट निर्मिती करणे ही बाब महत्त्वाची आहे. हा कन्टेन्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या पीसी, लॅपटॉप, स्मार्टफोन्स अशा कोणत्याही माध्यमाद्वारे ॲक्सेस करता आला पाहिजे. म्हणजे पारंपरिक शिक्षणात अभिप्रेत असलेल्या क्लासरुम टिचिंगच्या पुढे जाऊन कुठेही आणि कधीही शिक्षणाचा अभिनव प्रकार स्मार्ट तंत्रज्ञानामुळे जन्मला आहे. हो, अशा व्यक्तीगत शिक्षणासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता प्रत्येक विद्यार्थ्यासाठी करण्याची जबाबदारी मात्र आपल्याला, आपल्या यंत्रणेला पेलावी लागणार आहे. देशातल्या प्रत्येक सामाजिक-आर्थिक स्तरामधील विद्यार्थ्याचा विचार करूनच धोरणांची आखणी करावी लागणार आहे, ही पूर्वअट याठिकाणीही लागू होतेच, हे लक्षात घ्यायला हवे.
या स्मार्ट शिक्षण प्रक्रियेत एक महत्त्वाची गोष्ट घडून येऊ शकते, ती म्हणजे व्यक्तीशः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांकडे लक्ष पुरविता येऊ शकणे, ही होय. वर म्हटल्याप्रमाणे भारतासारख्या देशामध्ये विविध सामाजिक-आर्थिक स्तरातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात सामील होत असतात. यातील बहुसंख्य हे प्रथमच शिकणारे असतात. पारंपरिक शिक्षणामध्ये या प्रत्येकाकडे व्यक्तीशः लक्ष देणे कदाचित शक्य नसते. तथापि, स्मार्ट टीचिंग-लर्निंग प्रक्रियेत या विद्यार्थ्याची अभ्यासाची गती, त्याची गरज आणि त्याची प्रगती यावर लक्ष ठेवून त्याला अधिक सक्षम करण्याकडे लक्ष पुरविता येऊ शकते. त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थीही आपल्या प्रगतीची दशा पाहून तिची गती आणि दिशा निश्चित करू शकेल.
क्लाऊड कम्प्युटिंगची सुद्धा स्मार्ट टीचिंग-लर्निंग प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. पीसी, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन्समधील जागा न अडवता इंटरनेटच्या माध्यमातून क्लाऊडवर माहिती ठेवून ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यास अधिक उपयुक्त ठरते. मात्र, याठिकाणी इंटरनेटचा ॲक्सेस आणि गती या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
शिक्षकांनी क्लासरुमव्यतिरिक्तही विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यासक्रमाची, कन्टेन्टची निर्मिती करून त्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणे या प्रक्रियेत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी या कन्टेन्टचा अभ्यास करून वर्गात येतील. त्यावर त्यांचे चिंतन झालेले असेल, त्यांनी पूरक अन्य माहितीचा अभ्यास केला असेल आणि वर्गामध्ये या अभ्यासाच्या अनुषंगाने मंथन होणे या नवव्यवस्थेत अभिप्रेत आहे. विद्यार्थ्यांना पूरक आणि अद्यावत ज्ञान मिळविण्यासाठी, प्रदान करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही घटकांच्या बाजूने प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे. या स्मार्ट शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा स्मार्ट ऑनलाइन पोर्टफोलिओ निर्माण करणे आणि शिक्षकांकडून त्याचे नियमित मूल्यमापन करणेही सोपे व शक्य होणार आहे, ही सुद्धा यातील महत्त्वाची बाब आहे.
स्मार्ट टीचिंग-लर्निंग प्रक्रिया ही केवळ एखाद्या शिक्षण संस्थेच्या चार भिंती किंवा खोल्या यांच्यापुरतीच मर्यादित आहे, असे मानण्याचे कारण नाही. आज एखाद्या व्यक्तीला, तो लौकिकार्थाने विद्यार्थी नसला तरी त्याच्या आवडीच्या विषयाचे शिक्षण ऑनलाइन घेण्याचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांमधील तज्ज्ञांकडून त्याला हे शिक्षण घेता येऊ शकते. एखाद्या विद्यार्थ्याला एखादे विशिष्ट कौशल्य आत्मसात करावयाचे असेल, तर त्याच्यासाठी हे कौशल्य शिकविणारे अनेक ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहेत. अनेक क्षेत्रांमधील तज्ज्ञांचे त्यांच्या क्षेत्रांमधील अनुभवावर आधारित ऑडिओ-व्हिज्युअल्स उपलब्ध आहेत.
अभ्यासक्रमांच्या बाबतीत बोलायचे झाले तर पारंपरिक शिक्षण पद्धती आता हळूहळू कालबाह्य होत जाऊन तिची जागा आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम निश्चितपणे घेतील, असे वातावरण आहे. व्हर्च्युअल क्लासरुममुळे कोणत्याही ठिकाणावरील विद्यार्थ्याला शिकविणे शक्य झाले आहे. याखेरीज 'मूडल' (MOODLE)च्या माध्यमातून उपलब्ध असणारे मोफत, ओपन-सोर्स ऑनलाइन अभ्यासक्रम, मूक (MOOC) सारखे मॅसिव्ह ओपन, ऑनलाइन अभ्यासक्रम आदींमुळे शिक्षण अधिकाधिक खुले आणि प्रवाही होते आहे. शिक्षण खऱ्या अर्थाने अमर्याद आणि विशाल होते आहे, ते या स्मार्ट व नवतंत्रज्ञानाचे आयाम लाभल्यामुळे! त्याला पूरक असे व्हर्च्युअल डिस्कशन/ लर्निंग फोरमसुद्धा उपलब्ध आहेत. गरज आहे ती त्यांचा डोळसपणे लाभ घेण्याची आणि उपलब्ध माहितीचे ज्ञानात रुपांतर करून त्याचा स्वतःसाठी, स्वतःच्या देशासाठी आणि ग्लोबल कम्युनिटीच्या भल्यासाठी वापर करण्याची!