सोमवार, २८ मे, २०१२

मुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा!


पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील.

 दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला कोणता भारतीय नागरिक विसरू शकेल? या हल्ल्यात महाराष्ट्रानं, देशानं कित्येक शूर पोलीस अधिकारी-कर्मचारी, जवान आणि निरपराध नागरिक गमावले. पण, याच हल्ल्याच्या वेळी, जगाच्या इतिहासात कधीही झाली नाही, अशी घटना घडली. ती म्हणजे दहशतवादाचा चेहरा खऱ्या अर्थानं यावेळी प्रथमच साऱ्या जगासमोर आला. आणि ही कामगिरी केली होती, मुंबईचे पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांनी! एके-47 मधून बेछूट गोळीबार करत सुटलेला दहशतवादी अजमल कसाब याला आपल्या हाती असलेल्या लाठीच्या सहाय्यानं आणि असीम धैर्याच्या जोरावर जेरबंद करणारे ओंबळे स्वतः शहीद झाले, मात्र आपल्या शेजारी देशाचा दहशतवादाला असणारा वरदहस्त प्रथमच पुराव्यानिशी सामोरा आला. तुकाराम ओंबळे यांचं हौतात्म्य हे मुंबई पोलीसांची कर्तव्यपरायणता, कामाप्रती अतीव निष्ठा आणि देशाप्रती अत्युच्च समर्पणशीलता यांचं सर्वोच्च प्रतीक ठरलं.
शहीद ओंबळे यांची आठवण होण्याचं कारण म्हणजे या महिन्यात म्हणा, किंवा गेल्या दोन आठवड्यांत दोन अशा घटना घडल्या की, ज्यांच्यामुळं मुंबई पोलीसांची ही समर्पण वृत्ती पुन्हा एकदा झळाळून सामोरी आली. जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या संरक्षणासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर असल्याचा दिलासा या घटनांतून मुंबईकरांना निश्चितपणे मिळाला आहे.

घटना पहिली :
            शिकलगर टोळीचे दरोडेखोर विरारमध्ये असल्याची खबर दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अन्सार पिरजादे यांना दि. 13 मे 2012 रोजी सकाळी मिळाली. ही शिकलगर टोळी म्हणजे दरोडेखोरीच्या बाबतीतली अतिशय निष्ठूर मानली जाते. दरोडा तर टाकायचाच, पण पुरावा मागे राहू नये, म्हणून संबंधित कुटुंबातल्या सर्वांनाच मारुन टाकायला ते मागेपुढे पाहात नाहीत. त्याचप्रमाणं अटक टाळण्यासाठी पोलीसांवरच उलटून प्रतिहल्ला करायलाही हयगय करत नाहीत. भूतकाळात पोलीसांच्या बाबतीत असे प्रतिहल्ले झालेलेही आहेत. त्यामुळं या टोळ्यांना पकडायचं, म्हणजे पोलीसांना जीवावर उदार होऊनच जावं लागतं.
तर.. पिरजादे यांना खबर मिळताच, त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक शंकर खटके यांना आपल्या टीमसह विरारला जाऊन दरोडेखोरांसाठी सापळा रचण्याचे निर्देश दिले. त्यानुसार श्री. खटके हे हवालदार चंद्रकांत माने, हवालदार शांताराम भुसार, पोलीस नाईक नामदेव भोगले, पोलीस नाईक प्रवीण जोपळे, पोलीस शिपाई शिवाजी भोसले, शिवराम बांगर आणि दिलीप वऱ्हाडी यांच्यासह पूर्ण तयारीनिशी बाहेर पडले.
ही टीम विरार पूर्वेला चंदनसार रोडवरच्या राहील पेट्रोल पंपाच्या जवळ सकाळी अकराच्या सुमारास पोहोचली. त्याचवेळी त्यांना समोरून एक टेम्पो येताना दिसला; मात्र, पोलीस वाहन पाहून त्या टेम्पोने यू-टर्न घेतला आणि अमित हाऊसिंग सोसायटीच्या गेटमध्ये थांबला. पाठोपाठ येणारा दुसरा टेम्पोही या टेम्पोच्या पाठीमागे थांबला.
कॉन्स्टेबल शिवराम बांगर यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील.
            या वाहनांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलीसांची टीम तातडीनं त्या टेम्पोच्या दिशेनं पुढं सरकली. सर्वांनी टेम्पोला घेरलं आणि टेम्पोतल्या संशयित व्यक्तींना खाली उतरायला सांगितलं. त्यानंतर काही क्षणांतच, टेम्पोमध्ये लपवलेल्या लोखंडी कांब (सळई) आणि तलवारी घेऊनच दरोडेखोर झपकन खाली आले आणि त्यांनी पोलीसांवर हल्ला चढवला. त्यातल्या एकानं पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांच्यावर लोखंडी कांबेनं वार केले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी दुसऱ्या दरोडेखोरानं कॉन्स्टेबल शिवराम बांगर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जमिनीवर कोसळलेल्या बांगर यांच्यावर तिसरा दरोडेखोर तलवारीचे वार करण्याचा प्रयत्न करत होता, आणि बांगर ते हातांवर झेलत चुकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना ठार करण्याचेच दरोडेखोरांचे प्रयत्न सुरू होते. आपला सहकारी जीवघेण्या संकटात असल्याची जाणीव गंभीर जखमी असलेल्या दिलीप वऱ्हाडी यांना झाली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोझिशन घेतली आणि आपल्याकडचं सर्व्हीस रिव्हॉल्व्हर हल्लेखोरांवर रोखलं आणि त्यांना हातातली शस्त्रं खाली टाकायला सांगितलं. मात्र, हा काय गोळी घालणार, अशा अविर्भावात त्या दरोडेखोरांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि बांगर यांच्यावर ते प्रहार करणार, इतक्यात वऱ्हाडी यांनी आपल्या सहकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी त्या हल्लेखोरावर एक राऊंड फायर केला. गोळी त्याच्या पायात घुसली आणि त्याच्या हातून तलवार गळून पडली. वऱ्हाडी यांच्या तत्पर हालचालीचा इतका जोरदार परिणाम झाला, की त्यामुळं दरोडेखोर गांगरले. त्यांच्या त्या गोंधळलेल्या स्थितीचा फायदा घेऊन पोलीसांनी त्या सहा गुन्हेगारांना अटक केली. कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांनी अतिशय बिकट परिस्थितीत प्रसंगाचं गांभीर्य ओळखून आणि स्वतःच्या जीवालाही धोका असताना आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी जी कर्तव्यतत्परता आणि साहस दाखवलं, त्याला तोड नाही. त्यांच्या या दक्ष हालचालींमुळंच वीसपेक्षाही अधिक दरोड्याचे गुन्हे नावावर असलेली अतिशय जहाल दरोडेखोरांची टोळी मुंबई पोलीसांच्या ताब्यात आली.
--
घटना दुसरी:
गुणाजी पाटील यांचा सत्कार करताना मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनाईक.
दि. 19 मे 2012, दुपारी 12.45 वा.ची वेळ. वरळी पोलिस स्टेशनला एक कॉल येतो.. राजीव गांधी वांद्रे-वरळी सी-लिंकवरून एका महिलेनं उडी मारल्याचा! प्रकाराचं गांभीर्य लक्षात येऊन पोलीसांची टीम तातडीनं सायरन लावूनच घटनास्थळाकडं रवाना होते. पोलीस वाहनावर चालक असतात.. गुणाजी पाटील.. वय वर्षे 51.
ही टीम तीन ते चार मिनिटांतच सी-लिंकवर संबंधित ठिकाणी पोहोचते, तर तिथं बघ्यांची ही गर्दी जमलेली.. खाली पाण्यात गटांगळ्या खाणारी महिला तर दिसतेय, पण काय करावं कुणालाच सुचेनासं झालेलं! फायर ब्रिगेडला यायलाही किती वेळ लागेल, माहित नव्हतं; बरं, ते येईपर्यंत ती महिला जिवंत राहील की नाही, याचीही शाश्वती नाही. वरळी पोलीस स्टेशनमधून गेलेली टीमही संभ्रमात पडलेली! त्याचवेळी कुणाला काही समजायच्या आतच पोलीस हवालदार - ड्रायव्हर गुणाजी पाटील सी-लिंकच्या त्या 20-25 फुटांवरुन खाली खवळत्या समुद्रात उडी टाकतात आणि त्या गटांगळ्या खाणाऱ्या महिलेला हाताला धरून, लाटांवर तरंगत ठेवून महत्प्रयासानं किनाऱ्याला आणतात. त्या महिलेला सुरक्षितपणे किनारी आणणारे गुणाजी पाटील यांच्या पायाला मात्र जबर मार बसलेला! मात्र, त्या दुखापतीची चिंता वाटण्यापेक्षा एक जीव वाचवल्याचं समाधानच त्यांच्या चेहऱ्यावर झळकतं.
जल्पा पुजारी असं नाव असलेली ती विवाहिता, कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्यासाठी गेलेली! पाटील यांनी जीवावर उदार होत दाखवलेलं साहस आणि हिकमतीमुळं तिचा जीव तर वाचलाच, पण आत्महत्येचा विचारही तिच्या मनातून गेला. दोन-तीन दिवसांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन पाटील यांना तिनं वाचवल्याबद्दल धन्यवादही दिले.
--
 मुंबई पोलीसांच्या या असीम शौर्याची राज्य शासन आणि पोलीस प्रशासन यांनी तातडीनं दखल घेतली. या सर्व शूर पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबई पोलिस आयुक्त अरुप पटनाईक, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामराव पवार यांनी सत्कार करून कौतुक केलं. धाडसी पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांच्या नावाची तर ‘राष्ट्रपती शौर्य पदका’साठी तर गुणाजी पाटील यांची ‘पंतप्रधान जीवनरक्षा पदका’साठी शिफारस करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, अगदी अनपेक्षितपणे, ‘राज ट्रॅव्हल्स’नं दिलीप वऱ्हाडी आणि गुणाजी पाटील यांना त्यांच्या कुटुंबियांसह मलेशिया-थायलंडची सहल ऑफर केली आहे. पोलीसांच्या कर्तबगारीची शासनाबरोबरच एखाद्या कंपनीनं दखल घेण्याचा हा प्रसंगही निश्चितच वेगळा आणि त्यांना आणखी चांगल्या कामगिरीसाठी बळ देणारा ठरणार आहे.
मुंबई पोलीसांच्या या कर्तबगारीला माझा एकदम कडक सॅल्यूट!!!

बुधवार, ९ मे, २०१२

आत्महत्येच्या विचारावर 'विजय'!


Vijay Gaikwad

मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री राज्यातल्या दुष्काळग्रस्त स्थितीबाबत केंद्र सरकारला अवगत करण्यासाठी व मदत मिळविण्यासाठी मा. पंतप्रधानांच्या भेटीला गेल्यानं तुलनेत कमी वर्दळीचा…  याच वर्दळीबरोबर कृष्णा दादाराव डोईफोडे हा आंतरवळी-खांडी (ता. पैठण, जि. औरंगाबाद) या गावचा एक तरुण मंत्रालयात दाखल झाला… मंत्रालयात आपली कामं होण्यासाठी किंवा करवून घेण्यासाठी येणाऱ्या गर्दीपेक्षा तो वेगळा होता… त्याला त्याचं काही काम करून घ्यायचं नव्हतं किंवा कुणाचं काम करवून द्यायचंही नव्हतं… तो आला होता मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला… निवेदनाचा विषय होता… आत्महत्या करणेबाबत…!
मित्रहो, आज कदाचित सारं मंत्रालय हादरून गेलं असतं, जर या तरुणानं त्याचा इशारा खरा करून दाखवला असता तर…! पण तो आत्महत्या करू शकला नाही, इतकंच नव्हे, तर तो त्याच्या या आत्महत्येच्या विचारापासून परावृत्तही झाला… आणि या दोन्ही गोष्टींना कारणीभूत ठरला आपला एक सहृदय पत्रकार मित्र… त्याचं नाव विजय गायकवाड!
डोक्यावर अडीज लाख रुपयांचं कर्ज… परतफेड न करू शकल्यानं व्याजासह पावणेतीन लाखांवर गेलेला परतफेडीचा आकडा डोक्यात सतत भुणभुणत असलेला… तशात वृद्ध आईवडिलांची जबाबदारी… कृषी अनुदान मिळू न शकलेलं… कापसाच्या पॅकेजमधून काही लाभ नाही… अशा परिस्थितीत जगणं मुश्कील झालेला कृष्णा काल मंत्रालयात आला तोच मुळी अतिशय गांजलेल्या आणि दीनवाण्या अवस्थेत… हातात प्लॅस्टीकची एक पिशवी, त्यात कागदपत्रं आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन… उद्या (दि. 9 मे 2012 रोजी) मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा इशारा देणारं…!
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या टपाल शाखेत कृष्णानं आपलं निवेदन दिलं… पोच घेतली… आणि तो मुख्य सचिवांच्या कार्यालयाला निवेदन देण्यासाठी निघाला आणि त्याच्या लक्षात आलं की त्याच्याकडं ओ/सी घेण्यासाठी झेरॉक्स नाहीय ते… कृष्णा झेरॉक्सच्या शोधात मंत्रालयाच्या तळमजल्यावरच्या प्रेस रुमकडं आला… तिथं 'ॲग्रोवन'चे मंत्रालय प्रतिनिधी आणि आमचा मित्र विजय गायकवाड याच्याकडं त्यानं झेरॉक्सबद्दल चौकशी केली… त्याच्या हातातलं थेट आत्महत्येचं निवेदन पाहून विजय सटपटला… दुसरा एखादा त्याच्या जागी असता तर पलीकडं न्यूजरुममधनं घ्या झेरॉक्स, असं सांगून मोकळा झाला असता… पण सामाजिक जाणीवा अद्याप शाबूत असलेल्या संवेदनशील मनाच्या विजयनं मात्र तसं केलं नाही… या शेतकऱ्यानं जर कदाचित आत्महत्या केली असती, तर त्याच्या दैनिकाला उद्या सनसनाटी मेन फीचर मिळालं… मिडियाला सुद्धा तुफानी बातमी मिळाली असती… पण विजयनं तसा विचार केला नाही… त्यानं कृष्णाला प्रेस रुममध्ये बसवून घेतलं… आणि समजावलं… आज मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक तर दिल्लीत आहेत, आणि त्याचं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत खूप उशीर झालेला असेल… किंगफीशरच्या मालकाला सुद्धा अडचणीतून जावं लागतंय, तिथं आपण सर्वसामान्य आहोत… अडचणींचा सामना करून त्यातून मार्ग काढायला शिकलं पाहिजे… मी स्वतः तुझ्यासाठी कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांना भेटतो… संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतो… काही तरी मार्ग काढू… पण आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाक… असं विजय त्याला समजावत होता… बोलता बोलता त्याची नजर कृष्णाच्या प्लॅस्टीक पिशवीतून बाहेर डोकावणाऱ्या, व्यवस्थित कागदात गुंडाळलेल्या एका वस्तूकडं गेली… कुतुहलापोटी विजयनं त्या वस्तूला हात लावला… तर कृष्णा त्याला हात लावू देईना… विजयनं बळेच त्याच्या हातून ती वस्तू घेतली… तिचं कागदी वेष्टन काढलं… आणि पाहतो तर काय… ती एका जहाल कीटकनाशकाची-मोनोक्रोटोफॉसची बाटली होती… ती पाहून आता मात्र विजयला घाम फुटला… यावेळी त्याच्या मदतीला तिथं आलेले पत्रकार संजीवन ढेरे धावले… त्यांनीही कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न केला… पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही, असं दिसल्यावर पलीकडंच असलेल्या पोलीस कंट्रोल रुमकडं त्याला घेऊन गेले… कीटकनाशकाची बाटली… तीही एवढा बंदोबस्त असतानाही मंत्रालयात दाखल झाल्याचं पाहून पोलीस अधिकाऱ्यांची काय अवस्था झाली असेल… याची तुम्हीच कल्पना करा…! तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी ती बाटली आधी ताब्यात घेतली आणि कृष्णाला त्यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला… पण तरीही त्याच्या मनोवस्थेत काही फरक पडत नाहीसं दिसल्यानं त्याला मरीन ड्राइव्ह पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आलं… तिथं रात्री पोलीसांनी त्याची अवस्था लक्षात घेऊन त्याला व्यवस्थित जेवण वगैरे दिलं आणि बसवून ठेवलं… पोलीसांच्या गराड्यात अस्वस्थ झालेल्या कृष्णानं रात्री पुन्हा विजयला तिथून फोन केला… दादा, मला इथं भिती वाटतेय, तुम्ही या ना इकडं… असं त्याचं आर्जव ऐकून विजय पुन्हा रात्री त्याच्या साथीला जाऊन बसला… दरम्यानच्या काळात पोलीसांनी त्याच्या आईवडिलांना फोन लावून त्याला घेऊन जाण्यासाठी यायला सांगितलं… विजयनं आणि पोलीसांनी पुन्हा रात्रभर कृष्णाला समजावलं… औरंगाबाद विभागाच्या कृषी सह-संचालकांशी विजयनं संपर्क साधून कृष्णाला मदत करण्याबाबत विनंती केली… त्यांनीही ती मान्य केली… आपल्यासाठी सारे जण करत असलेल्या प्रयत्नानं एक नवी उमेद मनी जागलेल्या कृष्णानं अखेर… पुन्हा आपण आत्महत्येचा विचारही मनात आणणार नाही… असं विजयला सांगितलं… विजयच्या आणि पोलीसांच्याही मनावरचं मळभ दूर झालं… आणि एक नवी पहाट सूर्याची नवी किरणं घेऊन पोलीस स्टेशनमध्येच नव्हे; तर, कृष्णाच्या आयुष्यातही दाखल झाली…!
असे कित्येक कृष्णा निराशेच्या गर्तेत बुडून आपल्या आयुष्याचा अंत करत असतात… त्यांना प्रत्येक वेळी त्यांच्या विचारापासून परावृत्त करणारा असा एखादा तळमळीचा विजय भेटेलच, असं नाही… पण आपण त्यांच्यासाठी 'विजय' होण्याचा प्रयत्न तरी करून बघायला काय हरकत आहे?
विजय, तुझं मनापासून अभिनंदन!!

(विजय गायकवाड यांचा संपर्क क्रमांक : 9870447750 आणि इ-मेल पत्ता vijay.agrowon@gmail.com)