मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

खुल्या दिलाचा ‘सत्यशोधक’ अभ्यासक

डॉ. संभाजी खराट यांच्या निवृत्तीदिनाच्या पूर्वसंध्येला अण्णासाहेब लठ्ठेकृत शाहूचरित्र ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा देताना डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह फारूख बागवान.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालय म्हणजे कामाची सातत्यानं धामधूम... या विभागामध्ये अधिकारी वा कर्मचारी होणं, म्हणजे पोलीस खात्यात भरती झाल्यासारखंच... सुटीच्या दिवशीही नित्यनियमानं काम सुरू असणारा हा विभाग. अशा व्हायब्रंट विभागामध्ये एखाद्या अधिकाऱ्यानं नियमित काम मार्गी लावलं तरी खूप असतं. कारण कामाचा ओघ आणि पसारा हा इथं कधी थांबतच नाही. त्यातूनही या विभागात काही असे अधिकारी आहेत की, या कामाच्या पलिकडं जाऊन त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. कोणी लेखक-साहित्यिक म्हणून, कोणी कवी-कवयित्री म्हणून तर कोणी संशोधक म्हणून... आपल्या सोशल कमिटमेंटच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाचा असाच ठसा उमटवणारे अधिकारी म्हणजे डॉ. संभाजी खराट सर... 

मराठवाड्याच्या मातीत उगवलेल्या या व्यक्तीत्वानं आपल्या संशोधकीय कर्तृत्वाची मोहोर अखिल महाराष्ट्रावर उमटविली. खराट सर जानेवारी अखेरीस नियत वयोमानाने निवृत्त झाले. सत्यशोधक चळवळीचा त्यांनी अतिशय चिकित्सक अभ्यास केला आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा वसा आणि वारसा घेऊन त्यांनी अत्यंत शांत व संयतपणाने आपले संशोधनाचे काम केले आहे. खराट सरांचे मला व्यक्तीशः भावणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा शांत सुस्वभाव. कधी कोणाबद्दल त्यांच्या मनात वाईट भाव येत नाही की तोंडून एखादा वाकडा शब्द. त्यांच्या मनात सतत काही ना काही चिंतन सुरू असतं, हे त्यांच्याकडं पाहिलं की लगेच लक्षात येतं. एक घनगंभीरता त्यांचं व्यक्तीमत्त्व व्यापून असते. समोर गेलात की हलक्या स्मितहास्यानं स्वागत होणार... आपुलकीची चौकशी... नवनव्या गोष्टी जाणून घेण्याकडं त्यांचा विशेष कटाक्ष... काम कितीही असलं तरी त्या कामाचं प्रेशर ना कधी ते जाणवून देत, ना हाताखालच्या लोकांवर टाकत, हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य.

खराट सर आता निवृत्त होताहेत, याचाच अर्थ ते आता सत्यशोधक चळवळीच्या अभ्यासासाठी व प्रसारासाठी फुल-टाईम उपलब्ध होणार आहेत. कित्येक विषय त्यांच्या डोक्यात घोळताहेत. आता ते कागदावर उतरावेत. नाही म्हटलं तरी कृतीशील कार्य करण्यावर नोकरीच्या, कामाच्या अन् वेळेच्या मर्यादा पडत असतातच. आता असे कोणतेही बंधन सरांवर असणार नाही. त्यामुळं त्यांनी आता या साऱ्या गोष्टी करण्यासाठी आयुष्याच्या खुल्या मैदानात उतरावं आणि मनमुराद काम करावं, याच या निमित्तानं अपेक्षा आणि त्यासाठी त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो, या सदिच्छा सुद्धा!


मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

नितळ-२: अजीर्ण: खाणं आणि जगण्याचं...

 


(मुंबई येथील 'फ्री प्रेस जर्नल' समूहाच्या 'दै. नव-शक्ति'मध्ये लिहीत असलेल्या 'नितळ' या मालिकेअंतर्गत आज दि. २४ जानेवारी २०२३ रोजी प्रकाशित झालेला दुसरा भाग माझ्या वाचकांसाठी येथे 'नव-शक्ति'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करतो आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)


संज्ञापनशास्त्राचे निवृत्त शिक्षक प्रा. ओमप्रकाश कलमे भेटावयास आले होते. विविध विषयांवर, विशेषतः संस्कृती आणि संज्ञापन या अनुषंगाने बोलताना त्यांच्या एका विधानानं माझ्या मनाचा ठाव घेतला. ते म्हणाले, चवीसाठी खाणं आणि मनोरंजनासाठी जगणं, या दोन गोष्टी माणसानं सोडल्या, तर त्यातून उरेल ती केवळ सात्त्विकता, अन्नाचीही आणि जगण्याचीही!”

आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं, मार्गदर्शक असं हे विधान आहे. सध्याचा काळ हा आपल्या खाण्याचाही आणि जगण्याचाही अगदी अजीर्ण होण्याचा आहे. अन्नामध्ये एक मूलभूत चव असायला हवी, ही रास्त अपेक्षा आहे. मात्र, आपलं खाणं आज केवळ चवीसाठी आणि चवीसाठीच चाललेलं आहे. त्यातली सात्त्विकता कुठेतरी बॅकसीटवर बसली आहे. यंदाचं वर्ष आपण जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरं करीत आहोत. मुळात आपली संस्कृती ही भरडधान्याधारितच आहे. पाश्चात्य जगताच्या नादाला लागून आपण आपल्या या पोषक खाद्यसंस्कृतीकडं काणाडोळा करीत गेलो आणि आपल्या नसलेल्या खाद्यसंस्कृतीला जवळ करताना तिच्यासोबत येणारे लाइफस्टाईलची सारी आजारपणंही कवटाळून बसलो. कोविडच्या कालखंडानं थोडं या सात्विकतेकडे आपल्याला पुन्हा वळवलं, मात्र त्याच काळात वेगवेगळ्या चवींकडं आकर्षून घेणाऱ्या युट्यूब वाहिन्यांचाही सुळसुळाट झाला.

सुखासीन जीवनासाठीच सारं काही करणाऱ्या व्यक्तींचं हे चवीसाठीचं खाणं काही काळापुरतं मान्यही करता येईल. मात्र, आपण समाजाच्या निम्न अथवा मध्यमवर्गीय स्तरातले लोक अन्नाची मस्ती करून जी नासाडी करतात, त्यावरही या निमित्तानं आक्षेप घ्यायला हवेत. खरे तर, विविध समारंभांमध्ये अन्नाची अतिरिक्त नासाडी होऊ नये, लोकांनी हवे तेवढेच अन् तितकेच घ्यावे, यासाठी अस्तित्वात आली ती बुफे पद्धत. मात्र, आपण जणू काही त्यातला कोणताही पदार्थ ना कधी यापूर्वी खाल्ला आहे, ना नंतर कधी बघायला मिळणार आहे, अशा पद्धतीनं अन्नपदार्थांनी ताट ओसंडून वाहेस्तोवर भरून घेतो. मागच्यांचा विचारही करीत नाही आणि त्यातला जीभेला बरा लागेल तो पदार्थ खातो आणि उरलेलं सगळं टाकून देतो. हे बुफेचं एक उदाहरण झालं. मात्र, भारतात अशा प्रकारे जवळपास ४० टक्के अन्नाची नासाडी होते. जगभरात हेच प्रमाण १७ टक्के इतकं आहे. भारतात एकीकडं ८१ कोटी लोक एका वेळी उपाशीपोटी झोपत असताना आपल्या स्वयंपाकघरात दरवर्षी ६.८८ कोटी टन इतक्या अन्नाचा कचरा होतो. यानुसार आपल्या देशातली प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी ९४ किलो अन्न वाया घालवते. हॉटेल-रेस्टॉरंट्समध्ये दरडोई अन्नाची नासाडी ही सरासरी २८ किलो इतकी आहे.

मुळात पोट भरायला माणसाला लागतं किती अन्न? एखादी भाजीभाकरी, डाळभात आणि सॅलड. या पलिकडं जाऊन केवळ चवीसाठी खाण्याचा आणि त्याहूनही अन्न वाया घालवण्याचा सोस आपण टाळायला हवा. एखादा अन्नाचा कण टाकून देतानाही भुकेपोटी ज्याला कळवळत झोपावं लागतं, अशा व्यक्तीचा, मुलाचा चेहरा आपल्यासमोर यायला हवा. त्याच्या मुखात आपण घास घालत असू वा नसू, मात्र आपल्याकडून अन्नाचा एक कणही वाया जाणार नाही, एवढी किमान दक्षता तरी आपण निश्चितपणानं घेऊ शकतो.

जे अन्नातल्या चवीच्या बाबतीत होतं, तेच आज आपलं मनोरंजनाच्या बाबतीतही झालेलं आहे. मान्य आहे, आपल्या लाईफस्टाईलमुळे ताणतणावाचे प्रसंग वाढलेले आहेत. सर्वत्र जीवघेणी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे, टिकवून ठेवायचं आहे. सारी दमछाक त्यासाठीच जणू काही सुरू आहे. त्या नादात आपण आपलं खरं जगणं विसरून गेलो आहोत. या धबडग्यातून मग थोडासा विरंगुळा म्हणून आपण मनोरंजनाचा आधार घेतो. मात्र, सध्या या मनोरंजनाचा इतका अतिरेक झाला आहे की, बोलता सोय नाही. तसे पाहता, संज्ञापनशास्त्रानुसार, माध्यमांच्या प्रमुख कार्यांमध्ये माहिती, मार्गदर्शन, प्रबोधन, मतनिर्मिती यानंतर मनोरंजनाचा क्रम लागतो. मात्र, आज बाकी सारे प्राधान्यक्रम गुंडाळले जाऊन सर्वच क्रमांवर जणू एंटरटेनमेंटनं आपलं बस्तान बसवलं आहे. अगदी सिरिअस जर्नालिझम करणाऱ्या वाहिन्या सुद्धा इन्फॉर्मेशनच्या ऐवजी स्वतःला इन्फो-टेनमेंट म्हणवून घेण्यात धन्यता मानू लागल्या आहेत. आणि हे मनोरंजनही सर्वंकष, सकस असं नाही. तिथंही सात्त्विकतेचा अभावच अधिक दिसून येतो. एकसुरी, सपाट, कोणत्याही प्रबोधनाचा अभाव असणाऱ्या मालिका, अंगविक्षेपी विनोदांचा भडीमार असणारे कार्यक्रम आणि रिएलिटीच्या नावाखाली लोकांच्या, स्पर्धकांच्या भावनांशी खेळ मांडणारे कचकडी टॅलेंट शोज् यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. वृत्तवाहिन्यांवरील डिबेट चर्चांच्या कार्यक्रमांवर तर अगदी सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत, यातच सारे काही आले.

आता नव्या पिढीच्या हातात आलेल्या स्मार्टफोन्समुळे दिवाणखान्यातल्या दूरचित्रवाणी पाहण्याच्या परंपरेमध्ये ट्विस्ट येऊन पर्सनलाईज्ड कन्टेन्ट एक्सेस करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. या प्रेक्षकांना एन्गेज ठेवण्यासाठी ओटीटी कन्टेन्ट क्रिएटर आणि सप्लायर्स यांच्या बरोबरच विविध सोशल मीडिया कंपन्यांनीही कंबर कसली आहे. प्रत्येकाला आज त्याचा दर्शक अर्थात ग्राहक मिळवायचा आहे, तो आपल्याकडे राखायचा आहे. त्यासाठी मोठी यातायात सुरू आहे. केवळ लिपसिंक आणि चेहरादर्शी स्युडो अभिनेते, अभिनेत्रींची निर्मिती घाऊक प्रमाणात करणाऱ्या रिल्सचं आता प्रचंड पेवच फुटलं आहे. हे रिल्स निर्माण करणारे जितके आहेत, त्यापेक्षा एक्सेस करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. गंमत म्हणजे एकापाठोपाठ एक रेल्वेप्रमाणं स्क्रीनवर येतच राहणाऱ्या या रिल्समध्ये आपण आपला किती तरी प्रचंड प्रमाणात अनावश्यक वेळ घालवू लागलो आहोत, याचं भानही राहात नाही. या अनाठायी मनोरंजनाची आपल्याला खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात गरज आहे का, याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वापरकर्त्यानं आपापल्या स्तरावर याचा निर्णय घ्यायचा आहे. नाही तर, खाण्याचं जसं अजीर्ण होतं, तसंच या अतिरिक्त मनोरंजनामुळं आपल्या जगण्याचंही अजीर्ण होऊन जाईल. त्या नादात आपलं सात्त्विक जगायचंही राहून जाईल, कदाचित!


शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

हरकाम्या विद्यार्थी ते सन्मानाची फेलोशीप... संख्याशास्त्रज्ञ कुलगुरूंचा गौरव...ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना इंडियन सोसायटी फॉर प्रॉबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स (आयएसपीएस) या संख्याशास्त्रातील राष्ट्रीय आघाडीच्या संस्थेकडून फेलो ऑफ दि सोसायटी हा सन्मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलं. या निमित्तानं प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कुलगुरू महोदयांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि अस्मादिक उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के सरांनी त्यांच्या कारकीर्दीत संख्याशास्त्र आणि वारंवारिता क्षेत्राच्या प्रगती आणि विकासात दिलेल्या लक्षणीय योगदानाबद्दल हा पुरस्कार बहाल करण्यात आलाय. यावेळी त्यांनी काही आठवणी सांगितल्या. आंध्र प्रदेशातील तिरुपती मुख्यालय असणाऱ्या इंडियन सोसायटी फॉर प्रॉबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स (आयएसपीएस) आणि कोचीन येथील कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानं कोचीन इथं ४ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत संस्थेची ४२ वी वार्षिक परिषद पार पडली. या परिषदेमध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या संस्थेच्या सुरवातीच्या कालखंडातली आठवी परिषद (साधारण ३४-३५ वर्षांपूर्वी) ही शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती. तेव्हा शिर्के सर संख्याशास्त्राचे विद्यार्थी होते. त्यावेळी आलेल्या संख्याशास्त्रज्ञांचे स्वागत करणे, त्यांना आवश्यक ती मदत करणे आणि परिषद व्यवस्थित पार पाडण्यासाठी विभाग देईल, ती जबाबदारी पार पाडणे अशा हरकाम्या विद्यार्थ्याच्या भूमिकेमध्ये ते होते. तिथंपासून ते परिषदेकडून सर्वोच्च फेलोशीप प्राप्त होण्यापर्यंतचा प्रवास खरोखरीच त्यांच्या संख्याशास्त्र विषयाप्रती आस्था व योगदानाची साक्ष देणारा आहे. याच आठव्या परिषदेवेळी त्यांची भारताचे महान संख्याशास्त्रज्ञ डॉ. पी.व्ही. सुखात्मे यांची भेट झालेली होती आणि त्या काळात सुखात्मे सरांनी आयएसपीएसला सुमारे एक लाख रुपयांची देणगी दिलेली होती. मोठी माणसं स्वतः मोठी होत असताना संस्थात्मक कार्यालाही कसं पाठबळ देतात, याचंच हे उदाहरण.

कुलगुरू डॉ. शिर्के सरांना वारंवारिता व संख्याशास्त्रातल्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

नितळ-१: ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे...(मुंबई येथील 'फ्री प्रेस जर्नल' समूहाच्या 'दै. नव-शक्ति'मध्ये या वर्षी पाक्षिक ललित लेखमाला लिहीतो आहे. या मालिकेचा पहिला भाग माझ्या वाचकांसाठी येथे 'नव-शक्ति'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करतो आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

एक व्यंगचित्र पाहण्यात आलं. यामध्ये एक दिग्दर्शक सांगतो आहे की, त्याचा पुढील चित्रपट हा ब्लॅक अँड व्हाईट असेल आणि महत्त्वाचं म्हणजे तो मूकपट असेल! संदर्भ ताजा आहे. तो विस्कटून सांगण्याची गरज नाही, मात्र आपल्या अभिव्यक्तीने तथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याने दिशा कोणती पकडली आहे, यावर नेमकेपणानं बोट ठेवणारं हे स्टेटमेंट!

का होतं आहे असं? का नाकारत चाललो आहोत आपण सगळं? अवघ्या शंभर-दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, न्या. रानडे, लोकहितवादी, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आदी अनेकांनी या देशाच्या पुरोगामित्वाची जी पायाभरणी केली, तिला मजबूत करण्याचे राहोच, पण ठिसूळ करण्याचे प्रयत्न स्वातंत्र्यानंतरच्या अवघ्या ७५ वर्षांत आपण चालविले आहेत. वादावर संवादानं विजय मिळवायचा, द्वेषाला प्रेमानं जिंकायचं, ही बुद्ध-गांधींची परंपरा या देशाला लाभलेली आहे. ती आपण विसरलो आहोत की काय, असे वाटायला लावणारा भोवताल आपल्याच भोवती फेर धरून गरगरतो आहे आणि आपणही त्यातच त्यात अधिकाधिक गुरफटत चाललो आहोत. चांगुलपणाचं भान सुटत चाललं आहे. एकाच एक चष्म्यातून या भोवतालाकडे पाहण्याची सवय आपल्याला लागलेली आहे. बरं, तो चष्मासुद्धा आपला नाहीच. इतरच कोणी तरी आपल्या डोळ्यावर तो चढविलेला आहे. आपलाच भाऊ, आपलीच भगिनी, आपलाच शेजारी अन् आपलाच मित्र, या सर्वांकडं अविश्वासदर्शक संशयाच्या नजरेनं आपण पाहू लागलो आहोत. या संशयानं आपलं अवघं आयुष्य व्यापत चाललं आहे. आपला सारासार विवेक, आपली विचारक्षमता, बुद्धीप्रामाण्यवाद या बाबी जणू काही आपलं बोट सोडून कुठं तरी अनोख्या बेटावर कायमच्या निवासाला निघून गेल्यात की काय, असं वाटण्यासारखी ही स्थिती.

काय कारण असेल बरं? कधी विचार केलात? आपण स्वतः सोडून इतर प्रत्येकाचं मूल्यमापन फार कठोरपणानं करू लागलो आहोत. त्या मूल्यमापनाचे निकषही आपले नव्हेतच. तेही दुसऱ्याच कोणी दिलेले. सप्तरंगांमध्ये नानाविध छटा असतात. त्या छटांमधील वैविध्यतेचा आनंद घेण्याऐवजी आपण साऱ्याच गोष्टी जणू ब्लॅक आणि व्हाईट या दोनच छटांमध्ये पाहू लागलो आहोत. काळोखासारखं कुळकुळीत काळं आणि नितळ हिमालयासम शुभ्रधवल पांढरं असं काही नसतंच मुळी. काळोखालाही चंद्र-चांदण्यांची शीतल धवलता उठाव देते; तर, हिमालयाची शुभ्रता खुलते ती आकाशी निळाईच्या पार्श्वभूमीवर!

मानवी आयुष्यालाही अशाच रंगच्छटा सौंदर्य बहाल करतात. अगदी करडेपणाच्याही अनेक छटा आयुष्याला व्यापत असतातच की. काळ्याकडून पांढऱ्याकडचा प्रवास हाच मुळी या करडेपणाच्या छटांमधून होत असतो. याच प्रवासाच्या टप्प्यावर काही रंग आपल्याला भेटतात- आयुष्याला गहिरेपण, अर्थ प्रदान करणारे.

निसर्गच जर असा रंगबिरंगी... तर, त्या निसर्गाचेच घटक असणारे आपण बेरंगी का होतो? एखाद्यावर सरसकट काळेपणाचे, धवलपणाचे आरोपण का करीत सुटतो? निसर्गाचे समस्त रंग आपल्यातही आहेत. त्यातही इतर प्राणीमात्रांपेक्षा एक अधिकचा रंग बाळगण्याची सक्षमता आपल्यामध्ये आहे, तो म्हणजे मानवतेचा रंग! विविध जाती, धर्म, प्रांत, भाषा आदी भेदांच्या भिंती आपणच बांधल्या आणि त्या भिंतींना आपणच वेगवेगळ्या रंगांत रंगवलं. आपण आपला एक रंग ठरविलेला आहे. तो वगळता आता आपल्याला अन्य तमाम रंगांविषयी घृणा वाटू लागली आहे. त्या घृणेमध्ये मानवता, एकता-एकात्मता, समता, राष्ट्रभक्ती यांच्या आकर्षक नैकरंगी विविधतेवर मात्र एक प्रकारची कृष्णछाया दाटून आलेली आहे.

ही कृष्णछाया, औदासिन्याचे मळभ, विषमता व द्वेषाची भावना दूर करण्याची जबाबदारी कोणा दुसऱ्याची नाही. आपले घर आपणच आवरायचे अन् सावरायचे असते. हा देश आपले घर आहे. तो जपणे आपली जबाबदारी आहे. आतला घरभेदी असो वा बाहेरचा घुसखोर, या दोहो प्रवृत्तींना तोंड द्यावयाचे, तर आपले एकीचे बळ कायम जपण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठीचे मार्गदर्शक डॉक्युमेंटही आपल्याकडे आहे- ते म्हणजे संविधान! आज जगभरात सुरू असणारे कलह आणि अशांती यांच्या थेट भडिमारापासून भारताचे अन् प्रत्येक भारतीयाचे संरक्षण संविधान करते आहे. संविधान तुमच्या-माझ्या पाठी पहाडासारखे उभे आहे, म्हणून आपण ताठ कण्याने उभे आहोत. घटनेनेच प्रदान केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण जिथे-तिथे वापर करतो आहोत. मात्र, तो सकारात्मक आहे की या देशाच्या स्वातंत्र्याच्या मुळावर उठणारा आहे, याचा विवेक आपण कधीही गमावता कामा नये. सृजनात्मक अभिव्यक्तीचे निर्माते आणि वाहक असणाऱ्या साहित्य, संस्कृती, कला, नाट्य, संगीत आदी क्षेत्रांनी तर याची जाणीव ठेवणे आवश्यकच. या विविध क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्याची नवचेतना सदोदित प्रज्वलित राखण्यासाठी अभिव्यक्तीचे विविध रंग मुक्तपणाने उधळीत राहणेहे जसे प्रतिभावान सर्जकाचे काम; त्याचप्रमाणे त्या अभिव्यक्तीला कणखर प्रोत्साहनाचे पंख प्रदान करणे, ही गुणग्राहक व्यवस्थेची आणि ती व्यवस्था राबविणाऱ्यांची जबाबदारी! या दोन्ही गोष्टी जुळून आल्या की, देशाच्या सर्वंकष प्रगतीला इंद्रधनुषी दिशा लाभण्याची शक्यता गडद होते.


रविवार, १ जानेवारी, २०२३

नूतनवर्षस्य प्रथम दिवसे...हे नवे वर्ष उत्तम जाणार आहे, याची खात्री पहिल्याच दिवशी वाटते आहे कारण लहानपणी ज्यांनी शाळेत आमच्यावर सुसंस्कार करण्यासाठी अतिशय खस्ता खाल्ल्या आणि आजही एखादे पुस्तक, कविता वाचताना ज्यांची हटकून आठवण येते, अशा शिक्षकांचा आशीर्वाद आज पुन्हा लाभला.

कागलचे यशवंतराव घाटगे हायस्कूल ही माझी शाळा. आई त्याच शाळेत शिक्षिका. तिच्या माझ्यावरील शिक्षक म्हणून झालेल्या संस्कारांबद्दल तर मी येथे स्वतंत्रपणाने लिहीले आहेच. पण, त्याही पलिकडे या शाळेत असे अनेक दिग्गज शिक्षक, शिक्षिका मला लाभल्या ज्यांचा माझ्या जडणघडणीत खूप महत्त्वाचा वाटा आहे. आज कुरणे बाईंच्या सागरच्या विवाहाच्या निमित्तानं तांदुळवाडीला गेलो. खरं तर आई प्रकृतीमुळं घराबाहेर पडू शकत नसल्यानं तिचं प्रतिनिधित्व करणं अगत्याचं होतंच, पण त्यातही शाळेतले आपले काही जुने शिक्षक नक्कीच भेटतील, ही आसही होती. आणि घडलंही तसंच. कुरणे बाईंची तर भेट झालीच. पण, विज्ञानाचे एस.डी. पाटील सर, मराठीच्या उपाध्ये बाई यांच्यासह नाटोलीकर बाई, सुतार बाई आणि नव्यानं रुजू झालेल्या काही शिक्षिकाही भेटल्या. इतकं छान वाटलं म्हणून सांगू. एसडी सर तर पूर्णवेळ सोबत होतेच. पण, उपाध्ये बाईंमुळं मराठीतली अनेकविध पुस्तक वाचण्याची प्रेरणा मनी जागली होती, त्याची आठवण झाली.

आज शाळेतल्या अनेक शिक्षकांच्या आठवणी मनी जागल्या. प्रवासभर लेकीला शाळेच्या आठवणी सांगत राहिलो. तिला सांगत होतो की, माझा मीच त्या आठवणींची उजळणी करीत होतो, कुणास ठाऊक? पण, या आठवणींच्या लाटा मनभर उचंबळत राहिल्या. पुन्हा शाळेत जाऊन त्यांच्या पुढ्यात बसावं आणि शिकवा म्हणावं, असं काहीसं वाटत राहिलं. कारण, ते त्या दर्जाचे शिक्षक होते, ज्यांनी आमच्या शाळेला तिचा लौकिक मिळवून दिला आणि विद्यार्थ्यांना त्यांची ओळख. आणि आमच्या ओळखीमध्ये त्यांना स्वतःचं समाधान गवसतं. तो अभिमान त्यांच्या डोळ्यांमध्ये चमकताना दिसतो आणि तो कायम राहावा, यासाठी प्रेरणाही देत राहतो.

डाटा ‘ड्रिव्हन’ सोसायटी...

('दै. पुढारी'च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 'युगांतर' ही विशेष पुरवणी प्रकाशित करण्यात आली. या पुरवणीसाठी लिहीलेला लेख सदर दिवशी कोल्हापूर व बेळगाव आवृत्तींमध्ये प्रकाशित झाला. हा लेख येथे माझ्या वाचकांसाठी 'दै. पुढारी'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

मानवप्राणी आणि अन्य जनावरे यांच्यामध्ये जर कोणता फरक असेल, तर तो बुद्धीमत्तेचा. मानवाने उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर त्याची विचार करण्याची क्षमता विकसित केली आणि तो इतर प्राण्यांपेक्षा स्वतःचे वेगळेपण अधोरेखित करत गेला. अंतिमतः तो जणू काही या धरातलाचा आणि तिच्यावरील सर्व प्राणीमात्रांचा स्वामी असल्याप्रमाणे त्यांच्यावर वर्चस्व गाजवू लागला. मानवाची विचारक्षमता, त्याचा विवेक, त्याचा बुद्धीप्रामाण्यवाद यांचा विकास होत असताना मूलभूत भौतिक गरजांच्या पलिकडे त्याच्या बौद्धिक गरजा वाढल्या. भौतिक गरजा भागविण्यासाठीची अनेकविध साधने, संसाधने त्याने विकसित केली. जीवन सुखकर बनविले. राहणीमान आरामदायी झाले. मात्र, त्याचबरोबर त्याची माहितीची (डाटा) गरजही वाढत गेली.

मानवाच्या वाढत्या आशाआकांक्षांच्या बरोबरीने माहितीची गरज ही वाढतच गेली. पूर्वी राजेरजवाड्यांच्या काळात त्यांच्याभोवती माहितीचे वलय फिरत असे. धर्मसत्ता, राजसत्ता यांच्यामध्ये हे माहितीचे वलय अधिक प्रभावीपणे फिरविले जात असे. आपापल्या सत्ता अबाधित ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेवरील आपला अंकुश कायम राखण्यासाठी या माहितीचा वापर, गैरवापर केला जात असे. त्याचप्रमाणे सत्ता बळकावण्यासाठीही तिचा वापर सोयीने केला जात असे. व्यापारउदीम करणाऱ्यांनी अर्थात अर्थसत्तेनेही या माहितीच्या प्रसारामध्ये आपला वाटा उचललेला दिसून येतो. तथापि, त्या काळात अर्थसत्तेचे केंद्र हे राजसत्ताच होते.

माहितीचे स्रोत हे पूर्वी मौखिक स्वरुपाचे होते. लेखन ही काही ठराविकांची मक्तेदारी होती. इतरेजनांना अर्थात व्यापक बहुजन समाजाला त्यापासून वंचित राखून ही मक्तेदारी बळकट करण्यात आली होती. तथापि, मुद्रणकलेचा शोध जोहान्स गुटेनबर्ग यांनी पंधराव्या शतकात लावला आणि माहितीच्या प्रसारासाठीचा एक महत्त्वाचा मार्ग जगाला खुला केला. सुरवातीच्या काळात बायबलच्याच प्रती प्रिंटींग प्रेसवर छापण्यात आल्या. अर्थातच, धर्मसत्तेने मोठ्या प्रमाणात या तंत्राचा लाभ घेऊन आपले पाठीराखे वाढविण्यासाठी त्याचा वापर केला. तथापि, हळूहळू इतरही लोकाभिमुख साहित्य छापले जाऊ लागले आणि टप्प्याटप्प्याने छपाईकलेचे लाभ सर्वसामान्य वाचक-लेखकांपर्यंत येऊ लागले.

पुढे सतराव्या शतकाच्या प्रारंभी जर्मनीतूनच वृत्तपत्र निघण्यास सुरवात झाली. माहितीच्या प्रसाराचे पुस्तकांपलिकडले आणखी एक नियतकालिकीय प्रकाशन जगाला ठाऊक झाले आणि ते त्याच्या याच गतिमान माहितीप्रसारणाच्या बळावर यशस्वीही झाले. पुढे औद्योगिक क्रांतीच्या युगामध्ये विज्ञानाच्या क्षेत्रात अनेकविध प्रयोग होऊ लागले. मानवी श्रमाच्या ऐवजी यंत्रांकडून काम करवून घेऊन अधिक दर्जेदार उत्पादने काढण्यावर भर देण्यात येऊ लागला. यंत्रे राक्षसी वेगाने काम करू लागली. उत्पादनाचा वेग प्रचंड वाढला. या राक्षसाकडून अधिकाधिक उत्पादन करवून घ्यावयाचे, तर कच्च्या मालाची उपलब्धता तितक्याच मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक ठरू लागले. जगाच्या पाठीवर अशा ठिकाणांचा शोध घेऊन भांडवलदारी राष्ट्रे तेथे आपल्या वसाहती स्थापन करू लागल्या. सुरवातीला गोड बोलून, स्थानिकांशी करारमदार करून, ऐकले नाही तर हल्ले अन् हत्या करून किंवा थेट त्यांच्यावर राज्य प्रस्थापित करून ही कच्च्या मालाची गरज भागविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्याचप्रमाणे तयार झालेला माल खपविण्यासाठी उत्तम क्रयशक्ती असणाऱ्या विभागांत आपल्या बाजारपेठा वसवून किंवा स्थानिक बाजारपेठा ताब्यात घेऊन व्यापार वाढविला. व्यापारातून नफेखोरीलाही ऊत आला. पण, औद्योगिक क्रांतीने जगामध्ये भांडवलदारांचे बस्तान निर्माण केले.

याच कालखंडात माहिती प्रसारणाचेही अत्यंत महत्त्वाचे शोध लागले. रेडिओ हा त्यातील महत्त्वाचा क्रांतीकारक शोध. जगाच्या एका कोपऱ्यातील आवाज दुसऱ्या कोपऱ्यात नेऊन पोहोचविण्याची अचाट क्षमता असणारा हा शोध होता. त्याच टप्प्यावर तारयंत्राचा आणि पुढे टेलिफोनचाही शोध लागला. जगाच्या दोन टोकांवरील व्यक्ती एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधू शकल्या. टपाल पाठवून ते पोहोचून पत्रोत्तराची प्रतीक्षा करण्याच्या कालखंडात हा प्रत्यक्ष संवादाचा क्षण मानवी इतिहासात किती महत्त्वाचा ठरला असेल, याची कल्पनाच करावी. इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात संशोधकीय प्रगती होत चालली तसा संवाद आणि दळणवळणाच्या साधनांचा शोध लागतच राहिला. दूरचित्रवाणी, गणनयंत्र, संगणक हे त्याचे पुढील महत्त्वाचे टप्पे.

भारतीय स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारत हा सातत्याने या माहिती साधनांचा आपल्या प्रगतीसाठी वापर करीत आलेला आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या द्रष्टेपणाने येथील टेलिकॉम क्षेत्राचा गतीने विकास झाला. भारतामध्ये दळणवळणाचे एक नवे युग अवतरले. तत्कालीन विरोधाला न जुमानता त्यांनी संगणकाचाही विविध क्षेत्रांत अवलंब केला. संगणकामुळे नोकऱ्या जातील, असा आक्षेप घेतल्या जाण्याच्या काळात संगणकाचा स्वीकारही केला आणि त्या माध्यमातून नोकरीच्या नव्या संधींचे अवकाशही खुले झाले. डिजीटल तंत्रज्ञानाने आणि जगात नव्याने अवतरलेल्या इंटरनेट युगाने जगभरात क्रांतीला सुरवात केलेली होती. भारतही त्याला अपवाद राहिला नाही. जागतिकीकरणानंतरच्या कालखंडात या नवतंत्रज्ञानाचा देशाने खुल्या दिलाने अंगिकार केला आणि डिजीटल टेलिफोनीचे युग देशात सुरू झाले. खिशात अगर हातात घेऊन कुठेही फिरता येईल असा टेलिफोन, इतकेच मर्यादित महत्त्व असणाऱ्या मोबाईलने स्मार्टफोनपर्यंत वाटचाल केली आहे. माहिती देणाऱ्या माध्यमांचे मल्टीमीडिया आविष्करण अचंबित करणारे ठरले. इंटरनेटमुळे लोकांना वसुधैव कुटुम्बकम्चा प्रत्यय येऊ लागला. डिजीटल क्रांतीमुळे आविष्कृत झालेल्या आणि मोठ्या संख्येने वाढलेल्या विविध माध्यमांच्या आगमनामुळे माहितीचा प्रस्फोट झाला. वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज' म्हणता म्हणता या खेड्यात इतक्या वार्तांची, माहितीची देवाणघेवाण सुरू झाली की त्या माहितीचे करावे काय, हेच कळेनासे झाले. एकविसाव्या शतकामध्ये प्रचलित पारंपरिक प्रसारमाध्यमांपेक्षाही वेगळी अशी समाजमाध्यमे अस्तित्वात आली. सुरवातीला केवळ एकमेकांशी संपर्कासाठी असणाऱ्या या माध्यमांनी या शतकाच्या पहिल्या अवघ्या दोन दशकांतच इतकी क्रांतीकारक वाटचाल केली आहे की आता प्रत्येक सर्वसामान्य नागरिक जणू माध्यमकर्मी बनला आहे. प्रत्येकाकडे माहिती आहे आणि ती माहिती त्याला समोरच्याला द्यावयाची आहे. अशी जगभरात क्षणोक्षणी अब्जावधी संदेशांची, माहितीच्या तुकड्यांची देवाणघेवाण सुरू आहे. तथापि, या प्रचंड माहितीचे करावयाचे काय, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आज उभी ठाकली आहे.

शासकीय यंत्रणांना विकासाभिमुख निर्णय घेण्यासाठी, त्यात पारदर्शकता राखण्यासाठी लोकांची विविध प्रकारची माहिती हवी असते. ती डिजीटल माध्यमांद्वारे सर्वेक्षणांच्या द्वारे गोळा केली जाते. आजकाल डिजीटल स्वरुपात ही माहिती गोळा केली जाते. आपल्या आधार क्रमांकापासून ते बँक अकाऊंटपर्यंतची सर्व माहिती यात असते. ती गोपनीय असते, तोपर्यंत ठीक; मात्र, जर कोणी वाईट हेतूने ती चोरली (हॅक), तर त्याचे कितीही टोकाचे दुष्परिणाम होऊ शकतात. शासनाला माहिती देणे ठीक आहे. पण, आपण विविध कंपन्यांनाही आपली खाजगी माहिती देऊन ठेवलेली असते. उदाहरणार्थ, गुगल-पे सुविधा वापरणाऱ्यांनी आपल्या बँक अकाऊंटची सर्व माहिती गुगलला देऊन आपल्या क्रयशक्तीचा अंदाज कंपनीला देऊन ठेवलेला असतो. ही माहिती संबंधित कंपनी स्वतःच्या उत्पादनाच्या प्रचारासाठी अगर अन्य कंपनीच्या लाभासाठी वापरणारच नाही, याची खात्री कोण देणार?

आपल्याकडील माहिती देणे, इथपर्यंतच ही बाब मर्यादित राहिली असती, तरी चालले असते. मात्र, आता त्यापुढे जाऊन भांडवलदार समाजमाध्यम कंपन्यांसाठी त्यांचा प्रत्येक वापरकर्ता हाच एक माहितीचा तुकडा बनला आहे. त्याची माहिती हा त्यांच्या भांडवली मिळकतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या समाजमाध्यम कंपन्यांनी आता तुमच्या माझ्या हातातल्या स्मार्टफोनचा आधार घेत तुम्हाला आणि मलाच एक उत्पादन, विक्रयवस्तू बनवून टाकले आहे. म्हणजे आपण आता ग्राहक राहिलो नाही, तर या कंपन्यांनी आपल्याला चांगलेच गिऱ्हाईक बनविले आहे. आपण आपली सारी खाजगी, सार्वजनिक माहिती या कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करतो. आपल्याला विविध प्रकारचा डाटा हवा आहे, असे म्हणत असताना आपणही त्याचवेळी त्या डाटाचा एक तुकडा बनत चाललेलो आहोत, याचे भान आपण बाळगायला हवे.

खरे तर, प्रत्यक्षात डाटा ही गोष्ट वापरून विश्लेषण करणे, तिचा मानवी जीवनाच्या भल्यासाठी वापर करणे हे अपेक्षित असताना डाटा ड्रिव्हन सोसायटीच्या नावाखाली मानवतेलाच ड्राईव्ह करीत भांडवलदारांच्या दावणीला बांधण्यात तर येणार नाही ना, अशी शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती आज आपल्या सभोवती निर्माण झाली आहे. तिची जाणीव या निमित्ताने करवून घेणे हीच आजच्या काळातील अगत्याची बाब आहे.