रविवार, ३० जानेवारी, २०११

निर्मलाताईंची 'निर्मल' मोहीम


एक मध्यमवर्गीय गृहिणी... अभियंता पती, तीन मुलं एवढंच तिचं विश्व... इतरांप्रमाणंच तीही वाढत्या महागाईनं त्रस्त... इतरांहून फरक इतकाच की वाचनामुळं आणि पूर्वाश्रमीच्या शेतकरी कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळं सामाजिक अन् पर्यावरणविषयक जाणीवा तीव्र झालेल्या... त्यातून ती स्वत:चं घर कचरामुक्त करून त्यापासून गांडूळखत, गॅस तयार करण्याच्या मागे लागते... तिच्या या प्रयत्नांना यश येतं... या यशानं हुरूप वाढून ती हळूहळू आपली कार्यकक्षा वाढवते... आणि तिच्या प्रकल्पाला वीजनिर्मितीचीही जोड लाभते... घरापासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा केवळ पाच वर्षांतच सव्वादोन कोटीची उलाढाल असणाऱ्या 'विवम् ऍग्रोटेक'च्या रुपात देशभर विस्तार झाला... आणि या प्रकल्पांना देशातीलच नव्हे तर जगभरातील तज्ज्ञांकडून प्रशंसेची पोचपावती मिळाली. ही यशोगाथा आहे औरंगाबादच्या निर्मला कांदळगावकर यांची.
निर्मलाताईंचं शिक्षण बीएस्सी. त्यानंतर त्यांनी समाजशास्त्रात एम. ए. ही केलं. पर्यावरण विषयाची सुरवातीपासूनच आवड. त्यामुळं दिल्ली विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्राची पदविका परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. वाचनाची त्यांना मोठी आवड. या आवडीपोटी शेती, पर्यावरण या विषयावर पुष्कळ वाचन केलं, अभ्यास केला. आपल्या दैनंदिन बेजबाबदार वर्तनातून आपण पर्यावरणाला किती हानी पोहोचवत आहोत, याची त्यांना जाणीव झाली. या जाणीवेतूनच शेतकरी व पर्यावरण या दोन्ही घटकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, या भावनेनं त्यांना अस्वस्थ केलं. अभ्यासाअंती त्यांना मार्गही सापडला. हा मार्ग होता गांडूळ खतनिर्मितीचा.
गांडूळखत निर्मिती :
पारंपरिक पध्दतीतील तोटे दूर करून निर्मलाताईंनी स्वरुप गांडूळ खत निर्मिती संयंत्राची निर्मिती केली. यात कमी श्रमात व कोणत्याही प्रकारच्या कचऱ्यापासून खत तयार करता येते. शेतकरी आपल्या शेतातील कचरा, शेण वापरून शेतातच खत तयार करू शकतात. खत उत्तम प्रकारचे व शुध्द असल्यामुळे, पीक चांगले येतेच, शिवाय जमिनीचा पोतही सुधारतो. निर्मलाताईंच्याच शब्दांत सांगायचे तर रासायनिक खताचा वापर न केल्याने अगदी विषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन होते. औरंगाबाद जिल्ह्यातल्या खामखेडासारख्या गावात महिलांनी बचतगट स्थापन करून गांडूळ खत तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी फार वेळ द्यावा लागत नाही अथवा श्रमही जास्त पडत नाहीत. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचे एक साधन सुरू झाले आहे.
शहरातील कचरा, त्याच्या विल्हेवाटीची अशास्त्रीय पध्दत, त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान व पर्यायाने मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांवरही गांडूळखत हा योग्य व शास्त्रीय उपाय होऊ शकतो, असे निर्मलाताईंच्या लक्षात आले. शहरी कचऱ्याचेही गांडूळखतात रुपांतर करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे जिथे कचरा निर्माण होतो, तिथेच त्याचे गांडूळखत केले तर खर्च कमी होतोच, आणि कचरा रस्त्यावरही जाणार नाही व परिसरही स्वच्छ राहील, असे त्यांना वाटले. त्यामुळे घरात तयार होणारा कचरा वेगळा केला तर त्यातील कुजणाऱ्या कचऱ्यापासून गांडूळखत होऊ शकते आणि न कुजणाऱ्या प्लास्टीकसारखा कचरा पुन्हा वापरात येऊ शकतो. ही बाब लक्षात येताच त्यांनी घरातील कचऱ्यापासून गांडूळखत तयार करणारे छोटे मॉडेल तयार केले. या कचऱ्यात विशिष्ट जीवाणू घातले की त्याचा वासही येत नाही, त्यामुळे ते घरात ठेवले तरी त्यात कचरा असल्याचे लक्षात येत नाही. निर्मलाताईंनी औरंगाबादच्या घरातच गांडूळखत उत्पादन, त्यासाठी लागणारी यंत्रे व गांडुळांचा पुरवठा करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी बनविलेल्या 'स्वरुप' गांडूळखत निर्मिती संयंत्राच्या साह्याने एका महिन्यात 1 ते 1.5 टन गांडूळखत बनविता येते. गॅल्व्हनाइज्ड जाळी आणि लोखंडापासून त्यांनी घडी पध्दतीचे संयंत्र बनविले आहे. त्यामुळे ते कोठेही नेण्यास सोपे आहे. आपल्या घरातील एक किलोच्या कचऱ्यापासून ते दरमहा 75 टन गांडूळखत बनविणारी प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या उभारले आहेत. आज केवळ पाच वर्षांत नेपाळपासून, पंजाब, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील 222 तालुक्यांत त्यांचे प्रकल्प पोहोचले आहेत. पाच हजारहून अधिक शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. एकटया औरंगाबाद शहरात हे गांडूळखत निर्मिती संयंत्र घेणारे सुमारे चार हजार नागरिक आणि दीडशे संस्था आहेत.
निर्मलाताईंच्या या शास्त्रीय व बहुपयोगी उपक्रमाची भारत सरकारच्या कृषी खात्यानेही दखल घेतली असून दिल्लीच्या प्रगती मैदानावर भरविण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले. तसेच त्यांच्या स्टॉलसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली. राज्याच्या तसेच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अनेक शासकीय उपक्रमांच्या जागेवर (उदा. कृषी, वनीकरण आदी) तसेच अनेक मान्यवरांच्या घरांतही निर्मलाताईंची स्वरुप संयंत्रे बसविण्यात आली आहेत. याठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे म्हणजे गांडूळखताच्या प्लँटमधून गांडूळपाणी मिळवले तर ते एक अत्यंत उपयुक्त कीटकनाशक आहे आणि त्याचे अन्य दुष्परिणामही नाहीत.
बायोगॅस निर्मिती :
गांडूळखत निर्मितीनंतर काय, हा प्रश्न पुढे निर्मलाताईंना पडलाच नाही. कारण त्याचे उत्तर त्यांनी शोधून ठेवले होते, ते म्हणजे बायोगॅस निर्मिती. घरातील कचऱ्याचे त्यांनी सुका कचरा, ओला कचरा आणि नष्ट न होणारा कचरा असे वर्गीकरण केले. भाजी, फळे, निर्माल्य, नारळाच्या शेंडया, कांद्याची टरफले थोडक्यात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पदार्थांचे उरलेले भाग, कागदाचे तुकडे- हा झाला हिरवा कचरा. यापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत निर्माण होते. त्यानंतर जेवणाच्या ताटातील, भांडयातील उष्टे अथवा शिल्लक अन्नपदार्थ, चहाच्या पातेल्यातला चोथा, खरकटे पाणी हा झाला ओला कचरा. हा कचरा बायोगॅसच्या संयंत्रामध्ये टाकून गॅस तयार केला जातो. तो गॅस पाइपच्या साह्याने स्वयंपाकघरात आणून थेट वापरता येतो. नष्ट न होणाऱ्या सुक्या कचऱ्यात रिकाम्या बाटल्या, टयूब, खराब बल्ब, प्लास्टीकचे तुकडे व पिशव्या, धातू, काच यांचा समावेश होतो. या वस्तू आपण भंगारवाल्याला देऊ शकतो. त्याच्या विक्रीतून पैसा मिळू शकतो. याठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे घरातील कोणताच कचरा या पध्दतीमुळे डंपिंग ग्राऊंडवर जाणार नाही. तयार होणारे गांडूळखत 10 रुपये प्रतिकिलो या दराने विकले जाते. खरकटया पाण्यापासून बायोगॅस मिळतो. त्यामुळे गॅसची बचत होते.
साधारण सकाळी दोन किलो अन्न व सायंकाळी दोन किलो अन्न बायोगॅस संयंत्रात टाकले तर त्यापासून 3 तास पुरेल एवढा गॅस मिळतो. त्याची ज्योतही निळया रंगात जळते. निर्मलाताईंनी त्यांच्या घरातच या गॅसचं प्रात्यक्षिकच आम्हाला दाखवलं. शासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी हे प्रात्यक्षित पाहण्यासाठी त्यांच्या घरी येऊन गेले आहेत.
या गॅसला कोणताही वास येत नाही. त्याचप्रमाणे त्या स्फोट होण्याचीही भिती नाही. जमिनीमधला मिथेन वायू काढून जाळण्याऐवजी कचऱ्यापासून निर्माण होणारा मिथेन वापरणे कधीही हितावहच ना!
आज राज्यभरात बसविलेल्या विवम् ऍग्रोटेकच्या संयंत्रांमधून दररोज सुमारे 500 टन कचऱ्याचे गांडूळखत अथवा बायोगॅसमध्ये रुपांतर होत आहे. यामध्ये आणखी भरच पडत आहे. औरंगाबादसह राज्यात 50 शहरांत असे बायोगॅसचे प्रकल्प बसविले आहेत. पुणे महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील 11 नगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयातील कॅन्टीनसह अनेक शासकीय इमारती, खासगी कंपन्यांच्या कॅन्टीनमध्ये ही संयंत्रे बसविली आहेत. प्रतिष्ठेच्या आयएसओ मानांकन मिळवण्यासाठीही अनेक कंपन्या आता हे संयंत्र बसविण्याला प्राधान्य देऊ लागल्या आहेत. हॉटेल, धाबे यांनाही डंपिंग ग्राऊंडऐवजी असा प्रकल्प परवडतो.
निर्मलाताईंनी नुकताच चंद्रपूर नगरपरिषदेसाठी बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित केला आहे. गंजवार्ड भाजी मार्केटमधील रोजच्या 1500 किलो कचऱ्यावर येथे प्रक्रिया करण्यात येते. त्यातून निर्माण होणारा गॅस शेजारच्या सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या कॅन्टीनला देण्याची योजना आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प स्वर्णजयंती महिला बचत गटामार्फत चालविला जातो.
वीजनिर्मिती प्रकल्प :
केवळ बायोगॅस निर्मितीवर निर्मलाताई थांबल्या नाहीत. त्या बायोगॅसपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे. याअंतर्गत जनरेटरमध्ये (डिझेलऐवजी बायोगॅस प्रकल्पांत तयार होणारा) बायोगॅस वापरला जातो. आज वीज तयार करण्यासाठी कोळशाचे ज्वलन केले जाते. यासाठी ऑक्सिजन मोठया प्रमाणात जळतो. ऑक्सिजनची किंमत पाहायला गेलो तर ती 36 रुपये प्रतिकिलो आहेच, पण जीवनासाठी अनमोल आहे. अशा वीजनिर्मितीचा खर्च ऑक्सिजनच्या किंमतीसह 120 रुपये प्रतियुनिटपर्यंत असू शकतो. मात्र कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा खर्च 3 रुपये प्रतियुनिट इतका असतो आणि प्रकल्पही पूर्णत: पर्यावरण सुसंगत.
नांदेड येथील केळी मार्केटमध्ये एक बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. तिथल्या केळीच्या लिलावानंतर उरणारे देठ, बुंधे, पाने असा रोजचा 1500 किलो कचरा प्रकल्पात टाकला जातो. याठिकाणी वीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव आहे. याखेरीज चंद्रपूर नगरपालिका, वर्धा नगरपालिका, पंढरपूर नगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका, रामटेक नगरपालिका व कागल नगरपालिका या ठिकाणी दीड ते पाच टनांपर्यंतचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. कोकणात चिपळूण आणि विदर्भात अंजनगाव- सुर्जी येथेही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
निर्मलाताईंच्या कार्याची आज अनेक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. जागतिक बँकेचे अधिकारीही त्यांचे काम पाहून प्रभावित झाले आहेत. केंद्र शासनाने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्यांच्या स्टॉलला मोफत जागा उपलब्ध केलीच शिवाय ठिकठिकाणी त्यांची मार्गदर्शन शिबिरेही आयोजित केली. महाराष्ट्र शासनाने कृषी सल्लागार समितीमध्ये स्थान देऊन त्यांच्या कामाचा सन्मान केला आहे. नाबार्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण शिबिरांत बायोगॅस व गांडूळखत या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जाते. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा पुरस्कार, माँसाहेब मीनाताई ठाकरे विशेष गौरव पुरस्कार, बेस्ट प्रोजेक्ट पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विविध नगरपालिकांसाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याच्या कामाचा ओघही त्यांच्याकडे पुष्कळ आहे.
'आधी केले, मग सांगितले' अशा वृत्तीने निर्मलाताईंनी कचऱ्यापासून वीजनिर्मितीपर्यंतचा टप्पा गाठला आहे. यापुढे सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्याबरोबरच 'व्हर्मीकंपोस्टिंग' या विषयावर पीएच. डी. करण्याचा त्यांचा मानस आहे. शाळा व मंदिरे याठिकाणी प्रबोधन शिबिरे घेण्याचे प्रमाणही त्या वाढविणार आहेत. अत्यंत साधी राहणी, मनमोकळं बोलणं यामुळं आपलंसं करणारं व्यक्तिमत्त्व लाभलेल्या निर्मलाताई आजही 'जमिनीवर'च असल्याचं त्यांच्याशी बोलताना जाणवतं. या जमिनीचे उपकार फेडण्यासाठी त्यांचे प्रयत्न अथक सुरू आहेत. त्या प्रयत्नांत आपणही सहभागी होण्याची गरज आहे.

बचतगटांना काम
चंद्रपूर येथील बायोगॅस प्रकल्पाचे काम महिला बचत गटाकडे सोपविण्यात आले आहे. या महिला सायकलवरुन कचरा गोळा करतात. प्रत्येक महिलेकडे साधारण 250 घरे आहेत. घरगुती स्तरावरच कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यांच्या ताब्यात मिळते. यामध्ये हिरवा भाजीपाला, अन्य सुका कचरा व ओला कचरा असा त्या गोळा करतात. प्रत्येक घरातून दरमहा दहा रुपये त्यांना मिळतात. जर कोणी ही मामुली रक्कम देण्यासही का- कु केले तर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे संबंधिताची तक्रार करण्याची मुभा त्या महिलेला असते. दरम्यान गोळा केलेल्या कचऱ्यातील हिरवा कचऱ्यापासून गांडूळखत केले जाते. प्लास्टीक, धातू, काच, बाटल्या वगैरे सामान विकूनही या महिलेला पैसे मिळतात. त्यामुळे कचरा गोळा करण्याचा मोबदला, गांडूळखत विक्री व भंगार विक्री यातून महिन्याकाठी तिला तीन ते चार हजार रुपये सुटू शकतात. तसेच त्यासाठी संपूर्ण दिवस न राबता केवळ चार तास द्यावे लागतात, अशी माहिती निर्मलाताईंनी दिली.
--
संपर्कासाठी पत्ता :
निर्मला कांदळगावकर,
विवम् ऍग्रोटेक,
ए-6, वेदांत गृहकुल, नवे श्रेयानगर,
औरंगाबाद, 431 005.
दूरध्वनी क्र. 0240- 2346532, 2321863
इ-मेल : vivamgroup@rediffmail.com
वेबपेज : http://vivamgroup.tripod.com