मंगळवार, २९ सप्टेंबर, २०१५

१९६५चे युद्ध आणि भारतीयत्वाच्या भावनेची ताकद

(आज मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०१५ रोजी शिवाजी विद्यापीठात एका महत्त्वपूर्ण व्याख्यानाचा साक्षीदार होता आले. ज्येष्ठ विश्लेषक विश्वास दांडेकर यांनी '१९६५चे युद्ध' या विषयावर विवेचन केले. ओघवत्या शैलीमध्ये १९६५च्या युद्धाचा कालखंड त्यांनी डोळ्यासमोर उभा केला. या भाषणाचा गोषवारा माझ्या ब्लॉग वाचकांसाठी सादर करीत आहे.)
भारतामधील विविधतेतील एकता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भारतीयत्वाच्या भावनेमधील ताकदीची १९६५ व १९७१च्या युद्धांमुळे जगाला प्रचिती आली. १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धातील पराभवामध्ये १९६५च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धाची; तर, या युद्धातच १९७१च्या बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाची बीजे दडलेली होती.  १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धातील पराभवामध्ये १९६५च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धाची; तर, या युद्धातच १९७१च्या बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाची बीजे दडलेली होती, असे सांगून श्री. दांडेकर म्हणाले, १९६२ च्या चीनबरोबरील युध्दामध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानाने युध्दासाठी तयारी सुरु केली होती. १९६५चे भारत-पाकिस्तान युद्ध हे अनिर्णित युद्ध होते. त्यात ना भारताचा विजय झाला, ना पाकिस्तानचा. युद्धाचे सारासार राजकीय आणि लष्करी विश्लेषण केल्यावर हे स्पष्ट होते की, या समासम युद्धाचे सुप वाजले, तेव्हा पारडे निश्चितपणे भारताकडे झुकत होते. भारताकडे निर्विवाद विजयाच्या संधी चालून आल्या होत्या, परंतु काही कारणांमुळे त्या गमावल्या. तथापि, भारताच्या विविधतेतील ताकद १९६५च्या युद्धाने जगाला समजली. विविधतेतून एकतेचे प्रतिबिंब भारतीय सेनेमध्ये आढळते. या युध्दात सैन्याबरोबरच त्यांना मिळालेली नागरी नेतृत्वाची साथही तितकीच महत्वाची होती. सेना व नागरी नेतृत्वामध्ये सामंजस्य निर्माण करण्याचे बहुमोल श्रेय तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांना द्यावे लागेल.
६ सप्टेंबरला पाकिस्तानची छांब विभागात युद्धाच्या आरंभीच्या भागात सरशी झाली होती, तो पाकिस्तान डिफेन्स डे म्हणून पाकिस्तानात साजरा केला जातो. पराभवाच्या उंबरठ्यावर उभ्या ठाकलेल्या पाकिस्तानने केवळ भारतविरोधी जनभावना निर्माण करण्यासाठी असा जल्लोष करावा, हा केविलवाणा प्रयत्न होता. युद्धात विजय कसा असावा, याचा धडा त्यांनी भारताच्या बांगलादेश युद्धातील निर्णायक विजयावरून शिकावा. १९६५ च्या युध्दातील विजय हा एका मर्यादेतच पाहता येईल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सतरा-अठरा वर्ष संपल्यावरही पाकिस्तान आपल्या अस्मितेच्या शोधात चाचपडत होता. शेजारच्या भारतात लोकशाहीत घट्ट मूळ पकडूनही पाकिस्तानची राज्यघटनासुद्धा अजून गर्भावस्थेत होती. पूर्वाश्रमीचे लष्करी अधिकारी आणि राष्ट्राध्यक्ष इरकंदर मिर्झा यांनी मार्शल लॉङ्घ जाहीर करून सेनाप्रमुख जनरल अयूबखानांकडे सत्ता सुपूर्त केली होती आणि लगोलग त्यावर पूर्ण कब्जा करून १९५९ मध्ये अयूबखान पाकिस्तानचे सर्वेसर्वा झाले होते. काश्मीर भारतापासून हिसकावून घ्यायच्या, फाळणीचे अर्धे राहिलेले कामङ्ग पूर्ण करण्याच्या ईर्षेने अयूब पेटून गेले होते. १९६२ मधील भारताच्या पराभवाच्या वेळीच त्यांचे परराष्ट्रमंत्री झुल्फिकार भुट्टो यांनी काश्मीरवर हल्ला चढवावा, अशी शिफारस केली होती. त्यानंतर ती अधिकच बळावत गेली. १९६४ मध्ये पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर पंतप्रधानपदावर आलेल्या लालबहादूर शास्त्रींची छोटी मूर्ती पाहून अयूबखान सुखावले होते. त्या पाच फुटी शरीरात किती प्रचंड करारी आणि निर्भय वृत्ती सामावली आहे, याची अयूब यांना तसूभरही कल्पना नव्हती. १९६२च्या पराभवानंतर दुबळ्या झालेल्या भारतीय सैन्याविरुद्ध एक अचानक आणि विजेच्या वेगाने मोहीम हातात घेतली तर ते तग धरू शकणार नाहीत, अशी त्यांची भाबडी समजूत होती. त्यांना पाकिस्तानमधील दोन लोकांनी विरोध  केला होता तरीसुध्दा अयुब खान यांनी युध्द करण्याचे ठरवले. काश्मीरमध्ये असंतुष्टता पसरली आहे आणि तेथील जनतेला तारण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात घुसखोर पाठवले तर ते आपले हात पसरून स्वागत करतील, यावर आयूब यांचा दृढविश्वास होता. दुर्दैवाने अयूबखानांची प्रत्येक समजूत चुकीची आणि आत्मघाती ठरली. प्रथम आम नागरिकांच्या वेशातील लष्करी सैनिक काश्मीरमध्ये घुसवून श्रीनगरवर कब्जा करायचा, तिथल्या काही घरभेदी सूत्रांच्या साहाय्याने काश्मीरच्या स्वातंत्र्याची घोषणा करायची आणि मग त्यांच्या मदतीच्या हाकेला प्रतिसाद देऊन जम्मू-काश्मीरवर अटीतटीचा हल्ला चढवायचा, हा अयूबखानांचा डाव होता.  १९५४ मध्ये पाकिस्तानचा सीऍटो करारबद्ध राष्ट्रांमध्ये समावेश झाल्यानंतर अमेरिकेकडून त्यांना अत्याधुनिक पॅटन रणगाडे, एफ ८६ सेबर विमाने, तोफा आणि इतर शस्त्रास्त्रे मिळाली होती. त्याचा उपयोग भारताविरुद्ध होता कामा नये, हे अमेरिकेने बजावले असतानाही हे शस्त्रास्त्रबळ वापरण्यात आले. आणि त्याकरवी आपण भारतीय सैन्याला नामोहरम करू शकू, हा त्यांचा आत्मविश्वास याबाबतीत तरी काही अंशी रास्त होता. परंतु ज्या भागात त्यांनी हे रणगाडे घुसवले तो महिना सप्टेंबर होता. भारताकडील सेंच्युरियन रणगाडयांनी पॅटर्न रणगाडे उध्वस्त केले. ५ ऑगस्टला पाकिस्तानने २५ ते ३० हजार सैनिक काश्मिरी नागरिकांच्या वेशात जम्मू ते गुलमर्गपर्यंत वेगवेगळ्या पायवाटांमार्गे घुसवण्यास सुरवात केली. या मोहिमेचे नाव होते ऑपरेशन जिब्राल्टर. भारतीय गुप्तहेर संस्थेला याची तसूभरही कल्पना नव्हती, हे लज्जास्पद होते; परंतु वेगवेगळ्या दिशांनी येणार्‍या अकरा गटांचे आघाडीचे दस्ते जसजसे काश्मिरी नागरिकांच्या संपर्कात येऊ लागले, तसतशी या परदेशी घुसखोरांची साधंत माहिती ते निकटच्या भारतीय सैनिकी ठाण्यांना पुरवू लागले आणि तीन-चार दिवसांतच ऑपरेशन जिब्राल्टर  पूर्णतः बारगळले. या मोहिमेला प्रतिसाद म्हणून भारतीय सैन्याने उरी आणि पूँचला जोडणार्‍या पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील हाजी पीर खिंडीवर यशस्वी हल्ला चढवून ती ताब्यात घेतली. अयूबखानांना हा जबरदस्त धक्का होता.
एक सप्टेंबर १९६५ ला पाकिस्तानने छांब-जौरिया भागावर प्रचंड हल्ला चढविला. महामार्गावरील अखनूर पुलावर ताबा मिळविण्याचा पाकचा प्रयत्न होता. तसे झाले असते तर भारताची रसदच तुटली असती. सहा सप्टेंबरपर्यंत त्या देशाच्या सैन्याने जौरियानिकट आघाडी घेतली. युद्धात भारतीय वायूदल उतरले आणि त्यांनी पाकिस्तानी सैन्याला थोपविले. दरम्यान, लालबहादूर शास्त्रींनी पंजाबची आघाडी उघडणार असल्याची गर्जना केली. परिणामतः पाकिस्तानची छांब-जौरियावरील पकड ढिली पडली.
अमृतसर डोळ्यांपुढे ठेवून पाकिस्तानच्या १ आर्म्ड डिव्हिजनने खेमकरगच्या दिशेने चाल केली, तेव्हा ४ इन्फन्ट्री डिव्हिजन व २ आर्म्ड ब्रिगेडने असल उत्तर या गावाजवळ कडवा प्रतिकार केला. त्यात पाकिस्तानचे ५० ते ६० पॅटर्न टँक गारद झाले. यात वायुदलानेही पराक्रम गाजविला. नॅट आणि कॅनबेरा बॉंबर्स विमानांनी भारताच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. युद्धाची व्याप्ती वाढू नये, म्हणून नौदलाला भारताने यात उतरविले नाही. ही चूक झाली. कारण, प्रबळ नौदलामुळे युद्धाचा नूरच पालटला असता. त्याचप्रमाणे लाहोर येथे भारतीय सैन्याच्या छोटया छोटया तुकडया घुसल्या होत्या परंतु एका वरिष्ठ अधिका-याच्या नाकर्तेपणामुळे भारतीय सैन्य निर्विवाद वर्चस्व मिळवू शकले नाही. पाकिस्तानच्या सैन्याने सीमेलगत असणारे सैनिकी विमान तळ उधळवून लावण्याचा डाव आखला होता परंतु पंजाब प्रांतातील शेतक-यांनी ३०० पाकिस्तानी पॅराशूटमधून उतरलेल्या सैनिकांना भारतीय सैन्याच्या ताब्यात दिले. एकीकडे युध्दा एक शह-काटशहाची परिस्थिती निर्माण झाली होती तरी, पाकिस्तानी सैन्यदले त्यांच्या सहनशीलतेच्या आणि युद्धपात्रतेच्या टोकाला पोचली होती. भारतीय सैन्यदलांची युद्धपात्रता बरीचशी अबाधित होती. त्या वेळी आणखी काही जोरदार धक्के पाकिस्तानी सैन्याला दिले असते तर ते कोसळले असते.  वाटाघाटी करण्यापूर्वी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी वाटाघाटीत मी आणखी आठ दिवस घालवेन परंतु तुम्ही एक मोठी चढाई करुन विजय मिळवू शकता अशी विचारणा केली होती परंतु सेनाप्रमुख जनरल जे. एन. चौधरी यांनी बर्‍याच रणगाड्यांचे नुकसान झाले आहे आणि बहुतांश दारूगोळा संपला आहे असे उत्तर दिले. वास्तविक फक्त १४ टक्केच दारूगोळा संपला होता आणि भारताच्या रणगाड्यांची संख्या त्या वेळीही पाकिस्तानच्या दुप्पट होती. उलट पाकिस्तानने ऐंशी टक्के दारूगोळा उडवला होता. आणखी काही दिवस ते युद्ध चालते, तर पाकिस्तानचा दारुण पराभव झाला असता. परंतु, युद्धशास्त्राला जर तरच्या भाषेचा उपयोग नसतो. अशाप्रकारे अनेक युध्दाच्या अनेक आघाडयावर भारताला आलेल्या विजयाची संधी गमावल्या परंतु या युध्दामध्ये सैनिक शक्तीला नागरी शक्तीची साथ मिळाली आणि भारताची विविधता म्हणजे काय हे जगाला समजले. भारतीय सैन्य आणि जनतेमध्ये अतूट संबंध, समजूतदारपणा आहे. त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. हुकुमशाही हा मूर्खपणा असून लोकशाहीत चुका होत असतील परंतु त्याला हुकुमशाही उत्तर नाही. १९६५च्या युद्धात भारताच्या १९७१ मधील निर्णायक विजयाची आणि पाकिस्तानच्या दुसर्‍या फाळणीची बीजे दडली होती.