रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

२४वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, कारदगा:

‘निष्पर्ण पिंपळाच्या छायेत’चे

डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या हस्ते प्रकाशन

अनुप जत्राटकर यांच्या पुरस्कारप्राप्त एकांकिकांचा संग्रह



अनुप जत्राटकर यांच्या 'निष्पर्ण पिंपळाच्या छायेत' या एकांकिका संग्रहाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. अच्युत माने, श्रेणिक पाटील.

अनुप जत्राटकर यांच्या 'निष्पर्ण पिंपळाच्या छायेत' या एकांकिका संग्रहाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. अच्युत माने यांच्यासह अन्य मान्यवर.

अनुप जत्राटकर यांच्या सन्मानचिन्ह देऊन गौरव करताना डॉ. आ.ह. साळुंखे.

अनुप जत्राटकर यांच्या एकांकिका संग्रहाबद्दल आत्मियतेने जाणून घेताना डॉ. आ.ह. साळुंखे.

कोल्हापूर, दि. २४ नोव्हेंबर: लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिका संग्रहाचे ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या हस्ते आज कारदगा येथे झालेल्या २४व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन करण्यात आले. जत्राटकर यांची ही पहिलीच साहित्यकृती आहे.
निष्पर्ण...चे मुखपृष्ठ
निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिका संग्रहात निष्पर्ण पिंपळाच्या छायेतसह असंबद्ध, आरोपी, ती यशोधरा उरली फक्त आणि कंकाली अशा विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय एकांकिका स्पर्धांमध्ये पुरस्कारप्राप्त एकांकिकांचा समावेश आहे. कोल्हापूरच्या तेजस पब्लिकेशनच्या वतीने हा संग्रह प्रकाशित करण्यात आला असून विकास प्रिंटींग अँड कॅरिअर्स प्रा. लि. येथे मुद्रण केले आहे. मीडियाटेक, कोल्हापूरचे राजेश शिंदे यांनी मांडणी केली असून माधव चांदेकर यांनी मुखपृष्ठ साकारले आहे. ज्येष्ठ अभिनेते व नाट्यकर्मी डॉ. शरद भुथाडिया यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे.
आज कारदगा येथे झालेल्या या संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी व्यासपीठावर मुनीश्री प्रसंगसागरजी महाराज, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, कारदगा साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशिद, डॉ. एन.डी. जत्राटकर यांच्यासह कारदगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा नंदिनी हेगडे, शिरोळच्या दत्त शेतकरी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रेणिक पाटील, अॅड.चंद्रकांत कोरे-रेंदाळकर, उद्योजक एस.एम. माळी, ज्येष्ठ शिक्षक एन.के. प्रताप, प्रा. प्रशांत मोरे आदी उपस्थित होते.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

ग.गो., पुढारी, बाळासाहेब अन् शिवाजी विद्यापीठ

पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव    (छाया. http://knowyourtown.co.in/ सौजन्याने)


कोल्हापूर येथून प्रकाशित होणारे महाराष्ट्रातील आघाडीचे दैनिक पुढारीचे ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेब जाधव हे आज (दि. ५ नोव्हेंबर २०१९) अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्रकारितेमधील कारकीर्दीचाही सुवर्णमहोत्सव साजरा होतो आहे. या निमित्ताने आदरणीय बाळासाहेबांना मनःपूर्वस शुभेच्छा...


सन १९३७मध्ये साप्ताहिकाच्या रुपात आणि त्यानंतर जानेवारी १९३९ पासून दैनिकाच्या रुपात सुरू झालेल्या दैनिक पुढारीने गेल्या ७५ वर्षांहून अधिक वाटचालीत स्थानिक, ग्रामीण पातळीवरील वृत्तपत्रापासून ते राज्यातील अग्रगण्य दैनिक होण्यापर्यंत केलेली वाटचाल स्तिमित करणारी आहे. या यशस्वी वाटचालीस पद्मश्री डॉ. गणपतराव गोविंदराव तथा .गो. जाधव आणि त्यानंतरच्या कालखंडात पद्मश्री डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेब जाधव यांची अपूर्व ध्येयनिष्ठा कारणीभूत आहे.
आदरणीय .गो. जाधव यांना भास्करराव जाधव, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर आदी सत्यशोधक विचारवंत, पत्रकर्त्यांचा सहवास लाभला. त्याच बरोबरीने अच्युतराव कोल्हटकर, मामा वरेरकर, मो.. रांगणेकर या जाणत्या मंडळींच्याही सहवासात वावरण्याचे भाग्य त्यांना लाभले. परिणामी, त्यांच्या सामाजिक जाणीवा विस्तारित झाल्या, जीवनाच्या चिंतनकक्षा विशाल बनल्या. दीनदलित, शोषित, उपेक्षित, श्रमिक यांच्या समस्यांनी ते अस्वस्थ बनले. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भूमिगत पद्धतीने स्वयंसेवकांना गुप्त निरोप पोहोचविण्याची जोखीम त्यांनी पार पाडलेली होती. कराडे मतवाड येथील मीठाच्या सत्याग्रहादरम्यान महात्मा गांधीजींची भेट घेऊन त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे भाग्यही त्यांना लाभले. राजकीय चळवळीत योगदान त्यांनी दिले असले तरी त्यांचा खरा पिंड तत्त्वनिष्ठ समाजचिंतकाचा होता. त्यामुळे युवक सभा भरवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला आपल्या परीने पाठिंबा देण्याचे धारिष्ट्य ते दाखवू शकले. ग.गो. जाधव यांनी आणखी एक महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य केले, ते म्हणजे राष्ट्रीय प्रवाहापासून दूर असलेल्या ब्राह्मणेतर चळवळीला समाजाला त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणून सोडले.
.गो. जाधव यांच्या पत्रकारितेला आणि उपक्रमांना नेहमीच विधायक सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान होते. त्याच्याशी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कधीही प्रतारणा केली नाही. किंबहुना, आपली सामाजिक जाणीवेची तळमळ आपल्या पुढील पिढीमध्येही त्यांनी अगदी यशस्वीपणे पेरली. त्यामुळेचपुढारीच्या यशाचा वटवृक्ष या सातत्याने बहरत आणि वृद्धिंगत होत राहिला आहे.
.गो. जाधव यांचे शिवाजी विद्यापीठावर थोर उपकार आहेत. कारण शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेच्या संदर्भातील नांदी घडवून आणण्याचे कार्य त्यांनी सन १९३३मध्येच केले होते. छत्रपती राजाराम महाराज यांच्या वाढदिवशी .गो. जाधव यांच्या 'सेवक' या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्या अंकात डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण लेख लिहीला होता. त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम शिवाजी विद्यापीठ स्थापनेच्या अनुषंगाने सूतोवाच केले होते.
त्यानंतर ग.गो. जाधव यांनी 'पुढारी'ची मुहूर्तमेढ रोवली. या नव्या दैनिकाच्या व्यासपीठावरुनही त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचा ध्यास सोडला नाही. किंबहुना, त्यासाठी जनमत संघटित करण्यामध्ये, समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळविण्यामध्ये आणि राज्यकर्त्यांना या विद्यापीठ स्थापनेचे मोल पटवून देण्याच्या कामी .गो. जाधव यांनी 'पुढारी'च्या व्यासपीठाचा पुरेपूर वापर केला. विद्यापीठ स्थापनेच्या प्रक्रियेदरम्यानही सी.रा. तावडे आदी समित्यांवरही त्यांनी जबाबदारपूर्वक काम केले. त्या माध्यमातून विद्यापीठासाठी आवश्यक पूरक व्यवस्थांची निर्मिती, जमीन अधिग्रहण, विविध विभागांची प्रस्थापना, सक्षम कुलगुरूंच्या नियुक्तीचे हिरीरीने समर्थन आदी अनेक निर्णयप्रक्रियांत सहभाग घेतला. ते तडीस नेण्यासाठी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक दबाव निर्माण केला.
Dr. Pratapsinh Jadhav
.गो. जाधव यांचे हे सामाजिक भान आणि विद्यापीठाविषयीची आत्मियता ही पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव तथा बाळासाहेबांमध्येही आपसूकच झिरपली आहे. जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेऊन, त्यासंदर्भात व्यापक सामाजिक हिताची भूमिका घेऊन लढा उभारण्याचे काम त्यांनी केले आहे. अंबाबाईच्या मंदिरात दलितांना प्रवेशासाठीची चळवळ हे त्यांच्या जबाबदार सामाजिक जाणिवेचे महत्त्वाचे लक्षण आहे, असे मला वाटते.
पत्रकारितेच्या क्षेत्रात आजचे युग हे मालक-संपादकांचे आहे. तथापि, बाळासाहेबांनी मात्र आजही एक लोकपत्रकार, लोकसंपादक म्हणून आपली प्रतिमा जपली आहे. त्या प्रतिमेला लोकांच्या प्रेमाचे वलय लाभले आहे. पुढारीचे स्थानिक लोकचळवळींना सातत्याने पाठबळ लाभते. या पाठपुराव्याच्या बळावर परिसराच्या हिताचा एखादा महत्त्वाचा निर्णय झाल्यानंतर अभिनंदनासाठी संपादकाच्या दारी रीघ लागावी, असे दुर्मिळातले दुर्मिळ चित्र कोल्हापुरात पुढारीच्या रुपाने पाहायला मिळते.
बाळासाहेबांनी ऊस, दूध, तंबाखू आदी उत्पादनांच्या संदर्भातील आंदोलनांना व्यासपीठ आणि पर्यायाने लोकसहभाग मिळवून देण्याचे काम केले. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या संदर्भातही विशिष्ट भूमिका घेऊन आंदोलनातली धग कायम राखली आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये ललित कला विभाग स्थापन व्हावा, यासाठी 'पुढारी'कारांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
बाळासाहेबांनी पुढारीची वृद्धी आणि विस्तारही अत्यंत धाडसीपणाने केला आहे. काळाची पावले ओळखून, प्रसंगी कर्ज काढून त्यांनी पुढारीचा विस्तार केला. आधुनिक नवतंत्रज्ञानाची कास धरत असताना थेट जर्मनीहून छपाई यंत्रणा मागविणारा हा अवलिया संपादक आहे. त्यांनी पुढारीचे स्वतःचे असे वितरणाचे तंत्र विकसित केले. टॅक्सीच्या माध्यमातूनगाव तिथे पुढारीअसा उपक्रम राबवून दैनिकाचा पाया प्रचंड प्रमाणावर विस्तारित करण्यात आणि भक्कम करण्यात त्यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे. आजघडीला तर ग्रामीण बागाबरोबरच राज्याच्या मेट्रो शहरांतही पुढारीच्या खपाचा आकडा वाढतो आहे, याचे श्रेय बाळासाहेबांच्या कौशल्यपूर्ण नियोजनाला व्यवस्थापनाला द्यावे लागेल.
वृत्तपत्र कार्यक्षेत्रातील प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात 'पुढारी' आपली विशिष्ट भूमिका घेऊन उतरला आहेच. पण, जिथे 'पुढारी' जात नाही, अशा ठिकाणीही त्यांनी आपल्या राष्ट्रीय कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक उभारले आहे, ते सीयाचीन येथील रुग्णालयाच्या रुपाने! सुमारे दोन कोटी रुपयांचा मदत पुनर्वसन निधी उभारून सीयाचीनसारख्या उत्तुंग थंडीच्या ठिकाणी राष्ट्रसेवा बजावत असलेल्या भारतीय जवानांसाठी हे रुग्णालय उभारून पुढारीकारांनी या मातृभूमीचे आणि तिचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांचे ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या रुग्णालयाचा लाभ आता स्थानिक नागरिकांनाही होतो आहे, ही अभिमानाची बाब आहे.
दैनिक पुढारीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोल्हापुरातले तत्कालीन एकमेव बहुजनवादी दैनिक म्हणून प्रचंड नावारुपास आले. ग्रामीण भागाच्या विकासाची आस आणि दीनदलितांच्या उद्धाराचा ध्यास घेतलेल्या पुढारीने गेल्या ८० वर्षांत आधुनिक पत्रकारितेसाठी असणारे इतर सर्व तंत्रज्ञानात्मक, विकासात्मक बदल स्वीकारले; मात्र, या दोन ध्येयांपासून कधीही फारकत घेतली नाही. सत्यशोधक चळवळीचा आत्मा जोपासत असताना समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरिती यांच्यावर कठोरपणे कोरडे ओढायला पुढारीने कमी केले नाही. त्यामुळेच पुढारीला जनमानसात इतके आपुलकीचे स्थान निर्माण झाले की, स्थानिक स्तरावर वर्तमानपत्राला 'पुढारी' हा पर्यायी शब्द रुढ झाला. 'तुमच्या घरी कुठला 'पुढारी' येतो?' असं सहजपणे एखाद्याकडून विचारणा केली जाते, इतकी त्याची मूळं खोलवर रुजली आहेत. या दैनिकाशी लोकांचे सवयीचे आणि आत्मियतेचे नाते जोडले गेले आहे.
डॉ. योगेश जाधव यांच्या रुपाने पुढारीकारांची पुढची पिढीही जोमदारपणाने पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत झाली आहे. व्यवस्थापकीय संपादक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी सुद्धा अनेक नवनवीन उपक्रम राबविण्याला आणि प्रयोगशीलतेला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचे फलित स्वरुप म्हणूनही पुढारीचा वारु राज्यभरात चौखूर उधळतो आहे. काळाची पावले ओळखून पुढारीने ऑनलाइन आवृत्तीसह स्वतःचे टोमॅटो ही एफएम वाहिनी सुद्धा कोल्हापूरकरांच्या सेवेत सादर केली आहे. या दोन्ही उपक्रमांना स्थानिकांसह जगभरातून मोठा प्रतिसाद लाभतो आहे.
या अमृतमहोत्सवी कालखंडातच शिवाजी विद्यापीठाची वर्षांपूर्वी कोल्हापुरात स्थापना झाली. विद्यापीठाशी 'पुढारी'चे एक अतूट प्रकारचे नाते आहे. या भावबंधातूनच विद्यापीठातर्फे पद्मश्री (कै.) डॉ. .गो. जाधव स्मृती व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित करण्यात येते. या व्याख्यानमालेसाठी पुढारीचा पद्मश्री डॉ. .गो. जाधव ट्रस्ट अगदी आपलेपणाने, उत्स्फूर्तपणे घरचा कार्यक्रम असल्यासारखे सर्व प्रकारचे सहकार्य रीत असतो. या व्याख्यानमालेच्या आयोजनात कोणतीही उणीव राहता कामा नये, यासाठी विद्यापीठास सर्वतोपरी सहकार्य करीत असतात. केवळ या व्याख्यानमालेपुरतेच नव्हे, तर वेळोवेळी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना, उपक्रमांना पुढारी परिवाराचे सदोदित सहकार्य लाभत असते.
त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठात पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव यांच्या स्मरणार्थ अध्यासन व्हावे, यासाठी देखील स्वतः बाळासाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा आणि सहकार्य केले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागात पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव अध्यासन स्थापन करण्यात आले. अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रत्नाकर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन जर्नालिझम या विषयामधील पदविका अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला असून या अभ्यासक्रमाची पहिली बॅचही बाहेर पडली आहे. शिवाजी विद्यापीठ आणि पुढारी यांचे साहचर्य पुढारीकारांच्या प्रेमामुळे इतक्या वर्षांत सातत्याने वृद्धिंगत झाले आहे.
बाळासाहेबांच्या अमृतमहोत्सवानिमित्त व्यक्तीगत पातळीवर तसेच शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीने सुद्धा त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन आणि दीर्घोयुरारोग्य लाभावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा!