रविवार, १९ डिसेंबर, २०२१

‘सोसायटी’ अन् समाज..!

 



माणूस हा समाजशील प्राणी आहे. माणसाच्या बाबतीत वेळोवेळी सांगितलं जाणारं एक महत्त्वाचं वाक्य आहे हे! माणसातली समाजशीलता काढून टाकली अगर निघून गेली की फक्त प्राणी शिल्लक राहतो. भारतीय घटनेनं या समाजशीलतेला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांची जोड देऊन अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक बनविलेलं आहे. मात्र, वेळोवेळी ही समाजशीलता सोडून देऊन आपण प्राणी- नव्हे, जनावर कसे आहोत, याचंच प्रत्यंतर देण्याच्या मागे आपण लागलेलो आहोत की काय, असे वाटावे, अशी परिस्थिती आपल्या भोवतालात निर्माण होऊ लागली आहे.

माणसाच्या सद्यस्थितीतील जगण्यावर आता भौतिकवाद आणि चंगळवादाची पुटंच्या पुटं चढलेली आहेत. सध्याचा कालखंडच बाजारीकरणाचा असल्यानं माणसाला जास्तीत जास्त ग्राहक म्हणूनच या बाजारात किंमत राहणार, हे वास्तव मानलं तरीही काही मूल्यं ही आपलं माणूसपण शाबूत ठेवण्यासाठी, अबाधित राखण्यासाठी आवश्यक असतात. मूल्यांची बूज ही आपल्या माणूसपणाची साक्ष देणारी महत्त्वाची गोष्ट असते. ती संपुष्टात आली की आपलं माणूसपण सिद्ध करणंच मुश्कील होऊन बसेल, असा आजचा सारा माहौल झालेला आहे.

वाढत्या नागरी वस्त्या, शहरीकरण, जगण्यासाठीची प्रत्येकाची अहमहमिका, जीवघेणी स्पर्धा या साऱ्या कोलाहलामध्ये माणूसपणाचा मागमूस हळूहळू अस्तंगत होत चालल्याचे चित्र निर्माण होते आहे. माणसांच्या आडव्या वस्त्यांनी जागा व्यापल्या, अतिक्रमल्या तेव्हा आता उंचच उंच, टोलेजंग इमारती बांधून माणूस त्या आलिशान खुराड्यांमधून कोंबड्यांप्रमाणं आपले संसार थाटू लागला. सोसायटी असंसमाजला समांतर नाव लेऊन समाजाचं जणू लघु प्रतिरुप म्हणून जिथं माणसांनी सहनिवास करणं अभिप्रेत असतं, तिथं सुद्धा तो परस्परांप्रतीचा उच्चनीचभाव, धर्म, जाती, भाषा, प्रांतादी भेदभाव जपत, जोपासत राहिला आहे. विविधतेत एकात्मतेचे सूत्र सांभाळून भेदांसह आपला देशबंधू-भगिनी म्हणून माणूस जोडला जात होता, तोवर तेही स्वीकारार्ह होते. आता मात्र आपण या भेदांच्या बाबतीत आपल्या भिंती अधिक मजबूत करीत चाललो आहोत. मनभेद निष्ठूरपणाने निर्माण करीत आहोत.

मुंबईसह बऱ्याच महानगरांमध्ये या भेदाभेदांची हद्द होताना दिसते आहे. विशेषतः मुस्लीम समाजाच्या संदर्भात हा भेद, विरोध अधिक तीव्रतर आहे. सुरवात झाली शाकाहारी सोसायट्यांच्या उभारणीपासून. काही विशिष्ट शाकाहारी समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन याची सुरवात केली आणि तिथेच सोसायटी या नावाला कलंक लावायला सुरवात केली. त्यांनी आपल्या समाजातल्या लोकांसाठी भव्य टाऊनशीप उभ्या केल्या मात्र तिथे केवळ शाकाहारी लोकांनाच बुकिंग करण्याची परवानगी दिली. यातही मेख अशी की, त्या समाजाखेरीजचे इच्छुक लोक हे काही पूर्ण वेळ शाकाहारी नव्हते अगर नसतात. आणि चौकशीअंती वस्तुस्थिती समजतेच की. त्यामुळे ना इतर समाजघटकांतील कोणी अशा सोसायट्यांच्या नादी लागले, ना त्यांनी अशा त्रयस्थ-समाजघटकांना आपल्यात सामावून घेण्यात इंटरेस्ट दाखविला. मुस्लीम समाजघटक हा तर खूपच लांबचा विषय ठरला. अशा तऱ्हेने या एकसमाजी सोसायट्या साकार झाल्या- घटनेतील तरतुदींना पद्धतशीर फाटा देऊन.

दहशतवादी घटनांमध्ये अधिकतर मुस्लीम समाजातील लोकांचा समावेश दिसून येतो, असे बेगडी कारण देत मुस्लीम समाजातील लोकांना कित्येक सोसायट्यांमध्ये फ्लॅट विकतच काय, पण भाड्यानेही देऊ नयेत, असा अलिखित संकेतच जणू रुढ झालाय. प्रत्येक दहशतवादी जसा मुस्लीम नाही, तसा प्रत्येक मुस्लीम दहशतवादी कसा ठरवू शकतो आपण? सोसायट्यांना कोणी दिला हा अधिकार? किती तरी मुस्लीम बंधू-भगिनी अत्यंत प्रगल्भपणाने विविध क्षेत्रांत आपले योगदान देत आहेत. या समाजाच्या, देशाच्या प्रगतीमध्ये आपला वाटा उचलीत आहेत. अशी वस्तुस्थिती असताना आपण मात्र धर्माच्या नावाखाली समतेच्या तत्त्वाला हरताळ फासतो आहोत, हे अन्यायकारक नव्हे काय? काही भडकाऊ लोक सामाजिक अस्थैर्य निर्माण करण्यासाठी धर्म व जातिभेदांना सातत्याने चिथावणी देत असतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे खोटेनाटे, भडक प्रचारकी साहित्य समाजमाध्यमांतून जाणीवपूर्वक गतिमानतेने पसरविले जाते. असल्या अफवेखोर साहित्याची कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवून अकारण मनामध्ये गैरसमज बाळगून त्या कलुषित दृष्टीनेच मुस्लीम समाजघटकांकडे पाहिले जाते. या संपूर्ण समाजाला एकाच पारड्यात तोलून आपण किती घनगंभीर चूक करतो आहोत, माणुसकीला हरताळ फासतो आहोत, याची मूलभूत जाणीवच खुंटते तिथे. समाजासमाजामध्ये तिरस्काराची, द्वेषाची, भेदभावाच्या भावनेची दरी निर्माण होण्यास, ती जाणीवपूर्वक वाढवित नेण्यास जर मूलतः आपणच कारणीभूत ठरतो आहोत, तर उद्या मुस्लीम लोक हे त्यांची त्यांची स्वतंत्र वस्ती थाटतात, त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र कॉलन्या, सोसायट्या निर्माण करतात, असल्या वावदुक आरोपांचे आरोपण आपण त्यांच्यावर करीत असताना प्रत्यक्षात ते बोट आपण आपल्याकडेच करायला हवे. शेवटी तीही माणसंच आहेत, त्यांनाही राहायला चांगलं घर, चांगली वस्ती, चांगली सोसायटी हवी आहे. तुम्ही नाकारत राहाल, तर ते स्वतःच्या स्थापन करणारच ना! मात्र, असे करीत असताना आणि त्यांना तसे करायला भाग पाडत असताना दोन्हीकडच्या सोसायट्या खऱ्या अर्थाने स्वतःला समाज म्हणवून घेण्यास पात्र असतील का, याचा विचार कोणत्या समाजाने करायचा मग?

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

चल उचल कबीरा तेरा भवसागर डेरा...!

 



महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांचे स्मरण करीत असताना त्यांनी आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत ज्ञानार्जनाशी जे दृढ नाते जपले, त्याचेच मला स्मरण होत राहते. बाबासाहेबांचा १ डिसेंबर ते ५ डिसेंबर १९५६ या कालावधीतील दिनक्रम किंवा त्यांनी केलेली कामे पाहता ते अखेरपर्यंत या ज्ञानसाधनेत किती निमग्न होते, याचीच प्रचिती येत राहते. त्यांचे ग्रंथप्रेम, बुद्धाप्रती निष्ठा, लेखनासक्ती या सर्वांची प्रचिती देणारे हे पाच दिवस आहेत. बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने बाबासाहेबांच्या जीवनकार्याची पारायणे तर करायलाच हवीत, मात्र या अखेरच्या क्षणांचेही स्मरण करून त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रतिबद्ध होणे आवश्यक आहे.

१ डिसेंबर रोजी बाबासाहेब दिल्लीतल्या मथुरा रोडवर भरविण्यात आलेले बुद्धिस्ट आर्ट्स एक्झिबिशन पाहण्यास गेले होते. प्रदर्शन पाहून झाल्यानंतर तेथेच आपल्या मोटारीत बसून पुस्तक वाचत होते. त्यावेळी तेथे सोहनशास्त्री आले. त्यांना पाहून बाबासाहेबांनी हसून विचारले, काय शास्त्री? काय पाहिले प्रदर्शनात?” यावर शास्त्री उत्तरले, बाबासाहेब, सर्व प्रदर्शन पाहिले व ते मला आवडलेही! पण बाबासाहेब, बुद्धाचे पुतळे अनेक आहेत आणि प्रत्येकात बुद्धाचे अवयव निरनिराळ्या आकाराचे. हे कोडे मला उलगडत नाही. यावर बाबासाहेब थोडे हसून म्हणाले, हे कोडे आहे खरे! पण, ते फारसे कठीण नाही. बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर सुमारे सहाशे वर्षांनी बुद्धाचे पुतळे बनविण्याची प्रथा सुरू झाली. श्रेष्ठतम पुरूषांच्या अवयवांची जी वर्णने आहेत, त्यात मोठ्या आकाराचे कान, आजानुबाहू, कुरळे केस, गोल चेहरा, भव्य कपाळ इत्यादिकांचा समावेश होतो. ही वर्णने परंपरेने लोक ऐकत आले आणि चित्रकार, शिल्पकार त्या वर्णाबरहुकूम पण स्वतःच्या प्रतिभेची जोड देऊन अशा श्रेष्ठतम पुरूषांची चित्रे व शिल्पे तयार करू लागले. बुद्धाची चित्रे व त्यांचे पुतळे त्यांच्या नंतरच्या सहाशे वर्षांतील कलावंतांनी तयार केले. भारतीय कलावंतांनी बुद्धाचे अवयव भारतीय पद्धतीने काढले. चिनी, जपानी, सिलोनी, तिबेटी वगैरे कलावंतांनी त्यांच्या त्यांच्या देशांतील पुरूषश्रेष्ठांचे अवयव बुद्धाला दिले. यामुळे बुद्धाची चित्रे व त्यांचे पुतळे यांत अवयवांचे निराळेपण प्रेक्षकांना ठळक दिसून येते. सिद्धार्थ गौतम हा अत्यंत देखणा होता. ते देखणेपण जसेच्या तसे कोणत्याही कलावंताला रेखाटता येणे अशक्य आहे. आपण बुद्धाची चित्रे व पुतळे यांकडे लक्ष न देता त्याची तत्त्वे व शिकवण यांकडे सर्व लक्ष केंद्रित केले पाहिजे. बाबासाहेबांचा हा खुलासा ऐकून सोहनशास्त्री खूष झाले. त्यांच्याशी गप्पा आटोपून बाबासाहेबांनी ड्रायव्हरला मोटार कॅनॉट प्लेस रोडवरील बुक डेपोकडे घेण्यास सांगितले. तिथे १५-२० मिनिटे त्यांनी ग्रंथ पाहिले व ५-७ ग्रंथ खरेदीही केले.

रविवारी, २ डिसेंबरला सकाळीच चहा घेऊन कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल ग्रंथातील संदर्भित मजकूर परत डोळ्यांखालून घालून बुद्ध अँड कार्ल मार्क्स या आपल्या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. लिहीलेल्या मजकुराची पाने ते नानकचंद रत्तू यांच्याकडे टाईपिंगला देत होते. संध्याकाळपर्यंत हे काम चालले.

संध्याकाळी दिल्लीतील अशोकविहार महरौली येथे तिबेटचे दलाई लामा यांच्या सत्काराचे आमंत्रण होते. तेथे बाबासाहेब उपस्थित राहिले. समारंभानंतर बरेच लोक बाबासाहेबांना भेटावयास त्यांच्या बंगल्यावर आले. वऱ्हांड्यात खुर्च्या मांडलेल्या.बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी काय केले पाहिजे, हा चर्चेचा मुख्य विषय होता. रात्री आठनंतर लोक निघाले. बाबासाहेबांनी तेथे हलके भोजन घेतले. माझ्या हयातीत माझे हे ग्रंथ प्रकाशित होतील का? बौद्ध धम्माचा प्रसार जोरात चालेल का?” याबाबत नाकचंदांशी तळमळीने बोलत राहिले. साडेदहाच्या सुमारास झोपी गेले.

सोमवारी, ३ डिसेंबरला पुन्हा लिहावयास बसले. संध्याकाळी ती पाने नानकचंदांकडून टाईप करवून घेतली. संध्याकाळी आपल्या आजारी म्हाताऱ्या माळ्याला पाहण्यासाठी त्याच्या खोलीवर गेले. माळी बाजल्यावर पडलेला. अंगात ताप आणि खोकल्याने हैराण, अशी त्याची अवस्था. त्याची वृद्ध पत्नी शेजारी बसलेली. बाबासाहेबांना पाहताच माळी उठण्याचा प्रयत्न करू लागला. बाबासाहेबांनी त्याला उठू दिले नाही. त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला, तेव्हा माळ्याच्या डोळ्यात पाणी तरळले. तो गहिवरुन म्हणाला, आज प्रत्यक्ष भगवान माझ्या झोपडीत आला. त्याने आपल्या दोन्ही हातांनी बाबासाहेबांचे हात पकडून आपल्या कपाळाला लावला अन् रडू लागला. त्याची पत्नीही रडू लागली. बाबासाहेब म्हणाले, असे कशाला रडायचे?” माळी म्हणाला, भगवान, मी आता एक-दोन दिवसांचाच सोबती आहे. मला मृत्यूच्या अगोदर भगवानाचे दर्शन झाले, हे माझे महाभाग्यच. बाबासाहेब म्हणाले, अरे रडू नका. औषधोपचार करा. मी औषध पाठवून देतो. मृत्यू टाळता येत नाही, पण औषधोपचाराने थोडा आराम मिळतो व काही काळ पुढेही ढकलला जातो. मृत्यूला का एवढे भितोस? सर्वांना कधी तरी मरायचेच आहे. मलाही मरायचे आहे. मरण कोणाला चुकविता येत नाही. तू सांत हो व मी पाठवितो ते औषध घे. असे दिलासादायक बोलून बाबासाहेब तेथून निघाले आणि माळ्याला लागणारी औषधे केमिस्टकून मागवून त्याच्याकडे पोहोचती केली.

१६ डिसेंबरला बाबासाहेबांनी मुंबईला दीक्षा समारंभ भरविण्याचा कार्यक्रम ठरविला होता. त्यासाठी बाबासाहेबांनी रेल्वेची चार फर्स्ट क्लासची तिकीटे काढावयास सांगितली होती. ती मिळत नसल्याचे नानकचंदांनी सांगताच १४ डिसेंबरला बाबासाहेब व माईसाहेब यांची विमानाची व इतरांची मिळेल त्या रेल्वे तिकीटाची व्यवस्था करायला सांगितले. त्यावेळी लॉनवरच्या खुर्च्यांवर माईसाहेबांचे वडील, बंधू व डॉ. मालवणकर बसले होते. बाबासाहेबांचा मूडही चांगला होता. तेव्हा मेव्हण्याने निरानिराळ्या कोनांतून त्यांचे फोटो घेतले.

मुंबईतील समारंभावेळचा मुक्काम बॅ. समर्थ यांचे चुलत चुलते कुमारसेन समर्थ यांच्याकडे करण्याचे बाबासाहेबांनी ठरविले होते. ते जमत नसेल तर त्या चार दिवसांच्या राहण्याची व्यवस्था बॅ. समर्थ यांच्या घरी करावी, असे पत्र बाबासाहेबांनी नानकचंदांना टाईप करायला सांगितले आणि त्यावर स्वाक्षरी करून ते सकाळी पोस्टात टाकायला सांगितले.

त्यानंतर बुद्ध अँड कार्ल मार्क्स या ग्रंथाचा बराचसा मजकूर व आलेल्या पत्रांना द्यावयाची उत्तरे यांचा मजकूर नाकचंद टाईप करीत बसले. माईसाहेबांचे वडील, बंधू व सामराव जाधव या तिघांनी त्याच रात्री मुंबईस जायचे ठरविले व ते स्टेशनवर गेले. बाबासाहेब झोपी गेल्यानंतरही नानकचंदांनी हातातील टाइपिंग संपवून ते कागद टेबलावर नीट ठेवले व रात्री एक वाजता तेथेच झोपले.

४ डिसेंबरला बाबासाहेब सकाळी पावणेनऊच्या सुमारास उठले. नानकचंदांनी रात्री टाइप केलेल्या पत्रांवर सह्या घेतल्या व दहा वाजता बाहेर पडले. सकाळी ११ वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी जैन व बौद्ध धर्मांतील तत्त्वांची सम व विषम स्थळे याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. या बाबतीत अधिक विचारविनिमय व्हावा व दोन्ही धर्मांतील लोकांचा मिलाफ व्हावा, यासाठी योजना आखावी, अशी त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली. बाबासाहेब म्हणाले, उद्या रात्री साडेआठनंतर आपण यावर अधिक चर्चा करू. दुसऱ्या दिवशी येण्याचे आश्वासन देऊन ती मंडळी बाहेर पडली. त्या संध्याकाळी बाबासाहेबांनी काही पत्रे स्वतः लिहीली. त्यापैकी एक आचार्य अत्रे यांना व दुसरे श्री. एस.एम. जोशी यांना होते. शिवाय, रिपब्लिकन पक्षाचे ध्येय, धोरण, कार्यक्रम वगैरे मुद्यांसंबंधी माहिती देणारा १०-१२ पानांचा इंग्रजी मजकूर; ब्रह्मदेशाच्या सरकारने भारतात बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी सहाय्य करावे, अशा अर्थाचे त्या सरकारास पत्र- असे सर्व लिखाण बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ते तयार करून ते टाइप करावयास नानकचंदांकडे दिले. व १६ डिसेंबरच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेसंदर्भात पत्र लिहायलाही सांगितले.

दि. ५ डिसेंबर १९५६ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कार्यालय सुटल्यावर नानकचंद बंगल्यावर आले. तसा साहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. बाबासाहेबांना झोप लागत नव्हती. थोडेसे अस्वस्थ होते. अशाही परिस्थितीत मधूनमधून बाबासाहेब बुद्ध अँड कार्ल मार्क्स या ग्रंथाचा मजकूर लिहीत, त्यामुळे त्यांच्या हातून तीन-चारच कागद लिहून झाले होते. नानकचंदांना बाबासाहेबांचा चेहरा म्लान झालेला व ते अस्वस्थ असलेले दिसले. साहेबांनी त्यांच्याकडे लिहीलेले कागद टाईप करायला दिले आणि बिछान्यावर जाऊन पडले.

आधीच ठरल्याप्रमाणे थोड्याच वेळात जैन धर्माचे लोक चर्चा करण्यासाठी दाखल झाले. त्यांनी नानकचंदांजवळ भेटण्यास आल्याचा निरोप बाबासाहेबांना दिला. मी फार थकलो आहे, त्यांना उद्या बोलाव, असे ते म्हणाले; मात्र, लगेच मी एक पाच-दहा मिनिटांनी खाली येतो. त्यांना बसायला सांग. असे सांगितले. थोड्या वेळाने नानकचंदांचा आधार घेऊन ते बाहेर वऱ्हांड्यात पाहुण्यांशी बोलावयास येऊन बसले. त्या दोन जैन व्यक्तींनी बाबासाहेबांना उत्थापन देऊन नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी, ६ डिसेंबरला जे जैनांचे संमेलन भरणार आहे, त्यातील जैन मुनींबरोबर बौद्ध धम्म व जैन धर्म यांचे ऐक्य व्हावे, याबद्दल बाबासाहेबांनी चर्चा करावी, अशी इच्छा प्रदर्शित केली आणि श्रमणसंस्कृति की दो धाराएँ- जैन और बौद्ध ही पुस्तिका भेट दिली. उद्याच्या चर्चेसंबंधी नक्की वेळ ठरवू या, या जैन गृहस्थांच्या बोलण्यावर बाबासाहेबांनी त्यांना चिटणीसांना फोन करून शक्यतो संध्याकाळची वेळ घेण्यास सांगितले. कारण सकाळी त्यांना जमणार नव्हते. ते लोक निघून गेल्यानंतर बाबासाहेब तेथेच थोडा वेळ डोळे मिटून बसून राहिले आणि हळू आवाजात बुद्धम् शरणम् गच्छामि त्रिसरण म्हणू लागले. त्यानंतर नानकचंदांना बुद्ध भक्तिगीते ही रेकॉर्ड लावायला सांगितली व त्या गीतांबरोबर स्वतःही गुणगुणू लागले. नोकराने जेवणास बोलावले, तेव्हा जेवणाची इच्छा नाही म्हणाले. पुन्हा नानकचंदांच्या आग्रहाने जेवावयास उठले. डायनिंग हॉलचा मार्ग ड्राईंग रुममधून जात होता. त्या हॉलच्या दोन्ही बाजूंना भिंतीच्या कडेने ग्रंथांची कपाटे ओळीने लावलेली. ग्रंथांनी खच्चून भरलेली कपाटे. ग्रंथांनी भरलेले स्टँड्स. त्यातील एक ग्रंथ घेऊन बाबासाहेबांनी तो उघडला. तो ठेवून दुसरी अलमारी उघडून त्यातील अत्यंत दुर्मिळ पुस्तकांतील काही ग्रंथ काढून नानकचंदच्या हातात दिले. त्या अलमारीच्या बाजूच्या अलमारीत कायद्याची, त्यापुढच्या अलमारीत समाजशास्त्राची, त्याच्या बाजूला तत्त्वज्ञानाची, पुढे अर्थशास्त्र, त्यापुढे राजकारणाची, त्याच्या बाजूला चरित्रग्रंथ होते. आपले हे सर्व अद्यावत  ग्रंथभांडार पाहून त्यांनी एक दीर्घ निःस्वास सोडला. हळूहळू चालत डायनिंग टेबलला येऊन बसले. दोन घास खाल्ले व पुन्हा हॉलमध्ये येऊन बसले. नानकचंदला डोकीला तेल लावून मसाज करायला सांगितले. मसाज संपल्यावर काठीच्या सहाय्याने उभे राहिले आणि एकदमच मोठ्याने म्हणाले, चल उचल कबीरा तेरा भवसागर डेरा...

परत हॉलमधून आपल्या ग्रंतांकडे पाहात बिछान्याकडे आले आणि आडवे झाले. नेहमीप्रमाणे नानकचंद पाय चोळू लागले. त्यावेळी मघाशी कपाटातून काढलेली पुस्तके चाळून पाहू लागले. टेबलावर पुस्तकांशिवाय काही ग्रंथांची टिपणे, लिहीलेली प्रकरणे, टाईप केलेला मजकूर यांची ढीग पडलेला होता. बाबासाहेब थकलेले दिसत होते. चेहराही निस्तेज झाला होता. त्यांना झोप येऊ लागली, तेव्हा नानकचंदांनी जायची परवानगी मागितली. तेव्हा ते म्हणाले, जा आता. पण उद्या सकाळी लवकर ये. लिहीलेला मजकूर टाइप करावयाचा आहे. नानकचंद निघाले, तेव्हा रात्रीचे ११.१५ झाले होते. इतक्यात सुदामने त्यांना साहेब बोलावत असल्याचे सांगितले. ते गेले असता म्हणाले, अरे ती अत्रे आणि एस.एम. जोशींना लिहीलेली पत्रे आणि बुद्ध अँड हिज धम्म हे सर्व इथे माझ्याजवळ ठेव. त्यावरुन मला दृष्टी फिरवायची आहे. नानकचंदने त्याप्रमाणे केले व ते जायला निघाले तेव्हा ११.३५ झाले होते.

नानकचंदांनी उद्धृत केलेला बाबासाहेबांच्या आयुष्यातला हा अखेरचा संवाद होय. दुसऱ्या दिवशी, ६ डिसेंबरला बाबासाहेब उठलेच नाहीत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त या महामानवास कोटी कोटी प्रणाम!!!


रविवार, ५ डिसेंबर, २०२१

पदाई!


 

पदाबाई जत्राटकर



(ज्येष्ठ पत्रकार श्री. सुभाष धुमे यांच्या 'व्हिजन २०२१' या दसरा-दिवाळी विशेषांकासाठी माझी आजी पदाबाई जत्राटकर हिच्या काही स्मृतींना उजाळा देता आला. आज, रविवार, दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी तिचा दुसरा स्मृतिदिन... या निमित्त हा लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी साभार पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

पदाई... माझी आजी... वडिलांची आई... तिला जाऊन आज, ५ डिसेंबरला दोन वर्षं होताहेत... एक अत्यंत संपृक्त, समाधानी आयुष्य जगून वयाच्या साधारण १०३ ते १०५ या दरम्यान ती गेली... हे वयही तिच्या सगळ्या पिढीसारखं अंदाजानंच काढलेलं आम्ही... राजर्षी शाहू महाराजांच्या काळात आलेल्या महामारीची आठवण आपल्या अगदी सुरवातीच्या आठवणीपैकी एक असल्याचं ती सांगायची... त्यावेळी तिचं वय कळतं अर्थात पाचेक वर्षे असं गृहित धरून आम्ही तिच्या वयाचा ठोकताळा मांडलेला... म्हणून आम्ही ते वय १०३ इतकं मानलेलं... निपाणीत बाबासाहेबांना तिनं सभेत पाहिलेलं... म्हणूनही ती मला भारी वाटायची... ती कधी बोलता बोलता एकदमच कुठल्याही काळात जायची आणि आमच्यासमोर त्या काळाचा पट उलगडला जायचा... तिच्या अंगानं तिला आठवेल तसं उमजलेलं, उमगलेलं सांगत राहायची... आम्ही ऐकत राहायचो... बंधू अनुपनं एकदा त्याच्या स्टुडिओत तिला कॅमेऱ्यासमोर बसवून तिला तिच्या जन्मापासूनच्या आठवणी सांगायला लावल्या होत्या... पण, म्हातारीला कॅमेऱ्यासमोर तसं संगतवार काही सांगता येईना... अखेरीस अनुपने तिच्यासमोर हात टेकले... दोघे स्टुडिओतून खाली आले... आणि बसल्यानंतर मग पुन्हा म्हातारीची तार लागली आणि सांगू लागली काही गोष्टी खुलून खुलवून... अनुपनं कपाळावर हात मारुन घेतला... अशी आमची आजी!

मूळची शिरगुप्पीची पदाबाई... किती तरी वर्षांपूर्वी जत्राटच्या दत्तूची बायको म्हणून घरात आली... घरात एक-दोन म्हसरं, म्हारकीची एक पट्टी आणि तिच्या आज्जेसासऱ्यानं- रामानं गावच्या इनामदाराकडनं जितल्याली दुसरी एक शेताची पट्टी... इनामदारानं पैज ठेवल्याली... लोखंडाचा तापलेला गोळा हातातनं पडू न देता जिथवर जो कोणी जाईल, त्येवढी जमीन त्येला बक्षीस... रामा पैलवान गडी... विडा उचलला आणि लोखंडाचा तापलेला गोळा बी... हातात गोळा फिरवत पळत सुटला आणि जवळ जवळ बारा गुंठं जमीन बक्षीसात मिळवली... ह्यो किस्सा म्हातारीनंच कवा तरी सांगितलेला... ह्या दोन तुकड्यांत शेती पिकवली तरी भागायचं न्हाई... मग, आपली शेती करून पदाबाई दुसऱ्याच्या शेतात बी राबायची... शेतीचा सीझन सपला की दत्तू गावच्या बँड पथकात कलाट वाजवायचा... त्यो एक येगळाच नाद व्हता त्येला... पण, त्यातनं कमाई पन बरी व्हायची. कुटुंबाला हातभार व्हायचा... त्येची आई निलारानी... एकदम खवाट अन् कडक म्हातारी... पदाबाईवर तिचा वचक भारी... पण तीही सासूच्या तालमीत तश्शीच, तिच्यासारखीच तयार होत होती... हळूहळू पदाबाई साऱ्या भावकीची अन् गावची सुद्धा पदाई कधी झाली, ते तिचं तिलाही समजलं नाही... तंगू, तारू ह्या तिच्या वारकीच्याच सख्या... पण, त्या तारवाक्का न् तंगवाक्का झाल्या... आदराचं आईपण मात्र माझ्या ह्या आज्जीनं मिळवलेलं... ते सन्मानाचं पद तिनं शेवटच्या क्षणापर्यंत चालवलं, गाजवलं अन् टिकवलं...

पदाईचं दुःख एकच होतं... जल्मल्यालं मूल एक दीड वर्षाचं होईस्तोवर जगायचं अन् कुठल्या कुठल्या आजारानं अचानकच दगावायचं... चार-पाच पोरं तिची तशीच गेलेली... त्यानं ती खचलेली... दरम्यानच्या काळात निला म्हातारी पण गेलेली... मग शेवटी तिनं गावच्या जंगलीसायबाला नवस बोलला... त्या नवसानं एक ल्येकरू झालं... नवसाचं म्हणून त्याचं कान-नाक टोचल्यालं... घाबरून पदाईनं त्येचं लवकर नाव पण ठेवलं न्हाई... पन, पोर मोठं होऊ लागलं... आणि सासूच्या नावावरनंच पदाईनं त्येचं नाव ठेवलं निलाप्पा म्हणून... गावच्या शाळेत आलेल्या सिदनाळे मास्तरच्या धाकानं गावातले मायबाप पोरास्नी शाळंत पाठवू लागली... सगळ्या समाजाची, जातीधर्माची पोरं एका वर्गात शेजारी शेजारी बसून शिकू लागली... निलाप्पा म्हणजे नवसानं जगल्यालं, जगवल्यालं पोर, म्हणून पदाई त्याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायची... तिकडं निलाप्पाला पण शाळेची गोडी लागली... मास्तरांचा सहवास आवडू लागलेला... त्यांचं शिकवणं आवडू लागलेलं... निलाप्पाचं बोरूचं अक्षर एकदम दृष्ट लागावं असं... गुरूजी घोटवूनच घ्यायचे तसे... पदाईला बुकातलं काय कळत न्हवतं, पन गुरूजींवर, शाळेवर तिचा ईस्वास दांडगा... बाबासाहेबांनी पन तसंच सांगितलेलं, तिला आठवायचं... पोराला शिकवायचं, एवढं तिनं ठरवलेलं... किती, केवढं?.. तिला तर कुठं ठावं होतं... पण, ठरलंवतं एवढं नक्की... निलाप्पानं एकदा तिला विचारलंवतं... आई, मी केवढं शिकू? ... त्यावर पदाईच्या तोंडून शब्द उमटल्याले- बंदा रुपाया शिक!’… चवली-पावलीच्या जमान्यात राहणाऱ्या पदाईला शिक्षण कळत न्हवतं, पण व्यवहार समजे... त्यातनंच आपल्या पोरानं बंदा रुपायाएवढं, म्हणजे एकदम स्टँडर्ड, मोठ्ठं शिकावं, भरघोस शिकावं, ही भावना तिच्या त्या उद्गारातनं प्रकट झालेली...

घरची परिस्थिती, कमवायचं अन् खायचं अशीच... दाल्ला बँड घ्येवून पंचक्रोशीत लोकांच्या कार्यातनं वाजवत फिरायचा... सुपाऱ्या घेऊन गेला की दिवसच्ये दिवस तिकडंच... आला की विडीकाडीचा खर्च ठेवून घेऊन घरखर्चाला द्यायचा... पदाई त्यातही काटकसरीनं टुकीचा, नेटका संसार करायची... कधी कधी घरात खायला काहीच नसायचं... थोडी शाळू सापडायची... ती दळून तिचंच पिठलं, तिचीच भाकर पोराला खाऊ घालून शाळेला पाठवायचं आणि आपण पोटभर पाणी पिऊन दुसऱ्याच्या शेतात भांगलायला जायचं... दिवसभर काम करून दिवसाची कमाई, शेतमालकानं दिलेल्या थोड्या शेंगा किंवा शाळू घेऊन घरी परतायचं आणि मग लेकराला पुन्हा गरम गरम खाऊ घालायचं...

एक दिवस तर घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता... चाणाक्ष निलाप्पाच्या ते लक्षात आलं... आईला आपल्यासाठी काही तजवीज करावी लागू नये, म्हणून तो सकाळच्या पारीच घरातनं गायब झाला... पदाईला काही समजंना, पोर गेलं कुटं? दप्तरबी न्हाई नेल्यालं. ग्येला आसंल कुठं तरी हुंदडायला म्हणून तिनं विषय सोडून दिला... पाणी पिऊन कामावर गेली... संध्याकाळी घरी आली, तरी पोराचा कुठं पत्त्या न्हाई... सगळ्या गावातनं फेरफटका मारला, तरी कुठं दिसंना... पदाई कंटाळून शेवटी घराकडं परतली... न्हाई म्हटलं तरी रागाचा पारा आता तिचा चढलेलाच... त्येवढ्याच निलाप्पा हळूच घरात आला... सदऱ्याचा वटा करून त्यात भरतील त्येवढ्या आणि खिसं भरून आणलेल्या शेंगा आईच्या पुढ्यात रिकाम्या केल्या... दुसऱ्या खिशातनं एक मूठ काही तरी काढलं आणि तेही आईसमोर धरलं... त्यानं मूठ उघडली तर काही पैसे होते... पदाईला काय समजंना... ती फक्त एवढंच विचारती झाली, कुटं गेल्तास रं ईळभर? मी गावभर हुडकून आलो. निस्ता जिवाला घोर लागलावता..घरातली परिस्थिती बघून निलाप्पा त्या दिवशी आई कामाला जाते, त्याच्या बरोब्बर उलट्या दिशेच्या रानात कामाला गेलावता. दिवसभर उपाशी पोटानं त्येनं पन त्या शेतात शेंगा उपसायचं काम केलं. शेंगांचा ह्यो ढीग लावला. तवा कुटं सांच्याला त्येच्या हातात दिसभराची मजुरी आणि त्या वटाभर शेंगा मिळाल्यावता. त्ये समदं घिऊनच त्यो घराकडं आल्ता. पदाईला जसं त्येनं ह्ये सांगितलं, तसं तिच्या डोळ्याला धारा लागल्या. लेकराला जवळ घिऊन तिनं कुरवाळलं. म्हणाली, आज कामाला ग्येलास ते ठीक. खरं, परत पुन्यांदा असं जाऊ नकोस. आपल्याला चांगली साळा शिकून मोटं व्हायचाय. मजूर न्हाई. मी लागंल तेवढं कष्ट करीन, खरं तू शिकायचं निस्त. पदाईनं तिच्या कष्टाचा आवाका आणखी वाढवला. तारवाक्काच्या संगतीनं तंबाखू इकायला ती तळकोकणाकडं चालत जाय लागली. दोघी संगती संगतीनं कधी पायवाटनं, कधी जंगलातनं वाट काढत जायच्या. डोक्यावर, काखंत तंबाखूचं वज्झं लादून लिंगनूर, सुरुपली, कुरुकली, मुरगूड, गारगोटी, आजरा असं करत करत माल संपेस्तोवर विकत जायच्या. डोईचं वज्झं असं हलकं करून पुन्हा येताना तिकडनं तांदूळ घिऊन यायच्या. त्येची तर कथाच हाय. बाँड्रीवरनं तपासनीस तांदळाचं ट्रक अन् ट्याम्पो पास करायचीत. अन् ह्या बाया, जे दोन-पाच किलो घिऊन यायच्या, त्ये जप्त करायचीत. मग, त्यास्नी हुलकावनी द्येत, आडवाटंनं, जंगलातनं जीव आणि तांदूळ दोन्ही वाचवत ह्या दोघी बाँड्री क्रॉस करायच्या अन् मग कुटंबी न थांबता, कुणाच्या नजरेत न येता बिगीबिगी गावाकडं परतायच्या.

ह्याच दरम्यान पदाईच्या काळजाचा ठोका चुकवनारी आणखी एक घटना घडली. निलाप्पा सुट्टीचा एकदा गेल्ता नदीवर पवायला. नदीवर पवायला जाणं, ही तवा क्वामन गोष्ट व्हती. तसा त्यो व्हता पण पट्टीचा पवणारा. नेहमीप्रमानं तो गेला पवत पवत नदीच्या मध्यात. पण, कधी नव्हं ते घावला भवऱ्यात. लागला गटांगळ्या खायाला. सोबतच्या मैतरांनी बोंबाबोंब करून समदा गाव उठवला. दोनी काठांवर गावातल्या लोकांनी गर्दी क्येली. कोन, कुनाचा पोरगा म्हणून विचारणा झाली. पदाईचं एकमेव नवसाचं पोर आता एवढं मोठं होऊन हातातनं जातंय का काय, अशी अवस्था झालेली. समद्या गावाचाच जीव घुटमळल्याला. त्या गर्दीतनं पदाई वाट काडत काठावर आली आणि समोरचं दृश्य बघून तिनं तिथं बसकणच मारली. रडाय-आरडाय लागली. कुनी तरी वाचवा माझ्या लेकराला, विनवू लागली. पण, भवऱ्यात जायाचं धाडस करणार कोण? आता ह्यो काय वाचत न्हाई, असंच वाटू लागलेलं. तेवढ्यात जीव खाऊन भवऱ्याबरोबर झटापट करणारा निलाप्पा त्यातनं बाहेर निघाला खरा; पण, धारंला लागला. वाहून जाऊ लागला. तिथनं फुडं काही अंतरावर गावातल्या काही म्हशी पाण्यात डुंबायला सोडल्या व्हत्या. त्यात रखमी नावाची एक सगळ्यात आक्रस्ताळी आन् मारकी म्हस हुती. ती रस्त्यावर दिसली की पोरासोरांचीच काय, बायाबापड्यांची पण तारांबळ उडायची. रखमी कवा काय करंल, कवा ढुशी मारंल, काय नेम नसायचा. तिची शिंगं बी तशीच लांबसोर अन् धडकी भरवणारी निमुळती होती. अशी रखमी पन त्यात पवत हुती. धारंला लागल्याला निलाप्पा नेमका त्या म्हशींच्या टप्प्यात आलेला. आणि त्यातबी नेमकी रखमीच त्याच्या पुढ्यात व्हती. गाव हे सारं बघत होता. निलाप्पा येक वेळ पाण्यापास्नं वाचंल, खरं आता रखमीच्या तावडीतनं काय सुटत न्हाई, आसंच वातावरण निर्माण झालेलं. पदाईनं तिथनंच रखमीला शिव्यांची लाखोली वाहायला सुरवात केली. सारा गाव जीव डोळ्यात आणून आता काय व्हतंय म्हणून माना उंचावून टकामका बघू लागला. इकडं निलाप्पाचा जीव घाबरा झालावता, खरं त्येनं धीर सोडला न्हवता. भवऱ्यात हातपाय मारुन पेटकं आल्यालं. दमछाक झालेली. त्येला कशाचा तरी आधार हवा होता. तो रखमीच्या रुपानं त्येला समोर दिसत व्हता. रखमी जणू काही त्येला आधार द्यायलाच प्रवाहाच्या मध्यात थांबल्याली. रखमीजवळ पोचताच त्येनं पुढं हून गापकन तिची दोन्ही शिंग धरली आन् तिच्या पाठीवर त्येनं स्वतःला झोकून दिलं. रखमीच्या मानंला कवळा घालणाऱ्या निलाप्पाला बघून इकडं काठाला गावाचाच जीव जणू गळ्याला आलंला. पदाईनं तर गापकन डोळंच मिटून घेतलं. पन, कशी कोण जाणे, रखमीनं जरा उगंच मान हिकडं तिकडं हलवल्यागत केलं आणि आपली आंघुळ सोडून तिनं थेट काठाकडं पवत यायला सुरवात क्येली. ह्ये आक्रित समदा गाव बघत हुता. रखमी काठावर आली, तोवर निलाप्पाच्या बी जीवात जीव आलेला. जरा दम गेल्यानं हुशारी आलेली. काठ दिसल्याबरोबर त्येनं रखमीच्या पाठीवरनं खाली उडी मारली. रखमीनं पन एकवार त्येच्याकडं वळून बघितलं आन् पुन्हा हुंदडत आपल्या नेहमीच्या तालात घराकडं चालायला सुरवात केली. साऱ्या गावानं जल्लोष केला. एरव्ही रखमीच्या वागणुकीसाठी सगळ्यांच्या शिव्या खाणाऱ्या रखमीच्या मालकाला बी भरून आलं. त्यो तिकडं पळत जाऊन रखमीच्या गळ्यात पडून रडाय लागला. हिकडं निलाप्पा जे पळत सुटला, ते थेट पदाईच्या कुशीत शिरून रडाय लागला. मायलेकरांच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागलेल्या. सारा गाव हे दृश्य डोळं भरून पाहात होता. तिथनं फुडं जवा शक्य आसलं तवा पदाईच्या हातचा घास रखमीसाठी धाडला जाऊ लागला. निलाप्पाचं पवणं मात्र आता नदीच्या मध्यातनं काठावर आल्यालं. पदाईची तशी सक्त ताकीदच हुती त्येला!

पदाईचा संसार असा चाललेला. तशी ती वांडच हुती. भावकीवर शब्द चालवायची. शांत स्वभावाचा दत्तूही तिचा शब्द पडू द्यायचा नाही. आपली बाय संसार एकहाती सांभाळतीया म्हणून समदं ब्येस चालू हाय, ही त्येची भावना हुतीच. पन, कधी शब्दाला शब्द लागला तरी तिच्याफुडं आपलं काय चालत न्हाई, ह्येबी आता त्येला अनुभवानं कळून चुकलं हुतं. त्यो आता त्याच्या ब्यांड पथकात चांगलाच रमला व्हता. मागणी पण चांगली हुती. हुन्नरगीच्या ब्यांडापरास आपलं वाजवनं चांगलं व्हायला पायजे. त्येंच्याइतकी मागणी आणि दर आपल्याला मिळायला पायजेल, अशी ईर्ष्या त्यो आपल्या पथकात पेरत असायचा. त्या दिशेनं त्यांचं वाजाप चाललं पण होतं. हुन्नरगीयेवढी नसली तरी त्यांना पर्यायी म्हणून मागणी येत हुती. यातनं आणखी चांगलं दिवस येतील, अशा भावनेतनं काम करत हुता.

निलाप्पा नव्वी-धावीला आसंल, तवा आधनंमधनं पोटात दुखतंय म्हणून दत्तू तक्राद करायचा. खाणं वेळी-अवेळी, त्यात कलाट वाजवून पोटावर ताण यायचा, त्यातनं दुखत आसंल म्हणून दुर्लक्ष करायचा. पदाई काय तरी काढा-बिढा उकळून द्यायची. तेवढंच बरं वाटायचं. आणि स्वारी ऑर्डरीवर निघायची. डॉक्टर बिक्टरकडं जायाचं, हे त्या वेळी डोक्यात नसायचंच कुनाच्या. आणि कुणी डाक्टरकडं गेलंय आणि जिवंत परत आलंय, आसंबी दिसायचं न्हाई. कारण सगळं करून थकलं की मगच दवाखान्याची पायरी चढली जायाची. त्यावेळी डॉक्टरकडच्या उपचारांचा काही उपयोगच नसायचा. आणि माणूस गेल्याचा बोल मात्र डॉक्टरांना लागायचा. सगळीकडचीच ही अवस्था. आणि डॉक्टरला द्यायला पैसा असायचा कुणाकडं? तेव्हा दत्तूला अन् पदाईला डॉक्टरची आठवण होण्याचं कारणच नव्हतं.

एक दिवस दत्तू आला, त्येच मुळात तापानं फणफणून. आला तसा त्येनं हाथरुणच धरलं. पोटातल्या कळा वाढतच चालल्या. घरगुती उपाय, वैदूचं औषध, समदं करून झालं. वैद्यानंच डॉक्टरला दाखवा, म्हणून सांगितलं; तसं, पदाईला टेन्शल आलं. मनाचा हिय्या करून निप्पाणीला डॉक्टरला दाखवलं. त्येनं पोटाचा फोटु काढला. आनि पोटाचा आल्सर आसल्याचं सांगितलं. लवकर आपरेशन कराय पायजेल, आसं बी सांगितलं. पैका लागणार व्हताच त्यासाठी. दोघं नवरा-बायको घराकडं कशीबशी परतलीत. काय करावं, ह्येचा इचार करून डोक्याचा भुगा व्हायची येळ आल्याली. पैशापेक्षा पन आपरेशन म्हंजे प्वाट बिट फाडायचं, ही कल्पनाच त्यांना सहन हुईना झाल्याली. त्या परास वैद्यालाच जालीम औषिद द्यायला सांगू या आणि फुडचं फुडं बघू, आसं त्येंनी ठरवलं. पण, ह्ये ठरवणं दत्तूच्या जीवावर आणि पदाईच्या संसारावर बेतलं. त्या आजारातनं दत्तू उठलाच न्हाई. घरातनं भाईर पडला, त्यो चौघांच्या खांद्यावरनंच.

ऐन तारुण्यात पदाईवर वैधव्य लादलं गेलं. एकुलतं पोर पदरात. त्येला वाढवायचं, हुभं करायचं आव्हान पेलण्यासाठी दुःखावर मात करत ती पदर खोचून हुभी ऱ्हायली. दत्तू जणू ब्यांड वाजवायला भायेर गेलाय आणि आपण दोघंच घरात आहोत, अशी मनाची समजूत घालत तिनं आपला दिनक्रम चालवला. निलाप्पाला आभ्यासात काय कमी पडू द्यायचं न्हाई. जेवढं शिकंल, त्येवढं शिकवायचं, ही एकच जिद्द बाळगून ती राबत ऱ्हायली. निलाप्पा म्याट्रिक पास झाला. समाजातला, गावातला पहिला म्याट्रिक पास झाल्याला पोरगा. पदाईचा जीव सुपायेवढा झाला. तिचा बंदा रुपाया घडत व्हता. निलाप्पा कालिजात जायला लागला. बीए पण पास झाला. गावातला, समाजातला पैला बीए त्योच. निलाप्पानं आईला सांगितलं, मला फुडं शिकायचंय. पदाई त्येला घेऊन थेट गावच्या रामगोंड पोलीस पाटलाच्या दारात जाऊन हुभी ऱ्हायली. पोलीस पाटील म्हणजे देवमाणूस. ते पण निलाप्पाची प्रगती ऐकून, पाहून होते. त्यांचं त्याच्यावर बारीक लक्ष होतं. शिवाजी विद्यापीठात एम.ए. करायला कोल्हापुरात राहावं लागणार होतं. पोर कधीच गावाबाहेर न राहिलेलं. पोलीस पाटलांनी पदाईला आश्वस्त केलं. निलाप्पाचं पुढचं शैक्षणिक पालकत्व जणू त्यांनी स्वीकारलं. कोल्हापुरात नाळे म्हणून त्यांचे दुकानदार मित्र होते. ते त्याला घेऊन त्यांच्याकडं गेले. ह्यो माझा पोरगा हाय. हिथं शिकाय ठेवतोय. कधी काही पैसे लागलं, तर द्यायचे. हिशोबाचं आपलं आपुन बगू. आसं सांगितलं. नाळे दुकानदारांनी पण आपला शब्द दोन वर्षं पाळला. निलाप्पा अडीनडीला, गरजेला त्यांच्याकडून पैसे मागायचा. कशाला, असं देखील न विचारता ते तितके पैसे त्यांना द्यायचे. पाटील आण्णा ते त्यांना देत आसंत. निलाप्पा एमए पण झाला. गावातला पैला पोस्ट ग्रॅज्युएट पोरगा. पदाईनं कलईदार रुपाया घडवला होता. फुडं त्येनं गावातला पैला पीएचडी डॉक्टर व्हायचा पण मान मिळवला. गावानं दोन्ही वेळेला त्याचा जाहीर सत्कार केला.

त्यावेळी निप्पाणीला अर्जुननगरच्या माळावर देवचंद कॉलेज सुरू झालेलं. देवचंद शेटजी चांगल्या शिक्षकांच्या शोधातच असत. त्यांनी एमए झालेल्या निलाप्पाला बोलावून नोकरी दिली. त्यावेळी निलाप्पा कणकवली, सांगली आणि निप्पाणी असं तीन ठिकाणी दोन दोन दिवस सीएचबी काम करत होता. एक रविवारचा दिवस त्येवढा आईसोबत राहायला मिळायचा. नोकरीमुळं या मायलेकरांचा संसार जरा स्थिरस्थावर होऊ लागला. देवचंद कॉलेजमध्ये फुल टाईम ऑर्डर झाली, तेव्हा कुठं चांगलं स्थैर्य निर्माण झालं. पदाईच्या कष्टाला असं फळ मिळालं.

निलाप्पानं नाळे दुकानदार आणि पाटील आण्णांनी केलेल्या मदतीचा सगळा हिशोब व्यवस्थित लिहून ठेवलेला. एक दिवस त्येवढे पैसे घेऊन तो आण्णांपुढं उभा राहिला. आपली हिशोबाची वही उघडली, त्यांना नाळ्यांकडून घेतलेली रक्कम आणि आण्णांनी व्यक्तीगतरित्याही दिलेली मदत या साऱ्यांचा तपशीलवार हिशोब सांगितला. आणि तेवढी रक्कम आण्णांच्या समोर ठेवली. पाटील आण्णांना त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक आणि अभिमान वाटला. पदाईच्या संस्काराचं हे फळ होतं. आण्णांनी हसून त्याला ती रक्कम परत केली आणि म्हणाले, तुला गरज होती या पैशाची, आणि तुझ्यात गुणवत्ताही होती. म्हणून मी मदत केली. समाजात अजून अशी कित्येक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत किंवा ज्यांना शिकतानाही अडचणी येतात. अशा मुलांना तू मदत करीत राहा. त्यातनंच माझी तुला केलेली मदत सार्थकी लागली, असं मी समजेन. आण्णांच्या या प्रेरक शब्दांनी निलाप्पाला मोठं बळ मिळालं. त्या पैशात आणखी थोडी भर घालून देवचंद कॉलेजमध्ये समाजशास्त्रात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला त्यानं दर वर्षी एक स्कॉलरशीप सुरू केली. त्याशिवाय, दर वर्षी काही विद्यार्थी-विद्यार्थिनींचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांची फी, परीक्षा फी, शैक्षणिक साहित्याचा खर्च अशा अनेक प्रकारे दर वर्षी मदत करायचं धोरण स्वीकारलं. त्यातनं त्यांना मानसपिता मानणाऱ्या अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींची फौजच देवचंदमध्ये तयार झाली.

पदाईचं आयुष्य असं सार्थकी लागत होतं. लेकाचं लग्न केलं तिनं. सांगलीच्या एदा मास्तरची लेक सून म्हणून घरात आली. नातवंडं झाली. लेकानं शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रगती केली, पण आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आईला अंतर दिलं नाही. मी त्यांचा मुलगा म्हणून अगर तिचा नातू म्हणून दोघांना प्रेमानं कधीही बोलत बसलेलं पाहिलं नाही. किंबहुना, दोघं सातत्यानं एकमेकांवर काही ना काही कारणानं खेकसतच असत. पण, ते खेकसणं हाच त्यांच्यातला एक बॉण्ड होता. बाबांनी तिच्यासाठी फार मोठ्या असाईनमेंट घेण्याचं टाळलंच. दिवसभर कुठंही जावं लागलं तरी रात्री घरी येण्याची त्यांनी सवयच लावून घेतलेली. नाईलाजानं मुक्काम करावा लागला तरी एका रात्रीपेक्षा नाहीच कधी. आमच्या घराला कुलुप लावावं लागण्याची वेळ कधी आली नाही, आजी असेस्तोवर!