मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

ऊर्जा-5: व्यवसायास इच्छुकांसाठी सध्या सुवर्णकाळ: सुनील खांडबहाले
(शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' या उपक्रमामध्ये पाचवे पुष्प गुंफले नाशिकचे तरुण उद्योजक व डिजिटल डिक्शनरीकार म्हणून जगभरात लौकिक मिळविणारे श्री. सुनील खांडबहाले यांनी. अतिशय विनम्र, निगर्वी अशा सुनील यांनी मनापासून साधलेल्या संवादाचे शब्दांकन…)मित्र हो, तुम्हाला उपदेश करण्याइतका मी नक्कीच मोठा नाही. तुमच्यातलाच एक जण, तुमच्याच वयाचा मित्र म्हणून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीनजीकच्या वांजोळे इथं माझा जन्म झाला. घरची परिस्थिती गरीबीचीच होती. घर आमचं कुडाचंच होतं- चार खांबांवर उभं. जोराचं वारं सुटलं तर एक खांब आई धरून ठेवायची. बाकी खांब धरण्यासाठी वडिल, आजी आजोबा आणि आम्हा भावंडांची तारांबळ उडायची. रोजंदारी, शेतमजुरी करणाऱ्या माझ्या आईवडिलांना शिक्षणाचं महत्त्व मात्र कसं कोण जाणे खूप उमजलेलं. त्यामुळं आम्हा तिघा भावंडांना त्यांनी शिक्षणासाठी कधी अडवलं नाही. परिस्थिती नसतानाही शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमातूनच शिकलो. शाळा तरी कसली? एकाच खोलीत एकच शिक्षक पहिली ते चौथी शिकवायचे. त्यांच्यासमोर चार चटयांवर चार वर्गातली मुलं बसत. वर्षअखेरीस पास झालो की एका चटईवरुन दुसऱ्यावर बदली व्हायची इतकंच. पै-पाहुण्यांच्या मुलांनी दिलेल्या पुस्तकांवरच आम्हा सर्व भावंडांचं शिक्षण झालं. आज जगभर फिरुन आलो असलो तरी, त्या काळात शहर कसं असतं, ते सुद्धा कधी पाहिलेलं नव्हतं.
एकदा 'सकाळ'च्याच बालकुमार चित्रकला स्पर्धेसाठी नाशिकला जायचं होतं. गावातून बाहेर पडण्याचा आणि शहराकडं जाण्याचा, आयुष्यातला पहिलाच प्रसंग होता तो. मी कावराबावरा होऊन एसटी पकडण्यासाठी रस्त्याकडेला उभा राहिलो. कोणी ओळखीचे मित्र-मैत्रिणी दिसताहेत का, हे पाहात पाहातच कितीतरी बस सोडल्या. स्पर्धेची वेळ केव्हाच उलटून गेली होती. शेवटी मनाचा हिय्या करून एका एसटीत चढलो. नाशिक स्टँडवर उतरलो. तिथली गर्दी, कोलाहल, गोंगाट, गाड्यांची रहदारी पाहून गोंधळलोच. कुठे जावे, कसे जावे, काही समजेना. मला रडूच कोसळलं. कसाबसा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा स्पर्धा संपायला पंधराच मिनिटं शिल्लक होती. माझ्याकडं ना ब्रश होता, ना रंग. ज्या मित्राचं चित्र पूर्ण झालं होतं, त्याच्याकडून ते घेतले. कमी वेळ असल्यानं पेन्सिलनं स्केच न काढता थेट रंगांनीच 'हमाल' या विषयावर चित्र काढलं. रेल्वे स्टेशन आणि तिथं डोईवर ओझं आणि हाताला लहान मूल घेऊन निघालेली स्त्री मी रेखाटली होती. आुष्यभर सारी ओझी वाहणारी माझ्या आईसारखी महिला माझ्या डोळ्यासमोर होती. या चित्राला पहिला क्रमांक मिळाला. दुसरी एक विशेष बाब मला आवर्जून सांगायला आवडेल, ती म्हणजे नाशिकमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर ज्या ठिकाणी उभा राहून मी रडलो होतो, त्याच ठिकाणी आज माझं स्वतःचं ऑफिस मी थाटलं आहे.
पाचवी ते दहावीपर्यंतही मी असाच मराठी माध्यमातून शिकलो. बाकी विषयांत गती असली तरी इंग्रजीच्या बाबतीत मात्र आमची प्रगती न के बराबरच होती. मला खरं तर चित्रकारच व्हायचं होतं, मात्र दहावीला चांगले गुण मिळाल्यानं इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला. गणित विषय माझा चांगला होता. दहावीला गणितात १४० गुण होते. डिप्लोमाच्या ॲडमिशनवेळी शेवटचं एकच ॲडमिशन शिल्लक होतं आणि आम्ही दोघे उरलो होतो. त्यावेळी पॅनलनं सांगितलं होतं की, तुमच्यापैकी ज्याला गणितात अधिक मार्क आहेत, त्यालाच प्रवेश मिळेल. मला १४० आणि दुसऱ्याला १३९ गुण होते. त्यामुळं मला प्रवेश मिळाला. ॲडमिशन तर घेतलं, पण तिथं सारा कारभार इंग्रजीतून असल्याचं समजल्यावर मात्र घाम फुटला. माझ्यासारखे इंग्रजीची भीती असणारे आणखी चार पाच जण होते. आमचा समदुःखी जनांचा एक ग्रुप झाला. साहजिकच, सेमिस्टरला आमची सर्वांचीच दांडी गुल झाली. बाकीचे सारे शिक्षण सोडून गावाकडे निघूनच गेले. मलाही 'गड्या आपुला गाव बरा' असं वाटू लागलं. मी सुद्धा परतायचं ठरवलं; मात्र, त्याच क्षणी आईवडील डोळ्यांसमोर आले. माझ्या वारकरी आईवडिलांनी किती आशाअपेक्षेनं मला शिकायला पाठवलं. मी परत गेलो तर त्यांना काय वाटेल, असा विचार मनात आला आणि मी इंजिनिअर होऊनच गावाकडं परतण्याचा निश्चय केला.
त्यानंतर मी एका प्राध्यापकांची भेट घेतली. त्यांना माझी इंग्रजीची अडचण सांगितली. त्यांनी मला डिक्शनरी वापरण्याचा सल्ला दिला. 'डिक्शनरी' हा शब्द त्यांच्या तोंडून मी पहिल्यांदाच ऐकला. मी त्यांना 'डिक्शनरी म्हणजे काय?' असं विचारलं. तेव्हा सरांनी मला त्यांच्याकडचीच एक डिक्शनरी दिली आणि ती कशी वापरायची, शब्द कसे पाहायचे, ते सांगितलं. त्या दिवसापासून ते आजतागायत डिक्शनरी माझी सोबती झाली ती कायमचीच. मी मला लेक्चरमध्ये अडलेले शब्द डिक्शनरीत पाहायचो आणि ते स्वतंत्र कागदावर अर्थासह लिहून काढायचो. तेव्हा मला शिक्षकांनी काय शिकवलं, त्याचा अर्थबोध व्हायचा. असं करत करत अशा तांत्रिक शब्दांचा संग्रहच माझ्याकडं तयार झाला. या डिक्शनरीच्या बळावर पहिल्या टप्प्यात नापास झालेला माझ्यासारखा विद्यार्थी अखेरच्या वर्षी पहिल्या चार क्रमांकांत उत्तीर्ण झाला. मग, माझ्यासारख्या अनेकांना मी त्या पानांच्या झेरॉक्स करून द्यायला सुरवात केली. पण, त्यालाही खर्चाच्या मर्यादा होत्याच. त्याच वेळी मग आपण डिजिटल डिक्शनरी तयार करायची, असं मी ठरवलं.
माझं संगणकाचं ज्ञान खूपच जुजबी होतं. डिजिटल डिक्शनरी साकारायची तर, त्यासाठी उत्तम प्रोग्रामिंग यायला हवं. त्यासाठी मी एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये चौकशी केली. प्रशिक्षण उपलब्ध होतं, पण खर्च परवडणारा नव्हता. मग, मी माझ्या एका मित्राकडचा एक संगणक तात्पुरता मागून घेतला, ज्याचा उपयोग तो फक्त गेम खेळण्यासाठीच करायचा. अशीच इकडून तिकडून प्रोग्रामिंगवरची पुस्तकंही गोळा केली. आणि एक कमी भाड्याची खोली घेऊन अक्षरशः तिथं कोंडून घेऊन साधना आरंभली. कम्प्युटर प्रोग्रामिंगच्या सर्व भाषा मी एकलव्यासारख्या सेल्फ स्टडी करून शिकलो. या दरम्यान एक बाका प्रसंग आयुष्यात निर्माण झाला. संगणकासमोर अखंड बसल्यामुळं माझ्या पाठीत पाणी झालं. ऑपरेशन करावं लागलं. डॉक्टरांनी यापुढं बैठं काम करता येणार नाही, असं बजावलं. तेव्हा, खुर्चीवर संगणक ठेवून त्यासमोर टेबलवर आडवं पडून मी माझा उरलेला अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर मग एकामागोमाग एक शब्दकोष निर्माण करत गेलो. अंध मुलांसाठी बोलका शब्दकोषही निर्माण केला. मराठीतलाही पहिला बोलका शब्दकोष निर्माण केला. आणि अशा तऱ्हेनं आमचा व्यवसाय विकसित होत गेला.
आपण केला तर व्यवसायच करायचा, हे माझं आणि माझ्या मोठ्या भावाचं ठरलेलं होतं. पण, चांगल्या गुणांनी इंजिनिअर झाल्यामुळं हिंदुस्थान एअरोनॉटिक्समधून मला मुलाखतीसाठी कॉल लेटर आलेलं होतं. तेव्हा ते आम्ही घरी दाखवलंच नाही. तरीही भाऊ म्हणाला, जा, निदान मुलाखत तरी देऊन ये. उद्या आपण व्यवसाय सुरू केल्यावर मुलाखत कशी घेतात, ते तरी समजेल.
मी तिकडे जाणारी बस पकडून निघालो. पण, मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मनाची द्विधावस्था झालेली. त्या तिरीमिरीतच उठलो आणि मधल्याच कुठल्या तरी स्टॉपवर उतरलो. फिरता फिरता एका फॅब्रिकेशनच्या दुकानाजवळ आलो. त्याला म्हटलं, 'काम हवंय. काहीही सांगा. करेन.' त्यानं बिचाऱ्यानं घेतलं ठेवून. त्याच्याकडं काम करायचो. तिथंच रात्री थांबायचो. सकाळी उठून सारं आवरुन मालक येण्यापूर्वी दुकान व्यवस्थित ठेवायचो. एकदा मालकाला शंका आलीच. त्यानं मला जरा खडसावून विचारलं. तेव्हा त्याला सारं काही सांगितलं. त्यानं मला रागावून घरी पाठवलं. तेव्हापासून मग, चांगली नोकरी आहे, असं खोटंच सांगून घरून डबा घेऊन निघायचो आणि रात्री वेळेत परतायचो, असं काही दिवस केलं. हा माझा नोकरीचा एकमेव अनुभव.
आता देशातल्या २३ भाषांत डिजिटल शब्दकोष तयार केल्यानंतर आम्ही आता ग्लोबल लँग्वेज हेरिटेजचे काम हाती घेतलं आहे. आज जगात सुमारे सात हजार भाषा आहेत. त्यापैकी दर चौदा दिवसाला एक या प्रमाणे भाषा लुप्त होत आहेत. त्या भाषा वाचवण्याचा, त्यांचं संवर्धन करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. भाषा जोडल्या गेल्या की माणसं जोडली जातील आणि त्याद्वारे आपोआपच सर्व संस्कृतीही जोडल्या जातील, असं माझं मत आहे. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याशिवाय नाशिकला होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या आघाडीच्या एमआयटीच्या सहकार्यानं आम्ही 'कुंभथॉन' हा प्रकल्प राबवत आहोत. या माध्यमातून अनेक तरुण कुंभमेळ्याच्या पर्यावरणपूरक व इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं अनेक उपयुक्त उपक्रम, प्रकल्प राबवित जोडले गेले आहेत.
याठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनाही माझं असं सांगणं आहे की, आपल्या हातातल्या स्मार्टफोनचा केवळ चॅटिंगसाठी वापर न करता एक एज्युकेशनल डिव्हाइस म्हणून वापर केला, तर अधिक उपयुक्त ठरेल. तुम्ही या माध्यमाचा उपयोग करून हवे ते शिक्षण, प्रशिक्षण प्राप्त करून घेऊ शकता. संधींचे महाद्वार तुमच्यासमोर खुले होईल. त्यामुळे आजचा काळ तर उद्योग व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी खरंच सुवर्णकाळ आहे. त्यादृष्टीने स्वतःला तयार करा आणि पूर्ण निर्धारानिशी त्यात उतरा.

सोमवार, १३ एप्रिल, २०१५

ऊर्जा-4: छंदालाच व्यवसायात रुपांतरित करा: विठ्ठल कामत
('ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' या उपक्रमामध्ये चौथे पुष्प गुंफले ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक व लेखक श्री. विठ्ठल कामत यांनी. अत्यंत ओघवत्या शैलीत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्याचे हे शब्दांकन…)माझ्या मित्रांनो, मी या ठिकाणी भाषण करण्यासाठी नाही, तर संभाषण करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आलो आहे, हे लक्षात घ्या. कारण भाषण रटाळ व्हायची शक्यता असते, पण संभाषण मात्र हे निश्चितपणानं रसाळच असतं. कोल्हापूर हे श्री महालक्ष्मीबरोबरच खाद्यसंस्कृतीचं शहर आहे. इथले कित्येक पदार्थ जगभरातल्या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवतात. फक्त एकच आहे, की आपण आपल्या पदार्थांचं मार्केटिंग करायला विसरतो आहोत. त्यासाठीच्या टीप्स देण्यासाठीच मी, साक्षात विठ्ठल कामत इथं आलो आहे. आताच आपल्या विद्यापीठाच्या तलावावर मी सहा वेगवेगळ्या प्रकारचं पक्षी पाहून येतो आहे. कॅम्पसवरचे मोरही दिसले. सूर्यास्तही पाहिला. या साऱ्या गोष्टी लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी पुरेशा आहेत. फक्त त्या योग्य पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचं कसब तुमच्या अंगी असलं की झालं.
उद्योग-व्यवसाय म्हणजे तरी काय असतं हो? स्वस्तात घ्या आणि महागात विका. पण, त्यासाठीची अक्कलहुशारी मात्र तुमच्याकडं असायला हवी. नाही तर साऱ्याच गोष्टी अक्कलखाती जमा होतील. तुमच्या मनगटात ताकत असेल, तर जगप्रवासाचंही तिकीट मिळविण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होते, हे लक्षात ठेवा. मात्र, त्यासाठी कुठलाही उद्योग-व्यवसाय न निवडता जी तुमची आवड आहे, तो तुमचा छंद आहे, त्याला उद्योगाचं, व्यवसायाचं स्वरुप देता आलं तर यशाची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यासाठी 'गॅप, मॅप आणि टॅप' या त्रिसूत्रीचा वापर करा. विठ्ठल कामतनं पण त्याच्या आयुष्यात हीच त्रिसूत्री वापरलीय, हे लक्षात घ्या. कोणत्या क्षेत्रात, कोणत्या बाबतीत 'गॅप' आहे, त्याचा शोध घ्या. ही संधी कितपत विस्तारता येऊ शकते, त्याची चाचपणी करा, ती 'मॅप' करा, तिचा आराखडा आखा आणि मग त्या क्षेत्रात पूर्ण क्षमतेने उतरा. संधी पूर्णतः 'टॅप' करा. 'अगर देखना है तुम्हे, हमारे उडने का अंदाज, तो आसमाँ को कह दो, और ऊँचा हो जाए।' अशा पद्धतीनं या कक्षा जिद्दीनं अधिकाधिक विस्तारत नेल्या पाहिजेत. यश तुमचंच आहे.
हॉटेलिंगच्या क्षेत्रातही संधींचं अवकाश विस्तारत आहे. आपण आपल्याच पाकक्रिया विसरत चाललो आहोत. देशात दर दीडशे किलोमीटरवर जशी भाषा, तशी पाकक्रियाही बदलते. जिभेचे चोचले पुरविणारा आपला देश आहेत. हजारो पाकक्रिया आपल्या माताभगिनींनी विकसित केल्या आहेत. त्यांचं फक्त मार्केटिंग करण्याची गरज आहे. आपला हॉटेल व्यवसाय चालेल, वाढेल, असा आपला देश आहे. त्याला अच्छे दिन येण्याची प्रतीक्षा आहे. माझ्या परीनं मी काम केलं आहे, करतो आहे. तुम्हीही करा. अडचणींना घाबरू नका. अडचणी येणारच. परीक्षा पाहणारच. 'ऐ बुरे वक्त जरा अदब से पेश आ, वक्त को वक्त नहीं लगता बदलने में।' हे सांगण्याची धमक विकसित करा. अडचणी येतात पण, त्या रडविण्यासाठी नव्हे, तर घडविण्यासाठी, हे लक्षात ठेवा. कोणताही उद्योग-व्यवसाय करा, पण आपल्या ग्राहकाला कधीही नाराज होऊन जाऊ देऊ नका. 'मौत के बाद याद आ रहा है कोई, मेरी कब्र की मिट्टी उठा रहा है कोई, या खुदा दो पल की जिंदगी दे मुझे, मेरी दुकान से नाराज हो के जा रहा है कोई।' इतकी आत्मियता, प्रामाणिकपणा आपल्या ग्राहकांशी निर्माण व्हायला हवी.
चांगल्या पद्धतीचं मार्केटिंग करत असताना 'कम खर्चा, जादा चर्चा' हे सूत्र लक्षात ठेवा. तुमचा ग्राहक हाच तुमचा खरा जाहिरात करणारा आहे, हे लक्षात ठेवा. मी लंडनमध्ये गेलो असताना तिथल्या ऑथेंटिक इंडियन म्हणवणाऱ्या 'शान'मध्ये इडली पाहिली, तर रबर बरे म्हणावे, अशी परिस्थिती होती. मी त्यांना म्हणालो, की 'यापेक्षा चांगली इडली तुम्हाला मी करून देऊ शकेन.' तोपर्यंत मी आयुष्यात एकदाही इडली बनविलेली नव्हती. पण, आईला इडली करताना कित्येकदा पाहिलेलं होतं, त्या बळावर हा विश्वास माझ्या मनी जागला होता. तिथल्या मालकिणीनं 'ठीक आहे, उद्या कर.' असं सांगून संधी दिली. रात्री ती यिस्टचा डबा घेऊन माझ्याकडं आली. मी यिस्ट वापरण्यास नकार दिला, तेव्हा तिनं अत्यंत अविश्वासानं माझ्याकडं पाहिलं. यिस्ट आरोग्यास अपायकारक असल्यानं आजही मी माझ्या कोणत्याही पदार्थात ते वापरत नाही. मालकीण यिस्टचा डबा घेऊन निघून गेली. मी पीठ आंबवायला ठेवलं. पण, लंडनच्या मायनस डिग्री तापमानात ते आंबणार कसे? शेवटी खोलीतल्या हीटरजवळ रात्रभर ते ठेवले आणि सकाळी लुसलुशीत इडल्या तयार केल्या. डिस्प्लेमध्ये इटली, खोबऱ्याची चटणी मांडून ठेवली असताना एक इंग्रज नागरिक आला. त्यानं मला विचारलं, 'वॉट इज धीस?' मी उत्तरलो, 'धीस इज राइस पुडिंग.' मग त्यानं चटणीकडं बोट करू विचारलं, 'ॲन्ड धीस?' मी पुन्हा उत्तरलो, 'इट्स द कोकोनट सॉस. द राइस पुडिंग टेस्ट्स बेस्ट विथ कोकोनट सॉस.' आणि अशा तऱ्हेनं माझा पहिला ग्राहक मला मिळाला. त्याची प्रतिक्रिया म्हणून पुढील काळातला तिथला सर्वाधिक हिट पदार्थ तो ठरला. पुढं मग मी डोसा केला आणि त्यात मसाला रोल करून तिथल्या ग्राहकाला पेश केला. सांबार खाण्यास त्याला वेळ नसल्यानं रोल करून दिल्यानं त्याचीही लोकप्रियता वाढली. समोरचा ग्राहक पाहून, जसा देश, तशी भाषा बोलण्याचा धडा मला तिथून मिळाला. माझ्या हजरजबाबीपणाची त्याला जोड दिली. त्यामुळं आज जगातील चौदा भाषा मी बोलू शकतो. लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधल्यानं त्यांच्यातही आपुलकी निर्माण होते.
Mrs. & Mr. Vithal Kamat at Shivaji University's (Kolhapur) picturesque lake
ज्या देशात उद्योगासाठी जाल, तिथले कायदेकानून, नियम आधी समजावून घ्या. याचा धडा माझ्या स्वतःच्या जपानमधील उदाहरणानंच देईन. जपानमध्ये माझ्या पहिल्यावहिल्या रेस्टॉरंटचं उद्घाटन होतं. ज्या दिवशी संध्याकाळी उद्घाटन व्हायचं होतं, त्या दिवशी दुपारी तिथला शासकीय सर्वेक्षक पाहणीसाठी आला. रेस्टॉरंटच्या दर्शनी भागातच मी तंदूर लावलेला होता. तो पाहून तो म्हणाला, 'तुम्ही तंदूरसाठीचं लायसन्स घेतलेलं नाही. तेव्हा तुम्ही ते लावू शकत नाही.' मला खरंच, त्याची कल्पना नव्हती. रेस्टॉरंटच्याच लायसन्समध्ये मी ते गृहित धरलेलं होतं. आता इतक्या कमी कालावधीत तंदूरसाठी लायसन्स मिळणंही शक्य नव्हतं. स्थानिक लायसन्स नसल्यानं माझा प्रशिक्षित माणूस ते तंदूर वापरू शकणार नव्हता. मी प्रयत्न करून पाहिला, तर इतका जोराचा चटका बसला की, पुन्हा त्यात हात घालण्याचं धाडस मला झालं नाही. तेव्हा मी तिथं स्थानिक हरकाम्या टाइपची कामं करणाऱ्या कामगाराला बोलावलं. त्याला मी छोटे छोटे गोळे लाटून त्यावर काजू, ड्राय फ्रूट्स पेरले आणि त्याक्षणी त्या छोट्या नानचं नामकरण केलं- काबुली नान. मी आजतागायत काबूल कुठं आहे ते पाहिलेलं नाही, पण हा नान आजही जपानमध्ये पॉप्युलर आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गेली अनेक वर्षे माझा तोच जपानी कर्मचारी ते बनवतो आहे. अशा अडचणी येणार, हे गृहित धरून त्यावर मार्ग शोधत आपण पुढं जात राहायला हवं.
आणखी एक अनुभवाचा सल्ला देतो की, तुमच्या ग्राहकाला वय नसतं, तर हृदय असतं, हे लक्षात घ्या. ऑर्किडच्या उभारणीच्या काळात आम्ही शाळेतल्या लहान लहान मुलांसाठी आठवड्यातून एकदा साइट व्हिजिट ठेवायचो. त्यांना तिथं खेळू द्यायचो आणि त्यांच्यासाठी काही तरी स्पर्धा घेऊन बक्षीसंही द्यायचो. ऑर्किडच्या विस्तारासाठी मला अडीचशे कोटींचं कर्ज घ्यावं लागणार होतं. आता एवढी रक्कम कोणती बँक देईल, या विवंचनेत मी होतो. मी एका बँकेच्या शाखेत गेलो. तिथल्या दरवानानं बँकेचे वरिष्ठ मॅनेजर आले असून एवढ्यात ब्रँच मॅनेजरला भेटू शकणार नसल्याचं सांगितलं. माझ्यासाठी ही संधीच होती. मी त्याला म्हणालो, 'अहो, त्या साहेबांनीच मला बोलावलंय. त्यांना सांगा विठ्ठल कामत आलेत म्हणून.' मी असंच ठोकून दिलं होतं. त्या शिपायानं माझ्याकडं विचित्र नजरेनं पाहिलं आणि तो आत गेला. तर 'कुठे आहेत विठ्ठल कामत?' अशी विचारणा करत ते वरिष्ठ अधिकारीच बाहेर आले. ते म्हणाले, 'कामत साहेब, तुमच्याबद्दल माझ्या नातीनं कालच मला सांगितलं. तुम्ही घेतलेल्या स्पर्धेत काल तिला बक्षीस मिळालं आहे. बोला, कितीचं कर्ज हवंय?' मी उडालोच. म्हणजे निरपेक्षपणे केलेलं माझं काम. त्यातून नशीबानं साहेबाच्या नातीला बक्षीस मिळालेलं. अशा प्रसंगातून जीवन खूप काही शिकवून जातं. अडीचशे कोटीचं कर्ज त्या छोटीमुळं मला मिळून गेलं. याठिकाणी आणखी एक सांगतो. तुम्ही उद्योगासाठी, व्यवसायासाठी कर्ज जरुर घ्या. पण, ते घेतलेल्या कारणासाठीच खर्च करा, म्हणजे झालं.
ऑर्किडमध्ये तेरा मिनिटांत सर्व्हिस न दिल्यास जेवणाचं बिल न आकारण्याच्या माझ्या निर्णयाचाही मला खूप लाभ झाला. काही वेळा देशातल्या अन्य प्रांतातल्या ग्राहकांना पहिल्यांदा मुद्दामहून मोफत देण्याचा लाभ मला त्यांच्या किंवा त्यांच्या मित्र मंडळींच्या पुढच्या ट्रीपमध्ये आवर्जून झाला. लॉयल कस्टमर देशाच्या कानाकोपऱ्यात निर्माण झाले. दर्जाच्या बाबतीत आमच्या कोणत्याही रेस्टोमध्ये कधीही तडजोड केली जात नाही. मी स्वतः पत्नीसमवेत कित्येकदा आमच्या रेस्टोजना ग्राहक बनून सरप्राइज व्हिजिट करत असतो. आणि अशा व्हिजिटमध्ये अद्यापपर्यंत तरी कोणीही फेल गेलेलं नाही, याचा अभिमान वाटतो.
त्यामुळं विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं आहे की, आपल्या देशात ९९६ प्रकारचे जॉब आहेत. त्यातलं तुम्ही काहीही करा. त्यांना पालकांनी साथ द्या. ज्या त्या वयात जे ते करा. नाही तर पुढं आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येईल. तसं होऊ देऊ नका. 'हम होंगे कामयाब- एक दिन' नव्हे, तर 'हम होंगे कामयाब- हर दिन' अशा निर्धारानं आयुष्याला सामोरे जा- बस्स!

शनिवार, ४ एप्रिल, २०१५

ऊर्जा-3: जे काम कराल; ते स्वतःचे समजून करा: हणमंत गायकवाड('ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' या शिवाजी विद्यापीठ व सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमाअंतर्गत तिसरे पुष्प गुंफले ते भारत विकास ग्रुप कंपनीचे उद्गाते श्री. हणमंत गायकवाड यांनी. त्यांनी साधलेल्या संवादाचे हे शब्दांकन…)
मित्र हो, मुलाखतीपेक्षा आपणा सर्वांशी थेट संवाद साधणं मला सोपं जाईल, अशी माझी भावना आहे. त्यामुळं माझ्याबद्दल, माझ्या वाटचालीबद्दल मी स्वतःच सारी माहिती तुम्हाला देतो. सुरवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की, भलेही मी आज यशस्वी उद्योजक म्हणून गणला जात असलो, तरी त्यासाठी लागणारं कोणतंही भांडवल किंवा साधनसामग्री माझ्याकडं नव्हती. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाची स्वप्नं तरी काय असणार? चांगला अभ्यास करायचा, युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा द्यायच्या आणि एक चांगला सरकारी अधिकारी व्हायचं, असं काहीसं स्वप्न मी बाळगून होतो. उद्योजक होईन, असं कधी ठरवलंही नव्हतं किंवा वाटलंही नव्हतं. पण झालो खरा. मी चालत राहिलो आणि कारवाँ बनत गेला, इतकंच.
मी कोरेगावच्या एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा. वडील सारखे आजारी असायचे. त्यामुळं तुटपुंज्या शिलकीवर घर कसंबसं चाललेलं. घरमालकांशी वाद होते. त्यांनी घराची वीजही कापलेली. त्यामुळं दहा बाय बाराच्या खोलीत कंदिलाच्या उजेडातच माझा अभ्यास सुरू असायचा. चौथीत मला शिष्यवृत्ती मिळाली. तेव्हा, आम्ही वडिलांच्या उपचारासाठी पुण्याला फुलेवाडीत आलो. तिथली खोली दहा बाय दहाची. आई शिक्षिका होती. तिच्या कमाईत वडिलांचे उपचार, माझं शिक्षण भागणं शक्य नव्हतं. तिनं जोडीला पापड लाटणे, शिलाई करणे अशी जोडकामं करायला सुरवात केली. माझं गणित चांगलं होतं. त्यामुळं दहावीला ८८ टक्के मार्क मिळाले. मी इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमाला प्रवेश घेतला. त्याच सुमारास वडिलांचं निधन झालं. आता काम करण्याखेरीज माझ्यासमोर पर्याय नव्हता. शिकत शिकतच कामं करण्यास सुरवात केली. पापड, सॉस विकणं सुरू केलं. सुटीच्या काळात पेंटिंगची काम करायला सुरवात केली. डिप्लोमा झालो. पुढं व्हीआयटीमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पण, पुन्हा पैशाचा प्रश्न होताच. आईनं पंधरा हजारांचं कर्ज काढलं. कॉलेज घरापासून एकवीस किलोमीटर लांब होतं. बसचं एक रुपया भाडंही परवडणारं नव्हतं. त्यामुळं रोज एकवीस किलोमीटर सायकल चालवत जायचो. या प्रवासादरम्यान स्वतःला स्फूर्ती देणारी गाणी मोठमोठ्यानं म्हणायचो. बाबूजींचं 'यशवंत हो, जयवंत हो' हे तेव्हापासून आजतागायत मला स्फूर्ती देणारं गीत आहे. या काळातला एक गंमतीदार किस्सा सांगतो. माझ्या सायकलच्या सीटचे रिबिट निसटलेले होते. त्यामुळं काही खोडकर मुलं, ती सीट काढून लांब कुठं तरी फेकून द्यायचे. रिबिट बसविण्याचेही पैसे नव्हते. त्यामुळं ती सीट शोधायची, पुन्हा बसवायची आणि घराकडं निघावं लागायचं. त्यावर मी एक नामी उपाय शोधला. माझ्या गळ्यात शबनम असायची. मी कॉलेजात पोहोचलो की स्वतःच सीट काढून त्या शबनममध्ये टाकायचो आणि वर्गात जायचो. आता हसू येतंय, पण ते दिवस तसे खूपच परीक्षा पाहणारे होते.
एका शिक्षकांनी माझं गणित चांगलं असल्यानं ट्यूशन घेण्याविषयी सल्ला दिला. शिकत असतानाच साधारण तीनेक वर्षं मी ट्यूशन्स घेतल्या. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लाभला. मिळकतही चांगली सुरू झाली. पण, तेच ते शिकवण्याचा मलाच कंटाळा आला. म्हणून ट्यूशन बंद केल्या. शिक्षक लोक वर्षानुवर्षे तेच ते आणि तेच ते कसं काय शिकवू शकतात, कोण जाणे?
त्यावेळी बालेवाडीला आशियाई स्पर्धा होणार होत्या. त्यावेळी आयोजकांकडं गेलो. म्हणालो, 'मला काही काम द्या. कोणतंही काम सांगा. करेनच.' त्यावेळी अंतर्गत काँक्रिटचे रस्ते बांधायचं काम मला मिळालं. मात्र, अट अशी होती की सात दिवसांत काम पूर्ण करायचं. मी दणकून होकार देऊन टाकला. इकडची, तिकडची कामकरी माणसं जमवली आणि कामाला सुरवात केली. त्यांना चांगल्या प्रतीचं नाष्टा, जेवण आणि रात्रीच्या श्रमपरिहाराची विशेष सोय केली. त्यामुळं त्या लोकांनी सात दिवसांत काम पूर्ण केलं. पण, कोयनेच्या भूकंपामुळं स्पर्धा पुढं गेली आणि दरम्यानच्या काळात रस्त्यांची लेव्हल बिघडली. माझं बिल तटवण्यात आलं. मी पुन्हा माझ्या त्या कामगारांकडं गेलो. त्यांना अडचण सांगितली. त्या सर्वांनी पुन्हा ते काम चांगल्या पद्धतीनं केलं आणि मग मला माझे पैसे मिळाले.
इंजिनिअर झाल्यानंतर टाटा मोटर्समध्ये मला नोकरी मिळाली. तिथं पारंपरिक पद्धतीनं कामं चालायची. माझे सहकारी गणेश लिमये यांच्या साथीनं मी इलेक्ट्रीक केबल वापराविषयी थोडं संशोधन केलं. आणि जुन्या केबल्स इलेक्ट्रीक केबल्सनी रिप्लेस केल्यानंतर कंपनीची जवळ जवळ दोन ते तीन कोटी रुपयांची बचत झाली. त्यामुळं तिथंही कंपनीनं मुख्य व्यवस्थापकाच्या पगाराइतकं बक्षीस मला दिलं.
त्यावेळी कंपनीच्या हाऊस किपिंगचा मुद्दा अडचणीचा झाला होता. मी विचारलं, मी करून पाहू का? कंपनीनं परवानगी दिली. आणि अशा तऱ्हेनं मला नोकरी देणारी कंपनीच हाऊस किपिंगच्या क्षेत्रातली माझी पहिली क्लाएंटही ठरली. भारत विकास ग्रुपचा उदय झाला तो असा. मी स्वतः स्वामी विवेकानंदांना खूप मानतो. त्यांनी भारतीयत्वाची जाणीव माझ्या मनात जागवली. स्वतःसाठी किंवा इतर संकुचित काही विचार न करता देशाचा विचार करायला त्यांनी शिकवलं. त्यामुळं कंपनीचं नावही मी देशाचा विकास डोळ्यांसमोर ठेवूनच ठरवलं. मला हे नाव देताना संबंधित शासकीय यंत्रणांनी प्रथम नकारच दिला. कारण यातून कंपनीचा हेतू, कार्यक्षेत्र काहीच स्पष्ट होत नव्हतं. पण, मी सुद्धा त्यांना स्वच्छतेतून भारताचा विकास करण्याचा माझा मनोदय असून त्यासाठी हे नाव उपयुक्त असल्याचं पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अखेरीस हे नाव मिळालं. केवळ आठ कर्मचारी घेऊन मी काम सुरू केलं. अगदी झपाटून आणि मनापासून काम केलं. कामाचा दर्जा चांगला राखण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळं कामातून काम मिळत गेलं. पुण्यातलं काम पाहून बेंगलोरच्या कंपनीतलं काम मिळालं, तिथून चेन्नईतलं आणि तिथून हैदराबादमधलं. असा विस्तार वाढत गेला. आमचं कामचं आमचं मार्केटिंग करत होतं. कॉर्पोरेट कंपन्यांबरोबरच शासकीय कामंही मिळत गेली. त्यातून महाराष्ट्राचं मंत्रालय, दिल्लीत पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांची निवासस्थानं, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, सीबीआय हेडक्वार्टर अशी कामं मिळाली. त्यावेळी संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळं संसदेच्या बाहेरच्या परिसराची देखभाल बीव्हीजीला मिळाली. आतली देखभाल मात्र पीडब्ल्यूडी विभागाकडंच होती. माझ्या लोकांनी अगदी स्वातंत्र्यापासून धुळीनं विटलेल्या लाल रंगाच्या संसदेच्या पायऱ्यांचा मूळ रंग त्यांना प्राप्त करून दिला. ते पाहून खासदारांना आश्चर्य वाटलं. त्यांनी हे काम कोणी केलं, म्हणून विचारलं. 'बीव्हीजी' इतकं चांगलं काम करत असेल, तर आतली देखभालही याच कंपनीला द्यायला हवी, असा आग्रह त्यांनी धरला आणि अशा प्रकारे संसदेच्या अंतर्गत देखभालीचं कामही बीव्हीजीला मिळालं. त्यानंतर तीन वर्षे बंद अवस्थेत असलेला एक साखर कारखानाही मी केवळ बावीस दिवसांत कार्यान्वित केला. आता देशाबाहेर काठमांडू-नेपाळ येथील कचरा व्यवस्थापनाचं कामही बीव्हीजीला मिळालं आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतोय.
आज सुमारे दोन हजार कोटींहून अधिक उलाढाल असणाऱ्या माझ्या कंपनीत ७५ हजारांहून अधिक कर्मचारी काम करताहेत. माझ्या माणसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझं काम वाढवताना मी माझ्या नफ्यापेक्षा माझ्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, हे पाहतो. मी त्या साऱ्या परिस्थितीतून गेलो आहे. त्यामुळं कंपनीच्या कामाव्यतिरिक्त उरलेल्या वेळेत माझ्या कामगारांना मल्टिस्कील्स देण्याला माझं प्राधान्य राहिलं आहे. त्या वेळेत ते अन्य बाहेरची काही कामं करून कुटुंबाला अधिक हातभार लावू शकतील. आणि तसं होतं आहे. खरं तर स्कील्ड माणसांची आज जगभरात गरज निर्माण झाली आहे. जर्मनीचंच उदाहरण घेऊ. तिथं स्कील्ड आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. पण, जर्मन शिकून आरोग्य सेवाविषयक प्रशिक्षण घेऊन तिथं जाऊन काम करण्याची तयारी असेल, तरच ती संधी घेता येईल. त्यासाठी युवकांनी विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. ज्ञानसंपन्न बनलं पाहिजे. आणि ते ज्ञान कसं विकायचं, याचंही कौशल्य त्यांनी स्वतःत विकसित करायला हवं. जे काम कराल, ते स्वतःचं समजून करण्याची भावना मनात बाळगाल, तर प्रत्येक कामातून यश आणि समाधान मिळेल, याची खात्री बाळगा.
अशाच पद्धतीनं काम केल्यानं माझ्या लोकांचाही माझ्यावर विश्वास बसला आहे. इथल्यापेक्षा तिप्पट पगाराच्या नोकऱ्यांच्या ऑफर त्यांना मिळाल्या, तरी बीव्हीजी सोडण्यास त्यांनी नकार दिला, इतकी आत्मियता त्यांच्यात निर्माण झाली आहे. माझ्या कुटुंबाचा ती घटक बनली आहेत. यातली बरीचशी माणसं मला रस्त्यात भेटली, त्यांना मी सोबत घेतलं, विश्वास टाकला, म्हणून ही बांधिलकी आमच्यात कायम आहे. मी कधीही कामापुरते संबंध जोडले नाहीत. एकदा जोडले की ते कायमचेच, असं माझ्या बाबतीत झालं. प्रामाणिक काम करत, आयुष्यभराचे बंध निर्माण करत करत माझी वाटचाल सुरू आहे आणि तेच मला मिळालेल्या यशाचं गमक आहे, अशी माझी कृतज्ञ भावना आहे.