शुक्रवार, १ जुलै, २०२२

समाजमाध्यमांचे भवितव्य

('दै. सकाळ'च्या निपाणी कार्यालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 'व्हिजन २०२५' ही विशेष पुरवणी प्रकाशित करण्यात आली. सदर पुरवणीत प्रकाशित झालेला माझा लेख ब्लॉगवाचकांसाठी 'सकाळ'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यमे हे आजच्या काळातील एक महत्त्वाचे संवादसाधन आहे. वॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यापैकी एक तरी आपण वापरतोच. नवी पिढी त्यापलिकडं गेली आहे. ती आता स्नॅपचॅट, शेअरचॅट इथं तुम्हाला दिसेल. फेसबुक हे आता त्यांच्या दृष्टीनं जुन्या (थोडक्यात ज्येष्ठ) लोकांचं माध्यम बनलं आहे. तरीही फेसबुकनं आपलं स्वरुप सातत्यानं बदलत ठेवून नव्या-जुन्यांना जोडून ठेवण्याचं कसब दाखवलं आहे, जे अन्य स्पर्धक कंपन्यांना तुलनेत शक्य झालं नाही आणि त्या या स्पर्धेत काहीशा मागं पडल्या. फेसबुकनंच वॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम यांची खरेदी करून या क्षेत्रातील ती एक दादा कंपनी बनली आहे.

चालू वर्षात समाजमाध्यम क्षेत्रातला सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला तो म्हणजे अग्रमानांकित उद्योजक इलॉन मस्क यांनी केलेला ट्विटरचा खरेदी व्यवहार आणि त्या व्यवहारासाठी त्यांनी या कंपनीचा पुरविलेला पिच्छा! त्यानंतर या कंपनीच्या वृद्धीमध्ये योगदान देणाऱ्या महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची गच्छंती ही सुद्धा चर्चेत राहिली. श्रीलंका हा देश जितक्या अब्जांचा कर्जबाजारी आहे, त्याहून वीसेक अब्ज अधिक रक्कम मस्क यांनी ट्विटरसाठी मोजली, अशीही वार्ता या दरम्यान आली.

फेसबुक असो, गुगल असो, मायक्रोसॉफ्ट असो अथवा ट्विटर, या समाजमाध्यम कंपन्यांनी आज जगावर वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आज फेसबुकवर आहे. सर्व समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांची संख्या एकत्रित केली तर ती जगातील सर्वाधिक लोकसंख्या केव्हाच बनलेली आहे. समाजमाध्यमांच्या या ताकदीचा अंदाज त्या कंपन्यांच्या कर्त्यांना तर आलेलाच आहे, पण त्याचप्रमाणे बलाढ्य मल्टिनॅशनल कंपन्या चालविणाऱ्या भांडवलदारांनाही तो आलेला आहे. त्यामुळेच पूर्वी ज्या प्रमाणे प्रसारमाध्यमे आपल्या हातात असावीत, म्हणून त्यांचा आटापिटा चालायचा आणि तो त्यांनी ज्या आक्रमकपणाने हस्तगत केला. त्याहूनही अधिक आक्रमकपणाने समाजमाध्यमांची मालकी प्राप्त करण्यासाठी आज जगात वेगवान हालचाली सुरू आहेत. जगाचे अर्थकारण आणि त्याहूनही राजकारणाची सूत्रे हलविण्याची ताकद आपल्यामध्ये आलेली आहे, या जाणीवेतून समाजमाध्यमांनी विविध देशांत राजकारण प्रभावित करण्यासाठी आपल्या ताकदीचा वापर केला, आपल्या लाखो वापरकर्त्यांचा डाटा, माहिती व्यापारी कंपन्यांना प्रचंड किंमत घेऊन विकला. मात्र, केंब्रिज एनालिटिकाच्या माध्यमातून अखेरीस त्याची भांडाफोड झाली आणि ठिकठिकाणी त्यांना माफी मागावी लागली. फेसबुकला केंब्रिज एनालिटिका प्रकरणात मोठ्या नाचक्कीला सामोरे जावे लागले. त्यासाठी झुकेरबर्ग यांची अमेरिकन सिनेटमध्ये कानउघाडणी होऊन माफीनामाही सादर करावा लागला. तथापि, अमेरिकाच नव्हे, तर जगातील युके, जर्मनीमध्येही फेसबुकला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधातील हेट स्पीच आणि फेक न्यूजला वेळीच आळा न घातल्याचा ठपकाही फेसबुकवर ठेवण्यात आला. अगदी भारतात सुद्धा फेक न्यूज आणि हेट स्पीचला आळा घालण्याऐवजी सरकारधार्जिणे धोरण फेसबुक स्वीकारत असल्याच्या टीकेलाही कंपनीला सामोरे जावे लागले.

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे समाजमाध्यमे ही आज केवळ संवादाची साधने राहिलेली नाहीत, तर जगावर भांडवलदारी सत्ता प्रस्थापित करण्याची बहुराष्ट्रीय कंपन्यांची हस्तक साधने म्हणून ती अधिक वापरली जात आहेत आणि वापरकर्ते हे या व्यवस्थेचे केवळ ग्राहक आहेत, या दिशेने समाजमाध्यमांची आणि त्यांच्या बलाढ्य मालकांची वाटचाल सुरू झालेली आहे. आगामी काळात ही पकड अधिकाधिक घट्टच होत जाणार आहे. याचे कारण म्हणजे भांडवलदार हा नफेखोरीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे आजच्या जगभरातील सर्वाधिक प्रभावी राजसत्तांना या समाजमाध्यमांच्या प्रभावाची, बलस्थानाची पुरेपूर कल्पना आलेली आहे. त्यामुळे समाजमाध्यमे आणि त्यांच्या वापरकर्त्यांचे नियंत्रण आपल्या हाती असावे, आपण जे सांगू त्यावर या समस्त जनतेचा विश्वास बसावा आणि त्यातून अंतिमतः आपली सत्ता अबाधित राहावी, हा राज्यकर्त्यांचा मानसहेतू पूर्ण करण्यात अगर जोपासण्यात समाजमाध्यमांचे भांडवलदार मालक संपूर्णतः सहकार्य करण्यास तत्पर आहेत. त्यामुळे राजसत्ता आणि ही नवमाध्यमसत्ता एकमेकांच्या हातात हात घालून वापरकर्त्यांवरील आपली पकड अधिकाधिक मजबूत करण्याच्या मागे लागलेली आहे. पुढील काळात ही पकड अधिकाधिक घट्ट होत जाणार आहे कारण तिला आधुनिक नवतंत्रज्ञानाचे पंखही गतीने लाभणार आहेत.

समाजमाध्यमांच्या क्षेत्रामध्ये नवे तंत्रज्ञान मोठ्या गतीने विकसित होत आहे. किंबहुना, या तंत्रज्ञानामुळे समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांना संवादाचे नवनवे आयाम लाभणार आहेत. फाईव्ह-जी, इंटरनेट ऑफ थिंग्ज यांची सुरवात तर झाली आहेच. त्यामुळे डाटावहन क्षेत्राला प्रचंड गतीचे पर लाभले आहेत. त्याखेरीजही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (ए.आय.), मशीन लर्निंग, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (आर.पी.ए.), एज कम्प्युटिंग, क्वांटम कम्प्युटिंग, व्हर्चुअल रिअॅलिटी व ऑगमेंटेड रिअॅलिटी, ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे वास्तव म्हणून सामोरे येते आहे. त्यामुळे समाजमाध्यमांचा वापर, गेमिंग या क्षेत्रांत अत्यंत आमुलाग्र स्वरुपाचे बदल येऊ घातले आहेत. आताच वापरकर्त्यांचा ट्रेंड टेक्स्ट व इमेज शेअरिंगकडून व्हिडिओ शेअरिंगकडे वळलेला आहे. तीस सेकंदांपासून ते मिनिटभरापर्यंतच्या व्हिडिओ क्लिप्स आणि मिम्स सध्या प्रचंड ट्रेंडिंगमध्ये दिसताहेत. त्यांना लाखो व्ह्यूज मिळत आहेत. इन्स्टाग्रामपासून ते फेसबुक, युट्यूबपर्यंत सर्वांनीच त्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये अनेक अत्यावश्यक बदल केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये रंजकता आहेच, मात्र आताच हे व्हिडिओ हळूहळू सॉफ्ट पोर्नकडे झुकल्याचे दिसताहेत. त्यांना मिळणारे व्ह्यूज आणि लोकप्रियता अचंबित करणारी आहे. या क्लिप्स पाहणाऱ्यांत सर्व स्तरांतील दर्शक तर आहेतच, पण शेअरिंग करणाऱ्यांत न कळत्या वयातील केवळ टीनएज मुले-मुली आहेत असे मात्र नाही. तर यामध्ये अगदी मध्यमवर्गातील गृहिणींचाही समावेश आहे. एरव्ही घरात पदर न ढळू देणारी ही गृहिणी समाजमाध्यमांवर ‘टिप टिप बरसा पानी’सारख्या गाण्यावर दर्शकांना शक्य तितके सिड्युस करण्याचा प्रयत्न करताना दिसते. या महिलांवर टिप्पणी करण्याचा हेतू इथे नाही, तर समाजमाध्यमांनी कोणती दिशा पकडली आहे, या बाबीकडे अंगुलीनिर्देश करण्याचा प्रयत्न आहे. स्त्रीदेहाचे उत्तान प्रदर्शन मांडण्याचा हा प्रयत्न समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर बिनदिक्कतपणे सुरू आहे. त्याचा परीघ विस्तारतो आहे. दर्शकांच्या नजरा विटाव्यात, इतके हे प्रमाण वाढते आहे. समाजमाध्यमांमुळे आणि इंटरनेटमुळे झालेल्या माध्यमांच्या प्रचंड व्यक्तीगतीकरणामुळे पोर्न क्लिप्स, फिल्म्स हे आजचे तुमच्या आमच्या घरातले उघडेवाघडे वास्तव आहे, हे नाकारण्यात काहीही हशील नाही. आपली मुले आपल्याशेजारी बसून नेमक्या कोणत्या गोष्टी अॅक्सेस करताहेत, याचा थांगपत्ता पालकांना लागू न येण्याइतपत ही पिढी स्मार्ट आहे. सगळीकडेच हे असेच आहे, असे म्हणावयाचे नसले तरी बहुतांश वास्तव आणि आकडेवारी त्याकडे निर्देश करते, हेही खरे आहे.

या पार्श्वभूमीवर, उद्या व्हर्चुअल रिअॅलिटी वा ऑगमेंटेड रिअॅलिटीच्या युगात अशा प्रकारचा कन्टेंट केवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण केला जाईल आणि पाहिला जाईल, या शक्यतेच्या विचारानेच छाती दडपून जाते. सध्या पब्जीसारख्या गेमिंगमुळे तरुणांच्या हिंसात्मकतेची पातळी केवढी तरी उंचावलेली आहे. सारखा खेळू नको, म्हणणाऱ्या आईबापाची निर्घृण हत्या करण्यापर्यंत ही मजल गेलेली आहे. त्यामुळे गेमिंग व समाजमाध्यमांच्या क्षेत्रात ऑगमेंटेड रिअॅलिटी दाखल झाल्यानंतरचे परिणाम, दुष्परिणाम कोणत्या स्तराला जातील, काय वळण घेतील, हे सांगणे आणि समजून घेणे अवघड नाही.

समाजमाध्यमे वाईट नाहीत. मात्र त्यांचा वापर कोणत्या कारणांसाठी केला जातो, ती कोणाच्या हातात आहेत, त्यांचे हेतू काय आहेत, यावर त्यांच्या परिणामांची दिशा अवलंबून असते. आजकाल समाजमाध्यमांवर स्वच्छ अभिव्यक्ती करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. किंबहुना एखादी स्वच्छ अभिव्यक्ती सुद्धा तितक्याच स्वच्छपणाने घेतली जाईल, याची तीळमात्र शक्यता राहिलेली नाही, इतके वापरकर्त्यांचे मन ट्रोलिंगमुळे कलुषित झालेले आहे. तुम्ही समाजमाध्यमांवर आहात, याचा अर्थ तुम्ही कोणती ना कोणती भूमिका घेतलेले अथवा असलेले असायलाच हवेत, असा दुराग्रह त्यामागे आहे. किंबहुना, ट्रोलर्स तुम्हाला या बाजूचे अथवा त्या बाजूचे करूनच सोडतात. शिवीगाळ ही खरे तर आपली संस्कृती नाही. उच्च प्रतीचे वैचारिक आदानप्रदान होऊन चर्चाविमर्षातून एखादी भूमिका निश्चित होणे किंवा मतनिर्मिती होणे, यासाठी समाजमाध्यमांसारखा उत्तम मंच नाही. मात्र, समाजमानस प्रभावित करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याचा आजचा कालखंड आहे. व्हॉट्सअॅपवर आलेले सारेच खरे, किंबहुना आपल्या मताला परिपोषक तेवढेच खरे, स्वीकारार्ह आणि अन्य भूमिका अस्वीकारार्ह किंवा चुकीच्या, असे मानण्याचा हा काळ. त्यात समोरची व्यक्ती ही व्हर्चुअली समोर आहे. या अप्रत्यक्षतेचा फायदा घेऊन गालीप्रदानाचा एक मोठा कार्यक्रम समाजमाध्यमांवर आज चालू असलेला दिसतो. समोरच्याचे म्हणणे समजून न घेता त्याला लक्ष्य करून त्याचा ‘कार्यक्रम’ करण्याचा एकमेव हेतू येथे दिसून येतो. हे समाजस्वास्थ्याला अतिशय घातक आहे. 

भविष्यामध्ये ही परिस्थिती बदलेल किंवा कसे, हे आताच सांगणे अवघड आहे. याचे कारण म्हणजे एकविसाव्या शतकात जन्मलेली पिढी ही एकीकडे अधिकाधिक तंत्रज्ञानाभिमुख होत असताना त्याच तंत्रज्ञानाच्या ज्ञानावर आणि साधनांवर आरुढ होऊन त्यांना विज्ञानवादाऐवजी अधिकाकधिक सनातनी, प्रतिगामी बनविण्यासाठी प्रयत्न करणारी एक मोठी फळी समाजमाध्यमांवर कार्यरत आहे. त्यामुळे विज्ञाननिष्ठेऐवजी परंपरानिष्ठ पिढी घडविण्याकडे या साऱ्याचा कल दिसून येतो. समाजमाध्यमेच कशाला? आपली दूरचित्रवाणीसारखी माध्यमेही तेच करताहेत. एके काळी दूरदर्शनने जी सामाजिक व राष्ट्रीय मूल्ये रुजविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली होती, ती तर आता मागेच पडली आहेत. मात्र, भांडवलदारांच्या हातात एकवटलेली विविध वृत्तमाध्यमे असोत अथवा मनोरंजन वाहिन्या, त्या अधिकाधिक परंपरानिष्ठ कन्टेंट देण्याकडेच झुकलेल्या आहेत. सणसमारंभ, देवभोळेपणा, अंधश्रद्धा यांची रुजवात करण्याकडे त्यांचा सारा झुकाव आहे. त्याच प्रकारचा कन्टेंट अगदी ठरविल्याप्रमाणे साऱ्या वाहिन्या देताना दिसताहेत. विज्ञानवाद आणि विज्ञाननिष्ठा ही तर त्यांच्या जमेतच नाही. सत्ताधार्जिणा मजकूर तयार करणे आणि त्याचे व्यापक प्रसारण करणे हाच एककलमी कार्यक्रम जणू साऱ्यांनीच अंगिकारलेला आहे. त्यामुळे यासाठी केवळ समाजमाध्यमांनाच दोष देण्यात काही अर्थ नाही. तथापि, समाजमाध्यमांवर सर्वसामान्य नागरिकांची अभिव्यक्ती उमटत असल्याने त्या अभिव्यक्तीची दिशा कोणती आहे, याची नोंद घेणे अगत्याचे ठरते. म्हणूनच त्याची अभिव्यक्ती येथे विविध गैरप्रकारांचा अवलंब करून प्रभावित करण्याचे होणारे प्रयत्न चिंतेत भर घालणारे आहेत.

सर्वसामान्य वापरकर्त्याचे भावविश्व, मतक्षेत्र प्रभावित करून त्याचा आपल्या लाभासाठी वापर करून घेण्यासाठी टपलेल्या भांडवलदार, व्यापारी, सत्ताधीश, नटनट्या आणि असे तमाम इन्फ्युएन्सर्स यांचा हा जमाना आहे. अनुनय करणारे अनुयायी घडविण्यासाठी या साऱ्यांची सातत्यपूर्ण धडपड सुरू आहे. त्यातून त्यांना त्यांचे अर्थकारण आणि राजकारण साधून घ्यावयाचे आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. फेक न्यूज, हेट स्पीच हे सारे त्याचेच घटक आहेत. सामाजिक सौहार्द राखण्याऐवजी समाजामध्ये तेढ निर्माण होऊन त्याचा आपले राजकारण, सत्ताकारण साधून घेण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल, याचाच विचार करणाऱ्यांचे प्रमाण येथे मोठे आहे. ते समजून न घेता त्यांच्या अशा कोणत्याही चिथावणीला बळी पडणाऱ्यांचे प्रमाण तर त्याहून मोठे आहे. परिणामस्वरुप, देशात मोठे अराजक निर्माण करू शकणाऱ्यांची एक मोठी फौज या माध्यमातून समोर तयार आहे. त्याचे परिणाम आपण पाहिले आहेत. अशा भडक माथेफिरुंनी निष्पापांना दगडांनी ठेचून मारलेले आहे, जिवंत जाळलेले आहे.

समाजमाध्यमे एकीकडे चांगली अशीच माझी एक वापरकर्ता म्हणून भावना असताना या सर्व गोष्टी सांगण्याचे कारण म्हणजे त्यांचा भविष्यात योग्य दिशेने, स्वच्छ आणि विधायक अभिव्यक्तीसाठी वापर झाला नाही, तर याच वास्तवाला आपल्याला भविष्यात अधिक प्रखरपणाने सामोरे जावे लागणार आहे. ही प्रखरता भीषणतेमध्ये केव्हा पालटेल, याचा पत्ताही आपल्याला लागणार नाही. त्यामुळे त्यांचा आपल्या सर्वंकष सामाजिक व राष्ट्रीय विकासासाठी जास्तीत जास्त वापर करण्यासाठी नवपिढ्यांना प्रवृत्त करणे, समाजमाध्यम वापराची साक्षरता व संस्कार रुजविणे, हे आपण आतापासून केले, तरच ते भविष्यात हितावह ठरणार आहे. अन्यथा नवनवीन तंत्रज्ञानाच्या आगमनाबरोबर समाजमाध्यमे अधिकाधिक प्रगत होत जातील, त्याचा परीघ विस्तारत जाईल, हे जितके खरे आहे, तितकेच त्यांचे दुष्परिणामांचे क्षेत्रही विस्तारत जाणार आहे, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. कारण चांगल्याऐवजी वाईटाकडेच मानवाचा कल तातडीने झुकतो, हा अखिल मानवजातीचाच इतिहास आपल्याला सांगतो. अहिंसेचा संदेश देणारा एखादाच बुद्ध किंवा गांधी मानवजातीच्या इतिहासावर आपले नाव कोरतो कारण बाकीचा समग्र इतिहास हा सर्व प्रकारच्या मनोकायिक हिंसेनेच तर व्यापलेला आहे.