सोमवार, २५ मार्च, २०१३

निखळ-५: तिसरा मृत्यू!
गेल्या पंधरवड्यात दोन हृदयद्रावक मृत्यू पाहिले... मरणारे माझ्या जवळचे होतेही.. अन् नव्हतेही... दोघांचही वय मृत्यूचं नव्हतं.. मृत्यू नैसर्गिक नव्हते... दोन्ही मृत्यूंमध्ये एकच साम्य... दोघांना उपचारांसाठी उत्कृष्ट हॉस्पिटल्समध्ये दाखल केलेलं... तिथंच त्यांचा मृत्यू झाला... एकाला महिनाभराच्या उपचारानंतरही नेमकं काय झालं होतं, हे समजूच शकलं नाही... तर एकाला मृत्यूची दुरान्वयेही शक्यता आढळत नसताना अतिरेकी उपचारांनी मारलं गेलं...
***
मृत्यू पहिला
तेरा वर्षांचा चुणचुणीत मुलगा... महिनाभर कमी-अधिक होणारा ताप... महिनाभरात गारगोटीच्या (जि. कोल्हापूर) फॅमिली डॉक्टरांकडे सलग उपचार सुरू... आठ दिवस त्यांच्याकडे ॲडमिटही... एके दिवशी आपल्याकडून निदान होत नाहीसे पाहून निपाणी (जि. बेळगाव) इथल्या डॉक्टरांकडं हलविण्याचा त्यांचा सल्ला... पुन्हा निपाणी येथील दवाखान्यात आठवडाभर ॲडमिट... सतत सलाइन, आयव्ही सुरूच... तापाला उतार नाही... रक्त-लघवी तपासण्या झाल्या... पण रोगनिदान नाही... तिथलेही डॉक्टर हतबल... कोल्हापूरच्या प्रतिथयश दवाखान्यात हलविण्याचा त्यांचा सल्ला... आईवडिल अस्वस्थ... मुलाला तातडीनं कोल्हापूरला हलविलं... तिथंही पुन्हा सर्व तपासण्या- पहिल्यापासून... पण निदान नाही... तापाला उतार नाही... दरम्यान मुख्य डॉक्टरांचं परदेशी प्रयाण- एका महत्त्वपूर्ण परिषदेसाठी... पेशंट सहकारी डॉक्टरच्या स्वाधीन... इकडे मुलगा अत्यवस्थ... आईबाप चिंताग्रस्त... डॉक्टरांकडून काहीच ठोस निदानही नाही की तापाला उतारही नाही... अखेर सहकारी डॉक्टरलाही काही समजेनासे झाले... त्याने परदेशी उडालेल्या मुख्य डॉक्टरला फोन केला... त्यांनी मुलाला पाचगणी (जि. सातारा) इथं त्यांच्या मित्राच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला... कशासाठी?... तर मुंबईत उतरल्यावर त्यांना तिकडे तातडीने पोहोचणे शक्य व्हावे म्हणून (खरे खोटे तेच जाणोत)... आईबापानं पुन्हा मुलाला पाचगणीला हलवलं... तोपर्यंत मूल कोमात... एक दिवस आधी आला असतात तरी केस हातात होती... तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं... मग आता?’... पिचलेल्या आईबापाचा प्रश्न... मुलगा येईल का यातून बाहेर? की न्यावं त्याला नातेवाईकांच्या भेटीसाठी परत गावी?’... इथं ठेवलंत तर एक टक्का गॅरंटी... नेलंत तर आम्ही नाही जबाबदार...बिच्चाऱ्या आईबापानं एक टक्का गॅरंटीवर विश्वास ठेवला... आणि गॅरंटी देणारा डॉक्टरच मुंबईला एका मिटींगसाठी निघून गेला... तो दुसऱ्या दिवशी परतला... तेव्हा त्या कोवळ्या कुडीतून प्राण उडाला होता... शेवटपर्यंत त्याला काय झालं होतं, समजलं नाही... अखेरच्या श्वासापर्यंत त्याला झालेल्या आजारावर उपचारच मिळाला नाही... लाख- दोन लाख रुपयांचा खर्च करूनही... पोर मेलं अखेर... क्षयाचे विषाणू मेंदूत भिनल्यानं... कुठलाही रिपोर्ट आईबापाला पाह्यला मिळाला नाही की हातात पडला नाही... हातात पडलं ते तेरा वर्षं तळहातावर जपलेल्या मुलाचं निष्प्राण कलेवर... एका कुटुंबाचं आशास्थान, भवितव्य काळोखलं... जबाबदार कोण?
***
मृत्यू दुसरा
अठ्ठावीस वर्षांचा उमदा युवक... स्वतः एमडी... स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर... विदर्भातल्या गरीब कुटुंबातून येऊन सारी प्रगती साधलेली... गोरगरीबांच्या सेवेचं व्रत स्वीकारलेलं... त्यासाठी कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात नोकरी पत्करलेली... रात्रंदिवस सेवा करतानाच तारुण्याची स्वप्नंही पूर्ण करण्याची अखंड धडपड सुरूच... संशोधनातही अग्रेसर... यंदा कर्तव्यपूर्ती करण्याचाही मानस होता... पण... अचानक डेंगीच्या डासानं लक्ष्य साधलं... साताऱ्याच्या फॅमिली डॉक्टरकडं योग्य उपचार... पण थोड्या मर्यादा पडल्यानं पुण्याला नामवंत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचा निर्णय... निर्णयप्रक्रियेत या तरुण डॉक्टरचाही सहभाग... दोन दिवसांत रक्तातल्या प्लेटलेट्स वाढून पुन्हा घरी परतू, असा अभ्यासपूर्ण आत्मविश्वास... त्याची अट/अपेक्षा फक्त एकच... मला व्हेंटिलेटर तेवढा लावू नका’… ‘आयसीयूमध्ये मॉर्निंग वॉक घेणारा हा एकमेवच पेशंट असावा... पण दुपारी काय झालं कोणास ठाऊक?... कुटुंबियांचा विरोध डावलून उपचार करणाऱ्या मुख्य डॉक्टरनं अचानक पेशंटला व्हेंटिलेटर लावण्याचा निर्णय घेतला... आधीच अँटिबायोटिक्सच्या माऱ्यानं शिथिल झालेल्या डॉक्टर कम् पेशंटचा विरोध तोकडा पडला... आणि तिथून पुढं कुटुंबियांना धक्क्यावर धक्के सहन करावे लागले... पहिल्या तासानंतर किडनी फेल्युअर... आणखी एका तासानं लीव्हर फेल्युअर... आणखी दीड-दोन तासात पेशंटचाच खेळ खल्लास... मृत्यूचं कारण काय?... डेंगी, पण ते दुय्यम कारण... प्रमुख कारण ठरलं, मल्टीऑर्गन फेल्युअर... दोन दिवसांत रिकव्हर होण्याचा आत्मविश्वास असलेल्या एमडी डॉक्टरचाच हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून अवघ्या दहा तासांत मृत्यू... या दहा तासांत त्याच्यावर ६५ हजार रुपयांच्या ॲटिबायोटिक औषधांचा अखंड भडीमार... लाखाचं बील कुटुंबियांच्या हातात देणाऱ्या हॉस्पिटलनं लाखमोलाचा जीव मात्र घेतला... एका कुटुंबाचीच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्राची आणि त्या योगे समाजाची झालेली ही हानी... कधीही भरून न येणारी... जबाबदार कोण?
***
माझ्या जवळचे, म्हणून हे दोन मृत्यू आणि त्यामागील वस्तुस्थिती मला सांगता आली... दररोज मरणाऱ्या हजारोंमध्ये असे किती असतील?... माहीत नाही... त्यांचं जीवन कुणासाठी पणाला लावलं जातंय... आणि कशासाठी?...
या दोन मृत्यूंपेक्षाही आणखी एक तिसरा मृत्यू झालाय... जो खूपच चिंताजनक आहे...
***
मृत्यू तिसरा
वैद्यकीय प्रॅक्टीसच्या नोंदणी प्रसंगी घ्यावयाची शपथ...माझे संपूर्ण जीवन मी मानवतेच्या सेवेसाठी समर्पित करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होत आहे... कोणत्याही दबावाला बळी न पडता, मी माझे वैद्यकीय ज्ञान कधीही मानवतेच्या नितीनियमांविरुद्ध वापरणार नाही... मानवी जीवनाप्रती मी सदैव सर्वोच्च आदर बाळगेन... माझे कर्तव्य आणि माझा रुग्ण यांच्यामध्ये मी कधीही धर्म, राष्ट्रीयत्व, वंश, पक्षीय राजकारण अथवा सामाजिक भेदभाव येऊ देणार नाही... माझी वैद्यकीय सेवा मी पूर्णतः सजगपणे आणि निष्ठापूर्वक करीत राहीन... माझ्या रुग्णाचे आरोग्य जपण्याला माझे प्रथम प्राधान्य राहील... सेवेच्या अनुषंगाने येणाऱ्या गोपनीयतेची मी रक्षा करेन... माझ्या गुरूंप्रती सदैव आदरभाव बाळगेन... वैद्यकीय व्यवसायाच्या आदर्श, सन्मान्य परंपरा मी सर्वार्थाने जपेन... माझ्या सहकाऱ्यांशी मी उचित सन्मानपूर्वक वागेन... इंडियन मेडिकल कौन्सिल (प्रोफेशनल कन्डक्ट, एटिकेट ॲन्ड एथिक्स) रेग्युलेशन्स, २००२ मधील सर्व वैद्यकीय नितीमूल्यांची जोपासना करण्यास मी प्रतिबद्ध राहीन...
... या शपथेच्या मृत्यूला जबाबदार कोण?

गुरुवार, १४ मार्च, २०१३

कल आणि कौल..!('शेती-प्रगती' मासिकाच्या मार्च २०१३च्या ताज्या अंकात प्रकाशित झालेला माझा प्रासंगिक लेख...)

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतंच दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण केलं आणि माध्यमक्रांतीमुळं साऱ्या देशालाही ते ऐकायला-पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतरचा भारतीय जनता पक्षाचा नवा विकासाभिमुख चेहरा म्हणून सामोरे आणण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू झाले आहेत. वाजपेयींच्या धर्मनिरपेक्ष म्हणा किंवा सर्वसमावेशक प्रतिमेचा तत्कालीन एनडीए सरकारला मोठ्या प्रमाणात लाभ झाला होता. बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेसेतर सरकार केंद्रात (तारेवरची कसरत करत) पाच वर्षे चाललं. मात्र, फील गुड कँपेनच्या अतिरेकी लाटेमध्ये पुन्हा काही सत्तेत येण्याची संधी त्यांना मिळाली नाही, आणि भाजपच्या उमा भारतींसारख्या नेत्यांसह त्यांचे घटक पक्षही त्यानंतर दुरावत गेले. महत्त्वाचं म्हणजे ज्या राममंदिराच्या मुद्द्यावर भाजप सरकार सत्तेत आलं, त्या मुद्द्याबाबत या पाच वर्षांच्या काळात त्यांना काहीही करता येऊ शकलं नाही. गेल्या दहा वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. वाजपेयी वयानुसार अज्ञातवासात गेले. अडवाणींच्या रथयात्रेची बोथट झालेली धार, त्यांनी पुन्हा रथयात्रा काढून अनुभवली. मुरलीमनोहर जोशीही शांत झालेत. सुषमा स्वराज यांच्यासारख्या महिलेमध्ये क्षमता असूनही (कदाचित केवळ महिला म्हणून?) पक्षाच्या नेते पदापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं. गडकरी आले, पायउतार झाले. जेठमलानी दुरावले. राज्य स्तरावरही पक्षाची मोर्चेबांधणी कमी पडू लागली. कर्नाटकात यादवी माजली.
या सर्व पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी मात्र विकास घडवून आणण्याच्या दृष्टीनं चंग बांधला. प्रत्यक्षात विकास किती झाला हे मोदी आणि गुजरातची जनताच जाणो; परंतु प्रसारमाध्यमांना हाताशी धरून तसं वारं निर्माण करण्यात मात्र मोदींना यश आलं, एवढं खरं. गोध्रा हत्याकांडाचा कलंक कुणी कितीही प्रयत्न केला तरी मोदींना पुसता येणार नाही; या हत्याकांडामुळं भारतीय समाजमनावर झालेली तीव्रतर जखम सहजी भरून येण्यासारखी नाहीय. या कृत्याबद्दल मोदी यांना भारतीय समाजमन माफ करेल, असंही नाहीय. दरम्यानच्या काळात मोदी यांनी उपोषणादी प्रकार करून सर्वधर्मीयांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी इस्लाम धर्मगुरूंनी त्यांच्यासाठी भेट आणलेला ताकिया मस्तकी धारण करण्यास नकार दिला. यावरुन मोदींच्या सहिष्णु आणि दांभिक सर्वधर्म समभावाचं दर्शनच यातून झालं. पण पुन्हा एकदा त्यांच्या या प्रयत्नांना देशभरात व्यापक प्रसिद्धी मिळाली (देण्यात आली.).
याखेरीज दरवर्षी गुजरातमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासाठी एनआरआय उद्योजकांची प्रचंड मोठी अशी परिषद मोदी भरवतात. राज्याचे सारे अधिकारी तिथं उपस्थित असतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या उद्योगांना जाग्यावर मंजुरी आणि त्यासाठी आवश्यक सर्व शासकीय बाबींची पूर्तता करवून घेतात. जगभरात पसरलेल्या गुजराती उद्योजकांना मायभूमीची हाक म्हणून ते अगत्यानं बोलावतात आणि गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करतात. यामुळं त्या दोन तीन दिवसांत हजारो कोटींची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक गुजरातेत होते, त्याची देशभरात चर्चा होते आणि त्या योगे गुजरातमध्ये होत असलेल्या विविध विकास कामांना व्यापक प्रसिद्धीही मिळते.
मोदी यांची विकासपुरूष अशी प्रतिमा देशपातळीवर निर्माण झालेली आहे. सध्या आपल्या देशातला युवक मोदी यांच्या या प्रतिमेच्या प्रेमात पडलेला दिसतोय. मात्र असं मोदींच्या प्रेमात पडत असताना सुप्रशासन आणि विकास या संकल्पनांच्या संदर्भात त्यांच्या मनात माजलेला गोंधळच अधिक अधोरेखित होताना दिसतोय.
आजच्या भारतीय युवक-युवतींना आपल्या देशाच्या विकासाखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये, राजकारणात रस नसला ही गोष्ट खरी असली तरी आपल्या नेतृत्वाच्या मात्र ही गोष्ट लक्षात येत नाहीय, असंच सध्याचं वातावरण आहे. मोदी यांना भाजपने आपल्या पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून फोकस करायला सुरवात केली. सरसंघचालक मोहन भागवतांनीही भर कुंभमेळ्यात २०१४च्या निवडणुकीत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदी हेच असतील, असं सांगितलं. मोदी यांची निर्माण झालेली विकासपुरूष ही प्रतिमा एन्कॅश करण्याचा संघाचा हा थेट प्रयत्न आहे. तो असू नये, असं म्हणण्याचं कारण नाही. पण, त्याचवेळी मोदी यांना तरुण वर्गाचा जो पाठिंबा प्राप्त होतो आहे, तो केवळ देशाच्या विकासाच्या मुद्यापुरता मर्यादित आहे, पण ही गोष्ट सरसंघचालकांच्या ध्यानात आल्याचं काही दिसत नाही. कारण मोदी यांच्या नावाला पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देत असताना त्यांनी पुन्हा राममंदिराची शर्त त्यांच्यापुढं ठेवली आहे. मोदींच्या लोकप्रियतेच्या आडून किंवा आधारे आपला मूळ अजेंडा पुढं दामटण्याचा त्यांचा हा प्रयत्न सहजी यशस्वी होण्याची शक्यता नाही. मात्र, त्याचा नकारात्मक फटका बसण्याची शक्यताच अधिक वाटते.
गुड गव्हर्नन्स आणि डेव्हलपमेंट यांच्या स्पेलिंगमध्ये जितका फरक आहे, तितकाच या दोन संकल्पनांमध्ये आहे. चांगल्या प्रशासनाच्या माध्यमातून विकासाच्या दिशेनं वाटचाल होण्याची शक्यता अधिक वाढते, इतकंच! मोदींच्या बाबतीत तर अजूनही बूँद से.. गेलेली प्रतिष्ठा हौदानं सावरण्याचा त्यांचा अजूनही प्रयत्न सुरू असावा, असा दाट संशय येण्यासारखी त्यांची वर्तणूक दिसते. त्यांना ताकिया प्रदान करायला गेलेले मुस्लीम कार्यकर्ते हे सिंहाच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेलेल्या हरिण, सशांसारखे वाटतात मला. फक्त अंदाज घ्यायला गेल्यासारखे. गुजरातमधली ही सामाजिक दरी अद्यापही सांधली गेलेली नाही, ही बाबच त्यातून प्रकर्षानं अधोरेखित होते. या पार्श्वभूमीवर गुजरातबाहेर मोदींची ग्लोरीफाइड प्रतिमा निर्माण करण्यासाठी विकासाची आस घेऊन बसलेल्या तरुणांचा वापर करणं, ही खचितच योग्य बाब नाही.
तरुणांना गृहित धरण्याचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या लाटेवर स्वार होण्याचा हा या वर्षभरातला तिसरा प्रकार आहे. गेल्या वर्षाच्या सुरवातीला अण्णा हजारे यांनी जे लोकपाल जनआंदोलन पुकारलं. त्याला युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला. याचं कारण म्हणजे देशात फोफावलेला भ्रष्टाचार कुठंतरी संपला पाहिजे, ही त्यांची भावना होती. आणि त्या भ्रष्टाचाराला सुरूंग लावण्याचं काम अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी करताहेत, अशी तरुणांची भावना होती. त्यामुळं त्यांच्या आंदोलनाला युवकांच्या सहभागामुळं, पाठिंब्यामुळं खऱ्या जनआंदोलनाचं स्वरुप प्राप्त झालं. पण अण्णांचे साथीदार म्हणून झोतात आलेल्या अरविंद केजरीवाल आदी प्रभृतींना मिळणाऱ्या व्यपक प्रसिद्धीचा हव्यास निर्माण झाला. आणि त्यावेळी निर्माण झालेल्या लोकप्रियतेच्या वाटेवर स्वार होत त्यांनी पुन्हा राजकीय पक्ष काढण्याचा मार्ग अनुसरला आणि युवा वर्गाच्या पदरी निराशा आली. भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनातून हाती काही पडण्याऐवजी आपल्याला वापरून घेतलं जातंय, हे तरुणांच्या लक्षात आलं आणि पुढच्याच वेळी या आंदोलनाला मिळालेल्या थंड्या प्रतिसादातून त्याची प्रचिती आली.
नवी दिल्लीत झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या विरोधातही युवा वर्ग मोठ्या संख्येनं संघटित होऊन रस्त्यावर उतरला. राजधानीत सातत्यानं वाढत चाललेल्या महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात उमटलेली ती एक संतप्त प्रतिक्रिया होती. पण या लाटेवरही स्वार होण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षानं आणि संघटनेनं चालवला आणि दिवसागणिक हे आंदोलनही भरकटत गेल्याचंच दिसू लागलं. या आंदोलनापासूनही मग समंजस तरुणाई दूर होताना दिसली. पण सोशल मिडियासारख्या नव्या माध्यमांतून मात्र त्यांनी आपली लढाई जिवंत ठेवली.
त्यामुळं आजच्या देशातल्या युवावर्गाला कोणत्याही पक्षानं किंवा संघटनेनं गृहित धरण्याची चूक करता कामा नये. तथापि, तरुणांनाही आपला सातत्यानं वापर केला जातो आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. असं का होतं, कारण माध्यमांतून आपल्यासमोर पटकन उभ्या राहणाऱ्या किंवा उभ्या करण्यात येणाऱ्या गोष्टींवर, प्रतिमांवर ते पटकन विश्वास ठेवतात. ग्लॅमरला भुलतात. सोशल नेटवर्कवर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये अभ्यासाऐवजी अधिकतर भावनात्मकतेचंच प्रतिबिंब उमटत असतं. नेमक्या याच गोष्टीचा फायदा उचलला जातो आहे. विकासाची आस तरुणांच्या मनात आहे, म्हणजे मग त्याच शब्दाचा भुलभुलैय्या करून त्यांच्या मनात प्रतिमानिर्मिती करून पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं तरुणांच्या भावनात्मकतेचाच वापर करून घेण्याचा एक अतिशय वेगळा प्रयत्न आकाराला येतो आहे. तरुण वर्गाचा कल (Inclination) हा जणू कौलच असल्याचा आवेष आणला जातो आहे, ही खेदाची बाब आहे. या षडयंत्राची जाणीव युवावर्गाच्या मनात चेतवण्याची गरज आहे.

बुधवार, १३ मार्च, २०१३

निखळ-४: ‘मार्क्स’वाद!
कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगेल्स आदी प्रभृतींनी एकोणीसाव्या-विसाव्या शतकात ज्या मार्क्सवादी, समाजवादी विचारांची रुजवात केली, त्या मार्क्सवादाशी आज मी आपल्याला सांगत असलेल्या आजच्या मार्क्सवादाचं काही देणं घेणं नाही,  याची तमाम वाचकांनी सुरवातीलाच नोंद घ्यावी. आमचा MARX वाद नाहीय, तो आहे MARKS वाद!

झालं काय की, काही दिवसांपूर्वी मी ऑफिसमधून घरी पोहोचलो. वातावरण गंभीर होतं. ज्युनिअर केजीत असलेल्या माझ्या साडेचार वर्षांच्या (पाहा, किती मोठी झालीय!) लेकीची फायनल एक्झाम सुरू होती. तिची आई (आमच्या मिसेस हो!) तिला समजावून सांगत होती, - तू हे असं लिहिलं नाहीस किंवा असं म्हटलं नाहीस, तर तुला टेन आऊट ऑफ टेन पडणार नाहीत, बरं!’ तिचं हे वाक्य ऐकून मी चक्रावलो; पण, एक जण मुलांना काही सांगत असेल, तर दुसऱ्यानं ते तोडायचं नाही, असं आमचं ठरलं असल्यानं मी काही न बोलता आवरु लागलो. नंतर बायकोच्या टेन्शन वाढण्यानं या अभ्यासाची सांगता झाली. आणि मी तिला हळूच म्हणालो, अगं, या वयात आपण शाळा बघितल्याचं तरी तुला आठवतंय का? मग मार्क मिळवणं तर दूरच!’ बायकोचं उत्तर तयार होतं, पण आता ती जात्येय ना शाळेत? तिच्या बरोबरीच्या सगळ्या मुलांनाही हे करावंच लागतं! मग तिच्याकडून करून नको घ्यायला?’ मी म्हटलं ठीक आहे, पण जरा सबुरीनं घे. तिनं तिला जमेल तेवढं केलं तरी पुरेसं आहे. मार्कांसाठी तिच्यावर बर्डन नको.
आमचा नवरा-बायकोचा संवाद इथं संपला तरी या मार्क्सवादाच्या झंझावातात आपण पुन्हा एकदा प्रवेश केल्याचं मला जाणवलं. पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं की, आम्ही शाळेत असताना विशेषतः दहावी-बारावीच्या वेळी याच मार्क्सवादाची कास अगदी करकचून धरली होती. बोर्ड फाड के.. पहिल्या पन्नासात येणाऱ्या मुलांचे मार्क्स ऐकून छातीत धडधडायचंच, पोटात गोळा उठायचा. आणखी बऱ्याच उद्विग्न भावना मनात दाटून यायच्या.  वाटायचं, कसं काय बुवा इतके मार्क या मुलांना पडत असतील? आणि त्यांच्या पेपरमधल्या आणि पुढं दूरदर्शनवरच्या मुलाखती पाहिल्या की आणखीच टेन्शन यायचं. कुणी चौदा तास, तर कुणी अठरा तास अभ्यास करणारं असायचं. या पार्श्वभूमीवर एखाद्यानं फक्त सहा तास मनापासून अभ्यास केल्याचं सांगितलं, तर ते काही पटायचं नाही. या बोर्ड फाडणाऱ्या मुलांना कुठल्या विषयात मार्क्स पडले, यापेक्षा त्यांचे दोन-तीन मार्क्स कुठल्या विषयात गेलेत, हे पाहण्यातही आम्हाला रस असायचा. सायन्स-गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवायचं स्वप्न आमच्याही मनात दाटून आल्याचं आठवतंय. पण कसचं काय? स्वप्नच ठरलं ते! आईवडिलांनी असं मार्कांसाठी आम्हा भावंडांवर कधी दडपण आणलं नसलं तरी त्या बोर्डवाल्या मुलांचं कौतुक त्यांच्या तोंडून ऐकताना आपणही तशा कौतुकाला पात्र होण्यासाठी म्हणून भरपूर मार्क्स मिळवावेत, असं वाटायचं. त्यासाठी तेव्हा नवीनच आलेला आणि बोर्डात आलेल्या मुलांनी रेफर केलेला दहावी दिवाळीचा अंक माझ्या एका काकांनी मला भेट दिला होता. तेव्हा आता बोर्डात मीच पहिला येणार, अशीही भावना पुन्हा कितव्यांदा तरी मनात दाटून आली. बोर्डात आलेल्या मुलांनी वापरला, म्हणून पायलट पेनालाही माझ्या कंपास बॉक्समध्ये मानाचं स्थान लाभलं होतं. पण आमची झेप कुंपणापर्यंतच! (हे काय सांगायला हवं?) एक होतं, आर्थिक, सामाजिक हालाखीच्या परिस्थितीतूनही ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम मार्क्स मिळवलेत, त्यांचं उदाहरण मात्र माझे आईबाबा आवर्जून देत. अशा मुलांविषयी मात्र मनात आदर निर्माण व्हायचा. त्या मुलांकडं कोणतंही पाठबळ नसताना ती कष्ट करून, अभ्यास करून इतके मार्क मिळवतात. आपल्याला तर तशी कोणतीच झळ नाही, फक्त अभ्यास एके अभ्यास करायचाय. मग आपण नेटानं प्रयत्न करायला काय हरकत आहे, अशा सकारात्मक विचारांनी मन भारुन जायचं.
आमच्या मार्क्सवादाच्या काळात एक झालं की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे गुरू मात्र भेटत गेले. मग ते कॉलेज-विद्यापीठात असो की नोकरीच्या ठिकाणी! तुम्हाला सांगतो, आयुष्यात हा गुरू भेटणं फार महत्त्वाचं असतं. अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक खूप असतात, पण सुसंस्कृत बनविणारा, जगण्याच्या लढाईला समोरं जाण्यासाठी पाठीवर हात ठेवून फक्त लढ.. म्हणून प्रोत्साहन देणारा, सावरणारा गुरू मात्र दुर्मिळ झालाय. चांगला गुरू करायलाही मुलांना शिकवायला हवं. गुरूही असा की, शिष्य आपल्यापेक्षा मोठा झाला, याची खंत वाटण्याऐवजी अभिमान वाटावा त्याला; आणि शिष्यही असा की, कितीही मोठा झाला तरी गुरुच्या चरणी त्यानं नतमस्तक व्हावं! (अपवाद असणाऱ्या सर्व गुरूवर्यांची मी क्षमा मागतो, पण, आजच्या बाजारीकरणाच्या काळात माझ्या मुलांना असा गुरू भेटेलच, याची शाश्वती खरंच वाटत नाही.)
या पार्श्वभूमीवर, पुन्हा हा मार्क्सवाद माझ्या घरात नव्यानं प्रविष्ट झालाय. कदाचित, मी ही माझ्या आईबाबांप्रमाणं मुलांवर दडपण आणणार नाही, पण या सिस्टीमचं प्रेशर- जे त्यांच्या बालमनावर येतच राहील, त्याला मी कसा प्रतिबंध वा प्रतिरोध करणार? त्या प्रेशरवर मात करण्यासाठी आणि सिस्टीमशी जुळवून घेण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त कम्फर्ट करणं, एवढंच माझ्या हातात उरतं.
मग, मी काय करतो, लेकीला हळूच कुशीत घेतो, तिला थोपटतो आणि सांगतो, बेटा, उद्या तुझ्या सगळ्या मैत्रिणी ऱ्हाइम्स म्हणतील आणि तुला आली नाही तर तुलाच वाईट वाटेल कीनई? चल आपण दोघे मिळून प्रॅक्टीस करू!’ आणि आम्ही दोघंही तारस्वरात म्हणू लागतो-
                  ओल्ड मॅक्डोनल्ड हॅड अ फार्म.. इ..या..इ..या..ओ!’