सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

कन्फ्युजन!('दै. पुढारी' पणजी आवृत्तीच्या दिपावली विशेषांकात प्रकाशित झालेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)


स्साला, काय माजरा आहे, काही समजतच नाही... की काही तरी माजरा आहे, म्हणूनच काही समजत नाही, कळायला मार्ग नाही. सारा भोवताल, सारा आसमंत गजबजलेला, माहौल तय्यार झालेला.. पण तरीही काही तरी गडबड आहे... गडबड नेमकी कशात आहे, कळायला मार्ग नाही. पण, आहे खरी!
इथं प्रत्येकाला घाईय.. कशाची ना कशाची तरी.. काही ना काही तरी मिळवण्याची.. अचिव्ह करण्याची... त्यासाठी हरेक जण पळतोय नुस्ता.. धावतोय ऊर फुटेस्तोवर... मनातल्या मनात इतर पळणाऱ्यांशी प्रत्येकानं स्पर्धाही मांडलीय... इतरांचं काय घेऊन बसलात.. मी सुद्धा त्यातलाच! खोटं कशाला बोला?
पण, हे सारं कशासाठी? सिद्ध काय करायचंय यातनं, मला, आम्हाला, आपल्या सर्वांना? सारी यातायात, काही तरी मिळविण्यासाठी.. हे काही तरी, नेमकं आहे तरी काय? स्वत्व, आत्मसन्मान, प्रतिष्ठा, पैसा, ऐषोआराम की अन्य काही... सारा अट्टाहास भौतिक सुखांसाठी... हा आरोप आहे की कबुली जबाब... कारण चाललंय तर सारं स्वगतच... आरोप म्हणून जरी घेतला तरी कबुलीही देऊन टाकायला काय हरकत आहे?.. येस्स, हवीयंत मला सारी भौतिक सुखं... त्यासाठी बक्कळ पैसाही मिळवायचाय... त्या पैशाच्या जोरावर मला हवं ते सुख, सेवा मी घेऊ शकेन... रादर, वाजवून घेईन... का घेऊ नये, सांगा ना... माझ्या भोवतीचं जग मला उद्युक्त करतंय, त्यासाठी... जन्मल्यापासून किंबहुना, जन्माच्या आधीपासून... आईच्या पोटात असल्यापासून ते आतापर्यंत... सारा ईहवाद, भौतिकवाद गुंफला गेलाय माझ्याभोवती... साऱ्यांचे फास केव्हाचे तयार आहेत, मला त्यांच्या जाळ्यात खेचण्यासाठी... असलं भारी जाळ टाकलंय की कुठेही जा, कसेही जा, तुम्ही त्या जाळ्याला ओलांडून नव्हे, चुकवूनही जाऊ शकत नाही... कारण ते इतकं मस्त विणलं गेलंय ना तुमच्याभोवती, नव्हे आपल्याभोवती... अगदी त्या स्पायडरच्या जाळ्यासारखं... सुटण्यासाठी चुकूनही हालचाल केली ना, की हे पाश आपोआप अधिक वाढतात, त्यांचा गुंता, त्यांची पकड अधिकच घट्ट होत जाते आपल्या मानेभोवती... आपल्या खिशावर... ही पकडही अशी की हवीहवीशी वाटणारी... एकदम नशिली... बेधुंद करणारी... डान्स बारमध्ये गेल्यावर जसं समजत नाही की नशा नेमकी कुणामुळं चढत्येय, दारुमुळं, तिथं नाचणाऱ्या मुलींमुळं, कर्णकर्कश्य संगीतामुळं की आपल्या आतच खवळलेल्या जनावरामुळं?... पण, नशा असतेच ना... धुंदी चढतेच ना... मग तीच महत्त्वाची... बाकी सब झूठ... क्काय? तस्संच झालंय आपल्या आयुष्याचं... झिंगेचं कारण माहीत नाही... ते चांगलंय, वाईटाय काहीच ठाऊक नाही... काही कारण आहे की नाही, हेही तरी कुठं ठाऊकाय? ... पण, तिचं अस्तित्व आहेच ना... मनभर पसरणारं... शरीराला कवेत घेणारं... मनापेक्षा हे शरीरच महत्त्वाचं झालंय स्सालं आजकाल... पण, आपण तरी मनाला कुठं किंमत देतो... विचारतोय कोण त्याला?... हां, आता कुठलीही तल्लफ त्याला झाली की आपण करतो बरं का मनाचंही समाधान... भागवतो त्याचा कंड... त्याला हव्या त्या मार्गानं... मग खोलवर आत कुठं तरी थोडं शांत, गार झाल्यासारखं वाटतं.. पण, तेवढ्यापुरतंच... मग पुन्हा काही वेळानं तेच ते अन् तेच ते!
मनाचं अस्सं, तर शरीराचं आणखीच वेगळं मागणं... लहानपणापास्नं, वयात येण्याआधीपास्नं आणि आता वयात आल्यानंतर सुद्धा- ज्या गोष्टीसाठी, ज्याभोवती साऱ्या बाजारव्यवस्थेचा डोलारा उभा केला गेलाय- त्या गोष्टीपास्नं अजूनही आम्हाला लांब लांबच राखलंय... घालमेल होतेय, बेचैनी मनाचा, शरीराचा नुस्ता कोंडमारा करत्येय... सारं काही शारीर आहे, असं ही बाजार यंत्रणा सातत्यानं मारा करत्येय एकीकडे... आणि दुसरीकडे संस्कृती म्हणून लादल्या जाणाऱ्या पुराण गोष्टीसाठी आम्हाला आमच्या शारीर गरजांना वेसण घालावी लागत्येय... वयात आल्यावर, तोपर्यंत दाबून धरलेल्या शारीर ऊर्मी स्वस्थ बसू देत नाहीत... कश्शा-कशात लक्ष लागत नाही... काही करावंसं वाटत नाही... मन कशातही रमत नाही... सेक्सचा, सेक्सच्या हव्यासाचा नुसता धुमाकूळ चालतो डोक्यात... एक सैतान मनात थैमान घालत राहतो, सारखा... म्हणतो, जा, हवंय ना! घे मग ओरबाडून मिळेल तिथून... आणि मिळणार नाही तिथूनही... पण, घे.. त्यानं अस्वस्थता होत्येय का कमी, बघ... नाही झाली, तर मग पुन्हा सिद्ध हो ओरबडायला... हवं तसं.. हवं तिथून...
दुसरीकडं आणखी एक क्षीण आवाज पिच्छा करतच राहतो... नो डिअर, यात काय मज्जा... असं करणं बरोबर नाही... बरोबर होणार नाही- पेक्षा बरोबर दिसणार नाही, हे अधिक पटतं... मग, आम्ही पुन्हा थंड पडतो... तेवढ्यापुरतेच... पुन्हा सैतानाचा थयथयाट आणि पुन्हा त्याच्या मागण्या... त्याच त्या अन् त्याच त्या...
सुचत नाही यातनं काही... सुटण्याचा मार्ग दिसत नाही... कारण तो नाहीयेच मुळी... या भुलभुलैयातून सुटण्याचा मार्गच नाही... असं कसं नाही? काही तरी असेलच ना! मग, पुन्हा एक शोध सुरू होतो, स्वतःचाच, नव्याने... कोSहम्’… ‘कोSहम्’? युगानुयुगे अनेकांनी या प्रश्नाचा शोध अन् वेध घेतला... त्यातून वैश्विक उत्तर देण्याचाही प्रयत्न केला... पण, प्रत्येकाचा आपल्यापुरता आपला शोध हा घेतला जायला हवा... साऱ्या शारीर फेऱ्यांतून गेल्यानंतर, साऱ्या भौतिकतेच्या विळख्यातून थोडंसं डोकं वर करण्याची संधी मिळाल्यावर हा स्वतःचा शोध घेण्याची संधी घेतली जायला हवी... तशीच मीही घेतोय.. पण हाती काय लागेल, याचा नेम नाही... शोध घेतोय इथपर्यंतच ठीक राहतं... मनाची समजूत पटते... पण, त्यापुढं काय?  मला मीच गवसत नाही, तर इतर गोष्टींचं काय? गवसेन तरी कसा? ही शोधयात्रा अनंत आहे... माझ्या नव्हे, आदमच्या जन्मापासून... इव्हच्या ॲपलपासून... आणि त्यानंतरच्या प्रत्येक नव्या सृजनापासून... हो सृजनच!.. का गडबडलात? हल्ली तसं काही नसतं का? असतं तरी कुठं म्हणा?... सृजनशीलता राहिलीय कुठं? आता ती उरलीय फक्त मातेच्या उदरापुरतीच! नवजात बालकाला जन्म देताना मातेला होणारा सर्जनाचा आनंद कुठल्या मोजपट्टीवर मोजता येईल का? अत्युच्च सृजनशीलतेचा क्षण तो... क्षणाचाच अनुभव तो, पण आयुष्यभर पुरून उरणारा! आता पोटफाड्या कसायांनी आणि नाजूक नव्हे मनानंच कमकुवत झालेल्या बायाबापड्यांनी हे सृजनही आता इतिहासजमा करायचं ठरवलेलं दिसतंय...  करोत बिचारे... इतरांप्रमाणंच त्याचंही होईल... होऊ देत... वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, की कोणालाच वाईट वाटत नाही... कारणही तेच... फरक इतकाच की क्रिएटिव्हीटी संपवली जात असताना पॅसिव्हिटी मात्र जाणीवपूर्वक वाढविली जातेय... जोपासली जातेय... कुणाच्याही नकळत... समाजाला एकीकडं त्याच्यातील संवेदनशीलता जागृत असल्याचा आभास करून देणारं आभासी भवताल त्याच्याभोवती जाणीवपूर्वक उभारलं गेलंय... त्याचवेळी त्या षंढ संवेदनशीलतेमधून साहजिकच कोणतीही कृतीशीलता निर्माण होणार नाही, याचीही पुरेपूर दक्षता घेतली गेलीय... काय मज्जाय नै... संवेदनशीलता जपल्याचा आभास आणि वर सच्ची कृतीशून्यता... त्यातूनही डोकं वर काढणाऱ्यांचं डोकं उडवून टाकण्याचा सारा इंतजाम तैनात केलेला आहेच... त्यामुळं ही पॅसिव्हिटी हे आजच्या समाजाचं व्यवच्छेदक लक्षणच बनलंय जणू...
काय मस्त दिवस आलेत पाहा... नाचणं, गाणं ही आजच्या क्रिएटिव्हीटीची निव्वळ मोजमापं बनलीयेत... आणि ते म्हणजेच क्रिएटिव्हीटी मानणाऱ्यांचा फौजफाटा ऊतू चाल्लाय... पण, दोन्ही ठिकाणं खरं तर पॅसिव्हीटीची उगमस्थानं बनून गेलीयत... पॅसिव्हिटी हा गोंडस शब्द असला तरी षंढ हाच त्यासाठीचा खरा चांगला शब्द... हा षंढपणा पुरेपूर उतरलाय आपल्या लाइफ स्टाइलमध्ये... उगा आपलं त्याला सभ्यपणाच्या कोंदणात बसविण्याचा प्रयत्न करण्याला काहीच अर्थ नाही... आपल्यात दम नाही, हे एकवार मान्य करून टाकायला हवं... पण, तितकाही दम नाही आपल्यात... करणार काय? काही करत नाही, करता येत नाही, म्हणून तर या आरोपांचा सामना करावा लागतोय... पुनःपुन्हा... पुनःपुन्हा!
काही करावं म्हटलं तरी, या सिस्टीमनं आपलं इतकं बाहुलं करून टाकलंय की, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारा, चुकीविरुद्ध दाद मागणारा आज या यंत्रणेपुढं तर मूर्ख ठरतोच, पण, समाजाच्या दृष्टीनंही तो XXयाच ठरतो... हां, आता त्यानं उठवलेल्या आवाजापुढं यंत्रणा नमली, तर तेव्हा मात्र तिथं निर्लज्ज लाभार्थ्यांची रांग पाह्यला मिळते... असला दुटप्पीपणा, दांभिकपणा भरलाय सारा परिसरात...
या गदारोळात मग पुन्हा एकाकीपणाची भावना तीव्र बनते... स्वतःचा शोध घेताना मीच अधिक सापडलेला असतो. त्यामुळं पुन्हा त्या भानगडीत न पडता आपल्यासारख्या एकाकींच्या शोधात मी निघतो... मला काही त्यांचा कारवाँ वगैरे बनवायचा नाही... नक्कीच नाही... ती लायकीही नाहीय माझी... फक्त एक समाधान मिळवायचंय... की स्साला या आलम दुनियेत केवळ आपण एकटेच एलियन नाही आहोत... आपल्यासारखे आणखीही काही जण आहेत... जे, काही का असेना विचार करतायत... ते पॅसिव्ह नाहीयेत... त्यांनाही काही तरी करायचंय... सारं चित्र बदलून टाकायचंय... जग बदलायचंय... त्यांच्या साथसंगतीत म्हणूनच मी रमतो... माझ्या अवतीभवतीच असे किती तरी जण आहेत... म्हणजे अजूनही आशेची पालवी जिवंत आहे... त्यांच्याही आयुष्यात ती वेदना आहे, संघर्ष आहे... पण, म्हणून त्यांनी हार मानलेली नाहीय... त्यांना लढायचंय... जगायचंय... या समाजाचा कायापालट करायचाय... त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायची त्यांची तयारी आहे... ती ते मोजताहेत सुद्धा... कोणत्याही टोकाला जाऊन वाट्टेल तो त्याग करण्याची तयारीही त्यांनी ठेवलीय...
आत्ता मी जिथं बसलोय, त्यासारख्या गावोगावच्या कोपऱ्या-कोपऱ्यावर असणाऱ्या अशा मयखान्यांतून माझे असे लाखो समविचारी मित्र क्रांतीची भाषा करताहेत... मी सुद्धा त्या क्रांतीचा एक शिलेदाराय... एक एक घोट घेत बोलू लागलो तर कदाचित जीभ घरंगळेल... पण, पाहिलंत, माझ्या विचारांची इतकी खैरात, बरसात तुमच्यावर करत असताना ते विचार मात्र घरंगळलेले नाहीत... इतकी क्लॅरिटी माझ्या विचारांत असताना मी कन्फ्युज्ड असल्याचा बोभाटा करणाऱ्यांनो, तुम्हाला माझा एकच सवालाय... मी कन्फ्युज्ड आहे की सारी सोसायटीच, याचा एकदा आपल्या गिरहबानमध्ये डोकावून पाहून विचार करा... आणि मग सांगा... मी बोललो... कदाचित नशेत बोललो असेन... कदाचित नसेनही... पण, मला वाटतं ते बोललो... जे अवती भवती दिसतंय, दिसलं, ते बोललो... पण किमान बोललो तरी... ते बोलण्याचं, मग भलेही नशेतच का असेना, धाडस तरी केलं... एक फायदाय याच्यात... नशेतच असल्यानं कोणी फारसं सिरीअसली नाही घेणार... आणि कोणी सिरीअसली घ्यायचं म्हटलं तरी, त्याच्या हातून काही फारसं नाही होणार... म्हणजे आयेम क्लिअर, नॉट कन्फ्युज्ड... गॉट इट?