रविवार, २५ डिसेंबर, २०२२

हे प्रेषिता......प्रेषितांची गरज
असतेच सदैव या जगाला,
मानवी सत्त्वाला
त्याच्या अस्तित्वाची
जाणीव करून देण्यासाठी
अन् ते सदोदित
जागृत ठेवण्यासाठी!

त्यासाठी अगणित
व्यथा-वेदना, आरोप
पचवावे लागतात
त्या प्रेषितांनाच!

त्यातून झळाळून, तेजाळून
प्रखर व्हावे लागते त्यांना
तेव्हा त्या तेजाची खात्री पटते
मर्त्य मानवाला!

मात्र, तरीही मानवतेचे मारेकरी
प्रयत्नरत राहतात
प्रेषिताला नाकारण्यासाठी!
घालतात मारेकरी,
ठोकतात खिळे-मोळे
त्याच्या हातापायांत
चढवितात क्रूसावर!

देह जातो, पण
प्रेषित नसतो मरत
वर्षानुवर्षे...
काळ अधोरेखित करीत राहतो
सतत गरज
प्रेषिताची...

त्याचा जन्मसोहळा
साजरा होतच राहतो-
पुन्हा त्याच्या नवजन्माची
आस बाळगुनी...

पण...
पण, पुन्हा जन्मणारा तो
येशूच असेल,
मुहम्मद असेल,
याची काय खातरी???
- आलोक 'प्रियदर्शन'