शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

आपत्कालीन परिस्थितीत पाळावी अशी सर्वसाधारण आचारसंहिता


(छायाचित्र सौजन्य: टीव्ही-९)

(छायाचित्र सौजन्य: द इंडियन एक्स्प्रेस)

(छायाचित्र सौजन्य: द हिंदू)

आपत्ती कालखंडातील सर्वसाधारण आचारसंहिता: (पश्चिम महाराष्ट्र महापूर स्थितीच्या अनुषंगाने)

मित्र हो, गेल्या अनेक वर्षांमध्ये शासकीय अधिकारी या नात्याने विशेषतः माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात ११ जुलै २००६ च्या मुंबई बॉम्बस्फोटांपासून ते २१ जून २०१२ रोजी मंत्रालय जळीत प्रकरणापर्यंत आपत्ती व्यवस्थापनाच्या कामामध्ये सक्रिय योगदान दिल्याच्या अनुभवावर आधारित पुढे मी काही बाबी मांडत आहे. आपत्तीच्या प्रसंगी काही मूलभूत दक्षता विविध स्तरांवरुन घेण्याची गरज असते. मी देत असलेली आचारसंहिता हीच आदर्श आहे किंवा असावी, असे म्हणणे नाही. त्यामध्ये आपणही आवश्यक तिथे भर घालू शकता. तथापि, ती अंमलात आणली, तर या स्थितीत अत्यंत संतुलितपणे काम करता येणे आणि संकटावर मात करून पुन्हा लवकर स्थिती पूर्वपदावर आणणे आपल्याला शक्य होईल. यामध्ये मी सद्यस्थितीत अनुभवलेल्या, पाहिलेल्या बाबींचा उल्लेख केला असला तरी, त्याला व्यक्तीगत न घेता, त्यांची दक्षता सध्याच्या अभूतपूर्व स्थितीत घेणे आवश्यक आहे, म्हणून केवळ त्यांचा उल्लेख आहे, हे सुरवातीलाच नमूद करतो.  

शासकीय व प्रशासकीय स्तरावरुन घ्यावयाची दक्षता-

·         सध्या स्थानिक प्रशासन मोठ्या गतीने आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात सक्रिय आहे. उपलब्ध मनुष्यबळ, साधनसामुग्री, स्थानिक यंत्रणा, अग्नीशमन कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी त्याचप्रमाणे राज्याचे पोलीस दल, शीघ्र कृती दल, एनडीआरएफ, लष्कर, नौदल आदी जिथून शक्य असेल तिथून कुमक मागवून या कामाला गती देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्वच प्रमुख शासकीय अधिकारी या आपत्तीचा सातत्याने आढावा घेत व्यवस्थापनाचे, मदतीचे काम करीत आहे.
·         मा. मुख्यमंत्री यांनी जमिनीवर न उतरताच हवाई पाहणी केली आणि निघून गेले, असे आरोप सुरू झाले. तथापि, मुख्यमंत्री महोदयांनी राजापुरात उतरून पूरग्रस्तांना बाहेर काढण्याच्या कामाला लागावे, हे मुळातच अभिप्रेत नाही. त्यांनी केलेल्या हवाई पाहणीमधून महापूर स्थितीची तीव्रता आणि गांभीर्य त्यांच्या लक्षात येणे महत्त्वाचे. कारण पूरस्थितीमधल्या व्यवस्थापनाच्या कामानंतर पुढे जे मदत व पुनर्वसनाचे अत्यंत महत्त्वाचे काम असते, त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरुन केंद्र सरकारकडून पूरग्रस्तांसाठी आवश्यक तो मदतनिधी मिळविणे आणि त्याचे वितरण, संनियंत्रण करणे, राज्यभरातच उद्भवलेल्या प्रत्येक आपत्तीग्रस्तापर्यंत ती पोहोचविण्याचे राज्यस्तरीय नियोजन करणे आदी अत्यंत प्रमुख कामे राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री करतील.
·         एकदा मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर अन्य मंत्री, संत्री, विरोधी पक्षनेते यांनी प्रशासन बचाव व मदत कार्यात गुंतलेले असताना शक्यतो या भागाचे दौरे करू नयेत. त्यांच्या दौऱ्यांच्या, पत्रकार परिषदांचा अतिरिक्त ताण स्थानिक प्रशासनावर पडत असतो. मूळ कामावर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे त्यांनी शक्यतो मुख्यालयातूनच सदर परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि तेथून स्थानिक प्रशासनाला लागणाऱ्या मदतीसाठीचे नियोजन करावे, हे अधिक योग्य ठरते.
·         सदर मंत्री अगर कोणाही वरिष्ठाने अशा आपत्तीच्या प्रसंगी व्यक्तीगत प्रसिद्धीचा मोह शक्यतो टाळावा. आपदग्रस्तांपर्यंत जाऊनच मदत करण्याचा आग्रह धरू नये. कारण यंत्रणेचे लक्ष त्यामुळे आपदग्रस्तांपेक्षा मा. मंत्री यांच्या सुरक्षेकडे लागून राहते. राज्याचे मंत्री म्हणून आपला जीव मोलाचा आहे. तो धोक्यात घालण्याची नक्कीच गरज नाही. आपद्ग्रस्तांपर्यंत पोहोचण्याची सध्या गरज नाही. मदत व पुनर्वसनासाठी आवश्यक पंचनामे आणि त्यांना योग्य नुकसान भरपाई यासाठी पुढच्या टप्प्यात जरुर हिरीरीने मदत करावी.
·         संबंधित जिल्ह्याचे मा. पालकमंत्री हे राज्य शासनाचे नोडल मंत्री म्हणून सर्वांच्या वतीने स्थानिक पातळीवर परिस्थितीवर नजर ठेवून असतातच. प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याबरोबर सदर परिस्थितीबाबत राज्य शासनाला अवगत करण्याचे कामही पालकमंत्री करीत असतात. त्यांनीच सर्व मंत्री आणि तत्सम अन्य व्यक्तींसाठी सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट म्हणून काम करावे. अन्य मंत्र्यांनीही त्यांच्याशीच संपर्कात राहावे.
·         स्थानिक नेते आणि कार्यकर्ते पूरस्थितीत प्रत्यक्ष उतरून लोकांना मदत करताहेत, ही बाब उत्तमच आहे. मात्र, त्यांनीही शक्यतो व्यक्तीगत प्रसिद्धी किमान या प्रसंगी टाळावी. सर्वांनी पक्षभेद, मनभेद विसरून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात स्थानिक प्रशासनाला मदत करावी.
·         शासकीय व प्रशासकीय स्तरावरुन वेगवेगळी माहिती न प्रसृत करता स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झालेली अधिकृत माहिती दिवसातून टप्प्याटप्प्याने वितरित करावी, जेणे करून आपत्तीच्या स्थितीची नेमकी कल्पना लोकांना येऊ शकेल. यामध्ये सर्वच स्थानिक शासकीय आस्थापना, जसे की, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, महावितरण, जिल्हा परिषद आदी यंत्रणांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी (अगर परिस्थितीनुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाशी अगर केंद्रीय प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोशी) समन्वय राखून त्यांच्या माध्यमातूनच सिंगल पॉईंट अधिकृत माहिती माध्यमांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवावी.

 प्रसारमाध्यमांनी घ्यावयाची दक्षता-


 • ·         प्रसारमाध्यम प्रतिनिधींची भूमिका आपत्तीच्या कालखंडात अत्यंतच नव्हे, सर्वात महत्त्वाची असते.
  ·         आपत्तीच्या काळात सर्वात मोठा अडथळा निर्माण होतो, तो म्हणजे अफवांचा! अफवांचे पेव फुटून आपत्तीच्या काळात नागरिकांमध्ये घबराट, अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण पसरू शकते. याला सध्या समाजमाध्यमांची जोड मिळाल्याने अफवा वाऱ्यापेक्षाही अधिक वेगाने व्हायरल होतात. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून प्राप्त झालेली अधिकृत माहिती लोकांपर्यंत वेळीच पोहोचवून, त्याचप्रमाणे कोणतीही माहिती हाताशी आल्यानंतर तिची शहानिशा करून त्यानंतरच तिचे प्रसारण करणे अधिक योग्य ठरते.
  ·         एरव्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणे अभिप्रेत असलेल्या प्रसारमाध्यमांनी आपत्तीच्या प्रसंगी मात्र शासन, प्रशासन यांचा विस्तारित भाग म्हणून काम करावे. कारण अशा वेळी नागरिक अत्यंत सजगपणे प्रसारमाध्यमांतून काय माहिती दिली जात आहेत, त्यावर कधी नव्हे इतके लक्ष ठेवून असतात, विसंबलेले असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत अधिकृत आणि ताजी माहिती पोहोचविण्याच्या भूमिकेतून जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झालेले ताजे अपडेट्स रिलीज करावेत.
  ·         पत्रकार हा सुद्धा प्रथम माणूस आहे. आपत्तीच्या क्षणी कित्येक जण स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपले कर्तव्य बजावत आहेत, असतात. आपत्तीच्या काळात अडकलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावण्याला आपले हे माणूसपण आपल्याला प्रेरित करीत असते. मात्र, आपली ही धडपड आपल्या मूळ कामाच्या, तसेच प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याला अडथळा तर होणार नाही ना, याची दक्षताही घेणे गरजेचे आहे.
  ·         अशा आपत्तीच्या प्रसंगी प्रत्यक्ष ठिकाणावरच पोहोचून वार्तांकन करण्याचा सोस थोडा बाजूला ठेवायला हरकत नाही. अशा वेळी प्रसंगी काठावरची पत्रकारिता केली, तरी कोणी आपल्याला नावे ठेवणार नाही. (२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी अशा अतिउत्साही लाइव्ह कव्हरेजच्या नादात आपण इथून पाकिस्तानमध्ये बसलेल्या मास्टरमाईंडला सारी स्थिती लाइव्ह दाखवित राहिलो आणि तिथून त्यांना दहशतवाद्यांना सूचना देणे शक्य झाले, हे लक्षात यायला आपल्याला २४ तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेला होता, हे लक्षात घेऊ या.) अंतर्गत व्यावसायिक स्पर्धा अशा आपत्तीच्या क्षणी बॅकसीटवर ठेवून द्यावी. कारण मुळातच स्थानिक प्रशासनाकडे उपलब्ध पाणबोटी वगैरे सामग्री मर्यादित असते. अशा पाणबोटींपैकी एक बोट जरी केवळ पत्रकारांसाठी राखीव ठेवावी लागली, तरी त्या मदतकार्यातील एक बोट त्या क्षणी कमी होते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आपद्ग्रस्तांना सोडवून आणल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधावा. जीव धोक्यात घालून आणि प्रशासनाला अडचणीत आणून वार्तांकनाचा मोह आपण अशा प्रसंगी टाळला पाहिजे.
  ·         जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत प्राप्त झालेली अधिकृत माहितीच (किमान अशा प्रसंगी) लोकांपर्यंत पोहोचवावी.
  ·         एखादी विपर्यस्त अगर गंभीर माहिती हाती आली, तरी कोणत्याही परिस्थितीत तिची स्थानिक प्रशासनाकडून खातरजमा केल्याखेरीज ती रिलीज करू नये.
  ·         आपत्तीची स्थिती गंभीर आहे, हे एव्हाना साऱ्यांना ठाऊक झालेले असते. त्यामुळे सातत्याने मृतदेहांची छायाचित्रे अगर क्लिप्स दाखविणे टाळावे.
  ·         लोकांचे मनोधैर्य खच्ची होईल, अशा बातम्या कदाचित महत्त्वाच्या असल्या तरी त्या क्षणी त्या टाळाव्यात. त्यापेक्षा अशी माहिती प्रशासनाला देऊन त्या संदर्भात पावले उचलण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. तसेच, त्यांनी केलेल्या कार्यवाहीसह संबंधित माहिती द्यावी, जेणे करून नागरिकांना दिलासा मिळत राहील, त्यांचा आत्मविश्वास उंचावेल.
  ·         व्हॉट्सअपवरुन एखाद्या आपद्ग्रस्ताचा फॉरवर्डेड संदेश आला असेल, तर तो प्रसृत करण्याऐवजी प्रथम त्याची सुटका झाली आहे किंवा कसे, याबाबत स्थानिक प्रतिनिधीकडून लेटेस्ट माहिती घेऊन त्यानंतरच रिलीज करणे योग्य ठरते.

सर्वसामान्य नागरिक आणि मदतीसाठी धावून येणाऱ्या अशासकीय सेवाभावी व्यक्ती व संस्था-

 • ·         सर्वसामान्य नागरिकांची आपत्तीच्या क्षणी मोठी तारांबळ उडत असते. त्यांनी अशा वेळी स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्यासाठी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न करावा.
 • ·         प्रशासनाने नागरिकांना आपापल्या घरीच राहण्याच्या सूचना दिलेल्या असतील; शाळा-महाविद्यालयांना सुट्या दिलेल्या असतील, तर आपत्तीच्या वेळी अशा सुट्या मौजमजेसाठी नव्हे, तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी आहेत, हे लक्षात घ्या.
  ·         घरात रिकामे बसले असताना सातत्याने समाजमाध्यमांवर येत असलेले अपडेट्स आपण कोणतीही खातरजमा न करता फॉरवर्ड करीत राहतो. हे अतिशय गंभीर ठरते, अशा आपत्तीच्या प्रसंगी. यंत्रणेवरचा ताण आपण बसल्या जागी वाढवून ठेवतो. त्यामुळे समाजमाध्यमांवरून येणाऱ्या माहितीचा तुम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी वापर करा, मात्र अनावश्यक फॉरवर्ड्स पाठविण्याचा मोह किमान अशा प्रसंगी टाळा, आपल्या भावना कितीही प्रामाणिक आणि स्वागतार्ह असल्या तरी!
  ·         पुरामुळे घरातून, गावातून कोठेही जाता येत नाही, म्हणून केवळ पुराच्या ठिकाणी झुंबड करू नका. ते वर्षापर्यटनाचे ठिकाण निश्चितच नाही. आपल्या अशा बेजबाबदार वर्तणुकीमुळे आपल्या प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्यावरील ताण अनावश्यकरित्या वाढवून ठेवतो आहोत, याचे भान राखणे महत्त्वाचे असते. जे मनुष्यबळ अन्य कामात वापरता येऊ शकले असते, ते नागरिकांच्या अशा अतिउत्साहाला आवर घालण्यासाठी वापरावे लागते. त्यामुळे नागरिकांनी घरीच अगर आपल्या परिसरातच राहून परिस्थितीचा आढावा घेत राहाणे योग्य. प्रसारमाध्यमांतून प्रशासन वेळोवेळी आपल्याला आपत्तीच्या स्थितीबाबत अवगत करीत असते. त्यांवर लक्ष ठेवून राहा.
  ·         आपत्तीच्या क्षणी आपण आपल्या शहरातल्या, गावातल्या लोकांना मदत केली पाहिजे, ही भावना कोणाही सहृदय व्यक्तीच्या मनी जागणे स्वाभाविक आहे. विशेषतः तरुण त्यासाठी पुढे होऊन तत्परतेने मदतकार्यात सक्रिय होतात. यावेळी जाणकारांचे योग्य मार्गदर्शन घेण्याची गरज असते. योग्य त्या दक्षता घ्याव्यात. हाताशी दोरखंड वगैरे साधने बाळगावीत. अन्यथा मदतीला गेल्यानंतर आपणच त्या आपत्तीचे बळी ठरण्याची शक्यता वाढते.
  ·         शक्य तिथे स्थानिक प्रशासनाच्या गरजेनुसार आणि सूचनांनुसार बचावकार्य व आपत्ती व्यस्थापनाच्या कामात सहभाग घ्यावा. अशा प्रसंगी प्रशासनाला मनुष्यबळाची गरज असतेच. पण, त्यांच्याकडून पुरविण्यात आलेल्या साधनांचा, सुविधांचा वापर करून आपण मदतकार्यात सहभागी होणे अधिक योग्य ठरते. प्रशासनालाही आपली अत्यंत चांगली मदत होऊ शकते.
  ·         सेवाभावी व्यक्ती आणि संस्था यांची मदत व पुनर्वसनाच्या कामामधील भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. किंबहुना, आपत्तीमधून वाचविलेल्या लोकांना दिलाशाची, सहानुभूतीची त्याचप्रमाणे निवारा, अन्न व कपडेलत्त्याची गरज असते. या बाबींची पूर्तता सेवाभावी व्यक्ती व संस्था करीत असतात.
  ·         काही ठिकाणी तातडीने निवारा कॅम्प निर्माण केले जातात. नागरिकांना आवाहन केल्यानंतर मदतीचा ओघ सुरू होतो. प्रत्येक नागरिकालाच आपद्ग्रस्तांसाठी काही तरी करण्याची भावना असते. त्यातून प्रत्येक जण आपापल्या परीने या मदतीमध्ये आपला खारीचा वाटा उचलण्याचा आणि आपत्तीची तीव्रता कमी करण्याचा, आपल्या बंधू-भगिनींना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र, नेमक्या याच बाबीचे व्यवस्थापन योग्य रितीने झाले नाही, तर सारीच मदत व्यर्थ ठरते. या मदतीचेही कॅम्पनिहाय, तेथील व्यक्तीनिहाय योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
  ·         आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्माण केलेल्या सिंगल पॉईंट यंत्रणेशी सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांनी संपर्क साधावा. नेमक्या कोणत्या बाबींची गरज आहे, त्याची माहिती घेऊन अशा वस्तू अगर खाद्यपदार्थांची मदत करावी. शक्यतो, कोणत्याही प्रकारचा नाशवंत खाद्यपदार्थ देऊ नये. कोरडा खाऊ, बिस्कीटे आणि ती सुद्धा आवश्यकतेनुसार उपलब्ध करावीत.
  ·         आपत्तीचा क्षण हा अनेक नागरिकांना आपल्या घरातील जुनीपानी, फाटके कपडे दान देण्याचा सोहळा वाटत असतो. हे अत्यंत गैर आहे. आपत्तीच्या प्रसंगात सापडलेला आपला बांधव हा आपल्यासारखाच आहे, कोणी भिकारी नाही, याचे भान अशी मदत करताना ठेवले पाहिजे. अगदी नवेच कपडे द्यावेत, अशातला भाग नाही; मात्र, जे कपडे तुम्ही स्वतः वापरता आहात, वापरू शकता; जे कपडे तुमची मुलेबाळे घालू शकतात, अशाच प्रकारचे चांगले धुतलेले, स्वच्छ कपडे आपद्ग्रस्तांना द्यावेत. ते कपडे परिधान केल्यानंतर दात्याच्या प्रेमाची, मायेची ऊब त्याला मिळू द्या. अशा मदतीची घृणा न वाटता, अशा प्रसंगात सापडलेल्या नागरिकांना आपणही अशीच चांगल्या प्रकारे मदत केली पाहिजे, अशी कृतज्ञतेची भावना त्याच्या मनी जागृत व्हायला हवी.