मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१३

गजानन घुर्ये यांजसाठी..!


(माझे मुंबईतील वृत्त-छायाचित्रकार मित्र गजानन घुर्ये यांचे गेल्या शनिवारी, दि. २४ ऑगस्ट २०१३ रोजी निधन झाले. या प्रसंगी त्यांच्याविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांना दै. कृषीवलचे संपादक श्री. संजय आवटे यांनी सोमवार, दि. २६ ऑगस्ट २०१३च्या अंकात अतिथी संपादकीय म्हणून सन्मान दिला. हे अतिथी संपादकीय दै. कृषीवलच्या सौजन्याने माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)





गजानन घुर्ये गेले !


(छायाचित्र पत्रकारितेला वेगळा आयाम ज्यांनी दिला, असे पत्रकार-छायाचित्रकार गजानन घुर्ये यांच्या आत्महत्येने आम्ही शोकमग्न आहोत. घुर्ये यांचे जवळचे मित्र आणि कृषीवलचे स्तंभलेखक आलोक जत्राटकर यांनी व्यक्त केलेल्या या भावना प्रातिनिधिक असल्या तरी सार्वत्रिक आहेत आणि त्या आमच्याही भावना आहेत. – मुख्य संपादक)


गजानन घुर्ये यांनी काल पहाटे त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे मित्रांकडून आणि घुर्ये यांच्या सहकाऱ्यांकडून समजले आणि खरंच खूप मोठा धक्का बसला. गजानन घुर्ये यांच्यासारखा उमद्या मनाचा, मोकळाढाकळा, दिलखुलास आणि भरभरून बोलणारा माणूस असा अकाली आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवेल असा विचार स्वप्नात सुद्धा कोणी आणला नसेल. पण, या माणसाच्या अंतरंगात अशा कुठल्या विचारांचे काहूर माजले असावे की ज्यामुळे त्याने जीवन संपविण्याच्या निर्णयाप्रत यावे, असा विचार राहून राहून मनाला छळू लागला. त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर समजले की ढासळत्या प्रकृतीमानामुळे अलिकडे ते फारच चिंताक्रांत बनले होते आणि त्यातून ते कदाचित या निर्णयाप्रत आले असावेत. का, कसे आणि कशासाठी, या प्रश्नांची उत्तरे घुर्ये यांच्यासोबतच गेली आहेत, उरला आहे शक्याशक्यतांचा खेळ. तो सुरू राहील. तथापि, गजानन घुर्ये या एका छायाचित्रकाराने मुंबईमध्ये राजकीय छायाचित्रणाच्या क्षेत्रावर ज्या पद्धतीने स्वतःचा ठसा उमटविला, ते पाहून स्तिमित व्हायला होते.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयासाठी स्ट्रींजर फोटोग्राफर म्हणून काम करता करता घुर्ये यांनी राजकीय फोटोग्राफर म्हणून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आणि जवळपास २५ वर्षे या क्षेत्रामध्ये ते कार्यरत राहिले. राजकीय फोटोग्राफी या रुक्ष विषयामध्ये रुची घेतली तर उत्तम करिअर घडविता येऊ शकते, याचे (आता दुर्दैवाने "जिते-जागते" म्हणता येणार नाही,) मूर्तीमंत उदाहरण म्हणजे गजानन घुर्ये होते.

गजानन घुर्ये यांच्याशी माझा परिचय असला तरी आमचा संपर्क वृद्धिंगत झाला तो मी उपमुख्यमंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी असतानाच्या काळात. संध्याकाळी कार्यालयाची वेळ संपल्यानंतरही कित्येकदा आम्ही ऑफिसमध्ये काम करत असू. तेव्हा "अजून गेला नाहीत?" अशी विचारणा करत घुर्ये केबीनमध्ये शिरायचे आणि मग गप्पांची मैफलच जमायची. अंतुले यांच्यापासून ते आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत तसेच अनेक वरिष्ठ मंत्र्यांसोबत घुर्येंनी काम केलेले असल्याने त्यांच्या अनेक किश्श्यांचा खजिनाच त्यांच्याकडे असायचा. पण फोटोग्राफी या एकाच धाग्यामध्ये हे सारे किस्से त्यांनी विणलेले असत. पूर्वी फिल्म कॅमेरे आणि ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो धुवून देण्याच्या जमान्यात अनेक 'इलेव्हन्थ अवर'च्या आव्हानांचा सामना त्यांना करावा लागला होता. पण त्या आव्हानांच्या प्रसंगीही आपण प्रसंगावधान राखून आपले काम चोख कसे बजावले, हे सांगावे तर घुर्येंनीच. त्यांचे फोटोग्राफीवर निरतिशय प्रेम होते, निष्ठा होती. या प्रेमातून आणि अनुभवातून त्यांनी राजकीय फोटोग्राफीची वाट चोखाळली आणि त्यात यशस्वी झाले. मात्र हे यश केवळ फोटोग्राफी चांगली होती म्हणून त्यांना मिळाले नाही, तर सदैव हसतमुख चेहरा आणि गोड वाणी यांनी ते लोकांना आपलेसे करीत. फिल्डवर काम करत असताना मात्र हा माणूस अतिशय निर्भीडपणे काम करताना मी पाहिला. ते प्रोटोकॉल सांभाळणाऱ्यांपैकी होते, पण एखाद्या नेत्याचा हवा असलेला फोटो मिळविण्यासाठी प्रसंगी प्रोटोकॉलची 'ऐशी की तैशी' करायलाही ते कचरत नसत आणि मग कालांतराने त्या 'ब्रीच'चं आपसूकच घुर्येंच्या नव्या किश्श्यामध्ये रुपांतर होत असे. एक काळ असा होता की, गजानन किंवा त्यांचा फोटोग्राफर समोरच्या फोटोग्राफरच्या घोळक्यात दिसला की, व्यासपीठावरील नेता 'उद्याच्या वर्तमानपत्रात आपला फोटो झळकणार' म्हणून आश्वस्त होत असे. गजाननही हाती घेतलेले काम इमानेइतबारे करत असत. संबंधित कार्यक्रमाचा फोटो, त्याच्या फोटोओळीसह, कधी जमल्यास छोट्या बातमीसह आणि कंसात '(गजानन घुर्ये यांजकडून)' असे ठळक अक्षरांत लिहून सर्व दैनिकांच्या कार्यालयांकडे लिफाफ्यातून व्यवस्थित पाठवित असत. पुढे इंटरनेटचे आगमन झाल्यावर त्यांनी आपल्या या उपक्रमाला -मेलची जोड दिली. अलीकडे तर www.ggpics.com ही स्वतःची स्वतंत्र वेबसाइट तयार करून त्या माध्यमातून दैनंदिन राजकीय कार्यक्रमांची छायाचित्रे त्यांनी उपलब्ध करून देण्यास सुरवात केली. त्यांची सेवा केवळ मुंबईपुरती उपलब्ध होती, अशातला भाग नाही; तर मला त्यांनी दिल्ली, हैदराबाद आणि बंगळूर इथल्या कार्यक्रमांचीही छायाचित्रे त्याच दिवशी उपलब्ध करून देण्याची कामगिरी करुन दाखविली होती; इतकं त्यांचं नेटवर्क उत्तम होतं. त्यांची माझ्याकडून एकच अपेक्षा असायची, ती म्हणजे असा एक्स्क्लुजिव्ह फोटो पाठविताना 'गजानन घुर्ये यांजकडून' असा मी उल्लेख करावा आणि ती रास्त होती. मी माझ्या -मेलमध्ये तसा उल्लेख करून सर्व दैनिकांना आणि त्याची एक कॉपी त्यांना  पाठवित असे, त्यावेळी त्यांचा मला आवर्जून धन्यवादाचा फोन येत असे.

वेळेचे भान हा आणखी एक महत्त्वपूर्ण गुण घुर्ये यांनी आयुष्यभर जोपासला. कोणत्याही कार्यक्रमासाठी त्यांना बोलावले तर त्या वेळेच्या किमान पंधरा मिनिटे आधी संबंधित ठिकाणी उपस्थित राहण्याची दक्षता ते घेत. पुढे व्यवसाय विस्तारानंतर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या छायाचित्रकारांनाही त्यांनी ती सवय लावली. तेव्हा गजानन यांना एकदा सांगितले की आम्ही निर्धास्त होत असू. काहीही करून दिलेल्या वेळेत ते पोहोचणार आणि उत्तम असे छायाचित्र आपल्याला काढून देणार, असा विश्वास त्यांनी आपल्या कामातून निर्माण केला होता. या कामाच्या बळावरच त्यांची अनेक ज्येष्ठ मंत्र्यांशी सलगी निर्माण झाली होती. या सलगीचा गैरफायदा घेण्याचा मात्र त्यांनी कधीही प्रयत्न केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. तथापि, संबंधितांनी त्यांची छायाचित्रांची कामे मात्र आपल्याकडे सोपवावीत, याविषयी मात्र गजानन आग्रही असत. कोणी नाही दिली, तर ते नाराज होत. मात्र, त्या मंत्र्यांच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्यांचा फोटोग्राफर ते आवर्जून पाठवित आणि आपल्या -मेल, वेबसाइटच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करत. अशा प्रकारचा प्रोफेशनॅलिझम खूप कमी लोकांकडे पाह्यला मिळतो, तो घुर्ये यांच्याकडे होता. पैसे आज ना उद्या मिळतील, पण माणूस सांभाळण्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. घुर्ये यांच्याविषयी सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण जागेअभावी अशक्य आहे. यंदाच्या जागतिक छायाचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने राजकीय छायाचित्रणाच्या क्षेत्रातील एक अस्सल अवलिया फोटोग्राफर घुर्ये यांच्या रुपाने गमावला आहे, अशी माझी भावना आहे. एरव्ही, कार्यक्रमाचे टायमिंग सांभाळणाऱ्या गजानन घुर्ये यांनी मृत्यूसाठी मात्र चुकीचे टायमिंग निवडले. माझा एक चांगला छायाचित्रकार मित्र त्यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!