शुक्रवार, १ एप्रिल, २०२२

रिटायर नोकरीतनं व्हा, आयुष्यातनं नको...

 

Dr N.D. Jatratkar


परवा आम्ही काही विविधवयस्क मित्र-सहकारी गप्पा मारत बसलो होतो... त्यावेळी एक वरिष्ठ सहकारी म्हणाले, आता काय? आमचं संपलं की... पुढच्या वर्षी रिटायर... त्यावर मी म्हटलं, अहो, अजून त्याला तब्बल सव्वा वर्ष बाकी आहे... तोपर्यंत या नोकरीचा आनंद घ्या आणि त्यानंतरच्या मनमोकळ्या आयुष्याचं प्लॅनिंग करा ना... त्यांना माझं कितपत पटलं माहिती नाही... पण केवळ तेच नव्हे, इतरही अनेक जणांच्या बाबतीत मी पाहात आलोय की, नोकरीच्या उत्तरार्धात त्या रिटायरमेंटच्या दिवसाचं त्यांनी मनातल्या मनात आणि सार्वजनिकरित्याही काऊंटडाऊन सुरू केलेलं असतं. जणू त्यांनी त्या दिवसाशी त्यांच्या आयुष्याचीच सांगड घातलेली असते. रिटायर झालो की बास... संपलं... जणू काही आयुष्याची सारी इतिश्री त्या केवळ एका दिवसात एकवटलेली असावी, अशा पद्धतीनं त्यांचा वावर सुरू असतो. त्या काऊंटडाऊनच्या नादात होतं असं की, एकाच वेळी नोकरीच्या चाकोरीबद्ध चौकटीतून सुटण्याची आशा आणि त्याचवेळी हे चक्र थांबलं की संपलंच... अशा दोलायमान अवस्थेत आयुष्याची क्रमणा सुरू होते. अशा वेळी मग माणसाची विचित्र कोंडी होते. गंभीर बाब म्हणजे असे लोक निवृत्तीनंतरचं जीवन आनंदी पद्धतीनं घालवू शकत नाहीत. माझ्या पाहण्यात असे कित्येक लोक आहेत, जे निवृत्त झाले आणि त्यांना काही काळातच एखाद्या व्याधीनं ग्रासलं किंवा थेट त्यांना अकाली मृत्यूलाच सामोरं जावं लागलं.

आपण जन्मतो, ते का या नोकऱ्यांसाठी? वयाच्या किमान विशीपर्यंत आपण नोकरीविना जगतोच ना! हां, तोपर्यंत चांगल्या नोकरीची आणि त्यायोगे प्राप्त होऊ शकणाऱ्या छोकरीची स्वप्ने पडू लागतात, हे मान्य! पण तोपर्यंत केवळ नोकरी अन् नोकरीच हे आपलं ध्येय नसतं. नोकरी हे जगण्याचं साधन आहे. चरितार्थासाठी आर्थिक मिळकतीची आवश्यकता असते, ती गरज नोकरी भागवते. इतकं हे समीकरण आहे. मात्र, त्या नोकरीत आपण असे गुंततो की कुटुंबात, मित्र परिवारात बोलतानाही नोकरी आणि कार्यालयाच्याच गोष्टी लोक करत राहतात. जणू त्या पलिकडं दुसरा कोणता विषय त्यांच्यासाठी या जगात अस्तित्वातच नसावा. आपले छंद, आवडीनिवडी, कुटुंबासोबतचे निवांत, प्रेमाचे क्षण हे सारं आपण पाठी टाकून रिकामे होतो आणि या जगाच्या पाठीवर एक नोकरी करणारा, पण बिनकामाचा कारकून तयार होतो.

आपणच आपल्याभोवती घट्ट विणलेल्या या कोषातून अलवार बाहेर पडायला हवं. अरे, साहेब असलात, तर ऑफिसात. फॅमिलीसोबत फिरताना सुद्धा तुमच्यातला साहेबच जर बायका-पोरांसोबत असेल, तर तेव्हा समजून जा की काही तरी चुकतंय, चुकलंय...

मानवाचं इतकं सुंदर आयुष्य आपल्याला लाभलंय... ते उत्तम, रंगबिरंगी पद्धतीनं, सर्जनात्मक पद्धतीनं, काही नवं शिकण्यात, काही नवं साकारण्यात व्यतित करू या. त्याचा आनंद लुटू या... मजा घेऊ या...

सोशय मीडियाचे वर्कशॉप घेत असताना मी लोकांना-विशेषतः सरकारी नोकरदारांना नेहमी अमिताभचं उदाहरण देतो. त्यांना सांगतो की, तुम्ही जेव्हा रिटायर व्हायची स्वप्नं पाहात असता, अगर रिटायर होऊन आता नातवंडांना खेळवत बसण्याचं ठरवून घरी ठाण मांडता, त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे पासष्टीत अमिताभनं सोशय मीडिया वापरण्यास सुरवात केली आणि आजतागायत दैनंदिन स्वरुपात त्यांचं ब्लॉलेखन आणि मीडिया शेअरिंग अत्यंत प्रभावी पद्धतीनं ते करताहेत.

दुसरं उदाहरण माझ्या घरातलंच... आमचे बाबा म्हणजे दुसरे बच्चनच! आमच्यासह फिटनेसचेही बाप... बरं, फिटनेस असा की त्यांच्या लग्नाच्या वेळी जी मोजमापं काजम काकांनी (पी. काजम टेलर, निपाणी) घेतली, त्याच मापानं आजही त्यांचे पँट-शर्ट शिवले जातात. तेही रिटायर झाले, त्याला आता तेरा वर्षे झाली. पण, त्यांच्या दिनक्रमात काडीचा फरक नाही. पहाटे साडेचार ते रात्री साडेबारा अखंड काम. त्यात घरकामापासून ते बागकामापर्यंत, अशा सगळ्या कामांचा अंतर्भाव. ही कामं हेच त्यांच्या एनर्जीचं इंगित. आता आपल्यातल्या काहींना पदवीधर झाल्यानंतर एखादी नोकरी लागली की, लगेच शिकण्यातून सुटका झाली म्हणून निश्वास टाकतात. पण, बाबांची केस वेगळी. वयाच्या त्र्याहत्तरीत त्यांच्या लक्षात आलं की, आवड असूनही आपलं हार्मोनियम शिकायचं गेलंय राहून... मग, काय गेले थेट संकेश्वरला... चांगल्यापैकी हार्मोनियम बांधून घेतला आणि आता गुरू करून हार्मोनियम गायन-वादन शिकायचं सुरूय. शिक्षणाला वय नसतं, याचं हे खणखणीत उदाहरणच माझा आदर्श असल्यानं आपण पण कधीच म्हणजे अगदी अखेरच्या श्वासापर्यंत रिटायर न होण्याचं ठरवलंय... तुम्हीही ठरवाच!!