शनिवार, २० मार्च, २०२१

माणगाव परिषद आणि तत्कालीन व समकालीन माध्यमे



रजपूतवाडी येथील शाहू महाराजांच्या निवासस्थानाचे दुर्मिळ छायाचित्र.
(
दै. सत्यवादीच्या सौजन्याने.)

 


भारताच्या सामाजिक इतिहासाच्या पटलावर उदयास आलेले महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही त्रयी म्हणजे समता प्रस्थापनेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. फुले आणि राजर्षींची भेट झालेली नसली तरी त्यांच्या सत्यशोधकी कार्याचा वसा आणि वारसा महाराजांनी अत्यंत सजगपणे पुढे चालविला. मात्र, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या उभय नेत्यांच्या परस्पर स्नेहभावाचा मी चाहता आहे. या दोघांच्या मोजक्या गाठीभेटी आणि त्यांचा परस्परांशी पत्रव्यवहार यातून त्यांच्या स्नेहबंधाची जाणीव झाल्याखेरीज राहात नाही. यंदा माणगाव परिषदेचा शतकमहोत्सव साजरा केला जात असताना राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नेहबंधांना उजाळा मिळणे, ही एक स्वाभाविक बाब आहे. राजर्षींच्या अकाली जाण्याने बाबासाहेबांचा प्रचंड मोठा आधार नाहीसा झाला, तरी राजर्षींचे कार्य पुढे राज्यघटनेच्या माध्यमातून देशभरात चिरंतन करण्याचे महत्कार्य बाबासाहेबांनी केले.

माणगाव परिषद ही बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवन प्रवेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या परिषदेच्या अनुषंगाने तत्कालीन व समकालीन वृत्तपत्रांच्या भूमिकेची चर्चा करण्यापूर्वी या परिषदेची पार्श्वभूमी आणि बाबासाहेब व राजर्षी शाहू यांच्या स्नेहबंधांचा वेध घेणे अगत्याचे वाटते.

बडोदा संस्थानच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने विलायतेतील विद्याभ्यास अर्धवट सोडून भारतात परतलेल्या बाबासाहेबांनी तो पूर्ण करण्यासाठी पुंजी साठवावी म्हणून सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकी पत्करली होती. शिक्षण पूर्ण केल्याखेरीज सामाजिक अगर राजकीय जीवनात प्रविष्ट न होण्याचा त्यांचा संकल्प होता. मात्र, साऊथबरो कमिशनसमोर अस्पृश्यांच्या राजकीय व सामाजिक हक्कांच्या संबंधाने जर बाजू मांडली नाही, तर या समाजाचे घोर नुकसान होण्याच्या चिंतेने त्यांना ग्रासले. त्यातून त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये द महार ऑन होमरुलहा त्यांची बाजू मांडणारा लेख एक महारया नावाने लिहीला. १६ जानेवारी १९१९च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या या पत्रात ते म्हणतात, स्वराज्य हा जसा ब्राह्मणांचा जन्मसिद्ध हक्क आहे, तसा तो महारांचाही आहे, ही गोष्ट कोणीही मान्य करील. म्हणून पुढारलेल्या वर्गांनी दलितांना शिक्षण देऊन त्यांच्या मनाची आणि सामाजिक दर्जाची उंची वाढविणे, हे त्यांचे आद्यकर्तव्य आहे. हे जोवर होणार नाही, तोवर भारताच्या स्वराज्याचा दिन बराच दूर राहणार, हे निश्चित.” त्याचप्रमाणे थेट व्हॉइसरॉय कार्यालयाशी पत्रव्यवहार करून कमिशनसमोर साक्ष नोंदविण्यासाठी आपली निवड करवून घेतली.

अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचे खऱ्या अर्थाने संरक्षण व जाणीव व्हावयाची असेल, तर त्यांना स्वतंत्र मतदारसंघ असले पाहिजे, त्यांना मतदानाचा अधिकार हवा, निवडणुकीस उभे राहता आले पाहिजे, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनिधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात, असे सांगितले. यासाठीचे निकष ठरविताना उपरोक्त प्रकारचे राजकीय हक्क उपभोगण्यासाठी जी लायकी पाहिजे, ती सरकारने अस्पृश्यांची हीन व दीन अवस्था लक्षात घेऊन ठरवावी, असे आंबेडकरांनी सुचविले. डिप्रेस्ड क्लासेस मिशनने सुचविलेल्या को-ऑप्शनच्या पर्यायावर मात्र आंबेडकरांनी कठोर शब्दांत टीका केली. यामुळे अस्पृश्यांची गुलामी कायम राहून त्यांची शेंडी सदैव त्यांच्यावर हुकूमत गाजविणाऱ्या लोकांच्याच हाती राहील. त्यामुळे ही अत्यंत हास्यास्पद योजना आहे, अशा शब्दांत त्यांनी हा पर्याय नाकारला.

पुढे बहिष्कृत समाजाच्या राजकीय हक्क व वाटचालीच्या दृष्टीने साऊथबरो कमिशनसमोरची त्यांची ही साक्ष किती महत्त्वाची ठरली, हे वेगळे सांगायला नको. बाबासाहेबांचा टाइम्स ऑफ इंडियामधील लेख राजर्षींच्या वाचनात आलेला होता. त्या लेखाने ते प्रभावितही झालेले होते. आपले विश्वासू दत्तोबा पोवार यांच्याकडून त्यांनी बाबासाहेबांची माहिती मिळविली. महार समाजातील एक युवक विलायतेला जाऊन उच्चविद्याविभूषित होतो, ही बाबच मुळी राजर्षींना अभिमानास्पद वाटली. आपण अंगिकारलेल्या कार्याला अशीच फळे येण्याची स्वप्ने ते पाहात असत. दत्तोबांना सांगून त्यांनी बाबासाहेबांना भेटीला बोलावले. तोपर्यंत भारतातील संस्थानिकांबद्दल, त्यांच्या लहरी वर्तणुकीबद्दल बाबासाहेबांच्या मनात एक प्रकारची अढी होती. मात्र, राजर्षींच्या पहिल्या भेटीतच ती गळून पडली. परळच्या चाळीत आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये त्यांच्या या भेटी झाल्या. अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी बाबासाहेबांना वृत्तपत्राची निकड जाणवू लागलेली होती. ती त्यांनी राजर्षींना बोलून दाखविली. त्यांचा हा विचार पसंत पडून राजर्षींनी लगोलग त्यांना अडीच हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. राजर्षींच्या या मदतीमधूनच ३१ जानेवारी १९२० पासून मूकनायक प्रकाशित होण्यास सुरवात झाली. सरकारी नोकरीत असल्याने बाबासाहेबांचे त्यावर नाव नव्हते. पांडुरंग भटकर यांचे नाव संपादक म्हणून लागले. मात्र, अग्रलेखासह बहुतांश लेखन बाबासाहेबच करीत असत.

याच वेळी शाहू महाराजांच्या प्रेरणेतूनच कागल संस्थानातल्या माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरविण्याचे नियोजन दत्तोबा पोवारांसह निंगाप्पा ऐदाळे वगैरे मंडळी करीत होती. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांना निमंत्रण देण्यात आले. २० व २१ मार्च १९२० रोजी माणगाव येथे झालेली ही परिषद अनेकार्थांनी ऐतिहासिक स्वरुपाची ठरली. बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याच्या दृष्टीने त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करणाऱ्या या पहिल्या परिषदेस राजर्षींची उपस्थिती आणि त्यांचे भाषण फार महत्त्वपूर्ण ठरले. शिकारीहून परत जाता जाता या परिषदेस उपस्थित राहात असल्याचे राजर्षींनी दर्शविले असले, तरी त्यामागे त्यांचे धोरणीपण अधोरेखित होते. अस्पृश्य समाजाला आंबेडकरांच्या रुपाने त्यांच्यातीलच नेता लाभला असून भविष्यात ते या देशाचे पुढारी होतील, असे भाकितच राजर्षींनी वर्तविले. त्याचबरोबर परिषदेनंतर त्यांना रजपूतवाडीच्या कँपवर भोजनाचे निमंत्रणही दिले. या परिषदेत झालेल्या इतर ठरावांबरोबरच शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा उत्सवाप्रमाणे साजरा करण्याचा ठरावही करण्यात आला.

माणगाव परिषदेनंतर दोनच महिन्यांत नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान राजर्षींनी स्वीकारले. माणगाव परिषद ही जणू या नागपूर परिषदेची बीजपरिषद होती. आक्कासाहेबांची प्रकृती खालावल्यामुळे या परिषदेला राजर्षी उपस्थित राहतील की नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली होती. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना पाठविलेले पत्र हृदयास भिडणारे आहे. या पत्रात बाबासाहेबांनी म्हटले की, नागपूरच्या परिषदेस हुजुरांचे येणे झाले नाही तर आमचा सर्वनाश होणे अटळ आहे. ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी आपला आधार व टेकू नाही मिळाला, तर काय उपयोग. घरी अपत्य आजारी असताना आपणास सभेस गळ घालणे हे कठोरपणाचेच लक्षण. पण काय करावे? आक्कासाहेबांप्रमाणे आम्ही आपली लेकरे नव्हे काय? आपल्याशिवाय आमचा कोण वाली आहे? आम्ही कालपर्यंत किती आजारी आहोत, हे आपणास सांगायला नको. आमचा परामर्ष यावेळी आपण घेतलाच पाहिजे. नाही तर आपल्यावर बोल नाही, रुसवा राहील. म्हणून माझी सविनय प्रार्थना आहे की, अन्य सर्व गोष्टींकडे काणाडोळा करून सभेचे अध्यक्षस्थान मंडित करून या आपल्या लडिवाळ अस्पृश्य लेकरांस वर येण्यास हात द्यावा. यावेळी जर त्यांची उपेक्षा केली तर ते कायमचे खाली जातील. मग त्यांना वर काढणे अशक्य होईल. बाबासाहेबांचे हे शब्द वाचून राजर्षींच्या हृदयाला पाझर फुटला नसता, तरच नवल. ते नागपूर परिषदेला उपस्थित राहिले आणि त्यांनी देशभरातून आलेल्या अस्पृश्य बांधवांना प्रेमभराने संबोधितही केले. श्रीपतराव शिंदे यांनी महाराजांचे भाषण वाचून दाखविले. त्यात महाराजांनी जातिनिर्मूलनामध्ये शिक्षण, रोटीव्यवहार आणि बेटीव्यवहाराचे महत्त्व सांगितले. त्याशिवाय जातिनिर्मूलनाचे आणखी एक महत्त्वाचे सूत्र सांगताना महाराज म्हणतात की, लग्नकार्यात निरर्थक पैसा खर्च करण्यापेक्षा शिक्षणासारख्या उपयुक्त कामाकडे तो लागला पाहिजे. ज्याप्रमाणे जपानमधील उच्चवर्णीय सामुराई यांनी पुढाकार घेऊन जसा तेथील जातिभेद संपवला, त्याचप्रमाणे येथील उच्चवर्णीयांची जातिभेद निर्मूलनातली भूमिका महत्त्वाची आहे. खालील जातींनी आपली सुधारणा करून, दर्जा वाढवून घेण्याचा व वरील पायऱ्यांवर चढण्याचा प्रयत्न चालूच ठेवला पाहिजे. आणि वरील जातींनीही जरुर तर काही पायऱ्या खाली येऊन त्यांना हात देऊन वर घेतले पाहिजे. असे झाले म्हणजे सुरळीतपणे व सलोख्याने हे जातिभेद मोडण्याचे बिकट काम सिद्धीस जाण्याचा संभव आहे. आम्हासारख्या मराठ्यांना सुद्धा जात मोडून एकी करण्यास भाग पाडले पाहिजे, अशी भावना महाराजांनी व्यक्त केली. या परिषदेतही महाराजांचा जन्मदिन उत्सवासारखा साजरा करण्याचा ठराव झाला.

याच कालावधीत बाबासाहेबांनी राजर्षींना लिहीलेल्या एका पत्रात २६ जूनचा आपला वाढदिवस सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मूकनायकचा विशेषांक प्रकाशित करण्याचा मानस आहे. असे महाराजांना कळविले होते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे दरबारकडून उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही केली होती. बाबासाहेबांचे हे पत्र म्हणजे राजर्षींच्या जन्मतारखेचा एक अस्सल पुरावा आहे, यात शंका नाही.

नागपूर परिषदेनंतर बाबासाहेब महाराजांच्या मदतीनेच उर्वरित विद्याभ्यास पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. यावेळी माझी भगिनी रमाबाईला मी कोल्हापूरला तिच्या माहेरी घेऊन जातो, असे भावोद्गार महाराजांनी काढले होते. बाबासाहेबांना त्यांनी त्यांचे मित्र सर अल्फ्रेड पीज यांच्यासाठी बाबासाहेबांचा गौरवपूर्ण परिचय करून देणारे व गरज भासल्यास त्यांना मदत करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले होते.

माणगाव परिषद, नागपूर परिषद आणि त्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या सहसंबंधांचा तपशीलवार वेध घेण्याचे कारण म्हणजे या दोन्ही परिषदा या दोन महामानवांनी या देशातल्या बहिष्कृत वर्गासाठी जे कार्य आरंभले, त्याचा एक संयुक्त उपक्रम होता. विशेषतः शाहू महाराजांनी बहिष्कृत समाजाचे हिंदुस्थानाचे भावी नेते म्हणून जी घोषणा केली, त्यायोगे बाबासाहेबांच्या नेतृत्व प्रस्थापनेचा मार्ग सुकर झाला.

या दोघांच्या स्नेहबंधातून सुरू झालेला मूकनायक जर नसता, तर माणगाव परिषदेचा वृत्तांत कितपत आपल्या हाती लागला असता, याविषयी मला शंका वाटते. कारण माणगाव आणि नागपूर या दोन्ही परिषदांचे जे तपशीलवार वार्तांकन मूकनायकमध्ये आहे, त्यामुळेच या परिषदा तेथील उपस्थितांसह, तेथे झालेल्या ठरावांसह आपल्याला अभ्यासण्यास उपलब्ध आहेत. आज आपण माणगाव परिषदेची शताब्दी साजरी करीत असताना बाबासाहेबांनी बहिष्कृत समाजासाठी केलेल्या कार्याप्रती जितके कृतज्ञ राहणे आवश्यक आहे, तितकेच त्यांनी मूकनायकचा वृत्तपत्र प्रपंच आरंभला आणि त्या कामी शाहू महाराजांनी त्यांना भरीव मदत केली, या बाबीसाठीही ऋणी राहायला हवे. मूकनायकातील वार्तांकन वगळले, तर माणगाव परिषदेविषयी कदाचित, कागल संस्थानातील माणगाव येथे बहिष्कृतांची एक परिषद पार पडली, या नोंदीखेरीज अन्य कोणतीही नोंद आपल्या हाती लागू शकली नसती. यातून आपल्या वर्तमानाचे डॉक्युमेंटेशन केले, तर उद्या इतिहासात त्याची नोंद होऊ शकते, ही बाब अधोरेखित होते. त्यामुळेच माणगाव परिषदेच्या संदर्भात तरी बाबासाहेबांबरोबरच शाहू महाराज आणि मूकनायक यांचे अनन्यसाधारण असे पायाभूत योगदान आहे, ही बाब लक्षात घ्यायला हवी.

येथे आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेऊ या की, बाबासाहेबांनी त्यांच्या भावी आयुष्यात केलेल्या अलौकिक स्वरुपाच्या सामाजिक, राजकीय कामगिरीमुळे त्यांच्या भूतकाळाचा, समग्र कारकीर्दीचा वेध घ्यायला अभ्यासकांनी सुरवात केली, तेव्हा खऱ्या अर्थाने माणगाव परिषद सामोरी आली. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रकार चां.भ. खैरमोडे लिखित डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या चरित्रमालिकेच्या पहिल्या खंडामध्ये दोन ठिकाणी ३० व ३१ मे १९२० रोजी नागपूर येथे झालेल्या परिषदेचा उल्लेख आहे; मात्र त्या आधी दोन महिने झालेल्या माणगाव परिषदेचा उल्लेख नाही. या परिषदेत महर्षी वि.रा. शिंदे यांच्या साऊथबरो कमिशनसमोरील कैफियतीबद्दल अस्पृश्य समाजाची नामंजुरी जाहीर करण्याच्या अनुषंगाने परिषदेत झालेल्या खडाजंगीच्या अनुषंगाने ना.सी. शिवतरकर यांनी १९३३ साली जनतेच्या खास अंकात लिहीलेल्या डॉ. आंबेडकरांच्या सहवासातले काही संस्मरणीय प्रसंगलिहीलेल्या लेखातील काही उतारे उद्धृत केले आहेत. मात्र, माणगाव परिषदेच्या अनुषंगाने काही लिहील्याचे आढळून येत नाही.

तथापि, राजर्षी शाहू यांचे आद्य चरित्रकार प्रो. आण्णासाहेब लठ्ठे यांनी श्रीमच्छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र यामध्ये अस्पृश्य मानिलेल्या वर्गांचा उद्धार या प्रकरणामध्ये माणगाव परिषदेमध्ये शाहू महाराजांनी हजेरीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने केलेला खुलासा तपशीलाने दिला आहे. चरित्रकार धनंजय कीर यांनी राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांचीही चरित्रे लिहीली आहेत. या दोन्ही चरित्रांमध्ये त्यांनी माणगाव परिषदेचा वृत्तांत दिला आहे. ज्येष्ठ संशोधक डॉ. विलास संगवे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून राजर्षी शाहू छत्रपती पेपर्स हे मूळ स्वरुपात प्रकाशित केले. या मालिकेच्या नवव्या खंडात इंटिमेट रिलेशन्स विथ इमर्जिंग लीडर्स हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्यामध्ये पहिलाच भाग हा डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्याशी राजर्षी शाहूंच्या स्नेहबंधाविषयी आहे. या प्रकरणाची सुरवातच माणगाव परिषदेत महाराजांनी २२ मार्च १९२० रोजी केलेल्या भाषणाने करण्यात आली आहे. पुढे शाहू चरित्राचे ज्येष्ठ संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. रमेश जाधव यांनी शाहू-आंबेडकर यांच्या स्नेहबंधाच्या अनुषंगाने अधिक सखोल संशोधन केले आणि त्यामधील माणगाव परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले.

या प्रकारे माणगाव परिषदेची माहिती मूळ संदर्भ व चरित्रग्रंथांद्वारे उपलब्ध असली तरी सुरवातीला म्हटल्याप्रमाणे तत्कालीन अन्य वृत्तपत्रांमध्ये याचे फारसे वार्तांकन आले नाही. याचे कारण असे वाटते की, तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये बहिष्कृत समाजाचे एकूण नीच स्थान लक्षात घेता त्यांच्या अशा एखाद्या उपक्रमाची दखल प्रस्थापित वृत्तपत्रांनी घ्यावी, अशी अपेक्षाच करणे गैर होते. मूकनायक हे नवे वृत्तपत्र सुरू होत असल्याची जाहिरात पैसे देऊनही छापण्यास टिळकांच्या केसरीने नकार दिला होता, या तत्कालीन जळजळीत वास्तवाच्या पार्श्वभूमीवर या सापत्नभावाकडे पाहायला हवे. तथापि, माणगाव आणि नागपूर या परिषदांना राजर्षी शाहू महाराज यांच्या लाभलेल्या वरदहस्तामुळे आणि त्यांनी बाबासाहेबांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे या परिषदांना भारताच्या आद्य बहिष्कृतांच्या चळवळीच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान लाभले आहे, हे लक्षात यावे.

या संदर्भात वसंत मून यांनी बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल तत्कालीन वृत्तपत्रांच्या दृष्टीकोनाबाबत आपले सूक्ष्म निरीक्षण नोंदविले आहे. प्रा. मा.फ गांजरे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे व लेख या पुस्तकाच्या चौथ्या खंडाच्या प्रस्तावनेत प्रा. मून म्हणतात, मूकनायक पत्राची जाहिरात देखील जिथे नाकारली, तिथे बाबासाहेब आणि त्यांच्या चळवळीचा नामोल्लेख तरी केसरीतून होईल, अशी अपेक्षा करणे व्यर्थ होते. महाराष्ट्रीय वृत्तपत्रे डॉ. बाबासाहेबांच्या सुरवातीच्या कार्याकडे तोंडात शाळिग्राम व कानात बोळे घालून पाहात बसले होते. अखिल भारतीय पातळीच्या वृत्तपत्रांनी तर बाबासाहेबांना निव्वळ अनुल्लेखाने मारण्याचा चंगच बांधला होता. अस्पृश्य व आदिवासी समाजात कार्य करणाऱ्या ख्रिस्ती धर्मोपदेशक व माट्यांसारख्या ब्राह्मण सुधारकास जेवढी प्रसिद्धी ते देत, त्याच्या एक शतांशही वाटा, खेडोपाडी अस्पृश्यांत जागृती करण्याकरिता वणवण भटकणाऱ्या बाबासाहेबांना मिळाला नाही. १९२० ते १९३० च्या दरम्यानचे बाबासाहेबांचे कार्य बऱ्याचशा अनुमान धक्क्यावरच आधारावे लागते. १९२७ चा महाडचा सत्याग्रह वा पुढचा नाशिकचा मंदिर प्रवेश सत्याग्रह या दोन्ही चळवळी अस्पृश्यांच्या वृत्तपत्रांनी जेवढ्या मांडल्या, तेवढ्याच कळल्या. परंतु, या दोन घटनांचे अखिल भारतीय दलितांच्या भवितव्यावर होणारे परिणाम बाबासाहेबांना व दलित कार्यकर्त्यांनाच जगाला सांगावे लागले. अशा ऐतिहासिक प्रसंगाबद्दलच अनास्था, तर या घटनांच्या पूर्वतयारीसाठी बाबासाहेबांना करावे लागलेले प्रयत्न, सभा संमेलने आदींची माहिती आपणास कोठून व कशी कळणार? १९२० ते ३० चा त्यांच्या जीवनाचा ऐन तारुण्यातील त्यांचा उमेदीचा काळ त्यांनी ज्या प्रौढ बुद्धिमत्तेने हाताळला असेल व संघटना बांधण्यासाठी कार्यकर्त्यांची जी साखळी तयार केली असेल, त्या प्रयत्नांची कल्पना देणारी कोणतीच सामग्री आज उपलब्ध नाही. प्रा. मून यांच्या उपरोक्त निरीक्षणातून आपल्याला बाबासाहेबांच्या व एकूणच बहिष्कृत समाजाच्या चळवळींविषयी तत्कालीन समाजात व त्या व्यवस्थेतूनच प्रेरित झालेल्या अभिजन वृत्तपत्रांचा दृष्टीकोन स्पष्ट होतो.

माणगाव परिषदेचा ६१ वा स्मृती महोत्सव सन १९८२ साली मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने साजरा करण्यात आला. स्थानिकांसह राज्यभरातील नेते, कार्यकर्त्यांचा त्यामध्ये सहभाग होता. दलित पँथर चळवळीमुळे दलित समाजामध्ये अन्यायाविरुद्ध निर्माण झालेला असंतोष आणि जागृती यांची पार्श्वभूमी या महोत्सवाला होती. मात्र, परिषद यशस्वी करण्याच्या कामी दलितमित्र डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार या स्थानिक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला होता. विशेषतः या निमित्ताने जो स्मरणिका ग्रंथ प्रकाशित करण्यात आला, त्याची जबाबदारी अण्णांनी उचललेली होती. त्यामुळे या परिषदेच्या साजरीकरणावर एक प्रकारे काँग्रेसचा वरचष्मा होता. तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. बाबासाहेब भोसले या दोन दिवसीय परिषदेस उद्घाटक म्हणून उपस्थित राहू न शकल्याने महाराष्ट्र विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रा.सु. गवई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कै. आप्पासो पाटील नगर अर्थात समारंभ स्थळी डॉ. भाई माधवराव बागल, खासदार उदयसिंगराव गायकवाड, बाळासाहेब माने, आमदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जिल्हा आय काँग्रेसाध्यक्ष बाबूराव धारवाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शंकरराव कौलवकर, रत्नाप्पा कुंभार, बापूसाहेब राजभोज, माजी आमदार सावंत, रविंद्र सबनीस, डी.एस. नार्वेकर, आमदार जयवंतराव आवळे आदी उपस्थित राहिल्याचा उल्लेख या परिषदेच्या वार्तांकनात आढळतो. दा. म. शिर्के यांनी या उद्घाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप केला, तर वि.रा. भास्कर यांनी आभार मानल्याचाही उल्लेख आढळतो.

या कार्यक्रमाच्या समारोप सत्रातील परिसंवादात प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी हा देश कोणाच्या मालकीचा नव्हे! या देशाने दलितांवर वर्षानुवर्षे अन्याय व अत्याचार केले आहेत. हिंदु धर्मानेही दलितांना सदैव पायदळी तुडविले आहे. परंतु दलित समाज आता जागा झाला आहे. तो कोणापुढेही मान तुकविणार नाही, (दै. पुढारी, कोल्हापूर, दि. २२ मार्च १९८२) अशा स्वरुपाचे उद्गार काढल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे ग्रामविकास व वन मंत्री डी.डी. चव्हाण हे संतापून व्यासपीठावरुन उतरून आपल्या गाडीकडे जाऊ लागले, तेव्हा कवाडे यांनी मी दोन मिनिटांत भाषण संपवितो, आपण जाऊ नका, अशी विनंती केली. संयोजकांनीही त्यांना भाषण आटोपते घेण्यास सांगितले, मग कोठे तणाव कमी झाला. कवाडेंप्रमाणेच राजा ढाले या दुसऱ्या दलित नेत्यानेही प्रक्षोभक वक्तव्य केले, असेही या संदर्भातील वार्तांकनात म्हटले आहे. या परिसंवादात कवाडे, ढाले यांच्यासह अशोक निळे, शरद पाटील, चंद्रकांत थोरात, रतनलाल सोनग्रा, मुकुंद आचार्य, आर.डी. चव्हाण सहभागी झाले होते.

१९८२ साली झालेल्या या स्मृती महोत्सवाचे वार्तांकन तत्कालीन स्थानिक वृत्तपत्रांनी ठळकपणाने पहिल्या पानावर छायाचित्रांसह दिल्याचे दिसते. महोत्सवाच्या दिवशी माणगाव येथील तयारीच्या बातम्या व स्मारकाचे छायाचित्रही दै. पुढारीने पहिल्या पानावर दिलेले आहे. २१ मार्च १९८२ रोजीच्या रविवार पुरवणीमध्येही म.दा. नलावडे यांचा माणगावची पहिली अस्पृश्य परिषद हा मोठा लेखही प्रसिद्ध केला आहे. ज्येष्ठ संशोधक के.के. कावळेकर यांचा माणगाव परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व हा लेखही २० मार्च १९८२च्या अंकात पाहायला मिळतो. १९८२मध्ये झालेल्या या सोहळ्याला त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासह त्यावेळी झालेल्या कार्यक्रमांना सर्वच लहानमोठ्या वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिली. राजकीय पातळीवर सुरू झालेल्या दलितांच्या तुष्टीकरणाचे प्रतिबिंबही या सोहळ्यादरम्यान पाहायला मिळते.

या स्मृती महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या माणगाव परिषद: ६१ वा स्मृती महोत्सव विशेषांक, दि. २१ व २२ मार्च १९८२ या स्मरणिकेत मी आणि १९२० सालची माणगाव परिषद या विशेष विभागाअंतर्गत प्रज्ञावंत गौतम, प्रा.एम.एम. आचार्य, प्रा. रामराव वानखेडे, भास्कर कांबळे व प्रा. गणेश कांबळे यांच्या नावावर काही मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामध्ये अनुक्रमे माणगाव परिषदेचे साक्षीदार असलेल्या गंगाधर यशवंत पोळ, ज्ञानदेव भिवाजी खोचीकर, आणू हिरु पाटील, प्रभू यल्लाप्पा कांबळे, श्रीमती चंदा दादू सावंत, आबा सुबु गवळी यांच्या (प्रज्ञावंत गौतम यांच्या पुस्तकात या व्यतिरिक्त गणू मसू सनवी, चंद्राप्पा बाबाप्पा कांबळे, मारुती शिंगे यांच्याही मुलाखती आहेत.) मुलाखतींचा समावेश आहे. प्रज्ञावंत गौतम यांनी या मुलाखतींचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यांचे हे काम संशोधनपर होते. मी आणि माणगाव परिषद या पुस्तकामध्ये गौतम यांनी त्याविषयी माहिती देताना म्हटले आहे की, माणगाव परिषदेच्या स्मृती महोत्सव विशेषांकाचे संपादक प्रा. रमेश ढावरे यांनी त्या विशेषांकामध्ये छापण्यास देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे मी त्या संकलित करून दिल्या. वास्तविक हे काम संशोधनपर होते. त्या सर्व मुलाखती माझ्या नावावर प्रसिद्ध होणे आवश्यक होते; परंतु संपादकांनी, या मुलाखती तुमच्या एकट्याच्याच नावावर न छापता इतर कार्यकर्ते जे बाहेर काम करतात, त्यांच्याही नावावर छापू या, अशी माझ्याकडे विनंती केली. मीही थोडा उदार दृष्टीकोन स्वीकारला आणि प्रा. एम.एम. आचार्य, प्रा. रामराव वानखेडे व प्रा. गणेश कांबळे यांच्या नावावर माझ्या मुलाखती छापल्या गेल्या.

या प्रकरणाचा तपशीलात उल्लेख करण्याचे कारण असे की, सदर मुलाखतींमध्ये संबंधितांनी काही माहितीचे उदात्तीकरण केले अगर काही बाबी वाढवून सांगितल्या, काहींनी स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या, असे आक्षेप चळवळीतील लोकांनी त्यावर घेतले. मात्र, तरी सुद्धा या मुलाखतींचे महत्त्व कमी होत नाही. कारण त्यातला हा स्व-उदात्तीकरणाचा भाग वगळला तरी इतर उपलब्ध संदर्भांशी तुलना करून तत्कालीन मूळ वस्तुस्थितीचे आकलन करवून घेण्याच्या दृष्टीने गौतम यांच्या या संशोधकीय प्रकल्पाचे महत्त्व राहतेच. त्याचे श्रेय त्यांना द्यायला हवे.

उपरोक्त पार्श्वभूमीवर, समकालीन वृत्तपत्रांमध्ये माणगाव परिषदेचे स्थान काय, याविषयीची चर्चा करावयाची झाल्यास माणगाव परिषद ही या देशातील बहिष्कृत समाजाच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक घटना म्हणूनच केवळ तिच्याकडे न पाहता एकूणच आजच्या परिस्थितीमध्ये दलित, शोषित, वंचितांचे स्थान काय आहे, त्यांना, त्यांच्या जीवनातील घडामोडींना वृत्तपत्रीय अवकाशात कितपत स्थान लाभते आहे, या बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. माणगाव परिषदेच्या या शताब्दी वर्षाला प्रारंभ झाला, तेव्हा प्रस्तुत लेखकाने माणगाव परिषद तसेच राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नेहबंधाला उजाळा देणारे लेख वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केले आहेत. मात्र, केवळ या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतींना उजाळा देणे इतकाच याचा अर्थ लावल्यास ते संकुचितपणाचे लक्षण ठरेल. माणगाव परिषद आणि त्यानंतर लगोलग राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेली नागपूर परिषद या दोन्ही परिषदांनी तत्कालीन बहिष्कृत समाजामध्ये अस्मितेचे स्फुल्लिंग चेतविले. स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी स्वाभिमानपूर्वक मागणी करणारी ही पहिली दोन आद्य व्यासपीठे होती. तत्कालीन सामाजिक- राजकीय परिस्थितीत या परिषदांना मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रीय अवकाशात स्थान लाभणे अशक्यप्रायच ठरले.

तथापि, आजही मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त, अल्पसंख्याक यांच्या प्रश्नांना फारच त्रोटक स्थान लाभते आहे. माध्यमांच्या प्रचंड गदारोळातही खैरलांजीसारखी मानवतेला काळिमा फासणाऱ्या क्रूर घटना जगासमोर येण्यास तीन दिवसांहून अधिक काळ लागतो, अगर सामाजिक अन्यायाच्या कित्येक घटनांच्या बातम्या सामोऱ्या येतही नाहीत. यावरुन या वंचित, शोषित वर्गाच्या प्रश्नांविषयी माध्यमांना कितपत आस्था आहे, याची जाणीव होते. या वर्गावरील अन्याय, अत्याचार हे जातियतेच्या दृष्टीकोनातूनच सुरू आहेत. त्यांच्यावरील या अन्यायाला वाचा फोडण्यात मुख्य प्रवाहातील साखळी माध्यमे कच खातात. अन्यायविषयक बाब राहोच, पण या वर्गाला शिक्षणासह प्रबोधनात्मक अशा अनेक बाबींची गरज असते, ती तर आज कोणीही पुरवत नाही. भांडवलदारी व्यवस्था आणि जाहिरातदारांशी हितसंबंध सांभाळत असताना बाजाराचे गणित जुळविण्याची एक अपरिहार्यता या माध्यमांची आहे, त्याचाही परिणाम सामाजिक भोवतालाचे प्रतिबिंब अत्यल्प प्रमाणात उमटण्यामध्ये झालेला दिसतो.

या उलट, केवळ चळवळ म्हणून आंबेडकरी विचारांची म्हणून जी वृत्तपत्रे या अवकाशात आहेत, त्यांच्याही वितरणापासूनच्या अनेक समस्या आहेत. आज एकच एक म्हणावे असे कोणतेही मुखपत्र या व्यापक मागासवर्गासाठी नाही. साहित्यिक व्यवहाराच्या अनुषंगाने डॉ. गंगाधर पानतावणे यांचे अस्मितादर्शसारखे व्यासपीठ दलित साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. त्यातील लेखन बहुतांश इतिहासात रमणारे ठरले. समकालीन समस्यांच्या संदर्भाने त्यांना आवाज प्रदान करण्याचे काम त्यातून पूर्णांशाने झाले, असे म्हणता येणार नाही. शोषितांचा साहित्यिक हुंकार म्हणून मात्र अस्मितादर्शची कामगिरी अजोड स्वरुपाची राहिली. समकालीन व भविष्यवेधी स्वरुपाचे व्यासपीठ म्हणून नाव घ्यायचे झाल्यास धम्मलिपीला ओलांडून पुढे जाता येणार नाही. धम्माची समकालीन मांडणी करण्याबरोबरच समकालीन प्रश्नांना शस्त्रक्रियेच्या टेबलावर घेऊन त्यांची परखड शल्यचिकित्सा करण्याचे काम राजा ढाले यांनी त्या माध्यमातून केले. धम्मलिपीचा कालखंड फार मोठा नसला तरी आंबेडकरी चळवळीचे दिग्दर्शन तिने ज्या पद्धतीने केले, त्याला तोड नाही. विशेषतः चळवळीची भविष्यवेधी मांडणी करण्याचे काम या माध्यमातून त्यांनी केले.

अलिकडच्या कालखंडात बबन कांबळे यांच्या सम्राटने आर्थिक गणिते जुळवत आणि वितरणाचे जाळे विस्तारत महाराष्ट्राच्या विविध भागांत आपले स्थान निर्माण केले होते. पण, काही कारणांनी त्यांची बसलेली घडी विस्कटली. मिळालेला वाचकवर्ग दुरावला गेला. त्यांच्याकडे काम करणाऱ्यांतील काहींनी स्वतःचा वृत्तपत्र व्यवहार सुरू केला. मात्र, आर्थिक जोडण्यांअभावी ती साऱ्याच पातळीवर कमी पडताहेत. साहजिकच त्यांचे प्रभावक्षेत्र नाही म्हणण्यासारखेच आहे. अशी तुकड्या तुकड्यांत ठिकठिकाणी ध्येयनिष्ठपणे काम करणारी चळवळीची बहुतांश वृत्तपत्रे ही आजही डॉ. आंबेडकर यांच्या विचार, लेखन व कार्यावर पोसली जात आहेत. मात्र, चळवळ त्यापुढे नेऊन समकाळाचे प्रतिबिंब दर्शविण्यात ही वृत्तपत्रे कमी पडताहेत, ही बाब मान्य करायला हवी. वृत्तपत्र असो वा वाहिनी, या दोन्ही बाबी आर्थिक बाबतीत भस्मासूर आहेत. प्रचंड खर्च करावा लागतो त्यासाठी. चळवळीप्रती प्रचंड निष्ठा असूनही आर्थिक गणिते जुळवता जुळवता नाकी नऊ आले, तरी आपल्या ध्येयापासून न ढळता काम करणारे अनेक पत्रकार, संपादक आज कार्यरत आहेत. त्या सर्वांनी एकत्र येऊन, आपापसातले तात्त्विक मतभेद बाजूला ठेवून एखाद्या राज्यव्यापी अगर राष्ट्रीय वृत्तपत्राचा किंवा वाहिनीचा प्रकल्प हाती घेतला, तर चळवळीला एक मुखपत्र लाभेल आणि त्या माध्यमातून या देशातील सर्व शोषित, वंचित घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवाज बुलंद करता येऊ शकेल आणि महत्त्वाचे म्हणजे राज्यकर्त्यांना त्याची दखल घ्यावीच लागेल. या दृष्टीने भविष्यात प्रयत्न झाल्यास ते माणगाव परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षातील समकालीन फलित ठरेल.

 


संदर्भ सूची:

१)      Dr. Babasaheb Ambedkar Writings & Speeches, Education Department, Government of Maharashtra (1991)

२)      डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे (खंड १८, १९ व २०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (२००५)

३)      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूकनायक आणि बहिष्कृत भारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समिती, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (१९९०)

४)      डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई (१९९९)

५)      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अग्रलेख (संकलन- प्रदीप गायकवाड), क्षितिज पब्लिकेशन, नागपूर

६)      माणगाव परिषद ६१वा स्मृती महोत्सव विशेषांक, (मार्च १९८२)

७)      आंबेडकर, भी.रा.: जातिभेद निर्मूलन, (अनु. मा.फ. गांजरे), अशोक प्रकाशन, नागपूर (१९८०)

८)      कीर, धनंजय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पॉप्युलर प्रकाशन, पुणे (१९८१)

९)      कीर, धनंजय: राजर्षी शाहू छत्रपती, पॉप्युलर प्रकाशन, पुणे

१०)  कांबळे, बी.सी.: समग्र आंबेडकर चरित्र

११)  खैरमोडे, चांगदेव भवानराव: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, सुगावा प्रकाशन, पुणे, पाचवी आवृत्ती, (ऑक्टोबर २००२)

१२)  गौतम, प्रज्ञावंत: मी आणि माणगाव परिषद, प्रियदर्शी प्रकाशन, कोल्हापूर, (२००८)

१३)  जाधव, रमेश: राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई (२०१६)

१४)  पवार, जयसिंगराव: राजर्षी शाहू छत्रपती- जीवन व कार्य, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई, प्रथमावृत्ती (२००९)

१५)  पवार, जयसिंगराव (संपा.):  राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, कोल्हापूर द्वितियावृत्ती (२००७)

१६)  पाटील, बा.आ. (संपा.): राजर्षि शाहू खास अंक, सत्यवादी प्रेस, कोल्हापूर (ऑगस्ट १९२८)

१७)  पानतावणे, गंगाधर: पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रतिमा प्रकाशन, पुणे (१९९६)

१८)  सुरवाडे, विजय: समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई, प्रथमावृत्ती, (२००३)

१९)  Sangave, Vilas: Rajarshri Shahu Chhatrapati Papers, Shahu Research Centre, Shivaji University, Kolhapur (2005)