शनिवार, २ मे, २०२६

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत यंदा ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार

डॉ. भालचंद्र काकडे

डॉ. प्रकाश पवार


कोल्हापूर, दि. २ मे: शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला’ ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. यंदा या व्याख्यानमालेमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांचे ‘भारताचा विज्ञानवाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता ‘आ’लोकशाही’ (@alokshahi) या युट्यूब वाहिनीवरून हे व्याख्यान प्रसारित होणार आहे, अशी माहिती आयोजक डॉ. आलोक जत्राटकर यांनी दिली.

दि. ४ मे रोजी डॉ. भालचंद्र काकडे यांचा पाचवा स्मृतिदिन असून त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. ‘भारताचा विज्ञानवाद’ या विषयातून डॉ. पवार विज्ञाननिष्ठ विचारसरणी, समाजजीवनातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय परंपरेतील विवेकनिष्ठ प्रवाह यांचा परामर्श घेणार आहेत.

डॉ. प्रकाश पवार हे महाराष्ट्रातील प्रख्यात राजकीय विश्लेषक असून त्यांनी राज्यातील सामाजिक-राजकीय घडामोडींवर सखोल अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील त्यांचे चरित्रग्रंथ विशेष गाजले आहेत. विविध माध्यमांमधून ते सातत्याने प्रबोधनपर लेखन व व्याख्याने देत असतात. समकालीन राजकारण, इतिहास आणि समाजरचना यांचा परस्परसंबंध उलगडून सांगण्याची त्यांची शैली अभ्यासकांमध्ये लोकप्रिय आहे.

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला ही विज्ञान विषयाला वाहिलेली असून गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षवेधक व्याख्याने या व्याख्यानमालेत झाली आहेत. ही व्याख्याने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी प्रतिसाद देऊन ऐकली आहेत. सदर व्याख्यानमाला ‘आ’लोकशाही’ या युट्यूब वाहिनीवरून प्रसारित होणार असून प्रेक्षकांना @alokshahi या वाहिनीवर जाऊन त्यामध्ये सहभागी होता येईल. अगर पुढील लिंकद्वारेही सहभागी होता येईल.

https://youtu.be/z1CPpm8lL2k?si=78zLC8UgX225Eagw


बौद्ध स्थापत्य वारशाचे जतन व संवर्धन अत्यावश्यक: डॉ. कपिल राजहंस

डॉ. कपिल राजहंस


कोल्हापूर, दि. २ मे: बौद्ध स्थापत्य हा भारतीय सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा असून त्याचे शास्त्रीय पद्धतीने जतन व संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. कपिल राजहंस यांनी केले. डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या वाहिनीद्वारे आयोजित बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमालेअंतर्गत बौद्ध स्थापत्य कला या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

डॉ. राजहंस यांनी आपल्या भाषणात बौद्ध स्थापत्याची वैशिष्ट्ये अधोरेखित करताना सांगितले की, स्तूप, चैत्यगृह आणि विहार ही केवळ धार्मिक स्थळे नसून बौद्ध तत्त्वज्ञान, समाजरचना आणि ज्ञानपरंपरेची साक्ष देणारी केंद्रे आहेत. या स्थापत्य रचनांमध्ये प्रतीकात्मकता, भूमितीय अचूकता आणि पर्यावरणाशी सुसंगत नियोजन दिसून येते. सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध स्थापत्याला मोठी चालना मिळाली असून देशभर उभारण्यात आलेले स्तूप आणि शिलालेख हे त्या वैभवाचे द्योतक आहेत. या वारशामुळे भारताची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्याच्या काळात नागरीकरण, दुर्लक्ष आणि अपुऱ्या संवर्धनामुळे अनेक बौद्ध वारसा स्थळे धोक्यात आली आहेत, याबाबत डॉ. राजहंस यांनी चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शासन संस्था, पुरातत्त्व विभाग, संशोधक आणि स्थानिक नागरिक यांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

नव्या पिढीमध्ये या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल जागरूकता निर्माण करणे, शैक्षणिक अभ्यासक्रमात त्याचा समावेश करणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून संवर्धनाला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बौद्ध स्थापत्य हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून मानवी मूल्ये, शांती आणि सहअस्तित्वाचा संदेश देणारा जिवंत वारसा आहे, असेही राजहंस यांनी सांगितले.

डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व परिचय करून दिला आणि आभार मानले. 

--

(सविस्तर व्याख्यान ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. - https://youtu.be/CM8X4haMvqo?si=DWgIGkE0IpjTEBb2)