शनिवार, २६ जून, २०२१

शाहू महाराजांच्या धोरणांचे जागतिक लोकशाही मूल्यांशी नाते: डॉ. सुधीर गव्हाणे

 

डॉ. सुधीर गव्हाणे

डॉ. सुधीर गव्हाणे


कोल्हापूर, दि. २६ जून: राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या छोट्याशा करवीर संस्थानामध्ये राबविलेली धोरणे ही लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणारी होती, जागतिक मूल्यांशी नाते सांगणारी होती, म्हणूनच ते खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ या विशेषणाला पात्र होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे (औरंगाबाद) यांनी आज येथे केले.

येथील डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या युट्यूब वाहिनीवरून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राजर्षी शाहू महाराज: सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभया विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.

डॉ. गव्हाणे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे असे समाजपुरूष होते, ज्यांनी सत्तेलाच परिवर्तनाचे साधन बनविले. त्याचे पडसाद पुढे वर्षानुवर्षे उमटत राहिलेले आपल्याला दिसतात. शाहू महाराजांनी सामाजिक स्वातंत्र्यासाठीचे जे कार्य उभे केले, त्या कार्याला राजकीय स्वातंत्र्य चळवळीपासून वेगळे काढता येणार नाही. किंबहुना, राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, र.धों. कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी प्रभृतींनी जे सामाजिक चळवळीचे कार्य केले, ते राजकीय चळवळीइतकेच महत्त्वाचे आणि पूरक होते. सामाजिक स्वातंत्र्याखेरीज हाती आलेल्या राजकीय स्वातंत्र्याला काडीचाही अर्थ उरला नसता, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.

डॉ. गव्हाणे पुढे म्हणाले, राजकीय लोकशाहीइतकेच महत्त्व सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी प्रकारच्या लोकशाहीलाही आहे. वंचितांना हक्क, अधिकार, न्याय प्रदान करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. या लोकशाहीमध्ये परस्परविरोधी विचारांचा आदर आहे, वैविध्यपूर्ण संस्कृतींचा सन्मान आहे. बहुविध संस्कृती हे लोकशाहीचे महत्त्वाचे लक्षण आहे. अशा लोकशाहीचा विकास आपल्या राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केला. त्याचप्रमाणे जेथे जेथे अशा प्रकारचे कार्य चालू होते, त्या कार्यामध्ये आपल्या परीने सहभाग, पाठिंबा दिला. बहुजनांच्या कल्याणासाठी त्यांनी अथक लढा दिला. धाडसी वृत्तीबरोबरच अजस्त्र बुद्धिमत्ता त्यांच्या ठायी होती. तिचा उपयोग त्यांनी बहुजनांचे समाजकारण सक्षम करण्यासाठी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच त्यांचा सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभअशा शब्दांत सार्थ गौरव केला.

शाहू महाराजांच्या नावे राज्यात एकही विद्यापीठ नाही, याची खंत

मायावती यांच्या राजकारणाबद्दल दुमत असू शकेल, मात्र त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या नावे विद्यापीठ स्थापन केले. शाहू महाराजांच्या नावाचा जिल्हा स्थापन केला. महाराष्ट्रात मात्र शाहू महाराजांच्या नावे एकही विद्यापीठ नाही, याची खंत डॉ. सुधीर गव्हाणे यांनी या प्रसंगी व्यक्त केली.