सोमवार, ११ मे, २०२०

कोरोना आणि प्रसारमाध्यमे


(तिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागाच्या वतीने सोमवार, दि. ११ मे २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये 'कोरोना आणि प्रसारमाध्यमे' या विषयावर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाचा संपादित अंश माझ्या ब्लॉकवाचकांसाठी सादर करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

(प्रातिनिधिक छायाचित्र: द प्रिंटच्या सौजन्याने)

आजच्या या वेबिनारसाठी ऑनलाइन उपस्थित असणाऱ्या माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हणतात. कार्यपालिका, न्यायपालिका आणि संसद या तीन स्तंभांच्या बरोबरीने पत्रकारितेला चौथे महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि आता ऑनलाइन तसेच समाजमाध्यमे असा हा माध्यमांचा व्याप आता वाढलेला आहे. समाजमाध्यमांवर सर्वसामान्य जनताही मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याने त्या माध्यमाचा आपण पुढे थोडक्यात वेध घेऊ. मात्र, वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे दूरचित्रवाणी आणि रेडिओ या तीन माध्यमांच्या जबाबदाऱ्या एव्हाना बऱ्यापैकी सेट झाल्या आहेत. तरी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या अशा या जनमाध्यमांना त्यांच्यावरील जबाबदाऱ्यांची वेळोवेळी जाणीव करून देणे गरजेचे आणि महत्त्वाचे ठरते आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या आपल्यासारख्या विद्यार्थ्यांमध्येही त्या संदर्भातील जाणीव जागृती करणे ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्या अनुषंगाने तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागाच्या वतीने वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. या वेबिनारमध्ये आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी मला आमंत्रित केले, याबद्दल महाविद्यालयाच्या सर्वच घटकांना मी सुरवातीलाच मनापासून धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांचे स्वागत करतो.
 सर्वप्रथम आपण आपत्तीच्या काळामध्ये माध्यमे आणि माध्यमकर्मी यांची जबाबदारी आणि दक्षता या अनुषंगाने चर्चा करू या.
आपत्ती म्हणजे अचानक उद्भवलेले नैसर्गिक अथवा कृत्रिम अगर मानवनिर्मित संकट होय. ध्यानीमनी नसताना अचानक एखादी दुर्घटना, अपघात, घातपात, वगैरे घडून येते आणि जिवित व वित्तहानीची मोठी शक्यता निर्माण करते. गेल्या आठवड्यातलेच उदाहरण घ्या. सारे जग कोरोनाविरुद्धचा लढा लढत असताना विशाखापट्टणम येथे वायूगळतीची दुर्घटना घडली. परिसरातल्या कित्येक गावांतल्या नागरिकांचे जीवन संकटात सापडले. या वायूगळतीप्रमाणेच बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला वगैरे घटना म्हणजे आपत्तीच होत. त्याचप्रमाणे महापूर, दुष्काळ, वादळ, महामारी या घटना नैसर्गिक आपत्तीची उदाहरणे होत. बँक कर्मचारी, सरकारी कर्मचारी, कामगार अगर एखाद्या मोठ्या उद्योगातील कर्मचाऱ्यांचा संप ही सुद्धा वित्तहानी करणारी आपत्तीच असते.
या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींचा सामना करीत असताना नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांच्यामध्ये पॅनिक किंवा घबराट निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी जितकी सरकारची असते, तितकीच ती माध्यमांचीही असते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच सध्याच्या कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने माध्यमांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये केला, ही फार महत्त्वाची बाब आहे. सरकारने माध्यमांवर एवढा मोठा विश्वास दाखविला असल्याने तितकीच मोठी जबाबदारी माध्यमे आणि माध्यमकर्मींवर येऊन पडली आहे.
सर्वसाधारणपणे कोणत्याही आपत्तीच्या क्षणी संबंधित आपत्तीची प्राथमिक माहिती देण्यापासून ते वेळोवेळी त्यासंदर्भातील अपडेटेड माहिती देण्याची जबाबदारी माध्यमांवर असते. एरव्हीच्या सर्वसामान्य प्रसंगी ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली हाताला लागेल ती माहिती श्रोत्यांच्या/ दर्शकांच्या तोंडावर फेकायची, असे चालू शकते; बहुतांश वेळा ते खपूनही जाते. पण, आपत्तीच्या वेळी मात्र त्याची मोठी किंमत मोजायला लागण्याची शक्यता असते. यात वैयक्तिक हानीपासून ते सामाजिक, राष्ट्रीय हानीला सुद्धा माध्यमे कारणीभूत ठरू शकतात. आताच्या कोरोना लॉकडाऊनच्या कालखंडात या सर्व प्रकारच्या गोष्टी घडून गेल्याचे आपल्याला दिसले आहे. मग ते वार्ताहर राहुल कुलकर्णीचे प्रकरण असो किंवा मर्कज प्रकरण! मूळ प्रकरणापासून माध्यमे वार्तांकनाच्या नादात किती भरकटत जाऊ शकतात, याची ही दोन प्रकरणे प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. असो!
मुद्दा असा की, आपत्तीच्या काळात माध्यमांनी कोणत्या दक्षता घ्याव्यात? मित्रांनो, कोणतेही संकट आले की, आपण सर्वांत आधी देवाचा धावा करू लागतो आणि त्यानंतर शासनाकडे याचना करू लागतो. शासनाकडून काही कुचराई होत असेल, तर आपण त्या व्यवस्थेला शिव्यांची लाखोली वाहायला सुद्धा कमी करत नाही.
मित्र हो, देव काही आपल्या मदतीला येण्याची सुतराम शक्यता नसते. किंबहुना, सध्या सर्वात आधी सर्वच देवस्थानांना लॉकडाऊन करावे लागले आहे. राहता राहिले सरकार. आपण सरकारला शिव्या घालतो, याचे कारण आपला त्या व्यवस्थेवर विश्वास आहे, आणि आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, मदतीच्या, सहकार्याच्या आणि गरज लागल्यास पुनर्वसनाच्या! या ठिकाणी मला एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, की कोणत्याही आपत्तीच्या क्षणी आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी आणि सुरक्षेसाठी सर्वाधिक तत्पर कोणी असेल, तर ते म्हणजे सरकार. किंबहुना, लोकशाही व्यवस्थेमध्ये त्यांनी तसे असावे, अशी अपेक्षा असते. मग ते राज्य शासन असो की केंद्र सरकार!
आपत्तीच्या प्रसंगी आपला शेजारी आपल्या मदतीला थेट येईल, याच्यापेक्षा तो सरकारी यंत्रणेला फोन करून माहिती देईल, याचीच शक्यता अधिक असते. म्हणजे इथे सर्वांचाच विश्वास सरकारी यंत्रणेवर आहे. या यंत्रणेकडून आपल्याला अपेक्षा असतात, हे त्यातून दिसते. त्यामुळे आपत्तीच्या प्रसंगी केवळ माध्यमेच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे हेच कर्तव्य आहे की, त्यांनी सरकारी यंत्रणेला सहकार्य करण्यास तत्पर असले पाहिजे.
सरकार सुद्धा आपत्तीच्या तीव्रतेनुसार त्यासंदर्भातल्या उपाययोजना विविध स्तरांवर करीत असते. स्थानिक पातळीवर आपत्तीचा मुकाबला करणे शक्य असेल, तर स्थानिक प्रशासनाला त्या संदर्भातील अधिकार देऊन त्यांना आवश्यक ते सहकार्य वरिष्ठ यंत्रणा करीत असतात.
स्थानिक प्रशासनाबरोबर पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, अग्नीशमन दल, सरकारी आरोग्य यंत्रणा, अँम्बुलन्स, रक्तपेढ्या इत्यादी यंत्रणा गतीने कार्यान्वित झालेल्या असतात. आणि आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक जण आपापले मदतकार्य चोख व गतिमानतेने करण्याचा प्रयत्न करीत असतो.
अशा दुर्घटनेचे वार्तांकन करीत असताना माध्यमकर्मी निरनिराळ्या ठिकाणाहून वार्तांकन करीत असतात. कोणी प्रत्यक्ष घटनास्थळावर असतो, कोणी हॉस्पिटलच्या दरवाज्यात असतो. कोणी पोलीस प्रशासनाच्या संपर्कात असतो आणि न्यूजरुममध्ये बसलेले संपादक, अँकर त्यांच्याकडून माहितीचे तुकडे घेऊन प्रेक्षकांना सादर करीत असतात. अशा तुकड्या-तुकड्यांतल्या माहितीमुळे प्रेक्षकांच्या मनात गोंधळ, संभ्रम निर्माण होण्याचीच अधिक शक्यता असते.
 या पार्श्वभूमीवर, माध्यमांची ही जबाबदारी आहे की, त्यांनी अशा वेळी शासकीय यंत्रणेकडून जी अधिकृत माहिती पुरविण्यात येत असते, अशी माहितीच प्रेक्षकांना द्यायला हवी. आता शासकीय माहिती यंत्रणा सुद्धा अत्यंत गतिमान पद्धतीने काम करत असते. त्यांच्याकडून ठराविक अंतराने अधिकृत बुलेटिन रिलीज केली जात असतात. त्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणांकडून माहिती घेऊन कॉन्सोलिडेटेड स्वरुपात माध्यमांना पुरविण्यात येत असते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सुद्धा संबंधित आपत्कालिन परिस्थिती ज्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हाताळली जात आहे, अशांचेच बाईट घ्यायला हवेत कारण त्यांच्याकडे विविध यंत्रणांचे प्रमुख वेळोवेळी रिपोर्टिंग करीत असतात, अपडेट देत असतात. आपण प्रत्येकाकडे स्वतंत्र माहिती घेऊ लागलो, तर पुन्हा गोंधळच निर्माण होऊ शकतो.
 सर्वसाधारण परिस्थितीत माध्यमकर्मींनी घ्यावयाच्या या दक्षता सध्याच्या कोरोना साथीला सुद्धा लागू आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीला प्राधान्य दिले गेले पाहिजे. आणि तसेच सध्या केले जात आहे. त्यामुळे वृत्तपत्रे, वाहिन्या यांवरुन दिल्या जाणाऱ्या आकडेवारीत फारशी तफावत आढळून येताना दिसत नाही.
मित्र हो, या ठिकाणी मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की, प्रत्येक आपत्ती आपल्याला काही ना काही धडा शिकवून जाते. मुंबईमधील अनेक बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी शासकीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा एक घटक म्हणून मी काम केले आहे. उदाहरण म्हणून सांगतो, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी आपली सारी भारतीय प्रसारमाध्यमे विशेषतः टीव्ही वाहिन्या या सर्व हल्ल्यांचे लाइव्ह टेलिकास्ट करीत होत्या. परिणामी, पाकिस्तानमध्ये बसलेल्या या हल्ल्यांच्या मास्टरमाईंड्सना आपण थेट माहिती पुरवित होतो. ती पाहून ते तेथून दहशतवाद्यांना सूचना करीत होते. आणि त्यामुळे या दहशतवाद्यांना आवरणे आपल्याला मुश्कील झाले होते. ही वस्तुस्थिती लक्षात यायला आपल्याला ३६ तासांपेक्षाही अधिक वेळ लागला. लक्षात आल्यानंतर सरकारने सर्व वाहिन्यांना आवाहन करून लाइव्ह प्रक्षेपण न दाखविण्याची आणि त्याचप्रमाणे सरकार करीत असलेल्या कारवाईची माहितीही लगेच प्रसारित न करण्याची विनंती केली. त्यानुसार, वाहिन्यांनी केले. आणि मुंबईच्या ज्यू हाऊसमध्ये एनएसजी कमांडोजना हॅलिकॉप्टरद्वारे उतरवून ही कारवाई यशस्वी करण्यात आली. त्यानंतर प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडून माध्यमांसाठी एक आचारसंहिताही तयार करण्यात आली.
सांगण्याचा मुद्दा असा की, कोरोनाच्या साथीनेही आपल्याला काही गोष्टी शिकविल्या आहेत. हा लढा तर एका अप्रत्यक्ष शत्रूशी चालू आहे. हा विषाणू कोठेही आपल्याला धरू शकतो, हे माहिती असूनही मुंबईतील अनेक उत्साही माध्यमकर्मी रस्ते, ट्रेन, बेस्ट, स्टेशन्स अशा गर्दीच्या ठिकाणी लोकांचा बाईट घेत फिरत होते. हे त्यांच्या आरोग्याला घातक आहे, हे लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातच माझ्या लक्षात आल्याने तसे न करण्याची आणि बूमपासून सुद्धा स्वतःला जपण्याची सूचना मी या मित्र-मैत्रिणींना फेसबुकच्या माध्यमातून वेळोवेळी केली.
पण, उत्साहाच्या म्हणा अगर कर्तव्याच्या भरात म्हणा, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले आणि जगातील सर्वाधिक म्हणजे सुमारे ५३ माध्यमकर्मी मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यांना क्वारंटाईन करावे लागले.
इथे आपण एक लक्षात घेऊ या. फिल्डवर काम करणाऱ्या या पत्रकारांना निश्चितपणे त्यांच्या आरोग्याच्या काळजीचा विचार मनात आला असेलच. पण नागरिकांना थेट माहिती देण्याच्या जबाबदारीच्या भावनेतून त्यांनी आपले काम सुरू ठेवले. अशा प्रसंगी संबंधित वाहिनीचे संपादक, प्रमुख यांनी त्यांच्या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन त्यांना आपापल्या बीटच्या प्रमुखांच्या संपर्कात राहून घरूनच इनपुट देण्याविषयी सांगितले असते, तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती. मात्र, ती दक्षता घेण्यात आली नाही.
लोकांना माहिती देण्यासाठी स्वतःचे जिवित धोक्यात घालणाऱ्या १६९ पत्रकारांची मुंबईत तपासणी करण्यात आली. त्यातले ५३ जण पॉझिटीव्ह सापडले. तर जगभरात एकूण १९ पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला आहे.
याशिवाय, फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांच्या शारीरिक सुरक्षेचाही मुद्दा महत्त्वाचा आहे. गर्दीच्या ठिकाणी गर्दीकडून आणि काही ठिकाणी सुरक्षाकर्मींकडूनही पत्रकारांना, कॅमेरामन, छायाचित्रकारांना धक्काबुक्कीचे, त्यांच्याकडील कॅमेरे हिसकावून घेऊन फोडण्याचे प्रकार झाले आहेत. जगभरातील ४० देशांत (ज्यात आशियाई देशांचा समावेश अधिक आहे) ३००हून अधिक लोकांवर खोटी माहिती पसरविल्याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामध्ये काही पत्रकारांचाही समावेश आहे.
पत्रकारांमध्ये मानसिक तणावही मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या घटना घडताहेत. सातत्याने आपत्तीचे रिपोर्टिंग करीत असताना त्याच्यातल्या माणुसकीला सातत्याने आवाहन केले जात असते. ते बाजूला ठेवून अत्यंत निग्रहाने तो आपले कर्तव्य बजावत असतो. मात्र, एखाद्या क्षणी त्याच्याही भावनांचा बांध फुटू शकतो. (महापूर काळात आपण सांगलीच्या एका वाहिनीच्या रिपोर्टरची अशीच भावविवशता अनुभवली आहे.) मात्र, भावना व्यक्त जरी झाल्या नाहीत, तरी त्यांच्यावर मानसिक तणाव येत नाही, असे नाही. एक तर, वेळेत आणि ती सुद्धा अधिकृत माहिती देण्याचे बंधन, एकाच वेळी अनेक यंत्रणांशी समन्वय राखण्याचे आव्हान आणि त्यातून ती माहिती चुकीची जाणार नाही, याची दक्षता; अशा अनेक पातळ्यांवर पत्रकारांना एकाच वेळी काम करावे लागत असते. त्यातच समजा, त्याचा डिजीटल कनेक्ट तुटला, किंवा त्याला इंटरनेट मिळाले नाही, तर हे डिजीटल संकटही त्याच्यावरील मानसिक तणाव वाढण्याला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पत्रकारांच्या शारीरिक, भावनिक, मानसिक आणि डिजीटल सुरक्षेचे आव्हानही या काळात निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते.
युनेस्कोने कोरोनासंदर्भातल्या आपल्या अहवालात असे म्हटले आहे की, कोविड-१९च्या साथीने इन्फोडेमिक या दुसऱ्या साथीलाही जन्म दिला आहे. म्हणजे या काळात लोकांवर खऱ्याखोट्या माहितीचा इतका प्रचंड भडीमार केला गेला की, लोकांना विश्वास कोठल्या माहितीवर ठेवावा, हेच कळेनासे झाले. पसरविण्यात आलेल्या माहितीमध्ये मिसइन्फॉर्मेशनआणिडिसइन्फॉर्मेशनचा तर अतिरेकच झाला. डिसइन्फॉर्मेशन म्हणजे मुद्दामहून चुकीच्या माहितीची निर्मिती आणि प्रसारण अर्थात अफवा आणि अशी प्राप्त झालेली माहिती चांगल्या हेतूने प्रसारित केली जाणे. पण, तसे पाहायला गेले, तर दोन्हीही बाबी वाईटच. त्याला प्रतिबंध करण्यासाठी पत्रकारितेने जगभरात चांगले काम केले, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
या मिसइन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने एक सांगावेसे वाटते की, लोकांना दिलासा देण्याबरोबरच काहीतरी एक्सक्लुजिव्ह देण्याची आणि अशा प्रसंगामध्ये हिरो होण्याची एक सुप्त इच्छा पत्रकारांत असते; आणि काही अतिउत्साही, उथळ संशोधकांना सुद्धा! कोरोनाच्या काळात अनेक पत्रकारांनी संशोधकांसह आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, अॅलोपॅथिक अशा सर्व प्रकारचे वैद्यकीय तज्ज्ञ यांच्याशी वार्तालाप करून लस, उपचार, उपाययोजना याबाबतीत बातम्या दिल्या. काही जणांनी अल्ट्राव्हायोलेट बॅटरी कोरोनावर उपयुक्त, सॅनिटायझेशन टनेलने कोरोना रोखणे शक्य वगैरे बातम्या मोठ्या उत्साहानं दिल्या. पण, त्या देण्यापूर्वी त्यामागचं विज्ञान आणि आरोग्य विज्ञान लक्षात घेतलं असतं, तर कदाचित त्या बातम्या त्यांनी दिल्या नसत्या. कारण युव्ही प्रकाशात कोरोनाच काय, कोणताही जीवाणू व विषाणू जिवंत राहू शकत नाही. पृथ्वीभोवती ओझोनचा थर आहे म्हणून अन्यथा सूर्यप्रकाशातील युव्ही किरणांमुळे येथे माणूसही जिवंत राहिला नसता, किंबहुना, जीवसृष्टीच निर्माण होऊ शकली नसती. तेच सॅनिटायझेशन टनेलच्या बाबतीत. यामध्ये लोकांच्या अंगावर फवारण्यासाठी वापरले जाणारे सोडियम हायपोक्लोराईट हे खरे तर विषच आहे. त्यामुळे त्वचा, डोळे यांना इजा होण्याचीच दाट शक्यता असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा अशा टनेलच्या वापराला परवानगी नाकारलेली आहे. पुढे आपल्या केंद्र सरकारनेही त्याला प्रतिबंध केलाच. तर ही अशा प्रकारे मिसइन्फॉर्मेशन प्रसारित करण्याला आपल्या पत्रकारांचा हातभार कळत नकळतपणे लागत असतो.
ही मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन इतक्या मोठ्या प्रमाणात आली कोठून? तर, समाजमाध्यमांतून.
अमेरिकेतल्या ब्रुनो केस्लर फौंडेशनने कोरोनाच्या संदर्भातील समाजमाध्यमांवरील ६४ भाषांतील ११२ दशलक्ष पोस्टचे मशीन लर्निंग पद्धतीने विश्लेषण केले. त्यामध्ये ४० टक्के पोस्ट या अविश्वासार्ह स्रोतांकडून आल्याचे स्पष्ट झाले. ट्विटरवरील सुमारे १७८ दशलक्ष ट्विट्सपैकी सुमारे ४२ टक्के ही बॉट्सकडून (Bots) जनरेट झाल्याचे आढळले. आणि उर्वरितपैकी ४० टक्के ही अविश्वासार्ह स्रोतांकडून आलेली होती.
रॉयटर्स इन्स्टिट्यूटने सहा देशांच्या समाजमाध्यमांवरील केलेल्या पाहणीत कोरोनाच्या संदर्भातील सर्वसाधारणपणे एक तृतीअंश इतकी माहिती खोटी अगर दिशाभूल करणारी आढळली. म्हणजे ज्यांनी कोरोनाची माहिती समाजमाध्यमांद्वारे घेतली, त्यातल्या बहुतेक जणांना अशी चुकीची माहितीच अधिक मिळाली.
फेसबुकने मार्चमध्येच कोरोनाच्या संदर्भातील सुमारे ४० दशलक्ष पोस्ट चुकीच्या असल्याचे दाखविले आणि त्यांच्यासमोर वॉर्निंगही प्रदर्शित केली.
५० दशलक्ष ट्विट्सपैकी १९ दशलक्ष ट्विट्स (३८ टक्के) ही ब्लॅकबर्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने निर्माण केल्याचे आढळले आणि त्याद्वारे चुकीची माहिती पसरविली गेली.
न्यूजगार्डने केलेल्या पाहणीत युरोप व उत्तर अमेरिकेतील १९१ वेबसाइट्सवर चुकीची माहिती देण्यात आल्याचे दिसून आले. (कालच आपल्याकडे सोलापूरमध्ये एका युट्यूब चॅनेलवर कारवाई केल्याची बातमी होती. सोलापुरात या कोरोनाच्या काळात युट्यूब चॅनलचे पेव फुटले आहे. हे गंभीर आहे.)
कोरोनाव्हायरस फॅक्ट्स अलायन्सने सुमारे ७० देशांतील ४० हून अधिक भाषांतील माहितीची शहानिशा केली असून त्यातून ३५०० चुकीचे अगर गैर अशा माहितीचे तुकडे काढून टाकले आहेत.
या डिसइन्फॉर्मेशनच्या बरोबरीनेच वांशिक, जातीय आणि धार्मिक तणाव वाढविणाऱ्या पोस्टही मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या आहेत. खोटेपणाला भावनिकतेची जोड देऊन प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न झाल्याचेही दिसून आले.
कोरोनाच्या या कालखंडात लोकांचा ओढा माहितीसाठी ऑनलाइन माध्यमांकडे खूप मोठ्या प्रमाणात वळला. जगभरात हा ट्रेंड निर्माण झाला. आणि ऑनलाइन माध्यमांतील माहितीची विश्वासार्हता हा खूपच चिंतेचा मुद्दा असल्याने खऱ्या अर्थाने पत्रकारांवरील जबाबदारी ही अधिक वाढल्याचेही या काळात स्पष्ट झाले आहे. नागरिकांवर समाजमाध्यमांतून ज्या माहितीचा भडिमार केला जातो आहे, ती माहिती पत्रकारांकडेही टाकली जाते. मात्र, सर्वसामान्य लोकांप्रमाणे पत्रकारांना ती जशीच्या तशी स्वीकारता येत नाही. त्याला सर्व यंत्रणांशी संपर्क साधून त्या माहितीची खातरजमा करूनच पुढील प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे त्याच्यावरील हा अतिरिक्त माहितीचा भार आणि तणावही खूप मोठा आहे. त्यातून लोकांना योग्य, वस्तुनिष्ठ माहिती देण्याचे आव्हान जगभरातील माध्यमकर्मी मोठ्या जागरुकतेने, जीवावरचे संकट झेलून करीत आहेत, हे खरेच आहे. पत्रकारितेवरील जबाबदारी या कोरोना संकट काळात कधी नव्हे, इतकी पुन्हा प्रकर्षाने अधोरेखित झालेली आहे. म्हणूनच पत्रकारिता आणि पत्रकार हे अत्यावश्यक आणि इमर्जन्सी सेवेचा भाग बनले आहेत. समाजातील सर्वच घटकांनी जर आपापल्या स्तरावर योग्य दक्षता बाळगली, तर पत्रकारांनी या अभूतपूर्व आपत्तीच्या काळात त्यांचे काम निष्ठेने आणि सुनियोजितरित्या करणे शक्य होईल, असे वाटते. या निमित्ताने आपण आपल्या देशातीलच नव्हे, तर जगभरातील सर्व पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करू या. त्यांच्या कुटुंबियांना सलाम करू या.