गुरुवार, ७ जुलै, २०११

माझ्या मना, बन दगड..!

'दै. सकाळ'मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत असताना 15 एप्रिल 2005 रोजी निपाणी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेचा प्रकार झाला होता. यानंतर शहरात आणि परिसरात प्रचंड असं तणावाचं वातावरण पसरलं. सहिष्णु स्वभावाच्या निपाणीमध्ये असा प्रकार होणं, ही माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक गोष्ट होती. शहरात फिरताना ठिकठिकाणी विखुरलेल्या काचा, काठ्या, फोडलेल्या बस, वाहनं, दुकानं- सारा अनुभवच अतिशय वेदनादायी होता. आज निपाणी पूर्वपदावर आहे, पण कुठे ना कुठे तरी असे मूर्तीभंजनाचे प्रकार घडतच असतात. या पार्श्वभूमीवर मी लिहिलेला लेख हा आजही कालसुसंगत वाटतो. म्हणून खास आपणा सर्व मित्रांसोबत शेअर करीत आहे.
(प्रतिकात्मक छायाचित्र)

15 एप्रिल, 2005. डॉ. आंबेडकर जयंतीचा दुसरा दिवस. देशभर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली गेली असतानाच निपाणीतील आंबेडकरांच्या पुतळयास कोण्या एका समाजकंटकाने चपलांचा हार घातला. त्याची शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. जुना पुणे बंगळूर महामार्ग आणि मुख्य व्यापारीपेठ याभोवती वसलेल्या या शहरातील मुख्य मार्गावर दगडफेक होऊन नासधूस झाली नाही, असे एकही दुकान, खोका किंवा बूथ उरला नाही. रस्त्यावरील खासगी तसेच सार्वजनिक मालकीची वाहनेही यातून सुटली नाहीत. काही घरांवरही प्रक्षुब्ध जमावाने हल्ला केला. नेहमीच शांत आणि संयमी असणाऱ्या निपाणीवासियांचा रागाचा बांध या घटनेने फुटला होता. विशेषतः दलित समाज आपल्या नेत्याच्या पुतळयाच्या विटंबनेने संयम हरवून बसला होता. कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस यंत्रणेलाही केवळ बघ्याची भूमिका घेण्यापलिकडे काहीही करता आले नाही. दलित समाजाच्या या संतप्त भूमिकेचा फटका अनेक निष्पाप आणि विटंबनेच्या घटनेशी कोणताही संबंध नसणाऱ्या असंख्य गोरगरीब सामान्य व्यक्तींसह व्यापाऱ्यांनाही बसला. आपल्या मिळकतीचे होत असलेले नुकसान पाहून त्यांच्या भावनाही तीव्र न होत्या तरच नवल. साहजिकच सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या निपाणीत दलितांविरुध्द सवर्णांची एकी होऊ लागली आणि दलित वस्तीवर चालून जाण्याचा विचारही सामोरा आला. त्या विचाराच्या अंमलबजावणीच्या दिशेने त्यांची पावले वळू लागली; मात्र तोपर्यंत सावरलेल्या पोलिस प्रशासनाने आपली कुमक आणि बंदोबस्त वाढवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले आणि पुढचा- विचारही करता येणार नाही असा- गंभीर प्रसंग टळला. अन्यथा या घटनेला किती टोकाचे वळण लागले असते, याचा अंदाजही करता येत नाही. निपाणीतील जनजीवन दोन दिवसांत पूर्वपदावर आले; मात्र एक निपाणीकर या नात्याने या घटनेचे खोल पडसाद माझ्या ङ्कनावर उमटत राहिले.
पुतळा विटंबनेच्या या घटना घडतातच का ? अलिकडे त्यांचे प्रमाण का वाढू लागलेय ? समाजमन एखाद्या थोर व्यक्तीविरोधात किंवा आपल्याच बरोबरीने राहणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीविरोधात कलुषित का होऊ लागलेय ? समाजाची मानसिकता अशी हिंसक का होऊ पाहतेय ? या आणि अशा अनेक प्रश्नांची मालिका मनात उभी राहिली आणि त्यांची उत्तरे शोधण्याची प्रक्रियाही.
असे म्हटले जाते की थोर महापुरुषांचे मृत्यू दोनदा होतात. पहिले म्हणजे त्यांचे भौतिक अस्तित्व काळाच्या पडद्याआड जाते. दुसरे मरण म्हणजे त्यांच्या विचारांची त्यांच्याच अनुयायांकडून होणारी कत्तल. याला जोडून आता असे म्हणावेसे वाटते की, पुतळयांच्या रुपातील अस्तित्वही काही लोकांना आता नकोसे झाले आहे. त्यामुळे ते नष्ट करून तरी त्या व्यक्तीच्या स्मृती नाहीशा करता येतात का, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असावेत. असा विचार करणारे समाजकंटकच परिस्थितीचा फायदा घेत असतात. विटंबना करणारा कधीच चित्रात नसतो; मात्र दंगल घडविण्याचा त्याचा हेतू 101 टक्के यशस्वी झालेला असतो. सर्व काही करून सवरून तो मजा पाहात असतो. अशा समाजकंटकाला कुठली आलीय जात आणि धर्म ? समाजविघातक कृत्ये करणे हाच त्याचा धर्म आणि जातीजातीतील तेढ बळकट करणारी परिस्थिती निर्माण करणारी त्याची जात. विटंबनेनंतर उसळणाऱ्या दंगलीत सर्वच समाजघटक तितक्याच तीव्रतेने भरडले जातात; कोणीही त्यातून सुटत नाही. पण ही बाब लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते; होऊ नये ते झालेले असते. सामाजिक दरी सांधण्याच्या घटनाकारांच्या हेतूला सुरूंग लागलेला असतो आणि ही आग धुमसत राहते- नवी संधी मिळेपर्यंत. समाजमनावर झालेल्या या जखमा सहजी भरून निघणे शक्य नसते. पण लक्षात घेणार कोण ?
मुळात अशा घटना घडण्यास कारणीभूत आहे ती आपली मानसिकता. भारतीय समाज किंवा एकूणच मानवजात ही प्रतिमा आणि प्रतिकांच्या प्रेमात गुरफटलेली आहे. आपली अस्मिता ही विचारांपेक्षा अशा प्रतिमांपाशी अधिक भावनिकतेने गुंतलेली दिसते. त्यामुळेच जागोजागी मंदिरे, पुतळे उभारुन त्या व्यक्तींविषयी आदर प्रकट केला जातो, उदात्तीकरण केले जाते. अशा पुतळयांचा योग्य सन्मान राखला जातो का, हा आणखी एक वेगळाच विषय होऊ शकेल. मात्र या मानसिकतेमुळेच त्याचा राजकीय आणि धार्मिक लाभ घेणाऱ्यांचे फावते. जागोजागी उभारलेले पुतळे ही तर स्फोटके आहेत. त्यातही डॉ. आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचे पुतळे म्हणजे तर अणूबाँब आणि हायड्रोजन बाँब. मनुवाद बोकाळलेल्या या देशात राज्यघटनेद्वारे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम लोकशाहीची प्रस्थापना करून 'आधुनिक मनू' बनलेले डॉ. आंबेडकर आणि धर्मनिरपेक्ष हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे, आपल्या मुस्लीम शिलेदारांवरही जिवापाड प्रेम करणारे दिलदार शिवाजी महाराज यांच्या पुतळयांच्या विटंबनेवरुन दंगलींचे स्वरुप निश्चित होऊ लागले आहे, याला काय म्हणावे ? 'दलित-सवर्ण दंगल हवीय ?', करा आंबेडकर पुतळयाची विटंबना. 'की हिंदू-मुस्लीम दंगल हवीय ?'- शिवपुतळे आहेतच की. इतक्या सहजपणे समाजकंटकांचे फावतेय.
डॉ. आंबेडकर यांच्याच बाबतीत केवळ विचार करायचा झाला तर या देशातील सवर्णांनीच नव्हे तर बहुजन समाजानेही त्यांना कधीही राष्ट्रीय नेता किंवा आपला नेता म्हणून स्विकारले नाही, ही वस्तुस्थिती आहे. ते हयात होते तेव्हाही त्यांची अवहेलना झाली आणि आज मृत्यूनंतर 50 वर्षांनीही त्यांच्या प्रतिमेची विटंबना चालविली आहे. सवर्ण तरुणांचा आंबेडकरांवर रोष आहे तो त्यांनी घटनेत केलेल्या आरक्षणाच्या तरतुदींमुळे. वाढत्या बेरोजगारीमुळे तरुण वर्गाच्या टीकेचे लक्ष्य ठरतेय ती आरक्षण निती. 'दलित लोक सरकारचे जावई झालेत. पायरी सोडून वागताहेत, शिरजोर झालेत. तेव्हा त्यांची आरक्षणे रद्द करा. घटना बदला.' अशी ओरड सार्वत्रिक झाली आहे. मात्र युगानुयुगे गुलामगिरीत पिचलेल्या मागासवर्गीयांना आरक्षण मिळून आज केवळ 50 वर्षे होताहेत. त्यातही आरक्षणाची खरी अंमलबजावणी 1970 नंतरच्याच कालखंडात झाली. या कालावधीतच मागासवर्गीयांतील काहींनी शिक्षण घेऊन प्रगती साधली. मात्र अशी प्रगती साधणाऱ्यांच्या तुलनेत आजही गरीबीत असणारा मागासवर्ग मोठया प्रमाणात आहे. त्याला अजूनही आरक्षणाची गरज आहे, ही बाब हेतूतः नजरअंदाज केली जाते.
डॉ. आंबेडकरांविरुध्द केवळ सवर्णांतच खदखद आहे असे नाही तर मागासवर्गीय लोकही त्यांना आपलं मानत नाहीत. ज्या आंबेडकरांनी केवळ एस. सी., एस. टी. यांनाच नव्हे तर ओबीसींबरोबरच सर्व जातींतील स्त्रियांना आरक्षण मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; त्या जाती त्यांचे हे कार्य जाणतात, पण त्यांना मानत नाहीत. दलित समाजातीलच या जातीजातींतील दुहीचा राजकारणात किती पध्दतशीरपणे फायदा घेतला जातोय, हे इथे वेगळे सांगण्याची गरज नाही. आंबेडकरांसारख्या महान नेत्यालाही जातीच्या राजकारणात संकुचित करून टाकले आहे, ही खेदाची बाब आहे.
डॉ. आंबेडकरांचे अनुयायी म्हणून ज्या समाजाने निपाणीत दंगा केला; त्यांनीही आपण खरोखरीच आंबेडकरांचे अनुयायी म्हणावयाच्या पात्रतेचे आहोत का, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण डॉ. आंबेडकरांनी कधीही अहिंसेची कास सोडली नाही. महाडचा चौदार तळयाचा सत्याग्रह असो की नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह- दलितांना समानतेची वागणूक मिळविण्याच्या दिशेने मूलभूत म्हणावे, असे हे दोन लढे डॉ. आंबेडकरांनी अत्यंत संयमाने आणि सनदशीर मार्गांनी हाताळले. मात्र त्याच आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे एवढया मोठया प्रमाणात नुकसान करणारेही समाजकंटकच नव्हेत काय ? आपल्याच समाजातील एखाद्या गरीबाने टाकलेला खोका, टपरी, दुकान किंवा बूथ असेल अथवा बँकेचे कर्ज काढून घेतलेली रिक्षा असेल, ती उध्वस्त करताना आपल्या मनाला यातना होत नाहीत का ? की केवळ विध्वंसासाठी विध्वंस करायचा ? यातून नुकसान आपलेच आहे हे ध्यानात कसे येत नाही ? संपूर्ण हयातभर मूर्तीभंजक म्हणून वावरलेले डॉ. आंबेडकर आज असते तर त्यांनी स्वतःच आपले पुतळे हातोडयाचे घाव घालून फोडले असते. कारण प्रतिमांशी निष्ठा बाळगणारे अनुयायी त्यांना कधीच अभिप्रेत नव्हते तर विचारांशी निष्ठा आणि समाजोन्नतीसाठी प्रामाणिक कृतिशीलता त्यांना अभिप्रेत होती. पण आपल्याला विचारांशी काय देवाणघेवाण ? विचारांशी देणेघेणे असते तर डॉ. आंबेडकरांच्या पुतळयाचे दुग्धाभिषेकाने शुध्दीकरण करण्याचा हास्यास्पद प्रकारही होऊ देण्यात आला नसता.
'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या डॉ. आंबेडकरांनी व्यापक अर्थाने दिलेल्या संदेशाचा त्यांच्या अनुयायांनी अत्यंत संकुचित अर्थ घेतला आहे, असे खेदाने म्हणावे लागते. सवर्णांनी शिक्षणाच्या जोरावर शतकानुशतके आपले वर्चस्व अबाधित ठेवले तर तळागाळातील समाजाला त्या शिक्षणापासून वंचित ठेवूनच गुलामगिरीच्या जोखडात अडकविले, ही बाब डॉ. आंबेडकरांच्या लक्षात आली होती. त्यामुळे शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हेही त्यांना कळून चुकले होते. म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ते शिकले. इतके उच्चविद्याविभूषित झाले की त्यांच्या तोडीचे शिक्षण घेणारा माणूस आजही या देशात नाही. केवळ शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान त्यांना अपेक्षित नव्हते तर शिक्षणामुळे येणारी विचारक्षमता, चिंतनशीलता, स्वाभिमान आणि त्यातून निर्माण होणारा आत्मोन्नती आणि समाजोन्नतीचा विचार अभिप्रेत होता. 'संघटित व्हा आणि संघर्ष करा' याचा अर्थही गटबाजी किंवा हिंसा असा खचितच नव्हता. 1929मध्ये नाशिक जिल्ह्यातील चितेगाव येथील एका परिषदेतील त्यांच्या भाषणात याचे स्पष्टीकरण आढळते. ते म्हणाले होते की, 'मनुष्याचा स्वाभिमान टिकवून धरणारी शिक्षण ही एकमेव गोष्ट नाही. शिक्षणाने जर माणुसकी मिळती तर सुशिक्षित आणि अधिकारी यांच्याकडून आमच्यावर अन्याय झाला नसता. माणुसकीसाठी निकराचा लढा करा. आपल्या ध्येयातील व मार्गातील अडथळे स्वतःच दूर करून आपल्यावरील कलंक तुम्ही स्वतःच धुवून दूर करा.' या आवाहनातच संघटन आणि संघर्ष या संज्ञांचा अर्थ स्पष्ट होतो. पण त्यादृष्टीने विचार करण्याची क्षमताच आज समाज हरवत चालला आहे. कारण त्यासाठी विचारांचा अभ्यास करावा लागेल आणि ती तयारी समाजात दिसत नाही- दलितांतही, सवर्णांतही आणि बहुजन समाजातही. परिणामी भावनांच्या उद्रेकाची परिणती संपूर्ण समाजाचेच आर्थिक नुकसान होण्यात होते. यातून होणाऱ्या आर्थिक हानीपेक्षा होणारी सामाजिक हानी चिंताजनक आहे.
भारतीय समाजातील दरी सांधण्याचा प्रयत्न घटनाकार डॉ. आंबेडकरांनी केला आहे; पण सध्या एक 'दोरखंडाचा पूल' असेच त्याचे स्वरुप आहे. तो तोडण्यास सुरूंगाची नव्हे, केवळ एका दगडाचीच गरज असते. असे दगड वारंवार बरसू लागले तर, तिथे पक्का पूल कधीच बांधता येणार नाही आणि ही दरी रुंदावत जाण्याचाच धोका अधिक आहे. प्रजासत्ताकाच्या स्थापनेनंतर 55व्या वर्षानंतरही दलित आणि सवर्ण या शब्दांचा वापर करीत लेख लिहावा लागणे, हे त्याचेच द्योतक नव्हे काय?